साउंड आँफ नॉईस- नव्या बंडाची सुरुवात

>> Monday, September 3, 2012


एक परिचित दृश्य. भरधाव जाणारी गाडी. प्रथम दिसतो ,तो गती सूचित करणारा मागला टायर. साउंडट्रॅकवरही ,या गतीला सुसंगत असं जोरदार संगीत. मग दिसते, ती प्रत्यक्ष गाडी, एक व्हॅन. मग ही गाडी चालवणारी तरुणी, शाना पेरशाँ (अभिनेत्रीचं नावही हेच). शानाची मान संगीताच्या तालावर हलते आहे, म्हणजे हे केवळ पार्श्वसंगीत नाही. कदाचित गाडीत लावलेलं असावं. आता ती मान वळवून मागे पाहाते आणि आपल्या लक्षात येतं ,की संगीत गाडीतलंच आहे, पण म्युझिक सिस्टीमवर लावलेलं नाही. तर शानाच्या मागे एक ड्रमर बसलाय, ड्रम्सचा एक मोठासा सेट घेउन. हा मॅग्नस ( मॅग्नस यॉरहेन्सन).त्याच्या ड्रम्सच्या तालावर व्हॅनची गती वाढत चालली आहे.
केवळ परिणामासाठी घातलेलं पार्श्वसंगीत आणि कथेच्या अवकाशात प्रत्यक्ष स्थान असणारं संगीत यांची ही सरमिसळ इथे केवळ तेवढ्यापुरती गंमतीदार वाटत नाही तर ती ब-याच प्रमाणात चित्रपटाचा मूड ठरवून देते. या सरमिसळीला ‘साउंड आँफ नॉईस’ मधे महत्व आहे कारण मुळात संगीतालाच या चित्रपटाच्या संकल्पनेत केंद्रस्थान आहे. स्वीडिश-फ्रेन्च चित्रपट ‘साउंड आँफ नॉईस’ हे विनोद, गुन्हेगारी आणि संगीतिका, यांचं एक अतिशय विक्षिप्त मिश्रण आहे. विक्षिप्त अशासाठी, की यातल्या एकाही घटकाचा, तो परिचीत अर्थाने उपयोग करत नाही. इथला विनोद उपरोधाने वापरला जातो तर गुन्हेगारी प्रतिकात्मक असल्याप्रमाणे. संगीत हे  नेहमीसारखं नाच-गाण्यांच्या साथीने येत नाही, तर आँल्टरनेटिव संगीताचे तुकडे ,आविष्कारस्वातंत्र्याला वाट करुन दिल्यासारखे येतात.
 दिदर्शक ओला सिमॉन्सन आणि योहान्स स्ट्यार्न निल्सन यांचा 'साउंड आँफ नॉईस' (२०१०) हा हाय कन्सेप्ट चित्रपट आहे. इतका ,की त्यात एक सोडून दोन हाय कन्सेप्ट कथासूत्रांचं मिश्रण आहे. पहिलं आहे ते संगीत विश्वातल्या एका नामांकित कुटुंबात जन्मूनही संगीताचा गंध नसलेल्या पोलिस अधिकारी नायकाने केलेला संगीताशी संबंधित गुन्ह्यांचा तपास, आणि  दुसरं आहे, ते सर्वत्र चालू असलेल्या सुमार संगीत निर्मितीचा वीट आलेल्या बंडखोर म्युझिशीअन्सनी अकल्पनीय साधनांचा वाद्यांसारखा वापर करुन संपूर्ण शहराला वेठीला धरणं. ही दुसरी संकल्पना तर खूपच तपशीलात रंगवलेली आहे. लुइगी रूसोलोने १९१३ मधे उपलब्ध वाद्यांमधून होणारी संगीतनिर्मिती किती तोकडी आहे अशी कल्पना आपल्या 'द आर्ट आँफ नॉईसेस' या प्रबंधात मांडली होती ,ज्याच्या नावाशी चित्रपटाच्या नावाचं साम्य हा उघडच योगायोग नाही. औद्योगिक क्रांतिमुळे कानावर पडणा-या आवाजात किती बदल होत गेला आहे हे त्या प्रबंधात नोंदवलं गेलं होतं आणि या नव्या शक्यतांमुळे संगीत कसं बदलू शकतं असा त्याचा रोख होता. भविष्यात उपलब्ध होणा-या नव्या ध्वनीला त्यात सहा प्रकारांत विभागलं होतं. हे सहा प्रकारदेखील चित्रपटाच्या संकल्पनेत सहभागी होतात ते सहा बंडखोरांच्या निमित्ताने.
 मॅग्नस आणि शाना हे या बंडखोर टोळीचे प्रमुख आहेत. मॅग्नसने आपल्या संगीतक्रांतिला नव्या पातळीवर नेण्यासाठी एक योजना मांडली आहे. तिचं नाव ' म्युझिक फॉर वन सिटी अँन्ड सिक्स ड्रमर्स' , ज्यातला सहा हा आकडा अर्थातच आर्ट आँफ नॉईसेसची आठवण करून देणारा.सुरूवातीला जेव्हा मॅग्नस आपल्या योजनेचं बाड शानाच्या हवाली करतो तेव्हा ते पाहून आपल्याला फार काही लक्षात येत नाही. बरोबरच्या गंमतीदार अॅनिमेशनमधून ही योजना थोडक्यात स्पष्टही केली जाते ,मात्र आपण त्या पध्दतीचा विचार करत नसल्यास तेही आपल्याला पूर्णपणे न कळण्याची शक्यता अधिक. एका शहरात बरंच गुंतागुंतीचं आणि संगीताशी संबंधित काहीतरी घडवण्याचा प्रयत्न असावा एवढं समजलं तरी पुरे. (' म्युझिक फॉर वन अपार्टमेन्ट अँन्ड सिक्स ड्रमर्स 'ही याच मंडळींनी बनवलेली शॉर्ट फिल्म आहे ज्यावरून हा पूर्ण लांबीचा चित्रपट सुचला . ती  पाहिली असल्यास मात्र तुम्ही या बंडाची थोडीफार कल्पना करू शकता) शाना या योजनेवर खूष होते आणि तडकाफडकी ती पूर्णत्वाला नेण्याची तयारी सुरु करते.
इकडे आमाडीयूस( बेन्ड निल्सन)हा पोलिस इन्स्पेक्टर थोडा काळजीत पडलेला. महान कंपोजर मोझार्टशी जोडलं गेलेलं नाव लावणारा हा अधिकारी संगीत क्षेत्रातल्या एका नावाजलेल्या घराण्याचा भाग असतो. वडील आणि भाऊ याच क्षेत्रातली नावाजलेली व्यक्तिमत्व, पण टोन डेफ असल्याने आमाडियूसला संगीताचा गंध नाही.  घरच्या आणि बाहेरच्या लोकांकडून कायमच दुर्लक्षित राहिलेला तो, संगीताचा द्वेष करतो. संगीत विसरण्याचा प्रयत्न करणार््या या नायकाला काहितरी गडबड असल्याची शंका येते ,ती संगीतात बीट्स मोजण्यासाठी वापरलं जाणारं  मेट्रोनोम हे छोटंसं यंत्र एका अपघातस्थळी मिळाल्यावर. लवकरच बंडखोर आपला पहिला संगीत हल्ला चढवतात आणि आमाडीयूसला त्यांच्या बंदोबस्ताचं काम स्वीकारावं लागतं.
संकल्पनेच्या स्तरावर ब्रिलिअंट चित्रपटांचा ब्रिलिअन्स प्रत्यक्ष निर्मितीत टिकवणं हे कठीण काम असतं.विशेषतः जेव्हा या संकल्पना दृश्य योजनेच्या पलीकडे जाणा-या असतात तेव्हा. परफ्यूम मधे योजलेला वासासारख्या ,प्रेक्षकाला न जाणवणा-या गोष्टिचा वापर,   मेट्रिक्स मधल्या तत्वज्ञानासंबंधित कल्पना , यासारख्या गोष्टी प्रेक्षकाला खास विचार करायला न लागता त्याच्यापर्यंत पोचायला लागतात. तरच तो ककथानकाशी समरस होऊ शकतो. इथली संगीताला गुन्ह्याप्रमाणे मांडण्याची आणि या संगीताच्या खेळामुळे शहर खरोखरच हादरून जाऊ शकेल ही ,या दोन्ही कल्पना संहितेत ठिक वाटू शकतात पण सादरीकरणात त्यांचा टिकाव लागणं हे खरं आव्हान आहे.चित्रपट हे थोड्या विनोदाच्या आणि थोड्या प्रेक्षकांकडून अपेक्षित असलेल्या विलिंग सस्पेन्शन आँफ डिसबिलीफच्या मदतीने करून दाखवतो. उदाहरणार्थ बँकेवरल्या दरोड्यासारखा भासणारा संगीतप्रयोग पाहाता येईल. इथे ड्रमर्सनी बँक रॉबर्सच्या पारंपारिक वेषात येणं आणि त्याच थाटात पण महत्वाचे शब्द फिरवून बँकेतल्या लोकांना धमकावणं ('धिस इज अ गिग . वुई आर आेन्ली हिअर फॉर द म्युझिक. लिसन , अॅन्ड नोबडी विल गेट हर्ट' ) त्याला जोडून येणारा पोलिसांना खबर मिळण्याचा ,त्यांनी बँकेपर्यत येण्याचा ट्रॅक आणि अर्थात  'गिग' चा भाग असलेलं ,पण पडद्यावरल्या संकेताना पूरक असणारं वेगवान संगीत या सगळ्याचा परिणाम म्हणून ही घटना कथानकाच्या चाैकटीत विश्वसनीय होते. याच पध्दतीने चित्रपट बहुतेक प्रसंग हाताळतो आणि ब-याच प्रमाणात संकल्पनेचा परिणाम शाबूत ठेवतो.
इथे एक गोष्ट उघड आहे आणि ती म्हणजे कथानकाचा अर्थ शब्दश: घेता येणार नाही. बंडखोरांचा विरोध आहे तो मिडिआँक्रिटिला आणि आमाडियूसचा विरोध आहे तो त्याच्या कुटुंबियांच्या वर्तुळातल्या एलिटिस्ट वागण्याला. कलाविश्वाच्या अगदी खालच्या आणि अगदी वरच्या टोकांना मोडून काढत चित्रपट महत्व मांडतो ते नव्या विचारांचं, आविष्कार स्वातंत्र्याचं आणि व्यक्तिवादाचं. त्याचं हे धोरण त्याला संगीतक्षेत्रापुरतं मर्यादित ठेवत नाही, तर एक सामाजिक विधान म्हणून प्रेक्षकापुढे आणतो.
 -गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP