ऑस्कर २०१३ अर्थात नामांकनांचा घोटाळा

>> Saturday, February 23, 2013



गेल्या वर्षी हजानाविशसच्या 'द आर्टीस्ट' या मूकपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं आँस्कर मिळालं आणि नेमाने चांगले चित्रपट पाहाणारे बरेच रसिक गांगरले. चांगला असूनही, त्यावर्षीचा तो सर्वोत्कृष्ट चित्रपट होता का, तर उघडच नव्हता. आशय, संवेदनशील सादरीकरण, आव्हानात्मक भूमिकेतला दर्जेदार अभिनय अशा अनेक बाबतीत अलेक्झान्डर पेनचा 'द डिसेन्डन्ट्स' कितीतरी अधिक चांगला होता. तरीही त्याला डावलून द आर्टीस्ट पारितोषिकप्राप्त ठरल्याचं कोणाला काही वाटलं नाही, किंबहुना बऱ्याच अंदाजपत्रकात ते आर्टीस्टलाच जाईल, असा अंदाजही वर्तवला गेला होता. असं होण्यामागे कारण आहे.
ऑस्कर पारितोषिकांबद्दल असा एक लोकप्रिय समज आहे की, ते त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला दिलं जातं. खरंतर हे अर्धसत्य आहे. ऑस्कर नामांकनाची यादी ही पुरेशा तपशिलात आणि प्रामाणिकपणे दर्जाकडे पाहणारी असते हे बहुतांशी खरं आहे, मात्र त्यातून एकाला निवडताना संबंधित व्यक्तींच्या एकूण कारकिर्दीपासून ते वादग्रस्तता टाळण्यापर्यंत आणि चित्रपटाच्या व्यावसायिक यशापासून ते त्याच्या तत्कालीन महत्त्वापर्यंत अनेक बाजूंनी विचार होतो. त्यामागे हॉलीवूडची तत्कालीन मन:स्थिती असते, ऑस्करआधी येणाऱ्या बाफ्टा, गोल्डन ग्लोबसारख्या पारितोषिकांच्या निकालांचा त्याच्यावर परिणाम होत असतो, व्यावसायिकता आणि प्रयोग यांच्या निकषावर अ‍ॅकॅडमीचे मतदार दरेक चित्रपटाला तोलून पाहत असतात. थोडक्यात सांगायचं तर प्रत्यक्ष दर्जा हा या साऱ्या गणितात मागे कुठेतरी राहून जातो. अर्थात, हे झालं मुख्य स्पध्रेबाबत. परभाषिक चित्रपट, लघुपट आणि माहितीपट, या तीनही वर्गात तो अतिशय काटेकोरपणे पाळला जातो.
या सगळ्यावरून असं स्पष्ट व्हावं की ऑस्कर प्रेडिक्शन हे शास्त्र आहे आणि या पाश्र्वभूमीचा अंदाज असणारे लोक ते सहजपणे करू शकतात. बहुतेक वर्षी तर ते खूपच सोपं असतं. या वर्षी मात्र ते तसं नाही. किंबहुना या वर्षीच्या चित्रपटांचा दर्जा आणि नामांकन यादी यामधल्या काही विसंगती हा अंदाज जवळपास अशक्य करून सोडतात.
गेली काही र्वष अ‍ॅकॅडमीने आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारांत एक मोठा बदल केला आहे आणि तो म्हणजे या वर्गातली नामांकनाची यादी त्यांनी जवळजवळ दुप्पट केली आहे. पाचऐवजी आता दहापर्यंत कितीही नामांकनं या वर्गात देता येतात. या वाढीव यादीचा एक मोठा फायदा असतो. अनेकदा काही चित्रपटांना ऑस्कर मिळणार नाही हे गृहीत असतं. यात उत्तम परभाषिक चित्रपट असू शकतात, प्रयोग म्हणून केलेली निर्मिती असू शकते. तसंच ऑस्कर कटाक्षाने टाळत असलेले वाद वा हिंसाचार यांना या हमखास डावलल्या जाणाऱ्या चित्रपटात महत्त्वाचं स्थान असू शकतं. या चित्रपटांचा दर्जा अ‍ॅकेडमीला मान्य असला आणि तो अधोरेखित करण्याची इच्छा असली, तरी त्यांना पारितोषिक मिळणार नाही हे गृहीत असल्याने पूर्वीच्या पाचांच्या यादीत त्यांचा समावेश मुळातच होत नसे. आता ते शक्य होतं. प्रोमिथिअस, हिचकॉक, द डार्क नाइट राइजेस, हॉबिटचा प्रथम भाग, स्कायफॉल अशा अनेक चित्रपटांकडे एकूणातच दुर्लक्ष करूनही यंदाची यादी नऊ चित्रपटांची आहे. या यादीत ऑस्ट्रिअन चित्रपट आमोर (याला परभाषिक निर्मितीचा पुरस्कार निश्चित आहे), लो बजेट इंडी निर्मिती 'बीस्ट्स ऑफ द सदन वाइल्ड', किंवा टेरेन्टीनोचा नेहमीचा मसाला असणारा 'जँगो अनचेन्ड' या  केवळ मानाच्या स्वाऱ्या आहेत. यांचा समावेश कौतुकासाठी झाला असला, तरी त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळणं शक्य नाही. खरी स्पर्धा आहे ती इतर सहांमध्ये. पण तिथेही अ‍ॅकॅडमीने नामांकनात पुष्कळच गोंधळ करून ठेवलेत.
यंदा या यादीतला सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता, असा प्रश्न करताच उत्तर येतं, ते 'आर्गो'. बेन अ‍ॅफ्लेकने गेल्या काही वर्षांत सिद्ध केलंय की अभिनयापेक्षा दिग्दर्शनात तो अधिक पारंगत आहे. गॉन बेबी गॉन, टाऊन आणि आता आर्गो या तिन्ही चित्रपटांत त्याची कामगिरी विशेष प्रशंसनीय आहे. दंगलग्रस्त इराणमधल्या कनेडिअन एम्बसीत आश्रयाला राहिलेल्या सहा अमेरिकनांची सुटका करण्याचा यशस्वी प्रयत्न दाखवणाऱ्या 'आर्गो'ला प्रेक्षक आणि समीक्षक अशा सर्वानी पूर्ण पािठबा दिला आहे. गोल्डन ग्लोब आणि बाफ्टामध्येही चित्रपट आणि दिग्दर्शक हे दोन्ही पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. त्यामुळे 'आर्गो' इथेही विजयी ठरेलसा अंदाज डोळे मिटून करायला काहीच हरकत नव्हती. मात्र तसं करता येत नाही ते दिग्दर्शकीय नामांकनात अ‍ॅफ्लेकचं नावच वगळल्याने. सामान्यत: सर्वोत्कृष्ट चित्रपट हा दिग्दर्शनाच्या नामांकनात असतोच. तसा नियम नाही, अपवादही आहेत, मात्र ते तर्काला आणि सरासरीला धरून आहे. त्यामुळे 'आर्गो' लायक आणि आवडत्या चित्रपटात असूनही त्याचा विजय डळमळीत आहे. या प्रकारचीच आश्चर्यकारक गरहजेरी म्हणजे हर्ट लॉकरसाठी विजेत्या ठरलेल्या कॅथरीन बिगेलोची, जी ओसामा वधप्रकरणावर बनलेल्या 'झीरो डार्क थर्टी'ची दिग्दíशका आहे. तो चित्रपटही नामांकनात आहे, जरी त्याचा विजय टॉर्चर सीक्वेन्सेस आणि राजकीय वाद यांमुळे मुळातच डळमळीत आहे.
याउलट डेव्हिड ओ रसेलच्या 'सिल्वर लायिनग्ज प्लेबुक' या किंचित वेगळ्या वातावरणातल्या रोमँटिक कॉमेडीला मात्र चित्रपट आणि दिग्दर्शक धरून अनेक महत्त्वाच्या वर्गात नामांकनं आहेत. आता 'आर्गो' किंवा 'झीरो डार्क' हे 'सिल्वर लायिनग..'हून अधिक कठीण आणि अधिक दर्जेदार आहेत हे काही मी सांगायची गरज नाही, मात्र तरीही त्यांना दिग्दर्शक म्हणून नामांकन नसणं थोडं अजब वाटणारं आहे. सध्याच्या नामांकनांवरून असं वाटतं की एरवी चित्रपट वा दिग्दर्शनासाठी पुरस्कारप्राप्त ठरण्याची शक्यता नसलेल्या स्पीलबर्गच्या िलकनला संधी मिळण्यासाठी तर हे घडलेलं नाही? ऑस्करमध्ये इतकी उघड खेळी होण्याचा इतिहास नसल्याने तसं नसावं. पण मग याला दुसरं स्पष्टीकरण तरी काय?
अ‍ॅफ्लेक आणि बीगेलो गरहजेरीने स्पीलबर्गची संधी वाढते हे खरं असलं, तरी दुसरा एक चित्रपटही या मानासाठी आधीपासूनच तयारीत आहे. तो म्हणजे अँग लीचा 'लाइफ ऑफ पाय'. 'पाय' पाहण्यासारखाच आहे आणि तांत्रिक बाजूंमध्ये तो अफलातूनही आहे, मात्र त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन जाण्याएवढा तो उत्तम आहे का? मला तरी तसं वाटत नाही. मात्र या चमत्कारिक परिस्थितीत, त्याला पूर्ण बाजूलाही टाकता येत नाही.
आता अशी परिस्थिती असताना, एकेकाच नावं घ्यायची तर मी चित्रपटासाठी 'आर्गो'चंच घेईन आणि दिग्दर्शनासाठी स्पीलबर्गचं. आर्गोचं आशयापासून रंजनापर्यंत साऱ्याच बाबतीत जमलेलं असणं, त्याला असलेली सत्य घटनेची पाश्र्वभूमी आणि त्याला मिळालेला सार्वत्रिक सन्मान अ‍ॅकॅडमीला बाजूला टाकता येणार नाही, अ‍ॅफ्लेक नामांकनातच नसल्याने पुढलं महत्त्वाकांक्षी चित्रपट करणारं महत्त्वाचं नाव म्हणून स्पीलबर्गला पर्याय उरत नाही.
या साऱ्या गोंधळातदेखील दोन पुरस्कार मात्र त्या मानाने पक्के आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून लिंकनच्या भूमिकेसाठी डॅनिएल डे लुईस आणि साहाय्यक भूमिकेतली अभिनेत्री म्हणून 'ल मिजराब्ल'मधल्या छोटय़ा पण लक्षवेधी भूमिकेसाठी अ‍ॅन हॅथवे.
'माय लेफ्ट फूट' आणि 'देअर विल बी ब्लड'साठी अभिनयाचं ऑस्कर दोनदा खिशात घालणारा डॅनिअल डे लुईस हा सोसाने अधिक भूमिका घेत नाही. पुरेसा वेळ लावून, आपल्याला ज्यात पूर्ण वाव आणि करायला काही वेगळं मिळेल ते तो करतो. त्यासाठी तो आपलं व्यक्तिमत्त्वही पूर्णपणे बदलून टाकतो. िलकनमधला त्याचा कोणताही एक प्रसंग तो हा पुरस्कार खिशात घालणार, हे सांगायला पुरेसा आहे. याउलट हॅथवेचा अंदाज हा अधिक गणिती आहे. तिची कामगिरी उत्कृष्ट आहे, जशी तिच्याबरोबर नामांकनात असणाऱ्या इतरांचीही. पण साधारण कल पाहता, तीच पुरकारप्राप्त ठरेल अशी खात्री वाटते.
साहाय्यक भूमिकेतल्या अभिनेत्यासाठी स्पर्धा असेल ती रॉबर्ट डी नीरो (सिल्वर लायिनग्ज) आणि टॉमी ली जोन्स (िलकन) या पोचलेल्या नटांत. ही स्पर्धा बहुधा डी नीरोच जिंकेलसं मला तरी वाटतं. लांबीने मोठी आणि ऑथर बॅक्ड अशी ही भूमिका आहे. आणि स्टार डी नीरोला वलय वा विक्षिप्तपणा बाजूला ठेवल्या अवस्थेत, केवळ एक सामान्य चिंताग्रस्त बाप म्हणून पाहण्याची संधीदेखील. हल्लीच जर क्रिस्टॉफ वॉल्ट्झला त्याच्या 'इनग्लोरिअस बास्टर्डस'मधल्या भूमिकेबद्दल ऑस्कर न मिळतं, तर या वेळी त्याची वर्णी नक्की लागती. पण सकारात्मक असूनही त्याच अभिनेत्याच्या, त्याच जातीच्या, टेरेन्टीनोच्याच चित्रपटातल्या भूमिकेला पुन्हा लगेचच हा सन्मान मिळेलसं वाटत नाही.
याउलट सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं गणित एवढं सोपं नाही. हिचकॉकसाठी हेलन मिरेन मुळात नामांकनातच नाही. पण 'आमोर'मधल्या पक्षाघाताचा झटका आलेल्या वृद्ध नायिकेच्या हृदयद्रावक भूमिकेसाठी इमॅन्युएल रिवा, जी पारितोषिक मिळाल्यास आजवरची सर्वात वयस्कर पारितोषिक विजेती ठरेल आणि तितकीच लायक असणारी आणि पूर्ण चित्रपट पेलून धरणारी 'बीस्ट्स ऑफ द सदन वाइल्ड'मधली नऊ वर्षांची क्वेन्जाने वॉलिस, जी पुरस्कार मिळाल्यास आजवरची सर्वात छोटी विजेती ठरेल, ही नावं बहुधा एकमेकांना काट मारतील आणि पुरस्कार जाईल सिल्वर लाइिनग्जच्या जेनिफर लॉरेन्सला. 'सिल्वर लायिनग्ज प्लेबुक' न फसण्याची जी मोजकी कारणं आहेत त्यातलं लॉरेन्स हे एक कारण म्हणता येईल, त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळणं योग्यही ठरेल. पण तिला न मिळाल्यास इतर कोणालाही मिळणं शक्य आहे इतकी बाकीची सारी नावं तयारीची आहेत.
स्वतंत्र पटकथेच्या पुरस्कारात मला दोन शक्यता दिसतात. पहिली टेरेन्टीनोचा 'जँगो अनचेन्ड', जो वेस्टर्न चित्रपटाच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न करत असला तरी गुलामीच्या काळातलं भीषण वास्तव आपल्या विक्षिप्त शैलीत आपल्यासमोर रेखाटतो. दुसरी शक्यता आहे ती हानेकेचा आमोर, जो पडद्यावर पाहायला मिळणाऱ्या प्रेमाच्या एरवीच्या ग्लॅमरस रूपापेक्षा त्याचं डोळ्यात पाणी आणणारं दर्शन घडवतो. मृत्यू हा हानेकेच्या चित्रपटांना अपरिचित नाही. फनी गेम्स, कॅशे, व्हाइट रिबन अशा त्याच्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांत मृत्यूला महत्त्वाचं स्थान आहे. मात्र इथल्या वृद्ध जोडप्याच्या अखेरच्या दिवसांच्या अतिशय वास्तववादी चित्रणात होणारं मृत्यूचं दर्शन एकाच वेळी कारुण्यपूर्ण आणि प्रगल्भ आहे.
आधारित पटकथेचा मान बहुधा टोनी कुशनेरच्या'लिंकन'च्या पटकथेला मिळावा जी मर्यादित कालावधीतही या राष्ट्रपुरुषाच्या व्यक्तिमत्त्वाचं त्याच्या बारकाव्यांसहित चित्रण करते. या पुरस्काराला दुसरा पर्याय आहे तो क्रिस टेरिओच्या आर्गोचा, ज्याची संहिता विषयाचं गांभीर्य, साहस, राजकारण आणि किंचित विनोद यांना सहजपणे एकत्र आणते.
अ‍ॅनिमेटेड चित्रपटांमधला यंदाचा सर्वात चांगला प्रयत्न यंदा आहे तो टिम बर्टनचा फ्रँन्केनवीनी, जो फ्रँन्केनस्टाइनच्या राक्षसाच्या कल्पनेचं नवं रूप एक लहान मुलगा आणि त्याच्या कुत्र्याच्या कथेत खास बर्टन स्टाइलमधे करतो. मात्र शक्यता अशी आहे की पुरस्कार डिस्नीचा 'रेक इट राल्फ' घेऊन जाईल, जो उत्तम असला, तरी अधिक पारंपरिक वळणाचा आहे.
लाइफ ऑफ पायचं खूप कौतुक होऊनही आणि काही काळ तो प्रमुख विजेता ठरेलसं वाटूनही आता मात्र त्याला तांत्रिक पुरस्कारांवरच समाधान मानायला लागण्याची शक्यता दिसते आहे. वास्तव आणि फँटसी यांच्या अधेमधे वावरत यातल्या खिळवून ठेवणाऱ्या दृश्यप्रतिमा क्लॉडिओ मिरांडाला छायाचित्रणाचा पुरस्कार नक्कीच मिळवून देतील. इतर ठिकाणी मात्र त्याला हॉबिटशी टक्कर द्यावी लागेल.
जेव्हा एखादा चित्रपट सर्वोत्कृष्ट आणि परभाषिक या दोन्ही वर्गात नामांकन मिळवतो तेव्हा त्याला सर्वोत्कृष्ट मिळणार नाही, पण परभाषिक नक्की मिळेल असा अलिखित नियम आहे. रॉबेर्तो बेनिनीचा 'लाइफ इज ब्युटिफूल' हे याचं उदाहरण मानता येईल. त्यामुळे या वेळची परभाषिक चित्रपटांची स्पर्धा सुरू होण्याआधीच संपल्यात जमा आहे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. 'आमोर'चं हे बक्षीस कोणीच काढून घेऊ शकत नाही.
अर्थात या अंदाजांपलीकडे जाऊन खरे विजेते जाणून घ्यायला फार वाट पाहावी लागणार नाही. घोडामदान जवळ आहे.
- गणेश मतकरी (लोकसत्तामधून)

10 comments:

Dnyaneshwar February 24, 2013 at 1:24 AM  

माफ करा पण मी आपल्या मताशी असहमत आहे..

मी झिरो डार्क थर्टी आणि आर्गो दोन्हीही पहिले आणि मला तरी ते तेवढे आवडले नाहीत.. त्यातल्या त्यात आर्गो तर नाहीच.. शेवटचा प्रसंग कधी झालाच नव्हता पण तो त्यांनी स्पीड वाढावा म्हणून घेतला असे समजले तरी तार्किक दृष्ट्या किती चुकीचा प्रसंग आहे तो.. अमेरिकेचे इराण मध्ये असणारे लोक ते ६ सोडून अजूनही होते.. जर इराणच्या लोकांना हे कळले कि CIA आणि कॅनडा यांनी अमेरिकन लोकांना सोडवून नेले तर मागे राहिलेल्या अमेरिकन लोकांचे भविष्य काय? इराणी लोकांनी त्यांना जिवंत ठेवले असते? ४४४ दिवसानंतर त्यांची सुटका झाली तोपर्यंत इराणचे लोक मुग गिळून गप्पा बसले? हे आणि असे कित्येक प्रश्न पडताच राहतात. अलन अर्कीन ला का नामांकन दिले असा पण प्रश्न मला पडला आहे..

ganesh February 24, 2013 at 4:16 AM  

Dnyaneshwar, me maf karnyacha prashna nahi, you are free to like or dislike whatever you want.

the opinion which you are giving is about the policy and not about the film.though there are many dramatic modifications in the film ,the crisis and the rescue were true so your questions have no meaning.

Also ,you should understand that the article is in the context of these 9 films. personally, I liked Prometheus and Dark Knight rises even better than Argo , but talking about them here would be ridiculous.

Also ,I stand by my opinion that Argo is the best film of the lot and is the best candidate amongst the nine to win tomorrow. I have explained the reason in detail, so I am not going into it again. and since you are not saying your reasons ( the ones you mention can't be called the reasons) there is noting to discuss.

Vivek Kulkarni February 24, 2013 at 6:33 AM  

सोबत दिलेल्या लिंक वर आर्गो नेमकं कशाबद्दल नाही हे चांगलं सांगितलं आहे. http://www.frontlineonnet.com/stories/20130308300410100.htm

Ashish February 26, 2013 at 12:01 AM  

Ganesh,

TV var tumachi mulakhat pahili. Chhan mate mandalit tumhi.

attarian.01 February 26, 2013 at 4:57 AM  

मी सुद्धा काल तुमची मुलाकात पाहिली .पण मुलान मूले पूर्ण पाहता आली नाही . तरी ती कुटे नेट वर टाकल्यास लिंक कलवावे .

Ashish February 26, 2013 at 10:34 AM  

गणेश,

ख्रिस्तोफ वॉल्टझ बाबतचा अंदाज साफ चुकला.
मी जॅन्गो अजून पाहिला नाही. पण बास्टर्डस नंतर त्याचा ग्रीन हॉर्नेट, वॉटर फॉर एलीफंटस् बघितला.
थोड्याफार फरकाने अतिशय धूर्त आणि विक्षिप्त अशीच त्याची पात्रं आहेत ही. पण अजूनही त्याला परत परत पहावे वाटते. आताशी अभिनयाची एक छटा दाखवून त्याने २ ऑस्कर्स खिशात घातलीयेत. या माणसाची पुढील वाटचाल नक्कीच प्रेक्षणीय असेल.

आणखी एक शंका..
यातले निम्मेअधिक चित्रपट भारतात अजून रीलीस झाले नसताना तुम्ही कसे पाहिले?

लेख सुंदर झाला आहे.

आशिष.

ganesh February 26, 2013 at 10:42 AM  

Ashish, Thanks.
Kahi vela andaj chuklyacha anand asto, waltz is such a case. Although I had mentioned that he deserved and would have gotten definitely if he had not already received in a similar type of role. So fair enough.
Attarian, this is the link. though I am not sure how long before its removed.its in small segments.

http://zeenews.india.com/marathi/news/video/ऑस्कर-कम्स-टू-रोखठोक-१/162666

ganesh February 26, 2013 at 10:45 AM  

Ashish,
Sadhyaa internet war sarva kahi asta. either official or unofficial way

अमित दत्तात्रय गुहागरकर March 4, 2013 at 11:09 PM  

तुम्ही वर्तवलेले बहुतेक अंदाज बरोबर आले.

ganesh March 10, 2013 at 10:40 PM  

Yes Amit. Usually it is not very difficult but this year was next to impossible. more of a fluke than andaj !

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP