वुई आर आँन , होऊन जाऊ द्या- एक फिक्स्ड मॅच

>> Monday, June 10, 2013

चित्रपट यशस्वी कधी मानावा यावर मी गेले बरेच दिवस विचार करतो आहे. केवळ त्याची आर्थिक कमाई म्हणजे त्याचं यश का? केवळ त्याला मिळणारं रसिकांचं प्रेम म्हणजे त्याचं यश का?  का त्याच्या कलात्मक दर्जालाही गणितात धरणं आवश्यक आहे? आणि समजा एखादी कलाकृती जर यातल्या एखाद्या पातळीवर यशस्वी होऊन इतर पातळ्यांवर तडजोड करत असेल तर? मग तिचं यश हे यश मानता येणार नाही का? का यातली कोणतीही एक फुटपट्टी चित्रपटाला यशस्वी मानण्यासाठी पुरेशी आहे?
जर माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल, तर मला वाटतं पालेकर-गोखले कृत ( हा शब्द चांगला!) ' वुई आर आँन, होऊन जाऊ द्या' या चित्रपटाला यशस्वी मानायला काहीच हरकत नाही. कारण वुई आर आँनने आर्थिक दृष्टिकोनातून समाधानकारक कामगिरी केली असेल अशी माझी खात्रीच आहे. मात्र ते उत्तर होकारार्थीच असेल अशी माझी अजून खात्री नाही.
या चित्रपटाबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा क्रिकेट मॅच या विषयावर आता पुन्हा चित्रपट करण्याची काय गरज ,ही माझी प्रथम प्रतिक्रिया होती. लगान मधे हा विषय इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या उत्तम रितीने हाताळला गेलाय, की फार रॅडिकली वेगळं काही सांगायचं नसेल तर तो पुन्हा हाताळणं अनावश्यक ठरावं. वुई आर आँन रॅडिकली वेगळं काही सांगत नाही. ( आता मला कोणी प्लीज असं सांगू नका, की तो हिंदी चित्रपट होता आणि हा मराठी आहे, किंवा त्यात ब्रिटीश विरुध्द ग्रामीण भारतीय असा लढा होता आणि इथे सुखवस्तू मध्यमवर्गीय समाजातल्या दोन पिढ्यांमधे तो खेळला जातो हा वेगळेपणा आहे वगैरे) एका मूलभूत पातळीवर हा संघर्ष तोच आहे. खेळाची जाण असणारी आणि हमखास जिंकण्याची शक्यता असणारी एक टीम ,तर खेळाबाबत अनभिज्ञ,कमकुवत पण न्याय्य बाजू लढवणारी दुसरी टीम. यातली कोणती टीम जिंकणार, हे पारंपारिक सुखांतिकांच्या न्यायाने आधीच ठरून गेलेलं. त्यामुळे खरा संघर्षही लुटुपुटीचा, मात्र उत्तम  पटकथा आणि तरबेज दिग्दर्शकाच्या हाती जमण्याची शक्यता असणारा. लगान मधे तो जमून जातो, पण म्हणजे तो वुई आर आँन मधेही तो जमेल असं सांगता येणार नाही.
पालेकरांची ख्याती ही वेगळ्या प्रकारचे चित्रपट करणारा दिग्दर्शक अशी आहे. त्यांचा त्यातल्यात्यात पारंपारिक वळणाचा व्यावसायिक चित्रपट म्हणजे 'पहेली' , मात्र तोही लक्षवेधी होता तो त्याच्या मनी कौलांच्या दुविधावर आधारित असण्यामुळे, ज्यासाठी या रुपांतरालाही एक प्रयोग म्हणता येईल. पण असा वेगळा ट्रॅक रेकॉर्ड असलेला माणूस परिचित नाट्यपूर्ण विषयावर ,सरधोपट विनोदी चित्रपट का काढेल, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि जर काढला , तर त्यात काही वेगळं करुन पाहाण्याजोगं असेल अशी अपेक्षा तयार होते. 'विनोदी का?' याचं एक सोपं उत्तर म्हणजे ऋषिकेष मुखर्जी आणि बासू चतर्जी यांच्या चित्रपटांतून पालेकरांनी केलेल्या उत्तम विनोदी भूमिका. या भूमिकांची आठवण त्यांना त्या मार्गाने येणं शक्य जरुर आहे, आणि या चित्रपटाच्या सुरुवातीला आलेल्या या दोन मोठ्या दिग्दर्शकांची आठवण जागवणा-या पाटीमुळे हा चित्रपट त्या वळणाचा असल्याचा संभव आपल्याला वाटणंही स्वाभाविक आहे, मात्र त्यात तथ्य नाही.
वुई आर आँनचं कथानक हे मुळात विनोदी वळणापेक्षा अधिक नाट्यपूर्ण वळणाचं आहे. त्यातला विनोद हा प्रासंगिक नसून शाब्दिक आहे. तोही फार वेगळ्या शैलीतला नाही . त्यामुळे त्याला प्रामुख्याने विनोदी चित्रपट म्हणून सादर करणं आणि त्यासाठी कमी जास्त वजनाच्या आणि विनोदाची उत्तम जाण असणा-या विनोदी नटांची भली मोठी यादी  चित्रपटात आणणं हा अट्टाहास मुळातच का, हे कळायला मार्ग नाही. एरवीच्या विनोदी चित्रपटांहून कितीतरी अधिक विनोदी नट इथे एकत्र पाहायला मिळतात. पण पाहायलाच. त्यापुढे जाऊन त्यांनी तुम्हाला हसवावं अशी अपेक्षा असेल, तर मात्र ती पुरी होणं कठीण!
चित्रपटाच्या कथानकाबद्दल लिहिण्यासारखं फार काही नाही, कारण मुळात कथानक म्हणण्याजोगं इथे फार काही नाही. ( ते तसं नसणं हे मुळात वाईट नाही. एखाद्या वाक्यात सांगण्याजोग्या कल्पनेवर चांगले चित्रपट होणं सहज शक्य आहे. कल्पना इथे आहे, पण तेवढंच) एका मध्यमवर्गीय वस्तीजवळच्या मैदानात सकाळी चालायला येणारा पेन्शनरांचा गट ( यात दिलीप प्रभावळकर ,आळेकर, अशोक सराफ आणि या वयोगटातल्या इतर लोकांबरोबर अनासपुरे का असतो? हा गट नक्की कोणाचा आहे) आणि तिथे एका क्रिकेट मॅचसाठी प्रॅक्टीस करणारी तरुण मुलं ( यातली बहुतेक जणं पहिल्या गटाच्या मुलांपैकीच) यांच्यात मैदानावरच्या हक्कावरुन होणारा संघर्ष आणि त्यासाठी खेळली जाणारी मॅच हा इथला कथानकाचा ऐवज. लगानप्रमाणेच इथेही उत्तरार्धात मॅच खेळली जाते. ती उत्कंठावर्धक वगैरे मात्र होत नाही.
माझ्या मते इथले दोन प्रमुख प्रश्न आहेत ते मोठ्या संख्येने असणा-या सारख्याच वजनाच्या व्यक्तिरेखा आणि खेळाशी मुळात जोडलेला तोचतोचपणा या संबंधातले. इथे म्हणायला कोणीच प्रमुख व्यक्तीरेखा नाही किंवा म्हंटलं तर सा-याच प्रमुख व्यक्तिरेखा. त्यामुळे सर्वांना मिळणारा पडद्यावरला वेळ लोकशाही तत्वावर समान विभागलेला. त्यामुळे प्रेक्षकांना विशिष्ट व्यक्तिरेखांवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. सर्वच घरांमधले प्रसंग आलटून पालटून येत राहातात , पटकथा मात्र पुढे सरकत नाही. शिवाय ही नटमंडळी विनोदी असल्याने चित्रपटात तथाकथित विनोदी संवादांची रेलचेल. सर्व नट सतत, विश्रांती न घेता बोलतात. त्यातला बराच विनोद 'चावट' वर्गातला. का, कोणाला माहीत. आपला प्रातिनिधिक मध्यमवर्ग इतका सेक्शुअली डिप्रेस्ड आहे ही नवीनच माहिती मला इथे मिळाली.
दुसरा प्रश्न आहे तो पडद्यावरल्या खेळासंदर्भात नेहमीच पडणारा. मुळात कोणताही खेळ हा रिपीटीटीव असतो. तो नियमितपणे पाहाणारे, हे त्याच्या उर्जेसाठी , उतार चढावांसाठी आणि अनपेक्षित निकालासाठी तो पाहातात. एकदा का तो चित्रपटात आला की मुळातच त्याच्या निकालाची अनपेक्षितता निघून जाते आणि गेम फिक्स्ड होतो. कोण जिंकणार हे तुम्हाला समजलेलं असतं आणि तरीही त्यात अनपेक्षिताचा आभास तयार करणं हे आव्हान ठरतं . इथे आपल्या मनात कोण जिंकेल याबद्दल जराही संभ्रम राहात नाही. मग उरतो तो केवळ उपचार.
वुई आर आँन मधे मधल्या काळातल्या सो कॉल्ड विनोदी चित्रपटांप्रमाणे जशी बडबड आहे, तसं सर्वांनी रांगेत उभं राहून बोलणंही आहे. मला वाटलं होतं हल्ली ही पध्दत टाळली जाते. पण नसावी. पूर्वार्धात आपल्याला व्यक्तिरेखांची माहिती दिली जाते आणि निदान थोडी व्हरायटी दिसते. उत्तरार्धात मात्र तेही नाही. एकदा मॅच सुरू झाली की हे का आणि किती वेळ पाहायचं याचा हिशेब उरत नाही. पात्रांचं वागणंही रँडम होत जातं. मग अजित केळकरांची व्यक्तिरेखा स्कोअरबोर्ड लिहायला आर के लक्ष्मणच्या कॉमन मॅनचे कपडे घालते, मनोज जोशी उगाचच स्त्री वेशात येतात , एका ओव्हरमधे किती बॉल हे माहीत नसलेले प्रभावळकर उत्तम बॅटींग करायला लागतात आणि अचानक टीममधे खेळायला दिलीप वेंगसरकरही येऊन पोचतात. या वेळपर्यंत पटकथेची सारी अपरिहार्यता संपते आणि पाहाणं हादेखील एक उपचारच होतो.
हे असं का होतं याला मला विचाराल तर काही स्पष्टीकरण नाही. मुळात पालेकरांपासून तांत्रिक अंग सांभाळणा-यांपर्यंत ही सारीच टीम चांगली आहे. नटसंचात तर नाटक आणि चित्रपटांमधले अनेक जाणकार आहेत. सतीश आळेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, विजय केंकरे, सतीश पुळेकर आणि इतर अनेकांनाही या माध्यमाची आणि संहीतेची जाण आहे. मग मुळात हा चित्रपट असा का रचला आणि तो सावरण्याचा कोणी प्रयत्न का केला नाही असा प्रश्न उरतोच.
ब-याच वेळा प्रतिकूल लिहिणा-या समीक्षकांवर, परीक्षकांवर अशी टीका होते की ते दिग्दर्शकानी केलेला चित्रपट न पाहाता वेगळाच आपल्या डोक्यातला चित्रपट पाहाताहेत. क्वचित प्रसंगी ही टीका योग्य असते जेव्हा समीक्षक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न न करता नुसती टीका करतात. पण ब-याचदा असंही असतं की समीक्षक चित्रपटातल्या कोणत्या त्रुटी वगळता आल्या असत्या आणि त्यामुळे चित्रपटात काय सुधारणा झाली असती असा विचार करत असतात. त्यामुळे त्यांना मूर्ख वा विरोधक समजणं हे योग्य नसतं. असा वेगळा, डोक्यातला चित्रपट पाहाण्याचा प्रयत्न मी इथे करुन पाहिला, पण तो काही यशस्वी झाला नाही. काही वेळा काही गोष्टी मुळातच फसतात, तसं काहीसं या चित्रपटाचं झाल़य. त्याचा दोष कोणावर हा मुद्दा गौण आहे, इतका चांगला चमू असताना त्याचं तसं होणं ही मात्र दुर्दैवी घटना आहे.
- गणेश मतकरी

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP