एक हजाराची नोट- अर्थपूर्ण आणि आटोपशीर
>> Saturday, May 10, 2014
'एक हजाराची नोट' चं थोडक्यात वर्णन करायचं तर 'अर्थपूर्ण आणि आटोपशीर' असं करता येईल. त्याला काय म्हणायचय हे नेमकं आहे आणि तो नेमकेपणा शाबूत राखण्याच्या दृष्टीकोनातूनच त्याचा एकूण विचार झालेला आहे. त्याची लांबी, पात्रांची संख्या आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेली जबाबदारी, त्यातल्या प्रमुख घटनांची संख्या आणि रचना हे सगळं त्या विचाराशी जोडलेलं आहे( काही बाबतीत हा आटोपशीरपणा साधतानाची काटकसर टोकाची ठरते पण त्याविषयी थोडं नंतर बोलू) .
चित्रपटाचा विषय खूपच आजचा आणि मूलभूत स्वरुपाचा आहे. राजकारणाशी आणि निवडणूक प्रक्रियेशी जोडला असल्याने तर आहेच पण त्यापलीकडे जाऊनही. आपला स्वभाव, वागणं, आपल्या वागण्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उमटणारे पडसाद, स्वार्थ - मोह- त्याग यांसारख्या भावनांचा आपल्यावर होणारा परिणाम, आपले विश्वास, श्रध्दा, या सगळ्याला त्यात स्थान आहे. तो जे प्रश्न उपस्थित करतो ते चटकन उत्तर मिळणारे नाहीत, किंबहुना इथे उत्तराची अपेक्षाच नाही. अपेक्षा आहे, ती चित्रपटा पाहाताना ते प्रश्न आपल्याला पडावेत हीच.
चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे एका छोट्याशा गावात राहाणारी एक म्हातारी ( उषा नाईक) . म्हातारीकडे पैसा नाही म्हणजे जरासुध्दा नाही. तिच्या शेतकरी मुलाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे आणि तुटपुंज्या पैशावर ती कसंतरी घर चालवतेय. शेजारी राहाणारा सुदामा ( संदीप पाठक) तिला मुलासारखाच आहे आणि त्याचं कुटुंब ती नात्यातलच मानते. प्रचारादरम्यानच्या एका राजकारण्याच्या ( गणेश यादव) सभेला, लोकाना मतांसाठी पैसेवाटप होत असताना सुदामा म्हातारीच्या मुलाबद्दल बोलून सहानुभूती तयार करतो आणि तिला इतरांपेक्षा अधिक, म्हणजे शंभराएेवजी हजाराच्या नोटा मिळतात. म्हातारी या पैशातनं काय करायचं याची स्वप्न पाहायला लागते. थोडीफार खरेदी करावी म्हणून सुदामाबरोबर जवळच्या मोठ्या गावात बाजाराला गेली असताना म्हातारीवर या पैशांमुळे एक नवंच संकट कोसळतं.
चित्रपटाची रचना ही दोन अंकी असल्यासारखी आहे. पहिला अंक म्हातारीच्या गावात घडतो तर दुसरा बाजारच्या ठिकाणी. दोघांचे स्वतंत्र उत्कर्षबिंदू आहेत पण पहिला भाग हा प्रामुख्याने सेट अप सारखा आहे. त्यात म्हातारी आणि सुदामा कोण आहेत, त्यांचे परस्परसंबंध कसे आहेत हे सांगितलं जातं, त्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा क्षण आपल्यापुढे मांडला जातो आणि पुढल्या भागासाठी एक पार्श्वभूमी तयार होते. प्रत्यक्ष घटनांच्या दृष्टीने यात फार काही होत नसलं, तरी पुढल्या भागाचा परिणाम व्हायचा, तर हा भाग आपल्यापर्यंत पुरेशा ताकदीने पोचणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष नाट्य घडतं ते पुढल्या भागात. आता हे दोन्ही भाग आपापल्या परीने परिपूर्ण आहेत आणि त्यांच्या गतीत वा ते जे सांगू पाहातात, त्यात चुका काढायला जागा नाही. व्यक्तिश: मात्र मला एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे कथासूत्राच्या पूर्ण शक्यतांचा वापर चित्रपट करतो असं वाटत नाही . बहुतेक कथाविषय हे त्यांचा विस्तार कशा पध्दतीने होऊ शकतो याचा एक आराखडा स्वत:तच बाळगून असतात. काहींचा जीव लहान असतो तर काहींचा मोठा. जीव मुळात लहान असेल तर तो ताणणं जसं अनावश्यक तसंच असलेल्या शक्यता वापरण्याचं टाळणं देखील खटकणारं. एक हजाराची नोट अशी किमान एक , उघडपणे समोर दिसणारी महत्वाची शक्यता टाळतो.
या प्रकारची कमेन्ट ही सामान्यत: पटकथाकार वा दिग्दर्शकांना मान्य होत नाही, खासकरुन जर त्यांची काही निश्चित भूमिका असेल तर. इथे दिग्दर्शक श्रीहरी साठे आणि पटकथाकार श्रीकांत बोजेवार यांची उघडच तशी आहे. त्यांना आपल्या आशयाचा विस्तार हा एका मुद्द्यापर्यंत करायचाय अन त्यापलीकडे नाही. आता असं असण्यामागे कारणं अनेक असू शकतात. टिपेला गेलेला आशय कदाचित थोडा भडक होईल, सेन्सेशनलिस्ट वाटेल असं असू शकतं, संघर्षावर अधिक फोकस आला तर आधी आलेल्या महत्वाच्या पण काहीशा संयत मुद्द्यांकडे दुर्लक्ष संभवतं असं असू शकतं, किंवा अधिक प्रॅक्टीकल, म्हणजे चित्रपटाच्या लांबीसारख्या गोष्टीशी जोडलेली कारणंही असू शकतात. (थोडं विषयांतर- लांबीसाठी चित्रपटासंबंधातला इतका मोठा निर्णय घेतला जाणं संभवत नाही असं वाटणार््यांनी सुप्रसिध्द फ्रेन्च ओतर ज्याँ ल्यूक गोदारने जम्प कट या संकल्पनेचा शोध आपल्या 'ब्रेथलेस ' चित्रपटादरम्यान कसा लावला हे जरुर शोधून पाहावं. त्यांची करमणूक तर होईलच, वर त्यांच्या या विषयाकडे पाहाण्याच्या दृष्टीतही फरक पडू शकेल.) हे मुद्दे म्हंटलं तर रास्त आहेत आणि समीक्षक हा शेवटी निरीक्षक असतो, त्यामुळे विशिष्ट कलाकृतीत क्रिएटीव इन्पुट असणार््या माणसाला मी माझंच मत बरोबर असं नक्कीच सांगणार नाही. त्यांनी चित्रपटाचा विचार, कितीतरी अधिक वेळ देऊन केलेला असतो. मी केवळ एवढंच म्हणेन कि कलात्मक वा कलाबाह्य कोणत्याही कारणापलीकडे जाऊन जर यातला विषय एका थोड्या वरच्या टप्प्याला गेला असता, तर मला स्वत:ला अधिक आवडला असता.
ही एक गोष्ट सोडता मला हजाराची नोट पूर्णत: पटला. त्यातला विचार हा आपल्या आजच्या वातावरणाशी सुसंगत आहे आणि घटनांमधलं नाट्य हे अगदी शक्यतेच्या कोटीतलं , तरीही ( किंवा त्यामुळेच ) अस्वस्थ करणारं आहे. आपल्या देशात कोण कशाला आणि किती किंमत देतो याचा हा चित्रपट एक प्रकारे जाबच मागतोय असं आपण म्हणू शकतो. मात्र हे करताना तो कोणताही आव आणत नाही किंवा उपदेश करत नाही. तर्कशुध्द घटनांचीच तो अशी मांडणी करतो जी आपल्याला काही महत्वाचं, सहज समजणार््या भाषेत सांगेल.
उषा नाईक यांचं कास्टिंग हे विशेष उल्लेख करण्यासारखं. तरुण प्रेक्षकांना , म्हणजेच त्यांची आधीची कारकिर्द माहित नसणार््यांना, या नव्या , आजवर अपरिचित असूनही प्रथम दर्जाच्या अभिनेत्री नक्कीच वाटतील,पण खरी गंमत ही, की त्यांचं जुनं काम पाहिलेल्यांनाही तेच वाटू शकेल . जुन्या मराठी चित्रपटांमधली त्यांची ढोबळ, तथाकथित नाट्यमय भूमिकांमधली ओळख विसरुन इथे त्या पुन्हा स्वत:ला इन्व्हेन्ट करतात. इथून पुढे त्यांची कारकीर्द नव्याने सुरु झाली तर आश्चर्य वाटू नये. संदीप पाठक आता नव्या पिढितल्या उत्तम अभिनेत्यामधला एक म्हणून एस्टॅब्लिश झालाय . एकेकाळी प्रामुख्याने विनोदासाठी ओळखला जाणारा हा नट आता विविध प्रकारच्या भूमिका करतोय. त्याची एक हजाराची नोट मंधली भूमिका बहुधा लांबीने तर आजवरच्या सर्व भूमिकात मोठी असेलच, वर ती त्याची रेंज अधिक पुढे नेणारी आहे.
हा चित्रपट प्रेक्षकाला कसा वाटतो हे पाहाण्यात मला रस आहे कारण आपण एका ट्रान्झिशनच्या काळातून जातोय. जुना मराठी सिनेमा कधीच संपलाय आणि नव्या मराठी चित्रपटाचे ठोकताळे नव्याने ठरतायत. ज्यांना मिळालेल्या प्रतिसादावरुन येत्या वर्षांबाबत काही अंदाज बांधता येईल अशा मोजक्या चित्रपटातला एक म्हणून ' एक हजाराची नोट' चं नाव नक्कीच घेता येईल.
2 comments:
गणेश सर,
कथा, त्याचा आटोपशीरपणा आणि गंभीर मांडणीच्या माध्यमातून संदेश न देता, वास्तववादी दर्शन घडविणारा हा चित्रपट वेगळा जरूर आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या तो चित्रपट या पातळीवर कुठेच उतरत नाही, असं मला वाटतं. श्रीकांत बोजेवार यांची ही मुळ कथा मी ऐकली होती, परंतु त्यामध्ये क्लायमॅक्सला केलेला बदल चित्रपटाचा उद्देश पूर्ण करत नाही. बोजेवार यांच्या कथेतील अंतिम टप्पा व्यवस्थेवर आणि समाजातील भ्रष्ट गोष्टींवर थेट भाष्य करणारा होता. याठिकाणी मात्र त्याची उणीव जाणवते.
Please write about children of war
Post a Comment