लय भारी- मराठीतला हिंदी चित्रपट

>> Monday, July 14, 2014


गेल्या आठवड्यात मी एका चॅनलच्या साईटवर सादर केलेला निशिकांत कामत दिग्दर्शित, रितेश देशमुख अभिनित लय भारीचा रिव्ह्यू पाहिला आणि खालच्या कमेन्ट्स पाहून हादरलो. रिव्ह्यू अतिशय बॅलन्स्ड होता. कुठेही सिनेमाला मुद्दाम खाली ओढण्याचा प्रयत्न नव्हता. चित्रपटाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही मुद्दे त्यात नीट मांडले होते. वर स्टार देताना थोडं चांगल्या मुद्द्यांकडे झुकून तीन स्टार दिले होते. असं असतानाही, कमेन्ट करणार््या जवळपास सर्वांनी रिव्ह्यू, तो देणारा समीक्षक आणि चॅनल या सर्वांना अतिशय वाईट शब्दात संबोधलं होतं. शिव्याच दिल्या होत्या म्हणा ना !

 याला माझी पहिली रिअॅक्शन होती ती ही, की जर सामान्य प्रेक्षकाना प्रामाणिक समीक्षेची हीच किंमत असेल, तर उगाच ती करुन वेळ फुकट घालवण्यात काय अर्थ आहे? दुसरा प्रश्न हा की हे , अशा कमेन्ट करणारे लोक कोण आहेत? यांना खरोखर अगदी सोप्या शब्दात केलेलं चित्रपटाबद्दलचं विवेचनही समजत नाही आहे? का या लोकांची काही दैवतं या चित्रपटाशी संबंधित असल्याने त्यांना या दैवतांनी केलेली कोणतीही गोष्ट केवळ डोक्यावर घेण्यासारखीच वाटते? का मराठी चित्रपट थोडाफार त्यांच्या आवडत्या हिंदी चित्रपटाकडे जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसत असल्याने त्या मार्गात कोणतीही आडकाठी त्यांना नको आहे? जे असेल ते असो, ही मनोवृत्ती फार काळजीचं कारण आहे हे निश्चित.

गेली दहा वर्ष, मराठीत खूप चांगलं काम झालय आणि गेल्या शतकाच्या अखेरीला मृतप्राय मानला जाणारा चित्रपट आज अर्थपूर्ण, आशयघन काही देणारा चित्रपट म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखला जातोय. त्याचबरोबर आपल्या चित्रपटात बर््यापैकी करमणूक करणारी एक व्यावसायिक शाखाही आहे. आणि जोपर्यंत ती चांगली हेल्दी करमणूक करतेय, तोवर तिला आक्षेप घेण्यासारखंही काही नाही. मात्र मला जर आज मराठी चित्रपटांचा  वैशिष्ट्यपूर्ण भाग कोणता विचारलं, तर मी खास प्रादेशिक टच असलेल्या , आशयघन , पुरेशा प्रेक्षक प्रतिसादाला न जुमानता काही नवं सांगू पाहाणार््या चित्रपटाचं नाव घेईन, शंभर कोटी क्लबात घुसण्याच्या नादात बाॅलिवुडची सही सही नक्कल करणार््या चित्रपटांचं नाही. आणि का घ्यावं, ते करणारे आणि आपल्यापेक्षा अधिक मोठ्या बजेटमधे, अधिक मोठे स्टार घेऊन आणि अधिक भव्य परिणाम साधणारे लोक आहेतच की हिंदीत, मग त्याची पुसट झेराॅक्स पुन्हा मराठीत कशाला हवी? त्यापेक्षा व्यावसायिक चित्रपटातही अस्सल मराठी काय करता येईल असा प्रयत्न होण्याची गरज आहे. दैवतांना जर अर्थपूर्ण काही करायचं नसेल तर निदान त्यांनी नव्या प्रकारचा चांगली करमणूक असलेला चित्रपट का करु नये?

या दृष्टीने पाहायचं तर रितेश देशमुखने आधी निर्माण केलेले दोन्ही चित्रपट 'बीपी' आणि 'यलो' हे चांगले आहेत. हे व्यावसायिक प्रयत्न आहेत परंतु हिंदीची नक्कल करण्याचा मोह त्यामधे नाही. उलट काही वेगळं करुन पाहण्याचा प्रयत्न आहे. स्वतः मराठी पडद्यावर  उतरताना मात्र रितेशने ( की त्याच्या सहनिर्मात्यांनी?) कोणतीही रिस्क घ्यायची नाही असंच ठरवलय.

खरं सांगायचं, तर 'लय भारी' बद्दल माझ्या मनात थोडी अढी तयार झाली ती त्याचं नाव एेकूनच. मला नावं चित्रपटाच्या थीमशी जुळणारी असली की आवडतात . स्वतःचं कौतुक करणारी आणि मग कशीतरी चित्रपटाशी जोडलेली नावं मला मुळातच आवडत नाहीत. चित्रपट चांगला असेल तर लोक कौतुक करतीलच, ते करण्यासाठी तुम्हाला शब्दही पुरवण्याची गरज नाही. पण या चित्रपटाने मुळातच शंकेला जागाच ठेवायची नाही असं ठरवलेलं. सर्वच गोष्टी अगोदरच सिध्द हव्यात, उगाच नवं काही करण्याचा प्रयत्न कशाला, हा लय भारीचा मंत्र आहे. त्यामुळे सर्व जमेल तितकं लोकप्रिय उचला आणि चिकटवा, हा पटकथेचा एकच नियम.

चिकटवलेल्या गोष्टी अशा - थ्रिलरला चांगला (आणि हिंदीतही काम केलेला) दिग्दर्शक , मोठा ( हिंदीत काम करणारा) स्टार, हिंदी चित्रपटात राकेश रोशनने लोकप्रिय केलेला ( एका रुपातला नायक- मरुन किंवा अदरवाईज- नव्या रुपात परतण्याचा ) फाॅर्म्युला ,अर्थात तोही हिंदीत लोकप्रिय असलेला; बाॅलिवुड आणि साऊथच्या चित्रपटासारख्या मारामार््या , बाॅलिवुड पध्दतीच्या गाण्यांच्या सिचुएशन्स ( भक्तीगीतापासून, नायिकेने खलनायकाला गुंगवण्यासाठी केलेला नाच, वगैरे), एकूण सारं बाॅलिवुड शैलीतलं. मराठी काय, तर अर्थात भाषा.आणि विठ्ठलाचा संदर्भ घेऊन क्वचित प्रसंगी वापरलेलं वारीचं वातावरण. तेही चिकटवल्यासारखं. बाकी सारं हिंदी. अगदी पाहुणे कलाकारही हिंदीच. या सगळ्यामुळे चित्रपटाचा परिणाम हा अर्थातच एक नेहमीचा मसाला हिंदी व्यावसायिक चित्रपट पाहिल्याचा आहे. इतका पारंपारिक वळणाचा की हिंदीतही हल्ली कोणी इतका टिपीकल चित्रपट करायला धजावू नये. पण आपल्याकडे तयार प्रेक्षक उपलब्ध आहे, जो नव्या मराठी प्रयत्नाची किंमत न ठेवता या जुन्या हिंदी मसाल्याला डोक्यावर घेईल.

गोष्ट परिचित. निंबाळकर घराणं प्रतिष्ठीत, श्रीमंत, पण प्रतापराव निंबाळकर ( उदय टिकेकर)आणि सुमित्रादेवी ( तन्वी आजमी) यांना  मूल नाही. मग नवससायास वगैरे. मग विठ्ठलाच्या कृपेने मूल होतं. हा प्रिन्स( रितेश) प्रिन्स परदेशात गाणी म्हणून मायदेशी परततो आणि वडिलांना हातभार लावणार इतक्यात त्याच्या चुलतभावाच्या ( शरद केळकर) दुष्ट कारवाया सुरु होतात. ज्यानी संपूर्ण निंबाळकर कुटंुबच धोक्यात येतं. मदत मिळते ती बर््यापैकी उशीर झाल्यावर, पण थेट पंढरपुरावरुन.

ज्यांनी 'कस्मे वादे' पासून 'कहो ना प्यार है' पर्यंत मृत नायकाच्या अशक्य पुनरागमनाचे शेकडो चित्रपट पाहिले आहेत, त्यांना अपरिचित असा इथे एकही क्षण नाही. किंबहुना तो नसणं हीच इथली योजना आहे. सार््या यशस्वी चित्रपटांचा अर्क असलेली ही पटकथा आहे. त्यात नवीन काही असेल तरी कसं? पण चित्रकर्त्यांना तेच अपेक्षितदेखील आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा लाइट आहे, म्हणजे विनोद, रोमान्स वगैरे. दुसरा हाणामार््या. पहिला लांबतो, दुसरा त्यामानाने वेगवान आहे. मात्र शेवट ( अनइन्टेन्शनली) गंमतीदार आहे. विठ्ठलाचं रुप असणार््या नायकाच्या हातून तर खलनायक मारायचा नाही, पण तो मरायला तर हवा, शिवाय देवाघरचा न्यायही दाखवायचा. अशा पेचातून मार्ग काढायचा, तर थोडी क्रिएटीव (!?) लिबर्टी हवीच.

चित्रपटात काही नवीन नसलं तरी सारेच संबंधित लोक आपापल्या कामात हुशार असल्याने, आणि निर्मिती मूल्य अ दर्जाची असल्याने एका काॅम्पीटन्सी लेव्हलवर आपण तो पाहू शकतोच. कामत आणि देशमुख यांचा वाटा महत्वाचा, पण इतरही. गाणी, साऊन्डट्रॅक, अभिनय या सर्वच बाबतीत कलावंत आणि बाकी टीम हुशार आहे. मात्र त्यांच्या परफाॅर्मन्सवरही निश्चितपणे संहितेच्या मर्यादा पडतात.

'लय भारी' बाॅक्स आॅफीसवर छान कमवतोय हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे निर्मात्यांनी जे मनाशी ठरवलं, ती योजना अत्यंत यशस्वी ठरली यात वादच नाही. पण प्रश्न हा, की मुळात ही योजनाच का ठरवली गेली. ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे, साधनं आहेत, पैसा आहे, त्यांनी केवळ पैसा मिळवणे या मर्यादीत महात्वाकांक्षेला धरुन नवनिर्मिती करावी का? आणि उद्या त्यांच्या या यशाला भुलून इतर निर्मातेही याच मार्गावर जायला लागले, आणि आज मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पातळीवर असलेलं नाव पुन्हा दिसेनासं झालं, तर त्याला जबाबदार कोण?

- ganesh matkari 

1 comments:

Digamber Kokitkar July 14, 2014 at 8:13 AM  

Tumhi sangitlya pramane bheeti hich aahe ki ata Marathi producers pan hach formula vaprun bhayankar films banvtil.
1 gamtichi gosht ashi ki 1 ka scene madhye prince chi body strecher var aste ani tyachi aai radat astana achanak prince chya papnya haltat.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP