नैतिक पडझडीचा मागोवा
>> Sunday, February 7, 2016
हॉलिवुड- बॉलिवुड, ही एका दमात घेतली जाणारी नावं. नावसाधर्म्यातून उद्योगातल्या साम्याचा आभास तयार करणारी, दोन्ही व्यावसायिक वळणाची. दोन्ही स्टार सिस्टीमवर काही प्रमाणात अवलंबून. प्रत्यक्षात मात्र तसं नाही. प्रत्यक्षात हॉलिवुडमधे बनलेला सिनेमा, हा हिंदी चित्रपटांपेक्षा कितीतरी वेगळा असतो.
याचं एक प्रमुख कारण आहे, ती विषयांची मोठी रेंज. आपल्याकडे अलीकडच्या काही दिवसातच फॅमिली मेलोड्रामा, ढोबळ प्रेमकथा आणि सूडनाट्य यापलीकडे जाणारा , थोडा वेगळ्या प्रकारचा सिनेमा दिसायला लागला आहे. याउलट हॉलिवुडमधे विविध चित्रप्रकार ( genre) आधीपासून होते, आणि त्या सगळ्यांमधे जे जे शक्य आहे, ते सगळं करुन पहाण्याचा अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडून प्रयत्न झाला. त्याबरोबरच उघड प्रेक्षकप्रियता मिळेलशी खात्री नसणारा अर्थपूर्ण सिनेमाही त्यांच्याकडे अनेक लोकप्रिय नटांनी, दिग्दर्शकांनी करुन पाहिला. सनडान्स चित्रपट महोत्सवाने त्यांच्याकडल्या समांतर वळणाच्या इंडी सिनेमालाही मुख्य धारेत आणल्यावर मोठे स्टार्सही वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमधे काम करायला, त्यांची निर्मिती करायलाही तयार व्हायला लागले.
या अधिक मोकळ्या दृष्टीकोनाचाच एक भाग म्हणूनच ऑनसाम्ब्ल नटसंच असणाऱ्या फिल्म्स त्यांच्याकडे सर्रास पहायला मिळतात. खरं तर व्यावसायिक वळणाच्या चित्रपटसृष्टीत नायक/नायिका छापाच्या काही व्यक्तिरेखा आणि त्यांभोवती फिरणारं कथानक अपेक्षित आहे. त्यांच्याकडे अनेक नट हे स्वत:चा प्रेक्षकवर्ग असणारे आहेत, त्या दृष्टीनेही एखाद दुसऱ्या पात्राभोवती चित्रपट फिरणं अधिक लॉजिकल आहे. असं असतानाही आपल्याला हॉलिवुडमधे अनेक चित्रपट असे दिसतात की ज्यात साधारण एका वजनाच्या अनेक भूमिका आहेत. ज्यांना पारंपारिक अर्थाने नायक नाही, गोष्ट एका व्यक्तीची नसून समुदायाची आहे. बऱ्याचदा त्यांचे शेवटही सामाजिक न्यायाशी ( किंवा अन्यायाशी) जोडलेले असल्याचं दिसतं, जे आपण ज्या प्रकारच्या पलायनवादी मनोरंजनाची अपेक्षा या लोकांकडून करतो त्याच्याशी विपरीत आहे. गेल्या वर्षी या वळणाचे दोन चित्रपट हॉलिवुडमधे महत्वाचे ठरल्याचं दिसतं. अॅडम मॅकेचा 'द बिग शॉर्ट' आणि टॉम मकार्थीचा 'स्पॉटलाईट'. या दोघांनाही यंदाच्या ऑस्कर नामांकनात चित्रपट आणि दिग्दर्शक, या दोन्ही विभागांमधे स्थान आहे. शेवटी पुरस्कार कोणाला मिळतो ही बाब वेगळीच आहे, पण चित्रपटांचा यथोचित सन्मान होतोय हे दाखवून द्यायला ही निवड पुरेशी आहे.
दोन्ही चित्रपटांचा ढोबळ प्रकार सारखा असला, तरी चित्रपट म्हणून त्यांची जातकुळी खूपच वेगळी आहे. बिग शॉर्ट हा २००७-८ मधे ढासळलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आधारलेला आहे, तर बॉस्टन ग्लोबने २००२ मधे उघडकीला आणलेल्या चर्चशी संबंधित 'सेक्शुअल अब्युज स्कॅन्डल'शी स्पॉटलाईट जोडलेला आहे. दोन्हीचे विषय तर संपूर्णपणे वेगळे आहेतच, वर त्यांच्यापुढली आव्हानं, दर चित्रपटाची बलस्थानं आणि त्यांच्या सादरीकरणाची पध्दत, हे सारच संपूर्णपणे वेगळं आहे. तरीही आणखी एका बाबतीत दोन्ही चित्रपटांत उल्लेखनीय साम्य आहे असं मानता येईल. ते म्हणजे दोन्ही चित्रपटात होणारं समाजाच्या नैतिक ऱ्हासाचं दर्शन.
अमेरिकन अर्थव्यवस्थेची पडझड आणि त्याचे जागतिक परीणाम या विषयावर हॉलिवुडचं लक्ष आधीच गेलेलं आहे. एका प्रमुख भूमिकेएेवजी सारख्या लांबीच्या बऱ्याच मुख्य भूमिका असणारा, म्हणजेच ऑनसाम्ब्ल नटसंचातच असणारा २०११ चा ‘मार्जिन कॉल’ देखील, या क्रायसिसवर आधारित होता. ३६ तासाच्या कालावधीत एका इन्व्हेस्टमेन्ट बॅंकेत घडणाऱ्या घटनांमधून या क्रायसिसची सुरुवात या चित्रपटात दाखवली आहे. तीही एखाद्या थ्रिलरला शोभेलशा पध्दतीने, पण त्यातलं वास्तव पुरेशा त्रासदायक पध्दतीने . त्याआधी, म्हणजे २०१० मधे, याच विषयावरच्या चार्ल्स फर्ग्युसन दिग्दर्शित ‘द इनसाईड जॉब’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचं ऑस्कर मिळालं होतं.
स्टॉक मार्केट, त्यामधले क्रॅशेस, गुंतवणूकदारांवर येणारी संकटं, यासारखा भाग, हा केवळ त्यातल्या मानवी नाट्यावर फोकस ठेवत दाखवणं त्यामानाने नेहमीचं आहे. ऑलिव्हर स्टोनचा ‘वॉल स्ट्रीट’ आणि त्याचं सीक्वल, किंवा स्कोर्सेसीचा ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ आणि यासारख्या इतर काही सिनेमांमधून या प्रकारच्या नाट्याला स्थान आहे. पण बिग शॉर्टचा वेगळेपणा हा , की तो केवळ त्यातल्या मानवी नाट्यावर लक्ष केंद्रीत करत नाही. ते आहेच, पण त्याबरोबर, तो मुळात हे आर्थिक संकट येण्याची कारणं, त्यातल्या तशा चटकन समजायला कठीण असणाऱ्या संकल्पना , वैयक्तिक दृष्टीकोनामधून उभे रहाणारे नैतिक प्रश्न, या सगळ्याला एकत्रितपणे पहाण्याचा प्रयत्न करतो. मुळात मायकल बरी ( क्रिश्चन बेल) या प्रचंड मोठा हेज फंड सांभाळणाऱ्या गुंतवणूकदाराला हाऊजिंग मार्केट कोसळणार असल्याचा सुगावा लागणं ही या क्रायसिसची सुरुवात आहे. हे मार्केट जर विशिष्ट काळात कोसळलं,तर आपल्याला प्रचंड फायदा होईल अशा गुंतवणूका तो करत जातो. त्याच्या या हालचालीचा सुगावा आंधळेपणी हा व्यवहार न करणाऱ्या काही मोजक्या लोकांना लागत जातो, मात्र प्रत्यक्षात ते सारे हे संकट थांबवायचा प्रयत्न करायचं सोडून, ते आल्यावर आपल्याला कसा नफा होईल असाच विचार करतात, अशी या चित्रपटाची कल्पना आहे. बोचरा उपहास, आणि कॉमेडी-मेलोड्रामा-माहितीपट या साऱ्याचा एकत्र फील देणाऱ्या या चित्रपटात, बेल बरोबरच स्टीव कॅरेल, ब्रॅड पिट( जो चित्रपटाचा सहनिर्माता आहे) , रायन गोजलिंग या मोठ्या स्टार्सनी अतिशय वास्तववादी पध्दतीच्या आणि लांबीनेही बेताच्या भूमिका फार अस्सलपणे केलेल्या दिसतात.
मायकल लुईसच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित असणाऱ्या या चित्रपटापुढचं मोठं आव्हान होतं, ते गुंतागुंतीच्या संकल्पना अनभिज्ञ प्रेक्षकाला कळतीलशा पध्दतीने सांगणं. हे तो ज्या खुबीने करतो, ते पहाण्यासारखं आहे. यासाठी तो पहिली गोष्ट करतो,ती म्हणजे प्रेक्षकाला विश्वासात घेणं. कथेच्या ओघातून मधेच बाहेर येऊन प्रेक्षकाशी मित्रासाखं बोलणारी पात्र, आणि हे सारं समजायला तसं कठीण आहे, पण कसं समजावता येतं पाहू, अशी भूमिका घेणारं निवेदन, हा यातला सर्वात महत्वाचा भाग. जेव्हा पात्र खूप किचकट बोलायला लागतात, तेव्हा चित्रपट सरळ थांबतो, कथेच्या ओघात स्पष्टीकरणं आणायच्या फंदात न पडता प्रेक्षकाला ओळखीच्या कोणत्यातरी सेलिब्रिटीच्या तोंडून, आणि सोप्या , समजण्यासारख्या भाषेत, उदाहरणं देऊन या गोष्टी समजावून सांगतो, आणि मग पुन्हा कथेवर येतो. वेळप्रसंगी उधृतं, चित्र, अॅनिमेशन, यासारख्या गोष्टी वापरायलाही तो कमी करत नाही. त्यामुळे द बिग शॉर्टचं सादरीकरण खूपच आधुनिक वळणाचं आणि अर्थपूर्ण होतं.
याउलट स्पॉटलाईट मात्र सादरीकरणाबाबत असे कोणतेही प्रयोग करत नाही. उत्तम पटकथा , आणि हॉलिवूडमधल्या गंभीर चित्रपटांनी वर्षानुवर्ष परफेक्ट करत आणलेली सादरीकरणाची पध्दत यावर तो विसंबलेला आहे. मला स्पॉटलाईट पहाताना १९७६ चा अॅलन जे पाकुला दिग्दर्शित 'ऑल द प्रेसिडेन्ट्स मेन' आठवला. बहुतेकाना माहित असेल, की हा चित्रपट वॉटरगेट प्रकरणाचा शोध पत्रकारितेच्या मार्गाने छडा लावणाऱ्या वुडवर्ड आणि बर्नस्टीन च्या तपासावर आधारीत होता. ज्या क्षणी या दोघांना पूर्ण सत्य कळतं आणि ते बातमी लिहून पूर्ण करतात , त्या क्षणी चित्रपट संपतो, पुढलं स्कॅंडल, निक्सन सत्तेबाहेर पडणं वगैरे न दाखवताच. साधारण याच जातीचा स्पॉटलाईट देखील आहे. बॉस्टन ग्लोबमधल्या स्पॉटलाईट या शोध पत्रकारितेच्या केसेस घेणाऱ्या टीमची ही कथा आहे. २००१ च्या सुमाराला ग्लोबमधे आलेल्या नव्या संपादकाच्या, मार्टी बॅरनच्या ( लिव श्रायबर) सूचनेवरुन स्पॉटलाईट टीमने, म्हणजे वॉल्टर 'रॉबी' रॉबिन्सन( मायकेल कीटन), मायकल रेजेन्डस ( मार्क रफालो) आणि इतर, यांनी चर्चच्या भ्रष्टतेचा पर्दाफाश केला, आणि सेक्शुअल अब्युज ला जबाबदार असणाऱ्या धर्मगुरुंची चर्चला माहीती होती आणि त्यांना पाठीशी घातलं गेलं, असं जाहीरपणे मांडलं. ऑल द प्रेसिडेन्ट्स मेन प्रमाणे इथेही बातमी तयार होणं, पत्रकारांनी घेतलेला शोध हाच विषय आहे, पुढच्या कायदेशीर कारवाईत चित्रपटाला रस नाही. इथले तीनही प्रमुख नट तद्दन व्यावसायिक वळणाच्या चित्रपटांमधे चमकलेच आहेत, वर सुपरहिरो चित्रपटांसारख्या अजिबात गंभीर मानल्या न जाणाऱ्या चित्रपटांमधूनही त्यानी कामं केली आहेत. कीटनचा बॅटमॅन आणि रफालोचा हल्क आपल्याला परिचित आहेच, पण इथे अतिशय गंभीर भूमिकेतल्या श्रायबरनेही एक्स मेन ओरिजिन्स: वुल्वरीन' मधे वुल्वरीनच्या सावत्र भावाची खलनायकी भूमिका केलेली आहे. तरीही स्पॉटलाईट मधे हे नट बदलून जातात, जणू त्या व्यक्तिरेखाच होतात.
स्पॉटलाईट काय किंवा द बिग शॉर्ट काय, या चित्रपटांचे शेवट हे सांकेतिक शेवटांप्रमाणे , प्रेक्षकाला अंधारात ठेवून धक्का देणारे शेवट नाहीत. काय घडलं हे प्रेक्षकांना माहीत आहे. किंबहूना त्यातले अनेक जण यातल्या एखाद्या प्रकरणाचे बळीही असतील. महत्व आहे, ते तरीही या गोष्टी हॉलिवुडसारख्या व्यावसायिक सेट अप मधे मांडल्या जाऊ शकतात याला. या घटनांच्या बळींकडे पहाण्याचा एक संवेदनशील दृष्टीकोन अजूनही या उद्योगात जपला जाऊ शकतो, आणि त्यामार्फत काही त्रासदायक,पण महत्वाच्या गोष्टी विचार करु शकणाऱ्या प्रेक्षकासमोर उभ्या राहू शकतात, याला. या चित्रपटांचं प्रेक्षकांकडून होणारं स्वागत हाच त्यांच्यासाठी कोणत्याही पुरस्काराहून मोठा मान आहे.
- गणेश मतकरी
1 comments:
आपल्या इथे परत एकदा समांतर सिनेमाची सुरुवात होते गरजेचे आहे. मागे मिथ्या सिनेमाबद्दल लिहिताना 'नव-समांतर मिथ्या' असं लिहिलं होतत तेव्हा अशी सुरुवात झालीय असं वाटलं होतं पण ते तितकसं सर्वदूर प्रभावित नाही असं म्हणायला जागा असावी का?
Post a Comment