हायवे- एक सेल्फी आरपार
>> Wednesday, August 24, 2016
हायवे : एक सेल्फी आरपार या चित्रपटाला नुकताच सह््याद्री सिने पुरस्कार देण्यात आला. या निमित्ताने रुपवाणी त्रैमासिकाच्या अंकासाठी मुखपृष्ठकथा म्हणून केलेले विवेचन. ब्लॉगवर पुढील काही आठवड्यात अशा काही चित्रपटांच्या नोंदी करण्यात येणार आहेत.
हायवे- एक सेल्फी आरपार, या चित्रपटाच्या पोस्टरवरली ही प्रतिमा तशी वास्तववादी नाही. एका व्यक्तीरेखेचा चेहरा, मात्र त्याच्या डोळ्यांची जागा रीअरव्ह्यू मिररने अडवलेली. या आरशात प्रतिबिंबित होते ती दुसरीच व्यक्ती. सुरिअलिस्ट चित्रकार रेने माग्रितच्या एखाद्या चित्राची आठवण करुन देण्याजोगी ही प्रतिमा. आता प्रत्यक्षात पहायला गेलं, तर वास्तववादी रचनेत रिअरव्ह्यू मिरर असा लागणार नाही, पण वास्तव मांडणीपेक्षाही या पोस्टरमालिकेला रस आहे, तो या दोन व्यक्तिरेखांमधलं अमूर्त नातं दाखवण्यात. ही मालिका या चित्रपटातल्या अनेक पात्रांच्या जोड्या जुळवते, त्यांचा संबंध अधोरेखित करते, सोप्याचा अट्टाहास न घरता आणि स्टार्सच्या चेहऱ्यावर चित्रपट खपवण्याच्या जमान्यात, अपूर्ण चेहऱ्यांचा अर्थपूर्ण वापर करते.
जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं. आपल्या नेहमीच्या चित्रपटात पोचण्याचं ठिकाण , हे प्रवासापेक्षा नेहमीच अधिक महत्वाचं असतं. मधले टप्पे भराभर घेत प्रेक्षकाला एकदा घाईने त्याच्या आवडत्या सुखांताकडे पोचवणं, हे बहुतेक चित्रपटांना आवश्यक वाटतं. हायवे मधे तसं होत नाही.
प्रवास हे जीवन, आयुष्य, असं धरलं, तर ट्रॅफिक जॅम, हे सहज सापडणारं दुसरं प्रतीक. त्या प्रवासाला खीळ घालणाऱ्या कोणत्याही गोष्टीला अनुसरुन वापरता येण्यासारखं. मग ती गोष्ट कोणत्याही प्रकारची असेल, व्यक्तीगत जीवनातली निराशा, प्रेमभंग, व्यावसायिक अपयश, वैचारिक पेच, डिप्रेशन, अनेक गोष्टी. पण ही निराशा हे आतल्याआत कुढत रहाणं, हे सारं संपणार कसं? हे क्वचितच कोणी सांगतं. बांध फुटून प्रवाह पुन्हा सुरु होणार कसा ? हा प्रश्न हायवेसाठी महत्वाचा आहे. लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी या प्रश्नाभोवतीच हा सिनेमा रचतात.
हायवे हा पारंपारिक रोड मुव्हीला वेगळ्या वळणावर नेऊन सोडणारा सिनेमा आहे. त्यातल्या पात्रांचा प्रवास तर चालू आहे मात्र प्रत्यक्षात यातला प्रत्येक जण आपल्याच अस्तित्वाने आखून दिलेल्या पिंजऱ्यात अडकलेला आहे . त्यांचं पुढे जाणं हे नावापुरतं आहे कारण जोपर्यंत आपल्या बरोबर वागवत असलेल्या पिंजऱ्यातून त्यांची सुटका होत नाही, तोवर ते जैसे थेच रहाणार.
सरतेशेवटी चित्रपटात महत्व आहे ते माणसाना. दोन माणसातलं अंतर वरवर कितीही असलं, तरी प्रत्यक्षात ते मानण्यावर असतं, हेच हायवे सांगतो. पोस्टरवरल्या रिअरव्ह्यू मिररमधले चेहरे पहाताना रिअरव्ह्यू मिरर्सवरचा नेहमीचा संदेश आठवणं, हे त्यातला आशय डीकोड करायला पुरेसं आहे. 'ऑब्जेक्ट्स इन द रिअरव्ह्यू मिरर आर क्लोजर दॅन दे अपिअर', याची जाणीव आपल्याला सतत करुन दिली जाते. कदाचित आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्याला वाटतात त्याहून जवळचे असू शकतील, हाच हायवेचा अर्थ मानता येईल.
गणेश मतकरी
3 comments:
मतकरी सर, सिनेमास्कोप द्वारे आपला प्रयत्न स्वागतार्ह आहे, हा फक्त ब्लॉग नसून माझ्यासारख्या अनेक चित्रपट समजून घेणाऱ्या नवदिग्दर्शकांना आणि चित्रपट रसिकांना पर्वणी आहे. दुर्दैवाने आपल्याकडे अशा सुंदर कलाकृतींना, अपेक्षेपेक्षा तुलनेने कमी प्रेक्षकवर्ग मिळत असल्याने आणि एखादा चित्रपट मुळात समजावून घेण्याची वृत्ती न बाळगता निव्वळ मनोरंजन आणि पॉपकॉर्न खाऊन टाईम पास करणे अशी मानसिकता असल्याने फक्त चित्रपट महोत्सवात असे चित्रपट आवर्जून पहिले जातात, आपल्या या नवीन प्रयत्नाला शुभेच्छा आणि सलाम. - सतेज नाझरे
मतकरी सर, सिनेमास्कोप द्वारे आपला प्रयत्न स्वागतार्ह आहे, हा फक्त ब्लॉग नसून माझ्यासारख्या अनेक चित्रपट समजून घेणाऱ्या नवदिग्दर्शकांना आणि चित्रपट रसिकांना पर्वणी आहे. दुर्दैवाने आपल्याकडे अशा सुंदर कलाकृतींना, अपेक्षेपेक्षा तुलनेने कमी प्रेक्षकवर्ग मिळत असल्याने आणि एखादा चित्रपट मुळात समजावून घेण्याची वृत्ती न बाळगता निव्वळ मनोरंजन आणि पॉपकॉर्न खाऊन टाईम पास करणे अशी मानसिकता असल्याने फक्त चित्रपट महोत्सवात असे चित्रपट आवर्जून पहिले जातात, आपल्या या नवीन प्रयत्नाला शुभेच्छा आणि सलाम. - सतेज नाझरे
मला पाहायचा आहेच. :)
Post a Comment