द शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस

>> Saturday, February 17, 2018


गिआर्मो डेल टोरोची सर्वोत्कृष्ट फिल्म ‘पॅन्स लॅबिरीन्थ’, आणि ‘द शेप ऑफ वाॅटर’ यांची अनेक बाबतीत तुलना होण्यासारखी आहे. फॅन्टसी आणि वास्तव यांचं मिश्रण या दोन्ही फिल्म्समधे आहे.  तिथे स्पॅनिश सिव्हील वाॅर होतं तर या सिनेमात कोल्ड वाॅर आहे. लॅबिरीन्थ मधे युद्घाची भयानकता फॅन्टसी भागात प्रतिकात्मक पद्धतीने येते, इथे कोल्ड वाॅरमधलं अविश्वासाचं आणि द्वेषाचं वातावरण त्याच पद्धतीने येतं. ‘प्रिन्सेस’ नावाने निवेदकाने संबोधलेली पण दुबळी , एकटी पडलेली नायिका आणि तिच्या संपर्कात येणारा फॅन्टसी जगातला जीव, हेदेखील दोन्हीकडे आहे. लॅबिरीन्थमधली ऑफेलिआ दुबळी आहे कारण ती लहान आहे, आणि तिची आई आर्मीत अधिकारी असलेल्या तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या पूर्ण आहारी गेलेली आहे. शेप ऑफ वाॅटरमधली इलायजा बोलू शकत नाही. जगापासून ती तुटल्यासारखी आहे. नायिकेला मदत करणारी पात्र आणि अत्यंत डार्क खलनायक हा देखील दोन्हीकडे आहे. या दोन्ही खलनायकांचा विशेष हा की ते स्वत:च्या शौर्याबद्दल , राष्ट्रप्रेमाबद्दल अभिमान बाळगतात , पण माणूसकीसारख्या साध्या गोष्टीची ते पर्वा करत नाहीत. पॅन्स लॅबिरीन्थचा शेवट आणि शेप ऑफ वाॅटरचा शेवटही सहजच तुलना करण्यासारखा आहे. का, तर प्रामुख्याने तो इन्टरप्रिटेशन प्रेक्षकावर सोडतो. तो सुखांत म्हणावा का नाही हे आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे.
तरीही या दोन चित्रपटांमधला एक मोठा फरक आहे तो वास्तव आणि फॅन्टसीची सरमिसळ करण्याच्या पद्धतीत. लॅबिरीन्थमधे फौनची भेट, त्याने सोपवलेल्या कामगिऱ्या हा पूर्ण भाग केवळ ऑफेलिआच्या डोक्यातला म्हणून वेगळा करता येतो. इथे तसं होत नाही. फॅन्टसीला सिम्बाॅलिक महत्व असलं, तरीही यातला ‘ॲसेट’  हा पाण्याखाली राहू शकणारा ह्यूमनाॅईड, हा केवळ नायिकेच्या नजरेतला नाही, तो सर्वांसाठी तितकाच खरा आहे.
चित्रपट घडतो तो १९६२ मधे, कोल्ड वाॅरच्या काळात. बाल्टीमोरमधल्या एका रहस्यमय सरकारी प्रयोगशाळेत मुकी नायिका इलायजा ( सॅली हाॅकीन्स ) साफसफाईचं काम करते. एका सिनेमा थिएटरच्या वरच्या मजल्यावर तिचं लहानसं घर आहे.  तिचा शेजारी , गाईल्स ( रिचर्ड जेन्कीन्स ) हा गे चित्रकार आणि बरोबर काम करणारी झेल्डा ( ऑक्टाविआ स्पेन्सर ) ही कृष्णवर्णीय बाई एवढेच तिचे मित्र. प्रयोगशाळेत ॲसेट ( डग जोन्स) आणला जातो तेव्हा इलायजा त्याच्याकडे स्वाभाविकपणेच ओढली जाते. त्याचं इतरांपेक्षा वेगळं असणं, बोलता न येणं हे तिला जवळचं वाटतं आणि त्याच्याशी ती स्वत:ची तुलना करायला लागते. त्याला क्रूरपणे वागवणारा कर्नल स्ट्रिकलन्ड ( मायकल शॅनन) जेव्हा ॲसेटच्या जीवावर उठतो, तेव्हा त्याला कसं वाचवायचं असा प्रश्न तिच्यापुढे उभा रहातो. यातली तिन्ही सकारात्मक पात्र ही समाजाला तिरस्करणीय आहेत. अपंग, कृष्णवर्णीय आणि होमोसेक्शुअल. याउलट यातला खलनायक हा तथाकथित राष्ट्रप्रेमी, कर्तबगार, समाजात सन्मान्य ठरलेला आहे. चित्रपटाची सबटेक्स्ट आहे ती हीच.
शेप ऑफ वाॅटरची थीम काय असा विचार केला , तर डिस्क्रिमिनेशन ही म्हणता येईल. वरवर नाॅर्मल दिसणाऱ्या समाजात किती वेगवेगळ्या पद्धतींनी माणसांना हीन लेखून बाजूला काढलं जातं याचं हे धक्कादायक चित्रण आहे. वर्ग, वर्ण , सेक्शुअल प्रेफरन्स , शैक्षणिक पात्रता, राजकीय भूमिका, अपंगत्व , रुप, अशा अनेक बाबतीतल्या डिस्क्रिमिनेशनची यात उदाहरणं आहेत. अगदी पुरुषांकडून स्त्रीयांना देण्यात येणारी कनिष्ठ वागणूकदेखील त्यात येते. यातला कर्नल हा उच्चशिक्षीत आणि उच्चपदस्थ आहे. पण तो आपल्या पत्नीला जी वागणूक देतो ती, आणि कृष्णवर्णीय, खालच्या सांपत्तिक आणि सामाजिक स्तरातून आलेल्या झेल्डाचा पती तिला जी वागणूक देतो ती, यांच्यात तुलना सहज शक्य आहे. हे सारं दाखवताना चित्रपट कुठेही प्रिची होत नाही, पण ते डेल टोरो सारख्या दिग्दर्शकाकडून अपेक्षितच आहे.
सॅली हाॅकीन्सची ही मेजर लक्षात रहाणारी भूमिका आहे जी तिला स्टार पदाला नक्कीच नेऊन बसवेल. ॲसेटचं काम करणारा डग जोन्स हा या प्रकारच्या अदृश्य भूमिका अनेकदा करतो. हेलबाॅय मालिकेतला एब सेपिअन, पॅन्स लॅबिरीन्थ मधला फौन आणि पेल मॅन , यासारख्या भूमिका जोन्जने केल्यायत. पण तो प्रत्यक्षात पडद्यावर दिसत नसल्याने आपल्याला ते लक्षात येत नाही. इथली भूमिका त्याच पठडीतली . जेन्कीन्स , स्पेन्सर हे तर सराईतच परफाॅर्मर्स आहेत. ग्रे शेड्सच्या भूमिकात मायकल शॅनन नेहमीच दिसतो पण ही भूमिका खूपच गडद आहे. ती लॅबिरीन्थमधल्या क्रूर कॅप्टन विडालची वेळोवेळी आठवण करुन देते.
मुळात शेप ऑफ वाॅटरच्या कथेचा एकूण आकार हा प्रेमकथेचा आहे, आणि चित्रपट तो शेवटपर्यंत तसाच ठेवतो. सबटेक्स्टचा सततचा वापर असतानाही, तो कुठेही कथेकडे वा पात्रांकडे दुर्लक्ष करतोय असं दिसत नाही. पूर्णपणे संगणकाच्या आहारी न जाता पण त्याचा योग्य तो वापर करुन स्पेक्टॅक्युलर चित्रपट बनवणाऱ्यांमधला डेल टोरो हा महत्वाचा दिग्दर्शक आहे आणि त्याचं हे दृश्यभागावरचं नियंत्रण इथेही दिसून येतं. पिरीअडचा वापर, किंवा बेसिक सीजी इफेक्ट्स आता किती सफाईदारपणे दाखवता येऊ शकतात हे आपल्याला माहीतच आहे. पण केवळ तंत्रज्ञान उपलब्ध असणं वेगळं आणि दिग्दर्शकाने ते अनपेक्षित पद्धतीने वापरुन दाखवणं वेगळं.
शेप ऑफ वाॅटरमधे खास लक्षात रहाण्यासारखा प्रसंग आहे तो इलायजाच्या बाथरुममधला प्रेमप्रसंग, ज्याबद्दल मी काही सांगण्यापेक्षा प्रत्येकाने तो पहावा हेच बरं. दुर्दैवाने, आपल्या सेन्साॅर बोर्डाने त्यातल्या काही शाॅट्सना कात्री लावली आहे. इतरही ठिकाणी ती लागलेली आहेच. पण त्यासाठी सिनेमा थेट छोट्या पडद्यावर पाहू नका. मी सुचवेन की आधी चित्रपट थिएटरमधे पहा आणि मग डाऊनलोड करुन पहा. एकदा थिएटरला पाहिला असल्याने, मग गिल्टी वाटायचं काही कारण नाही. नको तिथे कात्र्या लावूनही आपल्या मठ्ठ सेन्साॅर बोर्डाने या भव्य आणि फॅन्टसीत रुजलेल्या प्रेमकथेच्या माध्यमातून सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्याचं आद्य कर्तव्य पार पाडलच आहे. पण मी म्हणेन की आपल्या मुलांच्या बुद्धीमत्तेवर विश्वास असलेल्या प्रत्येकाने एकदा स्वत: पाहून मग हा चित्रपट त्यांना जरुर दाखवावा. संस्कार हे केवळ पाठ्यपुस्तकांमधून आणि धर्मग्रंथांमधून होत नाहीत. चित्रपटांमधूनही होतात.
- ganesh matkari

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP