ऑस्कर्सचं इंडी स्पिरीट !

>> Monday, May 3, 2021

 




ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स ॲन्ड सायन्सेस तर्फेॲकेडमी अवॉर्डनावाने चित्रपट पुरस्कार द्यायला सुरुवात झाली, ती १९२९ मधे. चित्रपट तेव्हा नुकते बोलायला लागले होते, आणि चित्रपटसृष्टी नव्याने बऱ्याच गोष्टी शिकत होती. अमेरिकन चित्रपटउद्योग, किंवा हॉलिवुडचं वर्चस्व जसजसं वाढत गेलं, तसं या ॲकेडमी अवॉर्ड्सना, अर्थातऑस्करपुरस्कारांना येणारं महत्वही वाढत गेलं. या पुरस्कारांना केवळ अमेरिकेपुरती मर्यादा राहू नये म्हणून ( आणि त्याबरोबरच जगभरात अमेरिकन सिनेमा पाहिला जात असल्याचं ऋण काही प्रमाणात फेडलं जावं म्हणूनही ) ऑस्कर्सनी जागतिक चित्रपटांचा सन्मान करणंही १९४७ पासून सुरु केलं, आणि १९५६ पासूनपरभाषिक चित्रपटाचा पुरस्कारहा एक महत्वाचा विभाग बनला


व्यावसायिक सिनेमा, ही हॉलिवुडची प्रमुख ओळख असली, तरी आपल्याकडे जसा समांतर सिनेमा होता-आहे, तसा त्यांच्याकडेअमेरिकन इंडीपेन्डन्टकिंवाइंडीचित्रपट आहे. मर्यादीत बजेट, लोकप्रिय वा कौटुंबिक धर्तीच्या चित्रपटांपलीकडला आशय, प्रायोगिक मूल्य, अशी त्याची बरीच वैशिष्ट्य आहेत. सुरुवातीच्या दिवसात अशा वेगळ्या चित्रपटांची निर्मिती मोठे स्टुडिओज करत नसत, पण पुढे या संस्थांनिही इंडी चित्रपटांसाठी वेगळ्या शाखा काढून त्यांच्या निर्मिती आणि वितरणाला सुरुवात केली. १९८० च्या दशकापासून या वळणाचे चित्रपट अमेरिकेत आपलं अस्तित्व जोमाने टिकवून आहेत. त्यांच्यासाठीइंडीपेंडन्ट स्पिरीट अवॉर्ड्सनावाचे पुरस्कार दिले जातात आणि त्यांचा सोहळा हा ऑस्कर सोहळ्याच्या आदल्या दिवशी घेतला जातो. या वर्षी तो अगदी आदल्या दिवशी नाही तरी त्या सुमारासच घेण्यात आला. आता ऑस्कर पुरस्कार हे व्यावसायिक प्रकारचे असताना मी इंडी चित्रपट आणि त्यांच्या पुरस्काराविषयी का बोलतोय, तर त्यामागे तसच कारण आहे


काही वर्षांपूर्वी माझ्या अमेरिकेत असलेल्या मित्रांना बोलताना ऐकलं, की अलीकडे ऑस्करला काही अर्थ राहिलेला नाही. ऑस्कर मिळालं म्हणून मी चित्रपट मुद्दाम मिळवून पाहिले, तर ते आमच्यापर्यंत पोचलेच नाहीत. कसल्या त्या फिल्म्स, पूर्वीचे ऑस्कर मिळवणारे चित्रपट कुठे आणि हे नवे चित्रपट कुठे...वगैरे. ही भावना अर्थातच मला पहिल्यांदा दिसत नव्हती, केवळ रसिक म्हणून चित्रपट पहाणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या मनात ती गेली काही वर्ष टिकून राहिलेली आहे. आणि तिचं कारण आहे, ते ऑस्करचं ओव्हरकरेक्शन. काळाबरोबर रहाणं ही प्रत्येकच व्यवस्थेची गरज आहे, आणि ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स ॲन्ड सायन्सेस त्यात मागे नाही. पण सकारात्मक बदल करता करता कधीकधी ॲकेडमी अशा टोकाला जाते, की  मूळची दिशा पूर्णच बदलून जावी.


याच काळाबरोबर रहाण्याच्या नादात त्यांनी काही वर्षांपूर्वीपासून असं धोरण ठेवलय की विजेता ठरणाऱ्या चित्रपटाला व्यावसायिक मूल्य असण्यापेक्षा त्यातल्या आशयाला अधिक महत्व असायला हवं. आता वरवर पहाता, यात गैर काहीच नाही. कोणीही या भूमिकेचं स्वागतच करेल. हा व्यावसायिक, हा समांतर यापेक्षा निव्वळ सर्वोत्कृष्ट अशी निवड झाली, तर ते छानच नाही का ? गेल्या काही वर्षातल्या त्यांच्या निकालाकडे आपण पाहिलं, तर हे ठळकपणे दिसून येतं की विजेते चित्रपट हे व्यावसायिक धर्तीचे कमी आणि समांतर वळणाचे अधिक असतात. इतके, की त्यांच्यातल्या अनेकांनी इंडी चित्रपटांचं इंडीपेन्डन्ट स्पिरीट अवॉर्डही आधी पटकावलेलं असतं. उदाहरणार्थबर्डमॅन’ (२०१४), ‘स्पॉटलाईट’ (२०१५), ‘मूनलाईट’ (२०१६हे दोन्ही पुरस्कारांमधे सर्वोत्कृष्ट चित्रपट विजेते आहेत. गेल्या वर्षी ऑस्करविजेत्या ठरलेल्यापॅरासाईटला स्पिरीट अवॉर्ड्समधे  सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नसला, तरी त्याने तिथे  आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवला होताच. आणि यंदानोमॅडलॅन्डहा पुन्हा दोन्ही ठिकाणी विजेता ठरलेला आहे. खरं म्हणजे पुरेशी मान्यता असणारा एक महत्वाचा पुरस्कार हा केवळ समांतर पद्धतीच्या सिनेमासाठी राखीव असताना, ऑस्करला आपलं व्यावसायिक स्वरुप राखून ठेवायला हरकत नाही. वेळोवेळी काही खास चित्रपटांबाबत अपवाद करायला हरकत नाही, पण त्याउलट आता त्यांची निवड समांतर शैलीच्या, अर्थात इंडी चित्रपटांच्या अधिकाधिक आहारी जाताना दिसते. या वर्षीची एकूण नामांकनं पाहिली तर चित्र असच होतं, की प्रमुख विभागात निवडलेला कोणताच सिनेमा हा मुख्य धारेतला, रंजनाला महत्व देणारा, आम रसिकांना खूष करणारा नव्हता. खरं म्हणजे सध्याच्या काळात हॉलिवुडच्या सुवर्णकाळाची आठवण करुन देणारे रंजक चित्रपट काही प्रमाणात दिसले असते तर प्रेक्षकांना ते प्रोत्साहीत करणारं झालं असतं, पण ऑस्करने ते केलं नाहीत्यांच्या यादीतला दर सिनेमा पोलिटिकली करेक्ट आशय मांडणारा होता, रंजन हे दुय्यम होतं. डेव्हिड फिंचरचामॅन्क’, आणि एमरल्ड फेनेल दिग्दर्शितप्रॉमिसिंग यंग वुमनहे थोडेफार सर्वसाधारण प्रेक्षकाच्या अपेक्षांमधे बसणारे होते, पण त्यांनाही तसे महत्वाचे पुरस्कार मिळाले नाहीत


असं म्हटलं जातय, की यंदा पुरस्कारांमधे कोणाचच वर्चस्व राहिलं नाही, कारण पुरस्कार विभागले गेले. प्रत्येकजण दोन तीन पुरस्कार घेऊन घरी गेला. पण ते तितकंसं बरोबर नाही. संख्येइतकच किंवा त्याहूनही अधिक महत्व आहे, ते कोणत्या विभागात मान्यता मिळते याला, आणि त्या दृष्टीने पहाता, केवळ तीन पुरस्कार मिळूनहीनोमॅडलॅन्डचित्रपटाचं वर्चस्व या वर्षी राहिलं असं मानता येईल, कारण त्यांचे तीन पुरस्कार सर्वाधिक महत्वाचे होते. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक ( क्लोई जाओ) आणि अभिनेत्री ( फ्रान्सिस मॅकडॉरमन्ड). ‘नोमॅडलॅन्डहा चित्रपट म्हणून आपण पहातो आणि त्यात प्रमुख भूमिकांमधे फ्रान्सिस मॅकडॉरमन्ड आणि डेव्हिड स्ट्रेथर्न हे व्यावसायिक अभिनेते आहेत, तरीही त्याचा बाज माहितीपटाचाच आहे, आणि इतर भूमिकांमधेही सामान्य माणसं आहेत, नट नाहीत. यातली प्रमुख व्यक्तीरेखा फर्न ही भटक्यासारखी रहाते. अनेक वर्ष एका ठिकाणी राहिल्यावर आता तिनेघरया व्यवस्थेचाच त्याग केलाय आणि ती पोटापाण्याची सोय पहात विविध ठिकाणी फिरत मुक्त आयुष्य जगते. जेसिका ब्रुडर यांच्या पुस्तकावर आधारीत असलेल्या या चित्रपटाला लौकिकार्थाने कथा नाही पण त्यातलं तत्वज्ञान एका परीने अमेरिकन समाजाच्या बदलत्या मनोवस्थेकडे निर्देष करतं. आज त्यांच्याकडे वाढत चाललेली अस्थिरता, अनिश्चितता, उद्याची चिंता, याचं दर्शन या चित्रपटातून होतं. नोमॅडलॅन्डला मिळालेला अभिनय आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार योग्यच आहे. दिग्दर्शनाचा तर खासच कारणहर्ट लॉकरसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवणाऱ्या कॅथरिन बिगेलोनंतर हा पुरस्कार पटकवणारी क्लोई जाओ ही दुसरीच महिला चित्रपटकर्ती ठरली आहे. तिचं आशियाई वंशाचं असणंही नवा विक्रम घडवणारं. मात्रनोमॅडलॅन्डचा एकूण सूर, कथेचा संपूर्ण अभाव, मिनिमलिस्ट दृष्टीकोनहे सारं पाहून मला तरी हा ऑस्करचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून योग्य उमेदवार वाटत नाही. त्यापेक्षा ॲरन सॉरकिन दिग्दर्शित ट्रायल ऑफ शिकागो हा १९६८ साली शिकागोमधे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर घडणारा, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरणारा चित्रपट मला त्यासाठी अधिक योग्य वाटला असता. महत्वाचा विषय, प्रेक्षकांना गुंतवणारा आणि सामाजिक तसच राजकीय महत्व असलेला संघर्ष मांडणारा, आजच्या काळाशी सुसंगत, उत्तम नटसंच असलेला आणि वाशिष्ट्यपूर्ण पटकथा असलेला असा हा चित्रपट आहे. आश्चर्य म्हणजे, सहा विभागात नामांकन असून त्याला यंदा एकही पुरस्कार मिळाला नाही. सॉरकिनच्या पटकथेला तो मिळेल, असं जवळपास गृहीतच धरण्यात आलं होतं, पण तो पुरस्कारही एमरल्ड फेनेलला, ‘प्रॉमिसिंग यंग वुमनचित्रपटासाठी गेला


असाच अनपेक्षित ठिकाणी गेलेला आणखी एक पुरस्कार म्हणजेसर्वोत्कृष्ट अभिनेता’, जोमा रेनी ब्लॅक बॉटमसाठी चॅडविक बोसमनला जाईल असं सगळेच धरुन चालले होते. ‘ब्लॅक पॅन्थरचित्रपटाने मोठा स्टार झालेल्या बोसमनचा गेल्या वर्षी कॅन्सरने दुर्दैवी अंत झाला. तोही अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी. यावेळचे अनेक महत्वाचे अभिनय पुरस्कार या भूमिकेसाठी बोसमनला मिळालेले आहेत आणि इथेही त्याला तो मिळेल असं सर्वांनाच वाटत होत. बहुधा ऑस्कर व्यवस्थापनालाही, कारण एरवी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार शेवटी ठेवण्याची प्रथा बदलून त्यांनी अभिनयाचे पुरस्कार शेवटी ठेवले होते. बोसमनला श्रद्धांजली वाहण्याच्या हृद्य सोहळ्याच्या तयारीत असणाऱ्या सर्वांनाच हा पुरस्कार त्याला मिळाल्याचा मोठा धक्का बसला. पुरस्कार गेला तो फादरया चित्रपटासाठी ॲन्थनी हॉपकिन्सकडे, जो आपल्याला पुरस्कार मिळणार नाही अशा खात्रीने गैरहजर होता. एक मात्र नक्की, की जर यातला भावनांचा प्रश्न बाजूला ठेवला, तर फादरपहाणाऱ्या कोणालाही, भ्रमिष्ट होत चाललेल्या वृद्धाच्या भूमिकेतल्या उत्कृष्ट अभिनयासाठी झालेल्या  हॉपकिन्सच्या सन्मानात काही गैर वाटणार नाही. अभिनेत्याबरोबर फादरचित्रपटाला अपेक्षित असलेला दुसरा पुरस्कारही मिळाला. आणि तो म्हणजे पटकथाकार फ्लोरिअन झेलर आणि क्रिस्टफर हॅम्प्टन यांनाआधारीत पटकथेसाठी


अकाली बहिरेपणा आलेल्या ड्रमरची कथा सांगणाऱ्या डरायस मार्डरच्या  ‘साउंड ऑफ मेटलला ध्वनी आणि संकलनाचा पुरस्कार, १९४० मधलं हॉलिवुडसिटीझन केनचित्रपटाच्या संदर्भाने उभारणाऱ्या डेव्हिड फिंचरच्या  ‘मॅन्कला छायालेखन आणि प्रॉडक्शन डिझाईनचा पुरस्कार , आणि अर्थात क्रिस्टफर नोलनच्याटेनेटला मिळालेला व्हिजुअल इफेक्ट्सचा पुरस्कार  हे तांत्रिक पुरस्कार तसे अपेक्षेनुसारच होते. वाईट एवढच, की प्रेक्षकांना हॉलिवुडची जादू नेमाने दाखवणाऱ्या फिंचर, नोलनसारख्या दिग्दर्शकांना तांत्रिक पुरस्कारांवर समाधान मानावं लागलं


सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मला विशेष पटला नसला, तरीआंतरराष्ट्रीयआणिॲनिमेटेडया इतर दोन महत्वाच्या चित्रपट पुरस्कारांबाबत मात्र तसं झालं नाही. आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी दारुचा आसरा घेणाऱ्या शिक्षकांची गोष्ट सांगणारा थॉमस विंटरबर्गचाअनदर राउंडविजेता ठरणार हे जवळपास गृहीतच होतं, तसच जॅझ संगीताची लयबद्ध साथ असणारा पीट डॉक्टर दिग्दर्शीतसोलदेखील ॲनिमेटेड चित्रपटांच्या स्पर्धेत पुढेच होता. हे दोन्ही विजेते, वाटले होते तसेच


थोडक्यात सांगायचं तर यंदा निवडण्यात आलेल्या आणि विजेत्या ठरलेल्या चित्रपटांमधे दर्जा आणि आशय या दृष्टीने काहीच खटकण्यासारखं न्हवतं, पण तरीही त्यांना चित्रपटरसिकांकडून मिळालेली नकारात्मक प्रतिक्रिया, आणि आपापल्या घरुन ऑस्कर समारंभ पहाणाऱ्यांची अर्ध्यावर आलेली प्रेक्षकसंख्या, हा एका परीने ऑस्करला, त्यांच्या  निवडप्रक्रियेला दिलेला इशारा आहे. त्यावरुन सावध व्हायचं, की आपलीइंडीचित्रपटधार्जिणी भूमिका तशीच ठेवायची, हे त्यांनी आता ठरवायला हवं


- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP