आस्वादाच्या कक्षा रुंदावू पहाणारा ‘दिठी’

>> Sunday, June 6, 2021

 




या लेखाला स्पॉयलर वॉर्निंग देण्यात मुद्दा नाही, कारण पुष्कळ जणांनी सोशल मिडीआवर लिहिल्यामुळे, आणि त्यातल्या अनेकांनी मूळ कथाही वाचल्यामुळे  ‘दिठीचित्रपटाचं कथानक सर्वांना माहीत आहेच. वॉर्निंग द्यायची तर एवढीच, की हा लेख सिनेमाबद्दल आहे. दि बा मोकाशींच्याआता अमोद सुनासि आलेया  कथेबद्दल नाही. कथा आणि सिनेमा याबद्दल एक महत्वाची नोंद मात्र आधीच घेतो. ती अशी.


अनेकदा दिग्दर्शकांना कथा आवडते. मग ते ती डेव्हलप करतात. डेव्हलप करताना कथेत अधिक गोष्टी येतात, नसलेल्या जागा तयार होतात, शेवटी चित्रपट तयार होतो तेव्हा तो आणि मूळ कथा, यात खूपच फरक असू शकतो. आता याला चांगलं, किंवा वाईट असं म्हणता येणार नाही. दोन्ही पर्याय हे नित्य वापरात आहेत. जर कथेचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांची याला हरकत नसेल आणि दिग्दर्शक ताकदीचा असेल, तर त्याच्या भूमिकेनुसार कथा बदलली जायलाही काही हरकत नाही. किंवा दिग्दर्शकाने मूळ कथेचा जीव तसाच ठेवून तो माध्यमाच्या मदतीने अधिक प्रभावी करत नेणं, या पर्यायालाही काही हरकत नाही. सांगायचं ते एवढच, कीदिठीचित्रपटासाठी सुमित्रा भावे यांनी दुसरा पर्याय निवडला आहे. मी कथा अनेक वर्षांपूर्वी वाचलेली आहे, आणि वाचली तेव्हा मला आवडली होती. पण आता जरी तिचा आकार आणि आशय लक्षात असला, तरी तपशील लक्षात नाही. चित्रपट पाहिल्यावर मी कथेची उजळणी केलेली नाही. तरीही माझ्या आठवणीप्रमाणे पटकथा बरीचशी ( सर्वच बाबतीत नाहीमुळाबरहुकूम रहाते. रामजी लोहाराच्या मुलाचा मृत्यू असा ड्रॅमॅटीक ( आणि ताणता येण्याच्या मुबलक शक्यता असणारा ) भाग सुरुवातीला असतानाही, ती जाणून बुजून कथानकाच्या एकूण स्वरुपाचा विचार करते, आणि आधी नाट्यमय भाग लांबवणं टाळते. कथेच्या केंद्राशी प्रामाणिक रहाते. ते पसरट होऊ वा सरकू देत नाही. जो विस्तार होतो, तो कथेतल्या सूचक जागा शोधूनच


तर चित्रपटाला खरी सुरुवात होते ती पावसाच्या आवाजाने. दृश्यातही आपल्याला आधी दिसतं, ते ढगाळलेलं आभाळ. त्यानंतर वाहणारी नदी, आणि काळवंडलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर धावत जाणारी एक आकृती. ती रामजीच्या नावाने हाका मारते आहे. मग दिसतो, तो लोहाराचा भाता. केलेला हाकारा पूर्ण होतो तेव्हा लक्षात येतं, की रामजीच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रामजीचा ( किशोर कदम ) चेहरा दिसतो, तो एकदाच, आणि त्यानंतर दृश्य फेड आऊट होऊन उरलेली श्रेयनामावली सुरु होते. श्रेयनामावली सुरु असताना दृश्य येतात, ती कथानकातले प्रमुख घटक एस्टॅब्लिश करणारी. निसर्ग, गाव, पोथी, सगुणा गाय, पाण्यात कुठेतरी अडकलेलं एक वस्त्र, पोथी वाचली जाते तो माळा , इत्यादी. या भागाला प्रास्ताविक म्हणता येईल. इथे आपल्याला फार गोष्टी सांगितल्या जात नाहीत. पण पुढे महत्वाच्या ठरणाऱ्या काही गोष्टी सूचित होतात


मुख्य कथेला सुरुवात होते, तेव्हा मधे काही घडून गेलय. रामजीचा तरुण मुलगा गेल्याचं त्याला अपरिमित दु: झालय, त्या धक्क्यातून तो सावरलेला नाही. वर या दु:खात भर पडण्यासारखी आणखी एक गोष्ट झालीय, आणि ती म्हणजे त्याच्या गरोदर सुनेला , तुळसाला , या धक्क्याने प्रसूतिवेदना सुरु होऊन मुलगी झालेली आहे. विठ्ठलाचा परमभक्त असलेल्या रामजीचं एकच मागणं होतं, की आपला मुलगा आपल्याला नातवाच्या रुपाने परत मिळावा, जो मिळाल्याने तो बिथरल्यासारखा झाला आहे. त्याला सून आणि मुलगी डोळ्यासमोरही नको वाटते, तर मुलाच्या दु:खातून तर तो बाहेरच पडू शकत नाही. हे सारं आपल्यापुढे येतं, ते वेगवेगळ्या मार्गानं. स्वत: रामजीला आपला भूतकाळ आठवतो, किंवा गावकऱ्यांच्या बोलण्यात त्याचे संदर्भ येत जातात


सामान्यत: कथानकांचे सेटअप, कॉन्फ्लिक्ट आणि रेझोल्यूशन हे तीन प्रमुख विभाग/अंक असल्याचं मानलं जातं. मला वाटतं दिठीला तसे दोनच भाग आहेत. तेही असे विभाग म्हणावे इतके लक्षात येण्यासारखे नाहीत. पहिल्या भागात कथानकाच्या सुरुवातीची परिस्थिती मांडली जाते. रामजी, त्याची विठ्ठलावरची श्रद्धा, मुलाचा त्याला वाटणारा आधार आणि तो गेल्याने आलेली हतबलता  हे जसं उभं रहातं, तसच गावातल्या काही मंडळींचाही थोडक्यात परीचय करुन दिला जातो. त्याबरोबरच समोर येतं ते निसर्गाचं रौद्ररुप. पावसाचा वापर हा दिठीमधे अतिशय लक्षवेधी पद्धतीने केला आहे, आणि त्याचं अस्तित्व हे आपल्याला सतत जाणवणारं आहे.


चित्रपटातला महत्वाचा भाग हा एका सलग मोठ्या प्रसंगासारखा आहे, जो ( प्रामुख्याने )दोन स्थळी घडतो. पहिलं स्थळ आहे, ते संतू वाण्याचं घर, जिथे गावातली काही मंडळी पोथी वाचण्यासाठी जमली आहेत. रामजी त्यांच्याबरोबर नेहमी असणारा आहे, त्याच्या दु:खाची त्यांना कल्पना आहे, पण पोथी वाचनाने कदाचित त्याला आधार मिळेल या कल्पनेने जोशीबुवा ( डॉ मोहन आगाशे ) त्यालाही बोलवून आणतात. तो जणू झाल्या घटनेने बधीरच झालेला. त्यामुळे वाचन त्याला शांती तर देत नाहीच, वर आता त्याला पोथीतल्या ओळींचे अर्थही लागेनासे होतात. नवे प्रश्न उपस्थित होतात ज्याची उत्तरं त्याच्यापाशी नाहीत


दुसरं स्थळ आहे, ते शिवा ( शशांक शेंडे )आणि पारुबाईचं ( अमृता सुभाष ) यांचं घर. त्यांची सगुणा नावाची गाय अडली आहे. अशा अडलेल्या गाईंची सोडवणूक करण्यात रामजी पारंगत आहे, पण त्याच्यावर संकट आलं असताना त्याला कसं बोलवायचं, या संभ्रमात शिवा-पारु पडले आहेत. पण शेवटी निरुपाय होतो आणि भर पावसात पारुबाई रामजीला साद घालत धावत सुटते


चित्रपटाचा आशय हा ज्ञानेश्वरीतल्या ओळींशी जोडलेला आहे, ज्या आयुष्याचं तत्वज्ञान सोप्या शब्दात आपल्यापुढे मांडतात. आपल्या दिठीचा, म्हणजेच दृष्टीचा पुरेसा विस्तार झाला, तर आयुष्यातलं द्वैत लयाला जाईल, विसंगती उरणार नाही, असं या ओळी सांगतात, पण ऐहीक पातळीवर आणि कथेच्या विशिष्ट पार्श्वभूमीवर त्यांचा अर्थ पाहिला, तर रामजीने केलेला परिस्थितीचा स्वीकार, आणि आपल्या दु:खावर मात करुन त्याने जीवनाला सामोरं जाणं असा निघू शकेल. ते घडून येईल का, हा चित्रपटातला पेच आहे.


चित्रपटातलं द्वैत समोर येतं ते विविध रुपातून. रामजीला आपल्या सुनेला नात होण्याचं झालेलं दु:, पण सगुणेला कालवड व्हावी अशी शिवा पारुची इच्छा, चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या हाकाऱ्याचं  पुढे पारुबाईने दिलेल्या हाकाऱ्यात मिसळणं, जन्म आणि मृत्यूच्या वेणा सारख्या असल्याचा रामजीला होणारा साक्षात्कार...


सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने १९९५ च्यादोघीचित्रपटापासून कायम एकत्रच चित्रपट केले आहेत, दिठी हा सुमित्रा भावेंनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिलाच, आणि आता एकमेव चित्रपट. त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा तो थोडा वेगळादेखील आहे. सामाजिक आशय आणि वास्तववाद या दोन गोष्टी भावे-सुकथनकरांच्या चित्रपटांमधे आपण नेमाने पहातो, आणि इथेही त्याच्या शक्यता आहेत, पणदिठीहा रिअलिझम पेक्षा फॉर्मलिस्ट वळणाकडे झुकतो. त्यातलं वास्तव हे अधिक शैलीदार आहे. याचं एक छोटं उदाहरण घ्यायचं, तर गावकऱ्यांचं चित्रण ज्या पद्धतीने येतं त्याकडे पहाता येईल. पहिले काही प्रसंग पाहिले ( विशेषत: जोशीबुवा रामजीला बोलवण्यासाठी त्याच्या घरी जातात त्याआधीचा प्रसंग ) तर वाटतं की गावकऱ्यांचा वापर हा नाटकांमधल्या कोरस सारखा आहे. त्यांच्या बोलण्यात होणारी पुनरावृत्ती, किंवा या विशिष्ट प्रसंगातल्या दृश्यसंकल्पना, हे पाहूनही ते लक्षात येईल. एकूणातच, या गावकरी समूहाला स्वतंत्र ओळख मर्यादीत आहे, पण गट म्हणून ते आपल्यापुढे एकत्रितपणे ओळख तयार करतात. त्यातलं कोणीच कथेमधलं प्रमुख पात्र नाही. कथानक आहे ते रामजी, त्याची सून, काही प्रमाणात शिवा - पारु, यांचं, पण तरीही गावकऱ्यांचा समूह हा जे घडतं त्यावर टिप्पणी करतो. ही सारी लक्षणं कोरसची आहेत. त्यांच्या पेहरावातही साम्य आहेच. जणू ही सगळी मिळून एक पात्र आहेत. कथानकाचं शोकांत असणं, त्याचं नियतीशी जोडलेलं असणं, हेदेखील या कल्पनेशी सुसंगत आहे. एरवी महत्वाच्या भूमिकात दिसणाऱ्या कलावंतांनी ( डॉ मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, कैलाश वाघमारेया लहान भूमिका केल्यानेही त्यांना वजन आलं आहे


दृश्य रुपातही ( छायालेखन धनंजय कुलकर्णीचित्रपटाचा शैलीदारपणा दिसतो. आकाशाची बदलती रुपं, भूतकाळातली वारी दाखवताना वापरलेले म्यूटेड रंग, वेळोवेळी येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण दृश्यसंकल्पना, यातून तो हलकेच जाणवतो. काही मोजक्या जागांवर तो अधिक ठळक होतो. पारुबाई रामजीला बोलावण्यासाठी धावत येते त्याआधी रामजीच्या आठवणीतला एक प्रसंग आहे. सून आरशात पाहून कुंकू लावतेय अशी त्याची सुरुवात आहे, तो पाहून घ्या.( आता चित्रपट ओटीटीवर असल्याने तो आपण हवा तेव्हा पाहू शकतो, किंवा मधलाच एखादा भागही पुन्हा पुन्हा पाहू शकतो. याचा जरुर फायदा करुन घ्या.) या सगळ्यामुळे मी चित्रपटाला संपूर्ण वास्तवाचे नियम लावत नाही. एखाद्या रुपककथेसारखं मी त्याकडे पाहू शकतो


इथे दृश्यभागाबद्दल बोलल्याने, एका गोष्टीची नोंद त्याबरोबरच घ्यायला हवी आणि ती म्हणजे  चित्रपटातला ध्वनी ( ध्वनी - गणेश फुके, पियुष शाह ) . हा अगदी लक्षपूर्वक ऐकण्यासारखा आहे. पावसाचं सततचं असणं या ध्वनीमधून अधोरेखित होतं. स्थळानुसार हा आवाज बदलत जातो. मोकळ्यावर वा बंदीस्त जागांमधे त्याचं स्वरुप बदलतं. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा पाऊस उघडतो, तेव्हा शांततेत टपटप पडणारे थेंब, हे पावसाचं नसणंही फार प्रभावीपणे जाणवून देतात. चित्रपटात संगीत नाहीच असं नाही, पण ते मोजक्या आणि आवश्यक त्याच जागी आहे. त्याचं कमी असणं, हेच त्याला प्रभावी ठेवतं.


चित्रपटातला अभिनय ही चांगल्यापैकी जमेची बाजू आहे. त्यात किशोर कदमचा अर्थात वरचा नंबर. हा त्याचा आजवरचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स असेलसं नाही, पण त्याच्या उत्तम भूमिकांमधे हीचं स्थान नक्कीच आहे. मघा मी कोरस म्हणून ज्यांचा उल्लेख केला, त्या गटामधे डॉ आगाशे सर्वात प्रभावी. त्याशिवाय अमृता सुभाषची पारुबाईदेखील विशेष लक्षात रहाण्यासारखी


प्रत्येकालाच चित्रपटातली दर गोष्ट आवडतेच असं नाही. पण ज्या गोष्टी मला आवडत नाहीत, वा पटत नाहीत, त्यांना मी नेहमीच चित्रपटाच्या एकूण परिणामाशी तुलना करुन पहातो, आणि मग त्यांना किती महत्व द्यावं याचा विचार करतो. अशा काही जागा अर्थात दिठी मधेही आहेत. यातली एक जागा म्हणजे सुरुवातीच्या भागात असलेला, रामजी एका दुसऱ्या व्यक्तीचं सांत्वन करतो हा फ्लॅशबॅकने येणारा प्रसंग. आता सामान्यत: तो रामजीच्या आयुष्यात खरा घडला असणं सहज शक्य आहे. इतरांना धीराचा सल्ला देणारी व्यक्ती स्वत:वर प्रसंग येताच हताश होणं काही फार अविश्वसनीय नाहीच, पण तो प्रसंग पटकथेत घेतल्याने रामजीची व्यक्तीरेखा विनाकारण डिसक्रेडीट होते. हा माणूस दुसऱ्याला जे सांगत होता ते तो स्वत: जराही का समजून घेऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं. आता दिग्दर्शकाच्या दृष्टीने ते अधिक प्रामाणिक व्यक्तीमत्व दर्शनही असू शकेल, पण मला तो प्रसंग नको होता असं वाटलं एवढं खरं


असंच काहीसं शंकर पार्वतीच्या प्रसंगाबाबतही वाटलं. त्या कॅलेंडरच्या प्रतिमा, प्रत्यक्ष प्रसंगातही शंकराने घाई करणं आणि पार्वतीने शंकरावर डाफरणं, ते ज्यांच्या घरी दिसतात त्यांचीही शिवा-पारु ही नावं असणं, हे गंमतीदार आहे, तसच त्यांचं दर्शन आपल्या लोककला/दंतकथांमधे येणाऱ्या देवांच्या प्रतिमांशी सुसंगत आहेपणगंमतीदारप्रसंग घालण्याचं चित्रपटाचं टेक्श्चर नाही. शिवाय प्रसंगाचं फार प्रयोजनही नाही. मला तो मूळ कथेत वाचल्याचं आठवत नाही, पण त्यात तो आहे, असं मला कळलं. कदाचित अशी शक्यता आहे, की कथेत असलेल्या जागा वापरुन पूर्ण लांबीचा चित्रपट करायचा असताना, हा असलेला प्रसंग काढून टाकणं जीवावर आलं असेल. मला काही तो खटकला नाही, पण त्याची गरजही वाटली नाही.


खटकणारी एक गोष्ट मात्र आहे, आणि ती तशी महत्वाची मानण्यासारखी. ती म्हणजे शेवटाकडच्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगातला व्हिजुअल इफेक्ट्सचा वापर. तो अगदीच अनावश्यक आहे. एकतर तो कृत्रिम वाटतो, शिवाय इथे खरं महत्व आहे, ते रामजीच्या तोंडी येणाऱ्या संवादाला. बरंजर नुसतं सूचक दाखवलं असं वाटायला नको असेल, तर जन्माची प्रक्रीया थोडी अधिक स्पष्टपणे प्रत्यक्ष दिसणं आवश्यक होतं. ती पूर्णत: कॅमेराबाहेर ठेवणं, आणि अखेर त्याऐवजी vfx वापरणं, हे परिणामाला धोका पोचण्याच्या खूपच शक्यता असलेलं, विशेषत: चित्रपट संपण्याच्या इतकं जवळ. तसं असतानाही रसभंग होऊन एकूण परिणाम खाली जात नाही, हे विशेषच.


आणखी एका गोष्टीची नोंद घ्यावीशी वाटते, जिचा उल्लेख मी वाचलेल्या एकदोन प्रतिक्रियांमधे आला आहे. ते म्हणजे रामजीचं सतत सुनेला लागेलसं बोलत रहाणं. नात झाल्याचं दाखवणं, आणि त्यावर रामजीला येणारा राग, तो त्याने व्यक्त करणं, हे मला नाही खटकलं. त्याची जी मनस्थिती आहे, त्यात ते होणं अगदी स्वाभाविक आहे. शिवाय नातीच्या पात्राची योजना, ही घटनारुपात रामजीचा स्वीकार दिसण्यासाठी महत्वाची आहे. त्याशिवाय तो स्वीकार शब्दांपुरता उरता, आणि तो प्रत्यक्ष दिसावा अशी दिग्दर्शकाची भूमिका योग्य वाटते. त्याचं सुनेला बोलणं मला फक्त एका विशिष्ट जागी अयोग्य वाटलं, आणि ते म्हणजे पारुबाईच्या घरी जाण्याआधी तो काही सामान घेण्यापुरता घरी डोकावतो तेव्हा. कदाचित ते संहितेत तितकं खटकत नसेल, पण दृश्यरुपात आल्यावर ते जाणवतं. कथानकात ही जागा येते तेव्हा रामजीचं पात्र हे जवळजवळ ऑटोपायलटवर आहे. मदतीसाठी आलेल्या हाकेने त्याला आपल्या मुलाच्या निमित्ताने मारलेल्या हाकेची आठवण करुन दिली आहे, आणि तिथे त्याच्या मदतीचा उपयोग झाला नसला तरी इथे तो मदतीसाठी सरसावला आहे. हे काम त्याचं नेहमीचं असल्याने दु:खाचा अंमल असला, तरी ठराविक गोष्टी तो यंत्रासारख्या करतो आहे. त्याच्यातला बदल हा अजून झाला नसला, तरी एक प्रकारे प्रक्रीयेला सुरुवात झालेली आहे. त्या परिस्थितीत, सुनेची सामान गोळा करायला मदत घेतल्यावर रामजीने तिला निघून जायला सांगणं, हे पटत नाही. किंवा मला पटलं नाही असं म्हणू. असो.


दिठीम्हणजे दृष्टी, आणि चांगल्या अर्थानेआर्टहाऊसम्हणाकलात्मकम्हणा, असलेल्या सिनेमाचं नाव ते असणं, हा एक चांगला संकेत आहे. स्वत: दिग्दर्शिकेनेही आपल्या नजरेत आणलेला विस्तार त्यात जाणवतो. चित्रपट आपल्याला काय दाखवतो, आणि आपण त्यात काय पहातो हा विचार या निमित्ताने जरुर होऊ शकेल. पहाणारा आणि पाहिली जाणारी गोष्ट यातलं द्वैत त्या निमित्ताने पुसट होत गेलं, तर कमाल होईल.



 

  गणेश मतकरी



9 comments:

मकरंद जोशी June 7, 2021 at 12:07 AM  

खुप नजाकतीने आणि तपशीलवार सिनेमाचं सौंदर्य आणि सामर्थ्य उलगडून दाखवलं आहे.

Hemant Kothikar June 7, 2021 at 12:41 AM  

सिनेमाची भाषा समजावून सांगणारा आणि सिनेमाची मूळ कथेपासून फारकत का करावी आणि एक स्वतंत्र माध्यम म्हणून त्याची समीक्षा का व्हावी हे उचितपणे सांगणारा लेख. सिनेमाची शक्तीस्थळे असगळ्यांनाच ठाऊक आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करीत नाही. सिनेमातल्या ज्या जागा मलाही खटकल्या त्या लेखात आल्या आहेतच. फ्लॅशबॅक मध्ये रामजींचे वारी प्रसंग मध्ये मध्ये दाखवल्याने मूळ कथेच्या फ्लो मध्ये अकारण खीळ येते असे मला वाटले. वासराचा प्रत्यक्ष जन्म दाखवणार होते पण ऍनिमल बोर्ड च्या नकारामुळे ते शक्य झाले नाही असे सुनील सुकथनकर यांनी एके ठिकाणी लिहिले आहेच. पण त्याऐवजी निदान गर्भवती गाय दाखवली असती तर ती तडफड जास्त जिवंत वाटली असती. इथे ती फक्त तिच्या हंबरण्यातून आणि अमृता सुभाषच्या अभिनयातून येते. कथेशी तुलना म्हणून नाही, पण कथेत ती तडफड जास्त जिवंत आहे.

मुळात द्वैत-अद्वैताचे तत्वज्ञान हा पाया असणाऱ्या या कथेत किंवा चित्रपटात खरे तर सगळीच पात्रे रूपक आहेत. पण प्रेक्षकांना रामजीची कथा कळण्यापलीकडे जाऊन चित्रपट या पायाला स्पर्श करतो का आणि शेवटी असणाऱ्या ओव्यांतील अर्थ ( जे कथेचे शीर्षक सुद्धा आहे ) प्रेक्षकांना कळून त्यांना त्या अध्यात्मिक तत्वज्ञानाचा अर्थ रामजीचा कहाणीच्या रूपाने समजतो का ( रीव्हू न वाचता ) याचे कुतूहल आहे. समजत नसेल तरीही केवळ रामजीची कहाणी म्हणून हा चित्रपट एक श्रेष्ठ कलाकृती आहे का याचेही कुतूहल आहे.

santoshpadmakar June 7, 2021 at 1:01 AM  

अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षण...

vijay tambe June 7, 2021 at 1:46 AM  

आतापर्यंत वाचलेल्या सर्व परिक्षणातील सर्वात उजवे आणि सिनेमा बघितला नसेल तर बघण्याची उत्सुकता वाढविणारे.

vijay tambe June 7, 2021 at 1:46 AM  

आतापर्यंत वाचलेल्या सर्व परिक्षणातील सर्वात उजवे आणि सिनेमा बघितला नसेल तर बघण्याची उत्सुकता वाढविणारे.

Sanjeevani June 7, 2021 at 5:51 AM  

नमस्ते सर, अतिशय विवेकपूर्ण विश्लेषण आहे हे! खूप आवडलं.
सून आणि नातीच्या व्यक्तिरेखांविषयीचं तुमचं मत अगदीच पटलं. हो पण, रामजीचा तो फ्लॅशबॅकमध्ये सल्ला देत असतानाचा प्रसंग नको होता असं मात्र मला वाटलं नाही. आणि गाय विते तो प्रसंगही दाखवलाय तसाच खूप प्रभावी आणि आशय पोचवणारा वाटला! vfx चा वापर कल्पक आणि सूचक वाटला. त्याचा अडथळा अजिबातच वाटला नाही.

Sandeep K June 8, 2021 at 12:06 AM  

अतिशय सुंदर परीक्षण. पण अजून चित्रपट बघायचा आहे. तो बघून पुन्हा प्रतिक्रिया लिहितो.

Sangram Kulkarni June 14, 2021 at 9:31 PM  

एखाद्या सिनेमाच्या परीक्षणांचा 'ढीग' पडलेला असताना त्या सिनेमाचे नाव जरी दिसले तरी ती पोस्ट, तो ब्लॉग, ते वर्तमानपत्राचे पान घडून पाहायला नकोसे होते. त्यातील बहुधा परीक्षणे एकांगी असतात. त्यात एक पात्र, एक अभिनेता, अभिनेत्री किंवा दिग्दर्शक केंद्रस्थानी ठेवून 'वाहवा' अर्थाचे शब्द आजुबाजुला पेरलेले असतात. अशावेळी गणेश मतकरी यांचे सर्वांगीण परीक्षण वाचायला मिळणे ही मेजवानी असते.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP