तलाश'- शोध , वेगळ्या सिनेमाचा !
>> Sunday, December 2, 2012
स्पॉयलर वॉर्निंग- ही सूचना खरंतर निरर्थक आहे, कारण मी ज्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे त्याहून कितीतरी अधिक गोष्टी फेसबुक आणि 'इन्डिआ टुडे' सारख्या समीक्षणांमधून वाचकांपर्यंत आधीच पोचलेल्या आहेत. आणि मुळातच रहस्यभेद व्हावा ,अशी माझी इच्छा नाही. तरीही ज्यांना चित्रपट कोणत्याही अधिक माहितीशिवाय पाहायचाय, त्यांनी हे वाचण्याआधी चित्रपट पाहावा.
कोंबडी आधी की अंडं ,या गहन प्रश्नासारखाच चित्रपटांसंबंधात विचारला जाणारा प्रश्न आहे ,तो प्रेक्षक आधी सुधारावेत, का चित्रपट हा ! प्रेक्षकांची समज बेताची असल्याने आम्ही बाळबोध चित्रपट देतो असे सांगणारे चित्रकर्ते आणि मुळात पाहायला मिळणारे चित्रपट बाळबोध असल्याने समज वाढणार तरी कशी , अशी तक्रार असणारा प्रेक्षक ,हे चित्र बॉलीवूडमधे नित्याचं आहे. फिल्म सोसायटी चळवळीत ,मी प्रेक्षकांना दमात घेणारं ' उत्तम चित्रपटाची अपेक्षा असेल तर प्रथम आपण उत्तम प्रेक्षक बनलं पाहिजे' ,या अर्थाचं वचनही ऐकलेलं आहे, मात्र ते काही खरं नाही. हा काही वन वे स्ट्रीट नाही आणि बदल हा केवळ एका बाजूलाच घडणं पुरेसं नाही, तर तो दोन्ही ठिकाणी दिसायला हवा. जसे केवळ प्रेक्षक सुधारून भागत नाही तसंच केवळ चित्रपट सुधारणंही पुरेसं नाही. जसं चित्रकर्त्यांनी लोकप्रिय आवडीनिवडीचा विचार न करता वेगळा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं तसंच जेव्हा या प्रकारचा वेगळा प्रयत्न चित्रपटातून दिसेल तेव्हा प्रेक्षकांनी त्याचं स्वागत करणंही महत्वाचं . हा प्रयत्न सर्वगुणसंपन्न असेल असं नाही, किंबहुना प्रेक्षकांच्या धोरणाला बिचकणा-या चित्रकर्त्यांनी कदाचित रॅडीकली काही वेगळं करणं टाळलं असण्याचीही शक्यता आहे. पण जेव्हा चित्रपटात काही नवं घडण्याची शक्यता दिसेल तेव्हा प्रक्षकांकडून प्रोत्साहन मिळणं ,हे उद्योगाचं स्वरुप बदलण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाहाता ,आमीर खान प्रॉडक्शन्स कडून केल्या जाणा-या चित्रपटांच्या वेगळेपणात सातत्य आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही . पीपली लाईव्ह आणि धोबीघाट या त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच परिचित व्यावसायिक चौकटीबाहेरच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न आपल्याला त्यांचीच निर्मिती असलेल्या रीमा कागटी दिग्दर्शित 'तलाश' मधे दिसून येतो .
मध्यंतरी रामसे कँपमधे सेटल झालेली आपल्या चित्रपटांतली भूतं हल्ली बाहेर पडून भट् आणि वर्मा कँपमधे सामील झाली आणि त्यांचे चित्रपट अधिक स्टायलिश आणि चांगलं छायाचित्रण असणारे झाले तरी प्रेक्षकांच्या बुध्यांकावरचा त्याचा अविश्वास अजूनही कमी झालेला नाही. अतिमानवी चित्रपट हा केवळ भयपट असू शकतो आणि भयपटाने प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी अमुक अमुक युक्त्या करायच्या असतात ,असे संकेत आपला सिनेमा अजूनही पाळतो. त्यामुळे 'तलाश ' सारख्या चित्रपटांमधे जेव्हा हा विषय पध्दत बदलून आणि संवेदनशील दृष्टिकोनातून मांडला जातो तेव्हा त्याची दखल घेणं अपरिहार्य ठरतं. तलाश पूर्णपणे स्वतंत्र नसला तरी प्रयत्नाचं स्वरूप हे प्रामाणिक आहे आणि अंतिमतः पडद्यावर दिसणा-या गोष्टिंमधे काहीतरी मनापासून केल्याची जाणीव आहे. अवघड विषय आणि प्रेक्षकाला झेपेल याची खात्री नसतानाही मोकळेपणाने काहीतरी चांगलं करण्याचा त्याचा हेतू आहे. तो सर्वांना आवडेल याची खात्री नाही मात्र ज्यांना आवडेल त्यांना तो याच चित्रपटाच्या गुणांमुळे आवडेल, मध्यंतरी 'बर्फी' ला जसा 'इतर चित्रपट अधिक वाईट असल्याने हा आवडला' असा नकारात्मक प्रतिसाद आला तसा इथे होणं संभवत नाही.
मात्र एवढं सांगितल्यावर मी असंही म्हणेन की त्याला ज्या प्रकारचा गोंधळलेला रिस्पॉन्स मिळाला आहे ,त्याचं मला फार आश्चर्य वाटत नाही. त्याच्या स्ट्रक्चरपासून ते तथाकथित रहस्यभेद करणा-या शेवटापर्यंत अनेक जागा अशा आहेत ज्या संपूर्णपणे जमलेल्या नाहीत आणि त्यांचं न जमणं हे कोणत्याही क्षणी प्रेक्षकांचा रसभंग करु शकतं . अशा वेळी आवश्यक आहे तो पेशन्स , आणि केवळ अमुक एका गोष्टीवर तो आवडण्याची पूर्ण मदार ठेवण्यापेक्षा , एकूण चित्रपटाकडे पहाण्याची तयारी आणि क्षमता.
'तलाश' हा दोन जवळजवळ पूर्णपणे वेगळ्या कथानकांना एकत्र करतो आणि त्यांना एकच असल्याप्रमाणे भासवण्याचा प्रयत्न करतो. पुत्रवियोगाच्या दुःखाने नातं जवळजवळ संपुष्टात आलेल्या एका जोडप्याचं कथानक हा इथला एक धागा आहे, तर मृत्यूच्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं भूतकाळात दडलेलं रहस्य हा दुसरा. हे दोन्ही धागे आपल्याला स्वतंत्रपणे परिचित आहेत आणि आपण अनेक चित्रपटांतून कथा कादंबर््यांतून त्यांना वाचलं ,पाहिलं आहे. पहिला धागा आँर्डीनरी पीपल, सन्स रुम पासून रॅबिट होल पर्यंत अनेक चित्रपटात आलेला आहे . गंमत म्हणजे ,त्याचं हेच रुप त्यातल्या अतिमानवी सूत्रासह आणि याच प्रकारच्या शेवटासह , रत्नाकर मतकरींच्या 'बंध' या कथेतही आलेलं आहे, मात्र हा विषय तसा परिचित असल्याने तो योगायोग असण्याची शक्यता मी निकालात काढणार नाही. दुसरा धागा हा सरळसरळ पीटर स्ट्रॉबच्या कादंबरीवर आधारीत एका चित्रपटावरुन सुचला असण्याची शक्यता आहे. मात्र कादंबरीचं ,चित्रपटाचं नाव इतकं प्रसिध्द आहे की ते घेणं ,हे चित्रपटातलं रहस्य उलगडून टाकल्यासारखं होईल. सबब, मी इथे ते नोंदवणार नाही. या दोन धाग्यांना एकत्र करते ती सुर्जन ( आमिर खान )ची व्यक्तिरेखा, जो आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूला स्वतःलाच जबाबदार धरतो , आणि आपल्यातच कुढत राहातो. आपल्या पत्नीलाही ( राणी मुखर्जी) आपल्यापर्यंत पोचू देत नाही आणि कामातच स्वतःला बुडवून घेण्याचा प्रयत्न करतो. या परिस्थितीत त्याच्याकडे अरमान ,या सुप्रसिध्द अभिनेत्याच्या रहस्यमय अपघाती मृत्यूची केस येते. अरमानची गाडी काहीच कारण नसताना रस्ता सोडून समुद्रात कोसळलेली असते. या मृत्यूशी जोडलेलं हरवलेल्या वीस लाख रुपयांचं रहस्यदेखील असतं ,जे पोलिसतपासाला जवळच्याच वेश्यावस्तीत घेऊन जातं. तिथे सुर्जनची गाठ पडते ,ती रोजीशी ( करीना कपूर) , जिचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध असल्याचं सुर्जनच्या लक्षात येतं . वस्तीतलाच लंगडा भिकारी तेमूर ( नवाझुद्दीन सिद्दीकी - कहानी ,गँग्ज आँफ वासेपूर आणि मिस लवली मुळे अचानक प्रकाशात आलेला मोठा स्टार, तुलनेने छोट्या ,पण लक्षवेधी भूमिकेत) देखील या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणार असं दिसायला लागतं.
हे उघड आहे ,की सुर्जनचं व्यक्तिगत आयुष्य आणि पोलिस तपास या जवळजवळ एअरटाईट अशा स्वतंत्र गोष्टी आहेत आणि चित्रपटाने त्यांचा एकमेकांशी लावलेला संबंध हा वरवरचा आहे. त्यामुळे कथा ही कंपार्टमेन्टलाईज होते. कधी ती एका भागावर रेंगाळते ,तर कधी दुस-या आणि ज्या प्रेक्षकाला ज्या गोष्टीत अधिक रस आहे, त्याला तिचं दुस-या भागावर रेंगाळणं खटकतं. पुन्हा त्यातही गुंतागुंत अशी, की पुत्रवियोगाच्या गोष्टीचा इमोशनल पेआँफ जास्त असला तरी ती खूप संथ आहे आणि पोलिस तपासात घटना अधिक ,तपशील , वातावरणनिर्मिती अधिक असूनही त्यातलं रहस्य हे केवळ रहस्य ,म्हणजे 'गुन्हेगार कोण' छापाचं आहे, ज्यात प्रेक्षकाची म्हणावी तशी भावनिक गुंतवणूक नाही. त्यामुळे दोन्ही कथांचं रेझोल्यूशनदेखील स्वतंत्र आणि प्रत्येकावर कमीअधिक परिणाम करणारं आहे.
आपल्यातल्या बहुतेक सर्वांनाच ,या चित्रपटातल्या रहस्याचा अनेकांनी श्यामलनच्या ' द सिक्स्थ सेन्स' शी लावलेला संबंध हा परिचित आहे. हा संबंध म्हंटला तर महत्वाचा आहे आणि म्हंटला तर नाही. महत्वाचा नाही तो अशासाठी ,की ही सिक्स्थ सेन्सची कॉपी नाही. केवळ कथेतला एक विशिष्ट घटक इथे सिक्स्थ सेन्सच्या पध्दतीने वापरण्यात आला आहे. महत्वाचा आहे तो अशासाठी ,की केवळ या नावाचा उल्लेख ,हा आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी पुरेसा आहे. पटकथा जितकी हलक्या हाताने लिहीली जायला हवी होती तितकी इथे लिहीली गेलेली नाही आणि काही जागा या जागरुक प्रेक्षकासाठी हा छुपा घटक उघड करतात. अगदी मध्यांतराच्या वेळेपर्यंतच. आणि एकदा का हा घटक तुमच्यासाठी उघड झाला ,की तुम्ही तो पुन्हा विसरुन जाऊ शकत नाही. पुढला भाग हा तुमच्यासाठी रहस्यमय ठरत नाही, कारण तुम्हाला ते आधीच समजलेलं असतं.
मग प्रश्न उरतो ,तो रहस्याचा उलगडा शिल्लक नसताना ,हा चित्रपट तुम्हाला बांधून ठेवतो का नाही, हा . किंवा दुस-या शब्दात सांगायचं तर तुम्ही 'तलाश' कडे केवळ रहस्यपट म्हणून पाहाणं योग्य आहे का नाही, हा .या चित्रपटातलं भावनिक नाट्य ,त्यातल्या शोकांतिका, त्याची सामाजिक चाड,त्यातल्या सुर्जन पासून तेमूरपर्यंत अनेकांचं व्यक्तिचित्रण आणि या व्यक्तिंच्या स्वतंत्र आलेखांमधे दिसून येणारी त्या व्यक्तिरेखांबद्दलची कणव ,हे सारं तुम्ही स्वतंत्रपणे पाहू शकता, पचवू शकता, या व्यक्तिरेखांशी मानसिक जवळीक साधण्याची तुमची तयारी आहे ,की केवळ रहस्यभेदासारख्या लहानशा गोष्टीवर, आणि शेवटी धक्का बसण्या न बसण्यावर ,तुम्ही या चित्रपटाचा परिणाम जोखू पाहाता? हा प्रश्न इथे विचारण्यासारखा आहे. किंबहुना रहस्यभेदापलीकडे जाऊन 'तलाश'कडे पाहाणं हे खरंतर त्याला अधिक न्याय देणारं ठरेल. तसा तो द्यायचा का नाही हे मात्र तुम्ही स्वतःच ठरवायचं.
- गणेश मतकरी
Read more...






