ब्लान्कानिएवेस- स्पॅनिश हिमगौरी

>> Monday, November 5, 2012



काही चित्रपट पाहताना आपल्याला त्यांच्यापासून काय अपेक्षा ठेवायची याची पूर्ण कल्पना असते. आपण त्यांच्याविषयी आधी ऐकून असतो, त्याच्या जाहिराती, ट्रेलर्स पाहिलेल्या असतात, नावावरुन त्यातल्या आशयाची कल्पना आलेली असते, कधी कधी त्यांची वृत्तपत्रीय वा इन्टरनेट परीक्षणंदेखील वाचलेली असतात. बहुतेकवेळा या सा-याचा फायदा होतो. जे पाहायला मिळणार त्याविषयी आधी ठरवून वा सहजपणे केलेला विचार आपल्याला चित्रपट पाहाण्यासाठी एक मानसिक बैठक तयार करतो ,जी आपल्याला तो समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र कधीकधी असंही होतं ,की काही माहिती नसणारा चित्रपट ती नसल्यामुळे अधिक अनपेक्षित, अधिक वेधक वाटतो आणि आपल्यावर होणा-या परिणामात भर पडते. मुंबई चित्रपट महोत्सवात समारोपासाठी असलेल्या ’ब्लान्कानिएवेस’ या पाब्लो बर्जर दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपटाबद्दलही असं काहीसं झालं.

माहिती नव्हती हे आश्चर्य, कारण महोत्सवाच्या कॅटलॉगमधे ती असते आणि सामान्यत: पाहिली जाते. यंदा मात्र मी काही गडबडीत होतो आणि ती पाहाणं शक्य झालं नाही. गंमत म्हणजे श्याम बेनेगलांच्या प्रास्ताविकात त्यांनी नावाच्या अपरिचित उच्चाराचा उल्लेख करुनही त्या नावाचा अर्थ सांगितला नाही. जो ते सांगते, तर मनाची तयारी व्हायला वेळ लागला नसता. कारण ब्लान्कानिएवेस या वरवर डोक्यावरुन जाणा-या नावाचं भाषांतर अगदीच साधं आण ओळखीचं आहे, आणि ते म्हणजे ' स्नो व्हाईट’.

ब्लान्कानिएवेस हा सध्या अचानक लोकप्रिय झालेल्या ,पण अनेक वर्ष आपल्या ओळखीच्या असणा-या दोन सूत्रांना एकत्र करतो. पहिलं आहे ,ते अर्थातच ' स्नो व्हाईट अँड सेव्हन ड्वार्फ्स’ या ग्रीम बंधूंच्या परीकथेबद्दल चित्रपटसृष्टीला वाटणारं प्रेम. हे प्रेम फार नवीन नाही, कारण डिस्नीचा स्नो  व्हाईट (१९३७) आपल्या खूप परिचयाचा असला तरी गेल्या अनेक वर्षात टीव्ही आणि चित्रपटांनी या कथेची डझनानी रूपांतरं केली आहेत. तीही मुलांसाठी बनवलेल्या चित्रपटांपासून केवळ प्रौढांसाठी असणा-या एक्स रेटेड आवृत्त्यांपर्यंत. तरीही सध्या या कल्पनेची पुन्हा एकवार लाट आलेली आहे. हे स्पॅनिश रिवर्किंग सोडून या कथेची किमान तीन रुपांतरं या वर्षीच प्रकाशित झाली आहेत. थेट डीव्हीडी स्वरुपात आलेला ’ग्रीम्स स्नो व्हाईट’, तारसेम सिंगचा ’मिरर, मिरर’ आणि ब-यापैकी कौतुक झालेला ,रुपर्ट सँडर्सचा ’ स्नो व्हाईट अँड द हन्ट्समन’. ब्लान्कानिएवेस या तिन्ही आवृत्त्यांपासून खूप वेगळा असला तरी मूळ आराखडा ओळखता येण्यासारखा आहे.

दुसरं सूत्र आहे ते मूकपटांची आठवण जागवण्याचं जे यंदाच्या आँस्कर विनर ’द आर्टिस्ट’ने अचानक प्रकाशझोतात आणलं आहे.त्याचं स्वरुप मात्र आर्टिस्ट प्रमाणे लोकांना हसवत ठेवण्याला प्राधान्य देणारं नाही. त्यातलं नाट्य बरंचसं गंभीर आणि काहीसं शोकांत आहे. ब्लान्कानिएवेस हा पारंपारिक मूकपटांप्रमाणेच मोजक्या टायटल कार्ड्सचा वापर करत प्रामुख्याने दृश्यांमधून आशय मांडतो. त्याचबरोबर संगीताचाही तो प्रभावी वापर करतो.
आधी माहीत नसतानाही या चित्रपटाचं परीकथांच्या रुपरेषांशी असणारं साम्य थोड्या वेळातच लक्षात येतं ते त्यातल्या श्रीमंत पण दुस-या पत्नीच्या मुठीत असलेला बाप, हसत अन्याय झेलणारी गोड मुलगी, सावत्र आईने केलेला तिचा छळ अशा व्यक्तिरेखांच्या परिचित आणि प्रवृत्तीदर्शक चित्रणामुळे . तरीही ही अमुक एक गोष्ट हे लक्षात यायला थोडा अधिक वेळ लागतो तो त्याच्या अनपेक्षित पार्श्वभूमीमुळे. ही पार्श्वभूमी आहे ती प्रसिध्द स्पॅनिश बुलफाइटिंगची.
प्रसिध्द मॅटॅडोर अन्तोनिओ विलाल्टा (डॅनिएल गिमेनेझ काचो) रिंगणात जायबंदी होतो आणि अंथरुळाला खिळतो. दुर्दैवाने त्याच दिवशी त्याच्या पत्नीचाही बाळंतपणात मृत्यू होतो आणि शोकाकूल अन्तोनिओ मुलीचं तोंडदेखील पाहात नाही. या संधीचा फायदा घेउन इस्पितळात त्याची काळजी नर्स एन्कार्ना(पॅन्स लॅबिरीन्थ ,इ तू मामा ताम्ब्येन सारख्या लक्षवेधी चित्रपटांतून मध्यवर्ती भूमिका करणारी मेरीबेल वर्दू) अन्तोनिओच्या आयुष्यात शिरकाव करुन घेते. लवकरच त्याच्याशी लग्न करुन घराचाही ताबा घेते. इकडे आजीजवळ राहाणारी विलाल्टाची मुलगी कारमेन (लहानपणा सोफिआ ओरेआ, तर मोठेपणी माकारेना गार्शिआ) आजीच्या मृत्यूनंतर विलाल्टाच्या वाड्यात पोचते आणि परंपरेप्रमाणे सावत्र आईचा छळ सहन करते. या काळात तिला वडिलाचा माफक सहवास आणि बुलफाईटचं बाळकडू मात्र मिळतं. मूळ कथेप्रमाणेच पुढे घरापासून दूर जाऊन पडलेल्या कारमेनची गाठ बुटक्यांशी पडते, मात्र हे बुटकेही बुलफाइटर्स असतात. ते तिचं नामकरण करतात 'स्नो व्हाईट '. या नव्या रस्त्यावरुन सुरु झालेला प्रवास तिला पुन्हा आपल्या वडिलांप्रमाणेच मॅटेडोर करुन सोडेल याविषयी शंकेला जागा उरत नाही.
या गोष्टीतली बुटक्यांची संख्या आणि त्यांचा वापर ही पाहण्यासारखी गोष्ट आहे . वरवर ती बदललेली आहे, कारण इथे सात ऐवजी सहाच बुटके भेटतात. मात्र पुढे कारमेन ,अर्थात स्नोव्हाईटला घरकाम करत न बसवता त्यांच्या बुलफाईट टीम मधे आणून बसवल्याने आकडा सात वर जातो. पुन्हा या सातात ,बुटक्यांबरोबरच इतर प्रमुख व्यक्तिरेखांच्या छटाही डोकावतात. नायिका स्वत: तर या सातात येतेच ,शिवाय इथला एक बुटका जवळजवळ खलनायिकेच्या अजेंडालाच पुढे नेत कारमेनला संपवायची तयारी करतो तर दुसरा , तिला मुळात वाचवणारा बुटका मूळ कथेतल्या प्रिन्स चार्मिंगची जागा घेतो.त्यामुळे हा सहा अधिक कारमेन असा चमू ,केवळ सहाय्यक भूमिकांमधे आणि विनोदापुरता न उरता महत्वपूर्ण कामगिरी बजावतो.
मूकपटांना आदरांजली असल्याने या चित्रपटाचा प्रयत्न हा दर बाबतीत मूकपटांच्या काळाची आठवण करुन देण्याचा आहे. ब्लॅक अँन्ड व्हाईट रंगसंगती ,टायटल कार्ड्सचं डिझाईन, चौकटीच्या लांबी रुंदीचं प्रमाण मांडणारा आस्पेक्ट रेशो यासारख्या अनेक उघड दिसणा-या गोष्टी इथे आहेत. पण त्याहीपेक्षा लक्षात येण्याजोगा आहे तो दृष्यभाषेचा लवचिक आणि काळाशी सुसंगत वापर. मुद्राभिनयाचा सूचक प्रयोग,सावत्र आईची छानछोकीची आवड तिच्या वाईट स्वभावाशी जोडण्यासारख्या व्यक्तिचित्रणातल्या संकेतांचा वापर, आपला दुस्वास दर्शवताना सावत्र आईने कारमेनचे लांब केस कापून टाकण्यासारख्या प्रसंगात दिसणारं शब्दांऐवजी कृतीवर भर देणं , कारमेनचा एन्कार्नाने मारलेला कोंबडा अर्थपूर्ण जागांवर सुपरइम्पोज करणं ,या आणि अशासारख्या पटकथा आणि दिग्दर्शनातल्या जागादेखील त्या काळातल्या चित्रपटीय दृष्टिकोनाची आठवण करुन देणार््या आहेत.अनेक योगायोग असूनही प्रत्यक्ष चमत्कार टाळणा-या पटकथेने या गोष्टितली एक अतिशय प्रसिध्द व्यक्तिरेखा गाळली आहे आणि ती म्हणजे जादूचा आरसा. मात्र त्याची गैरहजेरी प्रेक्षकांना न जाणवण्याची खबरदारी मात्र त्यांनी घेतलेली दिसते.
डिस्नेच्या चित्रपटाने सुखांत शेवटाची सवय झालेल्या आपल्याला कदाचित यातला अनिश्चित आणि थोडा अस्वस्थ शेवट खटकेल मात्र तो ग्रीम बंधूंच्या परीकथांमधल्या एकूण वातावरणाशी सुसंगत वाटणारा आहे , हे नोंद घेण्याजोगं.
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP