द व्हिलेज- मॉन्स्टर मुव्ही
>> Friday, October 23, 2009
एम. नाईट अर्थात मनोज श्यामलनचं नाव घेतलं की बहुदा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्रपट येतो, आणि तो म्हणजे सिक्स्थ सेन्स. वास्तविक श्यामलनने अनेक चित्रपट केलेले आहेत. पहिले दोन (प्रेईंग विथ अँगर, वाईड अवेक) तसंच लेडी इन द वॉटर वगळता त्यातल्या बहुतेकांना ब-यापैकी यश देखील मिळालेलं आहे. स्पीलबर्ग आणि हिचकॉक या दोन अतिशय व्यावसायिक म्हणण्याजोग्या मोठ्या दिग्दर्शकांची सतत तुलना होऊनही श्यामलनचा सिनेमा हा बराचसा खालच्या पट्टीतला, प्रायोगिक म्हणण्यासारखा आहे. अमेरिकन इन्डीपेन्डन्ट चित्रपटासारखा असूनही, त्याची निर्मिती आणि वितरण हे व्यावसायिक धर्तीचंच आहे. अन् विषय फँटसी किंवा हॉरर सारख्या ब्लॉकबस्टर स्वरूपाचे असूनही हाताळणी अगदी वेगळी मिनीमलिस्टीक म्हणावीशी आहे. या सर्व विसंगती असूनही श्यामलनचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. आणि व्यावसायिक गणितांना न जुमानता प्रयोग करणा-या या दिग्दर्शकाच्या दर चित्रपटाला तो नेमाने हजेरी लावतो.
श्यामलनचा दर सिनेमा हा फॅन्टसी या ढोबळ चित्रप्रकाराच्या विविध पैलूंवर बेतलेला दिसतो. कधी ती भूतकथा (सिक्स्थ सेन्स) तर कधी परीकथा (लेडी इन द वॉटर), कधी परग्रहवासीयांच्या हल्ल्याची गोष्ट (साईन्स) तर कधी सुपरहिरो(अनब्रेकेबल) आख्यान. द व्हिलेज हा मॉन्स्टर मुव्ही आहे.
विषयाकडून अपेक्षित भव्यता टाळणं अन् स्वतःच्या दृष्टीकोनातून त्याला वेगळं परिमाण आणून देणं हे श्यामलनचं वैशिष्ट्य. त्यामुळे इथेही तो प्रत्यक्ष राक्षस उभा करणं, स्पेशल इफेक्ट्सवर खर्च करणं, गाड्या इमारतींची नासधूस करणं यातलं काहीएक करत नाही. किंबहूना त्याचं कथानक घ़डतंच इतक्या छोट्याशा गावाच्या पार्श्वभूमीवर जिथे नासधूस करायलाही फार वाव नाही.
हे गाव कुठल्याशा जंगलात, एका अनिश्चित काळात वसलेलं आहे. बहुदा १९व्या शतकात कधीतरी गावाचा संपर्क इतर जगापासून जवळजवळ तुटलेला. कारण आहे ते गावाभोवतालचं जंगल. या जंगलात म्हणे राक्षस रहातात. गावकरी त्यांना घाबरून आहेत. आणि अगदीच गरज पडल्याशिवाय ते जंगलात पाय ठेवत नाहीत. जंगलातले राक्षसही क्वचितच गावात येतात. पण त्यांचं येणं प्रचंड दहशत पसरवणारं असतं.
व्हिलेजचा महत्वाचा भाग हा लुशिअस (वाकीम फिनीक्स) आणि आंधळी आयव्ही (ब्राईड डल्लास हॉवर्ड) यांच्या प्रेमकथेचा आहे. ही कथा आणि कमीत कमी दृश्यांमधून वाढत जाणारी राक्षसी प्राण्यांची दहशत ही श्यामलनने चित्रपटाच्या पूर्वार्धात वाढवत नेली आहे. या दोन्ही गोष्टी प्रेक्षकाला पचणं चित्रपटाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जो लुशिअस अन् आय़व्ही यांचे प्रेम जितकं समजून घेईल तितकं त्याला आयव्हीने उत्तरार्धात जंगलचा रस्ता धऱण्याचं कारण पटेल. अन् दहशतीचा भाग जितका खरा वाटेल, तितकी या रहस्याच्या उलगड्यामागची कारणमीमांसा त्याला समजून घेता येईल.
व्हिलेजमध्ये सर्वात उत्तम आहे ती वातावरणनिर्मिती. काही न दाखवता केवळ चित्रिकरणाची गती, दृश्यांमधील सूचकता, प्रकाशयोजना आणि उत्तम साऊंड डिझाईन यांमधून भीती तयार होते. राक्षसाने गावावर केलेला हल्ला किंवा आयव्हीला जंगलात राक्षसाशी करावा लागणारा सामना, या दृश्यांमधून श्यामलनची आपल्या माध्यमावरची हुकूमत दिसून येते. रंगाचा, खास करून पिवळ्या रंगाचा वापर उल्लेखनीय.
व्हिलेजमधला रहस्यभेद आवडणारे जितके प्रेक्षक आहेत, तितकेच किंवा त्याहून अधिक प्रेक्षक तो न आवडणारे आहेत. दिग्दर्शकाने फसवल्याची भावना तयार होणं हे तो न आवडल्याचं कारण म्हणून पुढे केलं जातं. मात्र, हे खरं नाही. रहस्याच्या स्पष्टीकरणाला तार्किकदृष्ट्या विश्वसनीय कारण आहे. ज्येष्ठ गावक-यांच्या विशिष्ट प्रकारच्या वर्तणुकीलाही ते लागू पडतं. ख-या आयुष्यात कदाचित याप्रकारचं गाव वसणं शक्य होणार नाही. मात्र, श्यामलन वास्तववादी चित्रपटाचा दावा करतच नाही आहे. तो केवळ आपल्या सस्पेन्शन आँफ डिसबिलिफसाठी, एक कारण देऊ इच्छितोय. हे कारण ज्यांना योग्य वाटतं त्यांना हा चित्रपट आवडतो. उरलेल्यांना नाही.
दृष्टीकोन बदलामुळे चित्रपटाचं रहस्य कसं तयार होतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. चित्रपटाचं निवेदन हे त्याला परस्पेक्टीव्ह ठरवतं आणि त्या नजरेतून गोष्टीचं एक कथित वास्तव पक्कं करतं. प्रेक्षक त्या कथित वास्तवालाच मानतो, कारण त्याच्यासाठी चित्रपट हा त्या विशिष्ट नजरेतूनच घडतो आहे. द व्हिलेज (आणि श्यामलनचे इतर काही चित्रपटही) या नजरेत अचानक बदल घडवून आणतो आणि एक वेगळा त्रयस्थ दृष्टीकोन प्रेक्षकांसाठी खुला करतो. हा नजरबंदीचा खेळ हे श्यामलनच्या चित्रपटांचे एक वैशिष्ट्य आहे आणि पटकथा लेखनाचा एक महत्त्वाचा धडा. व्हिलेजला सांकेतिक मॉन्स्टर मुव्हीच्या व्याख्येतून मुक्त करणारा.
-गणेश मतकरी.