चित्र गडद मनुष्यस्वभावाचं

>> Monday, June 30, 2008

सायकॉलॉजिकल थ्रिलर हा शब्द आता इतका घासला गेलाय, की त्याचा नीटसा अर्थच आपल्याला कळेनासा झालाय. नुसत्याच हाणामा-या असलेल्या थ्रिलरच्या एक पायरी चित्रपट वर गेला, की वापरण्यासाठी ही कॅच फ्रेजच तयार झालीय. त्यामुळे होतं काय, की खरोखरंच पात्रांच्या मानसिकतेशी संबंधित असणाऱा आणि पटकथेच्या सोयीसाठी घटना न घडवता खरोखरंच व्यक्तिरेखांच्या वागण्यामागचा गूढाचा शोध घेऊ पाहणारा चित्रपट झाला, तर तो आपल्या लक्षात येत नाही, किंवा अनेकातला एक अशा वर्गवारीत त्याला टाकून आपण मोकळे होतो. द किंग चित्रपटाबाबत आपण तसं करण्याचा धोका नक्कीच संभवतो.अनेकदा चित्रपटांना किंवा कथा कादंब-यांनाही खोड असते, ती प्रत्येकाच्या वागण्यामागे कारणांची जंत्री उभी करण्याची. हा खलनायक असा वागला कारण त्याच्यावर कोणे एकेकाळी अमुक-अमुक अत्याचार झाले होते. हा नायक असा वागला कारण त्याच्यावर तमुक व्यक्तींनी चांगले संस्कार केले. पण प्रत्यक्षात असं असतं का ? इथं खलनायक- नायक तर नसतातच.वर प्रत्येकाचं पुस्तकी नियमांनी वागणंदेखील नाही. एरवी काही माणसं अतिशय स‌ज्जन असतात. तशी काही अतिशय क्रूर, दृष्ट, सारासार विचार करण्याची क्षमताच नसणारीही असू शकतात. मग या मंडळींच्या बाबतीत कारणं शोधत बसण्यात अर्थ नसतो, ती तशी आहेत हे जितक्या लवकरच स्पष्ट होईल. तितक्या लवकर आपण या माणसांना ओळखू शकतो. द किंग मध्ये आपल्याला याच प्रकारची व्यक्तिरेखा भेटते. जिच्या मनाचा थांग आपल्याला लागू शकत नाही. आणि तिच्या टोकाच्या गडदपणाला चित्रकर्ते फारसं स्पष्टिकरण देऊ इच्छीत नाहीत.गंमतीची गोष्ट म्हणजे व्यक्तिचित्रणात खूपच वेगळा आणि अस्सल ठरणारा हा चित्रपट मुळात अनेक ठिकाणी पहायला मिळणा-या स्टिरिओटाईप व्यक्तिरेखा साच्यासारखा वापरतो. भूतकाळात अनेक कुकर्म करून आता देवधर्माला लागलेला धर्मगुरू, आपल्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेणारा मुलगा, कोणाही अनोळखी तरुणाच्या प्रेमात पडायला आतुर तरुणी, तिचा कर्तव्यदक्ष पण भडक डोक्याचा भाऊ, या स‌गळ्यांना आपण अनेक चित्रपटांत, क्वचित साहित्यकृतींमध्य भेटलेले आहोत. ठराविक प्रकारच्या प्रसंगात या व्यक्तिरेखा कशा प्रकारे वागतील, आणि त्यांच्या आयुष्यातील काय प्रकारची वळणं कथानक चित्रित करणार असेल याचे निश्चित ठोकताळे आपण मांडू शकतो. द किंग मात्र हे ठोकताळे निरर्थक ठरवतो.ही गोष्ट आहे एल्विस (गेल गार्शिआ बर्नाल) या नेव्हीतून निवृत्त झालेल्या तरुण खलाशाची. निर्विकार चेह-याने वावरत असूनही त्याच्याबद्दल आपलं प्रथमदर्शनी मत तर चांगलं होतं. लवकरच एल्विस एका चर्चमध्ये पोचतो. आणि तिथे लोकप्रिय प्रिस्ट असलेल्या डेव्हिडची (विलियम हर्ट ) गाठ घेतो. एल्विसच्या तोंडून हा आपला मुलगा असल्याचं कळताच डेव्हिडला धक्का बसतो, आणि तो तडकाफडकी विरोधी भूमिका घेतो. आपल्या कुटुंबियांनादेखील एल्विसपासून सावध राहाण्याची सूचना देतो.किंग हा एल्विस आणि डेव्हिड या दोघांमधल्या संघर्षाविषयी जरुर आहे, मात्र हा संघर्ष ढोबळपणानं मांडण्यात आलेला नाही. प्रत्येकाला दुस‌-याकडून नक्की काय अपेक्षित आहे, हे इथे स्पष्ट नाही. कदाचित त्या दोघांनाही याची पूर्ण कल्पना नाही. एल्विसच्या डोक्यात काही योजना असावी. मात्र तो या योजनेला काटेकोरपणे पाळत असेल अशी शक्यता संभवत नाही. इथे काही प्रसंग उघडंच अनपेक्षित आहेत. डेव्हिडला आपली योजना बदलण्यासाठी उद्युक्त करणारे .मात्र हे बदल करताना दिसणारा त्याचा थंडपणा आणि हिशेबी वृत्ती ही अंगावर काटा आणणारी आहे.सांकेतिक थ्रिलर्स‌ आणि द किंगमध्ये एक मोठा फरक आहे. आणि तो म्हणजे गतीचा. व्याख्येनुसार थ्रिलर्स‌ला प्रेक्षकांना अडकविण्यासाठी स‌तत काही ना काही घडवत ठेवावं लागतं. बहुतेकदा या चित्रपटाचा भर हा विचरापेक्षा दृश्यावर असल्याने तिथे अधिक लक्ष पुरवलं जातं. आणि बाकी गोष्टी पार्श्वभूमीलाच राहतात. इथं तसं होत नाही. कारण चित्रपट केवळ दृश्य भागावर प्रेक्षकांना बांधू इच्छित नाही. दिग्दर्शक जेम्स मार्श हे मुळात माहितीपटांच्या जगतून आले असल्याने त्यांना दृश्य भागांचं वा गतीचं वेड नाही. त्यांना शोध आहे तो मनुष्यस्वभावातल्या गुंत्याचा आणि अगदी शांतपणे तपशिलात जाऊन तो उकलतात. प्रत्यक्षात अँक्शन ही केवळ दोन तीन प्रसंगात येते आणि तीदेखील अपरिहार्यपणे मनातल्या कोलाहलाचं दृश्यरुप असल्यासारखी.या चित्रपटात डेव्हिडचं चर्चशी संबंधित असणं हा योगायोग नाही. कारण भलं-बुरं- पाप- पुण्य अशा संकल्पनांबरोबर यातील पात्र जोडली आहेत. ज्याचा अंतिम निवाडा अखेर देवाच्या दारातच होऊ शकतो. प्रत्येकाला आपल्या पापाची शिक्षा या जन्मीच घ्यावी लागते का? पापी माणसाला मोक्ष संभवत नाही का? अखेर योग्यायोग्य ठरवणं हे आपल्या हातात आहे का? आणि असलं तरी ते आपण त्रयस्थपणे ठरवू शकू की आपलं माणूस असणंच त्याच्या आड येईल ? असे प्रश्न द किंग उभे करतो, जे पुन्हा देवालाच वेठीला धरणारे आहेत. जवळजवळ वास्तववादी वाटणारा हा चित्रपट काहींना संथ भास‌ण्याची शक्यता जरूर आहे. मात्र हे लक्षात घ्यायला हवं की या संथपणाला कारण आहे. एकदा का हे आपण स‌मजून घेऊ शकलो की, आपण त्याला इतर चार चित्रपटांच्या वर्गात न बस‌वता वेगळ्या दृष्टीने त्याकडे पाहू शकू.
-गणेश मतकरी

Read more...

फनी' नसलेला फनीगेम्स

>> Friday, June 27, 2008

हॉलिवूड थ्रिलर्समध्ये आपण काय पाहतो? कर्तबगार नायक, महादुष्ट खलनायक. खलनायकानं आपल्या उद्योगांनी नायकाला सळो की पळो करून सोडलेलं. मग नायक अखेरचं बंड पुकारतो आणि खलनायकाच्या हिंसक मार्गांनी जाऊन तथाकथित विजय मिळवतो. पडद्यावरलं हिंसेचं साम्राज्य हे व्यावसायिक हॉलिवूड थ्रिलर्स प्रेक्षकांच्या पचनी पाडतात ते त्यामध्ये करमणूक असल्याचा आभास निर्माण करून. पण खरंच ही करमणूक आहे का? अद्ययावत बंदुकांमधून सुटणाऱ्या गोळ्या, खून, मारामाऱ्या, आकर्षक संवादफेकीतून प्रेक्षकांशी नाळ जोडू पाहणाऱ्या अन् त्याचबरोबर आपलं उद्दिष्ट पुरं करण्यासाठी रक्ताचे पाट वाहायला कमी न करणाऱ्या व्यक्तिरेखा यात करमणुकीचं प्रमाण खरंच किती? एके काळी चित्रपटांमध्येही आक्षेपार्ह असणारा हिंसाचार आज मोठ्या अन् छोट्या पडद्यावरून घराघरात पोचलाय. त्यातल्या अप्रत्यक्ष संदेशाला जबाबदार कोण? हे दाखवणाऱ्या चित्रकर्त्यांची चूक, की ते पाहून घेणाऱ्या प्रेक्षकांची? "चित्रकर्त्यांची'; हे उघड आणि ढोबळ उत्तर असलं, तरी त्यामुळे प्रेक्षक आपला सहभाग झटकून टाकू शकत नाहीत. प्रेक्षक आहेत म्हणून चित्रपट आहे. प्रेक्षकांनीच तो नाकारला तर तो निर्माणच होऊ शकणार नाही.
हॉलिवूडने सर्वमान्यता मिळवून दिलेल्या हिंसकतेला तिच्या निंदनीय स्वरूपात समोर आणलं अन् प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडलं ते 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या मायकेल हानेके यांच्या "फनी गेम्स' या ऑस्ट्रियन चित्रपटानं. नुकतीच पाहण्यात आली ती याच दिग्दर्शकानं काढलेली अमेरिकन आवृत्ती. मूळ चित्रपटाशी पूर्ण प्रामाणिक असणारी. हानेकेचा हा मी पाहिलेला दुसरा चित्रपट. मी आधी पाहिलेला 2005 चा "कॅशे' काहीसा रहस्यपटाच्या जवळ जाणारा होता. मात्र, तो पाहूनही लक्षात येत होतं, की दिग्दर्शकाला सोपी उत्तरं काढण्यात रस नाही आणि पडद्यावर काय घडतंय याइतकंच किंवा त्याहून अधिक महत्त्व तो प्रेक्षकांच्या डोक्यात काय घडतंय याला देतोय. "फनी गेम्स'देखील याच प्रकारात मोडणारा आहे. मात्र, अधिक धक्कादायक, अधिक प्रक्षोभक आणि विचारांचं खाद्य पुरवणारा.
"फनी गेम्स'मध्ये खरं तर "फनी' काहीच नाही. नावात आहे तो उपरोध. करमणुकीच्या नावाखाली खपत असलेल्या क्रौर्याचा पर्दाफाश करणाऱ्या हानेकेनं हे गोंडस नावही यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या स्तंभित करणाऱ्या कारवायांना अधोरेखित करण्यासाठी वापरलं आहे.
इथं वापरण्यात येणारा चित्रप्रकार आहे तो होस्टेज मुव्हीचा. जॉर्ज (टिम रॉथ) आणि ऍना (नेओमी वॉट् स) हे सुखवस्तू जोडपं आपल्या जॉर्जी (डेवोन गीअरहार्ट) या दहा-बारा वर्षांच्या मुलाबरोबर आपल्या गावाबाहेरच्या बंगलीवर सुट्टी घालवण्यासाठी आलं आहे. परिसरात तसे अनेक बंगले आहेत, पण दूर दूर. घरी स्थिरस्थावर होत असताना पीटर (ब्रॅडी कॉरबेट) उगवतो. आपण शेजाऱ्याकडून आल्याचं सांगतो आणि ऍनाकडे थोडी अंडी मागतो. दुर्दैवाने त्याच्या हातून अंडी फुटतात आणि पुन्हा दुसरी देणं ऍनाला भाग पडतं. मग काही ना काही अडचणी येत राहतात आणि ऍनाला या पाहुण्याचा संशय यायला लागतो. लवकरच पॉल (मायकेल पिट) येऊन पीटरला सामील होतो. पांढरे कपडे आणि हातमोजे घातलेले पीटर आणि पॉल वरवर नम्र आणि हसतमुख वाटले तरी प्रत्यक्षात ते या सोज्वळ प्रतिमेपलीकडे आहेतसा भास व्हायला लागतो, जो लवकरच प्रत्यक्षात उतरतो. जॉर्जचा पाय मोडून या कुटुंबाला असहाय अवस्थेत सोफ्यावर बसवलं जातं आणि खेळाला रंग चढायला लागतो.
या प्रसंगापर्यंतचा "फनी गेम्स'चा भाग हा प्रेक्षकाला कथेत चांगलाच गुंगवणारा असला, तरी फारसा अनपेक्षित म्हणता येणार नाही. चित्रपटाच्या वेगळेपणाची पहिली चाहूल लागते ती पॉल थेट आपल्याशी बोलतो तेव्हा. अंधाऱ्या हॉलमध्ये यजमान अन् पाहुणे समोरासमोर बसल्यावर पॉलच्या डोक्यात कल्पना येते ती पैज लावण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जॉर्ज, जॉर्जी आणि ऍना जिवंत असतील की नाही ही ती पैज. त्याची अन् पीटरची बाजू म्हणजे नक्कीच नसतील. जॉर्ज आणि ऍनाने दुसरी बाजू निवडावी ही त्याची अपेक्षा. एवढं झाल्यावर पॉल सरळ प्रेक्षकांकडे पाहतो आणि त्यांचंही मत विचारतो. ते कोणत्या बाजूनं पैजेत सामील आहेत, हा त्याचा आपल्याला विचारण्यात येणारा प्रश्न. हा प्रश्न आपल्याला खरंच धक्कादायक वाटतो. कारण एव्हाना आपण या कुटुंबाच्या जीवन-मरणाबद्दल खरोखरच अंदाज बांधायला सुरवात केलेली असते. हा प्रश्न ही विचारांची प्रक्रिया आपल्या लक्षात आणून देतो आणि अशा चित्रपटाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती कॅज्युअल झाला आहे, हे स्पष्टपणे दाखवतो.
"फनी गेम्स' नीट पाहताना आपल्या लक्षात येईल, की ती वरवर दोन विकृत तरुणांनी एका कुटुंबावर केलेल्या अत्याचाराची गोष्ट असली, तरी ती कायमच यात सहभागी असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या मानसिकतेवर लक्ष केंद्रित करते. प्रत्यक्ष दृश्य परिमाणातून धक्के देण्याचा त्याचा प्रयत्न दिसत नाही. त्यामुळे मुख्यतः सर्व हिंसा ही ऑफस्क्रीन होते. पडद्यावर दिसतात त्या प्रतिक्रिया. मुलाच्या डोळ्यांवर फडकं टाकून आईला कपडे काढायला सांगण्यासारख्या प्रसंगातही प्रत्यक्ष नग्नता येत नाही. आपल्याला हिंसेची भयानकता जाणवून देतानाही या प्रकारच्या बहुसंख्य चित्रपटांमधून स्वीकारलेले राजमार्ग हानेके टाळतो, त्यामुळेच आपण "फनी गेम्स'लाही अशा इतर चित्रपटांच्या वर्गवारीत न बसवता त्रयस्थपणे त्याकडे पाहू शकतो. त्यातला प्रयोग लक्षात घेऊ शकतो.
हिंसाचाराच्या गंभीर घटनांना पडद्यावर दाखवून त्यांना सोपे सुखांत शेवट शोधण्याच्या हॉलिवूडच्या प्रवृत्तीवरही इथे शेवटाकडच्या एका प्रसंगी ताशेरे झाडलेले आढळून येतात. शेवटाकडे एका प्रसंगी बाजू उलटायची परिस्थिती तयार होतेसं वाटतं, आणि पीटर/पॉल पेचात येतात. यावर पॉल उपाय काढतो तो म्हणजे सरळ चित्रपट रिवाईन्ड करण्याचा. हा रिमोट कंट्रोलचा अभिनव वापर आपल्या एका प्रसंगाच्या दोन आवृत्त्या दाखवतो. एक वास्तव, तर एक हॉलिवूड स्पेशल. पुढे यातली एक आवृत्ती निकालात काढली जाते आणि कथानक पुढे जातं. पॉलनं प्रेक्षकांबरोबर केलेला संवाद किंवा चालू चित्रपट रिवाईन्ड करणं यांसारख्या घटना या धंदेवाईक चित्रपटांतून जाणूनबुजून घडवत आणलेल्या क्रौर्याच्या दर्शनाकडे निर्देश करतात. या दर्शनामागची योजनाबद्ध कृत्रिमता समोर आणतात. त्यामुळेच शेवटही हॉलिवूड प्रथेच्या विरोधात जाणारा असला तरी फसवा वाटत नाही.
इथं एक लक्षात घ्यायला हवं, की दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे जॉर्ज/ऍना हे ज्या प्रकारे पीटरने कह्यात ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रेक्षकांना चित्रपटानं कह्यात ठेवलेलं आहे. त्यांच्यापुढे उलगडणारा चित्रपट हा सांकेतिक अर्थानं त्यांचं मनोरंजन करत नाही, तरीही हा प्रेक्षक उठून न जाता चूपचाप चित्रपट पाहतो आहे, त्याच्यावर प्रत्यक्ष कोणतीही सक्ती नसताना. हा त्यानं चित्रपटाला दाखवलेला पाठिंबा आहे. त्यामुळेच या प्रकारच्या चित्रपटाला तो स्वतःही काही अंशी जबाबदार आहे.
1997 च्या आवृत्तीबद्दल बोलताना हानेके एकदा म्हणाला होता, की "एनीवन हू लीव्हज द सिनेमा डझन्ट नीड द फिल्म, ऍन्ड एनीबडी हू स्टेज डझ' दिग्दर्शकाने मांडलेला हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. शेवटी आपल्याला कोणत्या प्रकारच्या चित्रपटाची गरज आहे, हेच महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा चित्रपट मिळेल हे त्यावरच ठरणार, हेदेखील उघड आहे.
-गणेश मतकरी

Read more...

सुन्न करणारा अनुभव

>> Wednesday, June 25, 2008

गोष्टीला सुरुवात होते उत्तररात्रीच्या उदास, कृत्रिम, पिवळसर उजेडात. चार तरुणांचे तणावपूर्ण चेहरे. संथ-ठाम गतीनं चाललेली त्यांची तयारी. जोडीला काहीशा हिस्टेरिक सुरात चाललेलं धर्मग्रंथांचं पठण, बहुधा कुराण.
ताणलेल्या मनःस्थितीचं जाणीवपूर्वक सूचन करणारा, शैलीदार म्हणता येईल असा हा एकच प्रसंग. नंतरच्या सगळ्या पटाशी विरोधाभास सांगणारा. पार्श्वभूमीचं काम करणारा. गोष्ट मात्र आपल्याला चिरपरिचित अशीच. 9/11 ची गोष्ट. ती पडद्यावर उलगडत जाते ती पद्धत मात्र या सिनेमापुरती अनपेक्षित. वेगळीच. म्हटली तर कुठल्याही "सफाईदार'शैलीनं न सांगितलेली. म्हटली तर तीच या गोष्टीची शैली. अवघड. ओढून नेणारी.
गोष्ट विमानाच्या- "युनायटेड 93'च्या - अपहरणाची आहे हे आपल्याला माहीत असतंच. पण त्यातला कुठल्याच पात्रांशी साधी आपली ओळखही करून दिलेली नाही. मग दर संभाव्य मरणाऱ्या माणसागणिक एक प्रेयसी अशी हिशोबी "दत्ता'स्टाईल तर दूरच.
उड्डाणाला सज्ज होणारे "युनायटेड 93'. त्याचे कर्मचारी त्यांच्यासाठी नेहमीसारखा रुटीन दिवस, प्रवाशांसाठी सवयीचा असलेला विमानप्रवास, एअर ट्रॅफिक कंट्रोलिंगची यंत्रणा आणि तिथलं कॅज्युअल वातावरण... या साऱ्यांत आपण जवळजवळ अर्धा सिनेमाभर असतो. तरीही त्यांची नावं-गावं, स्वभाव, गुणदोष यांच्यातलं काहीही आपल्या मनावर ठसत नाही. एक घटना आणि त्यात सापडलेली माणसं. त्यांचं बरं-वाईट रिऍक्ट होणं इतकंच.
आधी एका विमानाच्या "हायजॅकिंग'ची शंका येते. तरीही फारसा ताण नाही. कारण हायजॅकिंग ही बऱ्यापैकी सवयीची असलेली गोष्ट असल्याचं, अधिकाऱ्यांच्या वागण्यावरून आपल्या लक्षात येतं. मग विमानाशी असलेला संपर्क तुटतो. तरीही अजून घबराट उडालेली नाही. मग दुसऱ्या एका विमानातून काही संशयास्पद वाटावेत असे आवाज नोंदले जातात. तरीही घबराट नाही. "हायजॅकिंग असू शकेल कदाचित' इतकीच नोंद आणि एकाएकी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर एक विमान आदळल्याची बातमी "सीएनएन'वर येते. दुसऱ्या विमानाशीही एव्हाना संपर्क तुटलेला. आणि ध्यानीमनी नसताना, बातम्या पाहत असताना, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दुसरं विमान आदळतं. धक्क्यानं सुन्न होणं म्हणजे नेमकं काय, ते आपण पडद्यावरच्या माणसांबरोबर अनुभवत असतो.
तरीही "युनायटेड 93'ला साऱ्याचा पत्ता नाहीच. "थोडं उशिरा उड्डाण झालंय, इतकंच' अशी कर्मचाऱ्यांची एकूण प्रतिक्रिया. त्या चार तरुणांचे चेहरेही तणावग्रस्त. "आता सुरुवात करायला हवी.' अशी घालमेल आणि तरी शांत राहण्याची आकांती धडपड.
एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग यंत्रणेत अभूतपूर्व गोंधळाचं वातावरण. किती विमानं हवेत आहेत. कितींशी संपर्क तुटलाय, नेमकं कोणतं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळलंय... कसलाच धड पत्ता नाही. आत्मविश्वासातून आलेली बेफिकिरी या यंत्रणेला भोवत असल्याचं स्पष्ट जाणवतं. अशात एक विमान वॉशिंग्टनकडे वळल्याचं लक्षात येतं. आता राजधानी...?
अखेरीस मनाचा हिय्या करून तरुणांपैकी एकजण उठतो आणि एका कर्मचाऱ्यावर हल्ला करतो. विमानात हल्लकल्लोळ, दोन प्रवाशांना भोसकलं जातं. कॉकपिटचा ताबा घेतला जातो.
फक्त चौघे अतिरेकी तरुण. दोन कॉकपिटमध्ये. फक्त दोन बाहेर. एकाच्या हातात सुरा. दुसऱ्याच्या अंगावर टाइमबॉम्बसदृश काहीतरी. त्यांच्या "अल्ला हू अकबर'च्या निर्वाणीच्या आरोळ्या; वेडसर, उन्माद आणि घबराट उडालेले प्रवासी. हे हायजॅकिंग असणार, इतकाच अंदाज असलेले. थरकाप उडालेले. "त्यांना हवं ते करू द्या. म्हणजे आपली सुखरूप सुटका होईल' अशा विचारात असलेले.
पण अतिरेक्žयांच्या वेळेचा चुकलेला अंदाज, त्यांनी वैमानिकांची मृत शरीरं हलवताना ती प्रवाशांना दिसणं आणि विमानात उपलब्ध असलेले फोन्स. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होतो. "हे हायजॅकिंग नाही, काहीतरी वेगळंय'. त्यातच फोनवरून वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टनची बातमी कळते. "म्हणजे हे सुइसाईड मिशन...'
पाहता पाहता प्रवाशांचा विचार पक्का होतो. आपण बरेच जण आहोत, ते फक्त चार. हल्ला केला तर काय करू शकणार आहेत ते? प्रतिकार करायचा शक्žय तितका. एक म्हातारा माजी वैमानिक. "वेळ पडली तर मी ताबा घेईन' तरीही इथे म्हणावी तशी योजना, एकजूट, भावनिक आव्हानं वा उदात्त देशभक्तीचे नारे नाहीत. फक्त ताबडतोब झालेली प्रतिकाराची प्रतिक्रिया. पार्श्वभूमीला "आय लव्ह यू डार्लिंग'ची जमिनीवरच्या नातेवाइकांना दिलेली हताश कबुली, जगायची सोडलेली आशा आणि तरीही प्रतिकाराचा कैफ. "अल्ला हू अकबर'च्या बेभान हिस्टेरिक उन्मादाइतकाच जिवंत.
एका क्षणी प्रवासी तरुणांवर हल्ला करतात. मग आपण त्या अनुभवातून वेगळे असे उरतच नाही. कॅमेरा आपल्याला कधी अलिप्त राहूच देत नाही. सुरुवातीपासून शेवटापर्यंत कॅमेऱ्यानं राखलेलं हे भान. तो सतत पात्रांच्या दृष्टिरेषेतूनच सारं दाखवत असतो. त्याचा फायदा. झटापटीत जणू आपण आहोत, ताबा सुटलेल्या विमानासोबत तोल सावरायला धडपडतो आहोत, त्यातही अतिरेक्यांशी बेभानपणे दोन हात करण्याचा प्रयत्न चालू आहे... हे दर्शवणारा कॅमेऱ्याचा जिवंत वावर. या गोष्टीतला अतिमहत्त्वाचा भाग.
अतिरेक्यांचा ताबा सुटतो आणि विमान कोसळतं. बास. काळोख. "त्या दिवशीच्या अपहरण झालेल्या चार विमानांपैकी फक्त युनायटेड 93 आपल्या इच्छित स्थळी पोचू शकलं नाही. विमानातलं कुणीही जिवंत वाचलं नाही. एवढी पाटी.
-मेघना भुस्कुटे

Read more...

तेरा मिनिटांची शोकांतिका

>> Monday, June 23, 2008

काही दिवसांपूर्वी मी एका शॉर्ट फिल्मच्या शोधात होतो. निमित्त होतं ते एका छोट्या महाविद्यालयीन स्पर्धेचं, ज्यात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रपट समीक्षेच्या विविध अंगांची कल्पना येईलसं काही दाखवायचं होतं, ते देखील मर्यादित वेळेत. आता बऱ्याच वेळा असं होतं, की पूर्ण लांबीचा चित्रपट आणि लघुपट यांच्या संकल्पनेतच फरक असतो, शॉर्ट फिल्म ही एखादा विचार, एखादी कल्पना मांडते, विविध प्रयोग करते; पण फिल्म रचनेच्या बाबतीत तिची तुलना सहजपणे चित्रपटांशी होत नाही. मला या लघुपटामधून ज्या गोष्टी दिसणं अपेक्षित होतं, त्या केवळ लघुपटांपुरत्या नको होत्या, तर एकूण चित्रपटांकडे त्रयस्थपणे पाहण्याच्या शक्यता दाखवणाऱ्या हव्या होत्या. कथेपलीकडे जाऊन चित्रपट काय काय दाखवू शकतो याची अनेक उदाहरणं आणि स्वतंत्र प्रयोग या दोन्ही गोष्टी इथं दिसाव्यात, अशी माझी अपेक्षा होती. शोध अचानक संपला तो 2004 मध्ये ऑस्कर पारितोषिक मिळवणाऱ्या "रायन' या लघुपटाशी येऊन. एका आयुष्याचा वृत्तांत रायन हा केवळ तेरा मिनिटांचा लघुपट/ माहितीपट आहे; मात्र त्याचा अवाका हा अचंबित करून सोडणारा आहे. त्याचा नायक आहे रायन लार्कीन. हा 1969 मध्ये आपल्या "वॉकिंग' या लघुपटासाठी ऑस्कर नामांकनात आलेला, गाजलेला ऍनिमेटर. नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडानं लघुपट/ माहितीपटांच्या निर्मिती आणि वितरणात केलेली कामगिरीही थक्क करून सोडणारी आहे. त्यांच्या सर्जनशील चित्रकर्त्यांमधील सर्वांत गाजलेलं नाव म्हणजे नॉर्मन मॅकलरेन. रायन हा नॉर्मनचा चेला. असं सांगतात, की रायनला प्रसिद्धी मिळण्याआधीच नॉर्मननं त्याला लवकर मिळालेल्या प्रसिद्धीच्या दुष्परिणामाची कल्पना दिली होती. दुर्दैवानं या पूर्वसूचनेचा रायनला फार फायदा झाला नाही. रायनला लोकप्रियता मिळाली ती झटक्यात अन् जागतिक पातळीवर. "वॉकिंग' आणि 1972 मधला "स्ट्रीट म्युझिक' यांनी त्याला कुठल्या कुठं नेऊन ठेवला; मात्र त्याच्या भावाला झालेला अपघात, प्रसिद्धीनं वाढलेल्या अपेक्षा आणि दडपण अन् त्यातून वाढत गेलेलं कोकेनचं व्यसन यामुळे रायनची कारकीर्द लवकरच संपुष्टात आली. नॅशनल बोर्डमधून बाहेर पडल्यावर चित्रपटांसाठी स्वतंत्रपणे कामं मिळवण्याचाही त्यानं काही वर्षं प्रयत्न केला; पण लवकरच त्याचं नाव कुठेसं हरवून गेलं. दिग्दर्शक क्रीस लॅन्ड्रेथनं जेव्हा रायनवर फिल्म बनवायचं ठरवलं, तेव्हा त्याचा दिवसाचा बराच वेळ रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून भीक मागण्यात आणि उरलेला बिअर पिण्यात जात होता. कोकेनचं व्यसन त्यानं आता सोडून दिलं होतं; पण हा उशीर अक्षम्य ठरला. "रायन' लघुपटाचा विशेष हा, की तो रायनच्या शोकांतिकेतल्या सर्व महत्त्वाच्या जागांना स्पर्श करतो; मात्र कथा सांगितल्यासारखा नाही. तो फॉर्म निवडतो मुलाखतीचा; मात्र ही मुलाखत घडते क्रिसच्या खास शैलीत, संगणकीय ऍनिमेशनच्या साह्यानं. व्यक्तींहून अधिक प्रवृत्तीनं बनलेल्या; पण वास्तवाशी एक प्रकारे प्रामाणिक असलेल्या विश्वात. "रायन' हा म्हटलं तर रायन लार्किनविषयी आहे, म्हटलं तर क्रिस लॅन्ड्रेथविषयी, म्हटलं तर कलावंतांना कोणत्या ना कोणत्या पातळीवर ग्रासून राहिलेल्या असुरक्षिततेविषयी. याकडे आपण एका प्रत्यक्ष आयुष्याचा वृत्तांत म्हणून पाहू शकतो; तसंच एका नवशिक्žया अन् एका निवृत्त कलावंतामध्ये घडलेला संवाद म्हणूनही. "रायन'ला सुरवात होते ती क्रिसची संगणकीय आवृत्ती प्रेक्षकांशी थेट बोलत असताना. एका मोठ्या सार्वजनिक; पण निर्मनुष्य टॉयलेट् समधल्या वॉशबेसिनशी उभा राहून क्रिस आपल्या जखमा प्रेक्षकांना दाखवतो. चेहऱ्याचा काही भाग विरळ करून रंगाच्या सढळ हस्ते केलेल्या वापरानं अन् तारांच्या जोडकामानं बनलेल्या या जखमा म्हणजे क्रिसच्या असुरक्षिततेचा पुरावा; मात्र दोन-तीन वाक्यांतच क्रिसच्या लक्षात येतं, की आपण भरकटतोय, लघुपट आपल्याविषयी नसून, "रायन'विषयी आहे. क्रिसचं हे सुरवातीचं निवेदन अन् शेवटी रस्त्यावर पैसे मागणाऱ्या रायनला सोडलं, तर उरलेला वेळ क्रिस आणि रायन यांची मुलाखत सुरू राहते. रायनचा चेहरा हा प्रथमदर्शनी धक्कादायक. (त्याला स्वतःलाही तो धक्कादायकच वाटला, असं "रायन'च्या निर्मितीवर बनवलेल्या ऑल्टर्ड इगोज या माहितीपटात दिसून येतं) कारण, क्रिसच्या चेहऱ्यावर आढळणाऱ्या माफक जखमांच्या तुलनेत इथल्या जखमा मोठ्या. चेहऱ्याचा मधला निमुळता भाग आणि त्यामागं तारांसारखं जोडकाम हाच रायनचा चेहरा. तो देखील मूडप्रमाणे बदलणारा. रायनचा पूर्ण चेहरा दिसतो, तो भूतकाळाच्या फ्लॅशेसमध्ये किंवा प्रतिबिंबात. एरवी दिसते ती हीच आवृत्ती. क्रिस आपल्या बोलण्यात रायनच्या कारकिर्दीतल्या सर्व टोकांना स्पर्श करतो; मात्र हे पाहताना आपल्याला जाणवतं, की प्रमाणाची भिन्नता सोडली, तर या दोघांनाही भेडसावणारे कळीचे मुद्दे तेच आहेत. क्रिसने इथं वापरलेला विनोद अतिशय बोचरा आहे अन् तो स्वतःही या विनोदाच्या तडाख्यातून सुटत नाही. रायनला दारू सोड आणि आयुष्य सुधारायचा प्रयत्न करण्याचा सल्ला देणाऱ्या क्रिसच्या डोक्यावर हळूच एक अँटेनासारखी काठी येते, भोवती वलय तयार होतं आणि चित्रातल्या देवदूतांच्या डोक्यावर पाहायला मिळतो तसा हॅलो तिथं दिसायला लागतो. क्रिसनं स्वतःकडे घेतलेली मोठेपणाची भूमिका आणि रायनच्या भावनिक विस्फोटानंतर या हॅलोचं विझून कोलमडणं हे म्हटलं तर विनोदी आहे; पण तितकंच करुणदेखील. क्रिस आणि रायनबरोबर इथं आणखी दोन पात्रं आहेत. रायनची एकेकाळची मैत्रीण फेलिसिटी आणि त्याच्या लघुपटांचा कार्यकारी निर्माता डेरेक लॅम्ब! मुलाखतीदरम्यान येऊन जाणारे हे दोन पाहुणे कलाकार रायनच्या अधोगतीवर अधिक प्रकाश टाकतात. यांच्यासाठी क्रिसनं वापरलेली शैली खूपच वेगळी आहे. त्यांचं दिसणं हे रायनच्या स्केचेसमधून जिवंत झाल्यासारखं दिसते. रायनच्या भूतकाळाचे हे प्रतिनिधी असल्यानं त्यांचं हे रायनची आठवण असल्यासारखं अवतरणं योग्य वाटतं. रायनचं माहितीपटाच्या शेवटी दिसणारं येणाऱ्या-जाणाऱ्यापुढे हात पसरणं हे करुण असलं, तरी क्रिस प्रेक्षकांच्या भावनांना हात घालण्याकरिता ते वापरत नाही. रायनच्या दृष्टीनं त्याचा मूळ आनंद हा निरीक्षणातून येणारा आहे. वॉकिंग अन् स्ट्रीट म्युझिक हे दोन्ही लघुपट त्याची उदाहरणंच आहेत. त्यामुळे रायनची ही नवी भूमिका मनुष्यजातीच्या निरीक्षणाची एक संधी असल्यासारखी वापरली जात असल्याचं लघुपट सुचवतो. रायनच्या आविर्भावातूनही हेच दिसून येतं आणि रायनची परिस्थिती दयनीय असल्याचं दाखवून कारुण्यरस आळवला जात नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीत रायन लार्किनचा मृत्यू झाला- कॅन्सरमुळे. आपल्या अखेरच्या काही वर्षांत त्यानं आपलं करिअर सावरण्याचा काहीसा प्रयत्न सुरू केला होता आणि आपल्या अनुभवांवर आधारित "स्पेअर चेन्ज' नावाची ऍनिमेटेड फिल्म बनवण्याची तयारीही सुरू केली होती. "रायन'मुळे त्याला मिळालेल्या लोकप्रियतेचाही त्याला फायदा झाला. या वर्षी बहुधा स्पेअर चेन्ज पूर्ण केली जाईल अन् प्रेक्षकांसमोर येईल. रायनला आपल्या मृत्यूनंतर तरी आपल्या कारकिर्दीला सावरण्याची आणि अपयशाचा ठसा पुसण्याची संधी पुन्हा एकदा मिळेल, अशी अपेक्षा.

- गणेश मतकरी

Read more...

संकल्पना आणि विज्ञानपट

>> Friday, June 20, 2008

विज्ञानपट म्हटलं की बिचकणारे अनेक प्रेक्षक आहेत. दोष त्यांचा नाही. हॉलिवूडने गेली काही वर्षं संगणकीय चमत्कारांची रेलचेल असलेल्या आणि सर्जनशीलतेची जागा तंत्रज्ञानाने घेतलेल्या विज्ञानपटांचा असा काही मारा चालवला आहे, की विज्ञानपट म्हणजे काही नेत्रदीपक घटना दाखवणारे, पण तार्किकदृष्ट्या आणि आशयाच्या बाजूने कमकुवत चित्रपट, अशी आपली समजूत होत चालली आहे. मात्र हे खरं असूनही या सर्व चित्रपटांना या समजुतीचा बळी करणं योग्य नाही. काही चित्रपट असेही आहेत, की विज्ञान हे केवळ त्यांच्या मूळ संकल्पनेत आहे. त्यातला घटनाक्रम हा काही वैचारिक मुद्द्यांवर आधारलेला आहे. आणि स्पेशल इफेक्ट्स जवळजवळ नाहीतच. अनेकदा असंही होतं, की अशा चित्रपटाच्या एकूण मांडणीमुळे आणि सखोलतेमुळे हे चित्रपट विज्ञानाबरोबरच सामाजिक आशयालाही स्पर्श करताना दिसतात. उदाहरणादाखल आपण "गटाका' (1997) चित्रपट घेऊ. इथली कल्पना अशी होती, की नजीकच्या भविष्यातल्या प्रथेप्रमाणे जन्मणारं प्रत्येक मूल हे जेनेटिक विज्ञानाच्या मदतीनं सुधारित असलंच पाहिजे. या सुधारण्याच्या प्रक्रिया न करता नैसर्गिकरीत्या झालेल्या मुलांची गणना कनिष्ठ वर्गात केली जाते. त्यांना महत्त्वाच्या पदावर ठेवलं जात नाही, सुखसोयी उपलब्ध होत नाहीत. त्यांची महत्त्वाकांक्षाही छाटून टाकली जाते. गटाकाचा नायक या कनिष्ठ वर्गातला आहे. ज्याला आपल्या मार्गातले अडथळे मंजूर नाहीत. तो एका उच्च वर्गातल्या मुलाकडून त्याची ओळख विकत घेतो, आणि सर्वांना फसवायला सज्ज होतो. यातला वैज्ञानिक भाग आहे तो केवळ जेनेटिक इंजिनिअरिंगला तंत्रज्ञान म्हणून अधोरेखित करणारा आणि समाजाला आलेला किंचित कृत्रिमपणा दाखवणारा. प्रत्यक्षात चित्रपटाची गोष्ट ही सरळच वर्णभेदाचं रूपक म्हणून वाचली जाऊ शकते. नेहमीच्या सायन्स फिक्शनचा चकचकाट इथे अजिबातच नाही. "गटाका' हे उदाहरण एरवीच्या विज्ञानपटांमध्ये वेगळं म्हणून उठून दिसलं, तरी या प्रकारचा हा एकमेव चित्रपट म्हणता येणार नाही. सत्य आणि स्वप्नाची सरमिसळ करणारा "ओपन युअर आईज' अन् त्याचं हॉलिवूड रूपांतर "व्हॅनिला स्काय', परकायाप्रवेशाला एका चमत्कारिक दृष्टिकोनातून सादर करणारा "बीइंग जॉन मालकोविच' (यात जॉन मालकोविच या प्रसिद्ध नटानं स्वतःच्या जनमानसातल्या प्रतिमेचं फार सुंदर आणि धीट विडंबन केलं होतं.याची पोस्टींग ब्लॉगवर फेब्रुवारी महिन्यात आहे. शक्य असल्यास जरूर वाचा) ), सैनिकांच्या आठवणीतल्या भूतकाळाबरोबर खेळणारा "मांचुरिअन कॅंडिडेट' असे अनेक चित्रपट आपण पाहू शकतो. असाच एक चित्रपट नुकताच पाहण्यात आला. अतिशय वेगळा विषय, उत्तम सादरीकरण, रॉबिन विलिअम्सच्या खालच्या पट्टीतल्या उत्तम दुर्मिळ भूमिकांमधली एक असूनही गेल्या वर्षी अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं फार कौतुक झाल्याचं ऐकिवात नाही. त्याचं नाव "फायनल कट'. ओमार नाइम दिग्दर्शित या पहिल्याच चित्रपटातली कल्पना, भविष्यात मृत व्यक्तीच्या आठवणीचं संकलन करणाऱ्या कटर नावानं ओळखल्या जाणाऱ्या संकलकाभोवती फिरते. या काल्पनिक समाजातल्या पद्धतीनुसार साधारण पैसेवाले लोक आपल्या मुलाच्या मेंदूत तो अर्भकावस्थेत असतानाच एक इम्प्लान्ट बसवतात. झोई इम्प्लान्ट नावानं ओळखलं जाणारं हे यंत्र या मुलाच्या शरीराचा एक अविभाज्य भाग बनून जातं. ते करतं काय, तर हे मूल जन्मल्यापासून त्याच्या डोळ्यांसमोर येणारी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करतं, मृत्यूपर्यंत. पुढे हे सर्व फुटेज कटर्सना दिलं जातं आणि ते या व्यक्तीच्या आयुष्यातल्या हायलाईट् सना एकत्र करून "रिमेमरी' असा दोन तासांचा कार्यक्रम त्यांच्या आप्तापुढे दाखवला, जो या मृत व्यक्तीची शेवटची आठवण ठरेल. शरीरात इम्प्लान्ट असल्याचं ते बसवलेल्या मुलांना एकविसाव्या वर्षापर्यंत सांगितलं जात नाही. कारण त्यांना त्यामागची संकल्पना लहानपणी लक्षात येणार नाही. तिचं महत्त्व मोठेपणी कळण्याची शक्यता अधिक. झोई इम्प्लान्टच्या बाजूनं लोक आहेत, तसेच त्याच्या विरोधातही आहेत. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचे ठरतात ते कटर्स, जे समाजाच्या प्रेमाला आणि रोषालाही पात्र आहेत. या चित्रपटात म्हटलं तर दोन रहस्य आहेत. पहिलं आहे ते हॅकमनच्या भूतकाळाशी निगडित. नऊ वर्षांचा असताना हॅकमनच्या हलगर्जीपणातून एका मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि या मृत्यूने हॅकमनचं पूर्ण जीवन झाकोळून गेलं आहे. पुढे चार्ल्स बॅनिस्टर या वादग्रस्त माणसाच्या झोई फुटेजचं संकलन करताना त्याला एक माणूस दिसतो, जो या मृत मुलाची आठवण करून देणारा आहे. हा माणूस कोण हे इथलं पहिलं रहस्य, तर बॅनिस्टरच्या आयुष्यातल्या काही घटना हे दुसरं. पण तसं पाहायला गेलं, तर हा रहस्यपट नाही. त्यामुळे महत्त्व आहे ते रहस्यांना नाही, तर एखाद्या माणसाचं आयुष्य चित्रित होणं या संकल्पनेला, आणि हॅकमन या व्यक्तिरेखेच्या तपशिलाला. आयुष्य चित्रित करण्याची कल्पना ही खूपच विचार करण्यासारखे प्रश्न उभे करते. ज्यातले बरेचसे ही पटकथा बोलून दाखवते. एक म्हणजे सर्वच गोष्टी चित्रित झाल्या, तर माणसाच्या प्रायव्हसीचं काय? कारण मूळ इम्प्लान्ट लावताना व्यक्तीला कल्पना दिलेली नाही. त्यामुळे हे चित्रीकरण त्याच्यावर लादलेलं आहे. हा प्रायव्हसीचा प्रश्न आज आपल्या समाजात अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. रिऍलिटी शोज किंवा टॅलेन्ट हन्टसारख्या स्पर्धात्मक कार्यक्रमातून मीडिया सामान्य माणसांच्या घराघरात पोचला आहे. एका परीने सर्व समाजच कॅमेराचं लक्ष्य झाल्यानं व्यक्तिगत म्हणण्यासारखं काहीच उरलेलं दिसत नाही. दुसरा प्रश्न असा, की एखाद्याला कळलं, की आपण केलेली प्रत्येक गोष्ट चित्रित होते आहे, तर तो आपलं आयुष्य मोकळेपणानं जगू शकेल का? त्यानं घेतलेले निर्णय हे पुढे चार लोकांत दिसणार असले तर तो तेच निर्णय घेईल का वेगळे? आपल्या आठवणी या खऱ्या कितपत विश्वासार्ह असतात, यावरही हा चित्रपट आपली मतं मांडतो. इथं हॅकमनच्या आयुष्यात लहानपणी घडलेला अपघात त्याच्या आठवणीत आणि चित्रित दृश्यात थोडा वेगवेगळा आहे. हा वेगळेपणा थोडा असला, तरी प्रत्यक्षात त्याचा हॅकमनवर झालेला परिणाम त्याचं आयुष्य व्यापून टाकणारा आहे. त्यामुळेच महत्त्वाचा. आयुष्य रेकॉर्ड करण्याची कल्पना कितीही ओढूनताणून आणलेली वाटली तरी खरी उतरते ती कटर्सच्या व्यक्तिरेखांच्या विचारपूर्वक केलेल्या हाताळणीमुळे. कटर्स हे या मंडळींची आयुष्य पाहू शकतात; पण त्याबद्दल बाहेर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. तसंच कायद्यानं ही मंडळी स्वतःही इम्प्लान्ट बसवलेली असू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी घेतलेला मृत व्यक्तीच्या जीवनाचा आढावा, हा पूर्णतः गुप्त राहतो. थोडक्यात, कन्फेशन घेणारा धर्मगुरू किंवा अपराधी व्यक्तीचा जबाब ऐकणारा वकील यांच्याप्रमाणेच हा कटर व्यक्तीच्या काळ्या बाजूचा अप्रत्यक्ष साक्षीदार आहे, पण त्रयस्थ. इथं कटर्सची तुलना ही प्रतीकात्मक मार्गानं व्यक्तीची पापं स्वतःकडे घेणाऱ्या सिनइटर्सच्या धार्मिक संकल्पनेशीदेखील केलेली आहे. कटर्सचा संपूर्ण काल्पनिक व्यवसाय इथं खरा वाटतो तो मुख्यतः रॉबिन विलिअम्सच्या कामगिरीमुळे. अत्यंत भडक (पॅच ऍडम्स, फ्लबर) संवेदनशील (डेड पोएट् स सोसायटी) आणि एकलकोंड्या, विरक्त (वन अवर फोटो, इनसोम्निआ) भूमिका हा नट सारख्याच प्रभावीपणे करतो. मी त्याच्या तिसऱ्या वर्गात मोडणाऱ्या भूमिकांचा चाहता असल्यानं, मला "फायनल कट' मधली त्याची भूमिका अधिक आवडली असावी. थोडक्यात काय, तर सर्वच विज्ञानपटांना ब्लॅक लिस्ट करण्यात अर्थ नाही. प्रत्येक चित्रप्रकारात जसे चांगले चित्रपट असतात, तसे वाईट. वाईटाचं प्रमाण वाढलं म्हणून चांगलं संपुष्टात येतं असं नाही. उलट त्याच कारणानं ते अधिक लक्षवेधी ठरतं, असंही आपण म्हणू शकतो.
-गणेश मतकरी

Read more...

गाडीतील तीन प्रवासी

>> Tuesday, June 17, 2008

केस ऍन्डरसनचा "द दार्जिलिंग लिमिटेड' आपल्याकडे का प्रदर्शित झाला असावा, हे सांगणं अवघड आहे. तो भारतात घडतो अन् त्यामुळे त्याबद्दल आम जनतेला थोडंफार कुतूहल असण्याची शक्यता आहे, पण तसा हा इतका वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे, की जरी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकाने हजेरी लावली (जे होणं कठीणच) तरीही त्यातल्या किती जणांना तो आवडेल याची शंकाच आहे. मात्र, मी इथे दोन गोष्टी म्हणजे पहिली म्हणजे आवडो वा न आवडो, ज्यांना आपल्याकडे सतत येणाऱ्या ब्लॉकबस्टर फॉर्म्युलाहून हटके असं काही पहायचंय त्यांनी दार्जिलिंग जरूर पहावा. आणि दुसरी म्हणजे ज्यांना तो आवडणार नाही, त्यांनी पटकन निष्कर्ष काढण्यापेक्षा तो आपल्याला का आवडत नाही याचा विचार करावा. दार्जिलिंग लिमिटेडला सांकेतिक अर्थाने कथानक नाही. हा तीन भावांनी केलेला प्रवास आहे. भारतातून एका ट्रेनमधून या तीन भावांच्या वडिलांचा वर्षभरापूर्वी मृत्यू झालेला आहे. आई त्याआधीच त्यांना सोडून गेली आहे. तीनही भाऊ आपापल्या उद्योगात असल्याने त्यांचा एकमेकांशी फारसा संपर्क नाही. सध्या त्यांना एकत्र आणलंय ते त्यांच्या मोठ्या भावाने, म्हणजे फ्रान्सिसने (ओवेन विल्सन) फार सलोखा नसला, तरी फ्रान्सिसची आजूनही दादागिरी चालते. आताही पीटर (एड्रिअन ब्रोडी) आणि जॅक (जेसन श्वार्न्झमन) हे दोघेही त्याला दबून आहेत. फ्रान्सिसच्या या मोहिमेच्या प्रथमदर्शनी समोर येणारा हेतू म्हणजे आध्यात्मिक समाधान आणि मनःशांती. प्रवासादरम्यान लागणाऱ्या धर्मस्थळांना भेट देत अन् एकूणच भारतदर्शन करत जाणे या दृष्टीने फ्रान्सिसने अत्यंत तपशिलात जाऊन आपली योजना ठरवली आहे. आपल्याला मदत लागेल म्हणून त्याने एक सहकारीदेखील बरोबर घेतला आहे; पण त्याने या भावांबरोबर न राहता पलीकडच्या डब्यात राहून वेळ पडल्यास पुढे येणं अपेक्षित आहे. पीटर अन् जॅकला फ्रान्सिसच्या या मनमानीचा त्रास होतो; पण बोलायची हिंमत नाही. शिवाय तिघांनाही आपल्या स्वतंत्र अडचणी आहेतच. फ्रान्सिस स्वतः नुकताच एका अपघातातून मरता मरता वाचलेला. पीटरच्या मैत्रिणीचे दिवस भरत आलेले; पण बाप होणं जमेल अशी त्याला खात्री नाही. जॅकच्या प्रेमकथेचं तर एक वेगळंच प्रकरण आहे. गमतीची गोष्ट म्हणजे, इथे वेगळंच प्रकरण हा केवळ शब्दप्रयोग नसून दिग्दर्शक ऍन्डरसनने हे प्रकरण खरोखरच वेगळं चित्रीण केलंय. "होटेल शेवाचिए' या बारा मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये जॅक अन पॅट्रीशिआ (नेटली पोर्टमन जी दार्जिलिंग लिमिटेड मध्येसेकंदच दिसते.) यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलची काही उपयुक्त माहिती इथे पहायला मिळते. ऍन्डरसनने आपल्या लहरीपणाला शोभेलसा प्रयोग करून आधी चित्रपटमहोत्सवामधून ही शॉर्ट फिल्म चित्रपटाआधी दाखवली. मग इन्टरनेटवरून ती फुलवत उपलब्धही करून दिली. त्यात पोर्टमनचं नग्नदृश्य असल्याने ती डाऊनलोड झालीही प्रचंड प्रमाणात. पुढे ज्या itunes च्या साइजवरून ती डाऊनलोड करता येत असे तिथून ती गायब झाली आणि चित्रपटगृहामध्ये दार्जिलिंग लिमिटेडबरोबर दाखवली जायला लागली. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या चित्रपटगृहात मात्र ही पहायला मिळत नाही. ज्यांना खरोखरंच ऍन्डरसनच्या कामात रस असेल त्यांना ती अजूनही नेटवर मिळू शकेल, मात्र शोधाशोध आवश्यक. तर दार्जिलिंग लिमिटेड ऍन्डरसनचे "द रॉयल टेनेनबॉम्स किंवा "द लाइफ ऍक्वॅटिक विथ स्टीव झिसू' सारखे चित्रपट पाहिलेल्यांना या दिग्दर्शकाबद्दल काही गोष्टी लक्षात येतील, ज्या दार्जिलिंगलाही लागू पडतात. एक म्हणजे ऍन्डरसन जानर (genre) किंवा लोकप्रिय चित्रप्रकारांचा वापर जरूर करतो. पण तो एक ढोबळ सांगाडा म्हणून. अखेर समोर येणारा चित्रपट हा कुठल्याही चौकटीत स्वतःला बांधून घेणारा होत नाही. इथला विनोद खोखो हसवणारा तर नसतोच वर काहीवेळा तर तो चक्क गंभीर मुद्द्यांना अधोरेखित करताना दिसतो. मूळचा सूर विनोदी चित्रपटाचा असला तरी तो टिकवण्याची ऍन्डरसनला गरज वाटत नाही. मग मध्येच तो गंभीर होतो. मध्येच तत्त्वचिंतनात्मक मध्येच प्रतीकात्मक अन् वेळप्रसंगी पुन्हा विनोदाकडे वळतो. विचार करण्याविषयी बोललो, त्यामागेही एक कारण आहे. अनेकदा चित्रपटांत जेव्हा भारत दिसतो तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचा काही ठराविक दृष्टिकोन दिसून येतो. इथली प्रेक्षणीय स्थळं, गरिबी किंवा बॉलिवूड ही बहुधा आवडती टारगेट्स असल्याचं दिसतं या चित्रपटातली देवळाला भेट किंवा इरफान खान असलेला गावकरी मुलाच्या मृत्यूचा प्रसंग यामुळे पटकन असा संशय येऊ शकतो की ऍन्डरसनही नेहमीप्रमाणेच आपली टिंगल करतोय. मात्र, नीट पाहता लक्षात येईल, की इथल्या घटना या तीन भावांच्या मानसिक आंदोलनाबरोबर जोडलेल्या आहेत. त्यांची दृश्यात्मकता आणि आशय हा चित्रपटाच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अंत्यविधीचा प्रसंग तर या तिघांच्या वडिलांच्या अंत्यविधीच्या प्रसंगाशी समांतर गेल्याने खूपच महत्त्वाचा आहे. ऍन्डरसन उगाचच कशावर टीका करणारा नाही. त्यामुळे इथेही पटकथा लिहिताना, त्याने सह पटकथाकार रोमन कपोलाबरोबर भारतभेट देऊन आपल्यावरचा थेट प्रभाव पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तो सांकेतिक वळणाने जात नाही. याचं एक छोटं उदाहरण म्हणजे ट्रेनमधल्या होस्टेसचं व्यक्तिचित्रण पाहता येईल. तिचा शरीरसंबंधांकडे पाहण्याचा कॅज्युअल दृष्टिकोन किंवा धूम्रपान यासारख्या गोष्टी तिचा एक आधुनिक व्यक्तिरेखा म्हणून दाखवतात. भारतीय संकेतांचा आधार घेणारा चित्रपट हे पात्र अशा रीतीने कधीही दाखवू शकला नसता. माझं व्यक्तिगत मत पाहायचं तर मला दार्जिलिंग खूप आवडला नसला तरी पाहण्याजोगा निश्žचित वाटला. जेव्हा चित्रपट कथानकाचा सुरवात, मध्य अन् शेवट यापलीकडे जाऊन विचार करतात तेव्हा ते आपल्याला काय सांगायचंय याचा मूलभूत पातळीवर जाऊन वेगळा विचार करताना दिसतात. मग त्यातल्या व्यक्तिरेखा अधिक तपशिलातल्या, प्रगल्भ होतात, विचारांना अधिक स्थान दिलं जातं. चित्रपट अधिक वैयक्तिक अनुभव आहे. मात्र, तो घेण्याची तयारी असणाऱ्या अन् त्याला एखाद्या वर्गवारीत बसवून मोकळं होण्याची घाई नसणाऱ्या प्रेक्षकांसाठीच.

-गणेश मतकरी

Read more...

भाबडा- सोपा, पण बहारदार...

>> Saturday, June 14, 2008

हलकं-फुलकं, देखणं, श्रीमंत जग दाखवणारी सिनेमांची एक जात असते. त्यांचा शेवट बहुधा गोडच होतो. त्यांचा आशय सखोल, गंभीर असतोच असं नाही. नातेसंबंधांबद्दल ते काही मूलभूत महत्त्वाचं सांगतात असंही नाही. पण दोन-अडीच तास ते तसा यशस्वी आभास मात्र निर्माण करतात. थोडा नर्मविनोद, थोडा चवीपुरता उपरोध, रोमान्स, हळवेपणा, भाव-भावना अशा सगळ्या गोष्टी त्यात असतातच असतात. पण आपल्याला कंटाळा येऊ न देता ते दोन तास घट्ट पकडून ठेवतात हे मात्र खरंच. तोच त्यांचा यूएसपी. "दी डेव्हिल वेअर्स प्रादा' हा त्याच जातकुळीचा सिनेमा आहे. याचा अर्थ तो वाईट आहे, असा अजिबात नाही. पण तो भाबडा-सोपा आहे. काही ठिकाणी तो उगाच इमोशनल होत लांबतो. गाभ्याला हात न घालता विषयाला वरवर स्पर्श करत जातो. लॉरेन विस्बर्गरच्या कादंबरीवर बेतलेली त्याची गोष्ट. ऍण्ड्रिया (ऍना हॅथवे) ही पत्रकार होण्याची स्वप्न बघणारी मुलगी. तिच्यात लिहिण्याची कला आहे. नवं ते शिकायची तयारी आणि स्मार्टनेस आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याची चिकाटीही. फॅशन आणि फॅशन मॅगझिन्स यांच्या जगाबद्दल तिच्यात एक प्रकारची तुच्छतादर्शक बेपर्वाई आणि उघड अज्ञान आहे. कुठल्याही बुद्धिजीवी माणसाला असेल तसंच. अशात तिला "रनवे'या फॅशन मॅगझीनच्या संपादिकेच्या मदतनीसाची नोकरी मिळते. "रनवे'ची संपादिका आहे मिरांडा (मेरिल स्ट्रिप) (या भूमिकेसाठी मेरिल स्ट्रिपला घेऊन खरं तर दिग्दर्शकानं निम्मं काम केलं आहे!) तिचा नखरा, हाताखालच्या माणसांना कःपदार्थ मानण्याची तिची सवय, तिचा दहशतीच्या जवळ जाणारा दरारा. "दॅट् स ऑल' असं म्हणून संभाषणाला एकतर्फी पूर्णविराम देऊन टाकण्याची तिची लकब आणि या साऱ्याबरोबरच आपल्या कामात तन-मन-धन देण्याची - सर्वश्रेष्ठ असण्याची वृत्ती. या दोन टोकाच्या दोन बायका एकत्र येतात, यातच गोष्टीची गंमत वाढत जाते. सुरुवातीला मिरांडाच्या फॅशनप्रेमाला तुच्छ लेखणारी ऍण्ड्रिया हळूहळू ते जग समजून घ्यायला लागते. आत्मतृप्तीतून थोडी बाहेर येते. "गबाळेपणा म्हणजे हुशार असणं नव्हे' हे समजून घेते. मिरांडाच्या तोफखान्यापुढे तगून राहायचं आव्हान स्वीकारते. आणि मग बघता बघता तिला या विक्षिप्त बाईचं - मिरांडांच - अंतरंगही हळूहळू उमगू लागतं. सुरुवातीला तिला चक्रम-सॅडिस्ट-विक्षिप्त बया असं संबोधणारी अँड्रिया मिरांडाला चक्क डिफेण्ड करायला लागते! या स्थित्यंतरात अर्थात ऍण्ड्रियाचं भावविश्वही ढवळून निघतं. साधा-सरळ, तिच्या गबाळग्रंथी सौंदर्यावर प्रेम करणारा तिचा मित्र, तिच्या करियरिस्ट धडपडीत दुखावला जातो. तिचे मित्र-मैत्रिणीही तिला तसं सुनावतात. तू पूर्वीची राहिली नाहीस. ऍण्ड्रियालाही ते जाणवतं. "पण या टप्प्यावर असे निर्णय तर घ्यावेच लागतात. कुणीतरी दुखावलं जाणं अपरिहार्यच...' असं स्वतःचं समर्थन करत असतानाच तिला जाणवतं, "म्हणजे मिरांडाही...' या टप्प्यावर ती थबकते. आपल्याला खरंच मिरांडासारखं असायचं होतं? आपल्या स्वप्नापासून किती लांब भरकटत आलो आपण? चांगुलपणा-नाती-स्वप्नं सोडून यशस्वी होऊ आपण? आणि मिरांडाला समजून घेण्याच्या, लौकिकार्थानं यशस्वी होण्याच्या, श्रीमंतीच्या उंबरठ्यावर ती "रनवे' आणि "मिरांडा' दोघींनाही रामराम ठोकते. पत्रकारितेच्या विश्वात परतते. फार सखोल गंभीर आशय हे "डेव्हिल वेअर्स प्रादा'चं बलस्थान नव्हेच. त्यातली गंमत आहे ती त्यातल्या चमकदार व्यक्तिरेखांमध्ये. त्यांच्यातल्या ठिणगीदार चकमकींमध्ये. ऍना हाथवे आणि मेरिल स्ट्रिप या दोघींचा हा सिनेमा. त्यांनी तो आपल्या कामानं पुरा रंगतदार केला आहे. ऍण्ड्रियाची स्वप्नाळू-स्वच्छ नजर, पाहता पाहता भरून येणारे तिचे डोळे, काहीसा गबाळा अवतार आणि त्यात खुलणारं तिचं रूप ऍनानं साकारलंय. "गबाळेपणा म्हणजे बुद्धिमत्तेचं सर्टिफिकेट नव्हे' हे जितकं खरं, तितकंच "स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत्व सोडून देणं म्हणजे यश नव्हे' हेही खरं. या दोन जाणिवांच्या मधला प्रवास ऍड्रियाचा. मेरिल स्ट्रिपला तर बोलून चालून भावखाऊच भूमिका आहे. मुळातच तुसडा स्वभाव आणि आपल्याभोवती माणसं नाचवण्याची तिची लकब बघता ती खलनायिका वाटण्याचा धोका होता. पण या सवयी काम ठेवूनही ही बाई "मिरांडा'ला एक माणूसपण सहजगत्या देते. एका विशिष्ट सुरात, समोरच्याला जराही बोलण्याची संधी न देता - आपलंच खरं करत बोलायची तिची शैलीदार लकब तर निव्वळ लाजवाब. या दोघींच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखाही. मग त्या किती लहान का असेनात - आपापले गुणदोष- प्रकृती घेऊन येतात. कागदी वाटत नाहीत. ही कारागिरी करून अखंड दोन तास आपल्याला बांधून ठेवणं, हेही काही कमी सोपं नसतंच!
-मेघना भुस्कुटे

Read more...

थिंग्ज टू डू इन डेन्वर...

>> Thursday, June 12, 2008

काही चित्रपटांविषयी आपण ऐकतो, पण काही कारणानं ते पाहण्याची संधी मिळत नाही. मग हे चित्रपट आपल्या डोक्‍यात राहून जातात. कालांतरानं जर हे नाव आपल्या कानावर पडलं तर ती आठवण जागी होते. आपल्याकडं केबल टीव्ही आले आणि आपल्याला काय पाहू आणि काय नको झालं. त्या सुमारास बी. बी. सी.वरचा एक कार्यक्रम मी नेहमी पाहत असे. "फिल्म सीरिज' नावानं ओळखली गेलेली ही मालिका बॅरी नॉर्मन हे नावाजलेले समीक्षक चालवत आणि थोडक्‍यात पण अतिशय योग्य त्या मुद्द्यांना स्पर्श करणारी समीक्षा ते करत. अर्थात, आपल्यासाठी यातले बहुसंख्य चित्रपट हे पाहायला न मिळणारेच असत. कारण तेव्हा चित्रपटांची मोठ्या प्रमाणातली आयात सुरू व्हायला वेळ होता आणि डी. व्ही. डी. क्रांती किंवा मल्टिप्लेक्‍सेस हीसुद्धा दूरच होती. तरी हा कार्यक्रम उद्‌बोधक ठरतो एकूण चित्रजगताच्या घडामोडींबद्दल होत राहणाऱ्या माहितीने आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे नॉर्मनच्या शैलीनं.
1996 मध्ये म्हणजे "फिल्म 96'च्या एका भागात ऐकलेलं चित्रपटाचं नाव माझ्या डोक्‍यात राहिलं ते राहिलंच. राहण्यामागं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे नाव तसं विचित्र आणि लांबलचक होतं. त्याचा सरळ अर्थ पाहिला तर चित्रपट अतिमानवी कथावस्तूवर बेतला असेलसं वाटणं स्वाभाविक होतं; पण नॉर्मनच्या म्हणण्यानुसार चित्रपट काही भुतांचा वगैरे नव्हता, तर ही एक गॅंगस्टर फिल्म होती. मात्र, फॉर्म्युलात न बसणारी. त्या सुमारास शक्‍य ते सर्व प्रयत्न करूनही हा चित्रपट मी पाहू शकलो नाही आणि परवा अचानक त्याची डी. व्ही. डी. समोर आली. नाव माझ्या लक्षात होतंच - "थिंग्ज टू डू इन डेन्वर व्हेन यू आर डेड!'
गॅरी फ्लेडर दिग्दर्शित चित्रपटाच्या नावाबद्दल मी एक मात्र म्हणेन, की ते बुचकळ्यात टाकणारं असलं, तरी खोटं नाही. त्याचा अर्थ शब्दशः घेणं योग्य नाही एवढंच. कथानक गडद आहे. जिमी द सेन्ट ही प्रमुख व्यक्तिरेखा सोडता इतर व्यक्तिरेखाही काळ्या रंगाच्या विविध छटांनीच रंगवलेल्या आहेत. एकूण चित्रपटावर प्रभाव आहे तो फिल्म नूवार (Film Noir) नावानं ओळखल्या जाणाऱ्या गडद अमेरिकन गुन्हेगारीपटाचा ज्यांनी 1940 च्या आसपासचा काळ गाजवला; पण आपला प्रभाव पुढं कायम ठेवला. पोलान्स्कीचा चायना टाउन, रॉबर्ट रॉड्रिग्जचा सिन सिटी आणि क्वेन्टीन टेरेन्टीनोचा प्रत्येक चित्रपट हा अखेर नूवार चित्रपटांशीच नातं सांगतो. त्यामुळे इथंही तो प्रभाव दिसण्यात आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही.
इथला नायक आहे जिमी द सेन्ट (ऍन्डी गार्शिआ) जो एकेकाळी गॅंगस्टर असला तरी आता सभ्य होण्याचा प्रयत्न करतोय. त्याची कंपनी मरणोन्मुख माणसांचा सल्ला त्यांच्या वारसांसाठी व्हिडिओटेप करून ठेवण्याचं काम करते. दुर्दैवानं हा धंदा फारसा यशस्वी नाही आणि तो करताना जिमी कर्जबाजारी झालेला आहे. यातून सुटण्याचा उपाय म्हणजे "मॅन विथ 9 प्लान' (क्रिस्टोफर वॉफन) या चमत्कारिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या एकेकाळच्या बॉसनं सांगितलेली कामगिरी पुरी करणं. कामगिरी तशी फारच सोपी. बॉसच्या अर्धवट मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं, जी आता दुसऱ्याच कोणाच्या प्रेमात आहे. त्या दुसऱ्या माणसाला धमकावून बाजूला करायचं आणि बॉसच्या मुलाचा रस्ता मोकळा करायचा.
नाइलाजानंच जिमी कामगिरी स्वीकारतो आणि आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांना घेऊन कामगिरीवर निघतो. चित्रपटीय तर्कशास्त्राला अनुसरून कामगिरी पुरी होत नाहीच, वर तिचा उलटाच परिणाम होतो. बॉस पिसाळतो. सहभागी झालेल्या सर्वांच्या मृत्यूचं फर्मान काढतो आणि जिमीचा डेन्वर कायमचं सोडून जायला थोडा अवधी देतो.
टेरेन्टीनोचा फसलेल्या दरोड्याविषयीचा रिझरवॉयर डॉग्ज 1992 चा, तर हा 1996 म्हणजे अशी शंका घ्यायला जागा उरते, की हा चित्रपटही आधुनिक गुन्हेगारीपटांवर टेरेन्टीनोनं टाकलेल्या सर्वव्यापी प्रभावाचा एक भाग आहे. शंकेचं कारण म्हणजे शैलीतलं साम्य. दोन्ही चित्रपटांचा विषय तसा जवळचा. काळजीपूर्वक आखलेली गुन्ह्याची योजना फिसकटणं आणि त्यात सहभागी गुन्हेगारांचं भवितव्य हेच दोघांच्याही केंद्रस्थानी. चलाख संवाद, ब्लॅक ह्यूमरचा मुक्त वापर हेदेखील तसंच. तत्कालीन समीक्षकांनी साहजिकच उपस्थित केलेल्या या शंकेवर उत्तर म्हणून दिग्दर्शक फ्लेडर यांनी दाखवून दिलं होतं, की "थिंग्स टू डू इन डेन्वर...' जरी नंतर बनला असला, तरी त्याची पटकथा काही वर्षांपूर्वी लिहिली गेली होती. "रिझरवॉयर डॉग्ज'च्याही आधी. त्यामुळे प्रभाव असला, तरी तो इतका थेट नाही आणि टेरेन्टीनोचा म्हणावा असा नाही. तर दोन्ही चित्रपटांच्या कर्त्यांची स्फूर्तिस्थानं साधारण त्याच प्रकारची असल्यामुळे होणारा हा आभास आहे.
फ्लेडरचा हा चित्रपट आणि टेरेन्टीनोचे चित्रपट यांमध्ये एक मोठा फरक मात्र दिसतो, तो खरं तर याला ठळकपणे वेगळा असल्याचं दाखवून देतो. टेरेन्टीनोची पात्रं ही केवळ त्या क्षणाचा विचार करणारी आहेत. "स्वार्थ' या एकाच गोष्टीभोवती त्यांची प्रत्येक हालचाल फिरताना दिसते. पाप-पुण्याच्या संकल्पनेपेक्षा चाली-प्रतिचालींची संकल्पना त्यांना कळायला अधिक सोपी आहे. याउलट जिमी द सेन्टच्या कथेचा संपूर्ण उत्तरार्ध हा समीप आलेल्या मृत्यूच्या पलीकडं जाऊन हातून काही चांगलं घडवण्याचा प्रयत्न करण्याबद्दलचा, मोक्षप्राप्तीबद्दलचा आहे. आयुष्यातल्या पापाचं परिमार्जन होऊ शकेल का, हा प्रश्‍न जिमीला पडतो, जो टेरेन्टीनोच्या कोणत्याही पात्राला पडेलसं वाटत नाही. नेमका हाच भाग या चित्रपटाला महत्त्व आणून देतो.
सामान्यतः बॉसनं सोपवलेली कामगिरी पुरी करण्यात अयशस्वी झालेला नायक हा चित्रपटाच्या अखेर बॉसवर कुरघोडी करून आपलं बस्तान पुन्हा तरी बसवील किंवा मोठा डल्ला मारून फरार तरी होईल. जिमी यातली कोणतीच गोष्ट करत नाही. आपला मृत्यू समोर दिसत असतानाही तो शांतपणे आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. चित्रपटाच्या नावाला संदर्भ आहे तो त्याच्या या वागण्याचाच. तो आपल्या प्रयत्नांत यशस्वी होतो का, हे मी सांगणार नाही. तो मुद्दाही नाही. महत्त्व आहे ते या प्रकारचं पात्र याप्रकारे वागण्याचं ठरवतं यालाच.
या एका गोष्टीवर चित्रपट पाहणाऱ्यांची मतं आपोआप विभागली जातात. जे प्रेक्षक आपल्याला स्मार्ट गुन्हेगारीपट पाहायला मिळेलशा आशेनं आले आहेत, ते गोंधळतात आणि चित्रपटाच्या दर्जाला नावं ठेवणं पसंत करतात. याउलट जे काही विशिष्ट अपेक्षा न ठेवता मोकळ्या मनानं चित्रपट पाहतायत ते या नव्या दिशेचं स्वागत करतात आणि कोणत्या मुक्कामाला घेऊन जाते हे पाहतात.
"थिंग्ज टू डू इन डेन्वर व्हेन यू आर डेड' पाहावा असं मी सुचवण्यामागं हे महत्त्वाचं कारण आहे. एका विशिष्ट चित्रप्रकाराच्या ठरलेल्या चौकटीपेक्षा बाहेरचं सामावून घेताना त्या चित्रकर्त्यांना काय तडजोडी कराव्या लागतात आणि एक प्रेक्षक म्हणून हा चौकट मोडणारा चित्रपट आपण काय प्रकारे पाहू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. नव्वदीमध्ये अमेरिकन गॅंगस्टरपटात काय बदल होत गेले याची नोंद म्हणूनही हा चित्रपट योग्य उदाहरण ठरेल. अखेर चित्रपट आपल्याला काय देतो हे बऱ्याचदा आपण त्याच्याकडून काय घेण्याची क्षमता ठेवतो, यावरही अवलंबून असतं. "थिंग्ज टू डू इन डेन्वर...' त्याला अपवाद असायचं काहीच कारण नाही.
-गणेश मतकरी

Read more...

दृष्टिकोनातला वेगळेपणा

>> Monday, June 9, 2008

2001च्या स‌प्टेबर महिन्यात ज्युल्स आणि मिडीयन हे बंधू अग्निशमन दलाच्या जवानांवर एक माहितीपट करत होते. अकरा तारखेच्या स‌काळी एका गँस लीकच्या तक्रारीमुळे हे जवान न्यूयॉर्कमधल्याच एका मध्यमवस्तीच्या भागात पोचले. तेव्हा ज्युल्स यांच्यात बरोबर होता. अचानक आलेल्या विमानाचा घरघराट ऎकून त्याने कॅमेरा फिरवला आणि त्यात दिस‌लेल्या दृश्याने जग हादरून गेलं.वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिलं विमान आदळतानाचा हा शॉट होता. दुस-याच क्षणी स‌र्व जवान आणि ज्युल्स‌ वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने सुसाट निघाले. आणि कॅमेरा या भयानक घटनेचा अवशेष टिपत राहिला.
9-11या माहितीपटात दिस‌णारे ज्युल्स आणि मिडीयन बंधू आणि त्यांचं फूटेज आठवण्यामागचं कारण म्हणजे 2008च्या जानेवारीत अमेरिकेत प्रदर्शित झालेला क्लोवरफिल्ड. क्लोवरफिल्ड हा कोणत्याही स‌त्य घटनांवर आधारित असण्याची शक्यताच नाही. कारण तो मुळात आहे एक मॉन्स्टर मुव्ही आणि न्युयॉर्कच काय पण कोणत्याहीन शहरात किंग काँग- गॉडझिलाचा नातलग शोभण्याजोग्या प्राण्याने धुमाकूळ घातल्याची घटना झालेली नाही, होण्याची शक्यता नाही, तरीही 11 स‌प्टेंबरच्या घटनेचे अनेक संदर्भ इथे अतिशय वास्तववादी पद्धतीने पाहायला मिळतात.
प्रत्यक्ष कथानकाकडे वळण्याआधी आणखी एका संदर्भाचा उल्लेख आवश्यक आहे. ज्याची क्लोवरफिल्डच्या संकल्पनेत मोलाची भूमिका आहे. तो म्हणजे ब्लेअर विच प्रोजेक्ट हा चित्रपट. एका गावातल्या चेटकीच्या दंतकथेवर माहितीपट करण्यासाठी गेलेले काही विद्यार्थी बेपत्ता झाले अन त्याचं मिळालेलं फूटेज केवळ संकलनानंतर प्रेक्षकांसमोर आणलं जातंय अशी ब्लेअर विचमागची कल्पना होती. यातली घटना ही केवळ कॅमेराच्या लेन्समधून सांगितली गेली होती, भीती जे दिसतंय त्यातून तयार होण्यापेक्षा जे दिसण्याच्या परिघापलीकडे आहे. त्यातून तयार होत होती. आणि अऩेक प्रश्न अनुत्तरीत ठेवूनही एक धक्कादायक अनुभव देणारा हा चित्रपट होता. स्पेशल इफेक्ट्स,नीट गोष्ट मांडणारी पटकथा किंवा स्टार्स यांचा संपूर्ण अभाव असूनही मी पाहिलेला स‌र्वोत्कृष्ट भयपटातला ब्लेअर विच प्रोजेक्ट हा एक.
तर क्लोवरफिल्ड, केवळ कॅमेराच्या नजरेतून घटना सांगितली जाणं आणि स‌र्व प्रश्नांना उत्तरे देणारी पटकथा नसणं या गोष्टी इथे ब्लेअर विचच्या संकल्पनेतून थेट आलेल्या आहेत. तर जवळजवळ माहितीपटात शोभण्यासारखं एका शहराचं (खरं तर प्रसिद्ध शहराचं म्हणजे, न्यूयॉर्कचं) नेस्तनाबूत होणं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दाखवलं जाणं. 9-11ची आठवण देणारं आहे.
मला वाटतं क्लोव्हरफिल्डला मॉन्स्टर मूव्ही न करता 9- 11च्या घटनेप्रमाणेच दहशतवादी हल्ल्याची गोष्ट करणं स‌हजशक्य झालं असतं. जो प्रत्यक्ष शक्यतेच्या कोटीतला नक्कीच आहे. मात्र कदाचित ते अमेरिकन प्रेक्षकांसाठी फार त्रासदायक, कदाचित न पाहावणारं झालं अस‌तं.
एक लक्षात घ्यायला हवं की, दोन इतके मजबूत संदर्भ असूनही क्लोव्हरफिल्ड हा रचायला आणि प्रत्यक्षात आणायलाही अत्यंत कठीण चित्रपट आहे. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट दिग्दर्शक मॅट रिव्हज आणि पटकथाकार डू गोदार यांना द्यायला हवं. पटकथा कठीण अशासाठी की ती कुठेही रचल्यासारखी न वाटता पुढेपुढे जायला हवी. ती कॅमेरावर चित्रीत करण्यामागे चित्रपटातल्या पात्रांनाच काही विशिष्ट कारणं हवीत. हे चित्रण अतराअंतराने तुटक होत असूनही त्याला एकसंघता हवी आणि घटनेचे स‌र्व पैलू त्यात यायला हवेत.
क्लोव्हरफिल्डच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं की हे एका कॅमेरावर मिळालेलं फूटेज आहे. पूर्वी सेंट्रल पार्क म्हणून ओळखल्या जाणा-या या भागात सापडलेल्या. मग आपण केवळ हे फूटेज पाहतो.एका प्रस‌न्न पहाटे सुरू झालेल्या, एखाद्या प्रेमकथेत शोभणा-या पहिल्या दृश्यानंतर कॅमेरा पोचतो तो जेसनच्या (माईक व्होगेल) हाती. तो आणि लिली (जेसिका ल्यूकस‌) जेस‌नच्या भावाच्या म्हणजे रॉबच्या (मायकेल स्टाल- डेविड) घरी स‌रप्राईझ पार्टीसाठी निघालेत. रॉब जपानला निघालाय. अन लिलीची योजना आहे की पार्टीतल्या मंडळींचे निरोपाचे संदेश चित्रित करून रॉबला ही टेप भेट द्यायची. पुढे आपण अर्थात कॅमेरा पार्टीत पोहोचतो. इथे रॉबची मैत्रिण बेथ (ओडेन यूस्टमन), पुढे बराच वेळ कॅमेरा चालवणारा हड (टी.जे मिलर) आणि मार्लिना (लिझी काप्लान) यांची थोडक्यात ओळख होते. क्लोव्हरफिल्डचा हा भाग थोडा रेंगाळतो, पण पुढल्या भागासाठी हा सेटअप आहे. हा जमला नाही, अन व्यक्तिरेखांची ओळख, त्यांच्या प्रवासामागची कारणं ठरली नाहीत तर चित्रपट पकड घेणार नाही. लवकरच टीव्हीवर एक बातमी येते. आणि शहरात काही घडत असल्याची कल्पना सर्वांना येते. मंडळी आधी गच्चीत आणि मग रस्त्यावर उतरतात आणि चित्रपट गती घेतो.
क्लोवरफिल्डमध्ये न्यूयॉर्कवर हल्ला करणारा राक्षस हा गॉडझिला वैगैरे चित्रपटातल्याप्रमाणेच प्रचंड आणि नासधूस करणार अस‌ला तरी कथा घडते ती सामान्य माणसांना प्रमुख भूमिकेत ठेवून.त्यामुळे अशा चित्रपटांमधील मीडिया-आर्मी- राजकारणी वैगेरेंच्या स्ट्रेटे ज्यांना आपसूक कात्री लागते. आणि कॅमेराधारकांच्या आपला अन आपल्या मित्रांचा जीव कसा वाचवायचा, या प्रश्नांना महत्त्व येतं. प्रेक्षकांची नजरही कॅमेराच्या मर्यादित आल्याने त्याला फार काही दिसू शकत नाही. मात्र ही मर्यादाच खरी भीती तयार करते.जी एरवी मॉन्स्टर मुव्हीजमध्ये बहुदा वाटतच नाही.
दिग्दर्शकाने चित्रपट वास्तव वाटण्यासाठी कॅमेरा हँन्डिकॅमच्या स‌हजतेने तर वापरला आहेच.वर हँडिकँमच्या अनेक गुणदोषांचाही वापर सामावून घेतला आहे. जेसनने लिलीशी बोलताना तिच्या नकळत मागच्या सुंदर मुलींचं चित्रण करणं, नाईट व्हिजनचा वापर, काही चित्रीत केलेल्याच टेपवर ही नवी दृश्य चित्रीत करण्यात आल्याने मधेच काही सेकंदांसाठी दिसलेला पूर्वीच्या दृश्यांचा भाग आणि त्यांचा व्यक्तिरेखांसाठी लागणारा संदर्भ अशा अनेक ठिकाणी हँडीकँमच्या वापराच्या खूणा सोडलेल्या दिस‌तात. प्रत्यक्षात अनेक कॅमेरांनी शूट केलेल्या दृश्यांना एकजीव करून एका कॅमे-याचं म्हणून वापरणं, दृश्यांनी ग्रेनी करणं. असे तांत्रिक चमत्कारही आहेत. त्याशिवाय स्पेशल इफेक्ट्सच्या मर्यादित आणि पटण्यासारखा वापर ही क्लोवरफिल्डची खासियत आहे. माझं वैयक्तिक मत विचाराल,तर मी म्हणेन की शेवटाकडे हेलिकॉप्टरमधून दिसणारं प्राण्याचं जवळजवळ संपूर्ण दर्शन नस‌तं. तर बरं झालं असतं. मात्र मॉन्स्टर मुव्ही या चित्रप्रकाराचाही एक प्रेक्षकवर्ग आहेच. त्यामुळे दिग्दर्शकाला त्यांचाही विचार थोड्या प्रमाणात करायला हवा. हे तर उघड आहे.
क्लोवरफिल्ड आपल्याकडे अजून का आला नाही कोण जाणे. पण माझ्या मते तो येण्याची शक्यता नक्कीच आहे. काही अपेक्षेबाहेरचं पाहण्याची तयारी असलेल्यांनी त्याची वाट पाहायला हरकत नाही.
-गणेश मतकरी

Read more...

वॉर पीस आणि सेन्सॉर!

>> Friday, June 6, 2008

आपण एका लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या देशाचे नागरिक आहोत, आणि व्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य यासारख्या काही घटकांना आपण मानणं गरजेचं आहे, हे आपल्या सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या कधी लक्षात येणार कोण जाणे! समाजाच्या सांस्कृतिक वाढीसाठी काही गोष्टी समाजापासून दूरच ठेवलेल्या बऱ्या, असं या मंडळींचं मत असावं. हे मत कितीही फसवं, ढोबळ आणि स्वतःकडे महत्त्व घेणारं असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर करताना बोर्ड काही तारतम्य वापरेल अशी अपेक्षा आपण करतो, आणि तिचा भंग करून ते आपल्याला अनेकवार तोंडघशी पाडायला कमी करत नाही. मागे, मी बोर्डाने "क्लोजर' या विवाह (आणि विवाहबाह्य) संबंधांवर आधारित चित्रपटावर घातलेल्या बंदीविषयी लिहिलं होतं. नात्याच्या बदलत्या चेहऱ्यांनी ओढवणाऱ्या प्रेम या प्राचीन भावनेच्या ऱ्हासाचा उतरता आलेख दाखवणारा हा चित्रपट दृश्यात्मक पातळीवर कधीही सवंग होत नव्हता, पण केवळ प्रेमात संभवणाऱ्या वैचारिक द्वंद्वाला वाचा फोडणारा होता. कदाचित त्याचं विचारप्रवर्तक असणंच त्याला मारक ठरलं असावं. कारण विचार या संस्थेशीच बोर्डांचं वाकडं. असो, आपण क्षणभर गृहीत धरून चालू, की एका व्यक्तीच्या कल्पनेतून निघालेला चित्रपट त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित असतो, अन् म्हणूनच तो इतरापर्यंत पोचताना त्याच्या योग्यायोग्यतेचा सर्वांगीण विचार होण्याची गरज असते. पण माहितीपट? त्यांचं काय? सर्वसाधारणपणे माहितीपट हे लोकांना वरवर माहीत असणाऱ्या गोष्टींचाच खोलात अभ्यास करून काढल्याचं दिसतं. बहुतेकदा या प्रकारच्या निर्मितीमागे निर्मात्याने, दिग्दर्शकाने ठरवलेली एक दिशा असते, त्यांना उपलब्ध असणाऱ्या माहितीमधून काही विशिष्ट मुद्दा मांडायचा असतो, आणि त्या मुद्द्याला अनुसरूनच माहितीपटांचा अंतिम आकार ठरवला जातो. पण शेवटी हे लक्षात घ्यायला हवं, की हा आकार काही निव्वळ कोणाच्या सुपीक डोक्यातून तयार होत नाही. (मायकेल मूरसारख्या काही डोक्यांचा सन्मान्य अपवाद वगळता) तर त्याची बीजं, ही घडलेल्या घटनांमध्ये आणि सामाजिक परिस्थितीत पाहायला मिळतात. बहुसंख्य वेळा या डॉक्युमेंटरीमध्ये दिसणारा दृश्य भाग हा टेलिव्हिजन, वर्तमानपत्रांसारख्या माध्यमांद्वारे आधीच जनतेपर्यंत पोचलेला असतो, आणि फिल्ममेकर केवळ या भागाची पुनर्रचना करून आपला कार्यभाग साधताना दिसतो. अशा परिस्थितीत एखाद्या माहितीपटावर- तेही कोणा केवळ सिद्धीच्या मागे असणाऱ्या ऐऱ्यागैऱ्याने नव्हे, तर एका प्रथितयश सिद्धहस्त माहितीपटकर्त्याने बनवलेल्या माहितीपटावर बंदी घालून, सेन्सॉर बोर्ड काय साधतं? आशयप्रधान आणि संवेदनशील विषय हाताळणाऱ्या डॉक्युमेंटरी मेकर्समध्ये, आनंद पटवर्धनांचं नाव आदरानं घेतलं जातं. गेल्या तीस वर्षांत त्यांनी सामाजिक जाणिवा आणि राजकारणी डावपेचांकडे लक्ष देत अनेक महत्त्वाचे विषय यशस्वीपणे हाताळले आहेत. प्रिझनर्स ऑफ द कॉन्शन्स (1978), इन द नेम ऑफ गॉड (1992) फादर सन अँड होली वॉरसारख्या माहितीपटांनी त्यांचे नाव चर्चेत राहिलं आहे. सेन्सॉर बोर्डानं यापूर्वी अनेकदा पटवर्धनांच्या कामावर आक्षेप घेतला आहे, पण त्यांच्या "वॉर अँड पीस'चा सेन्सॉरबरोबरचा लढा आजवरचा सर्वांत तापदायक असावा. जेव्हा "वॉर अँड पीस' सेन्सॉरला दाखवला गेला, तेव्हा बोर्डानं सहा जागा आक्षेपार्ह ठरवल्या. पटवर्धनांनी हे अमान्य करताच एका मोठ्या झगड्याला सुरवात झाली. जिचा शेवट अखेर केला तो न्यायसंस्थेनं. या चोवीस एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयानं हा माहितीपट जसाच्या तसा संमत करण्याचा आदेश सेन्सॉर बोर्डाला दिला आणि या लढ्याचा शेवट झाला. आश्चर्याची गोष्ट अशी, की सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीनं यात आक्षेप घेण्याजोगी कोणतीही जागा नाही. एके काळी महात्माजींच्या अहिंसेच्या संदेशानं प्रभावित झालेल्या भारताला आज लाखो माणसांचा क्षणात बळी घेण्याची शक्ती असणारी अण्वस्त्रं प्रिय झाली असल्याचं सत्य नोंदवणारा हा माहितीपट, केवळ भारत-पाकिस्तानच्या युद्धविषयक धोरणांना स्पर्श करून थांबत नाही, तर एकूण जगातच आज युद्धाचा व्यापार होऊन राहिल्याचं स्पष्ट करतो. अमेरिकेसारख्या महाशक्तीनं केलेल्या शस्त्रास्त्र उद्योगाच्या खासगीकरणातून उद् भवलेल्या तोट्याबरोबरच, तो त्यांच्या सरकारी धोरणातल्या विसंगतीवरही बोट ठेवतो, आणि हिरोशिमा नागासाकीसारख्या अण्वस्त्रांमधून ओढवलेल्या भीषण संहारावरही एक नजर टाकतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, की पटवर्धनांचा रोख हा संपूर्ण युद्धसंस्कृतीवर आहे, प्रादेशिक आणि जागतिक. माझ्या मते, यातली चित्रकर्त्यांना वाटलेली आवाका वाढवण्याची गरज, हा या माहितीपटाचा सर्वांत गोंधळाचा भाग आहे, जो त्याच्या एकूण परिणामाला पसरट करतो. जोवर चित्रपट युद्धाकडे केवळ आपल्या आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा तो सर्वांत प्रभावी ठरतो. या भागातही त्याच्या सादरीकरणाचे मुद्द्यांप्रमाणे तुकडे झालेले दिसतात. तरीही हे सर्व तुकडे हे प्रामुख्यानं एका प्रश्नाच्याच अनेक बाजू असल्याचं स्पष्ट होतं. किरणोत्सर्गाच्या परिणामाचे बळी ठरणारे सामान्य नागरिक, या शस्त्रांच्या भांडवलावर निवडणुका जिंकू पाहणारे राजकारणी, त्यांच्या दुष्परिणामाचं भांडवल करू पाहणाऱ्या विरोधी बाजू, दोन देशांतल्या वैरानं अकारण शत्रू पक्षात गेलेली जनता, नव्या पिढीची या वैराकडे पाहण्याची दृष्टी, अशा विविध अंगांनी जाणारा हा भाग, या द्वेषाच्या आणि शक्तिप्रदर्शनाच्या राजकारणाचं एखाद्या कोलाजसारखं चित्र उभं करतो. त्या मानानं आंतरराष्ट्रीय घडामोडींवर रेंगाळणारा भाग हा स्वतंत्रपणे लक्षवेधी असला, तरी डिसकनेक्टेड वाटतो. कदाचित त्याची स्वतंत्र डॉक्युमेंटरी अधिक चांगली वाटली असती. पण तो वेगळा मुद्दा. महत्त्वाचं हे, की यात कोणताच भाग समाजमानसासाठी अडचणीचा नसल्यानं, सेन्सॉर बोर्डनं सुचवलेल्या कट् समागच्या प्रेरणा स्पष्ट होत नाहीत. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते फिल्ममुळे समाजावर होणाऱ्या एकूण परिणामावर नजर टाकतात, आणि हा परिणाम नकारात्मक असला, तर चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारण्यात येते. आता "वॉर अँड पीस' बद्दल बोलायचं, तर त्याचा परिणाम हा नकारात्मक कसा? किंवा कोणासाठी? हा चित्रपट प्रामुख्यानं युद्धविरोधी असून, युद्धविषयक धोरणांमधल्या विसंगती सांगणारा आहे. त्यातला अतिरिक्त किरणोत्सर्गाविषयीचा भाग तर समाजाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि तो सिद्ध करणंही सोपं आहे. राजकारण्यांचा भाग हा पब्लिक रेकॉर्डचा भाग असल्यानं, तो तर बहुतांशी लोकांना आधीच माहिती आहे. त्यातलं राजकारण्यांचं वागणं स्वार्थी आणि मूर्खपणाचं असलं तरी ते काही पटवर्धनांनी तयार केलं नाही, राजकारणी मुळातच तसे असल्याची ही चिन्हं आहेत. थोडक्यात, "वॉर अँड पीस' ही एका प्रश्žनाची सुविहीत रचना आहे. हा प्रश्न समाजापर्यंत पोचण्यासाठी ती तशी असणं गरजेचं असल्यानं ती समाजासाठी नकारात्मक नाही. ती तशी असलीच, तर राजकारण्यांसाठी काही प्रमाणात आहे. म्हणजे बोर्डानं घेतलेला आक्षेप, हा राजकारण्यांचा फायदा मनात ठेवून घेतला असल्याचीच ही चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत निरपेक्ष नजर न ठेवता पक्षपात करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाची गरजच काय, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. "वॉर अँड पीस' हा चित्रपटाप्रमाणे चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा पहिला माहितीपट ठरला आहे. मायकेल मूरच्या "फॅरेनहाईट 9/11' नंतर या प्रकारच्या प्रयोगानं मूळ धरणं स्वागतार्ह आहे. मात्र वॉर अँड पीसच्या बाबतीत तो कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणं गरजेचं आहे. फॅरेनहाईटला प्रेक्षक मिळणं त्यामानानं सोपं होतं ते अनेक कारणांसाठी. एक तर तो त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या उघड विरोधात असल्यानं मुळातच वादग्रस्त होता. (आपल्याकडे अशा प्रकारचा माहितीपट सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटणं, केवळ अशक्य) शिवाय मायकेल मूर हा त्याच्या विशिष्ट प्रकारच्या माहितीपटांचा स्टार असल्यानं, त्याचा स्वतःचा प्रेक्षक आहे. त्याखेरीज मूरच्या शैलीतच एका प्रकारचा उपहासात्मक विनोद पाहायला मिळतो, जो त्याच्या माहितीपटांचं मनोरंजनमूल्यही वाढवतो. तुलनेनं "वॉर अँड पीस' हा अधिक सांकेतिक अर्थानं माहितीपट आहे. त्याला येणारा प्रेक्षक हा केवळ त्यातल्या प्रश्नाची हाक ऐकून येऊ शकतो, त्यापलीकडे वेगळ्या कारणांसाठी नाही. सेन्सॉरच्या अडचणीचा त्यातल्या त्यात फायदा म्हणजे, त्या निमित्तानं "वॉर अँड पीस'चं वादग्रस्त असणं थोडंफार अधोरेखित केलं आहे. त्यामुळे एरवी माहितीपटांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रेक्षकालाही यात थोडाफार रस तयार झाला असल्याची शक्यता आहे. प्रसिद्धीचा एक नेहमीचा नियम आहे, की "नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी', त्यामुळे बोर्डानं केलेल्या आरोपांचा झाला तर फायदाच होईल. त्या निमित्तानं काही अधिक लोकांपर्यंत या माहितीपटाचं नाव पोचेल, आणि तो अधिक प्रमाणात पाहिला जाईल. वाईटातूनही काहीतरी चांगलं निघू शकतं ते असं.
गणेश मतकरी

Read more...

चौकटीबाहेरचा थ्रिलर

>> Tuesday, June 3, 2008

इ न्टरप्रिटेशन हा शब्द वरवर साधा आणि नेहमीच्या वापराचा असला तरी प्रत्यक्षात खूपच गुंतागुंतीचा आहे. डिक्शनरीत पाहायचं तर त्याचा अर्थ हा "अर्थ सांगणे' या सोप्या क्रियेपासून ते "दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे, विवरण करणे' यासारख्या थोड्या अधिक गंभीर गोष्टींना स्पर्श करत थेट एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने समजणे, अर्थ लावणे इथपर्यंत पोचतो. त्यामुळे महत्त्वाचा ठरतो तो संदर्भ. आपण हा शब्द वापरताना तो कोणत्या संदर्भात वापरतो त्यावरून या शब्दाचं, विषयापुरतं वजन ठरतं. सिडनी पोलाक दिग्दर्शित " इन्टरप्रिटर' हा चित्रपट या शब्दाच्या संदर्भासहित बदलत जाणाऱ्या अर्थाशी वेगवेगळ्या पद्धतीने खेळून आपलं नाव सार्थ ठरवतो. वरवर पाहता हे यातल्या नायिकेचं जॉब डिस्क्रिप्शन किंवा तिचा हुद्दा आहे. UN मध्ये किंवा संयुक्त राष्ट्रसंघात ती दुभाषाचं काम करते. मात्र चित्रपटातलं इन्टरप्रिटेशन तेवढ्यापुरतं सीमित नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाच्या अंतर्गत आणि वैश्विक पातळीवरच्या प्रश्नांकडे पाहिलं जातं तेव्हा असं लक्षात येतं, की त्या देशाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांचा अर्थ हा अनेक प्रकारे लावता येतो. या वेळी जागतिक महासत्तांनी किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या महासंस्थांनी लावलेला अर्थ, त्यांचं इन्टरप्रिटेशन हे जागतिक इतिहासालाच वेगळं वळण लावणारं असू शकतं. या परिस्थितीत या महासत्ता अन् महासंस्थाच इन्टरप्रिटर ठरतात. इथे नेते आणि जनता यांमधलं नातंही इन्टरप्रिटेशनसाठी अभिप्रेत आहे. या चित्रपटातल्या "मरोबो' काल्पनिक देशाचा हुकूमशहा राष्ट्राध्यक्ष एडमन्ड झुवानी याच्या सत्तासंघर्षात अनेक निरपराध्यांचे बळी गेले आहेत. त्याचे समर्थक, विरोधक आणि जनता हाही "इन्टरप्रिटर'चा एक पैलू आहे आणि त्यांचे झुवानीकडे पाहण्याचे स्वतंत्र दृष्टिकोन हादेखील यातल्या इन्टरप्रिटेशनचा एक भाग आहे. अर्थात, एक लक्षात घ्यायला हवं, की इन्टरप्रिटरची पार्श्वभूमी, त्यातली राजकीय गुंतागुंत आणि विषयाची व्याप्ती हे सर्व गृहीत धरूनही हा चित्रपट मुळात एक थ्रिलरच आहे. मात्र त्याच्या काळाबरोबर असण्याने आणि रहस्यापलीकडे जाऊन विचार करण्याची त्याची तयारी असल्यामुळेही तो देत असलेला अनुभव हा अधिक परिपूर्ण आहे. इथली नायिका सिल्व्हिया (निकोल किडमन) ही मूळची आफ्रिकेतल्या मरोबो देशाची नागरिक आहे आणि तिचे आई-वडील अन् बहिणीच्या मृत्यूला मरोबोचा राष्ट्राध्यक्ष झुवानी हा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेला आहे. सध्या सिल्व्हिया संयुक्त राष्ट्रसंघात दुभाषाची नोकरी करते आणि तिच्या देशासारख्या भरकटलेल्या देशांना केवळ शांतिपूर्ण तडजोडींनीच योग्य मार्गावर आणता येईल हा तिचा ठाम विश्žवास आहे. झुवानीच्या कारकिर्दीत ओढवलेल्या मनुष्यहानीमुळे आता त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे, ज्यातून सुटण्याच्या आशेवर संयुक्त राष्ट्रसंघासमोर आपली बाजू मांडायला तो अमेरिकेत येणार आहे. एके रात्री आपलं सामान आणायला संघात परत गेलेल्या सिल्व्हियाच्या कानावर अपघाताने एक संभाषण पडतं, जो झुवानिच्या हत्येचा कट असतो. सहभागी व्यक्तींचे चेहरे पाहू शकत नाही, पण त्यांना मात्र तिचा छडा लगेचच लागतो. सिक्रेट सर्व्हिसच्या केलर (शॉन येन) या अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या तपासासाठी बोलावण्यात येतं, पण त्याचा सिल्व्हियावर विश्žवास बसत नाही. दिवस जातात तसा केलर सिल्व्हियाला समजून घ्यायला लागतो, पण सिल्व्हियानेही आपल्या जबाबात काही गोष्टी लपवलेल्या असतात, ज्या त्या दोघांनाही अनेकवार अडचणीत आणत राहतात. सध्या, म्हणजे खरं तर गेले बरेच दिवस चित्रपटातलं रहस्य हे केवळ धक्का देण्यासाठीच असल्याचा चित्रकर्त्यांचा समज झाला आहे. गुन्हेगारावर संशय येऊ न देणं हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाल्यामुळे अनेकदा चित्रपट त्याच्या कथेला पूर्ण न्याय देण्याऐवजी संशयितांमध्ये खो-खोचा खेळ करताना दिसतात. इंटरप्रिटर तसं करीत नाही. त्याच्या प्रवासात अनपेक्षित वळणं आहेत, पण केवळ धक्के देण्यावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तो पटकथा एका निश्चित आलेखात चढवत नेऊ शकतो. इंटरप्रिटर पाहताना अनेकांना 1998 मधल्या एडवर्ड झ्विक यांच्या "द सीज' या चित्रपटाची आठवण होणं शक्य आहे. सीज हादेखील पोलिटिकल थ्रिलर होता; पण त्यात रहस्याचा भाग हा इन्टरप्रिटरहून कमी होता आणि दहशतवादाच्या सार्वत्रिक परिणामांवर त्याचं लक्ष अधिक केंद्रित झालं होतं. या दोन्ही चित्रपटांत अनेक साम्यस्थळं आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवादाचा आसरा घेणाऱ्या राजकीय शक्ती, हतबल सरकारी यंत्रणा आणि अमेरिकेपर्यंत पोचलेले परकीय दहशतवादाचे पडसाद या गोष्टी दोन्ही चित्रपटांत आहेत; तरीही दोन लक्षणीय म्हणावेसे फरकही आहेत. "द सीज'ची रचना ही समाजाभिमुख आहे, तर "द इन्टरप्रिटर'ची व्यक्तिभिमुख. इन्टरप्रिटरमधली नायिका ही चित्रपटाचा जीव आहे. त्यातल्या सर्व वैचारिक प्रश्नांचा विचार हा प्रामुख्याने तिच्या दृष्टिकोनातून होतो आणि इतरांची कामं मोठी असली तरी दुय्यम राहतात. सीजमध्ये अनेकांचे समांतर दृष्टिकोन त्यातल्या घटना पुढे नेतात आणि पटकथा विविध पातळ्यांवर पुढे सरकते. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे सीज 9-11 च्या आधीचा होता, तर इन्टरप्रिटर नंतरचा आहे. हा फरक ढोबळ स्वरूपात जाणवत नाही, पण तपशिलात डोकावतो. अमेरिकेच्या परकीय धोरणाविषयीचे विचार, सुईसाईड बॉम्बर्सना थांबवण्यासाठी देण्यात येणारं प्रशिक्षण, चित्रपटातला सामोपचाराचा संदेश अशा अनेक ठिकाणी 9/11 चे पडसाद हलकेच उमटतात. आजकाल बहुसंख्य थ्रिलर्स हे एकप्रकारच्या निर्वातात घडताना दिसतात. त्यांना जगात काय चाललं आहे याचं भान नसतं. ना आपण चित्रपटातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दाखवत असलेल्या गोष्टींच्या प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामाची फिकीर. त्यांच्या नायकांची ओळख त्यांच्या कमावलेल्या शरीरयष्टीपुरती असते आणि खलनायकांची त्यांच्या अद्ययावत शस्त्रसामग्रीपुरती. त्यांच्या चित्रपटातलं ना राजकारण योग्य असतं ना समाजकारण. अशा अनेक चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर "द इन्टरप्रिटर'सारख्या चित्रपटांचं यश हे अधिकच प्रशंसनीय वाटतं. कारण त्यांनी घेतलेली थ्रिलरची चौकट ही त्यांची मर्यादा ठरत नाही, केवळ आपली मतं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेली दिशा होऊन जाते.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP