’वुइ हॅव ए पोप’ - विनोद आणि विचार

>> Sunday, March 25, 2012


 ’कॉमेडी ’ या शब्दाचा आपल्याकडे फार वरवरचा अर्थ घेतला जातो. प्रामुख्याने ’खो खो’ हा हसण्याचा एकच प्रकार माहीत असल्याप्रमाणे बहुतेक चित्रकर्ते (उदाहरणार्थ प्रियदर्शन) हे फार्सच्या वळणाने जाणा-या सिचुएशनल विनोदावर लक्ष केंद्रीत करतात. त्याखालोखाल प्रेमाचं पारडं विनोदाहून जड असणा-या रोमॅन्टीक कॉमेडी आणि शेवटी ह्रृषीकेश मुखर्जींच्या चित्रपटांच्या वळणाचे (उदाहरणार्थ खूबसूरत) ,व्यक्तिचित्रणाला कथानकाच्या पुढे ठेवणारे चित्रपट हा आपल्या विनोदी चित्रपटांचा संपूर्ण अवाका  .साहजिकच ,विनोद आपण पुरेसा गंभीरपणे घेत नाही असंच म्हणावं लागेल.उपहास, विडंबन , राजकीय निरीक्षणं, विक्षिप्त किंवा नकारात्मक विषयांभोवती रचलेल्या ब्लॅक कॉमेडी या आणि अशा विनोदाच्या अनेक उपप्रकारांना आपल्या चित्रपटांत स्थान नाही. त्यामुळे वेगळ्या प्रकारचा विनोद पहायचा तर आपल्या देशाबाहेर इतरत्रच तो सापडण्याची शक्यता अधिक. हे लिहिण्याचं निमित्त ठरला, तो नुकताच पाहिलेला , इटालिअन दिग्दर्शक (निर्माते, अभिनेते वगैरे , वगैरे) नानी मोराती यांचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट’ वुइ हॅव ए पोप’.
विनोदी चित्रपटांच्या चौकटीत ,या चित्रपटाच्या विषयाला अनपेक्षित म्हणणं ,हे अन्डरस्टेटमेन्ट ठरावं. व्हॅटीकन सिटीमधे घडणा-या या चित्रपटाचा विषय नावात सुचवल्याप्रमाणे चक्क पोपची निवडणूक हाच आहे. इथे एक प्रश्न विचारणं आवश्यक आहे ,आणि तो म्हणजे कोणताही विषय विनोदासाठी वापरला जावा का? याचं उत्तर ,निदान माझ्या दृष्टिने नकारार्थी आहे. अनेकांना आवडलेल्या , आँस्करला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट या दोन्ही नामांकनात येऊन परभाषिक चित्रपटाचं पारितोषिक पटकावणा-या दुस-या एका इटालिअन चित्रपटाने , ’लाईफ इज ब्युटिफुल’ने नाझी संहार आणि छळछावण्यांना आपलं लक्ष केलेलं मला आवडलं नव्हतं ते याच कारणासाठी. मात्र तसाच आक्षेप ,मी वुइ हॅव ए पोप साठी घेणार नाही. एकतर त्याचा विषय लाईफ इज ब्युटिफुल इतका दारुण नाही. त्याशिवाय इथला विनोद कुठेही नुसती टिंगल करण्याच्या वा हशे मिळवण्याच्या इराद्याने काही करत नाही. परिस्थितीतून उद्भवलेलं नाट्य हे विनोदी ठरतं ते परिस्थितीत अध्याह्रृत असणा-या विरोधाभासाने. समाजात देवाचा सर्वो्च्च प्रतिनिधी मानली जाणारी व्यक्तीच जेव्हा देवाच्या आदेशाबद्दल आणि पर्यायाने अस्तित्वाबद्दल शंका घेते तेव्हा विनोद निर्माण होतो तो या परिस्थितीशी जोडलेल्या विक्षिप्तपणामुळे, अँब्सर्डिटीमुळे.
पोपच्या मृत्यूनंतर नव्या पोपला घोषित करण्यासाठी होणारी कार्डिनल दर्जाच्या धर्मगुरुंची बैठक आपण त्यामानाने हल्लीच पाहिली आहे, डॅन ब्राउनच्या एंजल्स अँन्ड डिमन्स या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातून. त्या चित्रपटाप्रमाणेच इथली बैठकदेखील जवळपास चित्रपटभर चालते, मात्र अगदीच वेगळ्या कारणासाठी आणि अगदीच वेगळ्या पध्दतीने.ब्राउनच्या कादंबरीप्रमाणे इथल्या पोपच्या निवडणुकीच्या आड कोणा माथेफिरुचं कुटील कारस्थान येत नाही, उलट अतिशय सामंजस्याने आणि त्यामानाने लवकरच ही काहिशी अनपेक्षित निवड होते.फादर मेलविल (मिशेल पिकोली) यांना हा बहुमान मिळतो. प्रथेप्रमाणे नवनियुक्त पोपने बाहेर जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला सामोरं जाणं आवश्यक , मात्र मनाची तयारी नसलेले आणि आपल्या निवडीमागची इश्वरेच्छा कळू न शकणारे मेलविल गडबडतात आणि माघार घेतात. पोप निवडला गेल्याची बातमी कळूनही त्याच्या न होणा-या दर्शनाने जनता हवालदील होते, इतर कार्डिनल गोंधळतात. मानसोपचार तज्ञाला (नानी मोरेती)पाचारण केलं जातं.
साक्षात पोपशी बोलताना तज्ञ ब्रेझीला सेक्स, स्वप्न, आई-मुलाचं नातं अशा हुकूमी विषयांना बाजूला ठेवावं लागतं आणि कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचणं अवघड होऊन बसतं . ब्रेझीच्या त्याच व्यवसायातल्या पत्नीचा सल्ला मेलविलचा हुद्दा उघड न करता घेण्यासाठी त्याला साध्या कपड्यात चर्चबाहेर नेण्यात येतं. आपल्याला पडलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरं चर्चबाहेरच सापडतील अशा विश्वासाने पोप आलेली पहिली संधी घेउन पळ काढतो आणि परिस्थिती अधिकच बिकट होते.
या प्रकारचे वर्तमानात घट्ट पाय रोवलेले, चर्च सारख्या मोठ्या आणि शक्तीशाली संस्थांना वैचारिक पेचात पकडू शकणारे, आणि व्हॅटिकनसारख्या सर्वपरिचित पार्श्वभूमीवर घडणारे चित्रपट युक्तीवादाच्या गुंत्यापासून छायाचित्रणाच्या खरेपणापर्यंत सर्वच बाबतीत आव्हानात्मक असतात.इथलं आव्हान सुरू होतं तेच पोप जॉन पॉल- २ च्या अंत्यदर्शनाच्या अस्सल फूटेजच्या वापरापासून जे चित्रपटाच्या इतर टेक्शचरबरोबर इतकं बेमालूम मिसळतं की, काय खरं अन काय कृत्रिम हेच कळू नये.
वुइ हॅव ए पोप ची पटकथा आणि त्याचं सादरीकरण करताना चित्रकर्त्यांनी विनोदी प्रसंग जरुर योजले आहेत ,पण त्याचवेळी श्रध्दा आणि देवत्वाबरोबरच स्वत्वाच्या चाललेल्या या शोधाचा गाभा गंभीर असल्याचं जाणून त्यांनी विनोद कुठेही हाताबाहेर जाऊ दिलेला नाही.निवडणुकीदरम्यान कार्डिनल्सची वागणूक ,कार्डिनलांच्या घेरावात पोपवरला मानसोपचार, पोपचं वेषांतर, ब्रेझीने चर्चमधे आयोजित केलेले करमणुकीचे कार्यक्रम,नाट्यगृहातला घेराव , या सा-या गोष्टी गंमतीदार आहेत , पण एका मर्यादेत. त्या कुठेही शाब्दिक कसरतींवर वेळ मारुन नेताना , वा प्रेक्षकाना अविश्वसनिय वाटतील अशा कल्पनेच्या भरा-या मारताना दिसत नाहीत. अपवाद कदाचित पोप आपल्या निवासस्थानी असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी केलेल्या गार्डच्या योजनेचा.हास्यकारक असूनही हा प्रसंग वेगळा वाटतो, तो त्याच्या शक्यतेच्या कोटीत न बसण्याने. हे सारं करताना दिग्दर्शकाने विचार करण्यासारख्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे.चर्चचं आजच्या काळात असणारं महत्व, दैवी वस्त्रं परिधान करताच करावा लागणारा व्यक्तिमत्वाचा त्याग, कर्तव्य आणि जबाबदारी यांच्या मर्यादा,माणूस आणि त्याला घालावे लागणारे मुखवटे, प्रत्येकाच्या जीवनातलं श्रध्देचं स्थान अशा कथानकाशी संबंधित विविध पैलूंवर हा चित्रपट भाष्य करतो.
अगदी अखेरच्या प्रसंगात मात्र ’कॉमेडी’चा मुखवटा थोडा सरकलेला दिसतो. त्यांना चर्चच्या धोरणावर टिका करायची असणं आपण समजू शकतो, मात्र आतापर्यंत ठेवलेला विनोद आणि विचार यांचा तोल इथे थोडा विस्कळीत होतो हेदेखील खरं.ही एक जागा सोडली तर ’वुइ हॅव ए पोप' चा कार्यभाग पूर्णत: सिध्दीला जातो असंच म्हणावं लागेल.
- गणेश मतकरी

Read more...

द डिसेन्डन्टस- शेवटामागची सुरुवात

>> Monday, March 19, 2012

 अनेकदा आपल्या पाहाण्यात असे चित्रपट येतात, जे पाहून आपल्याकडे असं काहीतरी का होऊ शकत नाही असा प्रश्न पडावा. हे चित्रपट नेत्रदीपक नसतात, कथेतलं नाट्य टोकाचं नसतं, हाताळणी वरवर पाहाता साधी असते, आशय पटण्याजोगा आणि सर्वसाधारणपणे कोणालाही जवळचा वाटणारा असतो आणि बजेट बेताचं असतं. थोडक्यात सांगायचं तर आपल्या चित्रपटउद्योगाच्या अवाक्यात बसणार नाही असं काहीच त्यात नसतं. तरीही ते असं काहीतरी सांगून ,दाखवून जातात ,जे आपल्या कायम स्मरणात राहील. त्यांना सुचलेली गोष्ट आपल्याकडल्या कुणाला सुचू नये याबद्दल हळहळ वाटायला लावतात. नुकत्याच होऊन गेलेल्या आँस्कर पारितोषिकाच्या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनात एक असलेला व त्याआधी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविलेला ' द डिसेन्डन्ट्स’ अशीच हळहळ लावून ठेवतो.
दिग्दर्शक अलेक्झांडर पेन यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ( उद. अबाउट श्मिड्ट, साईडवेज) डिसेन्डन्ट्स हा कथेपेक्षा अधिक ,व्यक्तिरेखांचा सिनेमा आहे. याचा अर्थ त्याला गोष्ट नाही असा नाही. उलट त्याला ब-यापैकी गुंतागुंत असलेली ,पुरेशी नाट्यपूर्ण गोष्ट आहे.मात्र तिची रचना, तिचा तोल हा पूर्णपणे त्यातल्या व्यक्तिरेखांशी जोडलेला आहे.इथली पात्र कथेच्या सोयीसाठी काही करत असल्याचा कधीही भास होत नाही. ही पात्रं केवळ जगतात. कथा स्वाभाविकपणे त्यांच्या आजूबाजूला आकार घ्यायला लागते.
इथली सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे, ती मॅट किंग (जॉर्ज क्लूनी) ही.क्लूनी हा अमेरिकेतल्या आणि पर्यायाने जगातल्या सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक महत्वाचं नाव आहे हे मी वेगळं सांगायला नको. पण तो केवळ देखणेपणावर काम भागवणारा नट नाही. भूमिकेचा तपशीलात अभ्यास करणं आणि ती उभी करताना आपल्या स्टार प्रतिमेचा , आपल्या लोकप्रियतेचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवणं हा त्याचा विशेष. वन फाइन डे , ओशन्स मालिका यांसारख्या अतिशय व्यावसायिक चित्रपटांबरोबरच सोलरीस, सिरीआना , द अमेरिकन अशा वेगळ्या पध्दतीच्या़ चित्रपटांमधून त्याने आपली नवी ओळख बनवली आहे.तो स्वत: उत्तम दिग्दर्शकदेखील आहे हे त्याच्या ’कन्फेशन्स आँफ ए डेन्जरस माईन्ड’, ’गुड नाईट अँन्ड गुड लक’ किंवा यंदाच्या ’आईड्स आँफ मार्च’ मधेही दिसून आलं आहे. नित्य वेगळ्या पठडीतल्या भूमिका करत असूनही डिसेन्डन्ट्सचं नाव त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांमधे घेणं भाग पडावं , अशीच त्याची इथली कामगिरी आहे.
सामान्य प्रेक्षक हा ब-याचदा भूमिकेची चमत्कृती अन अभिनयाचा दर्जा यांची गल्लत करतो. त्यामळे पुष्कळदा लकबी, वैशिष्ट्यपूर्ण रंग/वेषभूषा, शब्दबंबाळ लेखन हे सगळं नटाच्या कर्तृत्वात जमेला धरलं जातं. मॅट किंगची व्यक्तिरेखा उभी करताना क्लूनीला अशा कुठल्याच गोष्टीची थेट मदत होत नाही. मॅट एक साधा माणूस आहे. व्यवसायाने वकील आहे. हवाईमधल्या परंपरागत श्रीमंत कुटुंबात किंग कुटुंबाची गणना होते. मात्र ही श्रीमंती मिरवण्याचीही त्याला गरज वाटत नाही.चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच त्याला जाणीव आहे ती कामापायी आपल्या हातून घराकडे झालेल्या दुर्लक्षाची. सध्या तो दुहेरी पेचात सापडलेला. मात्र बिकट परिस्थितीतही डोकं ताळ्यावर ठेउन शक्य तितकं न्यायाने वागणं हेच तो योग्य समजतो. नटाने अभिनय न करता स्वत:च ते पात्र बनण्याचा प्रयत्न करावा , असं या क्षेत्रातल्या थोरामोठ्यांनी सांगून ठेवलंय. पण ते कसं करावं याचं टेक्स्टबुक एक्झाम्पल म्हणजे क्लूनीचा मॅट किंग. आतून येणा-या भावनांचं संयत पण प्रत्ययकारी दर्शन, देहबोलीचा काळजीपूर्वक पण जेवढ्यास तेवढा वापर,कथानकाचा अचूक पकडलेला सूर अशा कितीतरी गोष्टि सांगता येतील.केवळ त्याने संवादांपेक्षा अधिक पॉजेसचा केलेला वापर, त्याची चाल (अन एका प्रसंगातलं धावणं) इतकंदेखील त्याची ताकद सिध्द करणारं आहे.
तर मॅट किंग. मॅटचं एरवीचं बिझी शेड्यूल सध्या एका जमीनविक्रीच्या कामाने अधिकच बिझी झालेलं. ही कोट्यवधी रुपयांची जमीन वडिलोपार्जित आहे, अन संपूर्ण कुटुंबाच्या मालकीची. पण ती विकण्या न विकण्याचा अंतिम निर्णय मॅटच्या हातात आहे़ .मॅट या कामात असतानाच बातमी येते ती त्याच्या पत्नीला झालेल्या अपघाताची. चित्रपट सुरू होतो तो हॉस्पिटलमधेच,थेट मुद्द्याला हात घालत, कोणत्याही प्रकारची प्रस्तावना टाळत.लवकरच मॅटला कळतं ,की अपघातापासून कोमात असणारी त्याची पत्नी एलिझबेथ बरी होण्याची शक्यता नाही. लवकरच ती हे जग सोडून जाईल.१० वर्षांची स्कॉटी (अमारा मिलर)  आणि सतरा वर्षांची अँलेक्स (शेलेन वुडली) या आजवर अंतरावर असलेल्या मॅटच्या दोन मुलींच्या विश्वात शिरकाव मिळवणं ही त्याच्यापुढली पहिली कठीण कामगिरी असते.तो प्रयत्न सुरू असताना अँलेक्सकडून एक अधिकच धक्कादायक बातमी कळते. अपघाताआधी काही दिवस एलिझबेथ दुस-याच कोणाच्या प्रेमात पडलेली असते.तिच्या सध्याच्या परिस्थितीत ,या माहितीवर काय रिअँक्ट करावं हेदेखील मॅटला समजेनासं होतं.
द डिसेन्डन्टचा टोन हा त्याचा विशेष आहे. विषयावरुन वाटतं तितका तो दु:खी नाही. दु:खाची छटा त्यात जरुर आहे, पण एरवीच्या आयुष्यात माणसं जशी केवळ दु:ख घेऊन बसू शकत नाहीत, तसंच इथल्या पात्रांचही होतं. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा एक ट्रॅक सतत चालू राहातो, जात्या माणसांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम तर राहातंच पण ते इतर भावभावनांना हद्दपार करु शकत नाही. संकटाला तोंड देताना ही पात्र जवळ येतात, त्यांच्यातले बंध घट्ट व्हायला लागतात. या सा-यामुळे चित्रपट केवळ सुखांत शोकांत अशा गणितात बसवणं शक्य होत नाही. त्यातल्या शोकाला छेद देणारी प्रसन्नतेची छटा आपल्यापर्यंत पोचते.
डिसेन्डन्ट्स हे नाव त्याच्या आशयाकडे अचूक निर्देश करणारं आहे. त्यातल्या वारशाचा अर्थ हा दुहेरी आहे. तो जसा एलिझबेथनंतर तिच्या मुलींच्या रुपाने राहाणा-या तिच्या अंशाशी जोडलेला आहे तसा तो किंग कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीशीदेखील संबंधित आहे.या दोन तशा स्वतंत्र वाटणा-या गोष्टींमधला समान धागाच डिसेन्डन्ट्सला संकेतांच्या बाहेर नेणारा, शेवटामधे दडलेली नवी सुरुवात दाखवणारा,प्रगल्भ अर्थाच्या शक्यता तयार करणारा आहे.
गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP