राशोमॉन आणि तलवारीचं रहस्य

>> Monday, October 12, 2015


जागतिक चित्रपटांसंदर्भात माहिती, जाण आणि इन्स्टीन्क्ट या साऱ्याच बाबतीत गोंधळलेल्या आपल्या सर्वभाषिक चित्रपट वृत्त/ समीक्षा संबंधित मिडीआने ६०/६५ वर्षापूर्वीच्या गाजलेल्या जपानी चित्रपटाचं नाव एका नव्या हिंदी चित्रपटाविषयी बोलताना सरसकट घ्यावं याबद्दल त्यांचं कौतुक ( हे नाव त्यांना सुचवलं गेलं असण्याची शक्यता गृहीत धरुनही ) करायलाच हवं. मात्र ते करताना हा संदर्भ या चित्रपटासाठी किती योग्य आहे, हा विचारही व्हायला हवा.

तलवार हा चित्रपट , हा ( बदललेल्या नावांसह) आरुषी तलवार- हेमराज यांच्या डबल मर्डर केसचा नव्याने विचार करतो. मूळ केस बहुधा सर्वांनाच माहीत असेल, पण कमी अधिक प्रमाणात. नॉयडा मधल्या एका बंगलीत तलवार कुटुंब , म्हणजे आरुषी आणि तिचे नुपूर आणि राजेश तलवार हे आई वडील रहायचे. हेमराज त्यांचा नोकर होता. एका सकाळी १४ वर्षाच्या  आरुषीची हत्या झाल्याचं लक्षात आलं. उघड संशय आला , तो घरुन गायब असलेल्या नोकरावर, हेमराजवर. पण पुढे त्याचाही मृतदेह मिळाला आणि संशयाची सुई आई वडीलांवर स्थिरावली. तपासाचं काम पुढे नं जाता वेगवेगळ्या अेजन्सीजकडे जात राहीलं, थिअरीज बदलल्या, संशयित बदलले, तपास करणारेही बदलले. पण पहिल्या, अत्यंत चुकीच्या प्रकारे केल्या गेलेल्या तपासाने आणि मिडीआत त्याला मिळालेल्या वारेमाप प्रसिध्दीने लोकांच्या मनात तिचे आई वडील हेच गुन्हेगार ठरले. आजच्या घडीला आरुषीच्या आई वडिलांना शिक्षा झालेली आहे, वरच्या कोर्टात त्यांचं अपील पेंडींग आहे.

कायदा आणि न्यायव्यवस्था याचा या केसमधे खेळखंडोबा झाला,  आणि कदाचित कोर्टासमोर आलेला पुरावा हा अंतिम सत्याकडे निर्देश करत नसेल, असं 'तलवार' चित्रपटाचं म्हणणं आहे. आता या चित्रपटाविषयी बोलताना, कोणालाही राशोमॉनची का आठवण व्हावी? तर कारण आहे ! तलवार आणि अकिरा कुरोसावाचा राशोमॉन (१९५०) या दोन्ही चित्रपटात एका अतिशय मूलभूत पातळीवर साम्य आहे. ते म्हणजे हे दोन्ही चित्रपट एका गुन्ह्याबद्दल, त्याच्या साक्षीपुराव्याबद्दल आहेत, आणि गुन्हा कसा झाला असावा याबद्दलच्या ऑल्टरनेट थिअरीज ते मांडतात. आता प्रश्न असा, की यामुळे तलवार राशोमॉनसारखा आहे, असं ठरतं , का नाही ?

राशोमॉन हा संकल्पनेच्या पातळीवरचा प्रयोग आहे. त्यातला गुन्हेगार आहे एक दरोडेखोर, जो एका उमरावाचा बळी घेतो, तोदेखील त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्यानंतर. त्यात आपल्याला घटनेची जी वेगवेगळी रुपं दिसतात, ती कोणी शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर समोर आलेली नाही, तर त्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तींच्या, या  साक्षी आहेत. दरोडेखोर, मृत उमराव ( प्लॅंचेटच्या सहाय्याने) , त्याची पत्नी, या सर्वांची साक्ष कोर्टात होते, तर खटल्यानंतर एक साक्षीदार पुढे येऊन आपली बाजू मांडतो. हे सारं असं घडलं नाही हे उघड आहे, कारण साक्षी जुळत नाहीत. तरीही चित्रपट आपल्याला हे निवेदन दृश्य स्वरुपात दाखवतो.

कुरोसावाने हे सारं एक मुद्दा , संकल्पना मांडण्यासाठी घडवलेलं आहे. आणि ती म्हणजे सत्य हे व्यक्तीसापेक्ष असतं. 'पूर्ण सत्य' असा प्रकारच असू शकत नाही. राशोमॉनमधल्या आवृत्त्या या आपल्याला काय घडलं हे सांगत नाहीत, तर माणूस स्वार्थी असतो, असं सांगतात. तो प्रत्येक गोष्टीत आपला फायदा पहातो, सत्य आपल्यापुरतं बदलून घेतो, आणि आपल्यासमोर बाकी कशालाही दुय्यम मानतो अशी इथली थिअरी आहे. त्यामुळे या घटनेच्या भिन्न आवृत्त्यांना एक सरसकट स्पष्टीकरण चित्रपटात मिळत नाही, उलट ते नसणं हेच महत्वाचं ठरतं. राशोमॉनला जोडलेली फ्रेम स्टोरी तर त्याला आणखीही वेगळा पैलू जोडते . खटल्याच्या गोष्टी एेकून हताश झालेल्या, आणि मानवजातीवरचा विश्वास उडालेल्या एका धर्मोपदेशकाला मानवता म्हणजे काय याचा या शेवटामधून साक्षात्कार होतो आणि चित्रपट फारच वरच्या पातळीवर पोचतो.

या पार्श्वभूमीवर, तलवारचं सत्य घटनेवर आधारीत असणं, हेच त्याला मुळात राशोमॉनपासून दूर नेतं. राशोमॉनमधल्या आवृत्त्या हा सत्याचा शोध नव्हे, तर सत्य या संकल्पनेचा तकलादूपणा दाखवण्याचा मार्ग आहे. याउलट खरं काय झालं, हे शोधणं , त्याबद्दल बोलणं , हाच तलवारमागचा हेतू आहे. याबद्दल चित्रपटाची एक निश्चित भूमिका आहे. किंबहूना चित्रपटाला पटणारा या केसमधला सत्यशोधक ,सीबीआयच्या अरुण कुमार वर बेतलेला  - चित्रपटातल्या सीडीआय च्या पहिल्या तपासणीचा मुख्य अधिकारी आश्विन कुमार ( इरफान ) हाच इथे प्रेक्षकांचा प्रतिनिधी आहे. चित्रपट सुरु होतो तोही त्याच्यापासूनच. त्याच्या नजरेला जे पटतं, ते प्रेक्षकाना पटावं, अशी पटकथाकार विशाल भारद्वाज आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांची योजना आहे.

तलवार चित्रपट आपण अनेकवार तुकड्या तुकड्यात वाचल्या पाहिलेल्या या घटनेच्या बाजू आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो, पण पध्दतशीरपणे. केसची सुरुवात , छोट्या श्रुती टंडनचा मृतदेह मिळाल्यानंतरचा रमेश ( नीरज कबी) आणि नूतन ( कोंकोणा सेन शर्मा ) यांचा आक्रोश त्या घटनेची हृदयद्रावकता आपल्यापर्यंत पोचवतो , जी आपण मिडीआच्या भडक अंदाजात, आणि सेन्सेशनल हेडलाईन्समधे लक्षातच घेतली नव्हती. त्यानंतर तिन्ही तपास तो दाखवत जातो, आणि त्या निमित्ताने त्यातल्या घटनेच्या तिचा तपास करणाऱ्यांच्या नजरेतल्या आवृत्त्या दाखवल्या जातात, पण त्या तेवढ्यापुरत्या. राशोमॉनप्रमाणे त्या आवृत्त्या हाच सिनेमा, असं इथे  होत नाही.  गुन्हेगार कोण ( किंवा कोण नाही) हा निष्कर्ष तलवारसाठी महत्वाचा आहे, आणि ते ठरवण्याची जबाबदारी चित्रपट आपल्यावर सोडत असल्याचा आभास असला, तरी ते तसं नाही.

पटकथा ही किती चातुर्याने प्रेक्षकाला  विशिष्ट निष्कर्षापर्यंत नेऊ शकते, याचं तलवार, हे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला तीन तपास दाखवताना, त्यातला कोणता ग्राह्य मानायचा, याबद्दल प्रेक्षकाला सोप्याआणि चटकन जाणवणार नाही अशा  रीतीने मार्गदर्शन केलं जातं. आपण कोणत्या व्यक्तीरेखांना, का विश्वासार्ह्य मानतो ? चित्रपटभाषेत सत्यासत्याचे, निवेदनशैलीचे कोणते संकेत प्रेक्षकाकरवी चटकन स्वीकारले जातात? पडद्यावर युक्तीवाद लढवताना तो कोणत्या बाजूला कसा झुकवावा, हे इथे छान साधलेलं आहे. मेधना गुलजारचा हा आजवरचा सर्वात चांगला चित्रपट आहे यात वादच नाही, पण तिचं श्रेय भारद्वाजच्या पटकथेबरोबर विभागलं गेलं पाहिजे.

तलवार आणि राशोमॉन या चित्रपटांच्या मांडणीत म्हणण्यासारखं साम्य नाही. राशोमॉनची मांडणी सोपी आणि निष्कर्ष कॉम्प्लेक्स आहे, तर तलवारची मांडणी गुंतागुंतीची आणि निष्कर्ष सोपा. किंबहुना चित्रपटात एका व्यक्तीरेखेने चित्रपटातल्या मूळ पोलिस तपासावर केलेला आरोप इथे विरुध्द बाजूने वापरण्याजोगा , तो म्हणजे चित्रपटाने निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवूनच युक्तीवाद रचला आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे केवळ फॉर्मॅट , किंवा ढाचा, हा दोन कलाकृतींच्या तुलनेसाठी पुरेसा नाही. चित्रकर्त्यांचा हेतू, हा यात  महत्वाची भूमिका बजावतो. एका घटनेकडे निरनिराळ्या शक्यता तपासत पुन्हा पुन्हा पहाणं या क्लुप्तीची अनेक पाश्चिमात्य चित्रपटांमधे उदाहरणं आहेत, अगदी टॉम टीकरच्या जर्मन ' रन लोला रन' पासून किस्लोवस्कीच्या पोलिश 'ब्लाईन्ड चान्स'पर्यंत. पण त्यामुळे हे सारे चित्रपट राशोमॉनची रुपं ठरत नाहीत कारण दर चित्रपट ज्या कारणासाठी बनला, ते कारण वेगळं होतं. निर्मितीमागला दिग्दर्शकाचा हेतू महत्वाचा असतो, जो यातल्या दर चित्रपटात वेगळा होता.

तलवारच्या राशोमॉनबरोबर सतत केल्या जाणाऱ्या तुलनेने एक गोष्ट दुर्लक्षित राहिली आहे आणि ती म्हणजे, याच वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला रहस्य, हा चित्रपट. रहस्यमधे तलवार सारखा निवाड्याचा प्रयत्न नव्हता, मात्र त्यांनी मॉडेल म्हणून वापरलेला गुन्हा हा उघडच नॉयडा डबल मर्डर केस हाच होता. दिग्दर्शक मनीष गुप्ताने कायदेशीर ससेमिरा टाळण्यासाठी काही युक्त्या केल्या होत्या. संपूर्ण प्रकरण देखील नॉयडातून मुंबईत हलवलं होतं, पण साम्य कळण्यासारखं होतं. तसं ते कळलं, चिकार गडबड झाली, तलवार कुटुंबाने विरोध केला. मग थोडे कोर्टकज्जे करुन मध्यममार्ग निघाला, आणि रहस्य प्रदर्शित झाला. मला गंमत वाटते ती अशी, की गुन्हा तोच असूनही, त्याच्या उलगड्याकरता रहस्य हा चित्रपट परिचित अॅगाथा क्रिस्टी वळणाची रचना वापरतो. अगदी सर्वाधिक संशयमुक्त व्यक्तीच अखेर गुन्हेगार ठरवण्यापर्यंत. साहजिकच, आपल्याकडे फार नसलेल्या रहस्पटांमधे  तो एक चांगली भर मानता येईल. तरीही चित्रपटांच्या तुलनेत मात्र तलवार हाच उजवा ठरतो. कल्पनेपेक्षा सत्यच वरचढ ठरतं ते असं.

मी मध्यंतरी तलवारच्या एका समीक्षेत वाचलं होतं की तलवारचं नाव तलवार हेच असलं, तरी या नावाचा, गुन्हा झाला त्या कुटुंबाच्या आडनावाशी काहीच संबंध नाही ( कारण चित्रपटात कुटुंबाचं नाव बदललेलं आहे) . हे काही मला पटत नाही. चित्रपटात तलवार या शब्दाला वेगळा अर्थ निश्चित आहे, जो अगदी थातुरमातुर आहे असंही नाही. चित्रपट यासाठी संदर्भ घेतो, तो डोळ्याला पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याचा ज्याच्या हातात तराजूबरोबरच एक तलवारही आहे.  ही तलवार म्हणजे तपासयंत्रणा, किंवा पोलिस खातं असा अर्थ अभिप्रेत आहे, आणि त्या दृष्टीकोनातून चित्रपट आजच्या परिस्थितीवर उत्तम भाष्यही करतो. मात्र याचा अर्थ तो मूळ कुटुंबाचं आडनाव बाजूला ठेवतो, असा नक्कीच नाही. याउलट मी म्हणेन की कितीही चपखल असला तरी तलवारीचा सिम्बॉलिक अर्थ हाच दुय्यम आहे, किंवा मुद्दाम जमवून आणलेला आहे. चित्रपटाला हे नाव यासाठीच आहे, की तो या प्रकरणात आजवर दुर्लक्षित राहिलेला तलवार कुटुंबाचा आवाज पहिल्या प्रथम प्रेक्षकांसमोर आणतो. त्यांनाही एक बाजू आहे हे आपल्या लक्षात आणून देतो. त्याना तो कोर्टात न्याय मिळवून देऊ शकणार नाही, पण जनमानसातली या कुटुंबाची प्रतिमा तो नक्कीच उजळ करु शकेल, निदान काही प्रमाणात. त्यांना दोषी ठरवणाऱ्या मिडीआ ट्रायल नंतर हे हॅपी एंडींग म्हणता येणार नाही, कारण या विदारक कथानकाला सुखांत असूच शकत नाही. पण निदान शंभर अपराधी मोकळे सुटले तरी एकाही निरपराध्याला न पकडण्याचा दावा करणाऱ्या या व्यवस्थेत ,निर्दोष असण्याची खूप शक्यता असलेल्या दोन व्यक्ती खितपत पडल्या असल्याची जाणीव तरी तो आपल्याला नक्कीच करुन देतो, आणि ते खूप महत्वाचं आहे.

- गणेश मतकरी

Read more...

शॉर्ट्स- माध्यम आणि चळवळ

>> Sunday, September 20, 2015



कलामाध्यम आणि रसिक यांच्यात अंतर असावं की नसावं हा मला पूर्वीपासून पडलेला प्रश्न आहे.
हे अंतर जर उरलं नाही तर काय होईल? कलेचं मूल्य वधारेल की खाली घसरेल? कलावंतांची संख्या वाढेल का तिला निव्वळ तात्पुरता फुगवटा येईल? हाताशी अालेलं माध्यम वापरुन रसिकानेच केलेला कलाविष्कार आणि प्रस्थापित कलावंताची कलाकृती , यांच्या दर्जातला फरक कोणत्या दृष्टीने पहाणं योग्य ठरेल?

थोड्याफार फरकानं हे साऱ्याच कलांबाबत खरं आहे, पण इथे मला पडलेला प्रश्न एका विशिष्ट कलेसंबंधातला आहे, आणि ती म्हणजे चित्रपटकला. खास आधुनिक मानली जाणारी, विज्ञानाचा आधार असूनही कला म्हणून परिपूर्ण असलेली, आणि इतर कलांच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या तुलनेत जेमतेम शंभरेक वर्षांचा इतिहास वागवणारी.

अगदी आताआतापर्यंत, चित्रपट हा कलाप्रकार त्याचा आस्वाद घेणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकापासून अमुक एका अंतरावर होता. नाट्य, वा चित्रकला, यांसारख्या क्षेत्रात मनात अालं तर कोणालाही काही करणं शक्य होत असे. म्हणजे अगदी व्यावसायिक पातळीवर जाऊन नव्हे, पण आपल्यापुरती चित्र काढून मित्रमंडळींची वाहवा मिळवणं, वा स्पर्धांसाठी , सांस्कृतिक संमेलनांसाठी नाटकं बसवणं हेही तसं नित्याचं होतं. चित्रपट हा मात्र घराघरात पोचूनही आपल्या अवाक्याच्या बाहेरचा मानला जात असे. त्यात काहीही करायचं तर लागणारं तांत्रिक ज्ञान, प्रचंड अर्थसहाय्य , आणि या माध्यमाला घेरुन राहिलेलं ग्लॅमर, या सगळ्यांमुळे असेल कदाचित, पण उद्योगाबाहेरच्या व्यक्तींना,    ' हे तर आपणही करु शकतो ' , असं वाटण्याची शक्यता फारच कमी होती. खासकरुन कॅजुअली वाटण्याची. ज्यांना ते फार प्रकर्षाने वाटायचं, ते तर नशीब आजवायला निघायचेच, पण ते आयुष्य पणाला लावण्याच्या तयारीने. गंमत म्हणून कोणी यात शिरलं नाही.

हॅन्डीकॅम्स आले तेव्हा हे चित्र फार मोठ्या प्रमाणात बदललं नाही हे वरवर आश्चर्याचं असलं, तरी त्याला एक महत्वाचं तांत्रिक कारण आहे. हॅन्डीकॅम्सनी कॅमेरा ही चीज घराघरात पोचवली हे खरंय, एक प्रकारे चित्रपटाच्या परिभाषेचीही प्रत्यक्ष ट्रेनिंगशिवाय, कॉमन सेन्सच्या पातळीवर त्याने अनेकांशी ओळख करुन दिली. पण त्याला फिल्ममेकिंगचं साधन म्हणून वापरण्याचे प्रयत्न एका मर्यादेपलीकडे गेले नाहीत. त्यांमधून नव्या प्रयोगांची लाट वगैरे सुरु झाली नाही. याला कारण म्हणजे त्याची तांत्रिक मर्यादा. हॅन्डीकॅमवर काहीही करुन पाहिलं तरी त्याचा दर्जा हा फिल्मसारखा नव्हता. त्यामुळे रफ वर्क साठी हॅन्डीकॅम वापरला तरी तेव्हा ऑनलाईन रिलीज हा प्रकारही नसल्याने , प्रेक्षकांपर्यंत पोचायचं तर अमुक एक तांत्रिक दर्जा गाठणं आवश्यक होतं, आणि तो गाठायचा, तर तांत्रिक सफाईपासून खर्चापर्यंत , सारीच तयारी हवी. आणि ती कुठली सगळ्याना परवडायला ! त्यामुळे हॅन्डीकॅमचा वापरही बहुधा घरगुती क्षण आणि समारंभ टिपण्यासाठीच व्हायला लागला. आज मात्र हे चित्र बदललंय आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या माध्यमाकडे वळलाय. मला यामागे दोन कारणं दिसतात.

पहिलं कारण हे, की प्रत्येकाच्या हातात खेळणारा स्मार्टफोन. व्हिजुअल लँग्वेजची जशी ओळख या फोन्सनी करुन दिली तशी हॅन्डीकॅम्सनी कधीच दिली नव्हती. सहज रेकॉर्ड करणं शक्य होणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स, फोटोग्राफी/सेल्फीची क्रेझ,इन्स्टाग्रामसारखी फोटोज सुधारण्याच्या सोप्या युक्त्या सांगणारी सॉफ्टवेअर्स, संकलनाची सोपी अॅप्स, यू ट्यूब / व्हिमिओ सारख्या साईट्सवरुन पहायला मिळणारी अनेकांची भली-बुरी कामं,  या सगळ्यांमधून प्रत्येकालाच हे माध्यम जवळचं वाटायला लागलं. बीएमएम सारख्या कोर्सेसमधून, या विषयावरची पुस्तकं वाचून - वेबसाईट्स पालथ्या घालून , चित्रपट रसास्वादाच्या शिबिरातून या मंडळींना काही मूलभूत पॉइन्टर्सही मिळत गेले, त्याचा त्यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे वापरही केला.  त्यांनी  केलेल्या या कामाला सोशल मिडिआमधे प्रेक्षकवर्गही उपलब्ध झाला आणि कोणताही गंभीर विचार न करता, अनेकांचा हा शॉर्ट फिल्म निर्मितीकडे जाणारा सहजप्रवास सुरु झाला.

या साऱ्याला खतपाणी घालणारं ठरलं डिजिटल माध्यम, ज्याला मी शॉर्ट फिल्म क्रेझ फोफावण्यामागचं दुसरं कारण म्हणेन. फोन्सवर शूट करत करत हात बसलेले अनेक जण जेव्हा त्यापलीकडे जाऊन, अधिक फॉर्मल पध्दतीने आपला प्रयत्न चित्रित करायचं ठरवतात, तेव्हा त्यांना दिसतं की डिजीटल तंत्राने आपलं काम तुलनेने सोपं करुन ठेवलय. प्रामुख्याने, त्यातला तांत्रिक पसारा कमी करुन. कॅमेरांचा आकार, रेकॉर्डींगची सोय, लायटींग कमीत कमी वेळात आणि इक्वीपमेन्ट मधे जमवणं, हे सगळच आज चित्रीकरणाच्या सोयीनुसार कमीत कमी वेळात, छोट्या क्रूमधे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परवडण्यासारख्या खर्चात करता येतं. आज अनेक जणांकडे स्वत:कडेही चित्रपटही चित्रीत करता येईल अशा दर्जाचे कॅमेरे असतात, उत्तम दर्जाच्या कम्प्यूटर्स वर लोड केलेली संकलनाची अधिकृत वा अनधिकृत सॉफ्टवेअर्स असतात. तांत्रिक बाजू स्वत: उचलायची नसेल तरीही पर्याय आहे.  पूर्वी मोजक्या असणाऱ्या तंत्रशिक्षण संस्था आज मुबलक स्वरुपात आहेत. बनवणाऱ्याच्या डोळ्यासमोर त्याला काय हवं, याचं अचूक चित्र असेल, तर अशा संस्थांमधून बाहेर पडलेले तरुण तंत्रज्ञही मदतीचा हात देऊ शकतात. या सगळ्यामुळे शॉर्टफिल्म्स बनवणं हे एका परीने सोपं झालय असं म्हणायला हरकत नाही.

मात्र या सगळ्यामधे एका महत्वाच्या गोष्टीचा विचार व्हायला हवा जो क्वचितच होताना दिसतो. पूर्वी, माध्यम परवडण्याबाहेरचं असल्याने त्याला हात घालणारा प्रत्येक जण दहा वेळा विचार करायचा. आपल्याला जे मांडायचय त्याला हे माध्यमच योग्य आहे ना याविषयी, तसंच आपण ते ज्या पध्दतीने मांडतो आहोत त्याविषयीही. ते मांडताना, संहितेच्या रचनेपासून ते छायाचित्रणाच्या, संकलनाच्या शक्यतांबाबत पुरेसं काम केलं जाई. आज झालेल्या माध्यमाच्या  लोकशाहीकरणाने, तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेला, आणि काही करुन पहाण्याच्या हौसेला सर्वाधिक महत्व आलय. प्रत्यक्ष कामामागे जो दर्जाचा विचार हवा तो क्वचित दिसतो. एक फिल्म फसली तर दुसरी करु, त्यात काय विशेष, या प्रकारचा दृष्टीकोन आज वाढीला लागलाय. जो या माध्यमाच्या सकारात्मक उपयोगासाठी मारक आहे.

मध्यंतरी आम्ही काही जणांनी मिळून एक 'शॉट' नावाची शॉर्ट फिल्म केली. प्रामुख्याने एक्जरसाईज म्हणून केली असली, तरी ती चांगली रिसीव्ह झाली आणि देशात, देशाबाहेरच्या अनेक चित्रपटमहोत्सवांमधेही दाखवली गेली. एक दिवस चित्रीकरण, दोन तीन दिवस संकलन असं सोपं गणित करताना आम्ही ठरवलं की मुळात सर्वच बाजू तंत्रशुध्द ठेवायच्या , कलावंत ( मुक्ता बर्वे , सुप्रिया विनोद), तंत्रज्ञ ( अमोल गोळे कॅमेरा , सागर वंजारी संकलन) हे कामाची उत्तम जाण असणारे घ्यायचे, पण सर्वाधिक महत्व हे केंद्रस्थानी असणाऱ्या विचारालाच द्यायचं. तंत्रज्ञान कुठे कमी पडणार नाही, पण डोईजड ही होणार नाही हे पहायचं . या दृष्टीकोनाचा फिल्मला फायदा झाला.

ज्यांना दृश्यमाध्यमात काही करुन पहायचय त्यांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की तंत्र, तंत्रज्ञान आणि विचार या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यातली कोणतीही एक दुसरीची जागा घेऊ शकत नाही. त्यातही सर्वात वरचं स्थान हवं ते विचाराला, ज्यापासून हा प्रवास सुरु व्हायला हवा. काय सांगायचय याला सर्वाधिक महत्व हवं, कसं सांगायचं हा त्यानंतरचा प्रश्न. केवळ सांगण्याची सोय असल्याने थातूर मातूर काहीही सांगायला जाणं हे मिळालेली संधी वाया दवडण्यासारखच आहे. याउलट,या विचारांचं स्थान जर आपण लक्षात घेऊ शकलो, तर या सुट्या प्रयत्नांना एका महत्वाच्या चळवळीचं स्वरुप आल्याशिवाय रहाणार नाही.
- ganesh matkari
( me marathi live madhun. )

Read more...

हायवे- एक सेल्फी आरपार अर्थात कुलकर्ण्यांचा मास्टरस्ट्रोक

>> Friday, August 28, 2015


उमेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि गिरीश कुलकर्णी लिखित 'हायवे- एक सेल्फी आरपार' पाहून आम्ही नुकतेच बाहेर आलो होतो. खूपशी शांतता होती. मग एकजण म्हणालं, ते फिल्ममधले लोक किती वाजता निघाले असतील पुण्याला जायला? मग दुसरं कोणीतरी म्हणालं, साडेतीन चार असतील. त्यात गिरीश कुलकर्णी म्हणत नाही का, मी आठपर्यंत पोचणार नाही बहुतेक असं? तिसरा म्हणाला, मला तर वाटलं की सुरुवातीला सकाळ आहे. पण मग पुण्याला जायला एवढा वेळ,.... आणि चारला निघालं तरी आठला का नाही पोचणार, हल्ली अडीच तासच- अशा रितीने मग ती चर्चा गेली ती मुंबई पुणे प्रवास, नवा जुना हायवे, वेळा, ट्रॅफिक जॅम्स, अशा त्यामानाने माहितीच्या आणि आमच्यातल्या प्रत्येकाला काही ना काही बोलता येईल अशा विषयांवर. ज्यांना खरच चित्रपटाविषयी बोलायचं होतं, त्यातल्या थीम्स, सबटेक्स्ट, लेअर्स, भा रा तांबेंच्या घन तमी शुक्र चा वापर , गर्दीत दरेक नट लक्षात राहिलसं पहाण्याची किमया याबद्दल काही सांगायचं होतं, ते गप्पच राहीले. नव्या वळणावरली चर्चा भलत्याच ठिकाणी वळली. असो. इथे मात्र तसं होणार नाही, हा हे स्वगत असल्याचा फायदा.

जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक  आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं. आपल्या नेहमीच्या चित्रपटात पोचण्याचं ठिकाण , हे प्रवासापेक्षा नेहमीच अधिक महत्वाचं असतं. मधले टप्पे भराभर घेत प्रेक्षकाला एकदा घाईने त्याच्या आवडत्या सुखांताकडे पोचवणं, हे बहुतेक चित्रपटांना आवश्यक वाटतं. प्रवासाने कथाभागाचा अधिक वेळ घेतला, तरी तो दुय्यमच रहातो. त्याला डेस्टीनेशनचं वजन येत नाही. हायवे- एक सेल्फी आरपार मधे तसं होत नाही.

प्रवास हे जीवन, आयुष्य, असं धरलं, तर ट्रॅफिक जॅम, हे सहज सापडणारं दुसरं प्रतीक. त्या प्रवासाला खीळ घालणाऱ्या कोणत्याही गोष्टीला अनुसरुन वापरता येण्यासारखं. मग ती गोष्ट कोणत्याही प्रकारची असेल, व्यक्तीगत जीवनातली निराशा, प्रेमभंग, व्यावसायिक अपयश, वैचारिक पेच, डिप्रेशन, अनेक गोष्टी. हे प्रतिक जागतिक चित्रपटांमधे अनेकदा वापरलं गेलंय. ८ -१/२ पासून फॉलिंग डाउन पर्यंत अनेक चित्रपटात त्याचा वापर झालाय. पण ही निराशा हे आतल्याआत कुढत रहाणं, हे सारं संपणार कसं? हे क्वचितच कोणी सांगतं. बांध फुटून प्रवाह पुन्हा सुरु होणार कसा ? हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच कधीना कधी पडणारा, पण त्याचं उत्तर कुठेतरी निसटून गेलेलं. त्यातही प्रश्न अतिशय पर्सनलाईज्ड, प्रत्येकाच्या वृत्ती, व्यवसाय , पार्श्वभूमीनुसार बदलणारा, त्यामुळे हायवेदेखील त्याचं उत्तर देईल ही अपेक्षाही चूक. मात्र तो ते उत्तर कुठे दडलेलं असू शकतं याकडे निर्देश करतो ही गोष्ट खरी.

मला विचाराल तर हायवे सारख्या चित्रपटात , ज्याचा मूळ आशय तत्वचिंतनात्मक वळणाचा आहे आणि जो सोपे परिचित टप्पे घेत नाही, रिअल वर्ल्ड तपशील हा दुय्यम आहे. म्हणजे पुण्याला पोचायला साडेतीन तास लागतात का पावणेचार हे इथे दुय्यम आहे, किंवा त्याहूनही कमी महत्वाचं. समजा हा एखादा रहस्यपट असता, तर कदाचित मिनिटा मिनिटाचा हिशेब महत्वाचा ठरता, पण तशी इथे गरज नाही. महत्व एवढ्यालाच आहे की यातली सारी मंडळी अदमासे एकाच वेळी मुंबईहून पुण्याकडे जायला निघालीयत. आता मंडळी तरी किती ? तर सारी नावं एका समीक्षणात नं मावण्याइतकी. यात एक एनाराय ( गिरीश कुलकर्णी)  आहे जो पुण्यात आपल्या वडिलांना ठेवलेल्या हॉस्पिटलमधे चाललाय. त्याच्या गाडीत पोलिसांनी जबरदस्तीने बसवून दिलेलं एक मध्यमवयीन जोडपं आहे. यातल्या पतीचा ( विद्याधर जोशी) पाय जायबंदी झालाय अन तो छोट्याछोट्या गोष्टींसाठी कटकट करतोय. पत्नी ( रेणुका शहाणे) मात्र आनंदाने ही कटकट सहन करतेय.  जुनाट विचारांच्या गरोदर पत्नीवर ( वृषाली कुलकर्णी)  वैतागलेला कॉर्पोरेट एक्झिक्युटीव ( सुनील बर्वे) नोकरीच्या शिड्या चढताना आपलं वैयक्तिक आयुष्यच विसरुन गेलाय. राजकारण्यांच्या फन्ड रेझरमधे सहभागी व्हायला चाललेली टिव्ही तारका ( हुमा कुरेशी) आपल्या व्यवसायात तर यशस्वी आहे, पण पर्सनल लाईफमधे मोठ्या अडचणीत. वेश्याव्यवसायातल्या एका युवतीला ( मुक्ता बर्वे) आपला भूतकाळ सोडून बाहेर पडायचय, तर उच्चभ्रू वर्गातली एक श्रीमती ( टिस्का चोप्रा ) आपल्या एकटेपणालाच नव्या मार्गांनी सजवण्याचा प्रयत्न करतेय. यांच्याबरोबरीने काही इतरही महत्वाचे ट्रॅक्स आहेत, त्या दर कथासूत्रात एकाहून अधिक व्यक्ती आहेत, चित्रपट या साऱ्यांवर नजर ठेवून आहे. तो यातल्या बहुतेक सर्वांना  काही ना काही करायला देतो. त्यांची सर्व माहीती आपल्याला मिळत नाही आणि ती मिळण्याची गरजही नाही. आपल्याला त्यांचं ओझरतं दिसणारं चित्रही गरजेपुरत्या तपशीलात असणं हेच महत्वाचं आहे, ते मात्र दिसतं.

मध्यंतरापूर्वीचा भाग, हायवे केवळ व्यक्तिरेखांना फ्लेश आऊट करण्यात घालवतो. त्या इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याने तसं करावं लागणं हे आवश्यकही आहे. तरीही दर ट्रॅकच्या वाट्याला जो मोजका वेळ येतो त्यात तो हे कसा करु शकतो हे अभ्यास करण्यासारखं आहे. कधी कोणाचा एखादा फोन कॉल, एखादा रिमार्क, मॅनेरिझम, बोलण्यातले संदर्भ, अशा अनेक गोष्टी यात उपयुक्त ठरतात. आता साहजिक पडण्यासारखा एक प्रश्न म्हणजे इतके अधिक लोक दाखवायची काय गरज होती? दोन चार मुख्य पात्रांमधे प्रातिनिधिक पध्दतीने हे दाखवता आलं नसतं का? का नाही, नक्कीच आलं असतं, पण संख्या इथे महत्वाची आहे. अनेक पात्र, त्यांची पार्श्वभूमी , संवादाची ढब या सगळ्यातून आपल्याला समाजाचा जो छेद दिसतो, तो प्रातिनिधिक स्वरुपात प्रभावी ठरला नसता. सर्वांच्या आयुष्यात आलेलं साचलेपण दिसलं नसतं. पहिला भाग हा प्रामुख्याने या ओळख परेडीवरच खर्च होतो, ही इन्टरेस्टींग नक्कीच वाटते, आणि हेही लक्षात येतं की यांचा प्रवास हा केवळ त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे घेऊन चाललाय खरा , पण प्रत्यक्षात यातला प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाने आखून दिलेल्या पिंजऱ्यात अडकलेला आहे . त्यांचं पुढे जाणं हे नावापुरतं आहे कारण जोपर्यंत आपल्या बरोबर वागवत असलेल्या पिंजऱ्यातून त्यांची सुटका होत नाही, तोवर तो जैसे थेच रहाणार.

एका गाडीत छोट्या डब्यात ठेवलेला मासा, तर दुसऱ्या गाडीतला पक्ष्यांचा पिंजरा या अर्थाला पुरक आहेत. या दोन्ही प्रकारच्या पिंजऱ्यातला फरक असा, की माशासाठी भोवताली पाणी असणं हे  नैसर्गिकच आहे. त्याचा तिथला वावर हा अपरिहार्य, काहीसा स्वखुषीनेच असल्यासारखा आहे, कारण तिथून सुटका, हा मृत्यूच. पक्षांसाठी मात्र सुटका ही स्वातंत्र्य ठरु शकते. त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात डांबणं हे क्रौर्याचं लक्षण आहे. ( हा विचार अधिक पुढे न्यायचा, तर मासा बरोबर घेणारी बाई गरोदर असणं आणि पिंजरा असणाऱ्या व्यक्तीची बॅकस्टोरी , या गोष्टी अधिक विचार करण्यासारख्या  ठराव्यात)  या दोन दृष्टीकोनांमधून आपण जर सगळ्याच व्यक्तीरेखांना पाहिलं, तर आपल्याला त्यांची आणि चित्रपटाची जातकुळी अधिक स्वच्छपणे लक्षात येईल. चित्रपटाच्या अखेरीस दुसऱ्याच एका  पिंजऱ्यातल्या प्रत्यक्ष सुटकेचं एक उदाहरण आहे. त्याकडेही  वास्तव नियम न लावता, या प्रतिकात्मकतेचं एक्स्टेन्शन लावून पहाणं अधिक योग्य.

चित्रपटाचं जेव्हा मध्यंतर झालं, तेव्हा या साऱ्यांचा प्रवास सुरुच होता. मला लक्षात येईना की पुढे काय होणार. म्हणजे या सर्वांच्या गोष्टी कळल्या, प्रश्नही कळले , पण पुढे काय? म्हणजे असच दाखवत रहायचं, तर आणखी कितीही दाखवता आलं असतं. पण त्याला पुढे मुद्दा काय? शेवटाचं काय? जेव्हा चित्रपटात स्वतंत्र कथानकं असतात तेव्हा ती शेवटी एकत्र येणं अपेक्षित असतं. प्रत्यक्ष वा थिमॅटीकली. इथे इतक्या जणांचं एकत्र येणं फारच मोठा योगायोग ठरता. पण मग काय होणार? असे बरेच प्रश्न मला पडायला लागले. मात्र या साऱ्याची उत्तरं मला दुसऱ्या भागात , अतिशय समाधानकारक पंध्दतीने मिळाली.

दुसऱ्या भागाचा बराचसा भाग हा एक मोठा ट्रॅफिक जॅम आहे. पण तिथे पोचायच्या आधीच, फुड मॉलच्या प्रसंगापासूनच मला उत्तरं मिळायला लागली. यानंतर मी खरा या सिनेमात, या व्यक्तीरेखात अडकत गेलो. मी ज्याप्रमाणे मिररमधल्या रिव्ह्यूतून या प्रसंगाबद्दल खूप माहीती दिलेली नाही, तशीच इथेही ती देणार नाही. काही गोष्टी मात्र सांगेन. या चित्रपटाला ग्रॅंड कन्क्लूजन असावं, ज्यात सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचा सिनेमा पहाताय, आणि तो पहात असल्याचं पहिला भाग संपूनही तुमच्या लक्षात आलेलं नाही. यातल्या कोणाचेच प्रश्न म्हंटलं तर सुटत नाहीत, किंवा म्हंटलं तर सर्वांचेच सुटतात. या भागात बऱ्याच जणांच्या आयुष्याची कोंडी फुटते, काहींना नवा मार्ग दिसतो, काहींना आपल्या प्रश्नांकडेच नव्याने पहाण्याची नजर मिळते. हा सगळा भाग पटकथेच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीचा आहे, आणि इतके कलावंत घेऊन या प्रकारचा सीक्वेन्स चित्रित करणं, हे अतिशय कठीण आहे. इथे गरजेचं आहे, ते चित्रपट पहाणाऱ्यांनी रेस्टलेस न होणं. चित्रपट पुढे सरकायचा, तर प्रत्यक्ष घटना पुढे सरकण्याची गरज नसते, तर आशय पुढे सरकणं हे बास असतं. तुम्ही जे पहाताय, त्यात तो पुढे सरकतोय का? आपल्या प्रेक्षकाना जी गोष्ट शिकण्याची गरज आहे ती ही, की प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, आणि आपल्याला परिचित रचनेपलीकडे इतर रचना असू शकतात. मुंबईचे लोक पुण्याला पोचल्यावर काय करतात हे महत्वाचं नाही , महत्वाचा आहे तो स्थित्यंतराचा काळ. हे स्थित्यंतर प्रत्यक्ष स्थलांतर असण्याची गरज नसते. ते मानसिकही असू शकतं. वैचारिकही. हे स्थित्यंतर अधोरेखित करणारी भा रा तांबेंची 'घन तमी शुक्र ' ही कविता हा एका अर्थी चित्रपटाचा हाय पॉइन्ट मानता येईल. आणि क्लायमॅक्सदेखील.

उमेश कुलकर्णीने याआधी डिजिटल माध्यम वापरलेलं नाही, पण या स्क्रिप्टला ते वापरण्यावाचून पर्यायही नव्हता. विविध आकाराच्या चालत्या गाड्या, गर्दीचा फूड मॉल आणि ट्रॅफिक जॅमने चोंदलेल्या रस्त्यावर, थांबलेल्या गाड्यांमधून वाट काढणारी माणसं टिपायला सेल्युलॉइड कॅमेराचा पसारा टाळणे अत्यावश्यकच होतं. या माध्यमाशिवाय ही फिल्म झालीच नसती, असही आपल्याला म्हणता येइल. याशिवाय खास उल्लेख करायला हवा तो मंगेश धाकडे यांच्या पार्श्वसंगीताचा. साउंड डिझाईन आणि इतर तांत्रिक बाबीत उमेश कुलकर्णीचे चित्रपट चांगलेच असतात. हायवे त्याला अपवाद नाही.

उमेश आणि गिरीश कुलकर्णीचे चार चित्रपट पाहिले तर त्यातले दोन बाहेर पहाणारे आहेत तर दोन आत, असं आपल्या लक्षात येईल. वळू आणि देऊळ हे समाजाच्या बाह्यांगावर टिका करणारे आहेत, तर विहिर आणि हायवे हे आपल्या अधिक मुलभूत जाणिवांकडे पहाणारे, फिलॉसॉफीकल वळणाचे चित्रपट आहेत. या दोन्ही जातीच्या  चित्रपटांमधे खोऱ्यानी कलावंत, प्रचंड तपशील, तंत्राची उत्तम जाण, अशा सगळ्या गोष्टी कायम असल्या तरी मुळात मला त्यांच्या दृष्टीकोनांमधेच फरक वाटतो. व्यक्तीश: विचारलं तर मला हे इन्ट्रोवर्ट चित्रपट अधिक आवडतात, असं मी म्हणेन. आणि पुन्हा मत बदलण्याची शक्यता नोंदवून असंही म्हणेन, की हायवे - एक सेल्फी आरपार हा या जोडीचा मला आजवर सर्वाधिक आवडलेला चित्रपट आहे.

नोंद- हा चित्रपट पाहून मला आठवलेले दोन संदर्भ मी माझ्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत. पहिला आहे तो विंदा करंदीकरांची यंत्रशिल्पे ही विरुपिका, आणि दुसरा REM चं Everybody Hurts, हे गाणं. या संदर्भांचा चित्रपटाशी तसा संबंध नसला तरी व्यक्त होणाऱ्या भावना आणि टेक्श्चर या बाबतीत ते नक्कीच पहाण्यासारखे आहेत. ते पाहून चित्रपट समजून घ्यायला नक्कीच अधिक मदत होईल.
- ganesh matkari

Read more...

मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम

>> Sunday, April 26, 2015


काही दिवसांपूर्वी आपले सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे, यांनी मराठी चित्रपटाला 'प्राईम टाईम ' उर्फ 'संध्याकाळी सहा ते नऊ ' या वेळात दाखवण्याची घोषणा केलेली एेकली आणि बरं वाटलं. का विचाराल ? तर सांगतो.
मराठी चित्रपट हा गेली दहाएक वर्ष मोठ्या स्थित्यंतरातून गेलेला आहे , जातो आहे. शतकाच्या सुरुवातीला कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या मराठी सिनेमाने संदीप सावंतच्या 'श्वास' चित्रपटासाठी राष्ट्रीय पारितोषिकातला सर्वोच्च सन्मान पटकवला आणि मराठी चित्रपटात एक नवी लाट आली. त्याचं पुनरुज्जीवन झालं. अनेक नवे निर्माते या चित्रपटांत येण्यासाठी पुढे सरसावले आणि विशेष लक्षवेधी ठरलेल्या तरुण आणि काही जाणत्या ज्येष्ठ चित्रकर्मींच्या सहाय्याने आपल्या चित्रपटाचं रुप पालटलं. आता या साऱ्याची सुरुवात होऊन दशक उलटलं तरीही चांगली कामगिरी बजावणाऱ्या मराठी चित्रकर्मींच्या अनुभवाला येणारी असुरक्षितता कमी होत नाही.  आज चांगले चित्रपट येण्याची संख्या आश्वासक असली, तरी त्यांना हवं ते यश मिळेलच, याची खात्री देता येत नाही. असं का होत असावं याचा विचार केला तर विविध कारणं पुढे येतात.
पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मराठी चित्रपटाची बॉलिवुड बरोबर स्पर्धा. या देशातला सर्वात उथळ, श्रीमंत आणि करमणुकीला इतर कशाहूनही अधिक महत्व देणारा चित्रपट महाराष्ट्राच्या राजधानीत, अन उर्वरीत महाराष्ट्रातही, उत्तम प्रकारे चालतो. त्याची शक्ती आणि आकर्षण हे मराठी चित्रपटाच्या कितीतरी पटीने अधिक आहे. त्याला प्रेक्षकवर्ग मोठा आहे. गंमतीची गोष्ट ही, की या मोठ्या प्रेक्षकवर्गात मराठी प्रेक्षकदेखील आहेच. मराठी येणाऱ्या जवळपास प्रत्येकाला हिंदी उत्तम येतं, शिवाय त्या जोडीला स्टार्स ना पहाण्याची संधी, देशभरात आणि विदेशातही मार्केट असल्याने मोठी, खर्चिक आणि मराठीशी तुलना करण्यातही मुद्दा नसलेली श्रीमंती निर्मितीमूल्य, असा थाट असल्यावर ते पहाण्याची इच्छा असणाऱ्या या प्रेक्षकाला तरी दोष का द्यावा? आपल्या समाजाला पारंपारिक शिकवण आहे की चित्रपट हा कला म्हणून वा आशयासाठी पहाणं फिजूल आहे, तो पहावा तर केवळ करमणूक म्हणून . त्यामुळे ही शिकवण शिरोधार्य मानणारा प्रत्येक माणूस या हिंदी चित्रपटांना हजेरी लावतो.
मराठी चित्रपट हे जाणतात, की शक्य तितकी उत्तम निर्मिती केली तरी त्यालाही एक मर्यादा आहे. अर्थकारणाच्या फ्रन्टवर मराठी आणि हिंदी या दोन व्यवसायांचा अवाकाच संपूर्ण वेगळा आहे. त्यामुळे मराठीला बलस्थानं निवडायची तर ती हिंदीपेक्षा वेगळी निवडणं आवश्यक आहे.  यावर मराठी चित्रपटाने काढलेला उपाय हा की विषयाचं वैविध्य, आशयाचं चांगलं सादरीकरण आणि चांगले अभिनेते, यांना पुढे करायचं. या पध्दतीने जे चित्रपट बनतात त्यांची श्रीमंती ही बॉलिवुडपेक्षा वेगळ्या परिमाणाने तपासावी लागते.  दुर्दैवाने, हे चित्रपट चांगले बनले तरीही त्यातल्या काहींनाच प्रेक्षकांपर्यंत नीट पोचता येतं.
प्रेक्षकांची अनास्था हे यातलं एक सहज दिसणारं कारण. मराठी प्रेक्षकाला हे दिसतं की आज मराठी चित्रपटाचा काही एक वेगळा प्रयत्न चालला आहे. तो या चित्रपटाचं कौतुकही वेळोवेळी करतो, मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद देत नाही. तो प्रतिसाद तेव्हाच देतो जेव्हा काही चित्रपट हे कल्पक मार्केटिंगमुळे त्याला जागोजागी दिसायला लागतात, किंवा जेव्हा एखादा चॅनल विशिष्ट चित्रपटाची जबाबदारी उचलून त्याच्या डोक्यावर ट्रेलर्सचा भडीमार करतो  . यापलीकडे त्याला अमुक चित्रपट समीक्षकांनी नावाजलाय, तमुक चित्रपटाला पुरस्कार मिळालेत, अमक्याचं महोत्सवांमधून कौतुक झालय हे माहीत असलं, तरी हे चित्रपट लागले असता, तो आऊट ऑफ द वे जाऊन ते पहातोच असं नाही, बहुधा नाहीच पहात. मल्टीप्लेक्सेसचा हे चित्रपट लावण्यातला निरुत्साह दिसतो, तो यातूनच तयार झालेला . समजा असं असतं, की मराठी चित्रपट कौतुक झालेला वा सन्मानप्राप्त असल्याचं कळताच चित्रपटगृहांबाहेर रांगा लागायला लागल्या असत्या, तर मल्टीप्लेक्सेसनी या चित्रपटांना जागा देताना मुळातच नाकं मुरडली असती का?

प्रेक्षक कमी म्हंटल्यावर, नफ्यापुढे सारं झूठ मानणाऱ्या मल्टीप्लेक्सेसनी या चित्रपटांना चमत्कारिक वेळा देणं हे ओघानच आलं. त्यांनी कलेची कदर का करावी, तो त्यांचा व्यवसायच आहे, वगैरे युक्तीवादही आले. पण या वेळांपासून खरोखर होणारा तोटा हा, की ज्या सूज्ञ प्रेक्षकाला खरोखर हे चित्रपट पहाण्याची इच्छा आहे, ते पोटापाण्याच्या उद्योगात गुंतले असल्याने त्यांनाही तो पाहाता येत नाही.  सरकारचा चित्रपटांना संध्याकाळची वेळ देण्याचा निर्णय महत्वाचा होता तो एवढ्यासाठीच, की संध्याकाळी शो लागण्याची सक्ती झाली तर नफा सोडा, पण चांगल्या प्रेक्षकापर्यंत, ज्यांची खरोखर हा सिनेमा पहाण्याची इच्छा आहे त्या प्रेक्षकापर्यंत पोचल्याचं समाधान तरी चित्रकर्त्याला मिळालं असतं.

पण सरकारी घोषणा झाली मात्र, महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला उपऱ्या करणाऱ्या बॉलिवुडचा विरोध सुरु झाला. त्याबरोबरच व्यक्तीगत नफ्यापासून ते लोकशाहीपर्यंत आणि बीफ बॅनपासून आविष्कारस्वातंत्र्यापर्यंत सर्वांचा दाखला देणाऱ्या सर्वभाषिक बुध्दीजीवी वर्गानेही आपली कंबर कसली आणि वर्तमानपत्रांपासून सोशल मिडिआपर्यंत सर्वत्र वाद सुरु झाले. काहींनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केले, तर काहिंनी टवाळी करायला सुरुवात केली.  खरं तर यात वाद घालण्यासारखं काय होतं? हा निर्णय काही त्या विशिष्ट वेळी सर्व सिनेमाघरांमधल्या सर्व पडद्यांवर केवळ मराठी चित्रपट दाखवायचे , असा नव्हता, तर दर मल्टीप्लेक्समधे निदान एका पडद्यावर मराठी चित्रपट दाखवायचा असा होता. ६ ते ९ ही वेळही तशी रँडमच. सिंगल स्क्रीनच्या काळातली. आजकाल कुठे असे तीनच्या पाढ्यात शोज असतात ? त्यामुळे मी म्हणेन , की या  घोषणेत तपशील ठरलेला दिसत नव्हता, पण इन्टेन्शन दिसायला जागा होती.  आता मराठी भाषिक राज्यात, देशभरात प्रभाव सिध्द केलेल्या मराठी चित्रपटाला साधारण दहा पंधरा टक्के वेळाचं आरक्षण ठेवणं, यात एवढं धक्कादायक किंवा अन्यायकारक काय आहे?

आज चांगला मराठी चित्रपट हा दोन प्रकारचा आहे असं आज आपल्याला दिसतं. एक प्रकार हा चांगली रंजनमूल्य असणारा, प्रेक्षकप्रिय ठरण्याची शक्यता असणारा आहे , जो काही प्रमाणात कॅलक्युलेटिव असला तरी चांगल्या अर्थाने आहे. त्याला प्रेक्षकाला काय हवं ते माहित आहे, आणि ते देण्याचा प्रयत्न तो प्रामाणिकपणे करतो. त्याचा मार्केटिंगचा विचारही काही प्रमाणात झालेला असतो. त्यांचे विषय तसे 'सेफ' वर्गात मोडण्यासारखे असल्याने त्यांना वितरक मिळण्याची शक्यताही अधिक असते. रवी जाधव, संजय जाधव , आदित्य सरपोतदार , सतीश राजवाडे, अशा काही दिग्दर्शकांची नावं या वर्गात घेता येतील. उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यासारख्या आधी समांतर घाटाचे चित्रपट बनवणाऱ्यांची व्यावसायिक दृष्टीही आता दिसायला लागली आहे.  यांच्या चित्रपटांचा विशेष हा, की काही प्रमाणात बेतलेले असूनही, त्यांचे विषय वा चित्रपट बॉलिवुडइतके फॉर्म्युलाच्या आहारी जात नाहीत. या मंडळींच्या चित्रपटांना, या तथाकथित प्राईम टाईमचा फायदा निश्चित झाला असता, पण त्यांना त्यांची खूप गरज होती , आहे असं मात्र नाही. या चित्रपटांकडे, दिग्दर्शकांकडे वितरकांचं मल्टीप्लेक्सवाल्यांचं लक्ष आहे आणि त्यांना प्रेक्षक आहे हे ते जाणून आहेत. आज त्यांना चित्रपटगृह मिळायला अडचणही फार मोठी नाही.

सरकारी निर्णयाचा खरा फायदा होऊ शकला असता, तो समांतर वळणाचे , पर्सनल गोष्टी सांगणारे , छोटेखानी पण कौतुक होणारे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांना. असे मराठी दिग्दर्शक प्रचंड प्रमाणात आहेत, आणि दरमहा त्यात नव्या नावांची भर पडतेय.  सतीश मनवर, शिवाजी लोटन पाटील पासून नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणे पर्यंत अनेक नावं या यादीत घेता येतील. या दिग्दर्शकांच्या  चित्रपटांमधे प्रेक्षकाला गुंतवण्याची ताकद निश्चित आहे, पण पारंपारिक मनोरंजनाच्या व्याख्येत ते बसतातच असं नाही. आता यातल्या एखाद्याला ( उदाहरणार्थ मंजुळेचा फँड्री) जबरदस्त वितरक आणि मार्केटींग स्ट्रॅटेजिस्ट लाभला, तर तो प्रेक्षकाना चित्रपटगृहाकडे वळवू शकतो, पण ते बरेचदा होत नाही. या चित्रपटांचा प्रेक्षक हा त्यांच्याविषयी एेकलेला, दोन घटका करमणुकीपलीकडे पहाणारा असतो. बहुधा तरुण, नोकरदार वर्गातला. चित्रपटांची समज येण्याच्या वयातला, आणि आपली मतं बनवू पहाणारा, विचार करणारा. मात्र तो चित्रपट काय वेळी पाहू शकतो हे त्याच्या कामाच्या गणितावर ठरतं. संध्याकाळी चित्रपट लागणं हे जर होऊ शकलं , तर या प्रेक्षकाला, आणि अर्थात चित्रपटाला ते कदाचित फायद्याचं ठरेल.

हे होण्याला ज्या मंडळींचा विरोध होता त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतं का? मला नाही तसं वाटत.

मुळात सरकारकडून एफएसआय पासून करात सवलतीपर्यंत सारे फायदे मिळवणाऱ्या आणि सरकारने त्यांच्या प्रादेशिक भाषेसाठी किंचित सवलत मागितली तर टिकेची झोड उठवणाऱ्या मल्टीप्लेक्स मालकांचं धोरणच दुटप्पीपणाचं आहे. बॉलिवुडवाले दर्जा आणि निवडीचं स्वातंत्र्य या गोष्टीला धरुन राहिलेत. तुम्ही आज सकाळचा पेपर काढा आणि त्यात आलेल्या जाहिराती पाहून सांगा की संध्याकाळी लागलेले सारे खेळ दर्जेदार आहेत का? आणि निवडीच्या अधिकाराचाच जर मुद्दा असेल, तर आज देशभरात, जगभरात नाव मिळवून राहिलेले मराठी चित्रपट पहाण्याची ज्यांची इच्छा आहे, त्या सुजाण प्रेक्षकाच्या निवडीच्या अधिकाराचं काय?

मी असं एेकतो, की मराठी चित्रपटाला मल्टीप्लेक्सचा विरोध आहे कारण त्याला येणाऱ्या प्रेक्षकाला मल्टीप्लेक्सचे महागडे दरच परवडत नसल्याने तो तिकिटापलीकडे काही खर्च करत नाही. अव्वाच्या सव्वा किंमतीचे पदार्थ खात नाही, मोठाले ग्लास भरून शीतपेय रिचवत नाही, आणि मल्टीप्लेक्सचा रेव्हेन्यू कमी होतो. हे मला खरंच कळू शकत नाही. आज 'कॉफी आणि बरच काही', किंवा 'कोर्ट' सारख्या चित्रपटाला गेलेला प्रेक्षक इतका गरीब आहे का, की ज्याला पॉपकॉर्न परवडू नये? आणि हिंदी चित्रपटांना गेलेला दर प्रेक्षक तरी थोडाच हा सारा खर्च करतो? मला वाटतं की हे जर खरोखरचं  गणित असेल, तर त्याच्या सत्यासत्यतेचा कोणीतरी अभ्यासच करायला हवा आणि ते खरं आढळल्यास संबंधितांची चौकशीही व्हायला हवी. कलाक्षेत्रात प्रेजुडिसचा असा वापर होणं हे निश्चितच धोकादायक आहे.

असो, सरकारच्या निर्णयाचं स्वागत करकरेपर्यंतच दुसरी एक बातमी आली, जी काहिशी ( किंवा बरीचशी) काळजी करायला लावणारी आहे. ती म्हणजे प्राईम टाईम या संज्ञेची व्याख्या बदलून, ती वेळ आता १२ ते ९ करण्यात आली आहे. तरीही हवी ती वेळ ठरवताना निर्मात्याचं म्हणणं विचारात घेतलं जाईल असं ठरलय, इत्यादी. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की सरकारने काही ना काही कारणाने आपल्या निर्णयावरुन माघार घेतलेली आहे, आणि विस्तारीत वेळ ही केवळ आपण शब्दाचे पक्के आहोत असा वरवरचा आभास ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली क्लुप्ती आहे. मराठी चित्रपटाला गरज होती ती संध्याकाळच्या वेळाची , दुपारच्या नाही. आणि हेही मान्य की सर्व चित्रपटांना संध्याकाळचा वेळ लागतो असं नाही, काहींना ( विशेषत: विद्यार्थी वा गृहीणींच्या आवडत्या विषयावरच्या चित्रपटांना)  दुपारचाही चालू शकतो, पण मुळातच मल्टीप्लेक्सचा दुपारचा खेळ चित्रपटांना द्यायला विरोधच नव्हता. किंबहुना प्रदर्शकांनी चुकीचा प्रचारही करायला सुरुवात केली होती/ आहे की मराठी चित्रपट केवळ दुपारच्या वेळी चालतात. ते त्या वेळी चालतात ( किंवा चालत नाहीत)  कारण त्यावेळी लावले जातात, संध्याकाळच्या चांगल्या वेळात चित्रपट लागूच दिला नाही, तर प्रतिसाद कसा कळणार? तर  मुद्दा हा, की दुपारचा वेळ, हा सरकारने प्राईम टाईम घोषित नं करताही त्यांना मिळतच होता. आता राहाता राहिला प्रश्न निर्मात्याचं म्हणणं विचारात घेण्याचा , तर मराठी चित्रपटनिर्मात्याचं / छोट्या वितरकाचं म्हणणं कधीही मल्टीप्लेक्सवाले विचारात घेत नाहीत. क्वचित वितरक फार मोठा , चॅनलवगैरे सारखा असला तर गोष्ट वेगळी. या मल्टीप्लेक्सच्या मनमानीचा, खेळ बदलण्याचा, हिंदी चित्रपट येणार म्हणून मराठीचा ठरलेला खेळ रद्द करण्याचा अनुभव मला स्वत:लाही आमच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ' इन्वेस्टमेन्ट' या मराठी चित्रपटाच्या वेळी आलेला आहे, पण हा माझा एकट्याचा अनुभव नाही. मराठीतले अनेक प्रथितयश आणि व्यावसायिक  निर्माते / दिग्दर्शक / वितरक अशा मनमानीच्या कहाण्या शपथेवारी सांगतील. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत चित्र आहे, ते मल्टीप्लेक्स नेक्ससचाच जय झाला, हे. तरीही सरकारचं मूळ धोरण योग्य होतं आणि ते पुढे मागे अंमलात आणता आलं तर फायदा होईल हे नोंदवावंसं वाटतं.

आता यावर काही उपाय नाही का ? म्हंटलं तर आहे, पण तो सरकारच्या हातात नसून तुमच्या आमच्याच हातात आहे. आणि तो म्हणजे उत्तम प्रेक्षक बनण्याचा, अर्थात चांगल्या चित्रपटांचा. मल्टीप्लेक्सेसनी आपला स्वार्थ हा दाखवून दिलेलाच आहे, तर सरकारने आपली हतबलता ! बॉलिवुडने आपण पाट्या टाकल्या, तरी निदान पारितोषिकप्राप्त मराठी चित्रपटांहून अधिक प्रेक्षक तरी मिळवतोच हेदेखील दाखवून दिलय. मग मराठीने तुल्यबल प्रेक्षकसंख्या आपल्याला उभी करणं शक्य आहे हे दाखवून द्यायलाच हवं.  जे चित्रपट संध्याकाळी लागणं जमवून दाखवतील त्यांना तर खासच, कारण नाहीतर या सरकारी निर्णयाला मुळात विरोध करणारे सारे, 'पहा, आम्ही सांगत नव्हतो', असं म्हणायला तयारच आहेत.

शेवटी प्रश्न केवळ मराठी अस्मितेचा नाही, तर शिल्लक रहाण्याचा आहे. गरज कोणाला आहे, यावर अनेकदा झुकतं माप कोणाला मिळेल हे ठरतं. जेव्हा आपला चित्रपट त्यांच्या चित्रपटगृहात लागण्याची गरज प्रदर्शकांना वाटेल , तेव्हाच या साऱ्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघू शकेल. अन्यथा हे घोषणांचं राजकारण आहेच !

गणेश मतकरी
(vivekmadhun)

Read more...

कोर्ट - एक प्रतिक्रिया

>> Monday, April 20, 2015



The most important characteristic, and the most important innovation, of what is called neorealism,it seems to me, is to have realised that the necessity of the "story " was only an unconscious way of disguising a human defeat, and that the kind of imagination it involved was simply a technique of imposing dead formulas over living social facts. Now it has been perceived that reality is hugely rich, that to be able to look directly at it is enough; and that the artist's task is not to make people moved or indignant at metaphorical situations, but to make them reflect ( and if you like, to be moved or indignant too) on what they and others are doing, on the real things, exactly as they are.

Cesare Zavattini, Some ideas on the cinema



'वेगळा', हा शब्द इतका चावून चोथा झालेला नसता, तर कोर्ट चित्रपटासंबंधात वापरायला अतिशय योग्य होता. चांगल्या मराठी चित्रपटातले  व्यावसायिक वळणाचे आणि समांतर वळणाचे , हे दोन्ही प्रकार पाहिले तरी त्यांच्याबद्दल आपल्या काही अपेक्षा तयार झालेल्या आहेत. आणि त्यातले बहुतेक चित्रपट या अपेक्षा कमी अधिक प्रमाणात पुऱ्या करतात. कोर्टला या अपेक्षा माहीत आहेत किंवा नाहीत याची कल्पना नाही, कारण या अपेक्षांचं कसलच ओझं तो बाळगताना दिसत नाही. अगदी मराठी चित्रपटाची भाषा मराठी हवी, इतक्या मुलभूत गोष्टीचंही बंधन तो पाळत नाही.

आता या संबंधात, म्हणजे चित्रपट इतका वेगळा असावा की नसावा या संदर्भात दोन विचार पुढे येऊ शकतात. एक गट म्हणू शकतो, की काय हे, या मंडळींना त्यांच्या प्रादेशिक प्रेक्षकाची इतकीही पर्वा नसावी ना? मराठी प्रेक्षकांसमोर चित्रपट दाखवताना  सरळ इंग्रजी आणि मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची काय गरजा आहे? या प्रेक्षकाला, चित्रपटात काय सांगितलं जातय कसं कळावं? वर सबटायटल्सदेखील इंग्रजी? ती तरी मराठीत द्यावी ! आणि किती ते संथ कॅमेरावर्क? आज आपला चित्रपट ( मराठी नसला तरी गेला बाजार हिंदी तरी) हॉलिवुडच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती दाखवत असताना कॅमेरा साधे जागचेही हलू नयेत? प्रेक्षक कंटाळणार नाही का?

याउलट दुसरा गट हा हे मुद्दे दिग्दर्शकाच्या हेतूविषयी शंका म्हणून पुढे आणत नाही, तर तो हेतू काय असावा, याचा विचार करतो. मी तरी सरळसरळ याच गटातला आहे. दिग्दर्शकाचा हेतू समजून घेताना, हे लक्षात घ्यायला हवं, की कोर्टला प्रादेशिक सिनेमा म्हणणं ही फक्त एक सोय आहे. चित्रपट कोणत्या तरी एका भाषेतला मानावा लागतो, आणि मराठीचा वापर यात सर्वाधिक आहे, वातावरण महाराष्ट्राच्या राजधानीतलं, मुंबईतलं आहे, चारातल्या तीन प्रमुख व्यक्तिरेखा मराठी आहेत, तो प्रदर्शितही इथेच करायचा आहे, म्हणून हा मराठी चित्रपट. खरं तर दिग्दर्शकासाठी तो बहुभाषिक/ युनिवर्सल आहे आणि अपेक्षा आहे ती त्याचा प्रेक्षकही बहुभाषिक असावा ही. यात आपल्या प्रेक्षकाचा मानापमान होण्याचं कारण नाही. चित्रपट सर्वांसाठी आहे म्हणजे तो आपल्यासाठी नाही अशातला भाग नाही. आपल्यासाठी काय आहे आणि काय नाही, हे आपण आपल्या कक्षा किती विस्तारु शकतो यावर बरचसं अवलंबून आहे. आणि मराठी प्रेक्षकाला जर त्याच्या भाषेने बनवलेली राष्ट्रीय आणि काही प्रमाणात जागतिक ओळख टिकवायची असेल, तर त्याने आपल्या कक्षा रुंदावलेल्या बऱ्या. अन्यथा भारताला ऑस्कर कधी, हा प्रश्न पुढच्या अॅकेडमी अवॉर्ड्सच्या वेळी अजिबात विचारु नये !

जी गोष्ट भाषेची , तीच दृश्यशैलीची. सध्या झालेल्या डिजीटल क्रांतीने आणि हॉलिवुडमधली जी ती गोष्ट क्षणार्धात आपल्याकडे उचलण्याच्या प्रथेने आपल्या हल्लीच्या चित्रपटात कॅमेरा मुक्तपणे फिरताना दिसतो. छोट्यात छोटे शॉट्स, गतीमान संकलन, याची आपल्यालाही आता सवय झालीय. प्रत्यक्ष फार काही घडत नसलं, तरीही ही गती काही होत असल्याचा आभास निर्माण करु शकते. कोर्टमधे असं काहीच नाही. तो आपला प्रसंगाची आहे ती गती तशीच ठेवतो.  आता याचा अर्थ या दिग्दर्शकाला हे तंत्र माहीत नाही, किंवा जमत नाही असा नाही, तर त्यांच्या चित्रपटाला ते योग्य वाटत नाही , एवढाच घ्यायचा.

हॅविंग सेड दॅट, एक गोष्ट स्पष्ट आहे, की हा चित्रपट आवडीने पाहू शकेलसा प्रेक्षक प्रामुख्याने शहरी आहे. ज्याला काही प्रमाणात वेगळ्या निवेदनशैलीचं एक्स्पोजर आहे, किंवा निदान ती असू शकते हे मान्य करु शकेल , असा हा प्रेक्षक असेलशी अपेक्षा आहे. जर हा प्रेक्षक पुरेशा प्रमाणात कोर्ट पर्यंत पोचला, तर त्यांना तो नक्कीच आवडू शकेल.

जे लोक हे वाचतायत, त्यांना कोर्ट या चित्रपटाची जुजबी माहिती तरी निश्चित असणार. त्याच्याबद्दल खूपच लिहिलं गेलय, आणि प्रेक्षकांचा पाठिंबा आहे वा नाही, याबद्दल अमुक एका प्रमाणात संभ्रम असला, तरी बहुतांश समीक्षकांनी, म्हणजे अगदी व्हरायटी पासून लोकसत्ता पर्यंत सर्वांनीच तो सरसकट उचलून धरला आहे. या मंडळींनी लिहिलेलं सगळं वाचूनही अनेकांच्या डोक्यात हा संभ्रम आहेच, की कोर्ट नक्की आहे कशाविषयी? कोर्टरुम ड्रामा, हा एक तद्दन बेतीव प्रकार आपल्या ( आणि अमेरिकन) सिनेमा नाटकांमधे अनेक वर्ष ठाण मांडून बसलाय. 'कोर्ट' हेच नाव आणि कथेचा बराच भाग व्यापणारी एक केस, त्यातही एका व्यक्तीवर उघड अन्याय, तिला सोडवण्याचा प्रयत्न करणारी एक नायकसदृश व्यक्ती, आणि यांच्या विरोधात उभी असणारी संपूर्ण व्यवस्था, म्हणजे कोर्टरुम ड्रामा नाही तर दुसरं काय? असा एक विचार , बाय डिफॉल्ट , प्रत्येक प्रेक्षकाच्या डोक्यात असणार यात शंका नाहीच. त्यामुळे चित्रपट सुरु होताच जे काही दिसतं, ते ज्या प्रकारे पुढे सरकत जातं, त्याने पहाणारा गांगरतो, जे घडतय ते पहाण्याचा योग्य दृष्टीकोन कोणता, हे शोधण्याचा जमेल तितका प्रयत्न करतो. हा दृष्टीकोन सापडला, तर चित्रपट त्याच्यापर्यंत पोचतो, अन्यथा, 'किती कंटाळवाणा चित्रपट होता' ,हे मत घेऊनच हा प्रेक्षक बाहेर पडतो. हा चित्रपट काही जणांना कंटाळवाणा का वाटतो, याचं उत्तर बहुधा त्यांच्या या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षांमधे दडलेलं आहे.

चित्रपटाला सुरुवात होते, ती एका छोट्या खोलीत. दिसणारी फ्रेम, ही पुढे येणाऱ्या चित्रपटाच्या एकूण दृश्य संकल्पनेशी सुसंगत. सर्व तपशील एका फटक्यात दाखवणारी, विस्तृत. पाहताक्षणी ही खोली साधारण कोणत्या वस्तीत, काय सांपत्तिक स्थितीतल्या लोकांची, समाजाच्या कुठल्या वर्गातली असेल, हे समजतय. एका पलंगावर एक मध्यमवयीन गृहस्थ बसलेला. हा नारायण कांबळे ( वीरा साथीदार) .  त्याच्या आजूबाजूला बसलेल्या पोरासोरांची शिकवणी घेतोय.तिथून तो बाहेर पडताच चाळीखालचं एक तसच विस्तृत दृश्य येतं. मग रस्ता, बस , वगैरे. दर दृष्यचौकट ही चित्रित होणाऱ्या घटनेबरोबरच, त्या घटनेच्या सामाजिक ( क्वचित राजकीय ) पार्श्वभूमीकडेही सूचना करणारी. आजूबाजूचा तपशील अधोरेखित करणारी. हे दर शॉटचं लॉजिक थोडं वाढवून सीनलाही लावण्यासारखं. त्यामुळे दर प्रसंग त्यात मुख्य पात्रांचा प्रवेश होण्याच्या किंचित आधी सुरु होणारा, आणि मुख्य घटना संपल्याच्या किंचित नंतर संपणारा. या कथानकातल्या प्रसंगांबरोबरच ते सामावणाऱ्या वास्तवाबद्दलही दोन शब्द सांगणारी ही शैली मग आपल्याला अनेक गोष्टी दाखवते. न्यायासनाच्या एथिक्सबद्दलच्या कालबाह्य कल्पना , जागृतीचं आवाहन करणाऱ्या शाहीराच्या गाण्याहून अधिक पंधरा वर्षाच्या मुलींचा फिल्मी नाच पसंत करणारी मनोवृत्ती, मध्यमवर्गाच्या मनोरंजनासंबंधीच्या कल्पना, व्यक्तीपूजनापासून सेन्सॉरशिप पर्यंत अनेक गोष्टींची नवी रुपं आणि असं बरच काही.

हे सारं समाजवास्तव दाखवताना, कॅमेरा हा शक्य तितका कमी हलणारा. एका जागी उभा राहून निरीक्षण करणारा. तटस्थ. हे स्पष्ट असावं की हा चित्रीकरणाचा आणि संकलनाचा पॅटर्न दिग्दर्शकाकडून आलेला आहे. त्यातली छायाचित्रकार (मृणाल देसाई) आणि संकलक ( रिखव देसाई ) यांची कामगिरी ही स्वत:कडे कमीत कमी लक्ष वेधून घेणारी आहे. अलीकडे अनेक चित्रपटात तंत्रज्ञान आशयावर कुरघोडी करताना आपण पहातो. किंबहुना जितका तांत्रिक बडेजाव अधिक तितकं दिग्दर्शकीय चातुर्य अधिक असाही एक समज आहे. कोर्टने तो नं स्वीकारणं हीच तो दिग्दर्शकाचा निर्णय असल्याची खूण आहे. मात्र अनपेक्षित काही  करणं इतकाच हेतू यात आहे असं नाही. तर वास्तवाचा वास्तवपणा शक्य तितका तसाच ठेवणं अशी ही कल्पना आहे. याचं एकच उदाहरण घ्यायचं, तर वकील विनय व्होरा ( निर्माता विवेक गोम्बर) इन्स्पेक्टरला भेटून केस समजून घेतो तो सीन पहाता येईल. यात टेबलाच्या एका बाजूला लावलेला कॅमेरा हा सर्व व्यक्तिरेखांना प्रोफाईलमधेच दाखवतो. तो कुठेही या पात्रांचे क्लोज अप घ्यायला जात नाही, वा एकाला दुसऱ्यापेक्षा अधिक महत्व देऊ पहात नाही.

ज्या प्रकारे चित्रपट दर प्रसंगात मध्यवर्ती अॅक्शनच्या आजूबाजूच्या आशयाचा शोध घेताना दिसतो त्याप्रकारेच कोर्टची एकूण पटकथाही प्रमुख घटनेच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी टिपते असं दिसतं. इथली मुख्य घटना आहे ती नामदेव कांबळेवर चालवण्यात येणारी ( काही प्रमाणात सत्य घटनेवर आधारीत असलेली) केस.  चित्रपट या खटल्याची प्रगती उलगडत नेतो.  महत्वाची हिअरींग्ज दाखवत , साक्षी पुरावे नोंदत,  आपल्या न्यायव्यवस्थेचा आढावा घेतो. तिच्यातल्या विसंगती, दुटप्पीपणा , पसरटपणा, कालबाह्य कायदे याकडे तो निर्देष करत जातो. मात्र त्याबरोबरच तो विचार करतो,  तो ही न्यायव्यवस्था चालवणाऱ्यांच्या व्यक्तीगत आयुष्याचा. यातून समोर येणारं चित्र हे वेगवेगळ्या पातळ्यांवर समोर येतं.

समाज एका विशिष्ट परिस्तिथीतून जात असल्याने त्यातली माणसं तशी आहेत, आणि माणसं तशी असल्याने न्यायव्यवस्था ही इतकी दुटप्पी बनली आहे, असा या चित्रपटाचा एकूण आलेख आहे. त्यामुळे वरकरणी विषय हा न्यायव्यवस्थेचा वाटला तरी कोर्टचा रोख आहे तो एकूण समाजावर.

संपूर्ण कोर्टला विसंगतीवर आधारित विनोदाचा एक बाज आहे, जो या चित्रपटाला कंटाळवाणा म्हणणाऱ्यांच्या नजरेतून कसा सुटला हे एक कोडं आहे. मात्र हा विनोद थेट नाही हे खरं. त्यामुळे विनोदी संवाद आणि प्रासंगिक विनोद, याची सवय झालेला आपला प्रेक्षक कदाचित यावर आपलं लक्ष चटकन केंद्रित करु शकला नसेल. किंवा हे वास्तव त्यांच्या फार जवळचं असल्याने तो त्याकडे त्रयस्थ नजरेने पाहूही शकत नसतील. या विनोदाच्या मुबलक जागा आहेत. विनय व्होराच्या सेमिनार भाषणावेळचा पंख्याचा प्रसंग, सरकारी वकील नूतन( गीतांजली कुलकर्णी) हिने केलेलं एका लांबलचक कालबाह्य आणि सर्वसमावेषक कायद्याचं वाचन, मघा उल्लेख केला तो कांबळेंच्या गायनानंतरचा पंधरा वर्षाच्या मुलींचा नाच, न्यायमूर्ती सदावर्ते ( प्रदीप जोशी) यांनी फिर्यादीच्या स्लीवलेस ड्रेसला  घेतलेला आक्षेप अशी कितीतरी उदाहरणं. व्होराच्या पालकांच्या तक्रारींसारख्या अधिक ढोबळ जागाही हास्यकारक आहेत. पण त्या तुलनेने कमी आहेत.

या चित्रपटात काही क्लिशेजचा वापर आहे जो कधीकधी  ताणला जातो. नूतनच्या व्यक्तिगत आयुष्याचा जुनाट मध्यमवर्गीय रोख , हा त्यातला सर्वात जाणवणारा. मुख्य कारण म्हणजे तो अनेकदा येतो. लोकलमधल्या मैत्रिणीबरोबरच्या गप्पा, जेवतानाचं सिरीअल, नाट्यप्रयोग, या दर प्रसंगात हा मध्यमवर्गीयपणा चढत्या क्रमाने अधोरेखित होतो. त्याचा अतिरेक होतो तो नाटकाच्या प्रसंगात , कारण मुद्दा असला, तरी हे दृश्य फार भडक होतं. ते तसं होईल याची चित्रकर्त्याना खात्री असेलच,पण ते तसं असणं अनावश्यक वाटतं, किंवा मला अनावश्यक  वाटलं, हे खरं. गीतांजली कुलकर्णी केवळ आपल्या इंग्रजी बोलण्याच्या ' मराठी ' अॅक्सेन्टमधून जे क्षणात सांगून जाते, ते सांगायला ही इतकी दृश्य अनावश्यकच खर्ची घातल्यासारखं वाटतं. त्यामानाने विनयचं व्यक्तीगत आयुष्य अधिक पैलू घेऊन येणारं, त्यामुळे अधिक इन्टरेस्टिंग. कदाचित अधिक खरं.

शेवटाबद्दल सर्वसाधारण ( म्हणजे मनोरंजनाच्या पारंपारिक कल्पना जपणारा) प्रेक्षक बुचकळ्यात पडेल, हे मामीत हा चित्रपट पहातानाच लक्षात आलं होतं, मात्र एक नक्की, की स्पूनफिडींग न करताही आपला प्रेक्षक शेवटच्या भागाला आपापल्या पध्दतीने इन्टरप्रीट नक्की करु शकेल. एक गोष्ट मात्र मी म्हणेन की परिणामाच्या दृष्टीने, थोडा आधी येणारा, अन उघडच अधिक ऑब्विअस क्लायमॅक्स वाटणारा प्रसंग खरा शेवट मानला गेला तर बरं. सदावर्तेंचा पुढला भाग हा एपिलॉग असल्यासारखा आहे. त्याला अर्थ आहे, पण वजन थोडं कमी आहे.

आता काही मूलभूत प्रश्न. कोर्टचा खरा प्रेक्षक कोणता आणि चित्रपटाला कलाकृती मानलं तर त्याची  गुणवत्ता ही प्रेक्षकानुसार कमीजास्त होऊ शकते का? प्रेक्षकाला जर या चित्रपटाचं एस्थॅटिक्स मान्य नसेल, तर सर्वांनी  तो पहावाच असा आग्रह समीक्षकांनी  धरण्यात मुद्दा तो काय?
आणि अखेर, कोर्ट हा खरोखर वेगळा प्रयत्न आहे का फेस्टिवल्सचा प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेला अपरिचित फॉर्म्युला ?

माझ्या मते गुणवत्ता, कुठल्याही कलाकृतीची गुणवत्ता,  ही दोन प्रकारची असते. एक सजग रसिकासमोरची अन दुसरी , कोणाही रँडम व्यक्तीपुढची. साऱ्याच गोष्टी सरसकट सर्वांना आवडतील असं नाही.  शक्यता आहे, की त्यात काही थेट पोचणारा आशय असेल, तर तो सर्वाना अमुक एका पातळीवर तरी सहजपणे कळू शकेल. म्हणजे सिस्टीन चॅपलचं छत, हे मिकॅलेन्जेलोच्या चित्रांच्या थेट दिसणाऱ्या सौंदर्यामुळे आपलसं वाटेल, किंवा बॅन्क्सीची ग्राफिटी त्यातल्या उर्मट बंडखोर संदेशांमुळे. मात्र पिकासोचा क्युबिस्ट पिरीअड किंवा अॅन्डी वॉरहॉलचे प्रिन्ट्स सर्वाना त्याच सुलभपणे पोचतील असं नाही. तरीही, या गोष्टी पाहून पाहूनच कळतात, त्यांची सवय होते, काय म्हणायचय ते हळूहळू जाणवायला लागतं, त्यामुळे कला कळली न कळली, आर्ट गॅलऱ्या आणि म्युझियमना गर्दी जरुर व्हावी. आज काही न कळणारा, हा उद्याचा चांगला रसिक असू शकतो. हाच न्याय चित्रपटांना आणि खासकरुन  कोर्टसारख्या सिनेमाला लावायला हवा आणि तो पहावा हा आग्रह आहे तो त्यासाठी. चैतन्य ताम्हाणेचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे आत्ताच त्याच्यापुढे दंडवत घालण्याची गरज नाही. पण एक चांगली, किंवा उत्तम सुरुवात म्हणून त्याच्या या फिल्मकडे निश्चित पहाता येईल.

आता राहिला प्रश्न , तो 'कोर्ट हा केवळ महोत्सवांसाठी केलेला फॉर्म्युला आहे का?' हा.  नुकताच त्या पध्दतीचा युक्तीवाद एका इंग्रजी ब्लॉगवर आढळला. मी म्हणेन की जर असा फॉर्म्युला वापरणं इतकं सोपं असेल, आणि त्यानी अमुक एक गुणवत्ता असणारी कलाकृती तयार होत असेल, तर का नाही ? मिळवा ना देशोदेशीचे पुरस्कार दरवर्षी. मराठी चित्रपटाचं ऑस्करही त्यामुळे अधिक जवळ येईल !  पण मला विचाराल, तर हे सारं एवढं सोपं नाही. कोणी व्हेनिसला बेस्ट फिल्म मिळवायचं किंवा सुवर्ण कमळ मिळवायचं म्हणून ठरवून मास्टरपीस बनवू शकत नाही. त्यामागे काही प्रेरणा असू शकतात, काही दिग्दर्शक, काही चित्रपट यांचा प्रभाव असू शकतो, पण या प्रकारे इतक्या सुजाण प्रेक्षकांना कह्यात घेणाऱ्या कलाकृतीत काहीतरी स्वत:चं, काहीतरी ओरिजीनल असावंच लागतं. आणि कोर्टमधे ते आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
- ganesh matkari 

Read more...

बॉलिवुडच्या नायिका- व्यक्तिमत्व आणि प्रतिमा

>> Tuesday, March 24, 2015


मध्यंतरी आपल्या सरसकट मराठी मध्यमवर्गीय मानसिकतेचा थरकाप उडवणारा एआयबी रोस्ट नामक कार्यक्रम पाहिला. खूप गंमत वाटली आणि खरं सांगायचं तर या साऱ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तो साजरा करुन घेणाऱ्या, तसंच त्या वरवरच्या शिव्यांमागची सन्मानाची , प्रेमाची भावना लक्षात घेणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजचं कौतुकही वाटलं.  स्टेजवरच्या , तसच  प्रेक्षकात बसून खो खो हसत दाद देत आपल्यावरचे टोमणेही सहन करणाऱ्या  सेलिब्रिटीजचं  देखील ! या प्रेक्षकात बसणाऱ्यांमधे आपल्या आजच्या आघाडीच्या तीन नायिका खास लक्षात येत होत्या. आयकॉनिक नायिका असून अधिक प्रौढ वळणाचे विनोद वाट्याला आलेली दिपीका पादुकोण, मठ्ठ म्हणून झालेल्या टिकेला एआयबीनेच सादर केलेल्या 'जिनीअस ऑफ द इअर' या अफलातून शॉर्ट फिल्मने उत्तर देणारी  आलिआ भट्ट, आणि अधिक पारंपारिक वळणाच्या भूमिकांमधे स्थिरावत चाललेली आणि कार्यक्रमात  तशा बाळबोध विनोदांना तोंड द्यायला लागलेली सोनाक्षी सिन्हा. या तिघीही वेगवेगळ्या प्रकारच्या नायिका साकारणाऱ्या आणि पडद्यावर अतिशय ग्लॅमरस प्रतिमा असणाऱ्या. त्यांचा या कार्यक्रमातला सहभाग हा धाडस मानायचा का? मला नाही तसं वाटत. याऊलट मला ही खूण वाटते, ती आजवर आपल्या चित्रपटात शोभेची बाहुली बनून रहाणाऱ्या नायिकांची  प्रतिमा बदलत चालल्याची. पडद्यावरली तसच लोकांसमोरचीदेखील. एकेकाळी बहुसंख्य प्रमाणात, सौंदर्य हीच ओळख बनलेल्या या नायिकांनी आपल्या व्यक्तिमत्वाला इतर पैलूही आहेत , हे दाखवायला केलेली ही सुरुवात आहे. त्यांच्या एरवीच्या थोड्या अनग्लॅमरस, थोड्या बोल्ड, थोड्या वृत्तीदर्शक वागण्यातून  बदलत जाणाऱ्या प्रतिमा केवळ एका पब्लिक रेकॉर्डचा भाग नाहीत, तर पडद्यावरलं त्यांचं वागणं हेदेखील त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक्स्टेन्शन होऊ पहातय. दिपिकाने फाइन्डींग फॅनी मधली गर्ल नेक्स्ट डोअर वळणाची भूमिका स्वीकारणं आणि त्यातल्या व्हर्जिन शब्दाला घेतलेल्या आक्षेपातून उद्भवलेल्या वादात हिरीरीने पडणं, किंवा नुकत्याच कामं करायला लागलेल्या आलिआ भट्टने हायवे सारखी स्त्रीवादी भूमिका स्वीकारणं अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.या साऱ्याजणींना घेऊन आज पडद्यावर येणारे चित्रपट, त्यातल्या स्त्रीभूमिका आणि त्यांना दिलेलं महत्व हे काही वर्षांपूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत रॅडीकली वेगळं म्हणावं असं आहे. याचा अर्थ हा नाही, की या नायिका यापुढे फक्त आपलं व्यक्तीमत्वच पडद्यावर दाखवतील. तसं झालं तर त्यांच्या अभिनेत्रीपणाला मुद्दाच उरणार नाही, पण हे जरुर होईल, की त्यांच्या भूमिकांच्या निवडींमधून, त्या साकारताना केलेल्या विचारातून, त्यांच्या एरवीच्या बोलण्यावागण्यातून त्यांची नवी, काहीशी एकसंध प्रतिमा तयार होईल. पडदा आणि बाहेरचं जग यातलं अंतर मिटवणारी.

आपला चित्रपट हा सुरुवातीपासूनच आपल्या समाजासारखा पुरुषप्रधान आहे. नायकांभोवती चित्रपट घडवायचा अन नायिकांना एक आकर्षण म्हणून उभं करायचं ही सामान्यत: आपल्या चित्रपटांची प्रथा. तरी त्यातही वेळोवेळी मार्ग काढत दुर्गाबाई खोट्यांपासून मधुबालापर्यंत, आणि वहिदा रहमान पासून रेखापर्यंत वेळोवेळी अशा नायिका उभ्या रहात गेल्या ज्यांनी या पुरुषप्रधान परंपरेला आपल्या कामामधून विरोध दर्शवला.  अर्थात केवळ स्त्रीप्रधान चित्रपट निवडणं त्या काळात शक्यच नव्हतं, त्यांना घरी बसण्यापलीकडे पर्याय उरला नसता. असे कितीसे मदर इंडिआ, बॉबी किंवा उमराव जान येणार होते? पण त्यांनी आपली कामं ही व्यक्तीमत्व दर्शवणारी असतीलसं पाहिलं . नायकाबरोबर प्रेक्षकाच्या मनात  त्यांचीही ओळख राहीलसं पाहिलं . आज 'प्यासा' वहिदा रहमानशिवाय, 'चलती का नाम गाडी' मधुबालाशिवाय आणि 'अनाडी' नूतनशिवाय आठवून पहा ! नाही आठवणार !

असं असतानाही नायिकांचं स्थान एका मर्यादेत होतं हे खरं. हे सर्वाना माहीत होतं आणि कोणाचा त्यावर फार आक्षेपही नव्हता. प्रेक्षकांची अपेक्षाही फार वेगळी नव्हती, आणि स्त्रीमुक्तीचे वारे वहायला लागले नव्हते. चित्रपटही फार साधी रचना असणारे असायचे, भल्याचा बुऱ्यावर विजय वगैरे सांगणारे. त्यातल्या व्यक्तिरेखांना कंगोरे यायलाही सुरुवात झालेली नव्हती , अगदी नायकांच्याही, मग नायिका तर दुरच राहिल्या. हे चित्र काहीसं बदलायला लागलं ते समांतर चित्रपटांच्या काळात. ७० च्या दशकात आलेला हिंदी समांतर सिनेमा, खासकरुन बेनेगल/ तेंडुलकर / निहलानींचा , हा स्त्रीभूमिकांचा नव्या काळात नव्याने विचार करायला हवा, हा धडा शिकवून गेला. अंकूर-मंथन-निशांत या तीन महत्वाच्या चित्रपटांतून शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्या रुपाने या बदलांना एक चेहरादेखील मिळाला. या काळातला व्यावसायिक चित्रपट सुधारलेला नव्हता, पण कधी ना कधी सुधारेल अशी आशा या काळात तयार झाली. या नायिकांना केवळ नायकांभोवती घुटमळण्यापलीकडे इतर अनेक कामं असायची. केवळ दिसणं आणि गाणी म्हणणं यापलीकडे जाऊन या व्यक्तीरेखांचा विचार केलेला असायचा. त्यांची प्रादेशिकता, व्यवसाय, विशिष्ट मुद्द्यांवरची त्यांची भूमिका, प्रसंगी नायकाची मतं अमान्य करण्याची मुभा असणं/नसणं ,  याचा विचार या भूमिका रचतानाच करण्याची गरज या साऱ्यांना भासायला लागली. या काळात स्त्रीवाद पुढे आलाच होता. चित्रपटाची समांतर शाखा, स्त्रीवादाचं एक रुप बनली.

सर्वसाधारणपणे असं घडताना दिसत नाही,की चित्रपटाचा एकच पैलू हळूहळू बदलला, बदलत गेला, पण बाकी सारं अनिश्चित काळ जैसे थे राहीलं. बदल हा नेहमीच सार्वत्रिक असतो. एखाद्या छोट्या घटकापासून तो सुरू झाला, तरी हळूहळू तो पसरत जातो, आणि सारंच अमलाखाली आल्याशिवाय थांबत नाही. व्यावसायिक चित्रपटामधल्या नायिकांमधे तो दिसायला लागला याचं कारण हे होतं की व्यावसायिक सिनेमाही त्या दिवसात नव्याने घडत होता. त्याआधी, म्हंणजे अमिताभ बच्चन एेन भरात होता तो  काळ, हा व्यावसायिक चित्रपटातल्या स्त्री भूमिकांना फारच चिंताजनक होता. त्या भूमिका अशा नव्हत्याच. आई, बहीण, प्रेयसी, अशा एखाद्या शब्दात वर्णन होण्यासारखे हे ढाचे असत आणि त्यात जी अभिनेत्री पडद्यावर उभी रहाणार तिची जनमानसातली प्रतिमा कच्चा माल  म्हणून वापरली जायची. त्यामुळे कोणता का सिनेमा असेना, निरुपा रॉयची आई तेच वात्सल्य आणि कठोरपणा यांचं मिश्रण दाखवायची, नितू सिंग आपला टॉमबॉइश खाक्या ,तर परवीन बाबी आपला पाश्चिमात्य अवतार.

या दिवसात नायिकांची प्रतिमा ही वरवरचा रोमॅन्टीक भाव आणि सोवळेपणा यांचं चमत्कारिक मिश्रण बनली होती. सेक्शुअॅलिटी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. आपल्या चित्रपटांमधला हा अँग्री यंग पिरीअड ओहोटीला लागला तेव्हापासून आपला व्यावसायिक चित्रपट स्त्री भूमिकांकडे थोड्या औदार्याने पहायला लागला. महेश भट्टच्या कामापासून व्यावसायिक चित्रपटांमधेही थोडी प्रायोगिक मूल्य यायला सुरुवात झाली. स्त्री भूमिकांमधेही अधिक खोली यायला लागली. 'अर्थ' (१९८२), 'सारांश'( १९८४) अशा निमव्यावसायिक अन खास वेगळ्या चित्रपटांबरोबरच त्याने रोमॅन्टीक वळणाचे चित्रपटही करायला सुरुवात केली ज्यातल्या स्त्रीभूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण होत्या. याच सुमारास आलेल्या शेखर कपूरच्या 'मासूम' (१९८३)  चित्रपटात लग्नसंस्थेबद्दल स्त्रीच्या दृष्टीकोनातून अतिशय सहज भाष्य केलं होतं. कपूरने पुढेही 'बॅन्डीट क्वीन' (१९९४) आणि 'एलिझबेथ'(१९९८) मधे स्त्री व्यक्तिरेखांना समोर ठेवलं . पण त्यावेळी तो बॉलिवुडच्या गणितांपलीकडे पोचला होता.

बॉलिवुडपुरतं बोलायचं तर,  नायिका खऱ्या विकसित झाल्या त्या गेल्या पंचवीसेक वर्षांच्या कालावधीत. त्यातलंही पहिलं दशक हे नव्या चित्रकर्त्यांच्या उदयात, त्यांनी बैठक पक्की करण्यात गेलं असं म्हणता येईल. एकूण चित्रकर्त्यांची एक फळीच्या फळी या काळात बदलली. आदित्य चोप्रा , करन जोहर यांसारखी जुन्या जाणत्या दिग्दर्शकांची मुलं या दिवसात नव्याने काम करायला लागली, शहारुख खान , सैफ अली सारखे नवे स्टार्स लोकप्रियतेत चढत गेले, अनुराग कश्यप सारख्या नंतर महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्ट्रगलर्सचा जम याच काळात बसत गेला. एव्हाना प्रेक्षकालाही तेच तेच पहाण्याचा कंटाळा आला होता. डिव्हीडी पायरसीमुळे शहरी प्रेक्षकापर्यंत पोचलेला जागतिक सिनेमा, केबल टिव्ही, २४ तास चालणारे मुव्ही चॅनल्स यातून आजवर न पाहिलेल्या चित्रपटांचं जग त्याच्यापुढे खुलं झालं होतं. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर हा एक सेटअप होता. प्रत्यक्ष कामाचा नव्हे तर तयारीचा काळ. या बदलांचा परीणाम हा २००० च्या पुढल्या काळात एक्स्पोनेन्शिअल पध्दतीने दिसत गेला.

कोणालाही घरबसल्या करुन पहाण्यासारखा एक प्रयोग सांगतो. हल्ली इन्टरनेटवर दरवर्षी आलेल्या चित्रपटांची यादी सहज उपलब्ध असते. त्यावर पटकन नजर फिरवायची आणि त्यात स्त्रीप्रधान किंवा किमान स्त्रीला महत्वाची आणि चांगली भूमिका असणारे चित्रपट सालानुसार बाजूला काढायचे. यादी पुरी झाली की तुमच्या लक्षात येईल की गेल्या पन्नास वर्षात आले नसतील एवढे स्त्रीप्रधान चित्रपट हे केवळ २००० च्या दशकात आले, आणि आता प्रत्येक वर्षीच्या नव्या यादीत अशा चित्रपटांना स्थान हे असतच.

या काळात काही गोष्टी झाल्या, त्या अशा.

एकतर नायिका या शब्दाची पारंपारिक व्याख्या बदलली. ती सुंदरच दिसायला पाहिजे, तिच्या अस्तित्वासाठी मुळात नायक हा प्राणी चित्रपटात असलाच पाहिजे, तिने स्वत:कडे दुय्यम भूमिकाच घेतली पाहिजे, हे सारे संकेत तितक्या गंभीरपणे पाळण्याचं कारण उरलं नाही. वयाची अटही उरली नाही. २००१ च्या 'दिल चाहता है' मधे जुन्या रोमान्सकडे नव्या पध्दतीने पहाताना  फरहान अख्तरने अक्षय खन्ना बरोबर डिंपल कापाडीआला घेतलं, किंवा आयान मुखर्जीने 'वेक अप सिड' (२००९) करताना  टिपीकल लव्हर बॉय प्रतिमा असणाऱ्या रणबीर कपूरच्या जोडीला त्याची मोठी बहीण शोभेलशी कोंकोणा सेन शर्मा कास्ट केली. डिंपलच्या व्यक्तीरेखेच्या घटस्फोटाची गुंतागुंत, किंवा कोंकोणाच्या वागण्यात दिसणारा करीअरचा विचार हे सारं बॅगेज दाखवणं, या व्यक्तीरेखा पूर्ण रंगवण्यासाठी आवश्यक ठरलं. प्रेक्षकांनाही त्यात काही वावगं, अधिक- उणं वाटलं नाही.

दुसरी गोष्ट झाली, ती म्हणजे विषयाच्या मर्यादा शिथील व्हायला लागल्या. त्या जशा विस्तारत गेल्या , तशी नायिकांवर लादलेली नैतिक मूल्य गळून पडायला लागली. लिव्ह-इन रिलेशनशिप्स, लग्नबाह्य संबंध, भ्रष्टाचार, कॉल गर्ल्स/ बार गर्ल्स सारखे व्यवसाय, एमएमएस स्कँडल्स अशा आजवर पडद्याआड ठेवलेल्या वा आडून आडून सुचवलेल्या गोष्टीही पुढे यायला लागल्या. कुमारी मातेला नवी स्त्रीवादी नायिका बनवणारा कुंदन शाहचा ' क्या कहना ' (२०००) , सर्व उद्योगांमागची भ्रष्ट नैतिकता तपासणारे मधुर भांडारकरांचे 'चांदनी बार'(२००१) , 'पेज ३' ( २००५) , 'फॅशन' (२००८)सारखे  चित्रपट, देवदासची आधुनिक आवृत्ती असणारा अनुराग कश्यपचा 'देव डी' (२००९) अशा , चित्रपटांवरची पारंपारिक बंधनं झुगारणाऱ्या चित्रपटांतून तब्बू, प्रिती झिंटा, कंगना रानावत, प्रियांका चोप्रा, कलकी यांसारख्या कितीतरी नायिका नव्या रुपात पुढे आल्या. प्रिती झिंटा सारख्या काहींनी पुढे नायिकांची परंपरागत भूमिका स्वीकारली, पण इतरांना नवी दिशा मिळाली.

यानंतरची पायरी पाहिली तर असं दिसतं, की काही नायिकांनी आपला स्त्रीप्रधान चित्रपट करण्याकडे कल असल्याचं आज उघड केलय. एके काळी जसा या चित्रपटांचा दुष्काळ होता तसा आज राहिलेला नाही. मल्टीप्लेक्सच्या  कृपेने छोटेखानी चित्रपट करण्याची तयार  झालेली शक्यता वापरु पहाणारे दिग्दर्शक, धाडस दाखवणारे काही निर्माते आणि हुशार बनत चाललेला प्रेक्षक , त्य प्रेक्षकांत वाढत चाललेलं स्त्रियांचं आणि समाजात वाढत चाललेलं करिअरिस्ट स्त्रियांचं प्रमाण या सर्वांमुळे या नायिकांना ते करणं शक्यही होतय. यातलं सर्वात लक्षात येण्याजोगं उदाहरण आहे, ते विद्या बालनचं जिने गेली काही वर्षं केवळ तिला महत्व असणारे चित्रपट केले. 'इश्कीया'( २०१०)  ,' द डर्टी पिक्चर्स'(२०११) , 'नो वन किल्ड जेसिका'(२०११), आणि 'कहानी' (२०१२) यांमधल्या तिच्या भूमिका त्याची साक्ष आहेत. तिच्या पाउलावर पाऊल ठेवून आता रानी मुखर्जी ( नो वन किल्ड जेसिका /अय्या/ मर्दानी) , कंगना रानावत ( क्वीन / रिव्हॉल्वर रानी)  यासारख्या नायिकाही याच दिशेने निघालेल्या दिसतात.

हे सगळं याआधीही कदाचित होऊ शकलं असतं, पण काही कारणाने आपला चित्रपट नायिका या संकल्पनेच्या नको इतका प्रेमात पडला आणि तिचं भूमिका म्हणून , कथानकातली एक व्यक्तिरेखा म्हणून काही एक स्थान असायला हवं, वजन असायला हवं, हेच विसरुन गेला. आजची नायिका बदलते आहे याचा मुख्य अर्थ एवढाच की ती या संकल्पनेत न अडकता आपलं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करते आहे. भूमिकेच्या संदर्भात आणि काही प्रमाणात समाजाच्या संदर्भात देखील. त्या दष्टीनेही नायिकांचं बेधडक बाहेर पडून आपण कोण आहोत, आपले विचार काय, हे खुलेपणाने सर्वांसमोर मांडणं मला सिग्निफिकन्ट वाटतं. मग ते त्यांनी मोकळेपणी दिलेल्या मुलाखतींमधून प्रकट होणं असू दे, ट्विटर/ फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क साईटच्या माध्यमातून लोकात मिसळणं असू दे , वा एआयबी रोस्ट सारख्या कार्यक्रमात स्वत:च्याच केलेल्या चेष्टेवर दिलखुलास हसणं असू दे. जुन्या प्रतिमांची चौकट मोडणं महत्वाचं, त्यातूनच नव्या प्रतिमा बनायला सुरुवात होऊ शकते.
गणेश मतकरी
( तनिष्काच्या महिला विशेष पुरवणीतून )

Read more...

एन एच १०- वास्तव भयाविष्कार

>> Sunday, March 15, 2015

नवदीप सिंग या दिग्दर्शकावर परकीय प्रभाव आहे, हे काही रहस्य नाही. त्याचा मनोरमा सिक्स फीट अंडर, हा पोलान्स्कीच्या चायनाटाऊन वरुन प्रेरीत होता, पण त्याच्या रुपांतरात भारतीयांच्या पचनी न पडेलसं वाटल्याने एक मोठा बदल केला होता, ज्याने चित्रपटाची हवा थोडीशी काढून घेतली होती. तरीही , आपल्याकडल्या कल्ट चित्रपटात मनोरमाचं स्थान महत्वाचं आहे. एन एच १० वरही परकीय प्रभाव आहे, पण एखाद दुसऱ्या चित्रपटापेक्षा तो एकूणच भयपटांमधल्या रोड-हॉरर या उपप्रकाराचा प्रभाव असल्यासारखा वाटतो. 'द टेक्सस चेनसॉ मॅसकर' पासून 'वुल्फ क्रीक' पर्यंत या प्रकारची मुबलक उदाहरणं आहेत, आणि त्यांमधून या प्रकाराची सारी बलस्थानं दिग्दर्शकाने आत्मसात केली आहेत याची हा चित्रपट पाहून खात्री होते.
थोडक्यात हा चित्रप्रकार पहायचा, तर साधारण शहरी वळणाच्या तरुण तरुणीनी एखाद्या अपरिचित ठिकाणी जाणं आणि घनघोर जीवावरच्या संकटात सापडणं, हा फॉर्म्युला. संकटात काही प्रमाणात व्हेरीएशन असू शकतं, पण खूप नाही. त्यामुळे एका विशिष्ट सेट अप नंतर उरलेल्या चित्रपटाचं स्वरुप हे बहुधा एखाद्या पाठलागासारखं होऊन जातं. अशावेळी महत्व येतं ते टप्प्यांना. पात्रांना हलवत ठेवायचं, ताण वाढवत न्यायचा, सुटकेची शक्यता नसल्याचा भास तयार करत रहायचं, आणि प्रेक्षकांना श्वास रोधून पहायला लावायचं, ही या चित्रपटांची गरज. सर्वच चित्रपटांना हे जमतं असं नाही. किंबहूना हॉलिवुडमधेही हल्लीचे या चित्रप्रकारातले अनेक चित्रपट हे ताणापेक्षा हिंसेच्या विकृत दर्शनातच समाधानी असतात असंही म्हणता येईल. एन एच १० मात्र हे टप्प्याटप्प्यानी परीणाम वाढवत नेणं चांगलं जमवतो. खासकरुन पहिल्या अर्ध्या भागात.
या चित्रपटाचा सेटअप खूप कमी आहे, पण जो आहे, तोदेखील थरकाप उडवणारा. गुरगांवसारख्या विकसित होणाऱ्या भागात मीरा ( अनुष्का ) रात्री पार्टीहून घरी जात असताना ओढवलेला प्रसंग हा गेले काही दिवस कानावर येत रहाणाऱ्या बातम्यांची , त्यातून दिसणाऱ्या भीषण मनोवृत्तीचीच आठवण करुन देणारा. मात्र तो केवळ त्या मनोवृत्तीचं दर्शन घडवत नाही. तर मीरा काय प्रकारची मुलगी आहे, हेदेखील त्यात दिसून येतं. मीराची हार नं मानण्याची, विचार करत रहाण्याची आणि येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची वृत्ती, इथे एका प्रसंगात चटकन समोर येते. कायद्याचं या प्रकरणात असमर्थ असणं, समाजाची या वास्तवाबद्दलची अनभिज्ञता, हे सारे मुद्दे, चटकन मांडले जातात. या प्रसंगाला आपल्या आयुष्यातून विसरण्यासाठीच मीरा आणि अर्जुन ( नील भूपालम) हे मीराच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी छान रिजॉर्टला जायचं ठरवतात. वाटेत एके ठिकाणी थांबले असताना त्यांना एका जोडप्याला मारहाण होताना दिसते आणि त्यात मधे पडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अर्जुनलाही एक झापड मिळते. चारचौघात आणि त्यातही  मीरासमोर झालेला अपमान त्याला सहन होत नाही आणि काही वेळाने या अपमानाचा बदला घेण्याची संधी येताच तो ती घेतो. पुढे धोका किती आहे हे अर्जुनच्या चटकन लक्षात येत नाही. जेव्हा ते येतं, तेव्हा परंपरेला अनुसरुन पुष्कळ उशीर झालेला असतो.
हॉरर चित्रपटांच्या पटकथेत नेहमी जाणवणाऱ्या दोन कमकुवत जागा म्हणजे पात्रांचा मूर्खपणा, आणि हिंसक दृश्यांचा अतिरेक. यातली पहिली जागा काही प्रमाणात इथेही आहेच. अर्जुनला तो कोणाच्या वाटेला जातोय हे लक्षात का येत नाही? मीरा गाडी सोडून बाहेर का पडते? हातातल्या पिस्तुलाचा वापर प्रोटॅगॉनिस्ट वा अॅन्टागाॅनिस्ट ( क्वचित एखादी वेळ वगळता) एकमेकांविरुध्द का करत नाहीत ? हे प्रश्न इथेही पडू शकतात, पण त्यांची तेवढ्यापुरती कारणं दिग्दर्शक देतो, ज्यामुळे आपण त्या विचारात अडकून रहात नाही. दुसरी जागा इथे खटकण्याइतकी जाणवत नाही, ती पटकथेच्या चतुराईमुळे. चित्रपटात काही ठिकाणी पाहाणाऱ्याचा थरकाप करणारा हिंसाचार आहे, पण त्या जागा अंतराअंतराने येतात. मधे कथानक अनेक वळणं घेत आणि मीरा /अर्जुनला चढत्या क्रमाने बिकट संकटात टाकत पुढे जातं. थेट हिंसा दाखवणाऱ्या विशिष्ट जागा सोडल्या तर उरलेल्या ठिकाणी हिंसा प्रत्यक्ष दिसण्यापेक्षा सुचवली जाते , किंवा तिचा धाक पात्रांवर वा प्रेक्षकांवर टांगता ठेवला जातो. काय घडतय , त्यापेक्षा काय घडू शकेल , याची भीती अधिक वाढवत नेली जाते.
एनएच १० किंचित लटपटतो, तो मीरा गावात पोचते तेव्हा. याचं एक कारण म्हणजे, या प्रकारचा हल्ला करणारी माणसं तालेवार घराण्यातलीच असणार आणि गावात मदत मिळण्यापेक्षा धोकाच अधिक , हे तिला कळायला हवं. तिची व्यक्तीरेखा इतकी बावळट नक्कीच नाही. त्याशिवाय गावातल्या माणसांना दूर ठेवण्यासाठी केलेली सांस्कृतिक कार्यक्रमाची योजनाही पुरेशी पटण्याजोगी नाही. इथे थोडी भीती वाटते ( खरी, चित्रपटातली नाही) की चित्रपट पारंपारिक नाट्यावर येतो की काय. पण नाही. सरपंचाच्या घरात पोचल्यावर मात्र चित्रपट पुन्हा पकड घेतो.
चित्रपटाचा आलेख जपण्यात जसा पटकथेचा मोठा हात आहे, तसा छायाचित्रण आणि संगीताचादेखील. वास्तव चित्रपटांमधे संगीत खटकतं, पण हा नुसता वास्तववाद नाही, त्यात थ्रिलरचा घटकही आहे. संगीताचा अचूक वापर आणि छायाचित्रणातलं वास्तवता आणि थरार यांचं मिश्रण मिळून चित्रपटाचा मूड तयार होतो. काही घडत नसतानाही, ते घडण्यासाठी वातावरण तयार करतो.
एन एच १० चं प्रदर्शन अतिशय योग्य वेळी झालय. विचारांची प्रगल्भता नसणारे, धर्मांध, बुरसटलेल्या विचारांचे समाजकंटक आज इतक्या प्रमाणात वाढत्या गुन्हेगारीला आणि खासकरुन स्त्रीयांवरच्या अत्याचाराला कारणीभूत ठरतायत, की हा चित्रपट हा सरळ एखाद्या वर्तमानपत्रातल्या बातमीसारखा वाटावा. त्याचा शेवट सुखांत नक्कीच नाही, पण पलायनवादाकडे झुकणारा असला, तरीही तो यातल्या सत्याची धार कमी करु शकत नाही.
माझा अनुभव हा, की त्रासदायक वास्तवाचा अतिरेक झाला, की पलायनवाद आपलासा वाटतो. जे पडद्यावर दिसतय ते घडण्याची शक्यता प्रत्यक्षात किती कमी आहे, हे माहीत असलं, तरीही वास्तववादी अंगाने जाण्यापेक्षा चित्रपट काहीसा परिचित पण न्याय्य मार्गाने गेला याचं आपल्याला बरं वाटतं आणि आपण सुखावतो. एक मात्र आहे, की एनएच १० च्या प्रकारचा , वास्तवाच्या जहालपणाची जाणीव करुन दिल्यावर येणारा सुखांत, हा पारंपारिक चित्रपटांमधल्या सुखांतासारखा नसतो. पारंपारिक चित्रपटांना एकूणच विशफुल थिंकींगचा आधार असतो, त्यांच्या लेखी सारंच मनोरंजन असतं. याउलट यासारख्या चित्रपटांना वस्तुस्थिती माहीत असते. ती प्रेक्षकांपर्यंत ठामपणे पोचवण्याचं कामही त्यांनी केलेलं असतं. त्यांचे शेवट हे फक्त प्रेक्षकांवरचा ताण किंचित कमी करण्याकरता असतात.
या विशिष्ट चित्रपटाच्या शेवटाबद्दल आणखीही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी. तो एक प्रकारचा न्याय जरुर करत असला, तरी दिग्दर्शकाने तो ज्या ठिकाणी संपवलाय त्यावरुन तो न्याय हा किती नाजुक जागी तोललाय हे स्पष्ट होतं. गोष्ट सुखांत वा शोकांत असणं,  ही ती कुठे संपवली जाते यावर ठरतं असं म्हणतात, ते उगाच नाही.

गणेश मतकरी

Read more...

ऑस्कर 2015 - अर्थपूर्णतेचा शोध

>> Sunday, February 22, 2015


यंदाच्या ऑस्कर नामांकनांना घेतल्या जाणाऱ्या आक्षेपातला प्रमुख आक्षेप म्हणजे या साऱ्या चित्रपटाना असणारं प्रायोगिक वळण.पुरस्कार व्यावसायिक चित्रपटांना दिले जाणारे असताना प्रत्यक्ष ऑस्कर पुरस्कार सोडा, पण नामांकनातही तद्दन व्यावसायिक ( चांगल्या अर्थाने) चित्रपटांना स्थान नसेल, तर लोक ऑस्कर पहायला तरी का जातील, असा एक सूर या वेळी एेकू येतो आहे. त्यात अगदी चूक म्हणण्याजोगं काही नाही.पीटर जॅक्सनच्या लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या अखेरच्या भागाने पारितोषिकांची लूट केली होती, पण त्याच दिग्दर्शकाच्या त्याच वळणाच्या हॉबिट चित्रत्रयीच्या अखेरच्या भागाचं मुख्य नामांकनात नाव नाही. क्रिस्टफर नोलनच्या डार्क नाईटने काही वर्षांपूर्वी चांगलाच ऑस्कर बझ तयार केला होता, पण त्याच्या या वर्षीच्या इन्टरस्टेलरचं जगभर कौतुक होऊनही, ऑस्करने त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात  घेतलेलं नाही. त्याएेवजी आहेत ते बरेचसे गंभीर वळणाचे, छोट्या - पर्सनल गोष्टी सांगणारे, छोटेखानी चित्रपट. त्यातल्यात्यात भव्य चित्रपट मानायचे तर दोन निघतील. छायाचित्रणात महत्वाचा प्रयोग करणारा बर्डमॅन ज्याच्याबद्दल आपण मागे बोललो , आणि अर्थात वेस अॅन्डरसनचा ' द ग्रँड बुडपेस्ट होटेल'. बर्डमॅनप्रमाणेच यालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक यांसह  नऊ विभागात नामांकनं आहेत.

अँडरसन हे एक नाव हॉलिवुडच्या साच्यात जराही न बसणाऱ्या , पण तरीही वर्षानुवर्ष याच लोकांमधे राहून, त्यांच्यातले अनेक नट वापरुन ,अत्यंत वेगळ्या धर्तीचे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांमधे अग्रणी मानता येईल. रशमोर ( १९९८) , द रॉयल टेनेनबॉम्स ( २००१), द दार्जिलींग लिमिटेड ( २००७) किवा मूनराईज किंगडम (२०१२) सारखे चित्रपट त्यांच्या विक्षिप्त विनोदाने, अवघड आशयाने आणि अनेक स्टार्सच्या अनपेक्षित भूमिकांमुळे महत्वाचे ठरतात. हे चित्रपट त्यांच्या दिग्दर्शकाबद्दल फार अनुकूल वा फार प्रतिकूल ,या दोन टोकाची मतं प्रेक्षकात तयार करु शकतात. बुडपेस्ट हा त्याचा त्यामानाने कथेच्या पातळीवर कळायला सोपा आणि गंमतीदार सिनेमा. फ्लॅशबॅक हे तंत्र कथेला चौकट टाकण्यासाठी , संदर्भ देण्यासाठी आणलेलं आपण पाहिलेलं आहे, पण इथे त्यांचा वापरही वेगळाच.

कथानक घडतं ते युरोपमधल्या रिपब्लिक ऑफ झुब्रावका या कल्पित देशात . चित्रपट सुरु होतो १९८५ मधे, तिथून मागे जात पोचतो १९६८ मधे , ग्रँड बुडपेस्ट होटेलच्या उतरत्या काळात. तिथे एका लेखकाला ( जुड लॉ ) हॉटेलचा मालक झीरो मुस्ताफा ( एफ मुरे एब्राहम) आपल्या तरुणपणची ( तरुण झीरो- टोनी रेवोलोरी)  गोष्ट सांगायला लागतो आणि आपण पोचतो थेट १९३० मधे, गुस्ताव (राल्फ फाईन्स) या मॅनेजरच्या हाताखाली भरभराट होणाऱ्या हॉटेलवर. हे चित्रपटाचं मुख्य कथानक. कथानक म्हंटलं तर थ्रिलरच्या वळणाचं, ज्यात खून , मारामाऱ्या , कारस्थानं, बदललेली मृत्यूपत्रं, जेलमधून पलायन, पाठलाग असं सारं काही येतं, पण अँडरसनचे चित्रपट हे आपल्या गतीने, आपल्या मर्जीने जातात. चित्रप्रकाराची बंधनं त्यांना पडत नाहीत. यात कथानक धडताना समोर दिसतय तितकीच  त्यामागची पार्श्वभूमीही महत्वाची ठरते. कम्युनिझम, युध्द, राजकीय अंदाधुंदी, नशीब, या साऱ्यांचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष परीणाम आपलं आयुष्य घडवतो हे इथे दिसतं. तेही अधोरेखित करण्याची गरजही न पडता.

 बुडपेस्ट जुन्या युक्त्यांना नव्या सफाईने सादर करतो. स्टॉप मोशन/ बॅक प्रॉजेक्शन ही तंत्र ज्या काळात वापरली जायची त्या काळातलं कथानक सांगताना दिग्दर्शक तीच जुनी तंत्र वापरतो. त्याचा कॅमेराही अनेकदा वापरला जातो, तो चित्रपटाची चौकट हे रंगभूमीवरलं उत्तम नेपथ्य असल्यासारखा. दृश्य संकल्पनेचा अभिजात विचार डोळ्यांपुढे ठेवत तो आपली चौकट आखतो आणि पात्रांना त्यावर स्थान देतो. शैली, साधनं यांचं जुन्या नव्याचं हे मिश्रण त्याच्या केवळ याच चित्रपटात आहे असं नाही. एका परीने तो अँडरसनचा ट्रेडमार्क आहे. वर सांगितलेले अभिनेते यात प्रमुख असले तरी एड्रीअन ब्रॅडी, विलेम डफो, जेफ गोल्डब्लूम, एडवर्ड नॉर्टन असे अनेक मोठे, लोकप्रिय  कलाकार यात छोट्या मोठ्या भूमिकांत आहेत. अँडरसनचे खास ओवेन विल्सन आणि बिल मरी देखील दर्शन देऊन जातात. केवळ या साऱ्यांनी मनापासून गंमत वाटून केलेलं काम म्हणूनही बुडपेस्ट उल्लेखनीय आहे. या दिग्दर्शकाचा जो प्रेक्षक आहे, त्यांनी चित्रपटाला आपलं म्हंटलय . ऑस्कर मिळणं न मिळणं हे आता दुय्यम आहे.

सामान्यत: ऑस्कर नामांकनांमधे चरित्रपटांना खास स्थान असतं, कारण व्यावसायिकतेतही या मंडळींचा अर्थपूर्णतेचा शोध सुरुच असतो, मग तो कमी प्रमाणात का असेना. त्यामुळेच पुस्तकं , चरित्र यांचं सहाय्य त्यांच्या अनेक चित्रपटाना मदतीचं ठरतं. यंदाच्या नामांकनात या प्रकारचे तीन चित्रपट आहेत, पण अमेरिकन स्नायपरला युध्दपटांचा अधिक मोठा संदर्भ आहे. त्या तुलनेत स्टीवन हॉकिंग यांच्या चरित्रावर आधारित जेम्स मार्श दिग्दर्शित ' द थिअरी ऑफ एव्हरीथिंग', आणि अॅलन टुरिंग या गणितज्ञाच्या चरित्रावर आधारलेला मॉर्टन टिल्डम दिग्दर्शित ' द इमिटेशन गेम ' हे अधिक सरळसोट चरित्रपट म्हणता येतील.

काही बाबतीत, या दोन्ही चित्रपटांमधे साम्य आहेत. या दोन्ही चरित्रनायकांचा आजच्या विज्ञानाशी बराच संबंध आहे. हॉकिंग यांचा काळासंबंधातला रिसर्च तर जगप्रसिध्द आहेच, वर टुरिंग यांनी कोड ब्रेकिंग यंत्रांवर केलेलं काम, हे संगणकाच्या शोधाला कारणीभूत ठरलेल्या संशोधनातलं मानलं जातं. दोघांनाही व्यक्तिगत आयुष्यात एकेका मोठ्या अडचणीशी झगडावं लागलं. मात्र फरक हा, की हॉकिंगनी त्यांच्या आजारावर मात करुन संशोधन सुरु ठेवलं, पण टुरिंगच्या काळात हॉमोसेक्शुअॅलिटीला समाजात असणारा प्रचंड विरोध त्याना एका मर्यादेपलीकडे सहन झाला नाही, आणि त्यांनी वयाच्या एकेचाळीसाव्या वर्षी आत्महत्या केली.

दोन्ही चित्रपट पाहिले तर इमिटेशन गेम  हा नक्कीच उजवा असल्याचं लक्षात येईल . नामांकनांकडे पाहूनही हे स्पष्ट व्हावं. थिअरीला दिग्दर्शनाचं नामांकन नाही. खरं तर दर्जात असा फरक असण्याचं कारण नाही. दोघांची आयुष्य तशाच नाट्यपूर्ण घटनांनी भरलेली आहेत आणि दोघांच्याही कामाचा अवाका प्रचंड आहे. तरीही हे होण्याचं एक कारण म्हणजे थिअरीच्या संहितेत हॉकिंगच्या व्यक्तीगत आयुष्याचा पुरेसा विचार झालाय, पण काम ही त्यांच्या आयुष्याची महत्वाची बाजू, कदाचित त्यांना जिवंत रहायला भाग पाडणारी प्रेरणा असूनही संहिता ते काम गृहीत धरते. क्वचित त्यांच्या थिसीसवर चर्चा होते, वा कधीतरी आपण त्यांच्या लेक्चरला हजेरी लावतो, पण ते पुरेसं नाही. बऱ्याच प्रमाणात त्यांचा मोठेपणा मानून चालावं लागतं. आता इथे अर्थात अशी अपेक्षा नाही,की चित्रपट पाहून आपल्याला हॉकिंगचं सारं संशोधन कळेल. ते तर त्यांची पुस्तकं वाचूनही कळायला कठीण आहे. पण हातपाय चालत नसताना, आवाज यंत्राच्या सहाय्याने पोचत असताना आपल्या मनावर, विचारांवर काय ताबा ठेवून हा माणूस इतक्या उंचीला पोचला असेल हे दिसणं आवश्यक होतं. थिअरी ते न दाखवता केवळ प्रेम आणि लग्नसंबंध या दोन बाजूंमधेच अडकून रहातो.

याउलट इमिटेशन गेम मात्र परिस्थितीचा सर्व अंगांनी विचार करतो. युध्दादरम्यान त्यांची भूमिका, वरिष्ठांनी उभ्या केलेल्या अडचणी, कोडब्रेकिंग मशीन उलगडल्यावरही युध्द जिंकण्यासाठी केलेला स्ट्रॅटेजीचा विचार, माणूस आणि यंत्र यांमधली तुलना, समाजाला उपकृत करणाऱ्या व्यक्तीकडे पहाण्याचं समाजाचं , वागण्यातला विरोधाभास दर्शवणारं धोरण अशा अनेक बाजू त्यात येतात. एक विशिष्ट काळ उभा करणं हे नेहमीच कठीण असतं. द इमिटेशन गेम ते उत्तमरित्या करुन दाखवतो.

गेम आणि थिअरी, या दोन्ही चित्रपटांमधे प्रमुख भूमिका करणाऱ्या नायकांना, बेनेडिक्ट कम्बरबॅच आणि एडी रेडमेनला ,  अभिनेत्याच्या भूमिकेसाठी नामांकन आहे.  या दोघांनीही काम उत्तम केलय यात शंकाच नाही, मात्र रेडमेनला मुळातच करण्यासारखं अधिक आहे. हॉकिंगना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, त्यांच्या आजाराची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. त्यांची कुठेही नक्कल होऊ न देता त्या व्यक्तीरेखेला पडद्यावर उभं करायचं, हे अतिंशय कठीण आहे. यंदा अभिनेत्यांच्या नामाकनात इतरही चांगली नावं ( स्टीव कॅरेल, ब्रॅडली कूपर , मायकल कीटन) असली तरीही या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. घोषणा व्हायचीच  काय ती बाकी आहे. अर्थात, या अशा मानाच्या पुरस्काराबाबत पारितोषिक मिळण्या इतकच नामांकनही महत्वाचं असतं. तुमच्या दर्जावर शिक्कामोर्तब करायला ते पुरेसं आहे.

काही वर्षांपूर्वी ऑस्करला सर्वोत्कृष्ट चित्रपटांची पाच नामांकनं असायची. पुढे हा आकडा वाढवून दहा पर्यंत नेण्यात आला. याला अर्थातच कारणं होती. तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या पलीकडे जाऊन अधिक विस्तृत पटावर चित्रपटांची दखल घेणं शक्य व्हावं हे एक, तर अधिक नामांकनांच्या निमित्ताने समारंभातही चित्रपट उद्योगाच्या अधिक मोठ्या तुकड्याला सामावून घेता यावं , आणि ओघानेच कार्यक्रमाचं आकर्षण अधिक वाढवून त्याची सेलेबिलीटीही वाढवावी हेदेखील तितकच महत्वाचं. यामुळे होतं काय, की दर वर्षी नामांकनांवर हक्क सांगणाऱ्यांमधे काही चित्रपट असे असतात ज्यांना नामांकनात असूनही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक मिळण्याची जराही शक्यता नाही. यंदा असे चित्रपट आहेत, ते डेमिएन चेजेलचा 'व्हिपलॅश', आवा डुवर्नेचा 'सेल्मा' आणि क्लिन्ट इस्टवुडचा ' अमेरिकन स्नायपर'.
या चित्रपटांना पुरस्कार नक्की मिळणार नाही हे जवळपास ठरल्यात जमा असलं तरी याचा अर्थ हे चित्रपट चांगले नाहीत असा मात्र मुळीच नाही. ते ऑस्करच्या गणितात बसणं कठीण आहे इतकच. यातले दोन चित्रपट, म्हणजे स्नायपर आणि सेल्मा,  हे परस्परांपेक्षा खूपच भिन्न असूनही त्यांची काही एका पातळीवर तुलना होऊ शकते. इराकच्या युध्दात शौर्य गाजवून आलेल्या आणि युध्दबाह्य परिस्थितीत मारला गेलेल्या क्रिस काईल या अमेरिकेतल्या सर्वात तरबेज नेमबाजाची शौर्यगाथा आणि मार्टीन लूथर किंगने कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी दिलेला एेतिहासिक लढा, यात तुलनेसाठी साम्यस्थळं तरी काय, असा प्रश्न पडणं साहाजिक आहे. पण उत्तर तसं सोपं आहे. या दोन्ही चित्रपटांना सत्य घटनांचा आधार आहे. या दोन्ही चित्रपटांत दिसणारे लढे हे अमेरिकेची प्रतिमा काही प्रमाणात डागाळणाऱ्या इतिहासाचा भाग आहेत.
अमेरिकन स्नायपर हा पुष्कळ चालला. इस्टवुडसारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा चित्रपट असल्याने अन चित्रपट स्वतंत्र कलाकृती म्हणून दर्जेदार असल्याने यात काही आश्चर्यही नव्हतं, पण पुढे यातून वाद उभे राहिले. चित्रपटाला ज्या युध्दाचा संदर्भ आहे, ते अाज अमेरिकन जनतेच्या डोक्यात ताजं आहे, किंबहुना व्हिएतनाम युध्दाप्रमाणेच जनता ते विसरुन जाण्याचा प्रयत्न करते आहे. अशा वेळी या युध्दातल्या  कामगिरीला लक्षवेधी ठरवणं, आणि १६० च्या वर इराकी नागरिकांचा ( युध्द परिस्थिती पहाता हे सारे सैनिक नक्कीच नव्हते. किंबहुना अमेरिकन बाजू ही इथे मुळातच वादग्रस्त असल्याने,प्रत्यक्ष इराकी सैनिकांनाही एक नैतिक अधिकार होता. त्याहूनही महत्वाचं म्हणजे काईलचे सारे बळी तरी जस्टीफाईड होते का , असाही एक प्रश्न आज डोकं वर काढून राहिला आहे. ) बळी घेणाऱ्याला नायक म्हणून चित्रित करणं , हे अनपेक्षित आहे. इस्टवुडच्या आधीच्या युध्दपटांमधे ( लेटर्स फ्रॉम आयवो जिमा आणि फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स) दिसणारा युध्दविरोधी दृष्टीकोनही इथे पुसट झालेला दिसतो . काईलची भूमिका करणाऱ्या ब्रॅडली कूपर ला इथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन आहे, पण स्वत: इस्टवुडला दिग्दर्शन विभागातून बाहेर ठेवलेलं दिसतं. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेतली ,तर सर्व सामाजिक-राजकीय संदर्भ विसरल्यास चांगला वाटणारा हा चित्रपट वा त्यातला अभिनेता ,स्पर्धेत टिकाव धरतीलसं वाटत नाही.
'सेल्मा' मधला कृष्णवर्णीयांचा नागरी हक्कांचा लढाही वॉर ऑन टेरर इतकाच विसरण्याजोगा, कदाचित थोडा अधिकच. मात्र त्याला आता बराच काळ लोटल्याने , आणि चित्रपट योग्य बाजूच उचलून धरत असल्याने ऑस्कर नामंकन योग्यच, अपेक्षितही. मात्र प्रत्यक्ष ऑस्कर पुरस्कारांमधला कृष्णवर्णीयांचा इतिहास लक्षात घेतला, तर सेल्मा जिंकणं केवळ अशक्य. सेल्मा घडतो, तो १९६४ मधे मार्टीन लूथर किंगना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरच्या काळात अन त्यात दिसतो तो मतदानाच्या मूलभूत हक्कासाठी दिलेला लढा . कागदोपत्री कृष्णवर्णीयांना हक्क मिळाल्यानंतरही ते अंमलात आणण्यासाठी गोऱ्यांकडून झालेला विरोध, प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी ठाम पाठींबा देताना केलेली टाळाटाळ आणि  लढ्यादरम्यान झालेले अनन्वित अत्याचार, हे सारं सेल्मा अतिशय प्रखरपणे दाखवतो. आपल्या प्रेक्षकाकरता ज्याप्रमाणे लिंकन मधले तपशील काहीसे अवघड होते, तसेच इथलेही आहेत, पण दृश्य रुपात सेल्मा हा अधिक वरचढ आहे.
मार्टीन लूथर किंग ( डेव्हिड ओयेलोवो) ही व्यक्तिरेखा इथे प्रमुख असली तरी हा लिंकनसारखा एकखांबी तंबू नाही. याचा फोकस प्रामुख्याने एका घटनाक्रमावर असला तरी त्यातलं अनेक पातळ्यांवर चालणारं विस्तृत राजकारण, त्याबरोबरच प्रत्यक्ष लढा, यांमुळे ही भूमिका इतरांबरोबर विभागली जाते. तरीही या भूमिकेला ऑस्कर नामांकन मिळणं हे योग्य झालं असतं. ते नं मिळणं हे आश्चर्यकारक तर आहेच, वर ते अधिक आक्षेपार्ह्य वाटतं ते यासाठी ,की हे महत्वाचं नावं वगळल्यामुळे यंदाच्या अभिनयाच्या २० जणांच्या नामांकन यादीत एकही कृष्णवर्णीय नाव उरत नाही. त्यात भर म्हणजे सेल्माची दिग्दर्शिका आवा डुवर्ने, हिलाही दिग्दर्शनाचं नामांकन मिळालेलं नाही. गेल्या वर्षी १२ इअर्स ए स्लेव च्या केलेल्या कौतुकाचं हे उत्तर म्हणावं का?
आपण गेले काही आठवडे चर्चा करत असलेल्या नामांकन यादीतलं कदाचित सर्वात वेगळं आणि अतिशय लक्षवेधी नाव म्हणायचं तर व्हिपलॅशचं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे बॉयहूड हा इंडी वर्गात बसणारा होता, त्याचप्रमाणे व्हिपलॅशदेखील आहे, पण हा बॉयहूडइतका संकल्पनेच्या पातळीवर महत्वाकांक्षी प्रयोग नाही. ही एका व्यक्तिगत अनुभवासारखी छोटी गोष्ट आहे.  तिची निर्मितीही छोट्या स्केलवरच केलेली आहे. मात्र ती पडद्यावर पहाणं हे थक्क करुन सोडणारं आहे.
हायस्कूलमधे शिकणारा आणि पुढे ड्रमर होऊ पहाणारा एक विद्यार्थी, आणि आपल्या चेल्यांकडून हवं ते काढून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा शाळेच्या बँडचा कन्डक्टर, यांमधल्या युध्दाचं हे चित्रण आहे.  दिग्दर्शक चेजेल याने ते स्वानुभवावर आधारल्याचं मानलं जातं.

सामान्यत: शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातं सांगणारे चित्रपट संवेदनशील वळणाचे असतात असं दिसतं.  गुड विल हन्टींग पासून तारें जमीं पर पर्यंत याची अक्षरश: शेकडो उदाहरणं देता येतील. व्हिपलॅश या साऱ्यांपासून वेगळा आहे. पहिल्याच प्रसंगात आपल्याला १९ वर्षांचा अँड्रू ( माईल्स टेलर) आणि कन्डक्टर फ्लेचर ( जे के सिमन्स , सहाय्यक अभिनेत्यांच्या नामांकनातलं महत्वाचं नाव)  यांच्यातली जी तणावपूर्ण भेट दिसते, ती आपल्याला पुढल्या भागात संपूर्णपणे गुंतवते. चित्रपट जो टोन पकडतो, तो एखाद्या थ्रिलरसारखा आणि पुढे काय घडणार याची उत्कंठा आपल्याला ग्रासून टाकते. अँड्रू आणि फ्लेचर यांच्यात तयार होणारं दहशतीचं नातं, त्यातून दिसणारे मानसिक ताण  तणाव, गुरुशिष्यातल्या नात्याचे सहसा संबोधले न जाणारे पदर आणि या दोन्ही बाजूंबद्दल निघणारे  काय बरोबर-काय चूक या संबंधातले निष्कर्ष यातून एक अविस्मरणीय चित्रपट तयार होतो. शेवटच्या कॉन्सर्टमधे फ्लेचरने मांडलेला ट्रॅप आणि त्यातून अँड्रूत होत गेलेला बदल हे सिनेमा या माध्यमाचा परिणाम आपल्यावर नव्याने ठसवायला पुरेसं आहे. काहीही नेत्रदीपक , चमत्कृतीजन्य विषय नसताना, भव्य स्पेशल इफेक्ट नसताना , वरवर साधा विषय असताना दिग्दर्शक आपल्या कथानक सांगण्याच्या पध्दतीमधून काय चमत्कार करु शकतो, ते व्हिपलॅश पाहून समजतं. त्याला पुरस्कार मिळणार नाही हे माहीत असूनही, तो मिळावा असं निश्चित वाटतं, तेही त्यामुळेच.

माझ्या अनुभवानुसार या आठ चित्रपटांमधल्या स्पर्धेत कोण जिंकेल कोण हरेल याबद्दल अंदाज बांधणं हे म्हंटलं तर कठीण आहे , म्हंटलं तर सोपं. ही निवड होते, ती छोट्या ज्युरींमधून नाही, तर सर्व अॅकेडमी मेम्बर्सनी केलेल्या मतदानातून, त्यामुळे कस केवळ चित्रपटाच्या दर्जाचा लागत नाही,तर चित्रपटसंस्था आपले चित्रपट कसे, किती लोकांपर्यंत पोचवतात याचाही लागतो. ऑस्कर पुरस्कारांची वेळ जसजशी जवळ येत जाते, तसं येणाऱ्या बातम्या, वाढती लोकप्रियता, चर्चा, प्रसिध्दी, वाद, यांमधून हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागतं. आज विचारलं तर मी ठामपणे एवढच सागू शकतो, की बर्डमॅन आणि बॉयहूड, यांमधला एक चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरेल. त्यांचे विषय, त्यांचा अवाका, त्यांचं सादरीकरण, आणि त्यांचं होणारं कौतुक ,हे सारं पाहून तसं या घडीला तरी वाटतं. बाकी आपण लवकरच पहाणार आहोत. शुभेच्छा तर साऱ्यांनाच आहेत,' मे द बेस्ट फिल्म विन ! '

- गणेश मतकरी

Read more...

बॉयहूड- बारा वर्षांचा प्रवास

>> Friday, February 13, 2015


अॅन्डी वॉरहॉल या वादग्रस्त कलाकाराचा एक चित्रपट आहे. 'एम्पायर' नावाचा. लांबी आठ तासाच्या आसपास. त्यात कलाकार कोण म्हणायचं, तर फक्त एम्पायर स्टेट बिल्डींग.  एका विशिष्ट जागी कॅमेरा लावून सूर्यास्तापासून ते रात्रीच्या एका प्रहरापर्यंत या इमारतीचं केलेलं हे चित्रण. सूर्यास्ताची वेळ , मग काळोख, दिवे लागणं , या प्रकारे हे चित्रण पुढे सरकतं. घडत म्हंटलं तर काहीच नाही, पण हे 'काहीच नाही', चिकार काळ घडतं. २०१४ मधे या चित्रपटाचा एक पूर्ण लांबीचा खेळ करण्यात आला. आणि तो पहाताना कंटाळा येणार हे गृहीत धरून गेलेले प्रेक्षकही या वरवर साध्या चित्रपटाच्या ताकदीने गडबडले. हा चित्रपट करतो काय, तर काळाची नोंद ठेवतो . आणि चित्रपटाची काही घडण्याची, घडवण्याची गरज संपली की प्रेक्षक लहान सहान गोष्टींमधे अडकत जातो. इमारतीवरल्या दिव्यांचे पॅटर्न, काचेवरची प्रतिबिंब, अंधारात दिसणारा इमारतीचा भारदस्त आकार, इतरही. अर्थात, एम्पायर हा एक प्रयोग आहे. चित्रपट हा परिचित आकार, माध्यम वापरत असला तरी तो मानला जातो तो कलाकृती म्हणून. त्याला रिअल वर्ल्ड अॅप्लिकेशन नाही. मात्र त्या पातळीवर जाऊ शकणारी  कलादृष्टी आणि  विचार असणारा आणि तो प्रेक्षकांना कळेलशा पध्दतीने त्यांच्यापर्यंत पोचवू शकणारा, मला वाटतं रिचर्ड लिंकलेटर हा एकमेव दिग्दर्शक आज समांतर आणि व्यावसायिक अमेरिकन चित्रपटात कार्यरत असेल. त्यामुळेच, यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत 'बर्डमॅन' खालोखाल महत्वाचा चित्रपट म्हणून त्याच्या ' बॉयहूड' कडे पहावं लागेल.

काळाला आपल्या चित्रपटात पकडण्याचा लिंकलेटरचा प्रयत्न जुनाच आहे. त्याच्या बीफोर चित्रत्रयीत ( बीफोर सनराईज, बीफोर सनसेट, बीफोर मिडनाईट) मधे त्याने जेसी आणि सेलीन या दोन पात्रांना आपल्याला नऊ नऊ वर्षांच्या कालावधीने भेटवलं, मात्र हे अंतर केवळ चित्रपटातल्या काळात नव्हतं, तर चित्रीकरणाच्या काळातही (१९९५/२००४/२०१३) होतं. त्यामुळे व्यक्तीरेखांमधला बदल हा संपूर्ण होता. त्यांच्या वयात, अनुभवात, व्यक्तीमत्वात दिसणारा होता. बीफोर मालिका आणि बॉयहूडची तुलना केली, तर दिसतं, की  बॉयहूडमधे या दिग्दर्शकाने एक पाऊल पुढेच टाकलं आहे.

बॉयहूडचा चित्रप्रकार पहायचा तर त्याला 'कमिंग ऑफ एज' चित्रपट म्हणता येईल. म्हणजे बालपण सरुन वयात येण्याचा मोठा टप्पा दाखवणारा चित्रपट. मात्र इथलं वयात येणं केवळ कथेपुरतं नाही, तर इथे आपण चित्रपटाच्या नायकाच्या भूमिकेतल्या एलार कोल्ट्रेनला,  आपल्या डोळ्यांसमोर वाढताना, मोठं होताना पाहू शकतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून ते थेट अठराव्या वर्षापर्यंत. ते शक्य व्हावं म्हणून चित्रपटाचं शेड्यूलही २००२ ते २०१३ असं लांबच लांब ठरवलं गेलं, आणि लिन्कलेटर आणि त्याच्या कलाकारांनी दरवर्षी थोडा थोडा भाग चित्रीत करत चित्रपट पूर्णत्वाला नेला. आपल्यासारख्या, पडद्यावर धावताधावता दहा ते पंचवीस अशी वयाची उडी मारणाऱ्या नायकांचे हिंदी चित्रपट रिचवलेल्या  प्रेक्षकांना, हे असं काही घडवलं जाऊ शकत हा एक  कल्चर शॉकच आहे, पण कोणत्याही देशात, चित्रपटसृष्टीत, या प्रकारचा प्रयोग हा दुर्मिळच ठरावा.

कोल्ट्रेनने रंगवलेली मेसन ईव्हान्स ज्यु. ही एकच व्यक्तीरेखा इथे आपल्याला डोळ्यांसमोर वाढताना दिसते असंही नाही, तर एक संपूर्ण कुटुंब दिसतं. मेसनची बहिण समॅन्था हिच्या भूमिकेतली लिंकलेटरची मुलगी लोरेली , आणि आईबापाच्या भूमिकेतले पॅट्रिशिआ आर्केट ( ऑलिविआ इवान्स) आणि बीफोर चित्रत्रयीसह  लिंकलेटरच्या चित्रपटात वेळोवेळी दिसणारा इथन हॉक ( मेसन इवान्स सि.) या चौघांचं हे कुटुंब आहे. या चारही अभिनेत्यांना या कालावधीत हळूहळू सहजपणे बदलत जाताना पहाणं हा एक अद्भुत प्रकार आहे. खासकरुन त्या दोन पोरांना, कारण त्यांच्यातला बदल अधिक मूलभूत स्वरुपाचा, त्यांचं व्यक्तिमत्व घडवणारा आहे.

आता बारा वर्ष चालणारी कथा, म्हणजे घडवणार तरी काय, हा प्रश्नच व्यर्थ आहे, कारण सामान्यत: ज्या प्रकारची गती चित्रपटांना दिली जाते तशी गती , तसं नाट्य इथे अपेक्षितच नाही. इथे जे नाट्य आहे, ते वास्तवाशी जोडलेलं, सामान्य माणसांच्या आयुष्यात ज्या प्रकारे ते येऊ शकेल तेवढं आणि तेवढच. पण त्याला तरी कमी कसं म्हणायचं. एक सहा वर्षांच्या मुलाचं आपल्या डोळ्यांसमोर  एका तरुणात रुपांतर होणं यापेक्षा अधिक नाट्यपूर्ण काय असेल?

असं असूनही, हा माहितीपट नाही. त्याला एक रचना आहे. त्यातल्या व्यक्तिरेखांना एक चढा आलेख आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतं ते पॅट्रिशिआ आणि तिची मुलं, यांचं तीन माणसांचं कुटुंब. तिची ओढाताण, तिने पुढलं शिक्षण घ्यायचं ठरवणं आणि आपल्या आईकडे रहायला जाणं . मुलांची बसून गेलेली घडी त्यातून विस्कटणं आणि एका नव्या जागी ती बसवणं भाग पडणं. पॅट्रीशिआ आणि मेसन सि. हे एकत्र रहात नाहीत,आणि पॅट्रीशिआचा त्याच्या निष्काळजीपणावर पूर्ण विश्वास आहे, पण दोघांनाही एकमेकांचं मुलांवर प्रेम आहे हे माहीत आहे, आणि हे संबंध टिकावे म्हणून ते जमेल ते सगळं करतात. पुढे या सर्वांच्याच आयुष्यात अनेक स्थित्यतरं येत जातात, पण नातं टिकवण्याचा प्रयत्नही केला जातो, अगदी प्रामाणिकपणे.

हे घडताना आपल्याला अमेरिकन आयुष्याची एक छान, साधी झलक मिळत रहाते. ज्या काळात हे सारं घडतय, तो काळही अगदी साध्या तपशीलांमधून नोंदवला जातो. हे तपशीलही अगदी ठळक असण्याची गरज नसते.  मेसनने केस वाढवणं, त्याच्या सावत्र वडीलांनी त्याच्या मनाविरुध्द ते भादरुन टाकणं आणि या बदललेल्या लुकला वर्गातल्या एका मुलीची पसंती मिळणं, इतक्या साध्या गोष्टींनीही आपल्याला त्या काळाचा एक संदर्भ तयार होऊ शकतो. आपण या साऱ्या घडण्याला जवळून पहातो, एखाद्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य न्याहाळत असल्याप्रमाणे. अर्थात बारा वर्ष या साऱ्याना एकत्र सलगपणे पाहिल्याने, आणि त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे न्याहाळल्याने आपल्याला थेटपणे  या व्यक्तीरेखांबद्दलचीआणि अप्रत्यक्षपणे एकूणच जगण्याबद्दलची एक दृष्टी तयार होते. यातले मेसन आणि समॅन्था मोठे होऊन जसे बनतात, जे बनतात त्यात त्यांच्या मूळ प्रवृत्तीचा भाग किती? विभक्त कुटुंबाचा त्यांच्या संवेदनशीलतेवर काही परिणाम झाला असेल का? मेसन सि. चा सत्प्रवृत्त अव्यवस्थितपणा आणि पॅट्रीशिआचं मुलांना जपत रहाणं नसतं, तर ही मुलं कोणी वेगळीच आली असती का?

आपण हाय कॉन्सेप्ट सायन्स फिक्शन, वा फिलॉसॉफिकल वळणाच्या चित्रपटांमधे फ्री विल विरुध्द डिटर्मिनिझम हा झगडा पहातो. माणसाला निर्णयाचं स्वातंत्र्य आहे का तो केवळ एका ठराविक रस्त्यावरच चालू शकतो, हा प्रश्न जितका त्या चित्रपटांमधे महत्वाचा आहे ,तितकाच इथेही, कारण इथे तो कोणत्या कल्पनाविष्काराशी जोडला नसून वास्तवाशी संबंधित आहे. यातल्या मेसन वा समॅन्थाला आपला रस्ता निवडायचं स्वातंत्र्य आहे की ते ज्या परिस्थितीच्या चौकटीत आहेत, ती चौकटच त्याचा रस्ता आखून देतेय असा हा प्रश्न. व्यक्ती आणि समाज यांच्या परस्परसंबंधाचा विचार करायला लावणारा. तोही आपण काही फार नवं करतोय, असा अविर्भाव न आणता.

बॉयहूड ऑस्कर मिळवेल अशा भ्रमात मी नाही, खरं तर त्याला ते मिळालं, तर मला थोडी फसगतच झाल्यासारखं वाटेल. कारण बॉयहूड चं वळण हे व्यावसायिक चित्रपटांचं नसून इंडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंडीपेन्डन्ट सिनेमा या संस्कृतीचं आहे. त्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि ऑस्करच्या आदल्या रात्री दिल्या जाणाऱ्या इंडीपेन्डन्ट स्पिरीट अवॉर्ड्समधेही बॉयहूडला नॉमिनेशन आहेच. आणि ते अवॉर्ड बॉयहूडने मिळवणं , हे ऑस्कर मिळवण्यापेक्षा अधिक योग्य होईल. ऑस्कर ही व्यावसायिक चित्रपटांसाठी दिली जाणारी पारितोषिकं आहेत, आणि आशयाबरोबरच व्यावसायिकता दिसणं हे त्या पुरस्कारासाठी आवश्यक वाटतं, जे बॉयहूडमधे जवळजवळ नाहीच. पण कोणी असंही विचारु शकतं , की मग या किंवा अशा चित्रपटांना ऑस्कर नामांकन तरी का मिळावं, तर त्याचं उत्तर हे, की नामांकनं ही अनेकदा कामाचा मान ठेवण्यासाठीही असतात. हे दिग्दर्शक महत्वाचं काम करतायत आणि ते काम अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅन्ड सायन्सेस ने अर्थात हॉलिवुडने ओळखलय असा त्या नामांकनांचा अर्थ असू शकतो. पुरस्कार जेवढा महत्वाचा तेवढंच हे नामांकनही, याबद्दल कोणतीही शंका असू नये.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP