किडनॅप- ऍक्‍शन कोलाज

>> Wednesday, October 29, 2008


"किडनॅप' चित्रपटात अनेक उघड दोष आहेत. मात्र केवळ हे दोष म्हणजे हा चित्रपट नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध नक्कीच चांगला आहे. पटकथेतल्या मुख्य पात्रांचं स्वतंत्र अस्तित्व, चांगलं चित्रीकरण, इमरान खानचा विचारी अभिनय ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत.

हॉलिवूडची उचलेगिरी शोधणं, हे तसं जिकिरीचं आणि खरं तर निरर्थक काम असतं. कारण मुख्यतः ही आयात ही लोकांना परकीय कलाकृतीचे विशेष दाखवण्याच्या प्रामाणिक हेतूनं आणि त्यांचं ऋण मान्य करून केलेली नसते, तर स्वतंत्र विचार करण्याचे कष्ट टाळणं आणि मुळात दुसऱ्या कोणीतरी स्वतंत्रपणे कल्पिलेल्या कल्पनांना रिसायकल करून वेळ मारून नेणं, एवढाच हेतू त्यामागे सामान्यतः संभवतो. साहजिकच कल्पना आपला मूळ संदर्भ सोडून आपल्या व्यवसायाच्या अलिखित नियमांशी अन्‌ प्रेक्षकांच्या मानसिकतेशी जुळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि परिणामी त्या ना आपल्या राहत, ना त्यांच्या.
या सर्व प्रकारात कथावस्तूंची संपूर्ण आयात होत नाही, तर सुटे सुटे चमकदार प्रसंग/ प्रसंगमालिका/ स्टंट्‌स/ छायाचित्रणातल्या क्‍लृप्त्या असं काही ना काही घेऊन विविध ठिकाणी सुचेल तसं चिकटवलं जातं. एकेक हिंदी चित्रपट हा किमान दोन तीन परभाषिक (कारण आता आपण फक्त हॉलिवूड नव्हे, तर जागतिक चित्रपटांमधून उचलेगिरी करतो.) चित्रपटांना आपलंसं करून काढला जातो. काही काही चित्रपटांत तर हे उचललेले क्षण इतक्‍या प्रमाणात असतात, की संपूर्ण चित्रपट हा एक कोलाज होऊन बसतो. अशा वेळी मग चित्रपटाच्या संदर्भाकडे दुर्लक्ष करणं आणि कोलाजकडे स्वतंत्रपणे पाहून काही अर्थ लागतो का हे पाहणंच, योग्य ठरतं.
संजय गढवी हे अशा कोलाज आर्टिस्टमधलं यशस्वी नाव आहे. दोन्ही "धूम' आणि आता "किडनॅप' हे इतक्‍या प्रचंड प्रमाणात परकीय कल्पनांवर आधारित आहेत, की त्यांना स्वतंत्र म्हणणं हे धाडस ठरावं. मग हे पाहताना करण्यासारखी गोष्ट हीच, की ते ज्या "थ्रिलर' या चित्रप्रकाराचं नाव लावतात, त्याच्याशी ते प्रामाणिक राहतात का? जी गोष्ट सांगायला ते सुरवात करतात, तिची गती आणि आलेख ते अखेरपर्यंत चढवत नेऊ शकतात का? ज्या व्यक्तिरेखांना ते प्रेक्षकांपुढे आणतात, त्या कचकड्याच्याच राहतात, की त्यांना एक आकार येऊ शकतो?
या दिग्दर्शकांच्या चित्रपटांतला सर्वांत फसवा आणि न जमलेला होता "धूम-2,' तरी त्याच्या या फसवाफसवीचा बॉक्‍स ऑफिसवर फार परिणाम झाला नाही. "किडनॅप' हा त्याचा सर्वांत बरा चित्रपट आहे, जरी त्याच्या अनइव्हन असण्यामुळे आणि मर्यादित ग्लॅमरमुळे तो "धूम' इतका जोरदार चालेल असंही सांगता येत नाही.
"किडनॅप' सर्वांत बरा म्हटला म्हणजे तो सर्वगुणसंपन्न आहे अशातला भाग नाही. उलट त्याच्यात उघड दोष अनेक आहेत. यांतले बहुतेक दोष हे दिग्दर्शकाच्या शैलीशी निगडित आहेत आणि जे त्याच्या सर्व चित्रपटांत आढळतात. उदाहरणार्थ व्यक्तिरेखांच्या संकल्पनेविषयी त्याच्या ठरलेल्या कल्पना. नायिकेनं किती बारीक असावं, कसं दिसावं, कसे कपडे घालावेत याबद्दल तो फार मेहनत घेताना दिसतो. मात्र सर्व चित्रपटांना किंवा सर्व नायिकांना तेच नियम लागू होत नाहीत. मिनिषा लांबा ही अभिनेत्री इथं सेक्‍स सिम्बॉल म्हणून रिइन्व्हेन्ट करण्याचा गढवीचा प्रयत्न हा "किडनॅप'च्या अतिशय मूलभूत दोषांमधला एक दोष आहे. या प्रयत्नांमुळे ही व्यक्तिरेखा कधीच खरी होत नाही आणि अनेकदा हास्यास्पद होते.
स्वतःच्या मर्जीसाठी किंवा काही उसन्या कल्पना कथानकात बसवण्याच्या प्रयत्नांमुळे प्रेक्षकांच्या कॉमन सेन्सकडे दुर्लक्ष करणं हा आणखी एक दिग्दर्शकीय दोष. जेव्हा दिग्दर्शक एखादी घटना वास्तव जागेत रचतो, तेव्हा त्याचे काही नियम पाळण गरजेचं असतं. जेव्हा तो म्हणतो की ही मुंबई आहे, तेव्हा तिथली पात्र ऊठसूट मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जायला लागलेली बरी वाटत नाहीत किंवा संजय दत्तची व्यक्तिरेखा मुंबईहून (म्हणजे नक्की कुठून ते माहीत नाही) पनवेलला जाताना तिला वाशी पुलाबरोबरच गोव्यातली मांडवी नदीवरची फेरीबोट लागणंही फारसं पचत नाही. जेव्हा दिग्दर्शकाला असं स्वातंत्र्य घ्यायचं असतं, तेव्हा त्यामागे तितकंच महत्त्वाचं कारण असावं लागतं किंवा मग मुंबई/ पनवेल अशी काही विशिष्ट जाणिवा, विशिष्ट पार्श्‍वभूमी असलेली नावं वापरण्यापेक्षा त्यानं सरळ काल्पनिक विश्‍वातच ही गोष्ट घडवणं योग्य ठरतं.
मध्यंतरापर्यंत "किडनॅप' हा या "गाढवीझम'मुळे फारसा परिणामकारक होत नाही आणि यथातथाच राहतो. त्यातल्या व्यक्तिरेखाही पोकळच राहतात. नायिका सोनियाचं (मिनिषा लांबा) किडनॅप होणं, तिच्या आईनं (विद्या माळवदे) हवालदिल होऊन आठ वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या आपल्या नवऱ्याला, उद्योगपती रायनाला (संजय दत्त) पाचारण करणं, किडनॅपर कबीरनं (इमरान खान) पैसे नाकारून रायनाबरोबर उंदरामांजराचा खेळ सुरू करणं, यातच हा भाग खर्ची पडतो. एव्हाना आपण दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपट माहीत असून येण्याचा धोका का पत्करला, अशा विचारात पडलेले असतो. मध्यंतरानंतर मात्र पटकथेचा सरधोपटपणा जाऊन तिच्यात अचानक बदल होतो आणि आपण या पात्रांच्या जवळ यायला लागतो.
मध्यंतरानंतर थोड्याच वेळात एक पाठलाग आहे. ज्याचं कसिनो रोयालमधल्या पाठलागावरून बेतलेलं असणं आपण विसरायचं म्हणूनही विसरू शकत नाही; पण एक मात्र आहे- या पाठलागाचं पटकथेत बसणं आणि त्याचं चित्रीकरण हे उत्कृष्ट आहे. बंगल्यात सुरू होऊन कन्स्ट्रक्‍शन साईटवर संपणारा हा पाठलाग "भरधाव' या शब्दाचं दृश्‍यरूप आहे. प्रत्यक्ष पात्रांची गती, त्याबरोबर अचूकपणे समतोल साधणारी कॅमेऱ्याची गती आणि दोन्ही व्यक्तिरेखांच्या प्रत्येक टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांचा जलदपणा यांचा हा मिलाफ आहे. यात कुठं प्रत्यक्ष अभिनेते आहेत, कुठं स्टंटमन वापरण्यात आले आहेत, कुठं केबल्ससारख्या उपकरणांचा प्रत्यक्ष स्टंटमध्ये वापर आहे किंवा कुठं संगणकाचा वापर आहे, हे जवळजवळ अदृश्‍य आहे. या पाठलागापासून पुढला कथाभाग हा आधीच्या भागाला न शोभण्याइतका चांगला आहे आणि त्याचा दर्जा शेवटपर्यंत टिकणारा आहे.
"किडनॅप' त्याच्या सर्व मर्यादांसह मला आवडला त्यामागे अनेक कारणं आहेत. किडनॅपिंगची गोष्ट असूनही त्याला खलनायक नाही; दोन्ही नायकच आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पात्रं सारख्या पातळीवर डेव्हलप होणं आणि प्रेक्षकांनी दोघांबरोबरही आयडेन्टीफाय करणं कठीण असतं. "किडनॅप' ते करू शकतो. त्यातल्या संघर्षाचं स्वरूपही असं आहे, की त्याचा समाधानकारक शेवट असणंही कठीण आहे. समाधानकारक म्हणजे दोन्ही व्यक्तिरेखांना न्याय देणारा. बहुधा असे चित्रपट नाट्यपूर्णतेसाठी किंवा एखाद्या नटाला अधिक महत्त्व आणण्यासाठी दुसऱ्या व्यक्तिरेखेवर अन्‌ पर्यायानं ती निभावणाऱ्या नटावर अन्याय करतात. "किडनॅप' हे होऊ देत नाही. तो या दोन्ही पात्रांमधल्या झगडा न्याय्य पद्धतीनं मिटवतो. नाही म्हणायला मात्र रायनावर कबीरनं सोपवलेल्या काही कामगिऱ्या तो अगदी बाळबोध पद्धतीनं पुऱ्या करतो (उदाहरणार्थ कबीरच्या मित्राची जेलमधून सुटका) पण शेवटाचं योग्य वळण, हे आपण या आधीच्या भागाला माफ करण्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं.
"किडनॅप'मधल्या दोन्ही पात्रांच्या प्रेरणाही खऱ्या वाटणाऱ्या आहेत. कबीरचा राग आणि तो शमवण्याचा त्याचा मार्ग आततायी असला तरी पटण्यासारखा आहे. त्याचबरोबर रायनालाही बाजू आहे. म्हणजेच पात्रं केवळ पटकथेच्या सोयीसाठी तयार झालेली नाहीत; त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.
बहुधा मी अभिनयावर बोलणं टाळतो, मात्र इथं इमरान खानवर बोलणं गरजेचं आहे. "किडनॅप'मध्ये तो "जाने तू....' इतका कम्फर्टेबल नाही; मात्र तो विचारी अभिनेता असल्याचं त्याच्या दोन्ही भूमिकांतून दिसतं. त्याचे दोन्ही चित्रपट आपल्या विचारी नट अशीच प्रतिमा असलेल्या मामाच्या पहिल्या दोन चित्रपटांशी समांतर आहेत (कयामत से कयामत तक ही रोमॅंटिक लव्ह स्टोरी होती, तर "राख' हा सूडपट) हादेखील योगायोग. "किडनॅप'मध्ये संजय दत्तसारख्या कसलेल्या नटाहून तो प्रभावी ठरतो, यातच सगळं आलं. त्याचं कामदेखील चित्रपट आवडण्याचंच एक कारण. "किडनॅप'मधले दोष उघड आहेत, अन्‌ कोणालाही सहज दिसणारे. मात्र केवळ हे दोष म्हणजे हा चित्रपट नव्हे. या एका चित्रपटावरून हा दिग्दर्शक सुधारतोय असं विधान करणं धाडसाचं ठरेल; पण निदान आशेला जागा आहे.

- गणेश मतकरी

Read more...

ल जेटी आणि ट्वेल्व्ह मंकीज - विज्ञानापलिकडे ते विज्ञानकथा

>> Monday, October 27, 2008


१९६२चा ल जेटी हा पूर्ण लांबीचा चित्रपट नाही. विज्ञानपटाशी नातं सांगणारी ही एक अठ्ठावीस मिनिटांची शॉर्ट फिल्म आहे, मात्र उल्लेखनीय चित्रपटीय प्रयोग म्हणून तिचं नाव आजही घेतलं जातं. ल जेटीचं एक थेट चित्रपट रुपांतरदेखील आहे, ते म्हणजे टेरी जिलिअमने १९९५मध्ये केलेला ट्वेल्व्ह मन्कीज. सायन्स फिक्शन आणि स्पेशल इफेक्ट्स या शब्दांची हल्ली एक जो़डी बनून गेली आहे. ज्या जो़डीत एकाशिवाय दुस-याला अस्तित्व नाही. मात्र विज्ञानपटांचं खरं आकर्षण हे स्पेशल इफेक्ट्समध्ये नाही. किंवा असल्यास त्याची गरज नाही. खरे बुद्धीला चालना देणारे विज्ञानपट हे या इफेक्ट्सवर अवलंबून असत नाहीत. तर काळ/भविष्य/त्यांच्या परस्परसंबंधातून तयार होणा-या विसंगती यासारख्या बुद्धीला चालना देणा-या कल्पनांना त्यामध्ये प्राधान्य असतं. ल जेटीमध्येही तसंच आहे, मात्र स्पेशल इफेक्ट्स तर सोडाच इथे तर दिग्दर्शक क्रिस मार्करने चित्रपटाच्या मूळ संकल्पनेत अभिप्रेत असलेल्या हालचालींनादेखील कात्री लावली आहे. ही केवळ एक स्टिल फोटोग्राफ्सची मालिका आहे, आणि या मालिकेच्या अनुषंगाने येणारे, त्रयस्थपणे मुद्रित करण्यात आलेलं निवेदन.
खरं तर कथेत दृश्यात्मकतेला वाव आहे, पण तो वापरण्यासाठी जाणूनबुजून खोटे वाटणारे (त्या काळी निश्चितच) तांत्रिक चमत्कार न करता इथे प्रयत्न होतो, तो या फोटोमधल्या दृश्यरचनेला अधिक अर्थपूर्ण आणि विचारांना चालना देणारा बनवण्याचा. गतीचा आभास तयार होतो तो जोडकाम वापरलेल्या संकलीय क्लृप्त्यामधून. पॅरिसमध्ये घडणारा ल जेटी सुरू होतो, तो आई वडिलांबरोबर विमानतळावर आलेल्या एका छोट्या मुलापासून. इथे हा मुलगा पाहतो एका तरुणीचा चेहरा आणि दुसरं काहीतरी जे त्याला आयुष्यभर लक्षात राहील.
पुढे लवकरच तिसरं महायुद्ध होतं आणि बेचिराख फ्रान्समध्ये अणुहल्ल्यापासून जिवंत बचावलेले मोजके नागरिक जमिनीखाली आपली वस्ती तयार करतात. विमानतळावरला छोटा मुलगा आता मोठा झालेला असतो आणि आपली त्या संध्याकाळची आठवण जिवापाड जपत असतो.
आता या मुलावर, म्हणजेच नायकावर नजर पडते ती वस्तीतल्या वैज्ञानिकांची, ज्यांचे कालप्रवासावर प्रयोग सुरू असतात. योजना असते, ती कोणालातरी भविष्यकाळात पाठवून मदतीची व्यवस्था करण्याची, मात्र आजवर प्रयोग यशस्वी झालेला नसतो. नायकाच्या भूतकाळातल्या आठवणींमुळे काळाशी त्याचा घट्ट धागा असतो. हा धागा वापरून त्याला आधी भूतकाळात पाठवून कितपत यश येतं ते पाहावं असं ठरतं. नायक भूतकाळात जातो आणि त्याच्या आठवणीतल्या मुलीला भेटतो. आता एक काळापलीकडे जाणारी प्रेमकहाणी सुरू होते. जिचा शेवट सुखात होणं तर अशक्यच असतं. मात्र जे घडतं ते पूर्णपणे अनपेक्षित असतं.
गतिमान कॅमेराऐवजी फोटोग्राफ्सचा वापर हे ल जेटीच्या वैशिष्ट्यांमधलं एक वैशिष्ट्य. निवेदनामार्फत सुरूवात आणि शेवट एकत्र बांधण्याचा प्रयोग हे दुसरं. कथानकाला विज्ञानाचा वरपांगी आव आणला असला तरी ही फिल्म मुळात वैज्ञानिकतेची चाैकट मानत नाही. त्यातली कथासूत्र ही अनेक विषयांचा विचार स्वतंत्रपणे करताना दिसतात. आठवणींचं स्वरूप, शरीरसंबंधांपलीकडे जाणारं प्रेम, भविष्याबद्दलची अनिश्चितता, असुरक्षितता आणि त्याचवेळी प्रत्येकाचं प्राक्तन निश्चित असतं. यावरचा विश्वास अशा अनेक विषयांना या थोडक्या वेळात स्थान दिलं जातं.
अणुयुद्ध, कालप्रवास यासारख्या भव्य कल्पनांनाही किती साधेपणाने प्रेक्षकांपुढे मांडता येतं. आणि प्रेक्षकही त्या किती चटकन गृहीत धरतात. याचं हा चित्रपट उदाहरण आहे. कृष्णधवल असल्याचा फायदाही त्याला जरूर मिळाला आहे, कारण रंगीत स्थिरचित्रणात असणारा नको इतका अस्सलपणा काळ्या-पांढ-यात अस्पष्ट करणं आणि एरवीच्या साध्या गोष्टींनाही अधिक भेडसावणारं बनवणं इथे शक्य झालेलं आहे. चित्रपटाची शक्ती तो काय प्रत्यक्ष दाखवतो यापेक्षा तो काय सुचवू शकतो. यातच असते, कारण मग आपली गोष्ट सांगण्यात तो प्रेक्षकालाही सहभागी करून घेतो. त्यात कल्पनाशक्तीचा वापरही तो आपल्या कथानकाला अधिक भव्य करण्यासाठी करू शकतो.
जिलिअमने जेटीला नवं रूप देताना यातला साधेपणा पूर्णपणे शाबूत ठेवला नसला तरी गाभा शाबूत ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळे स्पेशल इफेक्ट्सच्या चलतीच्या काळात येऊनही ट्वेल्व्ह मन्कीज सांकेतिक गणितापलीकडे पोचू शकला.


ल जेटीपासून टेरी जिलिअमने घेतलेल्या स्फूर्तीचा त्याच्या ट्वेल्व्ह मंकीज चित्रपटाच्या श्रेयनामावलीत उल्लेख असला तरी ही जशीच्या तशी नक्कल नव्हे. एका उत्तम कल्पनेचा आधार येवढंच या स्फूर्तीचं प्रमाण राहतं. ही कल्पना कुठली, तर नायकाने आपल्या लहानपणी पाहिलेली एक विलक्षण घटना त्याच्या आयुष्यभर स्मरणात राहणं आणि कालांतराने त्याच घटनेत त्याच घटनेत वेगळ्या रीतीने सहभागी होण्यासाठी त्याला भाग पडणं ही.अर्थातच या कल्पनेत कालप्रवास अधांतरीच आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये तो आहे हे उघडच आहे. मात्र दोन्ही चित्रपटांना प्रामुख्याने वेगळं करतो तो दिग्दर्शक टेरी जिलियमचा दृष्टिकोन.
चित्रपटाचं नाव ट्वेल्व्ह मंकीज असलं तरी प्रत्यक्षात त्याचा माकडांशी काही संबंध नाही. हे चमत्कारिक नाव आहे एका संघटनेचं. जी कदाचित जगाच्या विनाशाला कारणीभूत झाली आहे, किंवा होणार आहे. खरं तर ट्वेल्व्ह मंकीज प्रकार म्हणजे हिचकॉकने लोकप्रिय केलेल्या मॅकगफिन या संज्ञेचं उत्तम उदाहरण ठरेल. मॅकगफिन म्हणजे कथानकाचा असा धागा जो चित्रपटातील व्यक्तिरेखांना जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखा भासेल आणि कथानक पुढे नेताना महत्त्वाचा ठरेल, मात्र प्रत्यक्ष कथानकाच्या दृष्टीने त्याला जराही महत्त्व असणार नाही. इथेच पाहा ना. चित्रपटाच्या नायकाच्या दृष्टीने या संघटनेचा पत्ता लावणं अत्यंत गरजेचं आहे. इतकं की मानवजातीचा भविष्यकाळ त्यावर अवलंबून आहे. हा नायक धडपड करतो ती या संघटनेचा रहस्यभेद करण्यासाठी. मात्र चित्रपटाच्या कथानकात या संघटनेचं स्थान इतकं दुय्यम आहे, की तिचा उल्लेख न करताही आपल्याला पूर्ण कथानक सांगता येईल. तिची भूमिका आहे ती उत्प्रेरकाची, प्रत्यक्ष घटनाचक्रात तिला जागा नाही.
ट्वेल्व्ह मंकीजचा नायक आहे जेम्स कोल (ब्रूस विलीस) ल जेटीच्या नायकाप्रमाणेच लहानपणी विमानतळावर पाहिलेल्या घटनेने झपाटलेला. आता त्या घटनेला अनेक वर्षे लोटली आहेत. आणि पृथ्वीवर साम्राज्य आहे ते वन्य प्राण्यांचं. मनुष्य जात एका संसर्गजन्य आणि अत्यंत धोकादायक विषाणूंपासून सुटका करून घेऊन जमिनीखाली वास्तव्य करीत आहे, हालाखीच्या परिस्थितीत. विषाणूंच्या संसर्गावर उपाय काढण्यासाठी माहिती गोळा करायला जमिनीवर गेलेल्या कोलला असा पुरावा मिळतो की, १९९७मध्ये पृथ्वीला नेस्तनाबूत करणारा प्लेग पसरवायला कारणीभूत होती ती ट्वेल्व्ह मंकीज ही संघटना. आता या संघटनेविषयी माहिती काढण्याचं कामही कोलवरच येतं आणि कालप्रवास करून कोल भूतकाळात पोचतो. मात्र चुकीच्या भूतकाळात. १९९६ऐवजी १९९०मध्ये. त्य़ात त्याची रवानगी तत्परतेने केली जाते ती वेड्यांच्या इस्पितळात. इथे त्याची गाठ पडते ती डॉ. कॅथरिन केली (मेडलिन स्टो) या मानसोपचार तज्ज्ञाशी आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. लेलॅन्ड गाईन्स (क्रिस्टोफर प्लमर) यांच्या वेड्या मुलाशी, जेफ्रीशी (ब्रॅड पिट)

सामान्यतः कालप्रवासाशी संबंधित चित्रपट हे कालचक्रातील कुठलीतरी घटना बदलण्याशी संबंधित असतात. त्यामुळे टाइम पॅराडॉक्सेस किंवा कालप्रवाहाशी केलेल्या खेळातून तयार होणा-या विसंगती यांना यात फार महत्त्व असतं आणि दिग्दर्शकाला (किंवा लेखकाला) हा खेळ जमला नाही तर चित्रपट पार फसतो, हा चित्रपटही या विसंगतीच्या अवतीभवतीच फिरतो. मात्र यातल्या नायकावर सोपवलेली कामगिरी ही थोडी पटण्यासारखी आहे. तो प्लेग टाळून सर्वत्र आनंदी आनंद करण्यासाठी आलेला नाही. उलट प्लेग होऊन गेलाय, तो कसा टळेल, असा अधिक प्रगल्भ भासणारा त्याचा विचार आहे. तो भूतकाळात जातो. तो केवळ माहिती काढण्यासाठी. त्यामुळे नायक सुपरहीरो बनत नाही आणि आपण त्याच्या अडचणी अधिक समजून घेऊ शकतो.
अशा चित्रपटांमध्ये भविष्यकाळ दिसतो, तो दोन प्रकारचा. एक अगदी चकाचक अन दुसरा अगदी मोडकळीला आलेला. इथला भविष्यकाळ आहे तो दुस-या प्रकारचा. फिलिप के डीक या विक्षिप्त विज्ञानकथा लेखकाच्या कथानकात शोभण्यासारखा (अर्थातच इथे वर्तमानकाळही बराचसा तसाच आहे.) याला मूळ लघुपटाहून अधिक जबाबदार आहे तो दिग्दर्शक ज्याचा गाजलेला ब्राझिल चित्रपटदेखील याच प्रकारात मोडणारा आहे. त्याशिवाय इथे सहपटकथाकार आहे तो फिलिप के डीकच्या डू अँड्रॉईड्स ड्रीम आँफ इलेक्ट्रिक शीप ? या कादंबरीला ब्लेडरनर हे चित्रपट रुप देणारा डेव्हिड पीपल्स. साहजिकच मन्कीजच्या दृश्य रूपांत यांनी आपला गडदपणा सढळ हस्ते वापरला आहे.
मन्कीज विज्ञानपट आहे हे स्पष्ट आहे, मात्र बहुतेक विज्ञानपटासारखा तो अँक्शनला प्राधान्य देत नाही. आणि संहितेची रचनाही अशी करतो की, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारांनी पाहता येईल. कालप्रवास असणारी विज्ञानपट ही तर सरळ उकल झालीच, पण सामाजिक टीकाटिप्पणी करणारी ब्लॅक कॉमेडी किंवा मनोरुग्ण नायकाचं दिवास्वप्न म्हणूनही याकडे पाहता येईल. जे घडायचं आहे, ते घडणार. असा असा निर्वाणीचा इशारादेखील हा चित्रपट देतो.
पोस्टरवरल्या टॅग लाईन्स ही हॉलीवूड चित्रपटांची खासियत आहे. अनेकदा ते इतक्या थोडक्यात चित्रपटाचा आशय, टोन आणि शैलीबद्दल सांगतात, की कमाल वाटते. ट्वेल्व्ह मंकीजची टॅग लाईन मला सर्वात आवडणा-या टॅगलाइन्सपैकी आहे. द फ्यूचर इज हिस्टरी असं आगाऊपणे आधीच प्रेक्षकांना सांगणारं हे वाक्य कोणालाही सुखांत शेवटाची आशा लावत नाही, हे वेगळं सांगायला नकोच.
-गणेश मतकरी

Read more...

लिन्च लॉजिक - मलहॉलन्ड ड्राईव्ह

>> Friday, October 24, 2008


मलहॉलन्ड ड्राईव्ह चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल एकमत असणं जराही संभवत नाही, जसं त्याच्या दिग्दर्शकाच्या गुणवत्तेबद्दलही एकमत असणं शक्य नाही. वादग्रस्त हा एकच शब्द दिग्दर्शक डेव्हिड लिन्च आणि त्याचे चित्रपट यांना चालण्यासारखा आहे. ब्लू व्हेलवेट, वाईल्ड अँट हार्ट यासारख्या चित्रपटांमधला आशय प्रक्षोभक असला, तरी निदान त्यांच्या कथनाचा अर्थ तरी कळण्यासारखा होता. पुढल्या काळातल्या लॉस्ट हायवेसारख्या चित्रपटाकडून तीही अपेक्षा ठेवता येत नाही.
भ्रष्टाचार, हिंसा, सेक्स यासारख्या भडक विषय़ांची अगम्य मांडणी हा सामान्यतः लिन्चच्या चित्रपटांचा विषय म्हणता येईल. उदाहरणार्थ लॉस्ट हायवेमध्ये एका प्रसंगात नायक एका पार्टीला जातो. तिथे त्याला एक चमत्कारिक माणूस भेटतो. हा माणूस नायकाला सांगतो, की जसा मी आता तुझ्यासमोर आहे, तसाच तुझ्या घरीदेखील आहे. फोन करून पाहा. नायक फोन करतो, तर हा समोरचा माणूसच पलीकडून फोन उचलतो, आता हा प्रसंग म्हटलं तर नाट्यपूर्ण आहे. पण प्रत्यक्षात घडणं कसं शक्य आहे. पुन्हा स्पष्टीकरण देण्याचा लिन्च प्रयत्न करेल तर तेही नाही. प्रेक्षकाला भलत्या वाटेवर पोचवून पसार होणं, ही लिन्चची खासियत म्हणावी लागेल. मलहॉलन्ड ड्राईव्हही या जातकुळीचा चित्रपट आहे.
अशी वदंता आहे की मलहॉलन्ड ड्राईव्ह हा टेलिव्हिजन पायलट म्हणून बनवण्यात आला होता. एबीसी टेलिव्हिजनने नाकारल्यावर लिन्चने ठरवलं की आणखी थोडी भर घालून याचा चित्रपट बनवावा. त्याप्रमाणे ही भर घालण्यात आली. या हकिकतीत सत्य किती आणि कल्पित किती हे कळायला मार्ग नाही,पण एक गोष्ट खरी, की यातला तासाभराचा भाग हा एका काळजीपूर्वक लिहिलेल्या रहस्यकथेसारखा आहे. तर उरलेला भाग प्रचंड गोंधळाचा आहे.
रिटा (लॉरा एलेना हारिंग) एक प्रतिथयश अभिनेत्री आहे. आपल्यावर होणा-या खुनी हल्ल्यातून ती कशीबशी सुटका करून घेते. पण स्मरणशक्ती गमावून बसते. मग एका रिकाम्या घरात ती तात्पुरता आसरा मिळवते. हे घर असतं बेट्टीच्या (नओमी वॉट्स) नात्यातल्या कोणा बाईचं. तिने बेट्टीला या घरात राहण्याची परवानगी दिलेली असते. त्याप्रमाणे हॉलीवूडमध्ये नशीब आजमावयला आलेली बेटी या घरात उतरते. ती रिटाला मदत करायचं ठरवते आणि दोघी मिळून रिटाच्या कोड्याचा उलगडा करायच्या मागे लागतात.

मलहॉलन्ड ड्राईव्ह हा प्रेक्षकांसाठी म्हणजे डेव्हीड लिन्चचे चित्रपट न पाहणा-या प्रेक्षकांसाठी असा भास तयार करतो की, आपण एक रहस्यपट पाहत आहोत. यात या दोघी सुंदर नायिका तर आहेतच, वर अमुक नायिकेला अमुक भूमिका देण्यासाठी वरून दबाव आलेला एक दिग्दर्शक आहे, पोलीस आहेत, गुन्हेगार आहेत, रहस्यमय मृतदेह आहे आणि एकूण रहस्यपटात चालण्यासारख्या ब-याच गोष्टी आहेत. मात्र हा चित्रपट रहस्यपट नाही. किंबहुना तो कोणत्याही एका साच्यात बसणं कठीण आहे. पहिल्या आर्ध्याहून अधिक भागात तो जी रचना करतो,त्यातली बरीचशी तो उरलेल्या भागात विस्कटून टाकतो. आतापर्यंत गृहीत धरलेल्या प्रत्येक गोष्टींविषयी शंका तयार करतो. अगदी यातल्या दोन नायिकांच्या मूलभूत अस्तित्त्वापर्यंत कोणतीच गोष्ट आपण आधी कल्पना केली तशी नाही असं आपल्या लक्षात येतं. मात्र ती कशी आहे याचं निश्चित उत्तर आपल्याला हुलकावणी देत राहतं.
तरीही मलहॉलन्ड ड्राईव्ह लक्षवेधी ठरतो, तो या अखेरच्या भागामुळेच. हा भाग जर उत्तर शोधण्यात खर्ची पडला तर आपल्याला एक चांगला रहस्यपट पाहिल्याचं समाधान मिळालं असतं. पण ड्राईव्ह हा त्या पलीकडला, अधिक अदभुत अनुभव आपल्याला देतो. आपल्याला केवळ कथेच्या शेवटाशी गुंतवून न ठेवता एकूण रचनेचा अधिक बारकाईने विचार करायला लावतो. हा विचार अनेक नव्या शक्यता उघड करतो. आणि याचा अर्थ लावायचं कामही आपल्यावर सोडतो. इथे बसणारे धक्के आपल्याला कथेच्या ओघातून हलवून बाहेर काढतात आणि आपण अधिक जागरुक होतो.
इतर दोन गोष्टी या चित्रपटात जाणवण्यासारख्या आहेत. ते म्हणजे फिल्म नवार (film noir) पद्धतीने केलेलं हॉलीवूडचं गडद चित्रण आणि स्वप्नांचा, आभासांचा कथेतला वापर. एका परीने पाहायचं तर ही स्वप्न, हे आभास, या चित्रपटाच्या प्रकृतीशी अधिक जवळचं नातं सांगणारं आहेत. स्वप्नांना ज्याप्रमाणे आपण तर्कशास्त्र लावू शकत नाही, ती आपली आपण उलगडतात आणि पाहत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही, तसंच मलहॉलन्ड ड्राईव्हचं आहे. तो त्याच्या गतीने उलगडतो. कोणत्याही तर्कशास्त्राशिवाय ड्रिम लॉजिकप्रमाणे त्यालाही एक स्वतःचं लिन्च लॉजिक आहे, असं म्हणता येईल. त्याचं शक्तीस्थान त्याचा विक्षिप्तपणा हेच आहे. हे लक्षात ठेवलं तरच मलहॉलन्ड ड्राईव्ह रुचेल. कदाचित आवडेलही.
-गणेश मतकरी

Read more...

दैव देतं!

>> Monday, October 20, 2008


माणसाला आयुष्यात नशिबाची साथ असणं किती पदोपदी आवश्‍यक आहे, हे "मॅच पॉईंट' चित्रपट अगदी सुरवातीलाच एका चपखल उदाहरणाने दाखवून देतो. टेनिसच्या मॅचमध्ये असे क्षण येतात, की बॉल नेटला लागून उडतो. आणि त्या क्षणी तो नेटच्या कोणत्याही बाजूला पडण्याची शक्‍यता असते. तुमचं नशीब जोरावर असेल, तर तो पलीकडे पडतो आणि तुम्ही जिंकता. किंवा तो अलीकडे पडतो आणि तुम्ही हरता. आयुष्यातली हार-जीतदेखील अशीच पूर्णतः दैवावर अवलंबून असते, असं "मॅच पॉईंट' सांगतो. म्हणजे केवळ नशिबावर नाही, त्यासाठी लागणारे प्रयत्न हे आवश्‍यकच आहेत; पण तेवढेच पुरेसे नाहीत असं इथं सांगितलं जातं, आणि दिग्दर्शक "वुडी ऍलन' ते ज्या प्रकारे आपल्यासमोर मांडतो, त्यानं आपल्याला एक उत्तम चित्रपट पाहिल्याचं समाधान तर मिळतंच, वर वुडी ऍलन मध्यंतरीच्या काळात बेताची कामगिरी करूनही थोर दिग्दर्शक का मानला जातो, हेही लक्षात येतं.
"मॅच पॉईंट'ला वुडी ऍलनचा चित्रपट म्हटलं की लगेचच आपल्या मनात काही अपेक्षा तयार होतात. ऍनी हॉल (1977), मॅनहॅटन (1979), हॅना ऍन्ड हर सिस्टर्स (1986) आणि क्राईम ऍन्ड निसडी मीनर्स (1989) यांसारख्या त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्याने एक विशिष्ट शैली ठरवल्याचं दिसतं. तसंच त्याच्या बहुतेक चित्रपटांत असणारी त्याची स्वतःची व्यक्तिरेखा ही त्याच्या खऱ्या आयुष्यातल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि दृष्टिकोनाचं प्रतिनिधित्व करताना दिसते. (अलीकडच्या काळात वयपरत्वे त्याला मोठ्या वयाच्या भूमिका कराव्या लागल्या, तरी त्याचा आवाज हा त्याच्या नायकांमध्ये जाणवण्यासारखा आहे. "एनिथिंग एल्स'(2003) सारख्या चित्रपटात हे प्रकर्षाने दिसून येतं.) ऍलनचे चित्रपट प्रामुख्यानं घडतात ते न्यूयॉर्कमधल्या सुखवस्तू उच्च मध्यमवर्गीयांमध्ये. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या या वर्गाच्या मानसिक आणि म्हटलं तर वरवरच्या पण त्यांचं जीवन व्यापून राहणाऱ्या अडचणी वुडी ऍलनच्या चित्रपटांचा प्रमुख भाग असतात.
लैंगिक अपराधगंड, कलात्मक असमाधान, प्रेमात अपयश आणि न्यूयॉर्क शहराबद्दलचं अतीव प्रेम इथं कायम पाहायला मिळतं. मूळच्या स्टॅन्ड अप कॉमिक असणाऱ्या वुडी ऍलनच्या चित्रपटांचा पाया हा विनोदाचा असतो, पण तो गडागडा हसवणारा नाही, तर मंदस्मित करत अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा. अशा ट्रेडमार्क शैलीनं हा दिग्दर्शक ओळखला जात असल्यानं "मॅच पॉईंट'देखील याच प्रकारात बसणारा असेल, अशी आपण कल्पना करतो. मात्र इथे ती सपशेल खोटी ठरते. अनेक बाबतींत तो या दिग्दर्शकाच्या इतर चित्रपटांहून वेगळा आहे.
तो विनोदी नाही, जवळजवळ पूर्णपणे गंभीर आहे. उच्च मध्यमवर्गीयांऐवजी तो एका श्रीमंत कुटुंबात घडतो आणि न्यूयॉर्कऐवजी लंडनमध्ये. यातल्या व्यक्तिरेखांचे प्रश्न हे अधिक खरे आणि आपल्या मानसिकतेवर थेट प्रकाश टाकणारे आहेत आणि वुडी ऍलनचा आवाज असणारी ओळखीची व्यक्तिरेखा इथे पूर्णपणे गायब आहे. प्रेमकथेचा अंश असूनही हा रोमान्स नाही, चित्रपट शेवटाकडे एका गुन्ह्याकडे आणि त्याच्या उत्कंठावर्धक तपासाकडे जात असला तरी सांकेतिक अर्थानं हा रहस्यपट किंवा थ्रिलर नाही. याची रचना, त्याचा शेवट धरला तर अतिशय आधुनिक आहे. आणि लोक विसरत चाललेल्या वुडी ऍलनला या चित्रपटानं पुन्हा मुख्य धारेत बसवलं आहे.

नाव "मॅच पॉईंट' असलं, आणि सुरवात टेनिसमधल्या उदाहरणानं केली असली, तरी एकूण चित्रपटाचा टेनिस खेळाशी काही संबंध नाही. त्याचा नायक हा टेनिस कोच आहे इतकंच. क्रिस (जोनथन रिस-मेयर्स) हा गरिबीतून वर आलेला आणि मोठं होण्याची स्वप्नं पाहणारा तरुण आहे. व्यावसायिक टेनिस सोडून लंडनमधल्या एका श्रीमंती क्‍लबमधे नोकरी धरून संधीची वाट पाहणारा. त्याची ओळख टॉम ह्यूइट (मॅथ्यू गुडी)शी होते आणि आपल्या आवडीनिवडी जुळतात हे पाहिल्यावर टॉम त्याला ऑपेरा पाहायला आमंत्रित करतो. लवकरच टॉमची बहीण क्‍लोई (एमिली मॉर्टिमर) क्रिसच्या प्रेमात पडते, आणि या श्रीमंत घरात तो लवकरच जावई म्हणून घुसणार, अशी चिन्हं दिसू लागतात. क्रिसला क्‍लोई आवडत असली, तरी तो तिच्या प्रेमात आकंठ वगैरे बुडालेला नसतो; पण त्याच्या दृष्टीनं हा परिस्थिती सुधारण्याचा एकमेव मार्ग असतो. प्रश्न उभा राहतो तो त्याची भेट नोला (स्कार्लेट जोहान्सन) या टॉमच्या प्रेयसीशी झाल्यावर. तो तिच्याकडे ताबडतोब आकर्षित होतो, आणि हे आकर्षण वाढतच जातं. क्रिसप्रमाणेच नोलाही टॉमशी लग्न करून आर्थिक अडचणींवर मात करण्याच्या योजना आखत असल्यानं, क्रिसला उत्तेजन देत नाही. मात्र लवकरच परिस्थिती बदलते. क्रिसचं क्‍लोईशी लग्न होतं; पण टॉम मात्र घरच्यांच्या पसंतीची दुसरी वधू शोधतो. हताश झालेल्या नोलाची एकदा क्रिसशी गाठ पडते, आणि प्रकरण मागील पानावरून पुढे चालू राहतं.
या चित्रपटात विशेष म्हणण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. पहिली म्हणजे व्यक्तिरेखा. यातली कोणतीच व्यक्तिरेखा स्वच्छ, चांगली म्हणावीशी नाही. तरीही त्यांची समाजातली जी जागा आहे, त्या जागी त्या तशाच वागतील याबद्दल शंका घ्यायला जागा नाही. एका परीनं हे सर्वच जण सामाजिक गुन्हेगारीला खतपाणी घालणारे आहेत, पण ही गुन्हेगारी आज आपण जणू गृहीतच धरून चालतो, त्यामुळे ही पात्रं वरकरणी आपल्याला सज्जनदेखील वाटू शकतात. नायकाचादेखील अपवाद न करता.
नायक क्रिसला समाजात वरचं स्थान मिळवायचंय. त्यासाठी तो प्रेमाचं नाटक करून क्‍लोईला फसवतो. नोलाबरोबरचं प्रेमप्रकरण सर्वांच्या नकळत सुरू ठेवतो. क्‍लोईला एका सुप्त पातळीवर क्रिसची चलबिचल जाणवते; पण तिचे वडील इतके श्रीमंत आहेत, की त्यांच्या जोरावर ती नवरा विकत घ्यायला मागेपुढे पाहत नाही. वडिलांनाही मुलीच्या समाधानासाठी हे करायला काहीच वाटत नाही. क्‍लोईच्या आईला क्रिस चालतो, पण टॉमची मैत्रीण नोला तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी चालत नाही. टॉमही नोलाला झुलवत ठेवून दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवतो आणि घरच्यांच्या मागे लपून नोलाला नकार देतो. नोलादेखील क्रिसपेक्षा फार वेगळी नाही. याचा अर्थ, यातलं प्रत्येक पात्र हे केवळ स्वार्थाचा विचार करतं, आणि त्यात त्यांना काहीच वाटत नाही. एका परीनं आजच्या उच्चभ्रू समाजाची किडलेली मूल्यं इथं आपल्यापुढे येतात.
"मॅच पॉईंट'मध्ये लग्नबाह्य संबंधाचं चित्रणही एरवी पाहायला मिळतं त्याहून वेगळं करण्यात आलंय. क्रिसचं नोलाच्या अधिकाधिक आहारी जाणं, घरी असमाधानी असणं, ऑफिसात दुर्लक्ष करणं, हे प्रामुख्याने दिसतं ते क्रिसच्या बदलत जाणाऱ्या दिनक्रमावरून. हे प्रसंग छोटे, तुकड्यातुकड्यात येणारे आहेत. एरवी प्रेम आणि बदफैलीपणा जसा संवादी केला जातो, तसा इथं होत नाही.
स्वतः क्रिसची व्यक्तिरेखादेखील खास आहे. हा वाईट माणूस नाही, पण त्यानं जे ठरवलंय ते पार पाडण्यासाठी जे काय करावं लागेल ते तो करेल. क्‍लोईचा घरच्यांवर प्रभाव पाडण्यासाठी ऑपेरा ऐकणं आणि डोस्टोव्हस्की वाचणं, हे तो जितक्‍या गंभीरपणे करतो, तितक्‍याच गंभीरपणे तो अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शस्त्रही उचलतो. जे घडतंय त्यावर जणू त्याचा इलाज चालत नाही. शेक्‍सपिअरच्या शोकांतिकांच्या नायकांप्रमाणे हाही महत्त्वाकांक्षेचा बळी आहे. तो हवं ते मिळवेल जरूर, पण त्यासाठी द्यावी लागणारी किंमत त्याला आयुष्यभर सुखानं झोपू देणार नाही. आपलं वागणं जस्टिफाय करण्यासाठी तो तत्त्वशास्त्राला राबवेल; परंतु मनातून तो स्वतःला कधीच माफ करणार नाही. क्रिसची भूमिका हा मॅच पॉईंटचा कणा आहे, आणि "बेन्ड इट लाईक बेकहेम' मधल्या जोनथन रिस मेयर्सनं ती अतिशय परिणामकारक उभी केली आहे.
"मॅच पॉईंट' आपल्याकडे प्रदर्शित झाला नाही. वुडी ऍलनचे चित्रपट आपल्याकडे क्वचितच येतात; त्यातून हा वेगळा असला, तरी आपल्याकडल्या व्यावसायिक वितरणाच्या ब्लॉकबस्टरी गणितात बसणारा नाही. मात्र चांगल्या चित्रपटांच्या शोधात असणाऱ्या रसिकांनी आवर्जून पाहावा, असाच हा चित्रपट आहे.

- गणेश मतकरी

Read more...

भय इथले...

>> Friday, October 17, 2008



हॉलिवूडमध्ये भयपटांचं पेव फुटलंय. वादिम पेरेलमनने दिग्दर्शित केलेला "द लाईफ बिफोर हर आईज' हा चित्रपट याच पंक्तीतला असला तरी हॉलिवूडपटांची चौकट मोडून काढत नाही. हा चित्रपट म्हणजे चाणाक्ष प्रेक्षकांना घातलेलं एक कोडं आहे, म्हणूनच शेवट कथानकाशी सुसंगत नसूनही चित्रपट वेगळा ठरतो.


वादीम पेरेलमनने दिग्दर्शित केलेला "द लाईफ बिफोर हर आईज' जमला की फसला, याचं उत्तर फसला, असं देऊन मोकळं होणं सहज शक्‍य आहे; पण मला वाटतं ते शंभर टक्के बरोबर तर होणार नाहीच, वर न्याय्यही होणार नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्याचा शेवट हा या प्रकारातल्या संकेतांपेक्षा इतका वेगळा आहे, की त्याच्या जमण्या-फसण्याविषयीचा माझा निष्कर्ष हा सर्वांना मान्य असणंच संभवत नाही. प्रेक्षकांमध्ये तो दोन तट पाडणार अन्‌ त्यातून "शेवट योग्य होता का नव्हता' इथपासून "जो होता तो काय होता' इथपर्यंत वाद होण्याची शक्‍यता.
मला वाटतं, आपली थोडी घाई होतेय. एकदम चित्रपटाच्या अंतिम परिणामाविषयी अन्‌ शेवटाविषयी बोलण्यापेक्षा, हा चित्रपट नक्की काय, कशाविषयी आहे, हे पाहणं गरजेचं आहे.
हॉलिवूडबद्दल आपल्याकडच्या उच्चभ्रू मंडळींच्या अन्‌ चित्रपट पंडितांच्या मनात अनास्था आहे, हे तर आपण जाणतोच. ती असण्याचं खरं तर फार कारण नाही, कारण आपल्या चित्रपटगृहातून दिसणारं हॉलिवूड हे बरचसं नफ्याला वाहिलेलं अन्‌ कल्पनाशक्ती बोथट झालेलं असलं, तरी अमेरिकन चित्रपट पाहण्याचा थिएटर्स हा एकमेव मार्ग नव्हे. आज डीव्हीडी लायब्ररींपासून डीव्हीडी पायरसीपर्यंत अनेक मार्गांनी हे चित्रपट आपल्याकडे पोचू शकतात. यातल्याच कुठल्यातरी मार्गावर भेटणारा सिनेमा म्हणून "लाईफ बिफोर हर आईज'कडे पाहता येईल.
अमेरिकन समाजाला झपाटणाऱ्या भुतांची संख्या सध्या बरीच वाढताना दिसते आहे. गेल्या शतकातल्या वॉटरगेट, व्हिएतनाम युद्ध यांसारख्या भुतांबरोबरच 9/11 सारखी या शतकातली भुतंही आता जमायला लागली आहेत. कोलम्बाईन हत्याकांड हे त्यातलंच एक भूत. दोन मुलांनी कोलम्बाईन शाळेत बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेतले आणि त्यांच्या सुखवस्तू देशात सामाजिक असुरक्षिततेचं एक नवीन परिमाण रूढ झालं. पुढे साहित्य, चित्रपट यांसारख्या माध्यमातून कोलम्बाईन शाळा जिवंत राहिली. मायकेल मूरने गन कन्ट्रोल कायद्यासंबंधात काढलेला ऑस्करविजेता माहितीपट "बोलिंग फॉर कोलम्बाईन' आणि गस व्हान सान्तचा गोळीबाराच्या घटनेआधीची पंधरा-वीस मिनिटं वेगवेगळ्या पात्रांच्या नजरांतून दाखवणारा "एलिफन्ट' ही कोलम्बाईन कलाशाखेची दोन महत्त्वाची उदाहरणं. "द लाईफ बिफोर हर आईज' ही याच शाखेतली या एप्रिलमधली निर्मिती.
पेरेलमनच्या आधीच्या चित्रपटात म्हणजे "हाऊस ऑफ सॅन्ड ऍन्ड फॉग' मध्ये थ्रिलरचे घटक असणारी; पण थ्रिलरच्या वळणावर न जाणारी अपरिहार्य शोकांतिका होती. इथेही साधारण तोच प्रकार आहे, म्हणजे थ्रिलरचे घटक आहेत, शोकांतिका आहे; पण निवेदनशैलीने इथे एक महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, जी हाऊसमध्ये दिसली नव्हती.
डायना या प्रमुख व्यक्तिरेखेची दोन रूपं इथे आपल्याला दिसतात. एक डायना (इव्हा रेचेलवूड) हायस्कूलमध्ये आहे. तिची मोरीन (इव्हा अम्युरी) ही जिवलग मैत्रीण आहे. शाळेत जेव्हा कालम्बाईन थाटात गोळीबार केला जातो तेव्हाही या दोघी एकत्रच असतात. त्यांच्याच वर्गातला माथेफिरू मुलगा त्यांच्यावर बंदूक रोखतो आणि त्यांना संधी देतो, कोणी मरायचं हे ठरवण्याची.
दुसरी डायना (उमा थर्मन) आहे. या डायनाचं पंधरा वर्षांनंतरचं रूप! घटनेला पंधरा वर्षं होऊनही त्या धक्‍क्‍यातून डायना सावरलेली नाही. पूर्वीची बंडखोर डायना आता शांत झाली आहे. तिला एक मुलगी आहे. थोड्या मोठ्या वयाच्या विद्वान प्रोफेसरशी तिचं लग्नं झालंय. ती स्वतःही शिक्षिका आहे. मात्र शाळेतली ती भयंकर घटना डायना विसरलेली नाही. आता तर या दुर्दैवी घटनेचा स्मरणदिवसही जवळ आलेला. डायनाच्या डोक्‍यावरचा तणाव अशा परिस्थितीत वाढत जातो आणि तिला भास व्हायला लागतात. तिचं मेहनतीने उभारलेलं आयुष्य उसवलं जायला लागतं.
"लाईफ बिफोर हर आईज'ची पटकथा ही दोन्ही डायनांना सारखं महत्त्व देऊन उलगडते पंधरा वर्षांच्या कालावधीच्या मागे-पुढे करत. सामान्यतः चित्रपटांना एक ठराविक वर्तमानकाळ असतो, जिथे घडणारी गोष्ट ही प्रमुख मानली जाते. या वर्तमानातल्या घटनेचा संबंध हा भूतकाळाशी किंवा भविष्यकाळाशी लागू शकतो; पण तो भाग हा दुय्यम महत्त्वाचा असतो, जो फ्लॅश बॅक किंवा फ्लॅश फॉरवर्ड या सर्वमान्य निवेदन संकल्पनांमधून दाखवला जातो. या चित्रपटाचा विशेष हा, की त्याचा वर्तमानकाळ हा काही केल्या ठरत नाही. म्हणजे ही शाळेतल्या बंडखोर डायनाची गोष्ट आहे जी तिच्या पुढल्या आयुष्याचा संदर्भ देते आहे, की विवाहित डायनाची गोष्ट आहे, जी तिच्या भूतकाळाचा संदर्भ देते, हे बराच काळ स्पष्ट होत नाही. याचा दुसरा परिणाम असा होतो, की सतत मागे पुढे गोष्ट जाण्याने आपण या व्यक्तिरेखांशीदेखील पुरेसे समरस होऊ शकत नाही.
चित्रपट जसजसा पुढे जातो तेव्हा लक्षात येतं, की ही मांडणी अपघाती नाही. तिच्या रचनेमागे दिग्दर्शकाचा काही हेतू आहे. त्याने विचार करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक कोडं तयार केलंय, जे त्याला शेवट ओळखून दाखवण्याचं आव्हान देतंय. मात्र इथे एक गोम आहे.
चित्रपटातून पूर्णपणे येणारा आशय, हा त्याच्या शेवटाशी म्हटला तर सुसंगत आहे, म्हटला तर नाही. आहे अशासाठी, की जर चित्रपटाकडे कोडं म्हणून पाहिलं, तर त्याचं उत्तर म्हणून हा शेवट चालू शकतो. तो सर्वांनाच समाधान देणार नाही, मात्र एक वैचारिक कसरत म्हणून तो पटण्यासारखा आहे आणि चाणाक्ष प्रेक्षकांच्या तो कदाचित आधीही लक्षात येऊ शकतो, खास करून जर त्यांनी चित्रपटाच्या नावाकडे अधिक लक्ष पुरवलं तर.
सुसंगत नाही अशासाठी, की शेवट वगळता उरलेला चित्रपट, हा कोलम्बाईनसारख्या दुर्घटनेतून वाचलेल्या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण म्हणून चांगला आहे. त्यांचं आयुष्य या घटनेनं कायमचं झाकोळलं जाणं, गेलेल्याबद्दल त्यांना वाटणारं दुःख; पण त्याचबरोबर स्वतः जगल्याबद्दल वाटणारी अपराधी भावना, त्यातून उद्‌भवणारे मानसशास्त्रीय प्रश्‍न... अशा सर्व बाजूंनी चित्रपट डायनाच्या व्यक्तिरेखेकडे पाहतो. मात्र शेवट हा या चित्रणाला द्यायला हवा तितका न्याय देत नाही. केवळ प्रेक्षकांचीच नाही, तर आपल्या आशयसंपन्नतेचीही फसवणूक करतो.
"द लाईफ बिफोर हर आईज'विषयी कोणत्याही एका बाजूने पूर्णपणे सकारात्मक बोलणं शक्‍य होणार नाही, कारण आशयापासून ते छायाचित्रणापर्यंत आणि दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत अनेक घटक त्याच्या परिणामाला पूरक असले, तरी दृष्टिकोनामधला दोष हा इथे लपणारा नाही. मात्र केवळ दृष्टिकोनातला गोंधळ हा या इतर सर्व बाजूंना रद्द ठरवण्याइतका ठळक आहे, असंही मी म्हणणार नाही.
हॉलिवूडच्या चौकटीत राहून अन्‌ व्यावसायिक गरजेकडे लक्ष देऊनही जे वेगळे प्रयोग केले जातात, ते विशेष महत्त्वाचे असतात. कारण ते स्वतःसाठी खास जाणकार प्रेक्षक असण्याची अपेक्षा करत नाहीत. आपला प्रयोग हा सामान्य प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवूनच करतात, अन्‌ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचेल असंच या प्रयोगाचं स्वरूप ठेवण्याचा हे दिग्दर्शक प्रयत्न करतात. तयार रसिकांपर्यंत पोचण्यापेक्षा सामान्य माणसांपर्यंत पोचणं हे अनेकदा अधिक कठीण असतं. "द लाईफ बिफोर हर आईज' जमला का फसला, याचं उत्तर एका शब्दात देऊन प्रश्‍न निकालात काढणं गैर आहे ते याचसाठी. त्यापेक्षा तो मला वैयक्तिकदृष्ट्या आवडला की नाही, असा प्रश्‍न जर मी विचारला तर त्याचं उत्तर अधिक सकारात्मक येणं शक्‍य आहे. मला स्वतःला हा चित्रपट आवडला. त्यातल्या प्रयोगासाठीही अन्‌ आशयासाठीही. शेवटामुळे येणाऱ्या विसंगतीकडे मी सध्या तरी दुर्लक्ष करेन.

- गणेश मतकरी

Read more...

चिल्ड्रन ऑफ हेवन

>> Tuesday, October 14, 2008



शाळेतल्या मैत्रिणीचे बूट तिला खूप आवडत असतात. तिला नवे बूट घेतल्यावर "जुने काय केले' हा तिचा प्रश्‍न असतो! ते भंगारात दिले म्हटल्यावर ती जवळजवळ चिडतेच! "का?' हा प्रश्‍न विचारते. ......
जुने मला दिले असते तर, हा विचार तिच्या मनात येतो खरा; पण ती बोलून दाखवत नाही. तेवढा स्वाभिमान तिच्याकडे आहे. दोघी वर्गाकडे चालू लागतात. नव्या बुटातले तिचे पाय थिरकत आहेत, तर भावाच्या जुन्या बुटातले तिचे पाय नाइलाजानं, सवयीचे होऊ बघताहेत...


ती सात वर्षांची आहे आणि तिचा भाऊ नऊ वर्षांचा. तिचे दुरुस्तीला नेलेले बूट तो हरवतो; पण रडवेले होतात दोघंही. आईला सांगू नकोस म्हणून तो पुन्हा ते शोधायला पळतो. ती आईनं वाळत घातलेले दोरीवरचे कपडे काढून घरात जाता जाता दाराशी असणारे सगळ्यांचे बूट बघते. त्यात तिचे बूट नाहीत. क्षणार्धात ही चिमुरडी रंग, भाषा आणि देशधर्माची बंधनं तोडून आपलीशी वाटायला लागते. फक्त चेहरा सोडून बाकी नखनिशांत झाकलेली जोहरा जणू आपलीच लहान बहीण असावीशी वाटते, ही चित्रपटमाध्यमाची ताकद दिग्दर्शक मजिद मजिदीच्या स्क्रीनमुळे सहज अनुभवता येते.
""आईबाबा गरीब आहेत. तू बाबांना मी बूट हरवल्याचे सांगशील तर ते मला मारतील. मी माराला भीत नाही; पण त्यांच्याकडे तुला बूट आणायला पैसे नाहीत ही साधी गोष्टही तुला समजू नये?'' भावाचे शब्द तिला गप्प बसवतात. तिचा एकच क्‍लोजअप तिची प्रगल्भता दर्शविण्यासाठी पुरेसा ठरतो. तिचा भाऊ अली तिला गप्प बसण्यासाठी एक मोठी पेन्सिल देतो. स्वतःचे बूट घालण्याचं सुचवतो. योगायोगानं तिची शाळा सकाळची आहे आणि त्याची दुपारची. त्याचे बूट तिनं घालायचे आणि शाळा सुटली रे सुटली की पळतपळत येऊन घराच्या गल्लीच्या तोंडाशी ते अदलाबदल करायचे. मग ती हलतडुलत घराच्या दिशेनं येणार आणि तो सुसाट वेगाने शाळेकडे पळणार... छोट्याशा गोष्टीतून बहीणभावांचं एकमेकांशी असणारं सुंदर प्रेमाचं नातं उलगडत जातं. एकमेकांवर प्रेमही आहे आणि घरच्या परिस्थितीचं भानही. त्यामुळे चित्रपटाच्या सुरवातीलाच त्यांच्याशी भावनिक नातं जोडून बसलेला प्रेक्षक त्याच्यासमोर जणू पळत त्याच्या शाळेपर्यंत जातो आणि त्याला शिक्षा होणार नाही ना, या काळजीत पडतो आणि तिच्याबरोबर धावत येताना ती नीट पोचेल ना, या चिंतेतही असतो!
पहिल्या दिवशी तो घरी येतो तेव्हा ती भांडी घासत असते. तिनं आईला सांगितलं तर नसेल, या चिंतेत तो आहे. तिला याचा राग येतो. मी एकदा नाही म्हटलं म्हणजे नाही सांगणार, असं ठणकावून ती सांगते. पण त्याचे फुटबॉल खेळून घाणेरडे झालेले बूट घालायची तिला लाज वाटते. ती दोघं मिळून मग ते बूट स्वच्छ धुतात. साबणाच्या पाण्याचे फुगे करून उडवतात. संपूर्ण चित्रपटात त्यांचं बालपण दिसावं असा हा एवढाच सीन. एरवी घरच्या परिस्थितीनं त्यांना बरंच प्रगल्भ करून टाकलंय.बालपण हरवलं तरी त्यांची निरागसता कायम आहे. टीव्हीवरच्या जाहिरातीतल्या बुटांकडे त्यांचं लक्ष जातं. क्षणभर ते हरवून जातात; पण पावसामुळे तो सिग्नलच कट होतो. बुटांच्या जागी कोरडी खरखर सुरू होते. जणू कल्पनेतले बूटही त्यांच्या नशिबी नसावेत!

शाळेत चाचणी परीक्षेत तिचं संपूर्ण लक्ष घड्याळाकडे आहे. आपला भाऊ वाट बघतोय. त्याला बूट द्यायचेत, या कल्पनेनं ती अस्वस्थ आहे. झटपट पेपर लिहिते. वेळेपूर्वीच देऊन टाकते आणि धावत सुटते. रस्त्यातल्या नालीवरून उडी मारते आणि वाहत्या पाण्यात एक बूट पडतो. झालंच की मग! आता त्या वाहत्या पाण्यातून बूट पुढे पळतोय, त्यामागं तो पकडायला जोहरा पळतेय आणि ती दोघं क्षणभरही नजरेआड होऊ नये म्हणून चित्रपट बघणारा प्रेक्षकही जीव मुठीत धरून तिच्यामागं पळतोय. तिकडे जसा बुटाचा वाहण्याचा वेग वाढतो, तसा तिचा पळण्याचाही वेग वाढतो आणि प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोक्‍यांचाही! एका छोट्या पुलाखाली तो बूट शेवटी अडकतो आणि मग मात्र तिचं अवसान संपतं. तिला रडू फुटतं. बुटाचं दुःख आहे की भावाची बोलणी ऐकावी लागतील त्याचं दुःख आहे? तिचं रडणं ऐकून शेजारचा दुकानदार तो काढून देतो. ती नाराजी भावाकडे व्यक्त करते. रडते. तो घरी आल्यावर त्याला शाळेत बक्षीस मिळालेलं पेन तिला देतो. ती खूष होते. "मी आईला काहीच सांगितलं नाही' म्हणते. तो म्हणतो ""मला खात्री होती, तू शहाणी आहेस!''
आपल्याला हा सीन आवडतो. डोळ्यांत पाणीही येतं. त्याचं कारण कळत नाही. आपल्याला त्यांच्या गरिबीचं दुःख व्हावं असं त्यात काहीही नाही. आनंदाश्रू असण्यासारखंही त्या सीनमध्ये काही नाही. मग दिग्दर्शक आपल्या डोळ्यांतून हे पाणी कुठल्या ताकदीच्या बळावर काढतो? हे दृश्‍य बघत असताना आपण आपल्याच घरच्या छोट्यांना बघतोय असं वाटतं आणि आपला मुलगा, भाची, पुतण्या किंवा नातवंडाचं बोलणं ऐकून अकारण डोळ्यांत पाणी यावं, तसं काहीसं होत असावं.
तिला शाळेत एका मुलीचे बूट आवडतात. ती तिचं घर शोधते, भावाला दाखवते; पण तिचे आंधळे वडील बघून दोघंही मान खाली घालून घरी येतात. तिचे बूट चांगले आहेत तरीही परिस्थिती मात्र आपल्यापेक्षाही गंभीर आहे, हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव स्पष्ट वाचता येतो.
वडिलांबरोबर सुटीच्या दिवशी काम करायला अली शहरात जातो. काम मिळवतो आणि सायकलवरून घरी परतताना वडिलांच्या स्वप्नरंजनात सामील होतो. आपण सगळ्या गोष्टी घेऊ म्हटल्यावर "आधी जोहराला बूट आणा' सांगायला तो विसरत नाही. मात्र उतारावर जोरात येत असलेल्या त्यांच्या सायकलचे ब्रेक लागत नाहीत आणि दोघंही आपल्या स्वप्नांसकट गडगडत खाली येतात! बुटांच्या मागे असलेला अली एका पळण्याच्या शर्यतीत भाग घेतो. कारण त्याचं तिसरं बक्षीस बुटांची एक जोडी आहे. पहिली दोन- खरं तर त्याकडे त्याचं लक्षच नाहीये. लक्ष्य एकच, तिसरं बक्षीस! "पण कशावरून तू तिसरा येशील?' बहिणीला शंका आहे. "मला माहित्येय, मी तिसराच येणार!' त्याला खात्री आहे. शर्यत सुरू होते. पळताना त्याला जोहराची वाक्‍यं आठवतात. पळणारी- बूट वेळेवर पोचवता यावेत म्हणून जिवाच्या आकांताने पळणारी जोहरा आठवते. तो एवढ्या जोरात पळतो, की पहिलाच येतो! खाली कोसळतो. शिक्षक उचलून घेतात. मी तिसरा आलोय का? एवढं एकच वाक्‍य तो बोलतो. पण पहिला आल्याचं कळल्यावर कमालीचा दुःखी होतो. फोटोसाठी मान खाली घालून उभा राहतो. "वर बघ' असं फोटोग्राफर सांगतो तर बघतो, तेव्हा त्याचे डोळे भरून आलेले आहेत.मान खाली घालून तो घरी येतो. जोहराला कळतं, त्याचे बूट जुनेच आहेत. रडणाऱ्या लहान भावाला बघायला ती आत पळते. तो संपूर्ण फाटलेले बूट काढून फेकतो. पायाला फोड आलेले आहेत. शांतपणे पाय पाण्यात सोडून बसतो.
दरम्यान, त्याच्या वडिलांचा एक सायकलवरचा शॉट दिसतो. कॅरियरला बुटांचे नवे दोन जोड अडकवले आहेत!आपण मनोमन दिग्दर्शकाला धन्यवाद देतो. वडील शेवटी मुलांना बूट घेतात असं दाखवल्यामुळे नाही, तर फक्त एवढंच दाखवून पुढचे बाळबोध शॉट्‌स दाखवण्याचं टाळल्याबद्दल.
बुटांसारख्या छोट्याशा विषयावरची कथा घडते तेहरानमध्ये. दिग्दर्शक - कलाकार सगळे इराणी. भाषाही पर्शियन. इंग्रजी उपशीर्षकांच्या साह्याने चित्रपट बघावा लागतो; पण त्यानं काहीही अडत नाही. चित्रपट हे माध्यम कायमच भाषा, संस्कृती आणि देशांच्या पलीकडचं आहे आणि यामुळेच इराणची ती दोन्ही भावंडं सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन आपल्या कुटुंबातली कधी होतात, ते आपलं आपल्यालाही कळत नाही. देश-धर्माच्या कृत्रिम सीमा कधीच विरून जातात आणि उरते ती फक्त अली, जोहरा आणि आपण यांना समान धाग्यात गुंफणारी मनुष्यत्वाची विशुद्ध भावना.
-प्रसाद नामजोशी
(सकाळच्या सप्तरंग पुरवणीमधील point of view या सदरामधून. )

Read more...

हार्डकोअर थ्रिलर

>> Saturday, October 11, 2008


काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एखाद दोन चित्रपटगृहांत मर्यादित खेळांसाठी १३ झमेटी हा फ्रेंच चित्रपट लागून गेला. तेव्हा मला थोडं कौतुक वाटलं, ते वितरकांच्या धाडसाचं. मुळातच आपल्याकडे सबटायटल्ड चित्रपटांच्या प्रेक्षकांची वानवा असताना उघडच हिंसाचार दाखविणारा अन वादग्रस्त ठरण्याची शक्यता असलेला चित्रपट आणणं, हे धाडस नाही तर काय ? मात्र आपल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट, अन् जोडीला लावलेला सिटी ऑफ गॉड या दोघांकडेही शांततेने दुर्लक्ष केलं.वेगळं काही पाहण्याची तयारी नसणं, हा तसा आपल्या प्रेक्षकांचा स्थायीभावच आहे.
गेला बाब्लुआनी या दिग्दर्शकाचा १३ झमेटी हा पहिला चित्रपट. पहिला वाटू नये इतका सराईत. मात्र सकारात्मक अर्थाने. मी मघा म्हटल्याप्रमाणे इथे हिंसाचार जरूर आहे, पण तो दृश्य पातळीवर भडकपणा आल्याने अंगावर येणारा नाही. शिवाय प्रत्यक्ष हिंसेपेक्षा इथे अधिक परिणामकारक ठरतो, तो दिग्दर्शकाने तयार केलेला ताण, जो काही प्रसंगात असह्य होण्याइतकी ताकद बाळगतो.
सामान्यतः चित्रपट सुरुवातीपासून शेवटापर्यंत सातत्याने अधिकाधिक गतिमान होत जातात आणि शेवट हा या चढ्या गतीचा अत्युच्च बिंदू असतो. झमेटी मात्र या काळ आणि वेगाच्या गणिताला फाटा देतो. रचनेच्या दृष्टीने त्याचे तीन भाग पडतात. मात्र, गती तणाव आणि प्रेक्षकांना गुंतवण्याची शक्यता या तीनही पातळ्यांवर सर्वाधिक परिणामकारक ठरतो, तो अखेरचा नव्हे, तर मधला भाग. गंमतीची गोष्ट म्हणजे, चित्रपटाच्या सुरुवातीवरूनच तो लवकरच घेणार असलेल्या भरधाव वेगाची कल्पना तर येत नाहीच, वर आपण थ्रिलर न पाहता, सामाजिक प्रश्नावर आधारित काही तरी पाहत नाही ना, अशी शंका येऊ शकते.
त्याची सुरुवात होते, ती आर्थिक अडचणीत असलेल्या नायकापासून, फ्रान्समध्ये राहणारा जॉर्जीअन निर्वासित सॅबेस्टीअन (जॉर्ज बाब्लुआनी, म्हणजेच दिग्दर्शकाचा धाकटा भाऊ) हा पैसे मिळविण्यासाठी पडेल ते काम करतो. सध्या तो एका घराच्या छपराची डागडुजी करून देण्याचा उद्योग करतोय. या कामाने पुढच्या काही दिवसांचा प्रश्न तरी सुटावा अशी त्याची अपेक्षा आहे. मात्र काम अर्धवट झालं असतानाच घरमालकाचा मृत्यू होतो. आणि सॅबेस्टीअनची परिस्थिती आणखी बिकट होते. अशावेळी अचानक त्याच्यापुढे एक संधी चालून येते. मृत्यूपूर्वी घरमालक कसल्याशा खेळात सहभागी होणार असतो, जो कदाचित त्याला मालामाल करून सोडेल. सॅबेस्टीअन तुटपुंज्या माहितीच्या जोरावर आडबाजूच्या एका बंगल्यात पोचतो, अन् खेळण्याची तयारी दाखवितो. मात्र हा खेळ असतो मृत्यूचा. तेरा माणसांना खेळाव्या लागणा-या या खेळात कोण जगेल यावर बोली लागणार असते. अन् अनेक श्रीमंत असमी या अभागी खेळाडूंच्या जीवाचा जुगार हसतहसत खेळणार असतात. जो सर्वांना पुरून उरेल त्यालाही मोठी रक्कम मिळणार असं आश्वासन जरूर असतं. पण हे जिवंत राहणं तेरातल्या एकाच्याच नशिबी येणार असतं.
१३ झमेटीमधला खेळ मी अधिक तपशिलात सांगणार नाही, पण तो पिस्तुलाच्या एका गोळीने आयुष्याचा जुगार मांडणा-या रशियन रुलेचीच एक आवृत्ती आहे, असं म्हटलं तरी पुरे. असे प्रसंग चित्रपटात तेव्हाच यशस्वी होतात, जेव्हा आपल्याला नायक कोण आहे, ते माहिती असूनही पुढे काय होणार याचा अंदाज बांधता येत नाही. इथे श्वास रोखून बसलेल्या प्रेक्षकाला चित्रपट पूर्णपणे वेठीला धरतो,अन आपल्या नियमांनी त्याला पूर्णपणे कह्यात आणतो.

सॅबेस्टीअनचं निर्वासित असणं,गरीबी,खेळात बळी जायला तेरा जण उपलब्ध असल्याचं चित्रण या सगळ्यांमधून एक सामाजिक पार्श्वभूमी जरूर तयार होते. पण त्यामुळे मी याला सोशल थ्रिलर म्हणणार नाही. हा हार्डकोअर थ्रिलरच आहे. मात्र त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण विषयाबरोबर त्यातल्या एका उपसूत्राचा उल्लेख मात्र हवा, नियती आणि तिने घेतलेल्या चमत्कारिक वळणांचा बेसावध माणसावर होणारा परिणाम हे इथलं उपसूत्र. हे इथल्या घरमालकाच्या मृत्यूपासून ते चित्रपटातल्या अखेरच्या प्रसंगापर्यंत वेळोवेळी कथानकामध्ये डोकावताना दिसतं.
मागे आल्फ्रेड हिचकॉकने सायको चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं,ते म्हणजे यातल्या सर्वात गाजलेल्या प्रसंगाच्या, म्हणजे शॉवर सीनच्या संकल्पनेतलं रक्ताचं चित्रण. या रंगसंगतीने भडकपणा काढून दृश्ययोजनेता रेखीवपणा जसाच्या तसा ठेवला. १३ झमेटीमध्येही रंग न वापरण्यामागे त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रसंगातलं रक्ताचं प्रमाण हे कारण असू शकतं.जरी ते प्रमाण हे सायकोच्या आसपास येण्यातलं नाही. या एकूणच चित्रपटाचं छायाचित्रण आणि दृश्यसंकल्पना अतिशय नेमक्या आणि प्रभावी आहेत. हिंसेला भडकपणा न आणून देता सूचक मांडणीचा वापर करणा-या. एकच उदाहरण घ्यायचं तर खेळ सुरू होण्याची सूचना असणा-या लाईट बल्बचं देता येईल. सहभागी खेळाडू आणि लाईट बल्ब यांच्यावर पुढेमागे फिरणारा कॅमेरा, हे दिग्दर्शकाच्या माध्यमावर असलेल्या पकडीचा पुरावा देणारं उदाहरण आहे.
सध्या हा चित्रपट युटीव्हीच्या वर्ल्ड मुव्हीज चॅनलवर कधीकधी पाहायला मिळतो. मात्र शक्य तर याची ट्रेलर न पाहिली तर बरं. कारण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यातला असा भाग ट्रेलर दाखवते, जो कथेच्या ओघात येणंच खरंतर योग्य. अर्थात तसं ते प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत लागू पडणारं विधान आहे. मात्र गुंतागुंत नसलेल्या आणि मर्यादित टप्प्यांनी पटकथा पुढे नेणा-या १३ झमेटीबाबत अधिकच.
-गणेश मतकरी

Read more...

गंमतीदार दुःस्वप्न

>> Wednesday, October 8, 2008


उबदार रात्र. ख्रिसमस इव्ह. एक गोड छोटा मुलगा सान्ताक्लॉजची वाट पाहत बसलाय.यथावकाश फायर प्लेसमध्ये एक दोरी सोडली जाते आणि सान्ता अवतरतो. मुलाला आनंद, सान्ता पोतडीतून हळूच एक खेळणं काढून मुलापुढे करतो. मुलगा ते उचलतो. प्रसंग प्रत्यक्षात इथेच संपायला हवा. पण सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रन चित्रपटात तो चालूच राहतो. आता फायरप्लेसमधून आणखी एक सान्ता उतरतो. मग आणखी एक. सगळे खेळणी काढून ती मुलापुढे करायला लागतात. आता मुलाच्या आनंदाची जागा हळूहळू भीतीने घेतलेली. हे वाढत चाललेले सान्ता आता खोली भरून टाकतात.त्यांचे हसरे चेहरेही आता बदलायला लागलेले,विकृत होत चाललेले. हे सगळं मुलगा सहन करू शकत नाही. तो भयंकर घाबरलेला. आता तो रडायला लागतो, बांध फुटल्यासारखा.
जाँ पिएर जुनेट या फ्रेंच दिग्दर्शकाचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणावा लागेल एमिली. जो लगाबरोबर इंग्रजीतर भाषेतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनात होता, आणि ब-याच जणांना तो जिंकण्याची खात्री होती. एमिली त्यावर्षी पारितोषिक प्राप्त ठरला नाही. (युद्धावर विदारक भाष्य करणा-या नो मॅन्स लॅण्डने बाजी मारली.) पण जुनेट या दिग्दर्शकाचं नाव लक्षात राहिलं. एमिली हा त्याचा बहुसंख्य प्रेक्षकांना आवडणारा पहिलाच चित्रपट म्हणावा लागेल. एमिलीआधी मार्क कारोबरोबर केलेल्या विक्षिप्त आणि चमत्कृतीपूर्ण चित्रपटातील एक होता सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रन. हा आणि त्याआधीचा डेलिकटेसन पाहिलेल्यांना जुनेट एमिली करण्याइतका सरळ कसा झाला याचं निश्चितच आश्चर्य वाटेल. एमिलीनंतरच्या व्हेरी लाँग एन्गेजमेंटमध्ये तो आणखीच माणसाळल्याची चिन्ह दिसू लागली. (व्हेरी लाँग एन्गेजमेंटबद्दल वाचा फेब्रुवारी महिन्यातील पोस्टमध्ये)
सिटी ऑफ लॉस्ट चिल्ड्रनचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे त्याचं दृश्य स्वरूप. विकृती, चमत्कृती, भव्यता,आश्चर्य, किळस अशा अनेकविध आणि सतत बदलणा-या भावना हा चित्रपट आपल्या मनात उत्पन्न करत राहतो. त्याची निर्मिती अतिशय खर्चिक होती आणि हा खर्च आपल्या डोळ्यांना सतत दिसत राहतो. दिग्दर्शकांनी इथली गोष्ट घडविण्यासाठी एका नव्याच जगाला आकार दिलाय. हे जग भविष्यातलं नाही, भूतकाळातलं तर नाहीच नाही. पण आपल्या जगासारखंही नाही. आपल्या सर्वकाळाचं मिश्रण करणारं कोणत्याशा समांतर विश्वातलं हे जग असावं. किंवा कदाचित आपल्याच दुःस्वप्नातलं.
तर या जगात एक शास्त्रज्ञ आहे. समुद्रात मध्यभागी प्रयोगशाळा उभारून राहणारा. याचं नाव क्रँक (डॅनियल एमिलफोर्क) क्रँक फार झपाट्याने म्हातारा होतोय. कारण त्याला स्वप्नच पडू शकत नाहीत. क्रँकच्या तळावर एक फिशटँकमध्ये तरंगणारा मेंदू , मिस बिस्मथ नावाची बुटकी बाई आणि एकसारखे दिसणारे (अर्थातच) सहा क्लोन्स आहेत. आपलं वाढणारं वय वेळीच आवरण्यासाठी क्रँक करतो काय, तर लहान मुलांना पळवून आणून त्यांची स्वप्न चोरण्याचा प्रयत्न. या पळवलेल्या मुलांमधला एक असतो डेनरी. डेनरीला पळवणं क्रँकला महागात पडेलसं दिसायला लागतं. कारण डेनरीचा (बहुदा मानलेला) भाऊ असतो, जत्रेत शक्तीप्रदर्शन दाखवणारा वॅन (रॉन पर्लमन) , वॅन डेनरीच्या मागावर राहण्याची शर्थ करतो. आणि या प्रयत्नात त्याला साथ मिळते ती मिएट (जुडीथ विटेट) या चोर अनाथ मुलांच्या गँगचं नेतृत्व करणा-या मुलीची. कथेची इतपत वळणं सांगितली, तरी लक्षात येईल की कथा किती विचित्र आहे. व्यक्तिरेखा त्याहून विचित्र.
लॉस्ट चिल्ड्रनमधली गंमत म्हणजे तो या चमत्कारिक विश्वातली प्रत्येक गोष्ट ही बारकाईने रंगवायचा प्रयत्न करतो. भावनिकदृष्ट्या नाही, तर व्हिजुअली.
उदाहरण एक. इथे मुलं पळवणारे क्रँकचे काही हस्तक आहेत. ते एका परीने आंधळे आहेत. म्हणजे त्यांचा एक डोळा सफेद झाला आहे. तर दुस-यावर अनेक चक्रांची बनलेली एक यंत्रणा लावली आहे. जिचा वापर त्यांना टीव्हीच्या पडद्यासारखी दृश्य दिसण्याकरता होतो. ही चक्रांची यंत्रणा कशा प्रकारे वापरात येत असेल याचा पूर्ण विचार दिग्दर्शकाने केला आहे आणि त्याचा अंगावर शहारे आणण्यासारखा वापरही एका प्रसंगात करून दाखविला आहे.
उदाहरण दोन. क्रँकच्या फिशटँकमधला मेंदू. हा मेंदू कुणाचा आहे ? तो इतरांशी काय संवाद साधत असेल ? त्याची क्लोन्सबरोबर बोलण्याची पद्धत अन् क्रँकबरोबर बोलण्याची पद्धत यात काय फरक असेल ? याचा पूर्ण अभ्यास दिग्दर्शकाने केलेला दिसतो.
अशी अनेक उदाहरणं घेता येतील. दिग्दर्शकांनी चित्रपटाची जणू फोड करून प्रत्येक प्रसंग स्वतंत्रपणे भरत नेला आहे. कल्पनेच्या यथासांग भरा-या मारत त्यांनी ही गोष्ट रंगवत नेली आहे. लॉस्ट चिल्ड्रनला एखाद्या गटात बसवायचं तर त्याला फॅन्टसी किंवा अदभुतिका म्हणता येईल. पण एक तर ही अदभुतिका (यात मुलांच्या भूमिका असूनही) मोठ्यांचा प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे आणि फॅन्टसीप्रमाणेच इतर चित्रप्रकारांचे, खासकरून सायन्स फिक्शनचे अनेक गुणधर्म इथे लक्षात येण्यासारखे आहेत. इथे विनोदही आहे, पण तो मुख्यतः काळा.
जुनेट आणि कारोचं हे जग सर्वांनाच आवडणार नाही, काहींना पटणार नाही, काहींना पाहवणार नाही. पण वेगळ्या चवींचं काही चाखण्याची तयारी असणा-यांनी तो जरूर पाहावा. नाहीतरी रुचीपालट सर्वांनाच हवा असतो.
-गणेश मतकरी

Read more...

ब्लू- अथांग निळाई

>> Friday, October 3, 2008



स्वातंत्र्य समता आणि बंधुता या फ्रान्सच्या घोषवाक्‍याच्या संदर्भानं प्रसिद्ध पोलिश दिग्दर्शक क्रिस्तॉफ किस्लोवस्की यांनी ब्लू, व्हाईट आणि रेड ही चित्रत्रयी तयार केली. "ब्लू' या चित्रपटातून ज्युलीची वैयक्तिक पातळीवरची स्वातंत्र्याची कल्पना आणि तिला शोधत येणारा तिचा भूतकाळ तिच्या दुःखाच्या जखमांवर फुंकर घालत आपल्यापुढे उलगडला जातो. ........


असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाट माथे निळ्या राऊळांचे
निळाईत भिजे माझी पापणी

क्रिस्तॉफ किस्लोवस्कीचा "ब्लू' हा चित्रपट बघताना ग्रेसांच्या कवितेची आठवण झाली. पहिल्यांदा जेव्हा ह्या ओळी वाचल्या होत्या तेव्हा त्या कळल्या नव्हत्या. आज तरी कळल्या आहेत का? कुणास ठाऊक! पण तेव्हाही आणि आजही ह्या ओळींमध्ये काहीतरी जादू आहे आणि आपल्याला ती जादू उमगत नसली तरी आवडते आहे, हे मात्र जाणवत राहतं. मला वाटतं, काही कलाकृती अशाच असतात. संपूर्ण कळत नाही. काही तरी वेगळं आहे याची जाणीव मात्र होत असते आणि जे दिसतंय त्यातून निर्मात्याला काय बरं सांगायचं असेल, प्रश्‍नाच्या गुंगीत स्वतःला गुरफटून घेण्यातही एक मजा असते. ग्रेसांच्या या कवितेसारखीच "ब्लू' या चित्रपटाच्या निळाईत माझी पापणी हलकेच बुडून जाते.

निळ्याशार धुक्‍याच्या वाटेत एक कार जातेय आणि एका क्षणात त्या गाडीचा अपघात होतो. ज्युलीचा नवरा आणि पाच वर्षांची मुलगी ठार होतात. बेशुद्ध पडलेल्या ज्युलीला हे हॉस्पिटलमध्ये काही दिवसांनी कळतं. सर्वस्व संपलेली ज्युली गोळ्यांचा जादा डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करते; पण तो सफल होत नाही. ज्या झटक्‍यात ती तोंडात गोळ्या ओतते तेवढ्याच वेगाने त्या तोंडातून बाहेर फेकल्या जातात.

ज्युली दुःखात आहे; पण ते ती व्यक्त करीत नाही. नवरा पॅट्रिक मोठा संगीतकार आहे आणि एका मोठ्या सिंफनीच्या कंपोझिशनवर तो काम करीत होता. त्याच्या सुरावटींचं नोटेशन ज्युलीच करते अशीही एक अफवा आजूबाजूला आहे. ज्युलीला यापासून दूर जायचंय. ती घराची विल्हेवाट लावते, नवऱ्याच्या नोटेशन्स तयार करते. निळ्या रंगाच्या त्याच्या स्टडी रुममध्ये आता फक्त निळ्या लोलकांचं एक झुंबर उरलेलंय. तिच्या पर्समध्ये मुलीचा एक सॉलीपॉपही सापडतो. निळसर चंदेरी कागद बाजूला सारून ती त्याच्याकडे बघते; पण लगेच मोठ्या निश्‍चयानं तो कचाकच चावून खाऊन टाकते. आता तिला कुठल्याच आठवणी नको आहेत. नवऱ्याचा मदतनीस ऑलिव्हिअर याला ती घरात बोलावते. त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. एक रात्र ती दोघं एकत्र काढतात. सकाळी ती त्याला सांगते, "मी इतर चारचौघींसारखीच आहे. तुला माझी आठवण येण्याचं आता काही कारण नाही, तू इथून निघालास की दार ओढून घे'- त्याला काही कळायच्या आत ती घर सोडून निघून गेलेली आहे!


ज्युलीला सुटका हवी आहे. स्वातंत्र्य हवं आहे. सुटका भूतकाळापासून, स्वातंत्र्य इतरांपासून. स्वतःचं वेगळं, स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी ती माहेरच्या नावानं एक फ्लॅट घेते आणि पूर्वायुष्य विसरून नव्यानं जगायला सुरवात करते. जुन्या आयुष्यातलं फक्त निळं झुंबरच तिनं सोबत आणलंय. ती आपल्या आईला भेटायला जाते आणि तिला सांगते, की आठवणी, प्रेम, नवरा, घर हे सगळं मी तोडून टाकलंय. आता मला ते बंधन नकोय. काहीही न करणे एवढीच एक करण्यासारखी गोष्ट माझ्याजवळ उरलीये! नव्या फ्लॅटमध्ये नवी माणसं तिला भेटतात; पण तिला तिचा भूतकाळही शोधत येत असतो. अपघाताच्या ठिकाणी सापडलेली तिची साखळी परत करायला तिचा माग काढत अँटनी नावाचा तरुण येतो. तिला शोधत ऑलिव्हिअरही येतो आणि घराशेजारच्या कॉफी शॉपमध्ये ती जेव्हा जाते तेव्हा बाहेरच्या फुटपाथवर बासरी वाजवत बसणारा एक माणूस नेहमी तिच्याच नवऱ्यानं रचलेली सुरावट वाजवत असतो! ती अँटोनीला साखळी पुन्हा देऊन टाकते. ऑलिव्हिअरला परतीसाठी नकार देते, तर बासरीवाला ही मीच तयार केलेली सुरावट आहे असं सांगतो! टीव्हीवर तिच्या नवऱ्याची अर्धवट रचना ऑलिव्हिअर पूर्ण करणार असल्याची बातमी येते आणि त्याच्याकडे तिला ओढत घेऊन जाते. ती ज्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती त्याच वास्तवाकडे नियती तिला पुन्हा घेऊन जाते. नवऱ्याच्या मिस्ट्रेसच्या आणि तिच्या होणाऱ्या मुलाच्या नावे ती सगळी इस्टेट करते आणि ऑलिव्हिअरकडे राहायला जाते.

भूतकाळापासून ज्युलीला स्वातंत्र्य हवं आहे; पण ते तिला मिळत नाही. किस्लोवस्कीच्या म्हणण्यानुसार "ब्लू'मध्ये सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याविषयी चर्चा नसून व्यक्तीचं किंवा जीवनाचं स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. स्वतःकडे काही नसण्यात एक स्वातंत्र्य आहे आणि स्वतःकडचं सर्वस्व गमावण्यात देखील स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याचा निळा रंग चित्रपटात सूचक म्हणून वारंवार येतो. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाताना वास्तवापासून लांब पळता येत नाही. अन्यथा वास्तवच तुमचा पाठलाग करत तुमच्यापर्यंत पोचतं, असं काहीसं सुचवायचंय.

शेवटी ज्युली ऑलिव्हिअरकडे जाते तेव्हा निळ्या झुंबराचे लोलक दिसतात आणि एकमेकांत रमलेली ती दोघं, गळ्यातली साखळी बघताना अँटोनी, स्वतःत हरवलेली आई, नवऱ्याच्या प्रेयसीच्या सोनोग्राफिक इमेजेसमधलं बाळ, अपार्टमेंटमध्ये राहताना भेटलेली नाईट क्‍लबमध्ये काम करणारी ल्यूसी अशा सर्व प्रतिमा एकामागे एक दिसतात आणि या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या ज्युलीच्या डोळ्यांतल्या बाहुलीचा एक्‍स्ट्रीम क्‍लोजअप पडदाभर दिसतो आणि चित्रपट संपतो.

अत्यंत बारकाईनं रचलेले चित्रपटाचे सीन्स बघताना पुनःपुन्हा त्यातली तरलता शोधण्याचा मी प्रयत्न करतो आणि पुन्हा त्यातच बुडून जातो. मला वाटतं हीच या चित्रपटाची ताकद आहे. स्वातंत्र्याची निळाई रंगात, प्रकाशाच्या कवडशांत, धुक्‍यात सूचकतेनं येत राहते आणि निळाई सांगणारा ग्रेस पुन्हा पुन्हा आठवतो. किस्लोवस्कीच्या "ब्लू'ला ग्रेसच्या निळाईनं भागावं की ज्युलीच्या निळ्या झुंबराला धुक्‍याच्या निळ्या धुळीनं गुणावं हे गणित सुटत नाही! ब्लूच्या निमित्तानं निळाईचं गुपित अधिकच गूढ होत जातं आणि मला पुढल्या ओळी आठवतात.

निळ्याशार मंदार पाऊलवाटा
धुक्‍याची निळी धूळ लागे कुणा
तुला प्रार्थनेचा किती अर्ध्य देऊ
निळा अस्तकाही नारायणा


-प्रसाद नामजोशी
(सकाळच्या सप्तरंग पुरवणीमधील point of view या सदरामधून. ई-सकाळवर या सदरातील लेख सप्तरंगमध्ये वाचता येतील.)

Read more...

मुन्ना आणि गांधीवाद

>> Wednesday, October 1, 2008


मुन्नाभाईतल्या चित्रणाहून खरा समाज हा अधिक बेपर्वा आहे आणि गांधीवादाला फारच आयडियलिस्टिक समजून त्याला तो विसरूनही गेला आहे. आज केलेले सत्याचे प्रयोग हे आपल्याला मुन्नाइतकं यश मिळवून देतीलसं नाही. पण तरीही हे विचार ज्या मूलभूत पातळीवर आपल्याला पटतात, ती पातळी महत्त्वाची आहे. आपला वारसा आणि आपल्या माणूसपणाची आठवण करून देणारा आहे.
"मुन्नाभाई एम. बी. बी. एस.'च्या यशानंतर दिग्दर्शक हिरानी आणि निर्माता विधुविनोद चोप्रा यांनी "मुन्नाभाई एल. एल. बी.' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आणि आम जनता खूष झाली. ज्याप्रमाणे मुन्नाने वैद्यकीय महाविद्यालयात धमाल उडवली तशीच तो आता कायदेशास्त्रात उडवणार अशी चिन्हं दिसायला लागली. पण प्रश्न हा होता, की जर केवळ क्षेत्रं बदललं, तर या नव्या चित्रपटात खूपच तोचतोचपणा येईल का? अर्थात सीक्वल म्हटलं, की तोचतोचपणा येतो, नव्हे काही प्रमाणात तो आवश्यकही असतो. पण मूळ चित्रपटाचा बाज आणि नव्या चित्रपटातलं नावीन्य यांचा तोल जमणं आवश्यक असतं आणि तो कितपत जमतो, यावर हा चित्रपट तरतो का बुडतो हे अवलंबून राहातं. कदाचित "एलएलबी'मध्ये हा तोल राखणं शक्य झालं नसावं किंवा काही इतर कारणंही असतील, पण लवकरच वकिली पेशाला बाद करून मुन्नाला महात्मा गांधींना भेटवण्याचा घाट घातला गेला.
आजच्या काळातला मुन्ना महात्मा गांधींना कसा भेटणार, हे कोडं इतरांप्रमाणंच मलाही पडलं आणि त्यानंतर चित्रपटाबद्दल ऐकू आलेल्या उलटसुलट बातम्यांमुळे हा चित्रपट कागदावरच राहणार असंही वाटायला लागलं. सुदैवानं तसं झालं नाही. हीच कल्पना कायम ठेवून मुन्नाभाई आला आणि त्यानं सर्वांच्या अपेक्षा दामदुपटीनं पूर्णही केल्या. "लगे रहो मुन्नाभाई'ला खरंतर "मुन्नाभाई एम. बी. बी. एस.'चं सिक्वल म्हणता येणार नाही. जरी तो त्या मुन्नाभाईमधल्या अनेक व्यक्तिरेखांना (सगळ्याच नाही) पुन्हा पडद्यावर आणत असला, तरी पहिल्या चित्रपटातल्या घटनांना तो कथेच्या दृष्टिकोनात नंतर पूर्णपणे विसरतोच. बरं, ही त्याच्या आयुष्यात पुढं घडणारी घटना म्हणायचं, तरी ती "एम. बी. बी. एस.'मध्ये सांगितलेल्या मुन्नाच्या कल्पित भविष्यकाळाबरोबर जुळत नाही. थोडक्यात लगे रहो हा मुन्नाभाई मालिकेचा भाग असला तरी त्यापलीकडे तो एक स्वतंत्र चित्रपट आहे, ज्याचा आधीच्या भागाशी काही संबंध नाही. असं असूनही एक मान्य करता येईल, की पहिल्या भागात मुन्नाभाई या सद् वर्तनी गुंडाशी आणि सर्किट या त्याच्या गंमतीदार सुस्वभावी हरकाम्याशी आपली जी ओळख होते, त्याचा इथे फायदा होतो. "लगे रहो...' पुन्हा ही ओळख करून देण्यावर वेळ न काढता लगेच कथानकाला हात घालतो.
मुन्ना (अर्थात संजय दत्त) या वेळी कथेच्या सुरवातीलाच प्रेमात पडलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच गुंडगिरीकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रेयसीची चित्रं मनात रंगवतो आहे. मनात अशासाठी, की जान्हवीशी (विद्या बालन) त्याची अजून भेट झालेली नाही. तो केवळ तिचा आवाज रेडिओवर ऐकतो आहे. गांधीजयंतीनिमित्ताने घेतलेल्या एका क्विझमुळे त्याची जान्हवीशी भेट होते आणि मुन्ना ऊर्फ मुरलीप्रसाद शर्मा तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी आपण गांधीवादी प्रोफेसर असल्याचा आव आणतो. जान्हवीच्या सांगण्यावरून तो चार-पाच दिवसांत गांधीजींवर एक भाषण देण्याचंही मान्य करतो आणि क्रॅश कोर्स म्हणून दिवस-रात्र गांधीमय होतो. गांधीविषयक पुस्तकात तो रमला असताना त्याची प्रत्यक्ष गाधींजींशीच (दिलीप प्रभावळकर) भेट होते आणि हे प्रकरण केवळ जान्हवीसंबंधातलं उरत नाही. गांधीवादाचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करायला लागलेल्या मुन्नाला एक आव्हान मिळतं, ते लकी सिंगच्या (बोमन इरानी) जोरावर. लकी सर्किटलाच वापरून मुन्नाच्या नळकत जान्हवी राहात असलेल्या किंचीत वृद्धाश्रमाच्या वास्तूवर कब्जा करतो. आणि सत्य/अहिंसा आजच्या काळातही पूर्वीइतकीच प्रभावी ठरतील का, हे पाहण्याची संधी मुन्नाला मिळते.
या चित्रपटाचा विशेष आहे, तो त्याचा साधेपणा. कोणत्याही प्रकारचा आव न घेता त्याने आजच्या काळाबरोबर गांधीवादी विचारांना आणून जोडलं आहे. ही मूल्य अतिशय महत्त्वाची असून, आज हरवत चालली आहेत. आणि त्यांचा ऱ्हास न होऊ देता समाजाच्या सर्व घटकांनी ती अंगी बाळगणं आवश्यक आहे, हे या चित्रपटाचं सूत्र तो लोकांना यथेच्छ हसवत, त्यांना कळेलशा भाषेत पण प्रवचन न करता सांगतो. चित्रकर्त्यांनीच चिकार बोलबाला केलेल्या "मैने गॉंधी को नही मारा' चित्रपटाचा संदर्भ इथं आठवणं साहजिक आहे. खरं तर त्याचा गांधीवादाशी फार संबंध नव्हता आणि जो होता, तो सेन्सेशनल नाव आणि अनुपम खेरच्या तोंडी असणारं चिकटवलेलं भाषण यापुरता होता. मुळात भ्रमिष्ट होत जाणारा बाप आणि त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करणारी मुलगी एवढीच खरी गोष्ट होती. तरीही त्यांनी आपण गांधीच्या विचारांसंबंधित काही करत असल्याची जी पोज घेतली होती, तिला तोड नाही. "लगे रहो'त तो या प्रकारच्या युक्त्या करत नाही. त्याला तशी गरजही नाही. उलट तो मूळ गांधी प्रकरण जाहिरातीपासून लांब ठेवून अंडर प्ले करतो. इथे नावात गांधी नाहीत. जाहिरातीत आहे, ते आकाशात ढगांनी बनवलेलं अस्पष्ट रेखाचित्र. अशीही शक्यता आहे, की चित्रपट विनोदी आणि प्रेक्षक हा पहिल्या चित्रपटाच्या चाहत्यांचा असल्याने कोणत्याही प्रकारचं विषयातलं गांभीर्य सुरवातीपासून अधोरेखित होऊ नये असा संबंधितांचा प्रयत्न असावा. काही असो, ही स्ट्रॅटेजी योग्य असल्याचं सिद्ध झालेलं आहे.

मूळच्या मुन्नाभाईवर पॅच ऍडम्स चित्रपटाचा थोडा प्रभाव होता, तर या चित्रपटावर ब्युटीफूल माइंडची छाया आहे. मात्र, ही छाया अतिशय पुसट आहे आणि तिचं असणं हे शेवटाकडं येणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सच्या प्रसंगात निश्चित होतं. त्यापलीकडं चित्रपट हा स्वतंत्र तर आहेच. वर त्याची पटकथा खात्रीनं कौतुकास्पद आहे. मुळात गंभीर विचार आणि विनोदी सादरीकरण यांची सांगड घालणं हेच कठीण आहे. त्याशिवाय मुन्नाच्या भूमिकेला पटण्याजोगा आलेख उभा करणं वर्तमानातील कथेमध्ये प्रत्यक्ष गांधीजींना (कोणतेही वाद उपस्थित न करता) आणणं, त्यांच्या असण्याला योग्य तो स्पष्टीकरण देणं, प्रमुख पात्रांबरोबर अनेक पात्रांना थोडक्या प्रसंगात (हेमचंद्र अधिकारींसारख्यांना तर एका प्रसंगामध्येच) रेडिओ शोची गरज म्हणून उभं करणं, खलनायकाला माणसाळवणं आणि प्रेक्षकाला विचार करायला लावतोय असं न भासवता तो करायला भाग पाडणं या सर्वच गोष्टी आव्हानात्मक आहेत. ज्या इथं फार कौशल्यानं रचलेल्या आहेत. मध्यंतराआधीचा मुन्नाने सर्किटची माफी मागण्याचा प्रसंग आणि शेवटाकडचा लग्न एपिसोड हे विशेष जमलेलं.
या प्रकारचे वैचारिक खेळ असणारे चित्रपट दिग्दर्शकाच्या दृष्टीनंही कसरत असते आणि राजकुमार हिरानीनं आपल्या या दुसऱ्या चित्रपटात आपली ताकद उत्तम रीतीनं सिद्ध केली आहे. मूळ मुन्नाभाईतली अनेक पात्रं (उदा. विद्यार्थी, हॉस्पिटलमधला झाडूवाला, पेशंट् स, प्रोफेसर्स) इथे वेगळ्या छोट्या भूमिकांत चमकवणं हे गमतीदार आहे. बोमन इरानी आणि जिमी शेरगिललाही वेगळी पात्रं म्हणून आणणं स्वागतार्ह आहे. पण मग ग्रेसी सिंगनंच काय घोडं मारलं? हे मान्य, की इथे नायिका वेगळी असणं आवश्यक होतं, पण इतर पात्रं होतीच की. असो! लगान, मुन्नाभाई आणि गंगाजल या तीनही यशस्वी चित्रपटांत काम करूनही दुर्लक्षित असणाऱ्या ग्रेसीच्या अदृश्य असण्यामागं काहीतरी उघड न कळणारं कारण जरूर असावं.
मुन्नाभाईच्या दोन्ही चित्रपटांच्या आकारात एक लक्षात येईलसं साम्यस्थळ आहे. दोन्ही चित्रपटांत तो त्याला मनापासून पटणाऱ्या एका विचाराचा पाठपुरावा करतो. एका क्षणी त्याच्या लक्षात येतं. की आजचं जग त्याच्या कल्पनेपलीकडं निष्ठुर आहे आणि ते या विचाराला तग देणार नाही, या निराशेनं तो या विचाराचा नाद सोडणार एवढ्यात काही तरी घडतं आणि त्यानं निवडलेला मार्गच योग्य अल्याचं सिद्ध होतं. पहिल्या भागात त्याला पटणारा विचार होता तो वैद्यकशास्त्राला अधिक मानवतावादी करण्याचा, तर इथं आहे गांधीवाद. हे उघड आहे, की दुसऱ्या चित्रपटातला विषय अधिक महत्त्वाकांक्षी आणि आपल्या समाजाशी खास जवळीक असणारा आहे. त्यामुळेच हा चित्रपटही अधिक मोठा आहे. आपल्याला मनापासून पटणारा आहे.
अर्थात मुन्नाभाईतल्या चित्रणाहून खरा समाज हा अधिक बेपर्वा आहे आणि गांधीवादाला फारच आयडियलिस्टिक समजून त्याला तो विसरूनही गेला आहे. आज केलेले सत्याचे प्रयोग हे आपल्याला मुन्नाइतकं यश मिळवून देतीलसं नाही. पण तरीही हे विचार ज्या मूलभूत पातळीवर आपल्याला पटतात, ती पातळी महत्त्वाची आहे. आपला वारसा आणि आपल्या माणूसपणाची आठवण करून देणारा आहे. न जाणो ही आठवणही कदाचित आपल्याला अधिक सकारात्मक बनवायला पुरेशी ठरेल.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP