`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज` - युद्धानंतर...

>> Sunday, September 25, 2011

`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज` हे नाव थोडं फसवं आहे, आणि उपरोधाने भरलेलं. ते ज्या वाक्प्रचाराशी संबंधित आहे, तो एका प्रसंगात अनपेक्षितपणे आपल्या कानावर पडतो आणि आपण चमकतो. आपलं आयुष्य, आपल्या आजवरच्या जगण्याचा अर्थ आणि आयुष्याकडून आपल्याला असणा-या अपेक्षा यांचा ताळेबंद लावू पाहतो. बहुधा तो लागणार नाही, असं एका बाजूने वाटत असताना देखील!
`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज`ला युद्धपट म्हणता येणार नाही, कारण तो युद्धादरम्यान घडत नाही, मात्र युद्ध या चित्रपटाच्या केंद्रस्थानी जरूर आहे. त्याचे तीन नायक हे युद्धावरून आपल्या गावात परत आले आहेत. सैनिक म्हणून आपलं कर्तव्य त्यांनी यथायोग्य पार पाडलं आहे. त्यासाठी केवळ आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळच नाही तर इतरही गोष्टींचा त्याग त्यांना करावा लागला आहे. आता परत आल्यावर आपलं आयुष्य पूर्ववत सुरू करावं एवढीच त्यांची इच्छा आहे. मात्र मधे गेलेल्या काळाचं काय ? या काळात त्यांच्याशिवाय जग पुढे गेलं आहे, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या स्वतःमधेही बदल झाला आहेच. हा बदल विसरून समाजात आपलं स्थान पुन्हा मिळवणं शक्य होईल का, हा त्यांच्यापुढला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
व्हिएतनाम युद्धात सहभागी झालेल्या रॉन कॉविकच्या आत्मचरित्रावर आधारित असलेल्या ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित `बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै` ( Born on the Fourth of July) अनेकांनी पाहिला असेल. मात्र बेस्ट इयर्स... हा त्याच्या अनेक वर्ष आधी केलेला, आणि एका विशिष्ट हकिकतीपेक्षा अधिक प्रातिनिधिक पातळीवरून समाजात परत येऊ पाहाणा-या सैनिकांच्या समस्यांकडे पाहणारा चित्रपट आहे. तीन वेळा दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळविलेल्या विलिअम वायलर यांचा हा सर्वात महत्त्वाचा चित्रपट मानता येईल.
निर्माते सॅम्युअल गोल्डविन यांना `टाइम` मासिकातल्या एका लेखावरून या चित्रपटाची कल्पना सुचली, आणि प्रत्यक्ष पटकथेवर काम करण्यासाठी त्यांनी युद्ध पत्रकारितेत काम केलेल्या मॅककिनले कॅन्टर यांची मदत घेतली. मॅककिनलेनी आपला आशय व्यक्त केला तो `ग्लोरी ऑफ मी`  नावाने प्रकाशित झालेल्या लघुकादंबरीमधून. पुढे या कादंबरीचं रॉबर्ट इ, शेरवुड यांनी पटकथेत रुपांतर केलं. मॅककिनले यांना आपल्या वॉर कॉरस्पॉन्डन्ट असतानाच्या अनुभवाचा फायदा नक्की झाला असणार, हे आपल्याला चित्रपटात उभ्या राहणा-या सैनिकांच्या आयुष्याच्या अनेक पैलूंवरून लक्षात येतं. सैनिकांची वये, युद्धापूर्वी असणारे त्यांचे व्यवसाय, समाजातलं स्थान आणि सैन्यातलं पद यामधे असणारी विसंगती आणि गणवेश उतरल्यानंतर त्यातून उदभवणा-या समस्या, मानसिक समस्या, अपंगत्वासारखे अधिक बिकट प्रश्न, कुटुंबाबरोबरच्या संबंधात संभवणारे बदल, अशा कितीतरी पातळ्यांवरून इथे सैनिकांबद्दल विचार केलेला दिसतो. या चित्रपटात सांकेतिक खलप्रवृत्ती दाखवणारं पात्र नाही, चित्रपटाची तशी गरजही नाही. मात्र एका परीने परिस्थिती हीच यातली खलप्रवृत्ती आहे, असं म्हणता येईल.
चित्रपटाच्या तीन नायकांच्या व्यक्तिरेखा या, या सा-या पैलूंचा काळजीपूर्वक विचार करून मांडलेल्या आपल्याला दिसतात. यातली सर्वात ज्येष्ठ व्यक्तिरेखा आहे, ती अ‍ॅल स्टीवन्सन (फ्रेड्रीक मार्च) याची. याचा सैन्यातला हुद्दा सार्जन्टचा, म्हणजे फार वरचा नव्हे, पण त्याचा मूळ व्यवसाय बॅन्करचा असल्याने त्याचं समाजातलं स्थान सुरक्षित आहे. मध्यमवयीन अ‍ॅलचं एक सांकेतिक  सुखी कुटुंब आहे. पत्नी मिली (मर्ना लॉय), मुलगी पेगी (टेरसा राईट) आणि मुलगा रॉब यांचं अ‍ॅलवर प्रेम आहे. आल्या आल्याच पुन्हा सन्मानाने कामावर रुजू होण्यासाठी त्याला बॅन्केचं बोलावणंही आलेलं आहे. तरीही अ‍ॅल अस्वस्थ आहे. आपण नसताना आपले कुटुंबीय आपल्यापासून लांब गेल्याची भावना त्याच्या मनात आहे. आपल्या युद्धातल्या अनुभवाची किंमत आपल्या व्यवसायात होऊ शकत नसल्याची खंतही आहे.
मधली, तरुण नायकाची व्यक्तिरेखा आहे, ती कॅप्टन फ्रेड डेरी (डाना अँन्ड्रज) याची. फ्रेड विवाहीत आहे, मात्र विवाह युद्धावर जाण्याआधी घाईघाईत केलेलं. पत्नीशी घड परिचय नाही. युद्धातल्या हुद्दयाचा एरवीच्या आयुष्यात उपयोगही नाही. भरकटत जाणा-या फ्रेडला पेगी, ही अ‍ॅलची मुलगी आधार देऊ पाहते, मात्र या संबंधावर अ‍ॅल आक्षेप घेतो.
होमर पॅरीश (हॅरल्ड रसेल ) ही यातली तिसरी व्यक्तिरेखा त्यामानाने लहान, आणि कमी गुंतागुंत असणारी असली, तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर मुळातच ती अपंगत्वासारख्या सैनिकांबाबत संभवणा-या मुलभूत प्रश्नाला हात घालते. त्यातून ती साकारणारा अभिनेता हा नॉन अ‍ॅक्टर अन् खराच सैन्यात अपंगत्व आलेला. होमरचे दोन्ही हात कोपराखाली तुटलेले आहेत, आणि नेव्हीने तिथे हुक्स बसवून दिले आहेत. होमर ते वापरण्यात पारंगत आहे, आणि धडधाकट माणूस करेल ती कोणतीही गोष्ट तो करून दाखवू शकतो. मात्र आपल्या प्रेयसीचं, विल्माचं प्रेम स्वीकारणं त्याला कठीण जातं. वरवर अपंगत्वावर मात करणा-या होमरला आपल्या मनातल्या अपंगत्वाला कसं दूर करायचं, हे अजून समजलेलं नाही.
चित्रपटातलं प्रमुख कथासूत्र हे अ‍ॅल आणि फ्रेड यांच्या एकमेकांत गुंफलेल्या गोष्टीला पुढे नेतं. या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात आणि परिस्थितीत मूळचाच विरोधाभास साधून पटकथेने विषयाशी संबंधित अनेक घटक इथे एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला आहे. खासकरून सैन्यातला हुद्दा अन् समाजातलं स्थान या प्रश्नाची दोन टोकं आणि अ‍ॅलच्या सुखी कुटुंबाने फ्रेडच्या बिकट वैवाहिक जीवनाला दिलेला छेद यामधून हे कथानक अनेक मुद्द्यांना स्पर्श करू शकतं. होमरची समस्या ही त्यामानाने या दोघांच्या आयुष्यापेक्षा वेगळी आणि सेल्फ कन्टेन्ड आहे. इतर दोघांच्या कथेत तो अधेमधे डोकावत राहतो, आणि त्याच्या आयुष्यातलं नाट्यही उलगडत राहतं. मात्र त्याच्या प्रश्नावर चित्रपटाने शोधलेलं उत्तर हे त्यामानाने सोपं आणि अपेक्षित आहे. साहजिकच आहे, चित्रपट सैनिकांच्या सहानुभूतीने विचार करण्यासाठी काढण्यात आलेला आहे. अपंगत्वाकडे तो वास्तववादापेक्षा आदर्शवादी नजरेने पाहतो, यात आश्चर्य नाही.
दिग्दर्शक वायलर आणि `सिटीझन केन`साठी गाजलेला छायाचित्रकार ग्रेग टोलन्ड यांनी मिळून चित्रपटाच्या दृश्यरचनांमधे फार अव्वल कामगिरी बजावली आहे. केन प्रमाणेच इथेही डीप फोकस तंत्राचा, म्हणजे दृश्यचौकटीतल्या सर्व कोप-यांमधे स्पष्ट प्रतिमा उमटविण्याचा प्रयोग इथे केलेला दिसतो. चित्रपटात अनेक प्रसंगात तीनही प्रमुख पात्र आपल्या वेगवेगळ्या कथानकाला पुढे नेताना दिसतात, अशावेळी दृश्यचौकटीच्या खोलीचा, डेप्थ ऑफ फिल्डचा सराईत वापर करून दिग्दर्शक चौकट विभागून देतो. केवळ शॉट डिव्हिजन न करता बराच वेळ चालणा-या लॉन्ग टेक्स आणि पात्रांच्या योजनाबद्ध रचनेमधून दिग्दर्शक अर्थपूर्ण दृश्य मांडताना दिसतो.
होमरच्या काकाच्या बारमधले प्रसंग यादृष्टीने खास पाहण्यासारखे. बारची पूर्ण रचना नाटकाच्या नेपथ्याप्रमाणे आपल्यापुढे मांडत डायनिंग एरिआ, पिआनो, बार काउन्टर प्रवेशद्वार आणि त्याजवळचा फोनबुथ या सगळ्या जागांचा वापर करणारा अ‍ॅल आणि फ्रेडमधल्या कन्फ्रन्टेशनचा प्रसंग तर या पद्धतीचा सर्वात जमलेला नमुना.
`द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ज` हा सकारात्मक सूचक शेवटावर संपतो, मात्र तो पोलिटिकली करेक्ट पद्धतीने वागण्यासाठी आणि सैनिकांकडे सहानुभूतीने पाहाणं आवश्यक वाटल्याने केला असेल, हे उघड आहे. तो ज्या समस्या मांडतो, त्या अशा चुटकीसरशी सुटणा-या नव्हेत, किंबहुना आजही त्यांची भेदकता जाणवणारी आहे. काही चित्रपटांचं अभिजातत्व मान्य करण्यासाठी त्याकडे काळाच्या विशिष्ट चौकटीतून पाहावं लागतं. बेस्ट इयर्स त्यातला नाही. आजही ना त्याची जादू कमी झाली आहे, ना त्याची भेदकता.
- गणेश मतकरी 

Read more...

डबल इन्डेम्निटी - संकेत रुढ करणारा

>> Sunday, September 18, 2011

१९२५ च्या सुमारास क्वीन्स व्हिलेजमधे राहणा-या रूथ श्नायडरचं हेन्री जड ग्रे नावाच्या सेल्समनवर प्रेम बसलं. दोघांचही लग्न झालेलं होतं, पण रुथची या लग्नाबाहेर पडण्याची तयारी आधीपासूनच सुरू होती. एका इन्शुरन्स एजन्टच्या मदतीने तिने आपल्या नव-याला आयुर्विम्याची पॉलिसी काढण्यासाठी भरीला पाडलं होतं. पॉलिसीत डबल इन्डेम्निटीचा क्लॉज होता, ज्यामुळे एका विशिष्ट परिस्थितीत विमाधारकाला आलेला मृत्यू हा त्याच्या कुटुंबियांना अधिकच लाभदायक ठरेल !
रूथ श्नायडरच्या या प्रेमप्रकरणाचा अन् झटपट श्रीमंत होण्याच्या योजनेचा फायदा तिच्या नव-याला महागात तर पडलाच, पण तिला स्वतःला अन् तिच्या प्रियकरालाही देहांत शासन भोगायला लागलं. नाही म्हणायला त्याचा एक फारच वेगळ्या प्रकारचा फायदा साहित्य अन् चित्रपट क्षेत्राला आणि अर्थातच आम जनतेलाही झाला. दोन गाजलेल्या कादंब-या आणि किमान (एक रिमेक धरून) चार उत्तम चित्रपट या गुन्ह्यावरून स्फुरले असं म्हणणं ही अतिशयोक्ती होणार नाही.
१९२७मधे श्नायडर/ग्रे खटला चालू असताना, त्याला हजर राहणा-या अनेक बातमीदारांपैकी एक होता जेम्स एम. केन. कालांतराने केनने या खटल्यावरून दोन कादंब-या लिहिल्या. `पोस्टमन ऑल्वेज रिंग्ज ट्वाईस ` आणि `डबल इन्डेम्निटी` पोस्टमनची दोन हॉलीवूड रुपांतरं तर झालीच, वर (काही जणांच्या मते इटालिअन नववास्तववादाची सुरुवात मानला गेलेला ) विस्कोन्तीचा `ओसेसिओने` (१९४३) हा देखील त्याचीच अनधिकृत आवृत्ती होता. बिली वाईल्डर दिग्दर्शित `डबल इन्डेम्निटी` चं रुपांतर एकच असलं, तरी या खटल्यावर आधारित कलाकृतीतली ती सर्वात महत्वाची कलाकृती ठरावी. मूळच्या केनच्या कादंबरीवरून स्वतः वाईल्डर आणि डिटेक्टिव्ह फिक्शनमधलं महत्त्वाचं नाव असलेल्या रेमन्ड चॅण्डलरने (भांडत भांडत) केलेली पटकथा असणारा `डबल इन्डेम्निटी` हा फिल्म न्वार नावाने ओळखला जाणा-या चित्रप्रकारातलं सुरुवातीचं आणि महत्त्वाचं उदाहरण आहे. इतकं महत्त्वाचं, की त्याचं नाव या चित्रप्रकाराची व्याख्या ठऱविणा-या मोजक्या चित्रपटात घेतलं जावं.
गडद दृश्ययोजना आणि तितकाच गडद आशय असणा-या ज्या पाच चित्रपटांच्या दर्शनामधून निनो फ्रँक या फ्रेन्च समीक्षकाला `फिल्म न्वार` या नव्या चित्रप्रकाराचं अस्तित्व जाणवलं, त्यातला `डबल इन्डेम्निटी` हा एक चित्रपट होता.  अर्थात ही गोष्ट पुढल्या काळातली, प्रत्यक्ष प्रदर्शनावेळी तरी अमेरिकन प्रेक्षकाच्या दृष्टीने हा एक साधा मध्यम बजेट असणारा पण चांगला गुन्हेगारीपट होता.
सामान्यतः चित्रपटाचा नायक भला माणूस असावा, असा संकेत आहे. १९४४मधे तर तो आजच्यापेक्षाही अधिक प्रमाणात रुढ होता. हा संकेत मुळातच न जुमानणारे नायक, नायिका आणि अपेक्षित शोकांताकडे जाणारं तणावपूर्ण कथानक यामुळे मुळातच ही निर्मिती अवघड होती. तत्कालिन सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटूनही प्रेक्षकांना इतक्या निष्ठूर व्यक्तिरेखांशी समरस व्हायला लावणं सोपं नव्हतं. त्यातून मूळ कादंबरीने तो रहस्यपट करण्याचा मार्गही बंद करून टाकला होता. तिच्याशी प्रामाणिक राहायचं तर ही एका गुन्हेगाराच्या तोंडून वदवलेली, एका  काळजीपूर्वक आखून फसलेल्या गुन्ह्याची कहाणी असणार हे उघड होतं. शेवटाबाबत बोलायचं, तर चित्रपटाची मजल आणखी वरची होती. कादंबरीत प्रमुख व्यक्तिरेखा आत्महत्या करतात. चित्रपटाला मात्र शेवट अधिक हार्ड कोअर, गुन्हेगारी वळणाचा हवा होता.
`डबल इन्डेम्निटी` मधे तीन प्रमुख पात्र आहेत. इन्शुरन्स एजन्ट वॉल्टर नेफ (फ्रेड मॅकमरे) , त्याला आपल्या नव-याचा काटा काढण्याच्या कटात सामील करून घेणारी फिलीस डिट्रिचसन (बार्बरा स्टॅनविक) आणि फ्रॉड केसेस क्षणात ओळखू शकणारा नेफचा बॉस आणि जवळचा मित्र बार्टन कीज (एडवर्ड जी. रॉबिन्सन) .
चित्रपट सुरू होतो, तो अत्यंत थकलेल्या (आणि कदाचित जखमी) अवस्थेत मध्यरात्री आपल्या ऑफिसवर पोहोचणा-या नेफपासून. नेफ ऑफिसातल्या डिक्टेशन मशीनवर आपला कबुलीजबाब नोंदवायला लागतो, आणि कथेला खरी सुरुवात होते. निवेदन वापरणारे चित्रपट, किंवा साहित्यही ब-याचदा निवेदन का आणि कोणाला उद्देशून आहे, याची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाहीत. इथे हा कबुलीजबाब कीजला उद्देशून असणं ही अत्यंत चपखल बसणारी क्लृप्ती आहे. स्वतः केनने देखील ही क्लृप्ती अन् चित्रपटातल्या अनेक फेरबदलांचं पुढे कौतुक केलं अन् ते जर आपल्याला सुचते, तर आपणही ते मूळातच कादंबरीत वापरले असते, असं मान्य केलं.
प्रथम पुरुषी निवेदन आणि सर्व प्रमुख पात्रांचं नकारात्मक असणं, हे न्वार चित्रपटांचे दोन प्रमुख गुणधर्म. हे दोन्ही इथे पाळले जाणार, हे नायकाने पहिल्या काही वाक्यातच दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीजबाबावरून स्पष्ट होतं. चित्रपट भूतकाळात जातो अन् आपल्याला नेफ आणि फिलीस यांची प्रथम भेट पाहायला मिळते. फिलीसच्या पतीच्या गाडीच्या इन्शरन्ससंबंधी बोलायला गेलेल्या नेफला फिलीस जाळ्यात ओढते. लवकरच प्रश्न येतो, की पतीला कळू न देता त्याचा आयुर्विमा काढता येईल का ? मुळात हुशार असलेल्या नेफला, फिलीसची योजना लक्षात न येणं अशक्य असतं, मात्र सुरुवातीला या कटात सहभागी व्हायला नकार देणारा नेफ बदलत जातो. विमा व्यवसायातल्या सर्व खाचाखोचा त्याला माहीत असतातच. आणि कधीतरी या ज्ञानाचा सदुपयोग करण्याची त्याचीही इच्छा असतेच.
`डबल इन्डेम्निटी` आपल्या ननायिकेला पूर्ण काळ्या रंगात रंगवायला निघतानाही नायकाला संशयाचा फायदा देत नाही. केवळ नायिकेच्या नादी लागल्याने तो गुन्ह्याला तयार होतो, असं दाखवून त्याला सहानुभूती मिळवून देत नाही. उलट नायकाच्या डोक्यातही काही फसवाफसवीच्या योजना असल्याचं दाखवून त्यालाही दोषी ठरवतो. इथे त्यामानाने सहानुभूती मिळते, ती एकाच पात्राला, जे सांकेतिक रहस्यपटात डिटेक्टिव्हचं पात्रं ठरू शकलं असतं, हे आहे कीजचं पात्र, जे नायकाला मित्रासारखं किंवा त्याहूनही अधिक, धाकट्या भावासारखं मानतं. मात्र लांबीने मोठं असूनही हे कथानकाबाहेरचं निरीक्षकाचं पात्रं आहे. चित्रपट त्याच्या अन् नेफच्या मैत्रीचा दाखला देऊन त्याला वजन आणतो, आणि त्याच्या विश्वासघाताला कथेचा हाय पॉईंट ठरवतो.
विश्वासघात हे डबल इन्डेम्निटीमधलं प्रमुख कथासूत्र आहे, आणि ते वेगवेगळ्या पात्रांबाबत, वेगवेगळ्या नात्यांबाबत विविध परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्समधे पुन्हा पुन्हा योजलेलं आपल्याला दिसतं. फिलीस आणि तिचा पती, फिलीसची सावत्र मुलगी लोला आणि तिचा मित्र झाकेती, नेफ आणि लोला, नेफ आणि फिलीस अन् अखेर नेफ आणि कीज अशा सर्व प्रकारच्या जोड्यांमधे विश्वासघाताच्या सूत्राची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. या अगदी मूलभूत स्वरूपाच्या नाट्यपूर्ण सूत्राने सादरीकरण वेगळं असूनही प्रेक्षक चित्रपटात अडकतो.
रहस्यपट नसूनही रहस्यपटांचे अनेक संकेत रुढ करणा-या `डबल इन्डेम्निटी`चा परिणाम चिरकाल टिकलेला आपल्याला दिसतो. आजचा आधुनिक थ्रिलरदेखील एका परीने त्याच्या ऋणातच आहे, असं म्हणता येईल.
- गणेश मतकरी. 

Read more...

`युनायटेड ९३` - प्रवासी आणि दहशतवादी

>> Sunday, September 11, 2011

२००५ पर्यंतचे अमेरिकन चित्रपट पाहिले, तर कोणत्याच चित्रपटात ९/११ला प्रत्यक्ष स्थान मिळाल्याचं दिसत नाही. काही प्रयत्नांत असं घडण्यामागची कारणमीमांसा शोधून पाहण्याचा एक प्रयत्न दिसतो. वैचारिक पातळीवरून पाहणं हे एका परीने कठीण असलं तरी त्याचा फायदा आहे. सामान्य प्रेक्षकाला या घटनेची नवी आवृत्ती प्रत्यक्ष पाहायला लागत नाही आणि दिग्दर्शक जरी टीकेला कारण ठरण्याची शक्यता असली, तरी आर्थिकदृष्ट्या चित्रपटाला थेट धोका संभवत नाही. बहुधा याच कारणाने पहिली चार-पाच वर्षे हॉलीवूडने सावध राहणं पसंत केलं. आणि घटनेला फिक्शनालाईज करणं  नाकारलं. मात्र आता बराच काळ उलटला होता. काल्पनिक हिंसाचार आणि दहशतवाद व्यावसायिक चित्रपटांमधे  पुन्हा रुळायला लागला होता. थ्रिलर्सचं पुनरागमन झालं होतं आणि प्रेक्षक बिचकण्याची शक्यता कमी दिसायला लागली. असं असूनही २००६मधे `युनायटेड ९३`ची ट्रेलर जेव्हा पहिल्यांदा प्रेक्षकांना दाखविण्यात आली तेव्हा आलेली प्रतिक्रिया ही ब-याच प्रमाणात प्रतिकूल होती.
याला एक कारण हेदेखील म्हणता येईल की, प्रत्यक्ष `युनायटेड ९३` आणि त्याची ट्रेलर यांमधे बराच फरक आहे. खासकरून त्यांच्या दृष्टिकोनात. ट्रेलर ही अधिक सांकेतिक वळणाची कथासूत्र दाखवून नाट्यपूर्ण क्षणांना, संवादाच्या तुकड्यात अधोरेखित करून गतीचा आभास निर्माण करणारी आहे, एखाद्या अ‍ॅक्शन थ्रिलरची जाहिरात असावी तशी. प्रत्यक्ष चित्रपट मात्र तसा नाही.
दिग्दर्शक पॉल ग्रीनग्रासचा चित्रपट म्हणजे या प्रत्यक्ष घटनेतल्या एका उपघटनेचं जसंच्या तसं चित्रण आहे. ते महत्त्वाचं आहे. कारण या प्रकारे ही घटना चित्रपटात दाखविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि इथे पाऊल चुकणं हे विषयाला संभाव्य विषयांच्या यादीतून काढून टाकण्याइतकंच घातक ठरण्याची शक्यता. त्यातून चित्रण अधिक अवघड आहे, ते ख-या घटनेची माहिती असूनही तिचा एकही साक्षीदार जिवंत नसल्याने. अकरा सप्टेंबरच्या सकाळी जी विमानं दहशवाद्यांनी अपहृत केली त्यातलंच एक होतं युनायटेड ९३. अपहरण केल्यावर ते वॉशिंग्टनच्या दिशेने पळविण्यात आलं आणि अंतिमतः ते कॅपिटॉल बिल्डिंगवर आदळण्याचा दहशतवाद्यांचा विचार असल्याचं मानलं जातं. मात्र, दरम्यानच्या काळात प्रवाशांना या योजनेचा सुगावा लागला आणि हे विमान सोडवण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला. विमानांची अखेर ते कोसळण्यातच झाली, मात्र शहरापासून दूर. प्रवाशांमधील एकही जण वाचू शकला नाही. चित्रपटाचा विषय बाहेर येताच त्याच्या दर्जाबद्दल अंदाज बांधण्याआधीच विरोध व्हायला सुरुवात झालेली होती. इथेही टेलिव्हीजनने आधी बाजी मारलेलीच होती, याच घटनेवर `फ्लाईट - 93` नावाचा चित्रपट बनवून.  तरीही मोठ्या पडद्यावर इतक्या लवकर कशाला ? असा सूर उमटतच होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र तो विरला आणि एक विलक्षण चित्रपट म्हणून त्याचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी स्वागत केलं.
हा माहितीपट नाही, कारण उघडच .या विमानात खरं काय घडलं ते पूर्णपणे सांगू शकणारं कोणीच आज अस्तित्वात नाही. मात्र पूर्णपणे माहीत नसूनही विमानातल्या घटनांचा एक वृत्तांत मात्र अस्तित्वात आहे, अन् तो म्हणजे प्रवाशांनी आपल्या नातेवाईकांना केलेले फोन कॉल्स. विमान कमी उंचीवरून उडत असल्याने हा संपर्क शक्य झाला होता आणि या फोन कॉल्समधूनच प्रवाशांना दहशतवाद्यांच्या योजनेचा अंदाज आला होता. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या मित्र, नातेवाईकांनाही विमानात चाललेल्या घटनांची बरीच कल्पना आली होती आणि अखेर विमानावर कब्जा करण्याचा प्रयत्न प्रवासी करणार असल्याचंही इथेच कळलं.
ग्रीनग्रास आणि त्याच्या चमूने अनेक तास या प्रवाशांच्या आप्तांबरोबर काढले, तपशीला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या त्रयस्थपणे टीव्हीवर या हल्ल्याचं चित्रण झालं होतं त्याच त्रयस्थपणे या विमानाची गोष्टही सांगितली.
`युनायटेड ९३` बाजू घेत असता, तर भुवया उंचवण्यासारख्या अनेक जागा तयार झाल्या असत्या, ज्या इथे होत नाहीत. एका परीने तोही एखादा वृत्तान्त मांडत असल्याच्या थाटातच घटना उलगडत नेतो.
ग्रीनग्रास आपली गोष्ट ही प्रामुख्याने दोन पातळ्यांवर घडवितो. पहिली वेगवेगळ्या ठिकाणच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षांमधे आणि दुसरी प्रत्यक्ष विमानात. सहभागी व्यक्तिरेखांची तो ओळख करून देत नाही. म्हणजे फ्लॅशबॅकसारख्या तंत्राने या मंडळींची आयुष्य हृदयद्रावक करून दाखवत नाही, वा प्रवाशांमधल्या गप्पांमधूनही तथाकथित `ह्यूमन इंटरेस्ट` वाढवत नाही. आपल्याला खरोखरीच्या विमानात जशी सहप्रवाशांची होईल तितकीच जुजबी ओळख इथेही होते. हा दृष्टिकोन दिग्दर्शक सातत्याने पाळतो. घडलं त्यापलीकडे जायचं नाही, गरज नसलेले निष्कर्ष काढायचे नाहीत, शक्य तेवढा असलेल्या माहितीचा उपयोग करायचा, ही इथली त्रिसूत्री आहे.

`युनायटेड ९३`च्या पहिल्या अर्ध्या भागातला अधिक नाट्यपूर्ण भाग आहे, तो कंट्रोल रूममधला, जिथल्या अनेक व्यक्तिरेखा या प्रत्यक्ष त्या त्या अधिका-यांनीच वठविलेल्या आहेत. या अधिका-यांना एकेका अपहरणाची बातमी मिळत जाणं, वर्ल्ड ट्रे़ड सेंटरची अविश्वसनीय घटना कळणं आणि अखेर या कारस्थानाची पूर्ण कल्पना येऊन संपूर्ण हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाणं, या घटना खाली घडत असताना युनायटेड ९३ चा प्रवास मात्र सुरळीत सुरू असतो. तिथल्या घटना नाट्यपूर्ण होतात त्या अपहरणाबरोबर अन् मग पुढे अखेरपर्यंत तिथला तणाव टिकून राहतो. मात्र एक आहे, इथलं नाट्य हे कुठेही अतिनाट्य होणारं नाही, तर प्रत्यक्ष प्रसंगाच्या गांभीर्यानेच तयार होणारं आहे.
ज्याप्रमाणे ग्रीनग्रास प्रवाशांची अधिक ओळख करून देत नाही, त्याप्रमाणे दहशतवाद्यांचीही. तो  `पॅरेडाईज नाऊ`  या चित्रपटाप्रमाणे दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवित नसला, तरी इतर कमर्शियल हॉलीवूडपटांप्रमाणे त्यांचं दृष्ट राक्षस म्हणूनही चित्र रेखाटत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीचा कुराणपठणाचा प्रसंग हा त्यांच्या धार्मिक बैठकीविषयी बोलत असला, तरी तोदेखील फार तपशीलात जात नाही. शिवाय दहशतवाद्यांचं कुराणपठणही कोणी प्रत्यक्षात पाहिलं नसलं, तरीही त्याच्या खरेखोटेपणाबद्दल शंका घ्यायला जागा नाही.
प्रवाशांच्या नातेवाईकांशी चर्चा करूनच केला असला, तरीही प्रत्यक्ष चित्रपटातही ही दृश्य पाहणं या सर्वांना खूप मनस्ताप देणारं झालं असेल, यात शंकाच नाही आणि केवळ या एका विमानातल्या प्रवाशांनाच का, या दिवशी जे जे लोक मृत्युमुखी पडले, त्या सर्वांच्या आप्तांना, तसंच वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून सुखरूप वाचलेल्यांना देखील हा चित्रपट एखादं दुःस्वप्न पाहत असल्यासाऱखा जरूर भासला असेल,. तरीही वाटतं, की ही निर्मिती गरजेची होती, ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेची संपूर्ण नोंद होण्याच्या दृष्टीनेही आणि बिकट परिस्थितीत सामान्य माणसंही कशी धैर्याने उभी राहू शकतात अन् प्रसंगी प्राणाचाही त्याग करून इतरांना वाचवू शकतात याचा जिवंत पुरावा म्हणूनही.
चित्रपटात अध्याहृत नसला तरी एक प्रश्न पडण्यासारखा आहे. जे दहशतवादी जिवावर उदार होऊन ही कामगिरी करायला निघाले, त्यांच्याकडे समाज हा खलपुरूषांप्रमाणे पाहतो, तर त्यांच्याचप्रमाणे जिवावर उदार होऊन त्यांना थांबविणा-या व्यक्ती या नायक कशा ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर आपण सरहद्दीच्या कोणत्या बाजूने त्याच्याकडे पाहतो यावरही अवलंबून आहे. त्या दृष्टीनेही `युनायटेड ९३`मधलं प्रवासी आणि दहशतवादी यांचं एकसारखं केलेलं चित्रण हे न्याय्य आहे.
- गणेश मतकरी
(नुकत्याच प्रकाशित झालेल्या `सिनेमॅटिक` या पुस्तकामधील एका लेखाचा भाग.)

Read more...

`डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क` - पारंपरिक भयाचा नवा आविष्कार

>> Monday, September 5, 2011


सध्याचे भयपट हे प्रामुख्याने  `रिअ‍ॅलिटी हॉरर` च्या लाटेत वाहून गेलेले दिसतात. `ब्लेअर विच प्रोजेक्ट`ने सुरू केलेल्या आणि रेक/पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी सारख्या चित्रपटांनी पुढे नेलेल्या या बहुसंख्य चित्रपटांमध्ये अतिमानवी अस्तित्त्व  आणि आधुनिक समाज यांना वास्तवाच्या पातळीवर एकत्र आणलेलं दिसतं. जरी या चित्रप्रकारातला त्यामानाने नवा असणारा हा प्रयोग भयपटांना एकप्रकारे पुनरज्जीवीत करताना दिसला, तरी त्याने भयपटांच्या अभिजात संकल्पनांना अन् त्यातल्या प्रामुख्याने रंजनप्रधान आणि फॅण्टसीच्या वळणाने जाणा-या कथावस्तू विसरल्या जाणं हे फारसं बरं वाटत नाही. झपाटलेले जुने वाडे, जंगलं, त्यातून एकट्या दुकट्या फिरणा-या माणसांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचणारी भीती, वास्तवापेक्षा रोमॅण्टिक वळणाची भूतखेतं हे सारं आपल्यातल्या अनेकांना पाहायला आवडतं हे निश्चित. त्यामुळे अशा क्लासिकल वळणाच्या भयपटांनी अधेमधे वर डोकं काढणं हे स्वागतार्ह. विशेषतः जर ते चांगल्या चित्रकर्त्यांनी केले असले तर फारच.
मेक्सिकन दिग्दर्शक (निर्माता,पटकथाकार, कादंबरीकार इत्यादी) गिआर्मो डेल टोरो याचा ओढा हा पहिल्यापासूनच भय आणि फॅण्टसी या दोन्हीच्या उत्तम मिश्रणाकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. क्रोनोस, ब्लेड -२ , हेलबॉय अशा याच जातीच्या अनेक चांगल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं असलं, तरी त्याचा सर्वोत्तम गाजलेला चित्रपट होता पॅन्स लॅबिरीन्थ (२००६) युद्धातलं क्रौर्य आणि फॅण्टसी यांचं अप्रतिम मिश्रण लॅबिरीन्थमधे होतं. गिआर्मोची निर्मिती असणारा पण दिग्दर्शन नसलेला `ऑर्फनेज` (२००७) त्याच जातीचा, पण अधिक सांकेतिक वळणाचा होता. या दोन्ही चित्रपटांमधे लहान मुलं प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये होती. नुकताच अमेरिकेत प्रदर्शित झालेला `डोन्ट बी अफ्रेड ऑफ डार्क`देखील या दोन्ही चित्रपटांच्या गटात बसणारा आहे. या खेपेला तो ऑर्फनेजहूनही अधिक परिचित बाजाचा आहे. मात्र त्याचं एक कारण तो पूर्णपणे स्वतंत्र नसून १९७३च्या टेलिफिल्मचा रिमेक आहे, हे देखील असू शकतं.

`डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क` चं दिग्दर्शन देखील डेल टोरोचं नाही. तर ट्रॉय निक्सीचं आहे. मात्र निर्मिती अन् पटकथा डेल टोरोची असल्याने, त्याची छाया चित्रपटभर पडलेली दिसते. झपाटलेलं घर, रहस्यमय भूतकाळ, सत्य जाणणारा गूढ केअरटेकर असे भयपटांत दिसणारे लोकप्रिय घटक इथे आहेत. वर प्रमुख भूमिकेत लहान मुलगी अन् परीकथेत शोभणा-या कल्पनांचा भयप्रद वापर या खास डेल टोरोच्या आवडीच्या गोष्टी आहेत. या चित्रपटातला डेल टोरोचा रस हा स्वाभाविक आहे. त्याच्याच म्हणण्यानुसार त्याने नऊ वर्षांचा असताना टी.व्हीवर पाहिलेला मूळ चित्रपट, हा त्याच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. या प्रकारचे फॅन्टॅस्टिक भयपट करण्याची प्रेरणा त्याला तिथेच मिळाली.
चित्रपट सुरू होतो तो एकोणीसाव्या शतकात, एका गूढ, प्रचंड हवेलीत. इथे तो फार रेंगाळत मात्र नाही. भयपटाला साजेशी वातावरण निर्मिती करून , आणि किमान एक अनपेक्षित चमत्कृती दाखवून तो थेट आजच्या काळात येऊन पोहोचतो. आज ही हवेली अ‍ॅलेक्स (गाय पीअर्स) या आर्किटेक्टच्या ताब्यात आहे. गेल्या शतकातल्या काही रहस्यमय घटनानंतर बंदच असलेल्या या हवेलीला तिचं मूळचं वैभव पुन्हा देऊ करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र त्याला मूळ घटनांची फारशी माहिती नाही. त्याचबरोबर या हवेलीला एक तळघर असल्याचीही नाही. त्या तळघरात असलेल्या अन् घडलेल्या गोष्टींची माहिती असती, तर कदाचित त्याने घराला हातही लावला नसता.
अ‍ॅलेक्स आपल्या किम (केटी होम्स) या मैत्रिणीबरोबर या घरातच मुक्काम ठोकून आहे. घर नव्यासारखं करून `आर्किटेक्चरल डायजेस्ट`च्या कव्हरवर आणण्याचा त्याचा मनसुबा आहे. अन् त्यामुळे आपलं करिअर पुन्हा मार्गी लागेल ही त्याची अपेक्षा. अशातच अ‍ॅलेक्सकडे त्याची आठ-दहा वर्षांची मुलगी सॅली (बेली मॅडिसन) येऊन थडकते. आईने अ‍ॅलेक्सकडे सोपवल्याने आपण कोणालाच नको आहोत, अशी तिची भावना झालेली. अनवधानाने, सॅली घरातलं तळघर हुडकून काढते, आणि कदाचित त्या तळघरापलीकडे असलेलं दुसरं काही. जेव्हा या तळघरापलीकडचे रहिवासी तिच्याशी कानगोष्टी करायला लागतात, तेव्हा सुरुवातीला तिला ते आपले मित्रंच वाटतात. आणि जेव्हा त्यांचं खरं स्वरूप तिच्या ध्यानात येतं , तेव्हा अर्थातच, परंपरेला अनुसरून, खूप उशीर झालेला असतो.
`डोन्ट बी अफ्रेड ऑफ द डार्क`ची पटकथा चांगली आहे. मात्र तिच्यात त्रुटी नाहीत, असं मात्र नाही. ती मुळात चांगली आहे, ती तिच्या निवेदनाच्या गतीसाठी. सुरुवातीचा प्रसंग वगळता, ती प्रेक्षकांना लगेच धक्के द्यायला सुरुवात करत नाही, तर घटनांना वेग यायला वेळ देते. व्यक्तिरेखांची ओळख करून देते. त्यांच्या वागण्याला कारणमीमांसा देण्याचा प्रयत्न करते. मुख्य म्हणजे, घटनांना वेग यायला लागल्यावरही, ती तळघरातल्या रहिवाशांना बराच काळ पडद्यावर येऊ देत नाही. हे रहिवासी संगणकाच्या मदतीने कितीही छान साकारले असले तरी त्यांचं प्रत्यक्ष दिसणं हे प्रभाव कमी करणारं ठरतं. चित्रपटातील भीती ही आपल्याला काय दिसतं यापेक्षा काय सुचवलं जातं यावर अवलंबून असते. जेव्हा राक्षस आपल्या मनात तयार होतात, तेव्हा ते सर्वात भीतीदायक असतात. त्यांना एक स्पष्ट आकार येणं हे नेहमीच परिणाम कमी करणारं ठरतं. इथेही तेच होतं. मात्र या सुमारास घटना वेगवान आणि आपल्या अंदाजांना न जुमानणा-या झालेल्या असल्याने चित्रपटाची पकड सुटत नाही.
या पटकथेची त्रुटी आहे, ती तिच्या तर्कशास्त्रात. इथल्या अतिमानवी अस्तित्वाचा वेगळेपणा आपण गृहीत धरला, की त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे सारे प्राणी कुठे राहतात ? कुठून येतात ? त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याला केवळ तळघरातून वाट का असावी ? त्यांच्या अस्तित्वाला कोणत्या योनीचे नियम लागतात ? असे अनेक प्रश्न तयार होतात, ज्यांची समाधानकारक सोडाच, पण एकूणच उत्तरं देण्याचं पटकथा टाळते. मात्र ती आपल्याला पात्र आणि घटना यांमधे पुरेशी गुंतवत असल्याने आपण तेवढ्यापुरतं या प्रश्नांकडे दुर्लक्षित करू शकतो.
या चित्रपटात, किंवा डेल टोरोच्या आधीच्या चित्रपटातही कुटुंबव्यवस्थेला महत्त्व दिसतं, मात्र कधी ते सकारात्मक असतं, तर कधी नकारात्मक. इथे सॅलीच्या मनःस्थितीचं अन् पुढे येणा-या संकटांचं मूळ, हे मोठ्या प्रमाणात अ‍ॅलेक्सच्या घटस्फोटात आहे. त्यामुळे एका परीने हा घटस्फोटित मुलांच्या मानसिक संतुलनाकडे केलेला निर्देष दिसून येतो. त्याचबरोबर व्यक्तिरेखाटन मात्र स्त्रीवादी पद्धतीने केलेलं दिसून येतं. सॅली आणि किम यांच्या भूमिका या अ‍ॅलेक्सपेक्षा महत्त्वाच्या तर आहेतच, वर त्यांचा वस्तूस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक मोकळा असल्याचं पटकथा मांडते.
गेल्या काही वर्षांत भयपटांमधे स्त्रियांना अधिक महत्त्व देण्याची प्रथाच पडली आहे का ? नजिकचा इतिहास तरी हेच सांगतो. (आठवा, द रिंग, द ग्रज, डार्क वॉटर, ब्लेअर विच प्रोजेक्ट, पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी, रेक इत्यादी)
ट्रॉय निक्सीचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असला, तरी कुठेही ते जाणवत नाही. गिआर्मो डेल टोरोच्या चमूतल्या इतर दिग्दर्शकांप्रमाणेच हा देखील सराईत असल्याचं इथे सिद्ध होतं. अ‍ॅक्शनच्या मोहात न पडता किंवा स्टार्सच्या नावाला भूमिकेच्या वजनाबरोबर न तोलता आपल्या चित्रपटातलं तणावपूर्ण वातावरण आणि त्यातली सर्वात महत्त्वाची  व्यक्तिरेखा असणारी छोटी नायिका यावरच त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.
दिग्दर्शकाच्या योग्य फोकसचा फायदा चित्रपटाला झाला आहे. नव्या, बदलत्या भयपटांच्या अन् रिअ‍ॅलिटी हॉररच्या आक्रमणातही त्याने आपला काहीशा जुन्या पद्धतीचा, पण उत्तम मांडणी असणारा भयपट उभा करून दाखविला आहे. अभिजात भयपट मिस करणा-या प्रेक्षकाला हा प्रयत्न आवडण्यासारखाच.
-गणेश मतकरी 


Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP