मार्था मार्सी मे मार्लीन- मनोव्यापारांचा गुंता

>> Monday, June 25, 2012


सायकॉलॉजिकल थ्रिलर ही जमात गेल्या काही वर्षात भलतीच लोकप्रियता मिळवून आहे. गंमत म्हणजे या लेबलाचा वापर करणारे सारेच चित्रपट ते लेबल लावण्याकरता लायक असतात असंही नाही. एखाद्या पात्राचं नाममात्र माथेफिरू असणं , किंवा रहस्यभेदात सुचवलेलं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण देखील त्यांना या जमातीत प्रवेश मिळवून देण्यासाठी पुरेसं ठरतं.पण हे काही खरं नाही. माझ्या मते खरा सायकॉलॉजिकल थ्रिलर तोच हवा जो मनोव्यापारांच्या वैचित्र्याला केंद्रस्थान तरी देईल, मानसशास्त्रीय घटकांना ज्याच्या कथानकात एक प्रकारची अपरिहार्यता तरी असेल,जो व्यक्तिरेखांच्या मनोविश्लेषणाचा बारकाईने प्रयत्न तरी करेल ,किंवा प्रेक्षकांपर्यंत या व्यक्तिरेखांचा अनुभव पोचवणं ही तो आपली जबाबदारी तरी समजेल.श़ॉन डर्किनचा प्रथम चित्रपट 'मार्था मार्सी मे मार्लीन' (२०११) हा सांकेतिक वळणाने थ्रिलर नसला तरी सायकॉलॉजिकल नक्कीच आहे. वर सांगितलेल्या चार लक्षणांपैकी किमान तीन तरी त्याला लागू पडतात.
प्रोटॅगनिस्टची मानसिक स्थिती प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा एक अत्यंत उत्तम आणि कठीण प्रयत्न क्रिस्टोफर नोलनच्या मेमेन्टोमधे झाला होता ज्यात निवेदनाची रचना हीच त्या स्थितीचं स्पष्टिकरण म्हणून वापरण्यात आली होती. इथला प्रयत्न हा तितका गुंतागुंतीचा नसला तरीही दिग्दर्शकाने केलेला विचार हा साधारण त्याच प्रकारचा आहे. 'मार्था मार्सी मे मार्लीन' ची नायिका (एलिझबेथ ओल्सन, उत्तम अभिनय),मूळची मार्था, ही अशा परिस्थितीत आहे की आता घडणा-या गोष्टी आणि भूतकाळ यांची तिच्या नजरेत सरमिसळ झाली आहे. वरवर पाहाता आजूबाजूला घडणा-या गोष्टिंची जाणीव असूनही ती एका कायमच्या संभ्रमात आहे ,ज्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे.दिग्दर्शक हा तिला वाटणारा संभ्रम काही प्रमाणात प्रेक्षकालाही जाणवेल अशा पध्दतीने आपली चित्रीकरणाची आणि संकलनाची दृष्टी ठरवतो. मार्था जिथे सध्या राहाते आहे ,ते तिच्या बहिणीचं प्रशस्त घर आणि ती नुकतीच जिथून पळून आलीय ते ,पॅट्रिक (जॉन हॉक्स) च्या अधिपत्याखाली चालणारं , पळून आलेल्या तरुण तरुणींनी भरलेलं शेतावरलं घर या दोन्ही जागा ,मुळात एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत ़ मात्र चित्रपट त्या आपल्यासमोर अशा पध्दतीने मांडतो ,की क्षणभर विचार केल्याशिवाय आपल्याला दिसणारं दर दृश्य ,हे कोणत्या घरातलं ,कोणत्या काळातलं आहे याचा पत्ता लागू नये. दृश्य संकल्पनांमधला नेमका सारखेपणा, दोन्ही काळातलं मार्थाच्या दिसण्यातलं साम्य, संवादात पुनरावृत्ती करणारे विषय ,आणि पटकथेत कोणत्याही निश्चित आराखड्याशिवाय येणारे वेगळ्या स्थलकालांचे प्रसंग यांच्या मदतीने हे साधतं. हे परिणामाच्या दृष्टिने योग्य पाऊल सामान्यपणे चित्रपटात दिसणा-या, कथेत स्पष्टपणा आणण्याच्या प्रयत्नाच्या बरोबर उलट आहे, हे लक्षात ठेवण्यासारखं.
पटकथा आणि दृश्यातली सरमिसळ चित्रपटाच्या नावापासूनच सुरू होते.’मार्था’ हे नायिकेचं खरं नाव, ’मार्सी मे’ हे पॅट्रिकने पंखाखाली घेतल्यावर दिलेलं नाव आणि पॅट्रिकच्या घरातल्या सर्व तरुणी (आपली खरी ओळख लपवण्याकरता) वापरत असलेलं ’मार्लीन’ हे नाव . ही सारी नावं चित्रपटाच्या नावात सलग येतात. त्यांचा क्रम, नावांची स्वतंत्र ओळख यातलं काहीच सूचित न करता. जणू ही सारी नावं एकत्रितपणे एकाच व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत.दिग्दर्शकालाही हेच दाखवून द्यायचं आहे ,हे उघड आहे.
चित्रपट सुरु होताहोताच मार्सी मे अर्थात मार्था ,ही पॅट्रिकच्या घरून पळ काढताना दिसते. अर्थात या क्षणी या घराविषयी काहीच स्पष्टपणे कळत नाही. केवळ तरुण मुलामुलींचा एकत्रितपणे राहाणारा गट दिसतो. काहीतरी चमत्कारिक , अनैसर्गिक असल्याचं जाणवतं ,पण ते अर्धवटच. मार्था कुठूनसा आपल्या बहिणीला,लूसीला (सारा पॉल्सन) फोन करते आणि ती येउन मार्थाला आपल्या घरी घेउन जाते.लूसीचा मुळातच मार्थाशी फार संपर्क नसावा.लहानपणच्या कुठल्याशा क्लेशकारक अनुभवाने (ज्याबद्दल चित्रपट स्पष्टपणे काही सांगत नाही) मार्था कुटुंबापासून दुरावली असावी आणि आपलेपणाचा, प्रेमाचा शोध तिला पॅट्रिकपर्यंत घेउन गेला असावा. मार्थाच्या गरजेच्या काळात तिला मदत करणं शक्य न झाल्याने लूसीचं मन तिला टोचतंय आणि या टोचणीतून सुटण्याचा उपाय म्हणूनच तिने आता मार्थाची जबाबदारी उचलायचं ठरवल असावं. अर्थात ती उचलणं फारसं सोपं नाही. कारण पॅट्रिक बरोबरच्या काळात तिचा समाजाशी संबंध पूर्णपणे तुटलेला आहे. चार लोकांत कसं वावरावं हे तिला कळत नाही. त्याबरोबर मधल्या काळात तयार झालेलं विक्षिप्त तर्कशास्त्र आणि वेळोवेळी अनावर होणं यामुळे गोष्टी अधिकच हाताबाहेर जातात. लूसी आणि तिचा स्नॉबिश नवरा टेड, यांना हे प्रकरण झेपणं कठीण होणार असं दिसायला लागतं.
चित्रपटात संकल्पनांच्या पातळीवर खास वाटाव्यात अशा दोन गोष्टी आहेत.पहिली आहे ती पॅट्रिकच्या टोळीचं चित्रण. शॅरन टेट हत्याकांडाला जबाबदार असणा-या चार्ल्स मॅन्सन या माथेफिरुचा कल्ट यासाठी मॉडेल असावा असं या भूमिकेसाठी केलेल्या जॉन हॉक्सच्या निवडीवरून वाटतं. त्याखेरीज इतर सूचक तपशील देखील आहेत.पॅट्रिकला संगीतात असणारा रस, त्याची समोरच्याला गुंगवून टाकण्यातली हातोटी, वरवर एकत्र मुक्त कुटुंबाचा आव आणणा-या या मंडळींनी बलात्कारापासून खूनापर्यंत सर्व गोष्टिंमधे निर्विकारपणे सामिल होणं, इत्यादी. या निमित्ताने काही अत्यंत साधेपणी चित्रित केलेले ,पण तरीही अंगावर काटा आणणारे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात.
दुसरी गोष्ट जाणूनबुजून केलेली आहे ,की सरमिसळ करण्याच्या योजनेतून ती तशी असल्याचा आभास तयार झालाय हे मी ठामपणे सांगू शकणार नाही.ती म्हणजे पॅट्रिकचं स्वैर जग , आणि लूसीचा नियमांनी बांधलेला समाज यांमधली तुलना.दोन्ही ठिकाणी घडणार््या घटनांमधलं साम्य सूचीत करतं की खरं मुक्त आयुष्य हा पर्याय होउ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बांधलेलेच असता.बंधमुक्त अस्तित्व हे स्वत:चे वेगळे बंध तयार करतं. हे निरिक्षण पूर्णपणे खरं नाही मात्र त्यात सत्याचा अंश जरूर आहे.
'मार्था मार्सी मे मार्लीन'चा शेवट हा थ्रिलर संस्कृतीत वाढलेल्यांना फसवा ,किंवा अपूर्ण वाटण्याची शक्यता . त्याबद्दल मी अर्थात फार लिहू शकणार नाही. पण एक सांगेन ,की मार्थाला शेवटाशेवटाकडे दिसणा-या गोष्टिंची सत्यासत्यता पडताळून पाहाणं हे शेवटाचा अर्थ लावण्यासाठी उपयुक्त ठरेल.
चित्रपटाकडून कथेपेक्षा अधिक गोष्टीची अपेक्षा करणा-यांना ,आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिचित्रणांमधे रमणा-यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. सनडान्स या इन्डिपेन्ट सिनेमासाठी गाजलेल्या चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळवणारा 'मार्था मार्सी मे मार्लीन' त्यांना आवडल्यावाचून राहाणार नाही.
-गणेश मतकरी

Read more...

शांघाय, झी आणि निरूत्तर करणारा प्रश्न

>> Sunday, June 17, 2012

दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकाचे चित्रपट मी नियमितपणे पाहातो.खोसला का घोसला पासून आजपर्यंत त्याच्या कामात सातत्य आणि वैविध्य आहे, संकेतांना चिकटून न राहाता वेगळं काही करुन पाहाण्याची धमक आहे. त्याची शैली आणि चित्रपटांचे विषयदेखील अधिकाधिक महत्वाकांक्षी होत गेल्याचं दिसून येतं.सरळ सोपा विनोदी ’खोसला’ , चोराचं चरित्र थोड्या गंभीर तर थोड्या गंमतीदार पध्दतीने मांडताना कोणताही परिचित ढाचा वापरणं टाळणारा ’ओय लक्की ,लक्की ओय’ ,परकीय कल्पनेला वेगळ्या- यशस्वी पध्दतीने वापरणारा ’लव्ह, सेक्स और धोखा’ आणि आता राजकीय भ्रष्टाचाराकडे पाहाण्याचा ’शांघाय’ मधला प्रयत्न, हे टप्पे पाहाताच या तरूण दिग्दर्शकाची दिशा योग्य असल्याचं दिसून येईल.मात्र असं असतानाही त्याचे चित्रपट ज्या उंचीला पोहोचणं शक्य आहे, त्या उंचीला पोचण्यासाठी पुरेसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. योग्य उत्कर्षबिंदू समोर दिसत असताना त्याच्या एक दोन पाय-या खालीच ते थांबतात.क्वचित भरकटतात. शांघाय यातलं सर्वात मोठं, सर्वात महत्वाचं आणि म्हणूनच अधिक वाईट वाटायला लावणारं उदाहरण.
शांघाय पहिल्या प्रथमच हे सांगून टाकतो की तो ग्रीक लेखक वॅसिलीस वॅसिलीकोव यांच्या ’झी’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत आहे. आपल्याला प्रत्यक्ष कादंबरी परिचित नसली तरी आपल्यातल्या अनेकांनी त्याचं कोस्टा-गावरासने याच नावाने केलेलं चित्रपट रुपांतर पाहिलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा चित्रपट आणीबाणीच्या काळात आपल्याकडे प्रदर्शित झाला होता आणि त्यातला जहाल आशय पाहून लगोलग त्याची हकालपट्टी देखील झाली होती. मी कादंबरी वाचलेली नाही पण दोन्ही चित्रपटांच्या पटकथेतलं साम्य पाहाता एक उघड शक्यता दिसते ,ती म्हणजे कादंबरीपेक्षा १९६९ चं चित्रपटरुप हेच शांघायला अधिक जबाबदार आहे, आणि चित्रपट टाळून कादंबरीला श्रेय देण्यामागचं कारण अधिक व्यावसायिक , आर्थिक असावं. तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे, की एक खूप गाजलेला चित्रपट आणि त्याची विषयाला न्याय देणारी पटकथा ,आराखड्याच्या स्वरूपात दिबाकर बॅनर्जीपुढे उपलब्ध होती. असं असतानाही त्याचा करुन घ्यावा तितका उपयोग इथे करून घेतलेला दिसत नाही. मग हा चित्रपटाहून वेगळं भासण्याचा प्रयत्न म्हणायचा ,का आणखी काही?
चित्रपटाचा सर्वात अनावश्यक भाग म्हणजे त्याला ओढून ताणून जोडलेला शहरांच्या अत्याधुनिकिकरणाचा मुद्दा. हा मुद्दा राजकारणात खेळवला जातोय हे खरंच आहे,मात्र तो ज्या अपरिहार्यतेने कथेत समाविष्ट होणं आवश्यक आहे ,तेवढा इथे होत नाही. चित्रपटातल्या विकास प्रकल्पामागचा व्यूह, सर्व संबंधित व्यक्तिंची धोरणं , त्यांचे स्वार्थ हे प्रसंगांमधून उलगडत गेले असते तर हा मुद्दा प्रेक्षकांसाठी खरा ठरता. सध्याचं त्याचं अस्तित्व हे चित्रपटाचं चमत्कृतीपूर्ण नाव, काही घोषणा आणि स्पष्टिकरण दिल्यासारखे येणारे माहितीचे तुकडे यावर अवलंबून आहे, जे मुद्दा थेटपणे मांडला जाण्याच्या आड येतं.जर का हा करमणूकप्रधान ,’मसाला ’ कॅटेगरीतला चित्रपट असता ,तर या मुद्दयाचं असं मॅकगफिन बनून जाणं आपण चालवूनही घेतलं असतं, पण हा त्याप्रकारचा चित्रपट नसून आशयाला प्राधान्य देणारा आहे. शिवाय तो रंजनवादी नसल्याने , तशा चित्रपटांची मेलोड्रामा  ,खूप गाणीबजावणी ,अशी लोकांना आवडतील अशी बलस्थानंही इथे नाहीत.
झी आणि शांघाय ,या दोन्ही पटकथांच्या रचनेमधे म्हंटलं तर एक महत्वाची अडचण आहे, आणि ती म्हणजे त्यांच्या केंद्रस्थानी एक वा दोन निश्चित प्रोटॅगनिस्ट नाहीत. कथा ही एका प्रातिनिधिक समाजाची आणि त्यातल्या अनिष्ट प्रवृत्तींची आहे. त्यामुळे त्यात छोट्या लक्षवेधी व्यक्तिरेखांची कमी नाही, पण पूर्ण चित्रपट पेलणारं कोणी नाही. एका समाजसुधारकाची ( मूळ चित्रपटात विरोधी पक्ष नेत्याची) हत्या आणि पुढे ते प्रकरण मिटवण्याचे चालणारे प्रयत्न असा या कथानकाचा ढोबळ आराखडा आहे. त्यामुळे पूर्वार्धात महत्व येतं ते समाजसुधारक डाॅ अहमदीना (प्रोशोनजीत चॅटर्जी) ज्याना उत्तरार्धात कामच नाही, आणि उत्तरार्धात अहमदींचे सहकारी (त्यातलीच एक ,जरा ’अधिकच’ जवळची कलकी), अहमदींची पत्नी, राजकारणी मंडळी, हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभागी लोक, सरकारने प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ,वा ते मिटवण्यासाठी नेमलेला अधिकारी कृष्णन (देओल) ,घटनास्थळी असणारा , ब्लू फिल्म्सच्या धंद्यात असलेला फोटो/ व्हिडिओग्राफर जोगी (हाश्मी) असे महत्वाच्या भूमिकांसाठी अनेक उमेदवार तयार होतात.यात अभिनेत्यांच्या बिलिंगप्रमाणे कलकी, देओल आणि हाश्मी या तिघांसाठीही काम तयार केलं जातं.संहितेच्या ख-या गरजेनुसार पूर्वार्धात चॅटर्जी आणि उत्तरार्धात देओल ही विभागणी पटण्याजोगी आहे मात्र ती इथे होउ शकत नाही.कृष्णनची भूमिका इतर दोघंाबरोबर विभागली जाते आणि परिणामात कमी पडते.
असं असतानाही, चित्रपट अमुक एका पातळीपर्यंत चांगला वाटतो. त्याने सुरूवातीपासून पकडलेला सूर योग्य आहे आणि चित्रपटाचं अस्सल, वास्तववादी टेक्श्चर जमलेलं आहे. त्यातला राजकीय प्रश्नदेखील पुरेसा सोफेस्टिकेटेड आहे आणि छायाचित्रण ,संकलनासारख्या बाजू तर अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे जर त्याने शेवटापर्यंत हे सारं असंच टिकवून धरलं असतं ,तरीही हरकत नव्हती. पण दुर्दैवाने शेवटाकडे चित्रपट आणखी एक मोठी चूक करतो. या प्रकारच्या चित्रपटाचा शेवट सकारात्मक हवा का नकारात्मक ,हे मी सांगण्याची गरज नाही. झी पाहिलेल्यांनी तर मुळातच त्यात असणारा ,अशा उपहासात्मक चित्रपटांचा वस्तुपाठ मानण्यासारखा शेवट पाहिलेला आहे. मात्र तो शेवट , आणि आशयाच्या दृष्टिने तो काय असावा याबद्दलचं सारं तर्कशास्त्र निकालात काढून शांघाय आपल्याला एक बाळबोध वळणाचा शेवट देतो. असा शेवट , जो एकूण सिस्टिमवर भाष्य करण्याएेवजी एका पात्राच्या शॉर्ट टर्म हुशारीलाच महत्व द्यायचं ठरवतो. हे करतानाही , तो भ्रष्ट राजकारण्यांकडे थोड्याफार सहानुभूतीने पाहिल्यावाचून राहात नाही.
आता मी खरं तर इतर सा-या समीक्षकांप्रमाणे असं म्हणायला हवं की तरीही हा प्रयत्न वेगळा असल्याने सर्वांनी जरूर पाहावा वगैरे. पण मी तसं म्हणणार नाही. उलट मी असं सुचवेन, की शांघाय पाहिलेल्यानी मूळ चित्रपट मिळवून जरूर पाहावा. इथला प्रश्न दोन चित्रपटांच्या तुलनेचा नाही. प्रश्न हा आहे ,की जे सत्य १९६९ मधल्या चित्रपटाने प्रतिकूल राजकीय परिस्थितीत मांडून दाखवलं ,ते जसंच्या तसं मांडताना आज २०१२ मधेही आपल्याला काचकूच का वाटावी? आपला समाज अजून इतका प्रतिगामी आहे का? आणि जर तो तसा असेल,सत्य जर पचवता येणारच नसेल तर सत्यशोधनाचा आव तरी कशाला? मग आपले नेहमीचे नाच गाणी ,लुटुपुटीच्या मारामा-या आणि विनोदाचा मारा असणारे सुखान्त चित्रपट काय वाईट. ते निदान ख-याखु-या प्रश्नांना दिशाभूल करणारी सोपी उत्तरं तरी देत नाहीत !

- गणेश मतकरी 

Read more...

प्रोमिथिअस - विज्ञान-भय-तत्वज्ञान-इत्यादी...

>> Monday, June 11, 2012



प्रीक्वल म्हणजे नक्की काय ? तर जे एखाद्या चित्रपटातल्या घटनाक्रमाच्या आधी घडणारी , त्याच्या कथानकाशी जोडलेली ,पण त्या चित्रपटात न सांगितलेली गोष्ट सांगेल. नवे दुवे जोडून मूळ चित्रपटाचं कथानक पूर्ण करेल. ’प्रोमिथिअस’ ,हे रिडली स्कॉटच्या अतिशय गाजलेल्या वैज्ञानिक भयपटाचं प्रीक्वल आहे किंवा नाही , हा प्रश्न मी टाळण्याचं कारण नाही, कारण ज्यांना या चित्रपटात पुरेसा रस आहे ,त्यांनी याविषयी आधीच माहिती करून घेतलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं , की ते प्रीक्वल आहेही आणि नाहीही. कथानक मागे उलगडण्यापुरतं बोलायचं, तर हे प्रीक्वल नाही. ना ते एलिअन मधल्या पात्रांविषयी काही सांगतं , ना ते त्यातल्या घटनांना जोड देतं. एलिअन मधे अन त्याच्या इतर भागात दिसणारा, दहशत पसरवणारा प्राणीदेखील इथे केवळ पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. असं असूनही, थीमॅटिक पातळीवर त्याला प्रीक्वल मानायला काहीच हरकत नाही. एक तर ते घडतं तो स्थळकाळ ,हा एलिअन मधल्या घटनांशी काही बाबतीत जोडलेला आहे. छोट्याशा ग्रहावर उतरल्यावर एलिअन मधल्या नोस्ट्रोमो यानातल्या  तंत्रज्ञांना जे दिसतं, त्याला एक प्रकारे प्रोमिथिअस मधल्या घटना जबाबदार आहेत असंदेखील म्हणता येईल.त्याखेरीज रचनेत आणि व्यक्तिरेखांमधेदेखील एक प्रकारचं साम्य आहे. कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप असणारी आंतरग्रहीय कामगिरी, परग्रहवासीयांना कथेत येणारं महत्वाचं स्थान, नायिकाप्रधान मांडणी, महत्वाच्या पुरुष व्यक्तिरेखेचं मानव नसणं, विज्ञान आणि भय या दोन्ही घटकांचा वापर ( जरी एलिअन मधलं भयाचं पारडं जड होतं, तर इथे ते विज्ञानाचं आहे ) अशी अनेक साम्यस्थळं या दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतात.
’एलिअन’ची रचना हीच मुळात भयपटासारखी होती. एका बंदिस्त जागेत काहीतरी अमानवी अस्तित्व अवतरणं ,आणि या जागेत अडकलेल्या असहाय्य माणसांचा एकामागून एक बळी जाणं , या गोष्टीला त्यात महत्व होतं. मात्र इतर चार भयपटांप्रमाणे इथली जागा ही वस्तीपासून दूरवर रानात असणारं झपाटलेलं घर नव्हती तर ती होती एक अवकाशयान, नोस्ट्रोमो. ’प्रोमिथिअस’मधे स्कॉटने आपला अवाका सर्वच बाबतीत वाढवत नेला आहे. म्हणजे स्थळाच्या आकारापासून ,ते विषयाच्या व्याप्तीपर्यंत. प्रोमिथिअस हे या चित्रपटातलं मानवाचा निर्माता शोधण्याच्या मोहिमेवर निघालेल्या अवकाशयानाचं नाव ते धारण करणा-या ग्रीक दैवताच्या दंतकथांमुळे (ज्यात मानवाची निर्मिती आणि देवांकडून आग चोरून मानवजातीकडे देणं या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत आणि ज्ञानाचा ,विज्ञानाचा शोध अध्याऋत आहे) योग्य वाटणारं आहे मात्र या कथांच्या दुर्दैवी शेवटांमुळे ते कोणी या प्रकारच्या मोहिमेसाठी वापरेल असं वाटत नाही. (हे म्हणजे नव्या विमानकंपनीला इकॅरस नाव देण्याइतकंच शहाणपणाचं होइल). चित्रपटासाठी मात्र नाव चपखल आहे, काही प्रमाणात सूचक असलं तरीही.
तर एका विशिष्ट ग्रहसमूहाकडे निर्देश करणारे काही प्राचीन शीलालेख आणि केव्ह पेन्टिंग्ज पाहून आखलेली मोहीम घेउन प्रोमिथिअस हे यान त्या समूहातल्या एका उपग्रहापर्यंत पोचतं जो वरवर पाहाता बराच पृथ्वीसारखा आहे. मोहिमेचा उद्देश असतो तो मानवजातीच्या निर्मितीला कारणीभूत असणार््या परग्रहवासीयांची गाठ घेणं अन आपल्या अस्तित्वामागच्या रहस्याचा उलगडा करुन घेणं. मोहिमेचं नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ असतात एलिझबेथ शॉ ( नूमी रापेस) आणि चार्ली हॉलोवे (लोगन मार्शल-ग्रीन). मोहिमेचे स्पॉन्सर असणा-या वेलन्ड कॉर्पोरेशनतर्फे हजर असलेल्या मेरेडिथचा (चार्लीज थेरॉन) यातल्या कशावरच विश्वास नसतो, मात्र वेलन्डचा मानसपुत्र असणारा अतिशय हुषार अँन्ड्रॉइड डेव्हिड 8 ( मायकेल फासबेन्डर) मात्र मोहिमेत हिरीरीने भाग घेतो. ग्रहावर उतरताच कुठल्यातरी प्रकारचं जीवन तिथे निदान कधीकाळी असल्याचे पुरावे लगेचच मिळायला लागतात.लवकरच मानवसदृश पण आकाराने मोठ्या प्राण्यांचे अवशेषदेखील सापडतात, पण जर हेच आपले निर्माते असले तर त्यातलं कोणीच आता जिवंत असल्याच्या खूणा दिसत नाहीत. आणि मग अचानक कोणाचंतरी अस्तित्व जाणवायला लागतं. हे जीव माणसासारखे बिलकूल नसतात आणि त्यांच्यापुढे माणसांचा टिकाव लागणही कठीण दिसायला लागतं.
प्रोमिथिअस ही बिग बजेट, थ्री-डी ,काहीशी जेनेरिक असूनही खूपच विचार करणारी आणि करायला लावणारी फिल्म आहे.तिचा विषय मानवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे आणि ती त्या विषयाला पुरेशा गंभीरपणे घेते. मानवजात कशी अस्तित्वात आली हे रिडली स्कॉट आणि त्याच्या लेखकांना माहीत असण्याची शक्यता नाही हे तर उघडच आहे. त्यामुळे त्यावर थातूरमातूर उत्तरं शोधत बसण्यापेक्षा चित्रपट अधिक मूलभूत आणि तात्विक मुद्द्यांची चर्चा, त्यांचा तात्विकपणा पुरेसा जाणवू न देता करतो. उदाहरणार्थ निर्माता आणि निर्मिती यांतल्या परस्परसंबंधाची चर्चा जी मानवाची निर्मिती आणि मानवाने केलेली निर्मिती अशी डेव्हिडच्या अँन्ड्रॉइड असल्याचा संदर्भ देत आकाराला येते. त्याखेरीज माणूसपण म्हणजे नक्की काय, उत्क्रांतीवादाच्या संकल्पना, श्रध्दा विरुध्द विज्ञान अशा अनेक पैलूंवर चित्रपट प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे भाष्य करतो. मोहिमेचा वरवरचा उदात्त हेतू, आणि त्यामागे असणारा वेलन्डचा व्यक्तिगत अजेन्डा हीदेखील माणसाच्या कोत्या मनोवृत्तीवर केलेली टिकाच आहे.
चित्रपटाच्या पटकथेवर काही समीक्षकांनी ताशेरे ओढल्याचं मी ऐकून आहे. ती मधे संथ होते, वेग घेत नाही, वगैरे. व्यक्तिश: मला तसं वाटलं नाही. त्यांना तसं वाटण्यामागे एक संभाव्य कारण म्हणजे चित्रपटाला जेनेरिक चौकटीत अडकवणं , आणि त्याने त्याच चौकटीत राहावं अशी अपेक्षा ठेवणं. प्रोमिथिअस हा केवळ अँक्शनपट, केवळ भयपट वा केवळ विज्ञानपट नाही . त्यामुळे त्याने अमुकच पध्दतीने पुढे जावं ,अशी अपेक्षा निरर्थक आहे. त्याचं जे रसायन आहे, त्या रसायनाला ही गती योग्य असल्याचं माझं मत आहे.
थ्री-डी चित्रपटांचं सध्या जे स्तोम आहे त्यातले मोजकेच चित्रपट हे या माध्यमाचा खराखुरा ,चांगला आणि आवश्यक वापर करतात असं दिसतं. अवतार, हे त्यातलं सर्वात उघड उदाहरण. स्कोर्सेसीचा ह्यूगो मी स्वत: टु-डीच पाहीला पण तोही त्याच ताकदीचा असल्याचं ऐकून आहे. लवकरच येणारा नवा स्पायडरमॅन देखील याच वर्गात बसेल असं ट्रेलरवरून तरी वाटतंय. प्रोमिथिअसदेखील या चित्रटांप्रमाणेच थ्री-डीचा उत्तम उपयोग करतो. अवकाश, ग्रहावरली विस्तिर्ण निसर्गदृश्य आणि एका टेकडीसारख्या वास्तूमधल्या गुहा यांमधे बराचसा चित्रपट घडतो आणि या सर्व जागा दाखवताना थ्री-डी मुळे दृश्यांना आलेली खोली फारच परिणामकारक आहे. हे गिमिक नसून ही गरज आहे हे प्रोमिथिअस पाहाताना लगेच लक्षात येतं.
प्रोमिथिअसचा शेवट खूप इन्टरेस्टिन्ग आहे. अशासाठी, की तो म्हंटलं तर समाधानकारक शेवट असूनही सीक्वलसाठी शक्यता तयार करणारा आहे आणि ’एलिअन’ ला गरजेपुरता सेट अप लावून देवूनही तो कथेसाठी त्यावर अवलंबून नाही. करमणूकीच्या प्रांतात हाय कॉन्सेप्ट , विचारांना चालना देणारे चित्रपट मिळणं कठीण असतं. रिडली स्कॉट ते देउ शकतो हाच त्याचा मोठेपणा.
- गणेश मतकरी 

Read more...

द डेव्हिल्स डबल- कूपर आणि कूपर

>> Monday, June 4, 2012


प्रत्येक चित्रपट हा सर्वार्थाने जमलेला असावा अशी अपेक्षा फोल आहे. चांगल्यात चांगला चित्रपटदेखील कधीकधी एखादा मूलभूत दोष बाळगतो आणि सामान्य वाटणारे चित्रपटदेखील एखादी छान गोष्ट करुन जातात. मात्र ही झाली दोन टोकं. बरेच,म्हणजे काही मोजके श्रेष्ठ आणि अगदीच टाकाऊ चित्रपट वगळता बहुतेक सारेच चित्रपट ,या टोकांच्या मधे कुठेतरी येतात असं आपल्याला दिसतं. लतीफ वाहीया ,या वादग्रस्त इराकी व्यक्तिमत्वाच्या चरित्रात्मक कादंबरीवर (?) आधारलेला ली तामाहोरी दिग्दर्शित ’द डेव्हिल्स डबल’ देखील अशामधल्या चित्रपटांतलाच एक आहे, हे पाहताक्षणीच लक्षात येतं. त्यातले गोंधळ अनेक आहेत आणि ते संकल्पनेपासून ते दिग्दर्शन शैलीपर्यंत सर्वत्र पसरलेले आहेत. तरीही तो जरूर पाहावा अशाही काही निश्चित गोष्टी इथे आहेतच.
डबल रोल्स आपल्या परिचयाचे आहेतच.लोककथा, परीकथा ,साहित्य ,नाटकं, जगभरचे चित्रपट यांमधे सातत्याने येणा-या ज्या प्रमुख कल्पना आहेत ,त्यात एका चेह-याच्या दोन माणसांमधे घडणा-या नाट्याचा नंबर बराच वर लागतो. या माणसांचे परस्परसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, चित्रप्रकारही पूर्ण वेगळ्या जातकुळीचे असू शकतात, मात्र एका मूलभूत पातळीवर या समान चेह-याच्या दोन प्रवृत्तींमधला  संघर्ष सर्व माध्यमांत काहीसा परिचयाचा वाटतो, कदाचित प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वातल्या दुभंगलेपणाची हा विषय आठवण करुन देत असल्याने.
मूळ कल्पनेतच असलेल्या चमत्कृतीचाच परिणाम म्हणून कदाचित, पण बहुधा या विषयाला स्थान देणा-या कलाकृती सत्यकथनाचा दावा करत नाहीत. डेव्हिल्स डबलचा वेगळेपणा हा, की तो तसा दावा करतो.
अगदी शंभर टक्के नाही, कारण मूळ पुस्तकाच्या सत्याबद्दलच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे लतीफ हा सद्दाम हुसेन या कुप्रसिध्द इराकी हुकूमशहाच्या माथेफिरु मुलाचा ,उदे हुसेनचा बॉडी डबल होता किंवा नाही याचाच काही निश्चित पुरावा उपलब्ध नाही. त्याखेरीज पुस्तकदेखील पटकथाकार मायकेल थॉमस आणि दिग्दर्शक तामाहोरीने चित्रपटासाठी बरच बदललं आहे.त्यामुळे हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत आहे असं म्हणणं कठीणंच. त्याखेरीज त्यातले काही मोजके तुकडे वगळता ,दृश्य आणि सादरीकरण या दोन्ही बाबतीत चित्रपट वास्तववादी न वाटता करमणूकप्रधान व्यावसायिक स्वरुपाचा वाटतो. तरीही उदे हुसेनच्या आयुष्याचे तपशील, न्यूज फूटेजचा वापर, ऐतिहासिक घटनांचे संदर्भ, उदे आणि सद्दाम सारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा यांमुळे त्याला पूर्ण काल्पनिकदेखील मानता येत नाही.
चित्रपट सुरू होतो तो लतिफला (डॉमिनिक कूपर) उदेपुढे (पुन्हा कूपर) हजर  केलं जाण्यापासून. शाळेत असतानाची दोघांची ओळख पण पुढल्या काळात रस्ते अर्थातच वेगळे झालेले.उदे आपल्या वडिलांच्या सत्तेचा वाटेल तसा फायदा घेणारा क्रूरकर्मा बनलेला , तर लतिफने आजवर सैन्यात चाकरी केलेली. समोर दुसरा पर्यायच नसल्याने थोड्याफार मारहाणीनंतर आणि तुरुंगवासानंतर लतिफ उदेची धमकीवजा विनंती मान्य करतो आणि स्वत:चं अस्तित्व पुसून टाकून ऐशोआरामाच्या नजरकैदेत राहायला लागतो.अर्थात वेळोवेळी लतिफची जागा घेत. यापुढला चित्रपटाचा बराचसा भाग ,हा उदेच्या मनमानी कारभाराच्या आणि लतीफच्या हे निभावून नेत सुटकेचा मार्ग शोधण्याच्या गोष्टी सांगतो.असा मार्ग शोधणं जवळपास अशक्य असतं , हे वेगळं सांगायला नकोच.
चित्रपट हा प्रामाणिकपणे चरित्र मांडत नसल्याने आणि त्याबरोबरच केवळ रंजक कथानकाकडेही पाहात नसल्याने त्याच्या निर्मितीमागच्या हेतूवरच काहींना शंका आहे. त्यात एक स्पष्टपणे न कळणारा खोटेपणा असण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे लतीफचं पूर्ण सकारात्मक चित्रण. लतीफने आपल्या पुस्तकात ते तसं करणं स्वाभाविक आहे ,पण हेही खरं की त्याच्या वागण्याला एकही साक्षीदार नाही. हातात सत्ता ,मनमानी करण्याची शक्ती आणि संधी येताच ती पूर्णपणे झुगारुन द्यायला माणूस फारच सज्जन हवा आणि लतीफ तितका सज्जन असल्याचं सर्टिफिकेट त्याने पुस्तकातून स्वत:लाच बहाल केलंय, त्यामुळे ते फारसं विश्वसनीय नाही. पण चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहाताना ,हे हेतू ,ख-याखोट्याचे हिशेब बाजूला ठेवता येतात आणि जर तसं केलं ,तर डेव्हिल्स डबल आपल्याला गुंतवून ठेवतो.
आपल्या पटकथेत मायकेल थॉमसने उदेच्या आयुष्यातले अनेक प्रमुख प्रसंग घेतले आहेत. कधी पुस्तकाच्या संदर्भाने तर कधी स्वतंत्रपणे. यात उदेबद्दल सांगितल्या जाणा-या ब-या वाईट गोष्टी येतात (उदाहरणार्थ ,शाळकरी मुलींना रस्त्यातून जबरदस्ती उचलून नेणं), त्याने सद्दामच्या खास माणसाला भर पार्टीत खलास करण्यासारख्या इतिहासात नोंदलेल्या घटना येतात, आणि खास तपशील माहीत नसलेल्या ,पण कथेच्या तर्कशास्त्रात बसणा-या घटनाही वेगळ्या रुपात हजेरी लावतात (उदाहरणार्थ उदेला जवळजवळ प्राणघातक ठरलेला हल्ला).मात्र या सार््याचं जोडकाम केवळ चित्रपटाला वादग्रस्त आणि अतिरंजित करण्यासाठी वापरल्यासारखं वाटत नाही. त्यातून खरंच एक चांगली पटकथा आकाराला येते.
सामान्यत: या प्रकारचे चित्रपट पूर्णत: कल्पित असल्याने शेवटच्या ऊत्कर्षबिंदूवर नजर ठेवून बांधलेले असतात. इथे मात्र सरमिसळ असल्याने रचना ही वेळोवेळी येणा-या छोट्या मोठ्या उत्कर्षबिंदूना सामावत पुढे जाते.त्यामुळे वळणं ,धक्के यांचं प्रमाण अनपेक्षित राहातं. रिअँलिझमवरभर नसल्याने चित्रपट थ्रिलरसारख्या दृश्यरचना आणि नाट्यपूर्णतेच्या इतर जागा शोधतो आणि आपला परिणाम चढवत नेतो. पार्टीतल्या खूनाचा प्रसंग , कॅलिग्युलाच्या परंपरेतला लग्नाचा प्रसंग, शाळकरी मुलीच्या बापाबरोबरचा स्फोटक संवाद अशा अनेक जागा या प्रेक्षकाला विचाराला उसंत न देता खिळवून ठेवतात. काही वेळा आपण तर्कातल्या चुका हेरू शकतो, नाही असं नाही. उदाहरणार्थ शेवटाकडे उदेपासून लपताना लतीफ दाढी मिशा काढण्यासारखी उघड गोष्ट का करत नाही? घरच्यांना संकटात आणण्याचा धोका तो कसा पत्करतो?  इत्यादी.पण अशा शंकामधे आपण अडकून राहात नाही , ते डॉमिनीक कूपरच्या उत्कृष्ट दुहेरी भूमिकेमुळे.बहुतेक दुहेरी भूमिका मोजक्याच प्रसंगात पडद्यावर एकत्र असतात.इथे मात्र असे मुबलक प्रसंग आहेत.  उत्तम इफेक्ट्स मुळे इथला कूपरचा दोन्ही भूमिकांमधला वावर सोपा झालाय हे खरं असलं तरी त्याने या एकाच रुपातल्या दोन्ही व्यक्तिरेखा परस्परांपेक्षा इतक्या भिन्न रंगवल्यात ,की हा एकच माणूस आहे यावर विश्वास बसू नये.उदेचा उत्साह, दात पुढे काढून हसण्याची लकब , चेह-यावरला माज आणि लतीफचा नाईलाज,धिटाई आणि अभिमान यांनी हे चेहरे पूर्ण बदलतात. लतीफ उदेची जागा घेतो तेव्हा तर हा परकायाप्रवेश फारच गुंतागुंतीचा होतो. कूपरची भूमिका ,ही या चित्रपटाच्या यशामागचं प्रमुख कारण आहे. त्याला वगळून ’द डेव्हिल्स डबल’ची कल्पनाच करता येणं शक्य नाही.
- गणेश मतकरी 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP