आऊटसायडर स्कोर्सेसी

>> Friday, February 27, 2009



गणेश मतकरी लिखित ‘फिल्ममेकर्स’ या पुस्तकाचे बुधवारी दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीच्या चित्रपटांचे विश्लेषण करणाऱ्या ‘फिल्ममेकर्स’ मधील प्रकरणाचा हा संपादित अंश.

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट दृश्य. एका नक्षीकाम केलेल्या वॉलपेपरवरून कॅमेरा उजवीकडे सरकतो आणि दृष्टीपथात येते ती समोर चाललेली पार्टी. स्त्रीपात्र विरहीत. उपस्थित सज्जनांचं वय हे साधारण पंचविशीच्या आसपासचं. डावीकडून उजवीकडे सहजगतीने गेलेला कॅमेरा दाखवून देतो या मुलांचे घोळके, त्यांचे चाललेले उद्योग, गप्पा, फोनकॉल्स वगैरे. समोरच बाटल्या, त्यामुळे मद्यपानही जोमाने आलंच. बरोबर संगीत, आता कॅमेरा आपली दुसरी फेरी चालू करतो. पुन्हा डावीकडून उजवीकडे. या खेपेला थोडं अधिक जवळून.
लवकरच या दृश्यासाठी वापरलेली शैली स्पष्ट व्हायला लागते. वर्तुळाकार गतीचा आभास तयार करणारी कॅमेरा मूव्हमेन्ट. एक दुसऱ्यात डिझॉल्व्ह होणारे, मिसळून जाणारे शॉट्स, सलगता आणून देणारे, संवाद ऐकू येत नाहीत, पण संगीताबरोबर आता सुरू झालेलं गाणं हे पार्टीचा मूड पकडणारं. कॅमेरा फिरण्याची गती दर शॉटगणिक थोडी वाढणारी, पण सहभागी पात्रांच्या हालचाली स्लो मोशनमध्ये चाललेल्या. आता जमलेल्या घोळक्यातलं कोणी एक पिस्तुल काढतं. मग थोडा पिस्तुलाशी ढोळ. एकाकडून दुसऱ्याकडे. मग तिसऱ्याकडे. मग एक जण पिस्तुल समोर कोणावर तरी रोखतो. सगळे हसतात, थोडी गंमत. आता कॅमेऱ्याचं वर्तुळाकार फिरणं थांबलेलं, पण डिझॉल्व्हज सुरू. लवकरच एका मुलाला लक्ष्य केलं जातं. भीती घातली जाते. इतरजण मागे पळतात. काही जण हळूच गंभीर झालेली, इतरांच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित. लक्ष्य ठरलेल्या मुलाची मानगूट पिस्तुलवाल्याने धरलेली, मुलगा रडकुंडीला आलेला. थोडी पळापळ. मग मुलाला जमिनीवर ढकलण्यात येतं, आणि पिस्तूल रोखलं जातं, मात्र मुलावर नाही, तर दारूच्या बाटल्यांवर. गोळी सुटते. काच फुटल्याचे आवाज. पडद्यावर आता दिसतात ती ‘रिओ ब्राव्हो’ या वेस्टर्न चित्रपटातली छायाचित्रं. पाश्र्वभूमीला आवाज बंदुकीच्या गोळ्यांचे.
हे दृश्य मार्टिन स्कोर्सेसीच्या ‘हू’ज दॅट नॉकिंग अ‍ॅट माय डोअर?’ (१९६९) चित्रपटातलं. स्कोर्सेसीचा हा पहिला चित्रपट. फिल्म स्कूलमधली ग्रॅज्युएशन फिल्म म्हणून सुरू झालेला. अनेक अडचणींमधून गेलेला. पैशांची चणचण, तुकडय़ातुकडय़ात केलेलं चित्रीकरण/संकलन, नवे कलाकार, वितरकांच्या अटी, असे अनेक प्रश्न. तरीही महत्त्वाचं हे, की पुढल्या काळात एक मोठा दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेला दिग्दर्शक, इथे त्याच्या अनेक वैशिष्टय़ांसह आपल्याला सर्वप्रथम दिसतो. खास करून या दृश्यात फिल्मस्कूलमधल्या शिक्षणाने तयार झालेली प्रयोग करून पाहण्याची वृत्ती, तांत्रिक कौशल्यं, अर्थपूर्ण दृश्यरचना, संगीताचा ठळक वापर, इतर चित्रपटांचा प्रभाव, हॉलिवूडवरचं प्रेम आणि आशयात अचानक समोर येऊन प्रेक्षकांना (आणि क्वचित पात्रांनाही) कोंडीत पकडणारं हिंसेचं टोकदार दर्शन. थोडक्यात म्हणजे अस्सल स्कोर्सेसी.
हॉलिवूडच्या महत्त्वाच्या चित्रकर्त्यांपैकी एक असलेला स्कोर्सेसी हा एका परीने हॉलिवूडच्या तथाकथित परंपरेला उपरा आहे. ज्याला आपण हॉलिवुडपट म्हणतो तो सिनेमा हा प्रामुख्याने चार लोकांच्या मनोरंजनाला वाहिलेला, मुख्य धारेतला, व्यावसायिक सिनेमा आहे. या सिनेमाचं लक्ष्य हे प्रामुख्याने त्यातून होणाऱ्या नफ्यावर केंद्रित झालेलं आहे, आणि हा नफा इथे नेहमीच चित्रकर्त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीहून अधिक महत्त्वाचा मानला जातो. अर्थात हॉलिवूडमध्येही या चौकटीत राहून कलात्मकदृष्टय़ा दर्जेदार निर्मिती करणारे कलावंत आहेत. पण मार्टिन स्कोर्सेसी ही चौकटही मानत नाही. आजवर त्याने केलेले सर्व चित्रपट, क्वचित ‘द कलर ऑफ मनी’ किंवा ‘केप फिअर’ सारखे अपवाद वगळता, स्वत:च्या मनाशी प्रामाणिक राहूनच बनवलेले आहेत. त्या दृष्टीने पहायचं तर त्याचं काम हे मुख्य धारेपेक्षा अमेरिकेतल्या समांतर चित्रपट चळवळीच्या, म्हणजेच इन्डिपेन्डन्ट फिल्ममेकिंगच्या अधिक जवळ जाणारं आहे.
या दिग्दर्शकाच्या संपूर्ण कारकीर्दीकडे एक नजर टाकली तर लक्षात येईल की तिला एक निश्चित आकार आहे. या चित्रपटाच्या विषयाची निवड, त्यांची रचना, त्यातल्या व्यक्तिरेखांचं स्वरूप हे दिग्दर्शकाच्या जाणीवेतून आलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की स्कोर्सेसीने वारंवार तेच विषय त्याच प्रकारे हाताळले. उलट या विषयांमध्ये चिकार विविधता जाणवते. ‘गुडफेलाज’ किंवा ‘मीन स्ट्रीट्स’सारखे गँगस्टर्सचं व्यक्तिगत आयुष्य चित्रीत करणारे, कुंदन किंवा एव्हिएटरसारखे चरित्रात्मक, लास्ट टेम्प्टेशन ऑफ क्राईस्टसारखे धार्मिक कल्पनांचा नव्याने अर्थ शोधणारे चित्रपट आणि ‘केप फिअर’सारखे थ्रिलर्सदेखील त्याने दिले. मात्र या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या विषयांमध्येही काही समान सूत्रं आहेत जी आपल्याला या निवडीमागच्या कारणांपर्यंत घेऊन जाऊ शकतील.
१९४२चा स्कोर्सेसीचा जन्म हा अमेरिकेतल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय इटालियन वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातला. या ठिकाणी पाहायला मिळालेलं वातावरण, घरच्यांचे संस्कार, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्हीवर लहान वयात पाहायला मिळालेले इटालियन नव-वास्तववादी (ठी फीं’्र२३) चित्रपट यांचा स्कोर्सेसीच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. माफिया साम्राज्याच्या एका कोपऱ्यातत असलेल्या वस्तीत त्याला गुन्हेगारीने पोखरलेला समाज पाहायला मिळाला. इथली तरुण मुलं ही गुंडगिरी, लहान प्रमाणातला अमली पदार्थाचा व्यवसाय करताना सर्रास पाहायला मिळतो. या मंडळींमध्येच मोठा होणारा मार्टीन, हा या हळूहळू तयार होणाऱ्या गँग्जमध्ये मिळून मिसळून असे, पण प्रत्यक्षात स्वत:कडे फार लक्ष वेधून न घेता शांतपणे राहण्याचा प्रयत्न करी. मात्र कधीतरी आपणही या दुष्टचक्राचा कायम हिस्सा बनू ही भीती होतीच. या वस्तीत मान होता तो प्रामुख्याने तीन प्रकारच्या लोकांना, माफिया, गँगलीडर्स आणि धर्मगुरू. गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कोर्सेसीने या सुमारास धर्मगुरू होण्याचं ठरवलं ते हा मान मिळवण्यासाठी. हा काळ आणि हे वातावरण या ना त्या मार्गे स्कोर्सेसीच्या कारकीर्दीवर प्रभाव पाडून राहिलेले आहे. पुढे चित्रसृष्टीत जायचं ठरवल्यावर त्याने आपली धार्मिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवली, पण त्याच्या कथासूत्रांच्या निवडीमागे हा भूतकाळ जाणवण्यासारखा आहे. गुन्हेगारी, हिंसाचार आणि धर्म या तीन सूत्रांभोवती स्कोर्सेसीचे चित्रपट फिरतात. ही सूत्रं त्याच्या प्रेरणा आहेत ज्या त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात.
अमेरिकन चित्रपट व्यवसायाकडे ढोबळमानाने पाहिलं, तर १९७० च्या आसपास एक मूलभूत फरक पडलेला आपल्याला दिसून येईल. या आधी आलेली दिग्दर्शकांची पिढी ही मुख्यत: व्यवसायात तयार झालेली होती. त्यांचे आडाखे, कामाची पद्धत ही प्रामुख्याने त्यांच्या स्वत:च्या अनुभवावर आणि आपल्या आजूबाजूला पाहायला मिळणाऱ्या इतर दिग्दर्शक, कलावंतांच्या निरीक्षणातून तयार झालेली होती. या मंडळींनी काही प्रमाणात जागतिक सिनेमा पाहिला होता हे निश्चित, पण त्यापासून काही शिकण्यात त्यांना रस नव्हता. स्टुडिओ सिस्टीमही या काळी जोरात असल्याने दिग्दर्शकांचा कलही निर्मात्यांच्या बाजूने विचार करण्याकडे होता.
१९६०-७० च्या सुमारास स्टुडिओ सिस्टीमचं प्रस्थ कमी झालं आणि चित्रपटांचं पद्धतशीर शिक्षण घेतलेल्या दिग्दर्शकांची एक फळी पुढे आली. फ्रान्सिस फोर्ड कपोला, जॉर्ज लुकस, स्टीवन स्पीलबर्ग अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकांबरोबरचं स्कोर्सेसीदेखील व्यवसायात उतरला. या सर्वाची चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी ही आधीच्या पिढीपेक्षा खूपच वेगळी होती. त्यांचा जगभरातल्या चित्रपटांचा अभ्यास होता आणि आपल्या हिचकॉक किंवा काप्राबरोबरचं इटलीच्या डेसिका किंवा फेलीनीकडून वा फ्रान्सच्या त्र्युफो किंवा गोदारकडून काही शिकण्यात त्यांना कमीपणा वाटत नव्हता. आशयाबरोबरच तंत्रातही प्रयोग करण्याचा त्यांना उत्साह होता. या दिग्दर्शकांनी तरुण पिढीत आपला नवा प्रेक्षक शोधला आणि चित्रसृष्टीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली. या बदललेल्या चित्रसृष्टीने स्कोर्सेसीची दखल घेतली ती १९७३ मधल्या ‘मीन स्ट्रीट्स’मुळे. मीन स्ट्रीट्स हा चित्रपट स्कोर्सेसीच्या कारकीर्दीच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच, वर तत्कालीन तरुण पिढीची दिशाहीनता दाखवणारा आणि समाजाच्या एका विशिष्ट वर्गाचं चित्रण करणारा चित्रपट म्हणून तो उल्लेखनीय आहे. एका परीने तो तथाकथित ‘अमेरिकन ड्रीम’विषयी देखील आहे. समाजाच्या सर्व थरातल्या लोकांना भासणारी सुबत्तेची गरज तो दाखवतो आणि जेव्हा ही गरज कायद्याच्या चौकटीत राहून पुरी करता येत नाही तेव्हा ही चौकट खिळखिळी व्हायला वेळ लागत नाही. या चित्रपटातला तरुण वर्ग हा साधारण ‘हू’ज दॅट नॉकिंग अ‍ॅट माय डोअर? मधलाच आहे. किंबहुना मीन स्ट्रीट्समधली चार्लीची प्रमुख भूमिका हे त्या चित्रपटातल्या जे आरचंच एक रूप आहे. स्कोर्सेसीने दोन्ही चित्रपटांमधल्या भूमिकेसाठी केलेली हार्वी कायटेलची निवडही हेच सांगते. असं असूनही दोन चित्रपटांमधला प्रमुख फरक म्हणजे आता त्याला आलेलं स्पष्ट गुन्हेगारी वळण आणि मजकुराचा, त्याच्या दृश्य परिमाणातही परावर्तित झालेला गडदपणा.
‘हू’ज दॅट.. मध्ये भर होता तो नायक/नायिकेमधल्या भावनिक नातेसंबंधावर. प्रेम आणि शरीरसंबंध याबद्दलचे सांकेतिक आणि आधुनिक विचार, त्याचबरोबर पुरोगामीत्वाच्या आणि पावित्र्याच्या कल्पनांमधून येणारा दुरावा अशा प्रामुख्याने स्त्री-पुरुषांमधल्या जवळीकीसंबंधातल्या मुद्दय़ांवर त्याची बांधणी केली गेली होती. यातले काही मुद्दे मीन स्ट्रीट्समध्येही आहेत. पण नावाला जागून इथला भर आहे, तो स्ट्रीट कल्चरवर. चार्ली हा माफिआच्या जवळच्या संपर्कातला तरुण आणि त्याच्या तेरेसा या खास मैत्रिणीचा विक्षिप्त चुलतभाऊ जॉनी बाय यांची ही गोष्ट आहे. चार्लीचं आपली पत सांभाळत जॉनी बॉयला सावरून घेण्याचा प्रयत्न करणं आणि जॉनी बॉयचं जवळजवळ ठरल्याप्रमाणे विनाशाकडे धावणं असा या चित्रपटाचा आकार आहे.
काळाचा हिशेब ठेवायचा, तर १९९० च्या गुडफेलाजला स्कोर्सेसीच्या कारकीर्दीच्या मध्यावर येणारा चित्रपट म्हणावं लागेल, पण चित्रपटांची संख्या आणि त्यांचा प्रभाव या दोन्ही दृष्टींनी पाहायचं तर गुडफेलाजपर्यंतचा काळ हा कितीतरी यशस्वी म्हणावा लागेल. याचा अर्थ पुढल्या काळात स्कोर्सेसीच्या चित्रपटांचा दर्जा ढासळला असा मात्र नव्हे, किंबहुना ‘केप फिअर’ (१९९१) ही युनिव्हर्सल पिक्चर्ससाठी लगेचच स्कोर्सेसी केलेली निर्मिती ही अनेक बाबतीत विक्रमी ठरली होती. २००२ च्या ‘गँग्ज ऑफ न्यूयॉर्क’ने पुन्हा दिग्दर्शनाचं नामांकन मिळवण्यापर्यंतच्या काळात स्कोर्सेसीने चित्रपट अभ्यासकांना आणि चाहत्यांना उपयुक्त अशा दोन चित्रपटांची निर्मिती केली, खरं तर हे स्वतंत्र चित्रपट नव्हते, तर अमेरिकन आणि इटालियन चित्रपटांच्या इतिहासाचा अनेक चित्रपटांच्या दृश्यासह घेतलेला वैयक्तिक आढावा असं यांचं स्वरूप होतं. ‘ए सेन्चुरी ऑफ सिनेमा : ए पर्सनल जर्नी विथ मार्टिन स्कोर्सेसी थ्रू अमेरिकन मुव्हीज’ (१९९५) आणि ‘माय व्हॉएज टु इटली’ (२००१) हे दोन्ही चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा केवळ इतिहास मांडण्याचा नसून स्कोर्सेसीच्या नजरेतून तो मांडायचा असला तरी एका परीने हीच त्यांची खासियत आहे. कारण मग तो केवळ अहवाल राहत नाही, तर हा इतिहास जोडत जाणाऱ्या एका तल्लख व्यक्तिमत्त्वाची मदत आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळते. या माणसाचा हा गुण त्याच्या समकालीन असणाऱ्या अनेक चित्रकर्मीहून वेगळा आहे. इतिहास जपण्याची, जुने चित्रपट अभ्यासण्याची, ते पुन्हा प्रदर्शित करायला किंवा डीव्हीडीवर उपलब्ध होण्याला मदत करण्याची त्याला मनापासून हौस आहे. फेलिनीला ला स्टड्राच्या डीव्हीडी प्रकाशनासाठी प्रास्ताविक दे, मायकेल पॉवेलच्या पीपींग टॉमला किंवा निकोलस रेच्या जॉनी गिटारला अमेरिकेत प्रदर्शित व्हायला मदत कर, मॉडर्न लायब्ररी ऑफ मुव्हीजसारखी चित्रपटविषयक उत्तम पुस्तकं मालिका संपादित कर असे अनेक उद्योग त्याने केले आहेत, करतो आहे.
मार्टिन स्कोर्सेसीच्या कलाजीवनाचा मोठा भाग आज उरकून गेला असला, तरी त्याची अखेर समीप असल्याची चिन्हं नाहीत. आणखी अनेक र्वष तो याच जोमाने चित्रपट बनवू शकेल. मात गुडफेलाज ही त्याच्या प्रायोगिक चित्रपटांनी भरलेल्या करियरच्या पहिल्या टप्प्याची अखेर मानली अन् डिपार्टेडचं ऑस्कर ही तुलनेने व्यावसायिक म्हणता येईलशा दुसऱ्या टप्प्याची अखेर मानली, तर येणारा काळ त्याच्या खेळीला तिसऱ्या टप्प्यावर घेऊन जाताना दिसेल. हा पुढला टप्पा या सर्जनशील दिग्दर्शकाकडून काय घेऊन येतो हे पाहण्याची उत्सुकता आता आहे. ती शमवण्यात हा सर्जनशील कलावंत कुठेही कमी पडणार नाही याची खात्रीदेखील.

Read more...

आपला सिनेमास्कोपच्या वाचकांना निमंत्रण

>> Tuesday, February 24, 2009


मुंबई, ता. २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी
वर्षभरापासून या ब्लॉगचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या गणेश मतकरी यांच्या फिल्ममेकर्स या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (बुधवार. ता.२५ फेब्रुवारी २००९) दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्याहस्ते होणार आहे. पु.ल. देशपांडे अकादमी संकुल, रविंद्र मिनी थिएटर, प्रभादेवी येथे सायंकाळी ७ वाजता हा प्रकाशनसोहळा होणार आहे. यावेळी मराठीतील चित्रपट समीक्षा या विषयावर एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्यात गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, संतोष पाठारे, सचिन कुंडलकर आणि मीना कर्णीक यांचा सहभाग असणार आहे. मॅजेस्टिक प्रकाशन आणि प्रभात चित्र मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ब्लॉगच्या वाचकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही विनंती.
फिल्ममेकर्स या पुस्तकात स्टीव्हन स्पीलबर्ग,जॉर्ज लुकस, माजिद माजिदी, मनोज नाईट शामलन, वाचोस्की बंधू, क्लींट इस्टवूड, रॉबर्ट रॉर्ड्रीग्ज, जेम्स कॅमेरॉन, स्कॉर्सेसी आणि बर्गमन यांच्यावरचे अभ्यासपूर्ण आणि गणेशच्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील लेख आहेत.
<a href="http://1.bp.blogspot.com/_jXcd2zv5jXc/SaPxYy748TI/AAAAAAAAAi0/0IStUfUxqno/s1600-h/FilmmakersCover-one.JPG">

Read more...

अचानक धनलाभ आणि इतर शोकांतिका (बॉईल-३)

>> Monday, February 23, 2009


डब्लू, डब्लू. जेकब्स यांची एक गोष्ट आहे. मन्कीज पॉ नावाची. यातला माकडाचा पंजा हा चमत्कारी आहे. इच्छापूर्तीचं साधन म्हणून तो वापरला जाऊ शकतो. मात्र यात एक गोमदेखील आहे. या इच्छा अशा भयानक मार्गांनी पू-या होतात, की त्या मागणा-याला पश्चाताप करण्याची वेळ यावी. सध्या आपल्याकडे अचानक लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या दिग्दर्शक डॅनी बॉईलच्या चित्रपटांचा सूर जरी जेकब्स यांच्या गोष्टी इतका टोकाचा नसला तरी तथाकथित चांगल्या घटनांचे दुष्परिणाम हे त्याच्या चित्रपटांत हटकून पाहायला मिळतात.
आजच्या समाजाने तयार केलेल्या क्लॉस्ट्रोफोबिया हा त्याचा आवडीचा विषय आणि या विषयाची गडद मांडणी ही त्याच्या चित्रपटांची ओळख. त्यामुळेच बॉईलच्या चित्रपटांचे सुखांत देखील नव्या अडचणी उभ्या करणारे आणि अपूर्ण असतात. त्याच्या स्लमडॉग मिलीअनेअर बद्दलही हेच म्हणता येईल. एरवी नायकाच्या भावाचा मृत्यू ओढवणारा आणि नायिकेच्या भूतकाळातल्या समस्त खलनायकांना नायकाच्या मागावर येण्यासाठी उद्युक्त करणारा शेवट हा कसला सुखांत ? मात्र ही बॉईलची हातचालाखी आहे. एक क्षण पकडण्याची, जो कथेला सुखांत शेवटाचा आभास देईल, असो.
१९९४ पासून चित्रपटीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या डॅनी बॉईलने चित्रपटांचे अनेक प्रकार हाताळले असले, तरी त्या सर्वांवर त्याने स्वतःचा ठसा सोडलेला दिसतो. अतर्क्य घटनांना सामोरे जाणा-या सामान्य व्यक्तिरेखा, गुन्हेगारी किंवा नात्यांमधले संघर्ष, अशा प्रकारचे गंभीर आशय धरूनही घटनांची जवळ जवळ फार्सिकल म्हणण्य़ासारखी केलेली मांडणी. (ज्यात फार्समधला विनोद देखील अभिप्रेत आहे, पण तो मन प्रसन्न करणारा असेल याची खात्री देता येणार नाही.) कथानकाला विशिष्ट आकार देऊन निश्चित शेवटाकडे नेण्यापेक्षा कथनात आलेली गुंतागुंत आणि फसवा पण चटपटीत शेवट हे त्याचे ट्रेडमार्क त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच पाहायला मिळतात. हा पहिला चित्रपट म्हणजे शॅलो ग्रेव्ह.
अचानक धनलाभ, अन् त्यातून उदभवणारे पेचप्रसंग बॉईलने अनेकदा हाताळले आहेत. दरवेळी ते चित्रपटाच्या केंद्रस्थानी असतीलच असे नाही, मात्र पैशांचा प्लॉट पाइन्ट म्हणून वापर करणं ही त्याची नेहमीची खोड आहे. ट्रेनस्पॉटींग किंवा स्लमडॉगमध्ये याला दुय्यम महत्त्व आहे. मात्र मिलिअन्स आणि शॅलो ग्रेव्हमध्ये याचा वापर महत्त्वाचा पण प्रामुख्याने मॅकगफिन म्हणून आहे. किंवा दुस-या शब्दात सांगायचं तर पात्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, त्यांच्या प्रत्येक हालचालीला कारणीभूत ठरणारा, पण प्रेक्षकांना बिनमहत्त्वाचा.
शॅलो ग्रेव्ह हा एक गडद फार्स आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे इथला विनोद उघड नाही. छुपा, विक्षिप्त, तिरकस आहे. तो एका फ्लॅटमध्ये रहाणा-य़ा तीन मित्रांची अन् त्यांना झालेल्या अचानक धनलाभाची गोष्ट सांगतो. हे तीन मित्र आहेत अँलेक्स (इवान मॅकग्रेगर) हा पत्रकार, ज्युलिएट (केरी फॉक्स) ही डॉक्टर आणि डेव्हिड (क्रिस्टोफर एक्लेस्टन) हा अकाउंटंट. एक मुलगी आणि दोन मुलं असूनही त्यांचे संबंध पूर्ण आणि केवळ मैत्रीचे आहेत. आता या त्रिकुटाला आणखी एकाचा शोध आहे. भाड्यात भागीदार म्हणून अनेकांशी बोलल्यावर ते ह्यूगो नावाच्या माणसाला आपल्यात घ्यायचं ठरवतात. ह्यूगो येतो आणि लगेचच ड्रग ओव्हरडोसने मरतो. बरोबर एक पैशांची भरलेली सुटकेस सोडून. आता जर खरंखुरं पोलिसांना सांगितलं तर पैसे परत करावे लागणार. पण पर्याय काय, तर मृतदेह नष्ट करण्याचा. मग ही मित्रमंडळी मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करतात आणि पैसे ह़ड़प करतात. मात्र त्या क्षणांपासून त्यांचं आयुष्य बदलून जातं ते कायमचं.
शॅलो ग्रेव्हला व्यक्तीपेक्षा घटनांमध्ये आणि कथानक पुढे नेण्यापेक्षा गुंतागुंत वाढविण्यामध्ये अधिक रस आहे. हे चटकन स्पष्ट होणारं आहे. त्यातल्या व्यक्तिरेखा या टाईप्स आहेत. त्यांना खोली नाही. त्यांचा वापरही याप्रकारच्या व्यक्ती अमुक परिस्थितीत सापडल्यावर काय काय होऊ शकेल, या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी केल्यासारखा आहे. मग पटकथा या विविध शक्यता हाताळण्याचे मार्ग शोधताना दिसते. मृत माणूस ड्रग्जने गेला आणि त्याच्याकडे पैसे होते. म्हणजे तो बहुदा गुन्हेगारी वळणाचा असणार. मग तीन घटक पुढे येतात. म्हणजे खलप्रवृत्ती व्यक्ती, अशा माणसांच्या मागावर असलेले पोलीस, आणि मित्रांमधेच बेबनावामुळे वाढत चाललेली दरी, पटकथा प्रामुख्याने या तीन घटकांचा आधार घेते आणि पुढे सरकते. पटकथेचा प्रकार काहीसा एपिसोडीक आहे. जवळजवळ सेल्फ कन्टेन्ड प्रसंग मालिका एकाला एक जोडल्या सारखा, त्यामुळे येणा-या अडचणी कायम राहून तणावाची तीव्रता वाढत जात नाही. तर प्रत्येकवेळी नव्या अडचणी आणि त्यावर शोधलेले नवे उपाय असाच घटनाक्रम राहतो.
शॅलो ग्रेव्ह हा रहस्यपट नाही. त्यामुळे कथानक लपवाछपवीत वेळ काढत नाही. उलट घडणारी प्रत्येक घटना ही प्रेक्षकांसमोर घडते. या प्रकारचं तंत्र अनेकदा हिचकॉकच्या चित्रपटांतही आढळतं, जेव्हा प्रेक्षकांची व्यक्तिरेखांमधली गुंतवणूक त्याच्या शेवटापर्यंत रहस्य टिकवण्याहून अधिक महत्त्वाची वाटते. टीव्हीसाठी काम करीत असताना इन्स्पेक्टर मोर्स मालिकेवर केलेल्या कामाचा बॉईलच्या विषयांमध्ये पुन्हा पुन्हा डोकावणा-या गुन्हेगारी वळणांचा संबंध असावा, कारण विविध चित्रप्रकार हाताळूनही तो या विशिष्ट जागी परत येताना दिसतो. स्लमडॉग हे त्याचं ताजं उदाहरण.त्याचा प्रत्येक चित्रपट हा खास त्याचा असतो. हे नेहमी जाणवतं, कथासूत्रापासून छायाचित्रणापर्यंत अन् पटकथेच्या तपशीलापासून संकलनाच्या स्मार्टनेसपर्यंत सर्वत्र त्याची चाहूल लागत रहाते. शॅलो ग्रेव्ह याला अपवाद नव्हता. अन् स्लमडॉगही.
- गणेश मतकरी

Read more...

स्लमडॉग... आक्षेप हवेतच का?

>> Tuesday, February 17, 2009


स्लमडॉग... मिलेनिअरवर भारतातील दारिद्य्रदर्शनाचा आक्षेप सतत ठेवला जात आहे; पण परदेशी दिग्दर्शकांनी दारिद्य्र दाखवण्याला आक्षेप घेणाऱ्यांनी सर्व भारतीय चित्रपटात चोप्रा-जोहर पटांप्रमाणे सतत गर्भश्रीमंतीचंच दर्शन घडवण्याचा फतवा काढला तर? दिग्दर्शकाची प्रादेशिकता इतकी डोळ्यात खुपण्याची गरज काय? निव्वळ कलाकृती म्हणून या चित्रपटाकडे आपण कधी बघणार?

स्ल मडॉगने पारितोषिकासंबंधात चालवलेली घोडदौड पाहता, ऑस्करमध्येही त्यांनी चमत्कार घडवल्यास फारसं आश्‍चर्य वाटणार नाही. आपल्याकडे अजूनही चित्रपटाची वादग्रस्तता अन्‌ दर्जाबद्दल वाटणारा संभ्रम जराही कमी झालेला नाही. आणि दारिद्य्रदर्शनाचा मुद्दा हळूहळू मागे पडायला लागला असला तरी दोन मुद्दे अजूनही टिकाव धरून आहेत. एक म्हणजे या पारितोषिकांचा भर वाढत चाललेल्या भारतीय बाजारपेठेला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येत असावा का (जसा तो सौंदर्यस्पर्धांबाबत करण्यात आल्याचं मानलं जातं)? अन्‌ दुसरा म्हणजे, हा चित्रपट म्हणजे हा चित्रपट जसाच्या तसा आपल्या दिग्दर्शकाने केला असता तर त्याचं याच प्रमाणात कौतुक झालं असतं का?
हे दोन्ही मुद्दे संदिग्ध आहेत अन्‌ त्याचं कोणत्याही एका बाजूने दिलेलं उत्तर दुसऱ्या बाजूचं मत असणाऱ्यांना नाराज करणारं असेल हे उघड आहे. तरीही मी माझं मत मांडायला काहीच हरकत नाही.
गेल्या काही वर्षांत भारताबद्दल पाश्‍चात्त्यांना वाटणारं आकर्षण वाढतं आहे हे उघड आहे. वॉर्नर / फॉक्‍स यांसारखे हॉलिवूड स्टुडिओज आता निर्मितीत रस घ्यायला लागले आहेत, आपले ओव्हरसीज राइट्‌स तेजीत आहेत, तारे-तारकांना जागतिक ओळख मिळते आहे, "मुला रूज'सारखे बॉलिवूड मसाल्यापासून स्फूर्ती घेणारे अन्‌ आपली गाणी सर्रास वापरणारे हॉलिवूड चित्रपट काही कमी नाहीत. मात्र हे असण्याने त्यांना आपल्याविषयी वाटणारं कुतूहल खरंखुरं अन्‌ वाढणारं आहे, हे सिद्ध होतं. पारितोषिकं "फिक्‍स्ड' आहेत असं नाही.
डॅनी बॉइलने आपल्या आवडत्या आशयसूत्रांना बॉलिवूड मसाल्यात घालून "स्लमडॉग'ची संकल्पना बनवल्याचं मी गेल्या लेखात तपशिलात लिहिलंच होतं. बॉलिवूड मसाला जरी परदेशात लोकप्रिय होऊ घातला असला तरी आजवर बंदिस्त, आटोपशीर, परदेशात आवडणारे घटक घेणारा पण लांबण न लावणारा चित्रपट त्यांना पाहायला मिळाला नव्हता. त्यांच्या भाषेत तर नाहीच नाही. तो पाहण्याची संधी स्लमडॉगने त्यांना उपलब्ध केली. त्याचबरोबर आपल्याकडे बॉइलची शैली मोठ्या प्रमाणात माहीत नसली तरी ऑस्करसाठी मतदान करणाऱ्या ऍकॅडमी मेंबर्सना- जे सगळे चित्रपट क्षेत्रातलेच आहेत- अन्‌ बॉइलचं नाव गेल्या काही वर्षांत सातत्याने लक्षवेधी ठरलेलं आहे, तर त्यांना हे नाव अन्‌ त्याची कामगिरी नक्कीच माहिती असेल, हे उघड आहे. त्यामुळे ही भेळ कसली आणि किती प्रमाणात आहे, हे त्यांना स्पष्ट कळलं असल्यास आश्‍चर्य वाटू नये. साहजिकच त्यांच्या दृष्टीने स्लमडॉग हा खास वेगळा चित्रपट आहे. "त्यांच्यासाठी वेगळा' त्यामुळे त्याने अचानक येऊन ही भारंभार नामांकनं मिळवणं हे आश्‍चर्य वाटण्यासारखं नाही. या प्रकारचे चित्रपट सतत येऊ लागले तर ही नवलाई पटकन संपेल. मात्र या खेपेला या चित्रपटाचं नशीब चांगलं होतं, एवढंच.

मघाशी निघालेला दुसरा मुद्दा होता तो "आपल्या दिग्दर्शकाने हाच चित्रपट काढला असता तर त्याचं कौतुक झालं असतं का,' असा. मला वाटतं हा मुद्दा थोडा "जर आत्याबाईला मिश्‍या असत्या...' छापाचा आहे. कारण जर-तरचाच युक्तिवाद करायचा तर आपण तो कोणत्याही चित्रपटाविषयी करू शकतो. या विशिष्ट चित्रपटाबद्दल बोलायचं, तर आपल्या दिग्दर्शकाने हाच चित्रपट काढला असता, या गृहीतकाचाच गोंधळ आहे. आपल्या काही दिग्दर्शकांनी "क्‍यू अँड ए'चे हक्क मिळवण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र चॅनेल फोरने हक्क आधीच घेतलेले होते. तरीही त्यांना जरी हक्क मिळते, तरी त्यांनी असाच चित्रपट केला असता असं म्हणणं, हेच फारसं योग्य नाही. कारण मुळात ही कादंबरी अन्‌ चित्रपट यांच्यात प्रचंड फरक आहे. क्वीझ शोमध्ये विचारलेल्या प्रश्‍नांच्या निमित्ताने एका मुलाचं आयुष्य समोर उभं करणं हे गिमिक आणि घटनांची तीन पातळ्यांवर होणारी मांडणी, या दोन प्रमुख गोष्टी सोडता इथं फार कमी साम्यस्थळं आहेत. पुस्तक भडक आणि गल्लाभरू प्रकारचं आहे. माझ्या मते चित्रपट तसा नाही. चित्रपटातला जमालचा भूतकाळ जवळजवळ चरित्रात्मक पद्धतीने एका मालिकेचे तुकडे असल्यासारखा उलगडत जातो. पुस्तकातल्याप्रमाणे सुट्या घटना सांगितल्यासारखा नाही. इथे विनोदाला असलेलं स्थान, घटनांचं एकमेकांत मिसळणं, ही पटकथाकार सायमन ब्युफोयची किमया आहे आणि तांत्रिक बाजूंवरलं प्रभुत्व, चित्रपटाचा दृष्टिकोन, त्यातला दृश्‍य शैलीचा आविष्कार हा बॉइलकडून आलेला आहे. त्यामुळे चित्रपटातलं दोघांचं योगदान वगळून हा दुसऱ्या कोणी केला असता असं म्हणणं चुकीचंच नाही, तर या दोघांना अपमानास्पद आहे.
याचा अर्थ असा नाही, की आपल्या दिग्दर्शकांनी या कादंबरीवरून चांगला चित्रपट केला असता. जरूर केला असता, मात्र तो पूर्णपणे वेगळा चित्रपट असता. अन्‌ याच कारणाने तो सन्मानप्राप्त ठरला असता व नसता याबाबत आपण कोणतेही निष्कर्ष काढू शकत नाही.
एका गोष्टीची मात्र गंमत वाटते. दिग्दर्शकाची प्रादेशिकता ही आपल्या इतकी डोळ्यात खुपण्याची काय गरज आहे? आपण एक कलाकृती म्हणून त्यांच्याकडे पाहू शकत नाही का? छोट्या जमालने संडासात उडी घेण्याच्या प्रसंगाला सर्वाधिक आक्षेप घेतलेले दिसतात, मात्र बॉइलने तो आपलं दारिद्य्र दाखवण्यासाठी घातला असावा, हा निष्कर्ष कुठून आला? त्याच्या ब्रिटिश नायकांना तो फार श्रीमंतीत लोळवत असेल असा विचार करणाऱ्यांनी "ट्रेनस्पॉटिंग'मध्ये इवान मॅकग्रेगरने कमोडमध्ये केलेला भासमय जलविहार जरूर पाहावा. (बॉइलने स्वतःही एका मुलाखतीत ब्रिटिशांना असलेल्या टॉयलेट्‌सच्या ऑब्सेशनबद्दल सांगितलंय.)
शिवाय आपले दिग्दर्शकदेखील अखेर चित्रपटाची गरज भागेलशीच दृश्‍यं मांडतात ना? प्यासा किंवा पथेर पांचालीतली गरिबीची वर्णनं अन्‌ सत्या किंवा कंपनीतलं अंडरवर्ल्डचं चित्रण आपण वास्तवदर्शन म्हणूनच पाहतो ना? उद्या परदेशी दिग्दर्शकांनी दारिद्य्र दाखवण्याला आक्षेप घेणाऱ्यांनी सर्व भारतीय चित्रपटांत चोप्रा-जोहर पटांप्रमाणे गर्भश्रीमंतीचं दर्शन सतत घडवण्याचा फतवा काढला तर?
असो. शेवटी स्लमडॉग आवडणं किंवा न आवडणं हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अन्‌ दृष्टिकोनावर अवलंबून आहे. माझं एकच म्हणणं आहे, ज्या कारणांसाठी आवडला, वा आवडला नाही, ती कारणं तरी योग्य आहेत ना? कलाकृतीकडे कलाकृती म्हणून पाहणारी... यामध्ये आंतरराष्ट्रीय विवाद न आणता!
-गणेश मतकरी

Read more...

स्लमडॉग मसाला असूनही "टिपिकल बॉलिवूडपट' का नाही? (बॉईल-२)

>> Tuesday, February 10, 2009


स्लमडॉग मिलिअनेअरचं प्रदर्शन हे आपल्या प्रेक्षकांकडून मिक्‍स्ड रिऍक्‍शन्स मिळवणारं ठरेल, याची कल्पना होती आणि झालंही तसंच. मात्र रिऍक्‍शन्समधला चढ-उतार हा केवळ प्रेक्षकांपुरताच मर्यादित नाही, तर समीक्षकांची अवस्थाही काहीशी अशीच आहे.
या तुलनेने छोट्याशा, लो बजेट निर्मितीने प्रमुख चार गोल्डन ग्लोब ऍवॉर्डस मिळवून आणि आता एकदम दहा विभागांमध्ये ऑस्कर नामांकन मिळवून जगभरातल्या लोकांना तर चकित केलं आहेच, वर आपल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप प्रमाणात वाढवून ठेवल्या आहेत. या अपेक्षांचा परिणाम म्हणजे "स्लमडॉग'चा प्रत्येक प्रेक्षक हा चित्रपट कसा असेल, याच्या काही ना काही पूर्वकल्पना डोक्‍यात घेऊनच जातो आणि या कल्पनांचं ओझं त्याच्या मोकळेपणी रसास्वाद घेण्याच्या आड येत असेल यात शंका नाही. असो.
एकूण प्रतिक्रिया पाहता, "हा ग्रेट सिनेमा आहे' इथपासून ते "तो हायली ओव्हररेडेड आहे' इथपर्यंत सर्व प्रकारचे निकाल प्रेक्षकांनी लावल्याचं दिसतं आणि "हा परदेशी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून बनवलेला चित्रपट आहे' इथपासून ते "बॉलिवूडचा आत्मा डॅनी बॉईलला अचूक गवसला आहे' इथपर्यंत सर्व प्रकारचे निष्कर्ष या दरम्यान निघालेले दिसतात. या निकालांच्या अन्‌ निष्कर्षांच्या अनुषंगाने "स्लमडॉग मिलिअनेअर'कडे पाहता, काही प्रश्‍न मनात उभे राहतात.
यातला सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा? स्लमडॉग पाहून लक्षात येणारी एक उघड गोष्ट म्हणजे त्याच्या पटकथेत बॉलिवूडच्या मसालापटांमधले अनेक घटक पाहायला मिळतात. आज हा चित्रपट पाहिलेल्या अन्‌ न पाहिलेल्या सर्वांनाच त्याचं थोडक्‍यात कथानक माहीत आहे. जमाल मलिक (देव पटेल) या गरीब मुलाचा "हू वॉन्ट्‌स टू बी ए मिलिनेअर?' मधला सहभाग आणि त्यात विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांच्या निमित्ताने उलगडत गेलेला त्याचा भूतकाळ दाखवणारा हा चित्रपट ढोबळ रचनेत अन्‌ तपशिलातही अतिशय बॉलिवूडिश आहे. अशक्‍य योगायोग, क्‍लीशे यांना त्याच्या कथेत महत्त्वाचं स्थान आहे. चित्रपटाच्या सुरवातीलाच दाखवण्यात येणाऱ्या KBC स्टाईल प्रश्‍नाने अन्‌ त्याच्या संभाव्य उत्तरांमधून पुढे येणारा अशक्‍य सुखान्त सुचवला जातो आणि बॉलिवूड मसालापटांची एकेक स्टेशनं घेत कथा पुढे सरकायला लागते. लहानपणचं प्रेम, खलनायकांनी घडवलेली तद्दन नाट्यपूर्ण ताटातूट, कोठ्यावरून सुटका, जमाल आणि त्याचा भाऊ सलीम यांच्यात घडणारं परस्परविरोधी प्रवृत्तीचं दर्शन, आठवणीनं जपलेलं प्रेम अन्‌ घेतलेले बदले यातल्या कोणत्याच गोष्टी म्हटलं तर वास्तवाशी सुसंगत नाहीत. थेट शेवटच्या "जय हो' गाण्यापर्यंत हा चित्रपट आपल्या ट्रेडमार्क चित्रप्रकाराची वैशिष्टें मांडतो. मग या चित्रपटात अन्‌ बॉलिवूडच्या इतर कोणत्याही चित्रपटात फरक काय? तर आहे. बॉलिवूडच्या अतिनाट्यपूर्ण शैलीच्या उलट दिशेने जाणारा एक वास्तववादी प्रवाह इथे सतत आढळतो, जो डॅनी बॉईलच्या चित्रपटांशी नातं सांगतो.
डॅनी बॉईलनं फॅन्टसी (ए लाईफ लेस ऑर्डनरी), सायन्स फिक्‍शन (सनशाईन), गुन्हेगारी (शॅलो ग्रेव्ह, ट्रेनस्पॉटिंग) असे अनेक प्रकारचे चित्रपट त्या त्या चित्रप्रकारांच्या सर्व वैशिष्ट्यांसह हाताळले असले तरी त्याचा प्रत्येक चित्रपट हा त्याची स्वतःची काही वैशिष्ट्यं मांडतो. याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रत्येक चित्रपट हा सामान्य माणसांना असामान्य परिस्थितीत आणून सोडणारा अन्‌ त्या परिस्थितीत ती कशी रिऍक्‍ट करतात हे चित्रित करणारा असतो. कथानकाकडे अन्‌ व्यक्तिरेखांकडे पाहण्याची बॉईलची एक तिरकस दृष्टी आहे, जी त्याच्या चित्रपटांना एक विनोदाची झालर आणून जोडते. हा विनोद- ज्याला आपण ब्लॅक ह्यूमर म्हणू, अशा तऱ्हेचा गडद असतो आणि तो कथानकातली सिच्युएशन अन्‌ व्यक्तिरेखांचे स्वभाव या दोन्हीशी निगडित असतो, चिकटवलेला न वाटणारा.
तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हिंसाचार. स्कोर्सेसीने ज्या प्रकारे हॉलिवूडमध्ये राहून हिंसाचाराचं एक प्रक्षोभक रूप घडवत नेलं त्याच प्रकारचा धीट प्रयत्न युरोपीय पार्श्‍वभूमीवर बॉईलने केलेला दिसतो. फरक हा, की स्कोर्सेसीच्या बहुतेक व्यक्तिरेखा या मुळातच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या असतात. याउलट बॉईलच्या व्यक्तिरेखांचं हिंसा जवळ करणं, हे अपघाती असतं. तिथं सराईतपणा नसून, अचानक आलेली ऊर्मी असते; बऱ्याचदा नाइलाजानं अन्‌ जिवाच्या आकांतानं चढवलेला हल्ला दिसतो.
स्लमडॉग पाहताना जाणवतं, की बॉईलनं इतर चित्रप्रकारांना जशी आपल्या शैलीची जोड देऊन हायब्रीड सिनेमा बनवला, तसाच प्रयत्न त्यानं स्लमडॉगमध्येही केला आहे. बॉलिवूड वैशिष्ट्यांबरोबरच आता सांगितलेली त्याच्या चित्रपटांची आशयाच्या पातळीवरची वैशिष्ट्यं स्लमडॉगमध्ये दिसून येतात. दारिद्य्राचं अंगावर येणारं दर्शन, भिकारी मुलाला आंधळं करण्यासारखे धक्कादायक प्रसंग, पोलिसांनी जमालला टॉर्चर करण्यासारख्या जागाही इथं वेळोवेळी येतात. आशावादी फॅन्टसी आणि जळजळीत वास्तव यांच्याकडे एकत्रितपणे पाहत स्लमडॉग आकार घेतो. त्यामुळेच धक्कादायक प्रसंग अनुभवतानाही प्रेक्षक त्याचं "फीलगुड' असणं विसरू शकत नाही, अन्‌ जमालच्या यशाच्या चढत्या कमानीच्या आनंदात सहभागी होतानाही त्याच्या भूतकाळातले धक्के आपल्या जाणवत राहतात. हे टेक्‍श्चर हा स्लमडॉग मिलिअनेअरचा खरा वेगळेपणा आहे, जो त्याला टिपिकल बॉलिवूडपट बनू देत नाही.
स्लमडॉगचा अपेक्षित प्रेक्षक हा भारताबाहेरचा आहे, हा आणखी एक लोकप्रिय आरोप. माझ्या मते, प्रत्येक चांगला दिग्दर्शक हा स्वतःच्या डोळ्यांसमोरच्या आयडिअल प्रेक्षकासाठी चित्रपट बनवतो आणि तोही स्वतःच्या दृष्टिकोनाशी प्रामाणिक राहून. दिग्दर्शकाची ही शैली प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे जाणण्याची क्षमता असणारा प्रेक्षक हा त्या चित्रपटाचा योग्य प्रेक्षक- तो कोणत्या देशाचा, हा मुद्दा गौण आहे. स्लमडॉगबाबत हा मुद्दा काढला जातो, कारण हा चित्रपट ब्रिटिश दिग्दर्शकाने बनवला, आणि व्यावसायिक चित्रपटांची पंढरी असणाऱ्या हॉलिवूडमध्ये तो सन्मानपात्र ठरला. मात्र ही पारितोषिकं विसरून जर आपण तो बॉईलच्या शैलीशी प्रामाणिक आहे का, या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर होकारार्थी मिळेल. त्यामुळे बॉईलचे विचार, त्याची दृष्टी पटणारा प्रेक्षक हा स्लमडॉगचा प्रेक्षक! त्यातला काही भारतात असेल, काही भारताबाहेर.
स्लमडॉगमधल्या दारिद्य्राच्या दर्शनाला आणि "स्लमडॉग' या शब्दाचा झालेला विरोध तर फारच गमतीदार आहे. प्रमुख पात्राची गरिबी आणि या व्यक्तिरेखेचं दबलेलं असणं, "अंडरडॉग' असणं स्लमडॉग या शब्दातून दिसून येतं. ही काही शिवी नाही, त्यामुळे मुळात इथं विरोध करण्याचीच गरज नाही. आता राहिला प्रश्‍न दारिद्य्रदर्शनाचा, तर यातला कुठलाच भाग हा खोटा, रंगवलेला म्हणावासा नाही. गरिबी, मुलांवर येणारी संकटं, दंगली, भिकारी बनवण्याच्या यंत्रणा, वेश्‍या व्यवसाय या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. आपल्या माहितीच्या आहेत. त्यातल्या अनेक आपण आपल्याच चित्रपटांतून पाहिलेल्याही आहेत. इथलं चित्रण थोडं अधिक थेट असेल; पण त्यामुळे ते खोटं ठरत नाही. त्यातून चित्रपट या व्यक्तिरेखांचा, समाजाच्या या स्तराचा अपमान करू इच्छित नाही. तो त्यातल्याच तिघांना आपले नायक म्हणून उभे करतो. त्यांचा आपापल्या उत्कर्षबिंदूपर्यंतचा प्रवास दाखवतो. मग आपल्याला खटकतं ते नेमकं काय?
स्लमडॉगमधल्या एका व्यक्तिरेखेच्या चित्रणाबद्दलही अनेक आक्षेप घेतले गेलेले मी ऐकतो. ही व्यक्तिरेखा आहे, त्यातल्या नकारात्मक भूमिका करणाऱ्या क्विझ शो होस्टची. अनिल कपूरने उभी केलेली ही व्यक्तिरेखा खरं तर विशेष अशासाठी आहे, की प्रत्यक्ष चित्रपटाचा बराच भाग ती केवळ कार्यक्रमाचं संचालन करते. तिला असलेल्या नकारात्मक छटा पुढे येतात, त्या कॅमेऱ्यापुढे अन्‌ मागे तिने केलेल्या शेरेबाजीतून, टॉयलेटमध्ये घडणाऱ्या एका प्रसंगातून आणि अनिल कपूरच्या मुद्राभिनयातून अतिशय मर्यादित फूटेज अन्‌ संवादातून हा खलप्रवृत्तीचा आविष्कार करणं, हे उत्तम पटकथा/ संवाद/ दिग्दर्शन अन्‌ अभिनयाचं लक्षण आहे. इथं अनेकांचा विरोध आहे तो श्रीमंत टॉक शो होस्टला गरीब जमालबद्दल वाटणाऱ्या इर्ष्येला. या जेलसीचं काय कारण, असा प्रश्‍न हे विरोधक विचारताना दिसतात. गंमत म्हणजे खरोखरच असं एखादं कारण पटकथेनं उपलब्ध करून दिलं असतं (उदाहरणार्थ जमालच्या वडलांच्या मृत्यूला प्रेमकुमार जबाबदार होता वगैरे) तर हीच व्यक्तिरेखा आपण जशीच्या तशी मान्य केली असती. प्रत्यक्षात असे हेवेदावे पाळले जाण्यातला बेगडीपणा नजरेआड करून केवळ समीकरणाच्या पातळीवर पात्रांचा जमाखर्च बसवून. मात्र सायमन ब्युफॉयची पटकथा व्यक्तिरेखेला अधिक जिवंत करते. विरोधाचं कारण हे या व्यक्तीच्या मानसिकतेतच दाखवते. तिची स्वतःची पार्श्‍वभूमी गरिबीतून वर आलेलं असणं, स्वतःच्या आजच्या स्तराचा अभिमान, खालयांनी खालीच राहावं अशी मनाची जडणघडण, ही या मोजक्‍या जागा स्पष्टपणे दाखवून देतात, अन्‌ भूतकाळातली स्वतंत्र कारणं देण्याची गरज भासत नाही. निदान मला तरी भासली नाही.
"स्लमडॉग मिलिअनेअर' डॅनी बॉईलचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, असं मी नक्कीच म्हणणार नाही. माझ्या दृष्टीनं तरी तो मान गोल्डन ग्लोबदेखील न मिळू शकलेल्या "ट्रेनस्पॉटिंग'कडे जाईल. मात्र स्लमडॉग हा प्रयत्न प्रामाणिक आहे. मला तरी त्यात हिशेबीपणाचा वास येत नाही. त्याची निर्मिती ही दिग्दर्शकाच्या आधीच्या कामाशी सुसंगत आहे. त्याला मिळालेला मानसन्मान अन्‌ त्या निमित्तानं आपल्या चित्रपटसृष्टीकडे वेधलं गेलेलं आंतरराष्ट्रीय चित्रपट जगताचं लक्ष, हा मात्र एक योगायोग आहे. त्यातल्या गरीब पण सज्जन नायकाला अचानक झालेल्या धनलाभासारखाच चांगला पण अनपेक्षित योगायोग!
-गणेश मतकरी

Read more...

ड्रग अ‍ॅडीक्ट्सच्या नजरेतून ( डॅनी बॉईल-१)

>> Friday, February 6, 2009


काही चित्रपट विशिष्ट व्यक्तींच्या नजरेतून सांगितले जातात आणि वेगळे ठरतात. न्यूझिलंडचा हेवनली क्रिचर्स मनोरुग्णांच्या नजरेतून सांगितला गेल्याने वेगळा वाटतो तसाच काहीसा प्रकार इंग्लंडच्या ट्रेनस्पॉटींगमध्ये पाहायला मिळतो. मात्र इथलं जग हे मनोरुग्णांचं नसून ड्रग अ‍ॅडीक्ट्सचं आहे.
ड्रग अ‍ॅडीक्ट्सबद्दल लिहिलं गेलेलं साहित्य किंवा या विषयावर आधारित चित्रपट हे कायम व्यसनाधीन मंडळींकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून पाहत आलेले आहेत. या साहित्यकृती वा चित्रपटांचे कर्ते या मंडळींचं चित्रण काहीसं त्रयस्थपणे आणि थोडंफार दयाबुद्धीने करताना दिसतात. इथे मात्र तसं होत नाही. दिग्दर्शक डॅनी बाईलचा ट्रेनस्पॉटींग प्रेक्षकाला अ‍ॅन्टी ड्रग उपदेशाचे थेट डोस न पाजता, या व्यसनी विश्वाचा एक फेरफटका ड्रग अ‍ॅडिक्ट्सच्या नजरेतूनच घडवतो आणि निष्कर्षाचं काम प्रेक्षकांवरच सोडतो. निष्कर्ष हा ड्रगविरोधी आहे, मात्र त्यापर्यंत पोचताना व्यसनाच्या आहारी जाणा-यांची मनस्थिती हेरॉईनसारखे अमली पदार्थ वापरण्यातला त्यांचा आनंद (टेक द बेस्ट ऑरगॅझम यू एव्हर हॅड, मल्टीप्लाय बाय १०००,अ‍ॅन्ड यू आर स्टील नोव्हेअर निअर इट)
नाईलाजातून वाढणारी सहकाराची वृत्ती, अशा एरवी ऐकायला- पाहायला न मिळणा-या घटकांकडे दुर्लक्ष केलं जात नाही, ते चित्रपट एकांगी नसून दोन्ही बाजूंचा विचार करू पाहत असल्याने या भूमिकेचा तोटा असा की ट्रेनस्पॉटींग सर्वत्र वादग्रस्त ठरला. यु.के, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये त्यावर व्यसनाच्या बाजूचा असल्याचे आरोप झाले आणि त्याबरोबरच व्यसनविरोधी म्हणून त्याच आरोपांचं खंडन करणारेही पुढे आले. अर्थात नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी या न्यायाने चित्रपट मुख्य धारेतून आला आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
ट्रेनस्पॉटींग आयर्विन वेल्शच्या कादंबरीवर आधारित आहे. त्याचं नाव वेगळं आणि पटकन लक्षात राहणारं असल्याने चांगलं असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष आशयाशी काहीही संबंध नाही. ट्रेनस्पॉटींग या ट्रेन्सची सगळ्या प्रकारची माहिती करून घेण्याच्या छंदाचा एक छोटा संदर्भ पुस्तकात येतो, चित्रपटात तोही नाही. मात्र नाव मूळ कादंबरीचंच ठेवण्यात आलं आहे. इथलं प्रमुख पात्र आणि निवेदक आहे मार्क रेन्टन (इवान मॅकग्रेगर), मार्क हेरॉईन अ‍ॅडीक्ट आहे, पण वेळप्रसंगी कोणतीही नशा त्याला चालते. मार्कचं व्यसन हे म्हटलं तर आयुष्य चांगल्या रीतीने जगण्याचा तथाकथित मध्यमवर्गीय कल्पनांविरुध्द केलेलं बंड आहे. पण केवळ तेवढंच नाही. अमलाखाली असतानाच्या स्वर्गीय सुखालाही तो विसरू शकत नाही. दुर्दैवाने अंमल कायम टिकत नाही आणि पुढल्या नशेसाठी लागणा-या पैशाची चिंता आणि अंमल उतरल्यावर होणारा त्रास या त्याच्या मुख्य अडचणी कायमच राहतात. मार्कचं, एक त्याच्यासारख्याच गयागुज-या मुलांचं मित्रमंडळ आहे. स्पड (इवन ब्रेमनर) हा काहीसा लाजाळू अर्धवट मुलगा, टॉमी (केवीन मॅककिड) हा व्यसनाच्या कल्पनेनेच झपाटलेला तरुण, सिक बॉय (जॉनी ली मिलर) हा शॉन कॉनरीच्या बॉण्डपटाचा चाहता असलेला भुरटा चोर आणि बेगबाय (रॉबर्ट कार्लाईल) हा निर्व्यसनी पण माथेफिरू गुंड असं हे टोळकं आहे. त्यांचं व्यसन हा त्यांच्यातला समान धागा आहे, ज्यामुळे त्यांची मैत्री चिरकाल टिकणारी झाली आहे.
ट्रेनस्पॉटींगचं विशेष म्हणजे या ज्वलंत गंभीर विषयाचा त्यांनी घेतलेला विनोदाचा आधार, तरीही राखलेलं गांभीर्य, चित्रिकरणातली प्रचंड गती आणि ऊर्जा, त्याबरोबर व्यसनाच्या दृष्टचक्राला सर्व बाजूंनी दाखवून साधलेला परिणाम. या चित्रपटाला म्हणावी तशी कथा नाही, मात्र आलेख आहे. ड्रग अ‍ॅडिक्ट्सच्या आयुष्यात येणारे टप्पे आणि त्यांनी बाहेर पडण्याचे केलेले फोल प्रयत्न दिग्दर्शकाला आपल्यापर्यंत आणायचे आहेत. त्यामुळे चित्रपटाची सुरुवात त्यांनी मार्कच्या व्यसनमुक्त होण्याच्या प्रयत्नापासून केली आहे. व्यसनमुक्तीचा प्रयत्न, या प्रयत्नादरम्यानचा त्रासदायक काळ, सर्व प्रश्नांचं सोपं उत्तर असलेल्या ड्रगबद्दलचं वाढतं आकर्षण,एखादा कमजोर क्षण आणि पुन्हा या चक्रात अडकणं, हीच म्हटली तर यातल्या व्यक्तिरेखांची गोष्ट म्हणता येईल.
प्रत्यक्ष विषयात गडदपणा असूनही ट्रेनस्पॉटींग कुठेही करुण होत नाही. यातल्या व्यक्तिरेखांवर आलेले बिकट प्रसंगही तो काहीशा तिरकस दृष्टीक्षेपात मांडतो. मार्कची (स्कॉटलंडमधल्या सर्वात वाईट) टॉयलेटमधील उडी, स्पडने मैत्रिणीकडचा बिछाना खराब करणं यासारखे प्रसंग, हे या पात्रांसाठी खरंतर लज्जास्पद आहेत. पण एकदा का हा चित्रपट त्यांच्याच नजरेतून असणं गृहीत धरलं, तर यातल्या कोणत्याच गोष्टींकडे तो पुरेशा गंभीरपणे का पाहत नाही, हे उघड होतं. ट्रेनस्पॉटींगचा शेवट हा जाणूनबुजून दाखविलेल्या एका खोट्या आशावादावर आहे. एका व्यक्तिरेखेने पुन्हा शपथेवर ड्रग्ज सोडून चारचौघांसारखं आयुष्य जगण्याला सुरुवात करण्याच्या बाता शेवटी मारल्या जातात. मात्र त्याचवेळी या पात्राच्या खांद्यावरती खूपशा पैशांची बॅग आणि त्याने हाती घेतलेल्या हेरॉईनची शुद्धता पाहण्यासाठी नुकतीच केलेली नशा आपल्याला वेगळंच चित्र दाखविते. व्यसनाधीन व्यक्तींच्या मनातल्या इच्छा मात्र प्रत्यक्ष आयुष्यातली व्यसनाची गुलामी हे विदारक चित्र ट्रेनस्पॉटींग कोणताही आव न आणता आणि स्वतःकडे मोठेपणाची भूमिका न घेता रंजक करून सांगतो, ही त्याची खासियत म्हणावी लागेल.
-गणेश मतकरी

Read more...

एक होती राणी

>> Wednesday, February 4, 2009

श्रीमंत घरात वाढलेला नायक आणि गरीब घरची नायिका यांचं प्रेम हा आपला आवडता विषय! आपला म्हणजे आपल्या हिंदी चित्रपटांचा. भिन्न आर्थिक, सामाजिक स्तरांवरच्या या दोन तरुण व्यक्तिमत्त्वांनी एकत्र यायचं, घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यायचं, लग्न करायचं आणि मग काय, हॅपीली एव्हर आफ्टर आहेच! अर्थात, या हॅपीली एव्हर आफ्टरचा गोंधळ असा असतो, की ते प्रत्यक्षात कधीच येत नाही. वास्तवात ही प्रकरणं किती चिघळू शकतात, याचं टोकाचं उदाहरण म्हणजे ब्रिटिश राजघराण्यातला वारस प्रिन्स चार्ल्स आणि त्याची मध्यमवर्गातून आलेली पत्नी डायना यांचा विवाह.
डायनाचा परिकथेत शोभावा असा विवाह हे ब्रिटिश जनतेसाठी आणि काही प्रमाणात जगभरच्या लोकांसाठीही, अशक्य वाटणारी स्वप्नं प्रत्यक्षात येण्याचंच उदाहरण होतं; मात्र हे स्वप्न टिकलं नाही. सुरवातीचा काही काळ सुखाचा गेल्यावर आणि चार्ल्स-डायनाचे हसरे फोटो पाहायची सवय झाल्यावर, त्यांच्या कुरबुरीही प्रसिद्धिमाध्यमांमधून लोकांपर्यंत पोचायला लागल्या. दोघांचीही स्वतंत्र प्रकरणं बाहेर यायला लागली. राजघराण्याची तीव्र नापसंतीही स्पष्ट दिसायला लागली आणि त्याची पर्वा डायनाला नसल्याचंही समोर आलं. लवकरच डायनानं परिकथेतील राजकन्या या इमेजचा त्याग केला आणि स्त्रीवादी भूमिकेत ती शिरली. घटस्फोटानंतरही डायनाची राजघराण्याला टक्कर देणारी एक स्वतंत्र विचारांची मुक्त स्त्री ही प्रतिमा कायम राहिली आणि लोकांच्या मनातलं तिचं महत्त्व वाढत गेलं. प्रसिद्धिमाध्यमांनी ही प्रतिमा उचलून धरली. तिच्या लहानसहान वागण्याबोलण्याला सामाजिक कार्यांमधल्या सहभागाला, किंवा तिच्याशी नव्यानं जोडल्या जाणाऱ्या नावांनाही महत्त्व दिलं आणि अखेर तिच्या 1997 मधल्या अनपेक्षित अपघाती मृत्यूलाही कारणीभूत ही माध्यमंच ठरली. डायनाचे राजघराण्याबरोबर असलेले संबंध आणि तिची लोकांमधली अमर प्रतिमा ही पार्श्वभूमी एका चित्रपटात वापरली गेलीय. चित्रपटांचं नाव "द क्वीन', दिग्दर्शक स्टीफन फ्रेअर्स.
क्वीनमध्ये डायना ही फक्त पार्श्वभूमीपुरती असली, तरी तिचं हे गैरहजर व्यक्तिमत्त्व चित्रपटातल्या संघर्षाला कारणीभूत आहे आणि तिच्याबद्दल काहीच माहिती नसेल (हे तसं कठीणच!) तर चित्रपट प्रभावहीन वाटेल. चित्रपट घडतो 1997 मध्ये टोनी ब्लेअर पंतप्रधानपदी निवडून आल्यावर काही महिन्यांनी. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूपासून ते तिच्यावर लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या अंत्यसंस्कारांपर्यंतच्या कालावधीत. यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी (हेलन मिरेन) आणि पंतप्रधान टोनी ब्लेअर, (मायकेल शीन).
बकिंगहॅम पॅलेस आणि 10 डाऊनिंग स्ट्रीट यांसारख्या प्रतिष्ठित घरांमधल्या रहिवाशांना आणि त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये नाट्य शोधणाऱ्या या चित्रपटाला कुठल्या लेखी पुराव्याचा वा साक्षीदाराचा आधार आहे का, हे मी सांगू शकणार नाही; मात्र हे जरूर सांगू शकेन, की दिग्दर्शक कुठंही घटना वादग्रस्त वा अतिरंजित करण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच्या पात्रांना त्याची पूर्ण सहानुभूती आहे. त्यांच्याबद्दल त्याला आदर आहे; पण या पात्रांच्या जनमानसातल्या प्रतिभांनी तो दबून जात नाही.
चित्रपट सुरू होतो, तो टोनी ब्लेअरच्या निवडणूक जिंकण्यापासून. परंपरेप्रमाणे सरकार स्थापन करण्याचा आदेश घेण्याच्या निमित्तानं त्याची राणीशी भेट होते. प्रथमदर्शनी दोघांचंही एकमेकांबद्दल फार बरं मत होत नाही. पटकथा यानंतर उडी घेते ती डायनाच्या मूत्यूपर्यंत. डायनाच्या प्रेमानं हळव्या झालेल्या जनतेला राणीचं अशाप्रसंगी शोक व्यक्त न करणं खटकतं आणि दिवसागणिक जनतेचा संताप वाढायला लागतो. आपल्याला न जुमानणाऱ्या अन् आता राजघराण्याचा भाग न उरलेल्या व्यक्तीला असा जाहीर मान देणं राणीच्या तत्त्वात बसत नाही आणि आपल्या प्रजेचा राग- लोभदेखील समजू न शकणारी राणी या आवेगापुढे हतबल होते. टोनी ब्लेअर मात्र डायनाला पीपल्स प्रिन्सेस म्हणून मान देतो आणि त्याची लोकप्रियता आकाशाला भिडते; मात्र ब्रिटिश राजकारणातला सरकार अन् राजघराण्यातला तोल सांभाळणं फार गरजेचं असतं. तो सांभाळण्याची जबाबदारी न मागताच ब्लेअरवर येऊन पडते आणि स्वतःबरोबरच राणीनं काय करायला हवं याची तो गणितं मांडायला लागतो.
क्वीनला पटकथा आहे, जी चांगली रचलीदेखील आहे; पण कथा म्हटली तर जवळजवळ नाहीच. त्याचा भर आहे तो त्यातल्या दोन प्रमुख व्यक्तिचित्रांवर. राणीसारख्या उत्तुंग स्थानावर विराजमान झालेल्या व्यक्तीच्या भावनाही अखेर कशा मानवीच असतात, असं सांगून दिग्दर्शक राजघराण्याला एक ओळखीचा चेहरा देऊ करतो; मात्र हे करताना तो असं सांगायलाही विसरत नाही, की आज राजा आणि प्रजा यांमध्ये इतकं अंतर आहे, की ते एकमेकांना धड जाणूनही घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत राजघराण्याची कालबाह्यता हादेखील एक मुद्दा उपस्थित होतो; मात्र हा अनेक मुद्द्यांमधला एक. चित्रपटाचा हेतू केवळ या प्रकारची टीका करणं, असा म्हणता येणार नाही.
राणीकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन हा ब्लेअरची व्यक्तिरेखा देऊ करते. तोदेखील आधी राणीला शिष्ट ठरवून मोकळा होतो, मग हळूहळू त्याच्या लक्षात तिच्या असं वागण्यामागची कारणं लक्षात यायला लागतात. मग स्वतःहूनच तो मदतीचा हात पुढं करतो. सुरवातीला ही मदत नाकारली जाऊनही तो आपली बाजू बदलत नाही. त्याच्या या वागण्याला थोडा स्वार्थाचा भागही आहे; पण त्यापलीकडे जाऊन तो राणीच्या शांततेला समजून घेऊ शकतो हेही खरं. त्याच्यामध्ये होणारा बदल हा चित्रपट पाहणाऱ्यांच्या मनात होणाऱ्या दृष्टिबदलाशी समांतर जाणारा आहे.
राणीला जरी डायनाचं वागणं पसंत नसलं, तरी उत्तरार्धात ती एका पातळीवर तिला समजून घेऊ शकते. लोकांचं डायनाला मानणं आणि आपल्यावर आरोप करणं हे मात्र तिला समजून घेता येत नाही. चित्रपटाच्या एरवीच्या वास्तव हाताळणीत एक प्रसंग थोडा प्रतीकात्मक वाटण्याजोगा आहे. यात राणी एकटीच ओढ्यातून जाताना जीप बंद पडते आणि मदतीची वाट पाहत एकट्याच बसलेल्या राणीला रडू आवरत नाही. मनात साचलेलं दुःख बाहेर काढताना तिला इस्टेटीवरचं एक काळवीट दिसतं. त्याच्या सौंदर्यानं आणि मुक्त रूपानं मोहून गेलेली राणी जवळ येणारे बंदुकीचे बार ऐकून त्याला पळवून लावते आणि ते वाचेल अशी आशा करते. इथं तिनं स्वतःशी केलेला शोक हा आपल्या एकाकी परिस्थितीवर केलेला शोक आहे, तर पुढं काळविटाच्या शिकारीनंतर त्याला दिलेला निरोप हा राजघराण्याच्या संपर्कानं बंदी झालेल्या; पण मुक्तीच्या वाटेवर मृत्यू न टाळू शकलेल्या डायनाला दिलेला निरोप आहे. "क्वीन'मधली कथा जरी राणीची असली, तरी ही राणी प्रातिनिधिक आहे. प्रसिद्धीच्या, सत्तेच्या शिखरावर असलेली, लोकांच्या प्रेमाला पात्रं ठरलेली कोणतीही व्यक्ती या जागी पाहता येईल. कालपर्यंत आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला आज आपण नकोसं झाल्याची या व्यक्तीला झालेली जाणीव ही इथं महत्त्वाची आहे. अखेरच्या प्रसंगात राणी टोनी ब्लेअरला देखील या जाणिवेबद्दलच सांगते आणि तुलाही ती सुटणार नाही असा इशाराही देते. गंमत म्हणजे हा इशारा अगदी वेळेवर प्रेक्षकांपुढे आला आहे. एकेकाळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठणाऱ्या ब्लेअरची परिस्थिती आज राणीहून वेगळी नाही. मधल्या काळात त्याची जनता त्याच्यापासून फार दूर गेली आहे.
चरित्रात्मक सामाजिक, सत्यघटनांवर आधारित अशा अनेक लेबलांखाली जाऊ शकणाऱ्या "द क्वीन'ची शैली ही याआधी राजघराण्यावर आलेल्या चित्रपटांहून पुष्कळच वेगळी आहे. ब्रिटिश राजकारणाची या निमित्तानं पाहायला मिळणारी झलकही वेधक आहे; मात्र ही आहे फक्त झलक. प्रत्यक्षात इथं महत्त्व ना राजकारणाला आहे ना राजेशाही थाटाला. ते आहे केवळ माणसांना. परिस्थितीनं एका विशिष्ट वळणावर येऊन ठेपलेल्या. असामान्य असूनही आपला सामान्य चेहरा पूर्णपणे विसरू न शकणाऱ्या. "द क्वीन' पाहताना हे लक्षात ठेवलं, तर हा चित्रपट विशेष लक्षवेधी वाटेल.
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP