"300' मिलरचा चित्रपट

>> Friday, August 29, 2008


इराणने "300' नावाच्या चित्रपटावर आक्षेप घेतला आणि त्याला अमेरिकेच्या मध्यपूर्वविरोधी धोरणाचा भाग असल्याचं जाहीर केलं. का, तर म्हणे स्पार्टाच्या जेमतेम 300 योद्ध्यांनी पर्शियन सम्राट झर्क्झेसच्या लक्षावधी सैनिकांशी दिलेल्या कडव्या लढ्याचं यात चित्रण आहे. शेवटी स्पार्टाला हार पत्करावी लागते तीदेखील फितुरीमुळे. त्यामुळे असं चित्रण जागतिक चित्रपटात होणं, हा पर्शियाचा- अर्थात इराणचा अपमान आहे आणि अमेरिकन चित्रकर्त्यांमध्ये तो करण्याची हिंमत येते, ती त्यांच्या राजकीय धोरणाच्या पाठिंब्यानं, असा हा शोध आहे. या मुद्द्याची गंमत वाटत असतानाच आपल्याकडल्या एका इंग्रजी दैनिकातही या विचारधारेला संमती देणारं एका पारशी महाशयांचं पत्र पाहण्यात आलं. त्यांचा विरोध तर चित्रपटात झर्क्झेसची भूमिका वठवणाऱ्या कलावंतालाही होता. तो पुरेसा पर्शियन दिसत नाही आणि देवाचा अंश असलेला सम्राट म्हणून हा माणूस फारच कळकट दिसतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.
या दोन्ही युक्तिवादांना फार अर्थ नाही आणि आपल्या चित्रपटावर या प्रकारचे चमत्कारिक आक्षेप घेतले जातील, असं "300' च्या झॅक स्नायडर या दिग्दर्शकालाही वाटलं नसेल. अर्थ नसण्याची कारणं दोन. एक म्हणजे स्पार्टानं दिलेल्या लढ्याची गोष्ट काही चित्रकर्त्यांच्या डोक्यातून निघालेली नाही. थर्मोपायलीचं युद्ध ही ऐतिहासिक नोंद असलेली घटना आहे. ती इतकी जुनी म्हणजे ख्रिस्तपूर्व 480 मधील असल्यानं तिचा पुरेसा तपशील उपलब्ध नाही आणि माहिती साधारण दंतकथेच्या स्वरूपातच शिल्लक आहे; पण युद्ध कोणाकोणांत झालं, कोण जिंकलं, कोण हरलं, त्या युद्धाचा दूरगामी परिणाम काय झाला, या गोष्टी वादातीत आहेत. त्यातून चित्रपटाचं सादरीकरण काही इतिहासाला पडद्यावर आणण्याचा एकमेव हेतू मनात ठेवून केलेलं नाही. तपशील अचूक असण्याचा चित्रकर्त्यांचा दावाही नाही. त्यांचा कथेकडं पाहण्याचा एक हेतू हा वीरश्रीपूर्ण दंतकथा नेत्रदीपक पद्धतीनं मांडण्याचा आहे. कथेतही महत्त्व अमुक देश आणि तमुक वंश याला नसून, कोंडीत पकडल्या गेलेल्या राजानं आपल्या मूठभर सैनिकांसह कसा पराक्रम गाजवला आणि युद्धात हरतानाही त्यानं कशी दूरदृष्टी दाखवली, याला आहे. कथा शौर्याची, मर्दानगीच्या सांकेतिक व्याख्येची, त्यागाची आहे आणि त्यापलीकडले अर्थ त्यातून काढू नयेत, कारण ते अभिप्रेत नाहीत.
आक्षेप बिनबुडाचे असल्याचं दुसरं कारण अधिक महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे "फ्रॅन्क मिलर.' फ्रॅन्क मिलरचा सहभाग या चित्रपटातला सर्वाधिक महत्त्वाचा आहे. इतका, की तो नसता तर "300' अस्तित्वातच आला नसता. मिलरचं नाव आपल्याकडं फार प्रमाणात माहीत असेलसं नाही. तो ग्राफिक नॉव्हेलिस्ट आहे. त्याची चित्रशैली वास्तववादी नाही, तर अतिशय स्टायलाईज्ड आहे. मोजक्žया रेघांतून अचूक परिणाम देणारी, लक्षात राहणाऱ्या दृश्žयप्रतिमा असणारी चित्रं काढणं ही त्याची खासीयत आहे. त्याच्या नावाला आणखी एका कारणासाठी महत्त्व द्यायला हवं, ते म्हणजे त्याच्या पुस्तकांनी चित्रपटांचा एक नवाच प्रकार अस्तित्वात आणला आहे. आजवर कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेल्सवर चित्रपट आधारले जात असत; पण रॉबर्ट रॉड्रिग्ज या दिग्दर्शकानं मिलरच्या "सिन सिटी' मालिकेतल्या साडेतीन पुस्तकांचं असं काही अफलातून रूपांतर केलं, की आधारित या शब्दाला नवाच अर्थ आला. दिग्दर्शक आपल्या दृश्ययोजना ठरवताना छोट्या रेखाचित्रांमधून प्रसंग आखत जातात, ज्याला चित्रपटीय भाषेत "स्टोरी बोर्ड' म्हटलं जातं. रॉड्रिग्जनं स्वतः वेगळा "स्टोरी बोर्ड' न करता मिलरच्या मूळ पुस्तकांनाच "स्टोरी बोर्ड' म्हणून वापरलं आणि बहुसंख्य संवादही जसेच्या तसे पुस्तकातून उचलले. पार्श्वभूमीही पुस्तकातली वाटण्यासाठी डिजिटली तयार केली आणि मिलरच्या व्यक्तिरेखा उभ्या करण्यासाठी कलावंतांचं रंगरूपही बदलून टाकलं. सिन सिटी ही पुस्तकाची आवृत्ती नाही, तर जणू पडद्यावर आलेलं प्रत्यक्ष पुस्तकच आहे. "300'ची प्रेरणा स्नायडरनं सिन सिटीवरून घेतली, हे उघड आहे. कारण इथं पुन्हा एकदा मिलरचं पुस्तक पडद्यावर आकाराला आलं रेखाचित्रांना जसंच्या तसं चित्रपटाच्या चौकटीत साकारत.
"300' वर घेतलेले आक्षेप मिलरच्या मूळ पुस्तकाला जमेला धरत नाहीत आणि त्यामुळेच ते फसतात. फ्रॅन्क मिलरचं "300' पाहण्यासारखं आहे. पाच भागांत काढलेल्या या ग्राफिक नॉव्हेलमध्ये हे स्पष्ट होतं, की मिलरला कथेहून आकर्षित करतात त्या प्रतिमा. खरं तर इथं फार मोठी कथाच नाही; आहे केवळ एक युद्ध, त्याची थोडी (थोडी म्हणजे फारच थोडी) पार्श्वभूमी आणि या युद्धाच्या परिणामाविषयी थोडा सूचक भाग. इथली मुख्य पात्रंही तपशिलात रचलेली नाहीत, तर थोडक्यात स्वभावविशेष देऊन उभी केलेली. राजा लिओनिडस हा वीर योद्धा, कोणत्याही प्रसंगी हार न मानणारा, राणी तडफदार, राजाला साथ देणारी. झर्क्झेस गर्विष्ठ, ज्या गर्वातच त्याचा विनाश दडलेला असू शकेल. इतर व्यक्तिरेखा ही खरं तर पात्रांपेक्षा अधिक शरीरं. मिलरच्या कुंचल्याला प्रमाण मानून कागदावर उतरलेली. बलवान योद्धे, सुंदर स्त्रिया, भ्रष्ट विद्वान यांच्या कागदावरल्या रचना तरबेज कुंचल्यातून आणि कल्पनेतून उतरलेल्या. पाहणाऱ्याला गुंग करून टाकणाऱ्या. झॅकनं आपला दृष्टिकोन रॉड्रिग्जसारखाच ठेवला आहे. मात्र इथं त्याच्यापुढे वेगळी आव्हानं आहेत. सिन सिटी बनवतानाची सर्वांत आव्हानात्मक गोष्ट होती, जी पुस्तकातील करड्याचा पूर्ण अभाव असणारी काळी-पांढरी चित्रं परिणाम कमी न करता पडद्यावर कशी आणावीत ही, आणि मोजक्žया रंगछटा या गडद काळ्या रंगाबरोबर वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कशा सोडवाव्यात ही. इथं प्रश्न आहे तो भव्यतेचा. चित्रातली भव्यता पडद्यावर आणणं, हे मूळ संकल्पना कागदावर उपलब्ध असल्या तरी सोपं नाही. दोन्ही दिग्दर्शकांनी शोधलेले उपाय हे प्रामुख्यानं संगणकीय आहेत आणि या क्षेत्रात एके काळी केवळ स्पेशल इफेक्žट् ससाठी वापरण्यात येणाऱ्या या माध्यमाच्या वाढत्या ताकदीचा पुरावा देणारे आहेत.
मूळ इतिहास, दंतकथा, मिलर यांना सोडून आणखी एका गोष्टीचा अप्रत्यक्ष प्रभावही "300' वर आहे. ती म्हणजे 1962 मध्ये येऊन गेलेला "300 स्पार्टन् स' हा चित्रपट. मिलरला लहानपणापासून भलताच आवडणारा हा चित्रपट. किंबहुना या आवडीतूनच त्यानं या कथानकावर पुस्तक करायला घेतलं. आज पुस्तकाचा पुन्हा चित्रपट झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. सिन सिटीनं फिल्म न् वार (Film Noir) प्रकारच्या चित्रपटांकडं प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा वेधलं ते त्यातल्या गुन्हेगारी कथांच्या सरमिसळीनं, गडद रंगछटांमुळे आणि व्यक्तिरेखांना असणाऱ्या ग्रे शेड् समुळे. "300' मुळे प्रेक्षक पुन्हा ऐतिहासिक युद्धकथांकडं वळण्याचा संभव आहे, मात्र या कथा सादरीकरणात पुरेशा आधुनिक असल्या तर.
दरम्यान हा नव्या चित्रप्रकाराचा जन्मदाता आपली किती अपत्यं पडद्यावर येऊ देतो, हा विषय यापुढं कायमच कुतूहलाचा राहायला हरकत नाही.
-गणेश मतकरी

Read more...

नवसमांतर मिथ्या

>> Wednesday, August 27, 2008


"मिथ्या' हे नाव सर्वांना कळण्याइतकं किंवा त्याहूनही अधिक म्हणजे जवळचं वाटण्याइतकं सोपं किंवा आकर्षक नाही. मात्र, इथं दिसणाऱ्या आशयाला चपखल बसणारं जरूर आहे. इथला नायक व्ही. के. (रणवीर शौरी) ज्या दुनियेत राहतो, तिचा आभासीपणा, खोटेपणा दिग्दर्शक रजत कपूर आपल्याला पहिल्या शॉटपासूनच दाखवतो. मात्र, या खोटेपणाची व्याख्या ही कथेच्या चढत्या आलेखाबरोबर अधिकाधिक गहिरी होत जाते. 15 वर्षं रंगभूमीवर काढल्यानंतर (किंवा थिएटर केल्यावर) हिंदी चित्रपटात सटरफटर काम शोधणाऱ्या व्ही. के.चं आयुष्य हाच पुढे एक आभास बनतो आणि त्यातलं खरं काय अन् खोटं काय हे त्याला आणि बऱ्याच प्रमाणात इतरांनाही कळेनासं होतं.
या चित्रपटाचे पोस्टर्स पाहिले तर वाटावं, की हा विनोदी सिनेमा आहे. काही प्रमाणात ते खरं आहे. मात्र, पूर्ण सत्य नव्हे. इथला विनोद हा विसंगती आणि विडंबनातून तयार होणारा आहे अन् प्रामुख्याने प्रासंगिक आहे. इथला प्रत्येक प्रसंग हा कमी-अधिक प्रमाणात हसवतो. मात्र, याचा संपूर्ण परिणाम हा विनोदी चित्रपट पाहिल्याचा नाही. तो आपल्याला विचार करायला लावणारा आहे.
"स्ट्रगलर' या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या जमातीचा व्ही.के. हा प्रतिनिधी. फालतू चित्रपटातून काम करून, मोठा होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या हजारो कलाकारांपैकी एक. शेक्सपिअरचे संवाद त्याला तोंडपाठ आहेत, पण तो ज्या प्रकारच्या सूक्ष्म भूमिका करतो, तिथे या तयारीचा काहीच उपयोग नाही. चांगल्या भूमिकेच्या शोधात अन् हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या व्ही.के.चा अचानक गुन्हेगारी जगाशी संबंध येतो. राजेभाईसाब (पुन्हा रणवीर शौरी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका गॅंगस्टरचा चेहरा त्याच्याशी मिळताजुळता असल्याचं गावडे (नसिरुद्दीन शाह) या विरोधी गॅंगप्रमुखांपैकी एकाच्या लक्षात येतं आणि एक कट रचला जातो. राजेला उडवून त्याच्या जागी व्ही. के. ला आणण्यात येतं अन् प्रथमच आव्हानात्मक वाटणारी भूमिका करण्याची संधी व्ही.के.पुढे चालून येते. तिही पडद्यावर नव्हे, प्रत्यक्षात.
"मिथ्या'बद्दल जी भिन्नं मतं प्रदर्शित केली जातात, त्यांचं चित्रपटाच्या पूर्वार्धाबद्दल एकमत असतं. तो उत्तम आहे, याबद्दल दुमत असल्याचं ऐकिवात नाही. मात्र, उत्तरार्धाबद्दल "तो गोंधळाचा आहे,' किंवा "शेवट फसला आहे,' इथपासून ते "शेवटानेच चित्रपटाला अर्थ मिळतो,' इथपर्यंत अनेक मतं आहेत. प्रेक्षक किंवा समीक्षक यातल्या कोणाचंच यावर एकमत दिसून येत नाही.
मला स्वतःला शेवट (आणि उत्तरार्धातला बराचसा भाग) पटला; किंबहुना "मिथ्या' या नावामधलं गांभीर्य आणि यातल्या नायकाच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला हा शेवट खऱ्या अर्थानं टोकाला पोचवतो. केवळ एवढंच नाही, तर एका परीनं हा शेवट केवळ व्ही.के. किंवा सोनम (नेहा धुपिया)विषयी बोलत नाही, तर एकुणातच सामान्य माणसाच्या शोकांतिकेविषयी बोलतो. जग हे कसं प्रत्येकासाठीच मायावी आहे, सारं काही मिळूनही आपले हात कसे रिकामेच असतात आणि सुख हे कसं थोडक्यात आवाक्यापलीकडे राहतं, हे इथं दिसून येतं. रजत कपूर अन् सौरभ शुक्ला या पटकथाकारांना जर केवळ गंमत करायची असती, तर त्यांनी कथानकाचा शेवट हा सांकेतिक अर्थानं सुखांत केला असता. तो तसा केला जात नाही, याचाच अर्थ चित्रकर्त्यांना केवळ करमणुकीपलीकडे काही दिसणं अपेक्षित आहे.
पूर्वार्धावरून चित्रपटाचा आकार थोडा "डॉन' छापाचा वाटला, तरी तो तसा नाही. मध्यांतराजवळ येणारा एक धक्का (ज्याविषयी तपशिलात लिहिणं उचित होणार नाही.) त्याला या साच्यातून बाहेर काढतो. मात्र, त्याचं "थ्रिलर' हे स्वरूप शेवटापर्यंत तडजोडीशिवाय टिकवलं जातं आणि सुरवातीला पकडलेल्या विनोदाच्या सुरासकट. इथला विनोद हा मुद्दाम तयार केलेला वाटत नाही, तर रोजच्या निरीक्षणातून आलेला दिसतो. गुंड लोक व्ही.के.चे फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना, दर फोटोचा त्याचा चेहरा वेगवेगळ्या पद्धतीनं झाकला जाणं, किंवा मोबाईल कंपन्या रेंजबाहेर गेल्यावर सारखे मेसेज का पाठवतात, यासारखी निरीक्षणं, अशा आपल्या अनुभवातून येणाऱ्या गोष्टी वेगळ्या संदर्भात पडद्यावर येऊन हास्यकारक ठरतात. त्याचबरोबर गुन्हेगारीकडे पाहण्याचा तिरकस दृष्टिकोनही दिसतो. राजेला मारल्यावर व्हीकेच्या झालेल्या अवस्थेचा त्यानं शोधलेलं "आपण मघाशी खाल्लेला वडापाव खराब होता' यासारखं उत्तर आपसूकच हसू आणतं. त्याला असलेल्या विदारक पार्श्वभूमीसकट.
रजत कपूरच्या या आधीच्या दिग्दर्शक प्रयत्नाहून (रघू रोमिओ, मिक्स्ड् डबल्स) मिथ्या हा कितीतरी पटींनी अधिक वरचा आहे. केवळ तांत्रिक बाबीनंच नव्हे, तर तो जे सांगू पाहतो आहे, त्यातदेखील. अर्थात त्याचा बाज पाहता, तो पूर्णतः स्वतंत्र वाटत नाही; मात्र, चांगलं रूपांतर असणं, हेदेखील काही कमी नाही. कपूर, पाठक आणि शौरी यांचा हळूहळू एक स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार होताना दिसतो आहे. आणि गेल्या काही वर्षांमधली या तिघांची कामगिरी पाहता, त्यात गैर काहीच नाही.
शौरी आणि पाठक हे मुख्य धारेतल्या चित्रपटांमध्ये त्यामानानं कमी लांबीच्या सहायक भूमिकांमध्ये हजेरी लावताना दिसून येतात; पण त्यांचा खरा कस लागतो, तो या प्रकारच्या निर्मितीत. रजत कपूरचीच निर्मिती असलेल्या "भेजा फ्राय'मध्ये विनय पाठकनं आपली किमया दाखवली होती, तर इथं शौरीनं एका अस्तित्वहीन कलावंताची शोकांतिका फार ताकदीनं पडद्यावर आणली आहे. हे दोघे विनोदाच्या आहारी न जाता, पडद्यावरल्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांना हसवतात, जी गोष्ट गेल्या काही वर्षांत दुर्मिळ झाली होती.
मध्यंतरी समांतर चित्रपट बंद झाल्याची आवई उठली होती आणि बेनेगल, निहलानीसारख्यांनीही मुख्य धारेचाच आसरा घेतला होता. या दरम्यान, मुख्य धारेत केल्या जाणाऱ्या प्रयोगांची संख्या वाढली. मात्र, समांतर मंडळी ही काही प्रमाणात उपरीच राहिली. भेजा फ्राय, मिथ्यावरून हे दिसून येतं, की समांतर चित्रपटांची लाट अजूनही स्पष्टपणे स्वतंत्र वाटेलसं अस्तित्व टिकवून आहे. तिच्या स्वरूपात थोडा फरक पडला आहे. आणि आता अधिक वेगळं पाहण्याची तयारी असलेल्या प्रेक्षकांच्या कृपेनं तिला मिळणारा प्रतिसादही वाढता आहे. अर्थात हे जर टिकून राहायला हवं असेल, तर हा प्रतिसाद टिकायला हवा. भव्यपटांच्या स्पर्धेतही "मिथ्या'सारखी छोटी निर्मितीदेखील पाहिली जायला हवी, ती त्यासाठीच.

-गणेश मतकरी

Read more...

दिशाहीन वणवणीचा कोलाज

>> Saturday, August 23, 2008


सत्य आणि असत्य, वास्तव आणि आभास. प्राप्य आणि दुष्प्राय. म्हटलं तर दोन टोकांचे दोन ध्रुव आणि म्हटलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. पाठीला पाठ लावून येणाऱ्या. रेसभर अंतरावर वसणाऱ्या. त्यांच्यामधल्या सीमेवरच्या या धूसर शापित प्रदेशात आपल्या सर्वांचीच चाललेली ही वणवण तरीही हाती लागत नाही काहीच... अपर्णा सेन यांच्या "फिफ्टिन्थ पार्क ऍव्हेन्यू'ला गुंफणारं हे अंतःसूत्र त्यांच्या गोष्टीमधल्या अनेक सुट्या सुट्या पदरांतून ते पुनरावृत्त होत राहातं. भानावर आणत राहतं.
सरळसोटपणे पाहायला गेलं, तर ही गोष्ट आहे मिताली ऊर्फ मिठीची. स्कीझोफ्रेनिया आणि एपिलेप्सी या दोनही रोगांची लक्षणं घेऊन जगणाऱ्या मुलीची. तिच्या सांगण्यावरून "15, पार्क ऍव्हेन्यू' हा पत्ता शोधायला निघालेली तिची बहीण अनू आणि मिठी स्वतः आपल्याला सुरुवातीलाच दिसतात. पार्श्वभूमीला ट्रॅफिकचे, वाहनांच्या हॉर्नस् चे आवाज.
सिनेमा एका संथ गतीनं पुढे सरकत जातो तसतशी आपल्याला मितालीच्या आयुष्याची, तिच्या वर्तुळातल्या लोकांची, तिच्या आयुष्यातल्या वास्तव- अवास्तवाची ओळख होत जाते. तिची शून्य संभ्रमित हरवलेली नजर. काहीसं वेडसर वागणं. विचित्र हालचाली. आणि त्याच्या घरातल्यांची तिच्या सोयीनं होणारी फरपट.
अनू ही तिची बहीण. बुद्धिवादी. करियरिस्ट. पण मिठीची जबाबदारी असल्यामुळे तिचं आयुष्य जणू थांबून राहिलंय. संजीव या मित्रासोबत लग्न करणं तर दूरच, थोडासा मोकळा वेळ वा आनंद मिळणंही मुश्किल. मिठीची आई असहाय. काहीच करता येत नाही. आणि काळजी तर वाटत राहतेच अशा वयात असलेली. काहीशी अंधश्रद्धा त्याहूनही दयनीय. बिचारी भासणारी आणि ज्यो ज्यो हा मिठीचा प्रियकर. तिच्यावर भीषण बलात्कार होण्याआधी तिचा नियोजित वर असलेला. बलात्कारानंतर उफाळलेल्या तिच्या स्कीझोफ्रेनियाला सामोरा न जाऊ शकलेला. आता लक्ष्मी या स्त्रीशी विवाह करून दोन मुलांचा बाप झालेला.
फ्लॅशबॅक तंत्रानं- मिठीच्या नव्या डॉक्टरांना ही माहिती देता देता आपल्याला ही पात्रं परिचित होतात ज्यो ज्योशी आपलं लग्न झालेलं आहे. आपल्याला पाच मुलं आहेत; पण अनूसकट सगळं जग आपल्याविरुद्ध कट करून आपल्याला त्यांच्याकडे जाऊ देत नाहीय, अशा भासात जगणारी मिठी. सद्दाम ज्यो ज्योला मदत करणार आहे आणि बाकी सारं जग बुशच्या बाजूचं, ही तिची पक्की समजूत. त्यातून दिग्दर्शिकेने मोठ्या समर्पक पद्धतीनं तुम्हा-आम्हा सगळ्यांनाच मितालीच्या शोकांतिकेत सामावून घेतलं आहे.
भूतानमध्ये सुट्टीवर गेलेली ही सगळी मंडळी योगायोगानं आपापली विश्व घेऊन एकमेकांशी नकळत टक्करतात, ते अपरिहार्यच. मग मिठीच्या नव्या डॉक्टरांमध्ये गुंतत जाणारी अनू. त्यामुळे किंवा कदाचित अपरिहार्यपणे तिच्यापासून लांब जाणारा तिचा मित्र संजीव, स्वतःच्या असहायतेचीच कीव करणारी मिठीची आई, मिठीला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करू पाहणारा ज्यो ज्यो आणि त्यामुळे दुखावली जाणारी - असुरक्षित वाटून घेणारी त्याची पत्नी लक्ष्मी.
ही सगळी माणसं आपापल्या आयुष्यातली स्वप्न-स्वप्नभंग, आशा-निराशा आणि आपापले अपराधीभाव घेऊन जगत राहतात. सुख शोधण्याची धडपड करत राहतात. एकमेकांवर वृथा आरोप-प्रत्यारोप करतात. एखाद्या पिंजऱ्यात सापडलेल्या प्राण्यासारखी निष्फळ धडपड करून पाहतात.
त्याची अखेर होते, ती पुन्हा एकदा "15 पार्क ऍव्हेन्यू' शोधायला निघालेल्या मितालीच्या प्रवासासह. तिला खुणावणाऱ्या तिच्या आभासाच्या विश्वात जाण्यासाठी मिताली त्या रस्त्यावरून परागंदा होते. बाकी सारे तसेच आपापल्या श्रेयाच्या शोधात वणवणणारे. मिठीला शोधणाऱ्या या माणसांच्या सैरावैरा धावण्याकडे, त्यांच्या आजूबाजूच्या बघ्यांकडे पाहता पाहता कॅमेऱ्याचा कोन बदलतो. त्यांच्या बरोबरीला असलेले आपण कॅमेऱ्याच्या साथीनं वर जातो आणि वरून दिसते आपल्याला त्यांची धडपड, दिशाहीन. अस्तित्वात नसलेल्या वास्तवाच्या शोधात चाललेली. सरतेशेवटी एक तरुण तिथून मजेत शीळ घालत चक्कर मारतो, तेव्हा त्यानं आपल्याला दिलेलं अलिप्त पर्स्पेक्žटिव्ह आपल्या लक्षात येतं आणि त्या सगळ्या वणवणण्यातली निष्फळता जाणवून जाते.
यापरते काय सांगावे? शबाना आझमी आणि कोंकणा सेन-शर्मा या दोघीही आपापल्या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत.
-मेघना भुस्कुटे

Read more...

वास्तवाशी सुसंगत-बॅटमॅन

>> Monday, August 18, 2008


स्टार वॉर्स मालिकेच्या दुसऱ्या भागात म्हणजे "एम्पायर स्ट्राईक्‍स बॅक'मध्ये लुक स्कायवॉकरने आपल्या साम्राज्यवादी पित्यापासून सुटका मिळवण्यासाठी स्वतःचा हात तोडून टाकायला मागेपुढे पाहिले नाही. सुपरमॅन-२ मध्ये सुपरमॅनने आपल्या शक्तींचा त्याग करून आयुष्यभर क्‍लार्क केंट बनायची तयारी दाखवली आणि स्पायडरमॅनच्या दुसऱ्या भागात धावपळीने त्रासलेल्या पीटर पार्करने आपला स्पायडर सूट कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. .......

एकूण चित्रपटांचा इतिहास पाहता लक्षात येईल, की फॅंटसी या चित्रप्रकारात मोडणाऱ्या अन्‌ विशिष्ट रचना गृहीत धरणाऱ्या चित्रत्रयींचे दुसरे भाग ही त्यांच्या नायकांच्या मानसिकतेची कसोटी पाहणारे, अन्‌ संघर्षातल्या चाली प्रतचालींना वैचारिक दृष्टिकोनातून टोकाला पोचवणारे असतात. अनेकदा इथे नायकांपेक्षा खलनायकांना प्राधान्य येते आणि कथानकाच्या दृष्टिकोनातून त्यांचे शेवट हे क्‍लिफहॅंगर्ससारखे, म्हणजेच पुढल्या भागाविषयीची उत्कंठा टिपेला पोचवणारे असतात.
खासकरून सुपरहिरो चित्रपटांमध्ये हे गणित अधिकच निश्‍चित असते. पहिले भाग बहुधा "ओरिजिन' स्टोरी असतात- जिथे नायक सुपरहिरो बनतात तरी किंवा सुपरमॅनसारखे मुळातच शक्तिशाली असले तर ते स्वतःची ओळख तरी तयार करतात. पहिल्या भागात खलनायकांशी सामना जरूर होतो, पण इथे नायकाला उभे करण्यातच खूप वेळ गेल्याने नायकाने मिळवलेला विजय हा काहीसा तात्पुरता असतो. दुसरे भाग हे संपूर्णपणे संघर्षाने व्यापलेले असतात अन्‌ नायक आणि खलनायक या सर्वांच्या दृष्टीने हे भाग शोकेससारखे वापरले जातात. अखेर बहुधा खलनायकांचे पारडे वर जाते आणि तिसऱ्या भागात नायक बदला कसा घेणार, याविषयी वातावरणनिर्मिती केली जाते. अनेकदा हे चित्रपट "स्टॅंड अलोन' असतात. कोणताही एक भाग बघताना मागला-पुढला पाहायची फार गरज नसते. कारण प्रत्येक भागातली साहसे ही स्वतंत्रपणे संकल्पित असतात. मात्र बहुतेक वेळा कथानकांचा काही विशिष्ट धागा पुढे नेत राहणं आणि तीन भाग पुरणारा आलेख रचत नेणे, हे यातल्या चांगल्या चित्रपटांचे वैशिष्ट्य असते.
पहिल्या दोन भागांवरून हे दिसून येते, की दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलानची नवी बॅटमॅन मालिका या मांडणीला अपवाद नसावी. एक सुपरहिरो म्हणून बॅटमॅनचा वेगळेपणा हा, की मुळात हा सुपरहिरोच नाही. म्हणजे त्याच्याकडे अशा कोणत्याही शक्ती नाहीत- ज्या त्याला सामान्यांहून वेगळ्या बनवतील. आपल्या अतिशय श्रीमंत आणि सज्जन आई- वडिलांच्या आपल्या डोळ्यांदेखत झालेल्या मृत्यूच्या आठवणीने झपाटलेला ब्रूस वेन (क्रिश्‍चन बेल) हा रात्री आपली ओळख बदलून मुखवटाधारी बॅटमॅन होतो. मात्र त्याची खरी शक्ती ही त्याच्याकडच्या अद्ययावत यंत्रसामग्रीइतकीच त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या वलयात आहे. गुन्हेगार अधिक घाबरतात, ते या वलयाला.
आपल्या दोन्ही चित्रपटांमधून दिग्दर्शक नोलानचा प्रयत्न आहे तो बॅटमॅनच्या या संकल्पनेला अधिकाधिक वास्तव करायचा. टिम बर्टनने आपल्या मूळ चित्रपटात कल्पिलेल्या धूसर, गॉथिक पण पूर्णतः काल्पनिक जगापेक्षा नोलानने "डार्क नाईट'मध्ये वापरलेले शिकागोमधले चित्रीकरण त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. गॉथम शहराच्या या रिऍलिस्ट दर्शनातून बॅटमॅन अधिक खरा होत जातो. "बॅटमॅन बिगीन्स'च्या शेवटी सूचित केल्याप्रमाणे डार्क नाईटचा खलनायक "जोकर' (हीथ लीजर) आहे. जो नियम गॉथमचा तोच जोकरचाही. बर्टनच्या चित्रपटातल्या जॅक निकलसनने रंगवलेल्या भडक आणि तद्दन खोट्या जोकरपेक्षा इथे हीथ लीजरने उभा केलेला सायकोपॅथ हा अनेक प्रसंगी खरोखर अंगावर काटा आणणारा आहे. नुकत्याच ड्रग ओव्हर डोसने वारलेल्या लीजरची ही शेवटून दुसरी (एक चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे.) भूमिका असल्याने तर तिचे महत्त्व थोडे अधिकच आहे.
जोकरबरोबर इथे आलेले दुसरे नवीन पात्र म्हणजे हार्वी डेंड (आरोन एकहार्ट). हा नवा डिस्ट्रिक्‍ट ऍटर्नी शहराला माफियामुक्त करायला आला आहे, मात्र तो आपल्या कामात यशस्वी होतो की नाही, हे बॅटमॅन मायथॉलॉजी माहीत असलेल्यांना सांगायला नको. इतरांसाठी मात्र डेंडच्या भूमिकेला मिळणारी वळणे ही पूर्णपणे अनपेक्षित वाटणारी.
व्हाईट नाईट म्हणून सुरू होणारी डेंडची व्यक्तिरेखा ही खरोखरच संपूर्ण सद्‌गुणी, जोकरची पूर्ण काळी, तर बॅटमॅन या दोघांमधल्या ग्रे शेड्‌सचे प्रतनिधित्व करणारा. बॅटमॅन जरी नायक असला तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वातल्या गडद छटा या मूळ संकल्पनेतच अध्याहृत आहेत. चांगल्या कामासाठी वापरण्यात येणारी, पण काहीशी निगेटिव्ह एनर्जी असे बॅटमॅनचे स्वरूप इथे स्पष्ट कळण्याजोगे आहे. "डार्क नाईट'मध्ये बॅटमॅन, डेंड आणि पोलिस अधिकारी गॉर्डन (गॅरी ओल्डमन) यांच्या मोहिमेने माफिआ हैराण होतो आणि मदतीसाठी जोकर पुढे होतो. बॅटमॅनला जाहीर धमकी मिळते, की तो मुखवटा काढून समोर आला नाही तर रक्तपात ओढवेल. नुसती धमकी देऊन तो थांबत नाही, तर ती लगेच अमलातही आणतो.
डार्क नाईटची माझ्या मते दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. बॅटमॅन मायथॉलॉजीमधल्या अनेक बारकाव्यांचा वापर करणारी भरधाव अन्‌ वेड्यावाकड्या वळणांनी पुढे जाणारी अन्‌ संपूर्ण अनपेक्षित पटकथा हे पहिले. इथला बॅटमॅन हा त्रासलेला आहे. शहराला आपली गरज आहे का नाही, याचा संभ्रम तर त्याला आहेच, वर आपण उचलतोय ते पाऊल बरोबर आहे का, याची चिंता त्याला पावलागणिक वाटतेय. त्याची ही अस्वस्थता पटकथेत अचूकपणे उभी राहते. पहिल्या काहीच ठळक घडामोडींत ती इतका परिणाम साधते, की एरवी सुपरहिरो चित्रपटांमध्ये वाटणारी प्रमुख व्यक्तिरेखांच्या सुरक्षिततेची खात्रीच ती काढून घेते. इथे कोणाचाही बळी जाऊ शकतो, असे एरवी क्वचित उभे राहणारे वातावरण मग तयार होते, अन्‌ पुढे एका पात्राचा बळी जातोही. या रचनेच्या पातळीप्रमाणेच तपशिलांमध्येही ती कमी पडत नाही. बॅटमॅनचे पिस्तूल न वापरणे, त्याची जवळजवळ जेम्स बॉंडइतकी असलेली गॅजेट्‌सची आवड, बॅटमोबाईल अन्‌ बाईकचा चपखल वापर, डेंडच्या व्यक्तिरेखेचे तपशील, बटलर आल्फ्रेड (मायकेल केन) आणि ब्रूस यामधला घट्ट धागा, अशा अनेक जागांना ती स्पर्श करते. अजूनपर्यंत नोलानच्या चित्रपटांनी वगळलेला बॅटमॅनच्या सहअनुयायांचा धागा मात्र इथेही अस्पर्शित राहतो. डिक ग्रेसन ऊर्फ रॉबिन दर्शन देत नाही, तसेच बॅटगर्लचाही पत्ता दिसत नाही. चित्रपटाअखेर कमिशनर होणाऱ्या गॉर्डनला मुलगी न दाखवल्याने बहुधा हे पात्र तिसऱ्या भागातही येण्याची शक्‍यता कमी. रॉबिनबद्दल मात्र सांगता येत नाही. जुन्या मालिकेतही तो तिसऱ्याच भागात अवतरला होता.
चित्रपटाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जोकर. लिहिलेला आणि साकारलेला बॅटमॅन हा जसा सांकेतिक अर्थाने सुपरहिरो नाही तसे त्याचे खलनायकही सांकेतिक अर्थाने सुपरव्हिलन नाहीत. काही सन्माननीय अपवाद वगळता. यामधले बहुतेक सगळे हे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे मनोरुग्ण आहेत अन्‌ जोकर या सर्वांचा बादशहा. ही जाण या चित्रपटात संहितेपासून दिसते. जोकरचे क्रूर, अतिशय बुद्धिमान अन्‌ त्याच वेळी माथेफिरू असणे, इथे अनेक प्रसंगांत दिसते. अनेकदा ही व्यक्तिरेखा समोरच्या व्यक्तीला विचाराला वेळ न देता एकामागून एक गोष्टी करत जाते अन्‌ प्रेक्षकही हतबद्ध होतो. ब्रूस वेनच्या पेंटहाऊसमधून थंडपणे नायिकेला (मॅगी गिलेनहाल) बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रसंग हा या प्रकारच्या प्रसंगरचनेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
दिग्दर्शक नोलान अन्‌ हिथ लीजर यांनी या पात्राचा वावरही तितकाच थरकाप उडवणारा केला आहे. हातात वस्तरा घेऊन समोरच्याला आपल्या चेहऱ्यावरच्या स्मितरेषेच्या आकारातल्या व्रणाची दर वेळी वेगळी कहाणी सांगणे तर अविस्मरणीय. उच्चार, चपळ हालचाली, विद्रूप मेकअपखालूनही दिसणारा थंडपणा अन्‌ त्याच वेळी वाटणारी गंमत या सर्व गोष्टी लीजरची भूमिकेवरती पकड दाखवतात. या कलावंताचा अवेळी झालेला मृत्यू हा हॉलिवूडला बसलेला मोठा धक्का आहे.
"द फॉलॉइंग' आणि प्रचंड गाजलेला "मेमेंटो' या चित्रपटांमधून क्रिस्टोफर नोलानने आपली दिग्दर्शनावरची हुकुमत आणि प्रेक्षकांची दिशाभूल करण्याची हातोटी दाखवलीच होती. बॅटमॅन मालिकेला नवजीवन देताना त्याने आपल्या चलाखीचा यथायोग्य वापर केला आहे. आशा आहे, की तो ब्रायन सिंगरप्रमाणे (एक्‍स फाईल्सचे दोन भाग करून त्याने सुपरमॅनसाठी तिसरा सोडला होता) एका यशस्वी मालिकेचे भवितव्य धोक्‍यात न आणता याच जोमाने चित्रत्रयी पूर्ण करेल. त्याने हे जमवले तर ही आजवरची सर्वोत्कृष्ट सुपरहिरो चित्रत्रयी ठरेल, हे नक्की.
- गणेश मतकरी

Read more...

मुखवट्यामागला चेहरा

>> Saturday, August 16, 2008


"बॅटमॅन' एक सुपरहिरो म्हणून कितीही लोकप्रिय असला आणि कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेल्समधून त्याच्यावर अनेक यशस्वी प्रयोग झाले असले, तरी छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर तो आजवर दुर्दैवीच ठरला आहे. 1939 मध्ये बॉब केनने कल्पिलेला हा नायक सांकेतिक अर्थाने सुपरहिरो नाही, कारण त्याच्याकडे कोणत्याही वैशिष्ट्यपूर्ण शक्ती नाहीत. अतिशय चाणाक्ष बुद्धी, कमावलेली शरीरयष्टी, अद्ययावत साधनसामग्री आणि डोक्यातली सूडाची आग, या गोष्टींवर त्याची मदार आहे.यानंतरच्या दोन्ही पोस्ट बॅटमॅन' च्या शेवटल्या दोन चित्रपटांवर असतील. यावेळी श्यामलन इतका प्रतिसाद मात्र अपेक्षित नाही.

हॉलिवूडमध्ये प्रौढांचे चित्रपट अधिक बालिश होताहेत आणि मुलांचे अधिक प्रगल्भ. मोठ्यांच्या चित्रपटांमध्ये करमणुकीचं प्रमाण वाढण्यासाठी व्यक्तिरेखांना बाजूला ठेवून घटना, इफेक्ट्स आणि एकूणच भव्यतेचा वापर करण्यात येतोय, तर बालपटातल्या व्यक्तिरेखा अधिक सखोल, वैचारिक होत जातायत. नुसतं एवढंच नाही, तर मुलांच्या चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गातही मोठ्यांचाच भरणा अधिक होताना दिसतोय. नजीकच्या भविष्यात तरी हे चित्र बदलेल असं वाटत नाही आणि चित्रकर्त्यांची ते बदलण्याची योजनाही नसावी, असं या प्रॉजेक्ट्सवर काम करणाऱ्या दिग्दर्शकांच्या निवडीवरून वाटतं.
सुपरहिरोज हा खरा मुलांचा प्रांत; पण आज हे चित्रपट दिग्दर्शित करणारी मंडळी या प्रांतात उतरली ती त्यांचं मोठ्यांच्या चित्रपटांमध्ये चांगलंच नाव झाल्यावर. एक्स मेनच्या दोन्ही भागांचा दिग्दर्शक होता ब्रायन सिंगर ज्याचं "युजवल सस्पेक्ट्स' या अनयुज्वल रहस्यपटासाठी कौतुक झालं होते. त्याने एक्स मेनमधल्या नायक-नायिकांच्या गर्दीला आकार दिला, कमी प्रसंगांमधून व्यक्तिरेखा टोकदार केल्या आणि मूळच्या कृष्णवर्णीयांच्या चळवळीतून पुढे आलेल्या यातल्या विभिन्न दृष्टिकोनांचं बालप्रेक्षकांना पटेलसं चित्र उभं केलं. नंतर आलेल्या स्पायडरमनच्या दोन्ही भागांना पडद्यावर आणलं सॅम रायमीने ज्याचा विनोदी भयपट "इव्हिल डेड' कल्ट हिट ठरला होता. रायमीने यात स्पायडरमॅनइतकंच महत्त्व पीटर पार्कर या व्यक्तिरेखेला दिलं आणि कथाभागाला वजन आणलं. "क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन' मुळे प्रकाशझोतात आलेल्या अँग ली ने "हल्क'ला एखाद्या मोठ्या शोकांतिकेच्या नायकासारखा सादर केला; पण तो काही प्रेक्षकांना फार पसंत पडला नाही आणि मग मैदानात उतरला, तो "मेमेन्टो' आणि "इनसोम्निया'सारख्या मानसशास्त्रीय थ्रिलर्सचा दिग्दर्शक "बॅटमॅन'ला घेऊन.
या सर्व नवसुपरहिरोपटांकडे पाहिलं तर एक गोष्ट समान आढळते, ती म्हणजे त्यांनी या नायकांच्या मुखवट्यामागल्या मूळ चेहऱ्याला दिलेलं महत्त्व. अपवाद "एक्स मेन'चा, कारण त्यांच्या सिक्रेट आयडेन्टीटीला मुळातच फार अर्थ नाही. बाकी चित्रपटात पीटर पार्कर किंवा ब्रूस बॅनर यांना मिळालेलं महत्त्व हे स्पायडरमॅन किंवा हल्कहून कमी नाही. क्रिस्टोफर नोलॅन आपल्या "बॅटमॅन बिगिन्स'मध्येही त्याच वाटेने जातो आणि आपल्याला आजवरचा सर्वांत प्रभावी सुपरहिरोपट देतो.
"बॅटमॅन' एक सुपरहिरो म्हणून कितीही लोकप्रिय असला आणि कॉमिक्स आणि ग्राफिक नॉव्हेल्समधून त्याच्यावर अनेक यशस्वी प्रयोग झाले असले, तरी छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर तो आजवर दुर्दैवीच ठरला आहे. 1939 मध्ये बॉब केनने कल्पिलेला हा नायक सांकेतिक अर्थाने सुपरहिरो नाही, कारण त्याच्याकडे कोणत्याही वैशिष्ट्यपूर्ण शक्ती नाहीत. अतिशय चाणाक्ष बुद्धी, कमावलेली शरीरयष्टी, अद्ययावत साधनसामग्री आणि डोक्यातली सूडाची आग, या गोष्टींवर त्याची मदार आहे. स्वतः गुन्हेगार बनण्याच्या एक पाऊल मागे राहून, कायदा उचलून धरणारा हा नायक, सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांचं एक चमत्कारिक मिश्रण आहे. त्याचं सर्वांत मोठं शस्त्र आहे ती गुन्हेगारांच्या मनात त्याने निर्माण केलेली भीती आणि तो हे ओळखून आहे. बॅटमॅन अर्थात ब्रूस वेन ही अतिशय गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे.
या व्यक्तिरेखेच्या पडद्यावरच्या सादरीकरणात पहिला खो घातला तो ऍडम वेस्ट अभिनित चित्रमालिकेने. 60/65 च्या आसपास छोट्या पडद्यावर आलेल्या या मालिकेने (आपल्याकडेही काही वर्षांपूर्वी ती स्टार प्लसवर रोज दाखवली जात असे) बॅटमॅनला एक विनोदी वळण दिलं. मूळ व्यक्तिरेखेत अभिप्रेत असलेल्या गर्द छटा या मालिकेने काढून टाकल्या आणि घटनांचं गांभीर्यही. पुढे 1989 मध्ये टिम बर्टनच्या बॅटमॅनने केलेला प्रयत्न तुलनेने बरा होता; पण इथे भर होता तो दृश्यात्मकतेवर आणि खलनायकावर. बर्टनच्या दोन भागांनंतर चित्रपटमालिका पुन्हा विनोदाकडे वळली आणि चार भागांनंतर पडद्यावरला बॅटमॅन संपला, असं वाटायला लागलं.
मध्यंतरीच्या शांततेत एका सात मिनिटांच्या शॉर्ट फिल्मने बॅटमॅनविषयीचं कुतूहल जागृत ठेवलं. सॅन्डी कोलोरादिग्दर्शित बॅटमॅन ः हेड एन्ड या लघुपटात बॅटमॅन आणि जोकर बरोबर एलीअन आणि प्रेडेटर यांनाही घुसवण्यात आलं होतं; पण इथला बॅटमॅन हा कॉमिक बुक्सशी प्रामाणिक होता. चित्रपटांचा रेखीवपणा त्याला नव्हता. या लघुपटाचा इन्टरनेटवर झपाट्याने प्रसार झाला आणि लोक पुन्हा बॅटमॅनची वाट पाहायला लागले.
"बॅटमॅन बिगिन्स'चा कथाभाग हा बॅटमॅनच्या कारकिर्दीची सुरवात दाखवणारा आहे, हे उघड आहे; पण हे तथाकथित प्रीक्वल नव्हे. हा चित्रपट आधीच्या सर्व बॅटमॅन चित्रपटांना विसरून करण्यात आलेला आहे. ही एक नवीन सुरवात आहे आणि त्या दृष्टीनेही चित्रपटाचं नाव अतिशय योग्य आहे.
बॅटमॅनची व्यक्तिरेखा ही केवळ त्याच्या मुखवट्याशी संबंधित असू शकत नाही, कारण त्याच्या या मार्गाला लागण्यामागे ब्रुस वेनच्या आयुष्यातले दोन महत्त्वाचे प्रसंग आहेत. एक, लहान असताना विहिरीत पडल्यावर त्याच्या मनात वटवाघळांबद्दल तयार झालेली भीती आणि दोन, त्याच्या आई-वडिलांचा रस्त्यावरच्या भुरट्या चोराच्या हातून ओढवलेला मृत्यू. या दोन्ही घटनांचे संदर्भ आधीच्या चित्रपटांमधेही आले होते; पण ते अपूर्ण होते. हा चित्रपट ते पूर्ण करतो. इतकंच नाही, तर तो ब्रुस वेनच्या वागण्यामागे एक तर्कशास्त्र उभा करतो आणि त्यासाठी त्याच्या चित्रकथांबरोबरच काही नव्या प्रसंगांनाही जोडतो.
चित्रपटाच्या सुरवातीला ब्रूस (क्रिश्चन बेल), डुकार्ड (लिआम नीसन) या राज अलगुलच्या हस्तकाच्या संपर्कात येतो आणि बर्फाच्छादित पहाडांवर "लीग ऑफ शॅडोज' या न्यायाच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या संघटनेसाठी प्रशिक्षण घेतो. मात्र प्रत्यक्षात या संघटनेत भरती व्हायला तो नकार देतो आणि डुकार्ड त्याच्या शत्रुपक्षात जातो.
गॉथमला परत आल्यावर तो इथल्या गुन्हेगारीला निपटून काढण्यासाठी आपली एक नवी ओळख तयार करतो. ही करताना तो वटवाघळाच्याच प्रतिमेचा वापर का करतो, मनातल्या सूडभावनेचा सकारात्मक उपयोग कसा करायला शिकतो, त्याच्या यंत्रसामग्रीचा निर्माता कोण, बॅटकेव्ह आणि वेन मॅन्शनचा संबंध काय, वगैरे प्रश्नांची उत्तरं दिग्दर्शक शोधतो आणि ब्रूसचं एक त्रिमितीतलं चित्र उभं करतो.
दिग्दर्शका-दिग्दर्शकातला फरक ज्यांना पाहायचा असेल त्यांनी टिम बर्टनचा बॅटमॅन पाहावा आणि मग हा चित्रपट. बर्टनच्या जी ती गोष्ट डिझाईन करण्याच्या नादात बॅटमॅन कुठं हरवतो, तेच कळत नाही, याउलट इथे अनेक गोष्टींचा रेखीवपणा मुद्दाम काढून टाकल्याचं जाणवतं. दिव्याला बांधून ठेवलेल्या माणसापासून सुरवात झालेला बॅट सिग्नल, हा त्याच्या अंतिम रूपातही धूसरच राहतो. स्केअरक्रोने निर्माण केलेले भास कधीच स्पेशल इफेक्टची करामत होऊन राहत नाहीत. स्केअरक्रोचा मुखवटा तर साध्या गोणपाटाचा बनवलेला दिसतो.
बॅटमोबाईलसारख्या आधीपासून रेखाचित्रात आणि चित्रपटात असलेल्या गोष्टींना नोलॅन पेचात पकडतो. सामान्यतः नाजूक दिसणाऱ्या या गाडीऐवजी नोलॅन इथे एक रणगाड्यासारखी ओबडधोबड; पण सुसाट जाणारी प्रचंड गाडी वापरतो; पण तिचा उपयोगही तो सिद्ध करून दाखवत असल्याने प्रेक्षकांचं शंकासमाधानही होतं.
बॅटमॅन बिगिन्सची पूर्ण रचना ही "भीती' या एका संकल्पनेभोवती केलेली आहे. डुकार्ड इथे ब्रूसला विचारतो, "टेल अस मिस्टर वेन, व्हॉट डू यू फिअर?' चित्रपटाच्या सुरवातीलाच येणारा हा प्रश्न पूर्ण चित्रपटाचा आकार स्पष्ट करतो. अंधाराची भीती, अपरिचिताची भीती, अपराधाच्या भावनेतून येणारी भीती, भासमय भीती, प्रत्यक्ष भीती... अशा अनेक प्रकारे दिग्दर्शक या संकल्पनेशी खेळतो आणि आजवर या नायकाच्या चित्रपटातून गायब असणाऱ्या या महत्त्वाच्या भावनेला न्याय देतो.
गणेश मतकरी

Read more...

सुरेल उःशापाची गोष्ट

>> Monday, August 11, 2008


काही भाग्यवंत माणसे सोडली, तर आपण सारेच जण भूतकाळाची ओझी मनावर वागवत जगणारे लोक. कळत नकळत गोष्टी हातून घडून जातात आणि त्यांच्या भल्या-बुऱ्या आठवणींचे व्रण मात्र आपण अखेरपर्यंत वागवत राहतो. त्यातून सुटका नाही; मात्र कधी कधी एखाद्या सोन्यासारख्या क्षणी या शापालाही उःशाप मिळतो आणि माणसे अंतर्बाह्य उजळून जातात. "मॉर्निंग रागा'ची गोष्ट अशाच एका उःशापाची गोष्ट आहे.
गावाकडून शहराकडे जाणाऱ्या एका पुलावरचा दुर्दैवी अपघात हा या गोष्टीचा आरंभबिंदू. "मॉर्निंग रागा'मधली तीनही प्रमुख पात्रे आपापल्या पद्धतीने या अपघाताशी जोडली गेली आहेत.
गाण्याच्या कार्यक्रमासाठी शहरात निघालेली स्वर्णलता तिच्या विनवणीमुळे तिच्यासोबत आलेली, व्हायोलिनवर तिला साथ करणारी तिची मैत्रीण वैष्णवी आणि या दोघींचेही लेक दारू पिऊन बेभान झालेला एक मोटारवाला पुलावर बसला धडक देतो आणि बस नदीत कोसळते. वैष्णवी, बसमधले कित्येक गावकरी, स्वर्णलताचा मुलगा आणि मोटारवाला या अपघातात ठार होतात. स्वर्णलता गावात परतते ती वैष्णवीच्या मरणाचे ओझे घेऊनच. या मरणासाठी ती स्वतःला दोषी मानते आहे. या गोष्टीला 20 वर्षे उलटून जातात. वैष्णवीचा मुलगा अभिनय संगीतात नवे काही करू बघतो आहे. त्याचा अभिजात कर्नाटकी संगीताकडे ओढा आहे. आपल्या ग्रुपसाठी स्वर्णलताचा आवाज "टू मच ऑफ ए कोइन्सिडन्स' असे वाटण्याचा धोका या गोष्टीत आहे, पण "मॉर्निंग रागा'चे यश असे, की एकदाही असा विचार मनात येत नाही. अतिशय सहजगत्या गोष्ट पुढे सरकत जाते. अभिनय (प्रकाश कोवेलुमुडी), पिंकी (पेरिझाद झोराबियन) आणि स्वर्णलता (शबाना आझमी) या प्रमुख व्यक्तिरेखांइतकीच महत्त्वाची कामगिरी इतर पात्रांनी बजावली आहे. अभिनयच्या म्युझिक ग्रुपमधले त्याचे मित्र, पिंकीची काहीशी उथळ वाटणारी आई (लिलिएट दुबे) ही सारी मंडळी बारीकबारीक तपशिलांनी जिवंत केली आहेत. ती फक्त पार्श्वभूमीला न राहता आपापले स्वभाव घेऊन वावरणारी माणसे होऊन जातात. स्वर्णलताचा अपराधी भाव जिवंत करणाऱ्या शबाना आझमींइतकेच श्रेय या मंडळींनाही दिलेच पाहिजे. पेरिझाद झोराबियन आणि प्रकाश कोवेलुमुडी यांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखविली आहे.
दक्षिण भारतातले खेडे टिपणारा कॅमेरा ही "मॉर्निंग रागा'ची खासियत. तिथली विशिष्ट बांधणीची शांत, पांढरीशुभ्र घरे, देवळे आणि नदीवरचा "तो' पूल हे सगळे इतक्या जिवंतपणे टिपले आहे, की ते फक्त "लोकेशन' राहत नाही. हैद्राबादजवळचे ते गाव चित्रपटातले एक पात्र होऊन जाते. (हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा काही ठिकाणी मात्र दृश्याचा मोह संकलकाला अनावर झाल्याची शंका येते, पण अशा वेळा अगदी तुरळक आहेत, ही नशिबाची गोष्ट) प्रियदर्शनच्या चित्रपटांतून जिवंत होणाऱ्या अशा गावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वाट चालत राहते. शाप आणि उःशाप दोन्हीही देणारी नियती असे स्वरूप त्याला आहे. संगीत दिग्दर्शक अमित हेरी यांनी ही जबाबदारी अफलातून पेलली आहे. कर्नाटकी अभिजात संगीत ते आधुनिक वाद्यांसोबत मेळ साधत जाणारे कर्नाटकी संगीत असा या संगीताचा प्रवास. तो दृष्ट लागण्याइतका सुरेख आहे.
पटकथा, अभिनय, दृश्यांचा वापर, संगीत या सगळ्या बाबींमध्ये समाधान देणारा हा चित्रपट त्यात काही दोष आहेतही, पण ते निव्वळ तीट लावावी इतक्याच योग्यतेचे.
- मेघना भुस्कुटे

Read more...

गडद आणि गमतीदार

>> Thursday, August 7, 2008


मी काही दिवसांपूर्वी एक चित्रपट पाहिला- "ए सिम्पल प्लान' नावाचा. अतिशय साधेपणाने सांगितलेली ही एक नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाची गोष्ट होती. भल्या माणसांच्या हातूनही परिस्थिती कशी वाईट काम घडवते आणि एकदा घडलेली चूक आपल्याला कशी भलत्याच मार्गाला नेते, याविषयीचे हे कथानक होते.
कथानायक हॅन्क (बिल पॅक्स्टन), त्याची बायको सारा, त्याचा थोडासा मंद भाऊ जेकब (बिली बॉब थ्रॉन्टन) आणि जेकबचा मित्र लू ही तशी समाधानी माणसं. छोटी-मोठी दुःखं वागवणारी, पण जगण्यात आनंदाचे क्षण शोधणारी. एकदा हॅन्क, जेकब आणि लू ला. एक डबोलं मिळतं. एका विमानअपघाताच्या अवशेषात त्यांना लाखोंची प्राप्ती होते. मात्र ही नांदी ठरते ती त्यांच्या विनाशाची.
आपल्याला पैसा मिळाल्याचं आणि ते आपण कोणालाही न कळवता खिशात घातल्याचं गुपित, हे गुपितच राहायला हवं असतं. मग ते ठेवण्यासाठी तडजोडी या आल्याच. मग खोटं बोलणं, लोकांना फसवणं, वेळप्रसंगी हात उचलणं, प्रसंगी घातपातदेखील, अशा पायऱ्यांनी हा प्रवास होतो आणि एकदा हाती आलेले पैसे टिकवण्यासाठी आपल्या मनःशांतीचा बळी देऊनही हॅन्कला कोणत्याही थराला जाणं भाग पडतं. "सिम्पल प्लान' हा चित्रपट आपल्या कथानकाच्या बाबतीत कुठंही सोपा मार्ग निवडत नाही. सर्व संकटांतून पार पडून नायक मंडळी आनंदात राहू लागली, असा गोड शेवट दाखवून प्रेक्षकांना खूश करत नाही. त्याचा शेवट विदारक आहे आणि तो त्याच्या मध्यवर्ती कल्पनेशी पूर्णतः प्रामाणिक आहे. दिग्दर्शक सॅम रायमीने (इव्हिल डेड, स्पायडरमॅन) यांतला आशय अतिशय प्रभावीपणे पोचवला आहे. विषयात त्याच्या नेहमीच्या चमत्कृतींचा अभाव असूनही 1998 चा सिम्पल प्लान आठवण्याचं कारण म्हणजे प्रियदर्शनचा "मालामाल विकली'. विकली आणि प्लानमध्ये त्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या कल्पनेबाबत खूपच साम्य आहे; मात्र विकलीचा प्रभाव कमी होतो, तो त्याच्या हॅपीली एव्हर आफ्टर शेवटानं.
एक स्पष्टीकरण- विकली आणि प्लान यांच्या मध्यवर्ती कल्पनेत साम्य आहे म्हणजे तो प्लानचं रूपांतर आहे असं मी सांगू इच्छित नाही. कारण ते खरं नाही. विकली हे 1998 च्याच एका दुसऱ्या चित्रपटाचं सही सही रूपांतर आहे, "वेकिंग नेड डिव्हाईन' या आयरिश चित्रपटाचं.
मूळ चित्रपटात आणि मालामालमध्येही सांगितलेला गोष्टीचा प्रकार आहे तो हाच. साध्या, खलप्रवृत्ती अजिबात नसलेल्या लोकांकडून घडत गेलेल्या चुकांचा आणि वाढत जाणाऱ्या संकटांचा. (चित्रपटाचं पोस्टर, अनेक उत्तम अभिनेते पण मेजर स्टार्सचा अभाव आणि प्रियदर्शनची विनोदाची हौस यांनी सुरवातीला हा "इट् स ए मॅड, मॅड, मॅड वर्ल्ड' च्या प्रकारातल्या स्ट्रेट कॉमेडी चित्रपट असेल अशी माझ्यासकट अनेकांची समजूत झाली होती; पण "मालामाल' तितका वरवरचा नाही.) दोन्ही चित्रपटांत विनोद आहे, पण तिरकस शैलीचा.
हिंदी चित्रपटांतल्या विनोदाकडून आपल्या प्रेक्षकाची सर्वसाधारण अपेक्षा असते की त्यानं हसवावं, विचारबिचार करायला लावू नये. एस्केपिझम हा आपल्या चित्रपटांचा मूळ उद्देश असल्याने झालेला हा गोंधळ आहे. "मालामाल' एका अर्थी या गोंधळाचा बळी आहे. कारण आशयाकडे पाहायचं तर चित्रपटातल्या घटना आणि यातल्या व्यक्तिरेखांचं वागणं त्याच्या गाभ्याला धरून राहणारं, प्रामाणिक आहे. पण शेवट? तो स् ुखांत कसा व्हायचा? कारण चित्रपटाचा आलेख आणि त्यातून समोर येणारा संदेश हा नकारात्मक शेवटाची मागणी करतो, जो आपला यशस्वी व्यावसायिक दिग्दर्शक देऊ शकत नाही.
पण हा शेवटचा भाग सोडला, तर "मालामाल विकली' हा आपल्या इतर चित्रपटांच्या तुलनेत लक्षात येण्यासारखा वेगळा आहे. "विरासत'सारख्या चित्रपटांतून प्रियदर्शनने गावच्या पार्श्वभूमीवरची कथा मांडण्याची हातोटी दाखवलीच आहे. मात्र त्यात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा त्यामानाने कमी होत्या. इथे ते काम अधिकच बिकट आहे. याची कल्पना ही छोटीशीच पण चमकदार आहे.
एक छोटं गाव आहे. कर्जबाजारी झालेलं. जमीनदारीणीनं घशात घातलेलं. ती (सुधा चंद्रन) आणि तिचा गुंड भाऊ (राजपाल यादव) गावावर राज्य करताहेत. अशातच गावाच्या लॉटरी विक्रेत्याला (परेश रावल) खबर लागते, की गावात कोणालातरी एक कोटीची लॉटरी लागलीय. ती कोणाला लागली याचा तपास त्याला दारूड्या अँथनीपर्यंत पोचवतो. पण अँथनी आहे मेलेला- हातात विजयी तिकीट धरूनच. मग लॉटरी विक्रेता ठरवतो, की तिकीट स्वतःच्याच घशात घालायचं. पण तेवढ्यात तिथं येऊन पोचतो तो गावचा दूधवाला (ओम पुरी). दोघं ठरवतात, की संगनमतानं पैसे वाटून घ्यायचे; पण भागीदार वाढायला लागतात. दूधवाल्याचा हरकाम्या (रितेश देशमुख), अँथनीची बहीण (रसिका जोशी), चर्चमधला बदली धर्मोपदेशक (शक्ती कपूर) अशी यादी वाढत जाते. यातून जमीनदार पक्षाला याचा सुगावा लागतो आणि पैशांसाठी आपली सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवण्याचा प्रसंग गावकऱ्यांवर येतो.


"मालामाल'मधला नैतिक विचार त्याला इतर विनोदी चित्रपटांपासून वेगळा काढतो; मात्र हा विचार त्याच्या उत्कर्षबिंदूपर्यंत जाऊ शकत नाही. यातल्या एका प्रमुख पात्राने आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत यातला बोचरा विनोद आणि अर्थपूर्ण संहिता यांचा तोल राहतो. पुढे मात्र व्यावसायिक चित्रपटांचा विचार करून सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवले जातात आणि निरर्थक विनोदाच्या गदारोळात चित्रपट संपतो.
मी मघा "सिम्पल प्लान' चं उदाहरण दिलं, ते याच तुलनेकरता. "मालामाल'चा शेवट त्याच जातीतला असता तर अधिक योग्य वाटता आणि पटकथेच्या स्वरूपावरून वाटतं, की हे विनोदाचा बाज ठेवूनही शक्य झालं असतं. मात्र ही तडजोड आपण चालवून घेऊ. कारण 20% तडजोडीने जर आपल्याला 80% चांगला चित्रपट पाहता येणार असेल, तर त्यात वाईट काय!
या चित्रपटाच्या निमित्तानं मला बऱ्याचदा पडणाऱ्या प्रश्नावर मी पुन्हा विचार करायला लागलो. चांगलं रूपांतर म्हणजे नेमकं काय?
चित्रपट हा कलेआधी उद्योग (किंवा धंदा) मानला जात असल्यानं, बऱ्याचदा यशाच्या पुनरावृत्तीच्या अपेक्षेनं केलेली यशस्वी कलाकृतींची पुनर्रचना, असं या रूपांतरांचं स्वरूप असतं. मग हे यश मिळणं हे चांगल्या रूपांतराचं लक्षण मानावं का? मग त्यातल्या आशयाचा रुपांतर यशस्वी वा अयशस्वी ठरण्याशी काहीच संबंध नाही का? तर आहे.
चांगल्या रूपांतरामागे केवळ आर्थिक गणितापलीकडे जाणारा काही हेतू आवश्यक असतो. वेगळ्या भाषेत वेगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणारं काही आपल्याही प्रेक्षकांपुढे यावं, असं जेव्हा एखाद्या दिग्दर्शकाला वाटतं आणि त्या पोटतिडिकेनं तो चित्रपट बनवतो, तेव्हा हे रूपांतर खरं अर्थपूर्ण होतं. कारण केवळ एका साच्यावरून काम न करता त्याच्या विचाराच्या गांभीर्याकडेही मग लक्ष पुरवलं जातं. "मालामाल विकली' हा असा आर्थिक फायद्यापलीकडे जाणारा चित्रपट आहे. या प्रकारचे चित्रपट आपल्याकडे कमी प्रमाणात पाहायला मिळतात, त्यामुळेच त्याच्या निर्मितीला महत्त्व आहे आणि मग त्याच्या तिकीट खिडकीवरल्या आकड्यांनी काही सिद्ध झालं तरी आपण बेधडकपणे म्हणू शकतो, की हे एक चांगलं रूपांतर आहे.
-गणेश मतकरी

Read more...

निळी छटा अपरिहार्य...

>> Tuesday, August 5, 2008

कित्येकदा आपल्या आयुष्यातल्या अभावांची आपल्याला जाणच नसते. दुखऱ्या नसेला स्पर्श होईस्तोवर आपल्याला इथंही दुखतं आहे, हे समजतच नसतं. त्या दुखण्याला आपल्या असण्यात सामावून घेत निमूट विनातक्रार वाट चालत असतो आपण. एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही. या जागांचं ऋणी असावं की शाप द्यावेत त्यांना? हा ज्याच्या त्याचा निर्णय. आपापल्या वकुबानं आणि जबाबदारीनं घेण्याचा.
अशाच एका वळणाची गोष्ट सांगतो 'मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर'.म्हटलं तर ती एक सरळसोट प्रेमकथा आहे - जाहिरातीत म्हटलं आहे तशी विध्वंसाच्या इत्यादी पार्श्वभूमीवरची. आणि तुम्हांला दिसलंच, तर असं एक वळण - जे आपल्यापैकी कुणालाही गाफील गाठू शकतंच.
एखाच्या शांत-निवांत तळ्यासारखं सावलीला पहुडलेलं सुखी आयुष्य तिचं. सुसंस्कृत तमिळ ब्राह्मणाचं धार्मिक कुटुंब, उच्चशिक्षण, स्वजातीत लग्न, काळजी घेणारं सासर, ल्हानगं लेकरू - सगळं कसं चित्रासारखं. कुठे कसला उणिवेचा डाग नाही. माहेरच्या एका मुक्कामानंतर लेकाला घेऊन सासरी निघालेली ती. एकटीच. लांबचा प्रवास. आईबापांनी कुण्या एका फोटोग्राफरची तोंडओळख काढून त्याला तिला जुजबी मदत करायची विनंती केलेली. अर्धा प्रवास तसं सगळं योजल्यासारखं नीट पार पडतंही. तसंच होतं, तर तिला तिच्या त्या सहप्रवाश्याचं नावही कळतं ना. आयुष्य तसंच विनाओरखड्याचं निवांत चालू राहतं. कसल्याही खळबळीविना. पण तसं व्हायचं नसलेलं.
मधेच बस थांबते आणि गावात दंगली पेटल्याचं कळतं. रस्ता बंद. कर्फ्यू लागलेला. माथेफिरूंच्या झुंडी मोकाट सुटलेल्या. बसमधून बाहेर पडणंही धोक्याचं. अशात तिचा सहप्रवासी तिला सांगतो - 'मला जावं लागेल. मी - मी मुस्लिम आहे.' अरे देवा! मी पाणी प्यायले त्याच्या हातचं. आता? बुडाला की माझा धर्म... ही तिची पहिली प्रतिक्रिया. त्याच्यापासून तिरस्कारानं दूर सरकण्यात झालेली. पण बसमधल्या एका म्हाताऱ्या मुस्लिम जोडप्याला ओढून नेताना पाहून ती हबकते, की सोबतीच्या आशेनं का होईना - तिच्यातली माणुसकी डोकं वर काढते कुणाला ठाऊक. 'नाव काय तुमचं?' या एका हिंदू माथेफिरूनं दरडावून विचारलेल्या प्रश्नाला तिच्या तोंडून अभावित उत्तर जातं - 'अय्यर. मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर.'
आता सगळेच संदर्भ बदललेले.
इथवर अपर्णा सेननं आपल्याला बसमधल्या इतर अनेक प्रवाश्यांची ओझरती ओळख करून दिलेली. काही उत्साही तरुण मंडळी. रोमॆण्टिक. काही बाटल्या आणि पत्ते घेऊन मजा करणारे सद्गृहस्थ. काही फाळणीत पोळून निघालेले शिख व्यापारी. काही हनीमूनर्स. आणि ते मुस्लिम आजी-आजोबांचं जोडपंही. सगळीच माणसं. थोडी काळी. थोडी पांढरी. तुमच्याआमच्यासारखीच. ती तशी नसती, तर त्या ज्यू तरुणानं 'ते - ते मुस्लिम आहेत'असं म्हणून त्या म्हाताऱ्या जोडप्याचा बळी का चढवला असता? पण त्यालाही स्वत:च्या जिवाची चिंता आहेच. त्याबद्दल त्याला दोषी ठरवणारे आपण कोण? आपल्यावर अशी वेळ आली, तर आपण नक्की कसे वागू हे छातीठोकपणे सांगता यायचं नाहीच आपल्याला...
असे अनेक संमिश्र संदर्भ पेरले गेलेले. असल्या विद्वेषी हिंस्रपणाला आपल्या रुटीनचा एक भाग बनवून टाकणारे वृत्तपत्रीय मथळे या ना त्या निमित्तानं दाखवत राहते अपर्णा सेन. कुठे मासिकाचं एखादं पान, कुठे चिक्कीला गुंडाळून आलेला बातमीचा तुकडा. बसबाहेर सापडलेली त्या मुस्लिम म्हाताऱ्याची कवळी. मुद्दाम पाहिले नाहीत, तर लक्षातही येऊ नयेत, पण असावेत सगळीकडेच...
या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर एका प्रवासापुरते एकत्र आलेले ते दोघं. कर्फ्यू. धुमसती दंगल. प्रवास अशक्यच. हातात लहान मूल. राहायला जागा नाही कुठेच. त्याची सोबत-मदत तर हवी आहे, थोडी त्याच्या जिवाचीही चिंता आहे. पण तो मुस्लिम आहे म्हणून होणारी अभावित चिडचिडही. कुठून यात येऊन पडलो, असा थोडा बालिश वैतागही. तो मात्र शांत. आतून संतापानं-असुरक्षिततेनं धुमसणारा. पण तिच्या मूलपणाची जाणीव असणारा. बिनबोलता तिला जपणारा. त्याच्यातला कलावंत एकीकडे या सगळ्यातलं वाहतं जीवन टिपतो आहे. अस्वस्थ होतो आहे. बसमधे काढलेल्या त्या रात्रीनंतर तो कॅमेरा घेऊन बाहेर पडतो, तेव्हा त्यानं टिपलेल्या फ्रेम्स आयुष्याचं हे संमिश्र रुपडं अबोलपणे दाखवत राहतात. नदीच्या पाण्यातली म्हाताऱ्याच्या चष्म्याची तुटकी केस. थकून चाकावर डोकं टेकून झोपलेला ट्रक ड्रायव्हर. गाडीच्या आरश्यात पाहून मिशी कातरणारे कुणी एक सद्‌गृहस्थ. खोळंबलेली रहदारी. वाहतं पाणी. कोवळं ऊन. अव्याहत.
आता मिस्टर अय्यर यांना नाव निभावणं भाग आहे. औटघटकेच्या या लेकराची नि बायकोची जबाबदारीही.
आता त्यांच्यात घडतं ते काहीसं कवितेच्या प्रदेशातलं.
फॉरेस्ट बंगलोमधली ताजीतवानी संध्याकाळ. भोवताली पसरलेलं जंगल. उन्हातलं जंगल टिपणारा तो आणि त्याच्यावर विश्वासून मोकळी-ढाकळी झालेली ती. त्याच्या कॅमेऱ्याला डोळे लावून ऊन निरखणारी तिची एक निरागस मुद्रा त्यानं टिपलेली. आणि मग अशा अनेक मुद्रा तिच्या. हसऱ्या. संकोची. लटक्या रागातल्या... त्याच्या कॅमेऱ्यात बंद.
दिवसा गावात परतून तिनं सुखरूप असल्याचा घरी केलेला फोन आणि बसमॅनेजर म्हणून फोनवर अभिनय करायची त्याला केलेली विनंती.
'आम्हांला सांगा नं कसं जमलं तुमचं लग्न...' या कोवळ्या पोरींच्या उत्सुक प्रश्नावर त्यांच्यात पसरलेली अवघडलेली शांतता. आणि ओठांवर लाजवट स्मित खेळवत तिनं दिलेलं उत्तर. चकित तो. पण तिचं उत्तर निभावत किर्र जंगलातल्या मधुचंद्राचे तुटक तपशील देणारा.
ठिबकत्या दवाचा आवाज ऐकत संध्याकाळी बंगलोच्या व्हरांड्यात त्या दोघांनी मारलेल्या गप्पा. दंगलीच्या त्याच्या भयचकित आठवणी आणि हिंदू स्त्रियांच्या भालप्रदेशावरच्या रक्तबिंदूचं त्याला असलेलं अनाकलनीय आकर्षणही. दोघांनी मिळून कॅमेऱ्यात पकडलेली स्वप्नील हरणं. आणि त्याच कॅमेऱ्याच्या भिंगातून हतबलपणे निरखलेला कुण्या अभागी दंगलग्रस्ताचा जाता जीवही.
रक्ताच्या त्या चिळकांडीनं आणि माणसाच्या इतक्या सहजस्वस्त मरणानं मुळापासून ढवळून निघालेली ती. त्याच्या मिठीत विसावलेली. त्याचा हात घट्ट धरून झोपी जाणारी.
त्या रात्री अपर्णा सेनचा कॅमेरा त्या दोघांच्या निरागस जवळिकीचे तपशील चितारतो. ती फक्त एक भ्यालेली लहानशी मुलगी आहे. आणि तो तिचा सखा. बस. रात्र सरते. उमलत्या सकाळीसोबत तिला जाग येते आणि कॅमेरा हलकेच मागे येतो. क्लोज अप्स पुसले जातात आणि आपल्याला एक दूरस्थ चित्र दिसत जातं. आता पदरा-कुंकवाचं भान असलेली एक विवाहित स्त्री आहे ती. आरश्यापाशी जाऊन केस नीटनेटके करताना हलकेच टिकली आरश्याला चिकटवून थोडी सैलावते ती फक्त. लहानसं दृश हे, पण किती किती संदर्भ जागे करून जाणारं... तिच्या चौकटीतल्या विवाहित आयुष्याचे आणि त्याला मोहवणाऱ्या त्या कुंकवाच्या आकर्षणांचे...
परतीचा प्रवास सुरळीत सुरू. 'आता कुठे जाणार मग?' वरवर सहजपणा दाखवत तिनं त्याला केलेली पृच्छा. आणि त्यानं कुठल्याश्या जंगलाचं नाव सांगितल्यावर 'एकटाच जाणारेस?' हा स्वत:च्याही नकळत तिच्या तोंडून बाहेर पडलेला नाईलाज प्रश्न.
इथवर सगळं स्वप्नील-धूसर. पण तो तिच्या नजरेत नजर गुंतवून थेट उत्तर देतो - 'तू येणार नसलीस, तर एकटाच.'
हसत हसत रेषेपल्याड राखलेले सगळे सगळे बंध एकाएकी कधी नव्हे इतके निकट आलेले.
तिच्या 'मीनाक्षां'चा त्यानं हलकेच बोटांनी गिरवलेला आकार. त्यानं उष्टावलेलं पाणी तिनं सहज पिणं. सोबतीचा जवळ येणारा शेवट जाणवून त्याच्या खांद्यावर विसावणं. अंतरं मिटलेली आहेत आणि नाहीतही...
तिच्याकडे सहज पाठ फिरवून चालता होतो तो.
वळण संपलं.
त्यानं टिपलेला हा प्रवास मात्र तिच्या मुठीत दिल्यावाचून राहवत नाहीच त्याला.
त्यावर भरल्या नजरेनं तिनं 'मिस्टर अय्यर'ना दिलेला निरोप आणि तिच्या नजरेत धूसरलेली त्याची पाठ.
अपर्णा सेनचा कॅमेरा आता स्थिरावतो तो त्याच्या खऱ्या नावाच्या पाटीवर.
प्रवासापुरतं घेतलेलं नाव संपलं. वळणही संपलं.
त्याचे पडसाद मात्र अभंग उरतील. त्या दोघांच्याच नाही, आपल्याही आयुष्यात. विषाची चव चाखली आहे आता ओठांनी. निळी छटा अपरिहार्य...
- मेघना भुस्कुटे

Read more...

हल्कचा पुनर्जन्म

>> Sunday, August 3, 2008

सुपरहिरो या संकल्पनेतलंच एक अविभाज्य अंग म्हणजे दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व. या दुभंगण्याचं प्रमाण जरूर वेगवेगळं असेल, पण त्याचं अस्तित्व अन्‌ या नायकांना एरवीच्या जगात वावरण्यासाठी असणारं त्याचं महत्त्व हे वादातीत. मला वाटतं एक्‍स मेन मालिकेतली सुपरनायक- नायिकांची गर्दी या स्प्लिट पर्सनॅलिटी प्रकरणातून काही प्रमाणात मुक्त. मात्र, इतरांसाठी हे डिपार्टमेंट फार महत्त्वाचं. साहजिकच या नायकांवर आधारित चित्रपटांमध्ये हे व्यक्तिमत्त्व विभाजन लक्षात घेण्याजोगं. अभिनेत्यांनाही ते अधिक आव्हानात्मक. कारण बहुधा एका ठायी वसलेली ही दोन व्यक्तिमत्त्वं (वा आभास) केवळ एकमेकांपेक्षा वेगळीच नाही, तर पूर्णपणे विरुद्ध म्हणजेच सुपरमॅन देखणा/शक्तिशाली तर क्‍लार्क केन्ट वेंधळा/घाबरट, बॅटमॅन आपल्या भूतकाळातल्या मानसिक जखमा घेऊन गुन्हेगारांशी चारहात करणारा, तर ब्रूस वेन आपल्या श्रीमंतीचा दिखावा करत मुलींमागे फिरणारा. इतरांसाठीही हे काही प्रमाणात खरं. गमतीची गोष्ट म्हणजे हे आव्हान डी. सी. कॉमिक्‍सच्या नायकांना अधिक लागू पडतं अन्‌ मार्व्हलच्या नायकांना कमी. कारण डी.सी.च्या मुख्य नायकाचा चेहरा हा दोन्ही रूपांत फार बदलत नाही. बॅटमॅनसारखा नायक मुखवटा जरूर घालतो. मात्र, त्यातूनही त्याचा चेहरा अदृश्‍य होत नाही. मार्व्हलच्या स्पायडरमॅन, आयर्न मॅनसारख्या नायकांचा चेहरा हा महानायक बनताच मुखवट्याआड जातो अन्‌ मग मूळ अभिनेता इथे असण्या-नसण्याने फरत पडत नाही. मार्व्हलच्याच इनक्रिडीबल हल्कमध्ये तर हे आव्हान अधिकच कमी होतं. कारण इथला नायक हा पूर्णतःच नाहीसा होतो अन्‌ त्याजागी येते त्याची संगणकीय प्रतकृती. २००३ मध्ये दिग्दर्शक ऍन्गलीने घेतलेला हा अभिनेत्याऐवजी प्रतकृती वापरण्याचा निर्णय २००८ च्या आवृत्तीत दिग्दर्शक लुईस लेटेरीअर बदलू पाहत नाही. ही एक गोष्ट सोडता इतर बाबतीत मात्र तो चित्रपट विसरून जायचाच मार्व्हलचा इरादा दिसतो. इनक्रिडीबल हल्क आणि इतर सुपरहिरो यांमध्ये फरक आहे. हल्क हा पूर्णपणे ऍन्टीहिरो आहे. तो हल्क तर अपघाताने झालाच आहे, वर हल्क म्हणून तो कोणाचं भलं वगैरे करू शकत नाही. कारण या राक्षसी अवतारात असताना त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. ब्रूस बॅनर या मानवी अवतारातली त्याची विचार करण्याची क्षमता, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी तो महाकाय हल्क होताच परागंदा होतात आणि साधारण नासधूस करणं हा एक कलमी कार्यक्रम त्याच्यापुढे उरतो. शिवाय इतर सुपरहिरोंप्रमाणे तो हवा तेव्हा वेगळ्या रूपातही जाऊ शकत नाही. ब्रूसचं उत्तेजित होणं, हे त्याला हल्क बनवायला पुरेसं ठरणारं असतं. त्यामुळे सुपरपॉवर हे ब्रूससाठी वरदान तर नाहीच, वर जवळपास तो एक आजार आहे. ऍन्ग लीने आपला मूळ "हल्क' बनवतेवेळी ही बॅनर आणि हल्कमधली गुंतागुंत लक्षात घेतली होती आणि त्यावर चित्रपटाची संकल्पना केंद्रित केली होती. हल्कची ओरिजीन मांडतानाही त्याने सांकेतिक वळणांनी न जाता बॅनरच्या वडिलांनाच गुन्हेगार ठरवलं होतं आणि पालक/ मुलांमधल्या विसंवादाला उपसूत्र असल्यासारखं वापरलं होतं. बॅनर (एरिक बाना) आणि नायिका बेटी (जेनिफर कॉनेली) या दोघांची आपल्या वडिलांबरोबरची तणावपूर्ण नाती हा पटकथेचा महत्त्वाचा घटक होता. या सगळ्याने झालं काय, की नेहमीच्या सुपरहिरोपट - प्रेक्षकांना आणि हल्कच्या फॅन्सना जे अपेक्षित होतं, ते पुरेशा प्रमाणात न देता चित्रपटाने एक प्रौढांसाठी असणारी, जवळजवळ प्रतकारक दंतकथा उभी केली. त्यातून शेवटचा भाग तर इतका गोंधळाचा झाला, की अनेकांना शेवट नीटसा कळला नाही. तात्पर्य म्हणजे मार्व्हलचा एक लोकप्रिय नायक प्रेक्षकांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आणि संबंधित निर्माते हतबुद्ध झाले. पुढे सीक्वल आलं तर नाहीच, वर ते येणार की नाही असा संभ्रम तयार झाला. खरं तर ऍन्ग लीचा प्रयोग हा चांगला आणि वैशिष्ट्यपूर्ण होता आणि चित्रकर्त्यांनी त्याचा टोन अधिक सोपा करतानाही त्याच्या मूळ युक्तिवादाला ठेवलं असतं, तर सुुपरहिरोपटांमध्ये हळूहळू एक नवा प्रवाह येऊ शकला असता. मात्र, इथे मूळ चित्रपट पुसून टाकायचं ठरलं आणि त्याचा परिणाम म्हणून २००८चा इनक्रिडीबल हल्क अवतरला. नव्या ओरीजिनसह, चाहत्यांना अधिक पटेलशा स्वरूपात आणि मानसिक द्वंद्वाला दुय्यम पातळीवर ठेवून ऍक्‍शनला प्राधान्य देत. यंदा आयर्न मॅन आणि हल्क या दोन चित्रपटांनी नायक म्हणून दोन अनपेक्षित अभिनेत्यांना प्रमुख भूमिका देऊ केल्या आहेत. आयर्न मॅनमधल्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि इथला एड नॉर्टन हे नावाजले आहेत गंभीर अभिनेते म्हणून आणि सुपरहिरोपटांत ते पाहायला मिळतील (तेही नायक म्हणून) असं कुणालाही वाटलं नसतं. नाही म्हणायला दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वांना नॉर्टन फार नवीन नाही. प्रायमल फिअर आणि फाईट क्‍लब नंतरचा हा त्याचा तिसरा यशस्वी प्रयत्न. नव्या हल्कने जरी जन्मकथा बदलली, तरी परंपरेप्रमाणे तो तिच्यावर फार वेळा काढत नाही, उलट आधी एक चित्रपट येऊन गेल्यासारखा आभास निर्माण करत (पहा "स्पायडरमॅन-२') जवळजवळ रिकॅप असल्यासारखी ही ओरिजीन मांडतो. ही सोडली तर चित्रपटाचा आकार हा "चेज' चित्रपटासारखा म्हणता येईल. म्हणजे बॅनरचं पळणं आणि खलनायक मंडळींचं अधिकाधिक जवळ येत जाणं. प्रामुख्याने नायक अन्‌ खलनायक यांमधले तीन झगडे आपल्याला पाहायला मिळतात. यातला पहिला सर्वांत वेगळा, कारण तो घडतो ब्राझीलमधल्या प्रचंड झोपडपट्टीत. जर इथे सुरवातीला दिसणारं दृश्‍य जर संगणकीय नसून खरं असेल (आणि ते वाटतंही खरं) तर आपली धारावी या वस्तीसमोर छोटीशी वसाहत वाटावी. इथला बराच भाग आपल्यासमोर हल्क नसून बॅनर आहे आणि संगणकीय चमत्कारांना फारशी जागा नाही. याउलट तिसरा आणि अखेरचा झगडा प्रभावी असला, तरी अधिक स्पष्टपणे खोटा वाटणारा, अनेक शॉट्‌ससाठी संगणकाची मदत घेणारा आणि पारंपरिक वळणाचा. मात्र, स्पेशल इफेक्‍ट्‌सची आवड असणाऱ्यांना हा शेवट आवडून जाईल. बेटी (इथे लिव टायलर) आणि तिचे वडील (इथे विलिअम हर्ट) ही पात्रं २००३ प्रमाणेच इथेही असली तरी इथे त्यांच्या नात्याला समांतर नातं बॅनरच्या बाजूने येत नाही. त्यामुळे या नात्याला थीमसारखं वापरलं जाता, त्याला नायिका आणि तिचे दुष्ट वडील हा सांकेतिक आकार येतो. इथला दुसरा आणि अधिक ठळक खलनायक असणारा ब्लॉन्स्की मात्र टिम रॉथसारख्या नावाजलेल्या अभिनेत्याने उभा करूनही फार लक्षात राहत नाही. डॉ. ब्रूस बॅनर आणि त्यांचा ताबा सुटताच आकाराला येणारा हल्क या कल्पनेला उघडच डॉ. जेकील ऍन्ड मि. हाईड या कल्पनेचा आधार आहे. तसंच हल्कच्या राक्षसी वागण्यावर उतारा ठरणारी त्याची बेटीबरोबरची हळुवार वागणूक ही ब्यूटी ऍन्ड द बीस्टची आठवण करून देणारी. या दोन गाजलेल्या कल्पनांचा वापर आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोचेलसा स्पष्ट स्वरूपात मांडणं हे इनक्रिडीबल हल्कमध्ये जमवलेलं आहे आणि ते त्याच्या एकूण परिणामाला पूरक ठरतं. एकूण पाहता हा नवा हल्क अधिक सोपा. आर्थिक गणिताला प्राधान्य देऊन रचलेला असला आणि आशयाशी काही प्रमाणात तडजोड ही त्यात गृहीत धरलेली असली, तरी तो दर्जाशी तडजोड करत नाही. वेगळी वाट निवडत नसला, तरी जुन्या वाटेवरूनचा प्रवास अधिक सुकर होईल, याची काळजी घेतो. चित्रकर्त्यांनी आपल्या सोयीसाठी काढलेला हा मध्यममार्ग असला, तरी या मार्गावरून हल्क लांबचा पल्ला गाठेल, असा विश्‍वास तयार करतो.

- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP