हाफहार्टेड रईस

>> Friday, February 3, 2017


लोकसत्ता गप्पांच्या कार्यक्रमात जावेद अख्तरना ' मै आजभी फेके हुए पैसे नही उठाता' या प्रकारचे जबरदस्त डायलाॅग्ज कसे लिहायचात असा प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले ‘आज मला तसे डायलाॅग्ज बरे वाटत नाहीत. ते खोटे वाटतात, आजचे संवाद हे असे टाळीबाज नसतात, अधिक नैसर्गिक असतात.’ असं असतानाही त्यांचा मुलगा सहनिर्माता असलेल्या रईसमधे जागोजाग अशा टाळीबाज वाक्यांची रेलचेल आहे. या वाक्यांचा प्राॅब्लेम हा असतो, की संवाद तेवढ्यापुरता एेकायला बरा वाटला , प्रसंग चमकदार वाटला, तरी व्यक्तिरेखा खऱ्या वाटत नाहीत. त्या मुळापासून उभ्या नं रहाता वरवरच्या वाटतात. 

शब्दबंबाळ संवाद आणि प्रसंगांचं जुनाट पद्धतीचं डिझाईन हा भाग आज फार कंटाळा आणतो. एखाद दुसऱ्या प्रसंगात हे ठीक वाटतं, पण कोणतच पात्र दुसऱ्याचा शब्दही खाली पडू देत नसेल तर जरा वेळाने कंटाळा यायला लागतो. पुन्हा हे संवाद असणारे प्रसंग आशयाचा दृष्टीने काही घडणारे आहेत, पण त्या घडवण्याची पद्धतही जुन्या सिनेमातल्यासारखी , ड्रामेबाज. जयराजचं आव्हान आणि त्याला पुढे दिलेल्या प्रत्युत्तराबरोबरची घड्याळाची फेकाफेक, मजमूदारच्या रईसबरोबरच्या पहिल्या भेटीतला चहाचा संदर्भ आणि तो पुढे वापरणं , हे सगळच कृत्रिम वाटतं, आणि ते सतत आहे. मुद्दा कळला, पुढे चला, असं म्हणावंसं वाटतं. 

काही वर्षांपूर्वी हे चालून जात असे पण आज कालबाह्य वाटतं. किंबहुना केवळ संवादाबाबत नाही तर एकूणच रईस हा जुन्या वळणाचा सिनेमा आहे. अॅन्टीहिरोला पारंपारिक पद्धतीने डेव्हलप करत त्याच्या गडद बाजूंवर रंगसफेदी करणारा, मेलोड्रामा हाच धर्म समजणारा, अनावश्यक गाण्यांची गर्दी असलेला, सरधोपट खलनायक असणारा आणि इनकन्सिस्टन्ट व्यक्तिरेखांना ग्लोरिफाय करणारा. 

याचा अर्थ तो काही टाकाऊ आहे असा अजिबातच नाही. एेशीच्या दशकात तर तो खूपच जोरदार वाटला असता. त्यातले अमिताभचे संदर्भही त्यामुळेच चपखल आहेत. रईसची व्यक्तिरेखाही दिवारमधल्या अमिताभमधे तीसेक टक्के त्रिशूलमधला अमिताभ मिसळल्यासारखी वाटते. असो. चित्रपट जुन्या काळात घडणारा असणं, आणि जुनाट वाटणं , यात फरक आहे. (संदर्भासाठी पहा - गँग्ज आॅफ वसेपूर) . आज रईस जुनाट वाटतोच. तरीही, अडीच दशकं उशीर करुनही तो ठीक वाटतो हेच विशेष. 

कोणत्याही नॅरॅटीवचे सुरुवात, मध्य आणि शेवट असे तीन भाग असल्याचं अॅरिस्टाॅटल म्हणतो, पण हिंदि चित्रपटात मध्य हा फार डाॅमिनेट करतो असं आपल्याला दिसतं. या तीन विभागातून जो ग्राफ तयार व्हायला हवा तो बहुधा होत नाही आणि बराच वेळ एका पदधतीतच घटना घडत रहतात. सुरुवात आणि शेवट हे नावालाच असतात. रईसमधेही साधारण हाच प्रकार आहे. प्रत्यक्षात रईसने ( एसार्के )स्वत:ला कसं प्रस्थापित केलं हा भाग इन्टरेस्टिंग झाला असता, पण तो भाग फारसा न दिसता, केवळ त्याने जयराजने   ( अतुल कुलकर्णी) मागितलेल्या पैशांची सोय कशी लावली हे तो दाखवतो आणि थांबतो. तिथून पुढे प्रस्थापित होण्याचा भाग मोन्ताजमधे येतो. त्यामानाने शेवटाकडे किंचित ग्राफ दाखवण्याचा प्रयत्न आहे, पण त्यातला कळीचा मुद्दा ' धंदा तोवर चांगला जोवर तो दुसऱ्याचं नुकसान करत नाही ' , हा बाकीच्या मसालेदार फिल्ममेकिंग आणि संवादफेकीत आफ्टरथाॅटसारखा येतो, आणि पुरेसा अधोरेखित होत नाही. 

चित्रपटभर पसरलेला, आणि मुख्य बाॅडी असणारा भाग हा गुजरातमधलं प्रोहिबिशन धाब्यावर बसवून दारुचा धंदा करणारा आणि पुढे थोडाफार गॅंगस्टर झालेला रईस आणि त्याच्यामागे वेड्यासारख्या लागलेला इन्स्पेक्टर मजमूदार ( नवाजुद्दीन ) यांचा संघर्ष , हा आहे. पण हा संघर्ष बराचसा अनइव्हन आहे, दोन कारणांसाठी. पहिलं म्हणजे मध्यंतरापर्यंत जयराजचं पात्र अधिकृत खलनायक असल्याने मजुमदार ही दुय्यम व्यक्तिरेखा रहातो. त्यानंतरही, मजमूदारचं पात्र इनकन्सिस्टन्ट रहातं. प्रत्यक्षात रईस हा हार्डकोअर बॅड गाय नाही. तो दारुचा धंदाही करतो, पण हा धंदा गुजरातच्या चौकटीत मोठा गुन्हा असला तरी एका पोलिस अधिकाऱ्याबरोबर एवढा जीवघेणा संघर्ष उत्पन्न होण्यासारखा हा गुन्हा वाटत नाही. त्यात चित्रपटभर त्यांचा संघर्ष काहीसा लव्ह-हेट रिलेशनशिप असल्यासारखा वाटतो. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटचं मजमूदारचं वागणं पटत नाही. चित्रपटाचं एकूण तर्कशास्त्र आजचं नाही , अॅंग्री यंग मॅन पिरीअडचं आहे. त्या तुलनेत शेवट ( शेवटाचं तर्कशास्त्र- एन्ड रिझल्ट नाही) आजच्या चित्रपटात चालण्यासारखा आहे. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटत रहातं.

तपशीलात रईस बराच मार खातो. प्रत्यक्ष धंद्याचे बारकावे नं दाखवता, वरवरच्या गमजा मारण्यात आणि आॅब्विअस निराक्षणं ( उदाहरणार्थ दप्तरातून दारू नेणे) करण्यात त्याचा बराच वेळ जातो. खलनायकांची अनावश्यक गर्दी असल्याने कोणाचाच विशेष प्रभाव पडत नाही. मुसाची व्यक्तिरेखा तर कॅमिओच वाटते. अतुल कुलकर्णी ला काही प्रसंग येतात. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता ही तर कार्टून्सच वाटतात. त्यांचं वागणं कुठेही, एकाही प्रसंगात पटत नाही. खरे गुजरातचे मुख्यमंत्री किती चतुर असतात हे आपल्याला माहीतच आहे. त्या मानाने चित्रपटातले राजकारणी भलतेच बावळट वाटतात. त्यांच्यापुढे रईसचं नांगी टाकणंही पटत नाही. हे सावरायलाच शेवटी मजमूदारला खलनायकी पावलं उचलावी लागतात असंही वाटून जातं. 

ते सगळं सोडताही रईस निवडून येतो त्याचा फायदा - तोटा काय, ते दिसत नाही. रईसच्या मुलाचं हवं तेव्हा दिसणं आणि बाकी गैरहजेरी तर हास्यास्पदच. चित्रपटाचा काळ गाण्यांमधे विसरल्यासारखा वाटतो. आणि नायिकेच्या संपूर्ण व्यक्तीरेखेतही. 

चित्रपटाच्या नसानसात भिनलेला मेलोड्रामा बाजूला केला तर चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना  अधिक पटण्यासारखी आहे. रईसचा प्रत्यक्ष काळ्या धंद्याकडून गॅंगस्टरीझमकडे जाणं , तिथून मार्ग बदलून अधिकृत व्यवसायात शिरण्याचा प्रयत्न करणं ( जे खरोखरच तेव्हाच्या गॅंगस्टर्सनी केलं, काहींना ते जमलं, काहींना नाही) आणि शेवटी त्याच्या भूतकाळातल्या पापांचा घडा भरणं, हे पुरेसं वजन असणारं आहे. प्रमुख भूमिकेत शहारुख खान असल्याने त्या व्यक्तिरेखेला अमुक एक वजन देण्याचं आणि नवाजुद्दीनने आपली बाजूही नेहमीच्याच हुशारीने सांभाळण्याचं काम केल्याने एकूण चित्रपट चालून जातो. कंटाळा आणत नाही , पण अपेक्षेइतका आवडत नाही. परझानिआ केलेल्या राहूल ढोलकीआंकडून याहून अधिक अपेक्षा नक्कीच होत्या. 
 
-  गणेश मतकरी

Read more...

नटसम्राट आणि नटसम्राट

>> Thursday, January 26, 2017
  साहित्य, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमधला एक प्रमुख फरक म्हणजे त्या त्या  माध्यमानुसार  कर्त्याच्या भूमिकेत येणारा बदल. साहित्य लिहिताना लेखक हा एकटाच असतो. सारं काही येतं ते त्याच्याच डोक्यातून, त्यामुळे त्याचं त्याच्या लेखनावरचं नियंत्रण हे संपूर्ण असतं. वाचक जेव्हा या साहित्यकृती वाचतो आणि आपल्या डोक्यात त्या शब्दांचं दृश्यरुप तयार करतो, तेव्हा काही प्रमाणात हे नियंत्रण त्याच्याकडेही जातं, वाचणाऱ्याची वैयक्तिक कल्पनाशक्ती ही या रसग्रहणात महत्वाची ठरते  आणि त्यामुळे बरेचदा एकच पुस्तक एकाला आवडलं, तर दुसऱ्याला नाही, असं होऊ शकतं.

  नाटकामधे ही कर्त्याची भूमिका लेखक आणि  दिग्दर्शक , या दोघांमधे विभागली जाते. नाटकातही रंगमंचाची मर्यादा असतेच, त्यामुळे प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीचा भाग काही प्रमाणात असावाच लागतो, पण दिग्दर्शकाने घडवलेल्या दृश्य योजना, या प्रेक्षकावर एक प्रभाव पाडतात आणि त्याच्या कल्पनाशक्तीला दिशाही देतात. चित्रपटात, हे पारडं दिग्दर्शकाच्या बाजूने झुकतं आणि लेखकाला दुय्यम वा त्याहूनही कमी महत्व जातं. दिग्दर्शकाची प्रेक्षकाच्या डोळ्यासमोर सारं घडवण्याची शक्तीच इथे अधिक महत्वाची ठरते, आणि त्यापुढे बाकी सगळ्याच गोष्टी कमी महत्वाच्या ठरतात.

  नाटक आणि चित्रपटात आणखी एक फरक पडतो तो हा, की रंगभूमीचं नेपथ्य हे कायमच प्रतीकात्मक असतं. कितीही वास्तवदर्शी नेपथ्य असलं, तरी ते खरं मानण्यासाठी प्रेक्षकाला मनाची तयारी ठेवावीच लागते, आणि ही तयारी हा नाटकाचा अविभाज्य भाग असल्याने हे माध्यम वास्तवदर्शनाला बांधलं जात नाही. पात्रांनी मनातलं बोलून दाखवण्यासाठी केलेली स्वगतं, प्रकाशयोजनेत विशिष्ट परिणाम साधण्यासाठी केलेली कृत्रिम योजना, मर्यादीत पात्रांत अधिकांचा परिणाम साधण्यासारख्या क्लुप्त्या, या नाटकाचा प्रेक्षक समजून घेऊ शकतो. चित्रपटात यातलं काही चालत नाही, वा अपवादाने चालतं. मंचावर सभेचा प्रसंग दहा माणसात होऊ शकेल, जो चित्रपटात होणार नाही, नाटकात प्रमुख घटना एका नेपथ्यापुढे घडवणं शक्य होईल, चित्रपटात ती ( ट्वेल्व अॅंग्री मेन सारखी ) कथेची अपरिहार्य आवश्यकता असल्याखेरीज प्रेक्षकाला पटणार नाही. चित्रपटात कथानक प्रसंगानुरुप चौफेर भटकू शकतं, हा त्याचा निश्चितच फायदा, पण त्याचवेळी त्यातल्या प्रतीकात्मक स्वातंत्र्यावर येणाऱ्या मर्यादा, त्याचं वास्तवाच्या आभासापुढे आशयाच्या शक्यतांना बाजूला सारणं, हा एक मोठा तोटा. नटसम्राटच्या बाबतीत हा तोटा, ही मर्यादा, जाणवण्यासारखी.

  वि वा शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक आल्याकडचं महत्वाचं नाटक यात वाद नाही. काहीसं मुक्त स्वरुपातलं, म्हणजे कधी बाॅक्स सेटच्या नियमांना धरुन प्रसंग  घडवणारं, तर कधी  प्रमुख पात्राच्या मनोव्यापारांबरोबर, आणि स्वगतांसह मुक्त विहार करणारं. शिरवाडकरांमधल्या  कवीने त्यांच्यातल्या नाटककारावर मात केलेलं हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर यशस्वी, पण वृत्तीने काहीसं प्रायोगिकच. शेक्सपिअरचं किंग लीअर ही नटसम्राटमागची मूळ प्रेरणा असली, तरी लिअरचं सम्राटपद जितकं खरं, भव्य, तितकं नाटकातल्या बेलवलकरांचं, एका नटाचं अर्थात नाही. त्याचं सम्राटपद मानद, त्यापलीकडे त्याचं आयुष्य हे मध्यमवर्गीयाचच. त्यामुळे त्यातली शोकांतिकाही एका मानी, परंतु मध्यमवर्गीय म्हाताऱ्याचीच. ही गोष्ट नटसम्राट नाटकाला लिअरपेक्षा वेगळं ठरवत असली, तरी हेही खरं, की आपल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकाचं या व्यक्तीरेखेशी नातं तयार होतं, ते तो त्यांच्यातला एक भासल्यामुळेच. त्याच्या आयुष्यातला प्रश्न, हा घराघरात दिसणारा आणि त्यामुळेच त्या शोकांतिकेला त्याच्या  प्रेक्षकांपुरतं तरी एक वैश्विक रुप येतं हेदेखील लक्षात घेण्याजोगं. नटसम्राट प्रचंड प्रमाणात प्रेक्षकप्रिय असण्यामागेही हे महत्वाचं कारण आहे आणि ही नाट्यकृती चित्रपटात रुपांतर करायला चांगली ठरते तीदेखील त्यातल्या नाट्यपूर्णतेबरोबरच, आजही  तग धरुन राहिलेल्या, वाढत चाललेल्या या समस्येमुळे.


  महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या आणि किरण यज्ञोपवित-अभिजीत देशपांडे यांनी लिहिलेल्या नटसम्राटच्या पडद्यावरच्या आवृत्तीचं तिकिट खिडकीवरचं यश आपल्याला माहित आहेच, ज्यामागे मूळ नाटकाची किर्ती, नाना पाटेकरांची लोकप्रियता आणि प्रत्यक्ष समस्येची मांडणी, या तिन्ही गोष्टी आहेत. अर्थात किर्ती, किंवा नट म्हणून लोकप्रियता या गोष्टी अशा आहेत की त्या प्रेक्षकाला चित्रपटगृहात आणायला आणि पहिल्या काही दिवसांपुरतं चित्रपटगृह भरायला पुरेशा असतात, त्यापलीकडे तो चालला याचा अर्थ प्रेक्षकांना त्यातून अपेक्षा होती ते मिळालं असा घ्यायला हरकत नाही. त्यामुळे प्रेक्षकपसंती हा मुद्दा वादातीत, असं मान्य करुनच आपण पुढे या रुपांतराकडे पाहू शकतो.

  रचनेच्या दृष्टीने पाहिलं, तर मूळ नाटक हे लिनीअर, एकरेषीय आहे. नटवर्य गणपतराव बेलवलकर आपल्या यशस्वी कारकिर्दीतून निवृत्त झाले, आणि त्यांनी आपल्या साऱ्या मालमत्तेची वाटणी करुन टाकली, अशा स्मरणप्रसंगात ते सुरु होतं आणि पुढे क्रमाने त्यांच्या परिस्थितीत होणारा ऱ्हास आपल्याला दाखवत जातं. चित्रपट हा बेलवलकरांच्या अखेरच्या दिवसांमधल्या काही  घटना दाखवत सुरु होतो पण त्यानंतर मात्र तो मूळ एकरेषीय मांडणीकडेच वळतो. सुरुवातीच्या प्रेक्षकांशी बोलण्याच्या स्वगतातला आणि त्या प्रसंगातला काही भागही चित्रपटात येतो, पण मूळ नाटकात तो पूर्ण प्रसंगच वास्तवाबाहेरचा, बेलवलकरांच्या आठवणीसारखा आहे, ते रुप अर्थात चित्रपटाच्या काॅंक्रीट रिअॅलिटीला येत नाही. माझ्या मते, ही संदिग्धता जाणं, प्रमुख व्यक्तिरेखेच्या प्रेक्षकांशी होणाऱ्या काहीशा संज्ञाप्रवाही वळणाच्या  थेट संवादाचं , वास्तवाच्या चौकटीत बसू पहाणाऱ्या छोट्या प्रसंगात रुपांतर होणं, याने नाटकाचा आशय तर पोचतो पण नाटकाच्या काव्यात्म प्रवृत्तीचं नुकसान होतं.

  या पहिल्या प्रसंगासारखीच अनेक प्रसिद्ध स्वगतं चित्रपटात शाबूत ठेवण्याचा या रुपांतरात प्रयत्न आहे जो स्तुत्य तर आहे, पण त्यातली कसरत जाणवते. चित्रपटांमधे बहुधा  स्वगतांना जागा असत नाही, पण स्वगतांशिवाय नटसम्राट कसं होणार, त्यामुळे इतर व्यक्तिरेखांना ( उदाहरणार्थ विक्रम गोखलेंनी केलेली बेलवलकरांचे मित्र रामभाऊ यांची व्यक्तिरेखा, किंवा सारंग साठये यांचा सिद्धार्थ)  उभं करुन या स्वगतांची सोय लावली जाते हे दिसतं. तरीही काही स्वगतं उरतात . मग ती अशीच ( उदा - या तुफानाला कोणी घर देता का घर) लावली जातात, पार्श्वभूमीलाही वापरली जातात, पण वाटतं, की कदाचित तो मोह टाळलाच असता तर बरं झालं असतं.
 
  मला स्वत:ला यातली गोखलेंची रामभाऊ ही व्यक्तिरेखा अनावश्यक वाटते. त्यांनी उत्तम काम केलय, पण जेव्हा बेलवलकरांचं मोठं नट असणं हा नाटकाच्या गृहीतकाचाच भाग अाहे, तेव्हा त्यांना तू खरा फार बरा अभिनेता नाहीस असं ( प्रेमाने का होईना पण) सतत म्हणणारं पात्र तिथे का असावं?

  बाकी प्रसंग आणि व्यक्तिरेखा कमीअधिक प्रमाणात नाकासारख्याच रहातात. नाटकातला मेलोड्रामा चित्रपटात अधिकच भडक होतो हे ध्यानात घेऊन एकूण रसायनच एक पट्टी खाली नेलं असतं तर कदाचित अधिक परीणामकारक झालं असतं, पण जे मोडलेलं नाही ते दुरुस्त कशाला करा? या नियमानुसार प्रेक्षकप्रिय घटकांमधले फेरफार चित्रपटाने शक्यतर टाळले असं माझं मत आहे.

  डाॅ लागूंनी प्रथम रंगमंचावर सादर केलेली आणि पुढे अनेक ज्येष्ठांनी साकारलेली गणपतराव बेलवलकरांची व्यक्तीरेखा पडद्यावर आणण्याचा मोह पाटेकरांना होणं स्वाभाविक आहे, पण पाटेकरांचा स्वत:चा पर्सोनाच इतका तगडा आहे, की तो लपत नाही. साहजिकच  हा कायाप्रवेश पूर्ण   होत नाही. प्रेक्षक बेलवलकरांना दाद देत नाही, तर नाना पाटेकरांना देतो. खासकरुन बेलवलकरांच्या थकलेल्या अवस्थेतल्या प्रसंगात हे अधिक जाणवतं. प्रेक्षकांना पाटेकरांनाच पहायचं असल्याने, त्यांची याला हरकत असण्याचं कारण नाही.

 एकूणातच या रुपांतरात जागोजागी हा प्रेक्षकांचा विचार लपत नाही. शेवटी चित्रपट हा व्यवसाय आहे, त्यामुळे तसा असण्यात काही गैरही नाही. पण नाटकातदेखील व्यवसाय असतोच. शिवाय या विचारामधून चित्रपटाच्या व्यावसायिक मूल्यात वाढ होते, पण कलात्मक मूल्यात नाही, हे लक्षात घ्यावच लागेल.
-  गणेश मतकरी

Read more...

नववेस्टर्नपट!

>> Saturday, January 21, 2017हरवलेल्या सिनेप्रकाराचे पुनरुज्जीवन सध्या  जगातील सगळ्याच चित्रपटसृष्टींत होत आहे. अमेरिकेसारख्या सिनेबलाढय़ राष्ट्रात व्यावसायिक चित्रपटांतील कलात्मक प्रयोग दर्शकांकडून वाखाणले जातात आणि प्रयोगांचा नवा ‘ट्रेण्ड’ सिनेमाचा विकास घडवितात. तो पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या सिनेजाणिवांतील वाढ ही त्या चित्रपटाची आणखी एक कामगिरी असते. पुनरुज्जीवनाच्या सध्याच्या चित्रप्रवाहात ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटाने संगीतपटांबाबत जे केले, तेच ‘हेल ऑर हाय वॉटर’ने वेस्टर्न चित्रप्रकाराबाबत केल्याचे दिसून येते.
अमेरिकेतील मागास आणि हिंस्र असलेल्या पश्चिम प्रांतातील संघर्ष आणि शौर्यगाथा दर्शविणाऱ्या वेस्टर्न सिनेमांनी युद्धोत्तर १९५०-६० च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळविली. विस्तीर्ण प्रदेशातील काऊबॉय नायकांचा दुष्ट व्यक्ती आणि प्रवृत्तींविरोधातील लढा या एकाच संकल्पनेतील शेकडो कथा या चित्रप्रकारात झाल्या. जगभरात या सिनेप्रकाराचे अवतार झाले. यातल्या नायकांना अफाट स्टारपद मिळाले. याच सिनेमातला एक नायक अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंतही पोहोचला, तर लोकप्रियतेच्या निकषांवर अभिजात गणलेला भारतीय ‘शोले’ हा याच सिनेप्रकारातून अवतरला. १९८० नंतर आलेल्या डिजिटल युगात झपाटय़ाने हा चित्रप्रकार लोप पावू लागला. क्लींट ईस्टवूड, क्वेन्टीन टेरेन्टीनो, कोएन ब्रदर्स यांच्या मिश्रचित्रप्रकारी सिनेमांमध्ये तो सध्या शिल्लक होता. ‘नो कण्ट्री फॉर ओल्ड मेन’, ‘किल बिल’, ‘ट्र ग्रिट’सारख्या सिनेमांतून हा चित्रप्रकार पुन्हा डोकावू पाहत होता. ‘द हेटफूल एट’ किंवा ‘द रेव्हनाण्ट’ हे गेल्या वर्षी ऑस्करमध्ये मिरविणारे चित्रपटही वेस्टर्न होते.

यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत शिरण्याची पुरेपूर शक्यता असलेल्या ‘हेल ऑर हाय वॉटर’ने या चित्रप्रकाराच्या सर्वच जुन्या निकषांना आजच्या आर्थिक दुष्काळाशी एकरूप बनवून वापरले आहे. इथे सुरुवात होते, ती कारमधून लांबलचक प्रवास करणारे दोन मध्यमवयीन तरुण अत्यंत थंडपणे एका बँकेमध्ये दरोडा टाकताना. पहिला यशस्वी दरोडा पचवून ही दोघे त्याच बँकेच्या दुसऱ्या शहरातील शाखेतही आधीच्या प्रकाराची पुनरावृत्ती करतात. हा उद्योग पुढे थांबतो, तो त्या व्यक्ती दुष्ट नसून चित्रपटाचे नायक असल्याची जाणीव करून देत. यातले टोबी (ख्रिस पाइन) आणि टॅनर (बेन फॉस्टर) हे बंधू दिवंगत आई-वडिलांनी काढलेल्या कर्जाच्या वसुलीपोटी जप्ती होऊ घातलेले आपले शेतघर वाचविण्यासाठी एकत्र आलेले असतात. टॅनर हा उघडपणे गुन्हेगारीतून तुरुंगवारी करून आलेला उग्र हिंसावादी आहे. घटस्फोटित असूनही टोबी मात्र पापभीरू आणि कुटुंबमूल्यांची चाड असलेला दिसतो. जी बँक त्यांचे घर आणि शेत हिसकावून घेण्यासाठी सज्ज असते, त्या बँकेत दरोडे घालून त्या पैशांचे सफेदीकरण करून पुन्हा त्याच बँकेत पैसे भरण्याची या दोघांची योजना असते. या योजनेतील नियोजित टप्पे ते पार पाडत असतात. गुन्ह्य़ाचा कोणताही सुगावा लागू न देण्याची काळजी घेणारी ही दरोडामालिकेला थांबविण्यासाठी दुसऱ्या बाजूला हॅमिल्टन (जेफ ब्रिजेस) आणि अल्बटरे (जिल बर्मिगहॅम) ही पोलीस जोडगोळी सक्रिय होते. पैकी निवृत्तीचे काही क्षण उरलेल्या हॅमिल्टनला आपल्या नोकरीचा शेवट अचाट कामगिरीने करायचा असल्याने तो या दरोडासत्राला थांबविण्यासाठी अधिक उत्साही असतो. दुष्ट मार्गाचा अवलंब करणारे नायक दरोडेखोर आणि वाटेल त्या मार्गाने दरोडा थांबविण्यासाठी सज्ज झालेले पोलीस यांच्या आयुष्यातील अंतर्बाह्य़ गोष्ट ‘हेल ऑर हाय वॉटर’ दाखवून देतो.

चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील पात्रांभोवती असलेली अगतिकतेची पाश्र्वभूमी. मुर्दाड शहरांची लांबच लांब दृश्ये, हॉटेलातील वेट्रेसच्या मनोगतांपासून ते शहरातील कर्जवसुलीच्या बडय़ा पाटय़ांपर्यंत सारे घटक इथली नरकदायी आर्थिक स्थिती प्रगट करतात. एकीकडे हॅमिल्टनचे अनुभवातून गुन्हेगारांना पकडण्याचे मनसुबे आणि त्यांच्या वरताण टॅनर-टोबीचे धाडसी दरोडे प्रकार यांनी रंगत जाताना चित्रपट या सर्वाविषयी विलक्षण सहानुभूती निर्माण करतो. इथला विनोदही खूप गंभीररीत्या मांडला जातो. भिन्न स्वभावाचे दोन भाऊ आणि दोन पोलीस यांच्या माणूसपणाच्या छटा यांमध्ये प्रेक्षक हरखून जातो.
२००९च्या आर्थिक मंदीनंतर अमेरिकेत कर्ज-कर्जवसुली-जप्ती यांनी उद्ध्वस्त झालेल्या एका पिढीची दु:खी दास्तानच या चित्रपटात आली आहे. ‘ओशन’ मालिका किंवा टेरेन्टीनो-गाय रिचीच्या दरोडेपटांनी तयार केलेल्या स्मार्ट चित्रपटांशी याचे कोणतेही साधम्र्य नाही. जुन्या वेस्टर्न सिनेमाच्या निकषांना घासून-पुसून गोळीबंद पटकथेद्वारे दिग्दर्शक डेव्हिड मॅकेन्झी यांनी आजची आर्थिक अवघडलेली परिस्थिती सादर केली आहे. फक्त त्यासाठीच या नववेस्टर्नपटाची अनुभूती आवश्यक आहे.

- पंकज भोसले
(लोकसत्तामधून )

Read more...

जोरदार दंगल

>> Saturday, December 24, 2016
पोस्टरवरच्या टॅगलाईन्सनी चित्रपट काय आहे हे थोडक्यात मांडणं आवश्यक असतं. पण आपल्याकडे क्वचितच तसं होताना दिसतं. बहुधा केवळ लोकगर्दीच्या अपेक्षेने काहीतरी ठोकून दिल्याची  उदाहरणच अधिक. दंगल हा अपवाद ! इथे प्रत्यक्ष संवादात येणारी एक ओळ' म्हारी छोरियाॅं छोरों से कम है के?' ही या चित्रपटाचं आशयसूत्र असल्यासारखी आहे, आणि ती पोस्टरवर वापरण्यावरुन हे लक्षात येतं की चित्रपटाला काय म्हणायचय याची पूर्ण जाण तो बनवणाऱ्याना आहे. ही कुस्ती या खेळासंबंधीची स्पोर्ट्स फिल्म आहे पण केवळ स्पोर्ट्स फिल्म असणं हा त्याचा स्ट्राॅंग पाॅइन्ट नाही. मुलीना मुलांच्या बरोबरीने वागवणं , स्त्री पुरुष समानता हा चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. महिला हाॅकी संघावर आधारीत 'चक दे , इंडिआ' मधेही तो होता, पण दंगल ही एका कुटुंबाची गोष्ट असल्याने तो अधिक प्रखरपणे येतो.
दंगल हा डिस्नीनी प्रोड्यूस केलाय आणि त्याची एकूण वृत्तीही डिस्नीच्या तत्वांबरोबर चपखल जाणारी आहे. आता डिस्नीच्या सहभागामुळेच तो असा आहे, का तो तसा असणं हा हॅपी कोइन्सीडन्स आहे, हे कोणाला माहीत ?
डिस्नीच्या लोकप्रिय प्रिन्सेस स्टोरीज सारखी हीदेखील एका नायिकेची यशोगाथा आहे. आणि अलीकडच्या चित्रपटांमधून जशी नायिका अधिक सक्षम दाखवली जाते तशीच गीता फोगाट ( तसच बबिता ही उपनायिकाही ) आहे. पारंपारिक नायक इथे गैरहजर आहे, पण पुरुष प्रोटॅगनिस्ट म्हणून महावीर फोगाट हा त्या दोघींचा पिताच आहे. गीता आणि महावीर ही यातली प्रमुख पात्र . इतर अनेक लक्षात रहाणारी पात्र आहेत, पण चित्रपट प्रामुख्याने फिरतो तो या दोघांभोवती. चित्रपट घटनांभोवती अधिक गुंफलेला आहे आणि व्यक्तीगत तपशील ( पात्रांची मनोवस्था वगैरे ) त्यामानाने ठळक स्ट्रोक्समधे , फार खोलात नं जाता रंगवलाय. पण हे सारं एका योजनाबद्ध पद्धतीने केलय, यात चुकून काही झालेलं नाही.

आता कथानक काय आहे हे मी सांगत बसणार नाही. ते सर्वांना माहीतही आहे, आणि मुळात ही (बरीचशी) सत्यकथा असल्याने, त्याचा शेवटही आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे. तरीही, एक सूत्र सांगायचं तर एवढच म्हणेन, की कुस्तीमधे राष्ट्रीय पातळीवर नावाजूनही आर्थिक अडचणीमुळे बाहेर पडावं लागणाऱ्या महावीर सिंगाचा ( आमीर खान) , आपल्या होणाऱ्या मुलाला तरी  भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता बनवण्याचा निश्चय, मुलाएेवजी चारी मुलीच झाल्याने  त्याने आधी निराश होणं , पण मग त्या मुलींनाच या खेळात पारंगत बनवून त्यांच्याकरवी आपलं स्वप्न पूर्ण करणं असा हा प्रवास आहे. मध्यंतर जरी गीता - बबिता मोठ्या झाल्यावर येत असलं, तरी बालपणीचा काळ आधी आणि मोठेपणीचा नंतर, असं हे पूर्वार्ध - उत्तरार्धाचं ढोबळ विभाजन आहे, त्यामुळे लक्षवेधी काम करण्याची संधी गीता ( लहान- झायरा वसीम, मोठी - फातीमा सना शेख) आणि बबिता ( लहान- सुहानी भटनागर, मोठी - सान्या मल्होत्रा ) च्या भूमिकातल्या चारी गुणी अभिनेत्रींना यथायोग्य मिळाली आहे. लहान मुलींचं कौतुक अधिक वाटतं आणि ते केवळ त्या लहान आहेत म्हणून नाही , तर त्यांना साध्यासुध्या मुलींचं मल्ल बनणं , हा बदल, हे ट्रान्स्फाॅर्मेशन दाखवायचय म्हणून. बाॅडी लॅन्ग्वेजपासून व्यक्तीमत्व बदलापर्यंत त्या हा बदल यथायोग्य दाखवतात. मोठ्यांपुढे आव्हान आहे, ते आधीच्या अभिनेत्रींचं काम सहजपणे  पुढे नेणं आणि चित्रपटातल्या नाट्यपूर्ण , भावपूर्ण भागाला पेलणं.

दंगल सर्वात यशस्वी ठरतो तो मध्यंतरा आधीच्या भागात. यातलं नाट्य या मुलींमधल्या बदलात आणि त्यांनी दाखवलेल्या कर्तुत्वात आहे आणि ते अतिशय स्वाभाविकपणे, कुठेही कृत्रिम नं होता येतं. गाणी बिणीही जोरदार आणि प्रसंगानुरुप आहेत, हा भाग सर्वच बाबतीत जमलेला आहे.

उत्तरार्धाचा प्राॅब्लेम हा, की मूळ घटनांमधे पुरेसं नाट्य नाही. गीताने सरकारी प्रशिक्षणासाठी भरती झाल्यावर तिला काॅमनवेल्थ गेम्समधे पदक मिळेपर्यंतच्या भागात ( चित्रपटाच्या प्रकृतीला साजेसं) फार  काही घडत नाही. त्यातल्यात्यात गीताचा परफाॅर्मन्स घसरणं एवढाच भाग आहे. इथे नसलेलं नाट्य चित्रपट तयार करायला जातो ते कोच कदम ( गिरीश कुलकर्णी) या पात्रामार्फत, त्याच्या गीता आणि महावीर यांच्याशी होणाऱ्या संघर्षामधून. दुर्दैवाने हे पात्र मात्र खूपच कचकड्याचं ( डिस्नी व्हिलन?) वाटतं.

गंमत अशी की या कोचचा मुद्दा योग्य आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला जे जमेल तसं ट्रेनिंग मिळालय ते विसरायला लावून त्यांना नव्याने घडवणं हा त्याचा गेमप्लान आहे. यात गैर काही नाही. सर्व क्षेत्रात ( नाट्य क्षेत्रातही ) या प्रकारचं ट्रेनिंग असतं. कोणी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाला गेल्यावर तिथल्या थोरामोठ्यांनी सांगितलेलं नं एेकता आमच्या गावच्या ग्रुपमधे असच सांगायचे म्हणून भडक अभिनयच करत राहिला तर कसं होईल, त्याप्रकारची इथली गीताची परिस्थिती आहे. पण कोचचा युक्तीवाद पटू नये आणि सहानुभूती गीता- महावीर कडे जावी , तसच गीताच्या हरण्याचं बिलही कोचवर फाडता यावं , म्हणून ही कदमची व्यक्तिरेखा अतिशय वरवरची आणि मुद्दाम खलनायकी लिहिली आहे, जी बाकी साऱ्या खऱ्या प्रसंगांच्या तुलनेत बिल्कुल नकली वाटते. ही खोटी वाटण्यात गिरीश कुलकर्णीचा दोष नसावा कारण लेखन आणि दिग्दर्शन हे याला प्रामुख्याने  जबाबदार आहेत. त्या भूमिकेला अधिक प्रसंग मिळते, तर ती हळूहळू घडवता आली असती पण ते कमी असल्याने ही भूमिका कृत्रिम होते. शेवटच्या भागात तर हे खलनायकी वागणं फार टोकाला पोचतं . असं काही गीताच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडलं असेलसं वाटत नाही, किंवा असलं तरी ही गीताची बाजू झाली. कोचला त्याची बाजू विचारली गेली असेलसं वाटत नाही. आणि तसं नसेल तर मग हा केवळ नाट्यपूर्णता वाढवण्याचाच प्रयत्न म्हणून उरतो. चित्रपटासाठी तो खरा वाटणं आवश्यक होतं जे होत नाही. हा दंगलमधला सर्वात मोठा गोंधळ. पण या भागातही, सर्वजण कामं छान करतात आणि निवेदनाची गती रहाते ,सर्व मॅचेस पकड घेतात त्यामुळे आपण या दोषाकडे डोळेझाक करु शकतो.

कुस्तीच्या मॅचेसचं दंगलमधलं  चित्रण फार छान आहे आणि रेसलिंग मॅचेस खऱ्याच कमी वेळाच्या असल्याने चित्रपटात पुरेसा वेळ देत त्या रंगवता आल्या आहेत. चक दे मधे बऱ्याच मॅचेस उरकल्यासारख्या होत्या आणि खूप व्यक्तिरेखांमुळे चित्रपटही मधेमधे ड्रॅग व्हायचा. इथे तसं होत नाही. एका शब्दात सांगायचं तर या मॅचेसची कोरिओग्रफी आणि छायाचित्रण ( सेतू श्रीराम) ' रोमहर्षक ' झालेलं आहे. आता मॅचेसचा निकाल प्रेडीक्टेबल आहे का, तर आहे. गोष्ट लक्षात आली तर गीता कोणती मॅच जिंकणार- कोणती हरणार हे तुम्ही अचूक सांगू शकता, पण  हरकत नाही , पडद्यावर पहाताना आपण गुंतून जातो हे खरं, आणि ते पुरेसं आहे.

मागे आशुतोष गोवारीकरने बाजी, पहला नशा अशा सामान्य चित्रपटांनंतर एकदम लगान केला आणि त्याची गणना ए लिस्टर्समधे व्हायला लागली, तसच काहीसं चिल्लर पार्टी , भूतनाथ नंतर दंगल केलेल्या नितेश तिवारीचं होणार यात शंका नाही. आमीर खान असलेले स्पोर्ट्स थीम्ड चित्रपट दिग्दर्शकासाठी लकी ठरतात असं दिसतय. पण हा केवळ नशीबाचाच प्रश्न नाही. त्याने केलेलं काम हे त्याची लायकी सिद्ध करणारं आहे. नेहमीप्रमाणे आमीरच्या घोस्ट डिरेक्शनची चर्चा इथेही होईल, पण आपण नाव लागलेल्या दिग्दर्शकालाच मानून चालू. अर्थात लगानप्रमाणेच इथेही स्वत: आमीर खानने निर्मिती आणि व्यक्तीरेखा या दोन्ही बाबीत प्रचंड मेहनत घेतलेली आहे.

मी अनेकदा असं म्हंटलय, की अभिनेता म्हणून आमीर खान मला फार आवडत नाही कारण त्याची सारी वेषांतरं समोर असतानाही त्यामागे दडलेला आमीर खान सतत दिसत रहातो. इथे महावीर फोगाट उभा करताना दिसण्याबरोबर त्याने फिजिकल परीवर्तनही केलय. तरुण रेसलर पासून साठीच्या आसपासपर्यंत वयातला फरकही आहे, आणि आमीर खानने तो उत्तम रितीने पडद्यावर आणला आहे. यात अनेकदा अशा जागा आहेत ज्यात आपण आमीर खानला विसरुन व्यक्तीरेखेला दाद देतो. उदाहरणादाखल एक प्रसंग घ्यायचा  , तर गीता प्रशिक्षण घेत असताना गावी येते आणि बबिता आणि इतरांना काही नवे डावपेच शिकवू पहाते तो घेता येईल . गीताची लुडबुड पाहून चिडलेल्या महावीरने तिला दिलेलं आव्हान आणि पुढे येणारं कुस्तीचं दृश्य हा चित्रपटाचा एक हायलाईट आहे . भावपूर्ण तरीही अटीतटीचा आणि पुढे काय होईल याबद्दल प्रेक्षकाला संभ्रमात ठेवणारा प्रसंग. दंगल मधे अशी ही एकमेव जागा  नाही. इतरही आहेत. पण कोणत्या ते सांगण्यात मजा नाही. ते पहायलाच हवं.

गेल्या काही दिवसात डिमाॅनिटायजेशनच्या दणक्याने चित्रपटगृहांपासून प्रेक्षक काहीसा दूर गेलेला आहे. त्याला परत फिरवायला दंगलसारख्याच एखाद्या जोरदार चित्रपटाची गरज होती. दंगल हे करुन दाखवेल असा विश्वास वाटतो.
  - गणेश मतकरी

Read more...

मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं

>> Saturday, December 3, 2016
कॅस्ट्रो गेला आणि बंडाचा एक सिम्बाॅल हरवल्यासारखं झालं. खरं म्हणजे हरवल्यासारखंही नाही म्हणता यायचं. शक्यता अशीही वाटते की त्याचं क्युबामधल्या क्रांतीशी जोडलेलं नाव आता अधिक जागतिक होत जाईल. त्याच्या आयुष्याच्या तपशीलाला महत्व तर आहेच, क्युबा आणि जागतिक राजकारणातही तो मोठा नेता मानला जातोच, पण आता कदाचित त्या तपशीलापलीकडे जात  क्रांतीचा चिरतरुण शिलेदार म्हणून त्याचं नाव जगभरातल्या  तरुणांच्या अधिक जवळ पोचेल. हयातीत जवळचे मित्र आणि क्युबन लढ्यातले सहकारी असलेल्या  चे गेवारा ने व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या तरुणांच्या मनात पटकावलेलं स्थान, कदाचित आता मागून येणारा कॅस्ट्रोही पटकावेल. क्युबन राज्यक्रांतीचा चेहरा असणारी ही दोन नावं पुन्हा एकत्र येतील.

तरुणपणी गेलेले लोक कायम तरुणच रहातात. त्यांचे विचार, त्याची लोकांसमोरची अखेरची प्रतिमा हे काही बदलत नाही. याउलट वृद्धत्व व्यक्तीची प्रतिमा बदलत नेतं. दुर्दैवाने का असेना, पण गेवाराला कॅस्ट्रोपुढे हा अॅडव्हान्टेज मात्र आजही रहाणार. गेवाराच्या नावाचे टी शर्ट घालणाऱ्या तरुणांना त्याचं क्युबन लढ्यातलं काम, पुढे लॅटीन अमेरिकेतला बंडाचा फसलेला प्रयत्न, हत्या, याचे तपशील  माहीत नसतीलही, पण एक प्रतीक म्हणून तो चांगलाच परीचयाचा आहे. कॅस्ट्रोपेक्षाही अधिक परीचयाचा.

बरेचदा असंही होतं. लोकांपर्यंत पोचायला तुम्हाला काही गोष्टी सोप्या करुन सांगाव्या लागतात. विचार, कार्य यांचा अभ्यास हा आपल्या जागी ठीकच, पण लाल टी शर्ट वरची काळी प्रतिमा, ही कधीकधी सोपा आणि थेट संदेश देत असल्याने पटकन पोचते. अधिकांपर्यंत पोचते. फिल्म माध्यमाला आपण लोकांचं माध्यम म्हंटलं, तरी त्यातही अभ्यासपूर्ण मांडणीपेक्षा, थोडक्यात सांगितलेलं लोकांना आवडण्याची, समजण्याची शक्यता वाढते. गेवाराबद्दल स्टीवन सोडरबर्गने अभ्यासपूर्ण पद्धतीने काढलेला दोन भागातला चरित्रपट ' चे ' असताना, गेवाराच्या पुढच्या काळातल्या व्यक्तीमत्वाशी जराही संबंध नसणारा , आणि तरुण असताना गेवाराने लिहिलेल्या एका प्रवासाच्या आठवणींवर आधारीत ' द मोटरसायकल डायरीज' इतका लोकप्रिय असावा यामागेही हे सोप्या आणि थेट  आशयाचच कारण असावं.

२००४ साली वाॅल्टर सॅलीस दिग्दर्शीत ' द मोटरसायकल डायरीज' आला, तेव्हा तो समीक्षकांना आवडला, पण तो काय दृष्टीने पहावा याबद्दल त्यांच्यात मतभेद होते. आता चित्रपट चरित्रात्मक तर आहे, पण प्रत्यक्षात गेवाराच्या प्रमुख कार्यकाळातलं काहीच त्यात दिसत नाही, मग त्याला आशयाच्या दृष्टीने चांगला म्हणायचा का वाईट, का नुसताच रोड मुव्ही म्हणून सोडून द्यावं , असा काहीतरी गोंधळ झाला. ही गोष्ट खरी, की प्रत्यक्ष काम दिसलं नाही, तरी या नेत्याच्या मानसिकतेत होत गेलेला बदल, त्याचं एका सुखवस्तू कुटुंबातल्या मुलापासून ते समाजाच्या पिडीत घटकांबद्दल आपुलकी आणि त्यांच्यासाठी काही करायची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यात होणारं रुपांतर या चित्रपटात आपल्याला दिसतं. तरीही, हे थोडं मोठ्यांच्या छोट्या गोष्टीसारखं आहे. वर्गातली शेंगांची टरफलं आपण उचलणार नाही म्हणणारा मुलगा लोकमान्य टिळक होणार हे आपल्याला माहीत नसेल, तर आपण गुरुजनांची पर्वा नं करणारा आगाऊ मुलगा म्हणून त्याला सोडून देऊ. तसच, जर चित्रपटातला    २३ वर्षांचा मेडीकल स्टुडन्ट अर्नेस्टो गेवारा  पुढे कोण झाला हे जर माहीत असेल, तरच आपण त्याच्यातला बदल, एका वेगळ्या नजरेने पाहू शकू. नाहीतर ही एक साध्या आदर्शवादी मुलाची गोष्टच ठरेल.

सगळ्याच तत्कालीन समीक्षकाना जरी हे सारख्या प्रमाणात लक्षात आलं नाही, तरी चित्रपटातल्या अर्नेस्टोचं बदलणं हे लोकांपर्यंत पोचलं आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. ' चे ' या नावाबद्दल तरुणांमधे आकर्षणही होतं, आता या नावाला साजेलशी प्रतिमा उभी करणारा हा पडद्यावरला चे त्यांना भेटला. त्यांच्याच वयाचा, त्यांच्यासारखाच उत्तरं शोधणारा. या व्यक्तिरेखेशी समरस होणं त्यांना सोपं गेलं. दुसरी चांगली गोष्ट ही झाली, की चरित्राच्या ओझ्याखाली चित्रपट दबला नाही. रोड मुव्ही हा चित्रप्रकार रस्त्यावर, प्रवासात घडतो. हे प्रवास बहुधा दोन पातळ्यांवरचे असतात. प्रत्यक्ष आणि प्रतीकात्मक. ते केवळ स्थलांतर घडवत नाहीत तर सहभागी व्यक्तिरेखांमधे त्यांनी आमूलाग्र बदल घडवणं अपेक्षित असतं. या चित्रप्रकारात गेवाराचं ' मोटरसायकल डायरीज' चपखलपणे बसलं. चरित्रपट आवडणाऱ्यांना, रोड मुव्ही आवडणाऱ्यांना आणि एकूणच चित्रपट आवडणाऱ्यांनाही, तो त्याच्या साधेपणाने, आणि अभिनिवेश नं बाळगणाऱ्या अर्थपूर्णतेने पटून गेला.

मोटरसायकल डायरीजमधल्या प्रवासाच्या सुरुवातीला अर्नेस्टो गेवारा ( गेल गार्शिआ बेर्नाल ) म्हणून जी व्यक्ती होती, ती त्या प्रवासाच्या शेवटी उरली नाही. आपल्या कोषात वाढलेला, आर्थिक सुबत्तेची सवय असलेला हा मुलगा, आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा व्हायला थोडेच दिवस बाकी असताना रोड ट्रीपवर निघाला तो आत्मशोधासाठी नाही, तर निव्वळ एक गंमत म्हणून. आल्बेर्तो ग्रानाडो ( राॅडरिगो डे ला सेर्ना) या आपल्या मित्राच्या हौसेखातर तो यासाठी तयार झाला. ब्युनोस आयरेसपासून वेनेझुएलापर्यंत जमेल तितकी दक्षिण अमेरिका बघत बघत मोटरसायकलवरुन हा १४००० किलोमीटरचा प्रवास करायचा, अशी ही मूळ कल्पना होती. प्रत्यक्षात प्रवासाचा थोडाच भाग मोटरसायकलवरुन होऊ शकला, आणि मग पायी वा मिळेल त्या वाहनातून असं प्रवासाचं स्वरुप बनलं.

डायरीज टप्प्याटप्प्याने अधिकाधक गंभीर बनत जातो. यातला पहिला भाग तसा खेळकर पद्धतीने उलगडतो. अर्नेस्टोचं घर, प्रवासाची सुरुवात, त्याच्यासारख्याच ( किंवा त्याच्याहून ) सुखवस्तू घरातल्या त्याच्या मैत्रिणीला भेट, थोड्या गंमतीजमती वगैरे. ज्यांनी गेल गार्शिआ बेर्नालचाच 'इ तू मामा ताम्बिएन' पाहिला असेल, त्यांना चित्रपटाच्या सुरुवातीकडे पाहून हा त्यासारखाच काही प्रकार वाटेल. पण तसं नाही. इ तू मामा ताम्बिएन मधेही सामाजिक परिवर्तनाची जाण असली तरी त्यात सुखवस्तू समाज आणि ते अनभिज्ञ असलेला पिडीत समाज, असं स्वतंत्र तुकडे योजनाबद्ध रितीने केले होते. मोटरसायकल डायरीज मधे असे तुकडे नसून एकरेषीय चढता संघर्ष आहे, आणि दर भागाला त्याचं त्याचं महत्व आहे.

उदाहरणार्थ, या सुरुवातीच्या भागात मूळात अर्नेस्टो कोण होता, त्यांच्या समाजाच्या स्थितीबद्दल त्याला किती कमी माहिती होती, आणि आपल्या परीघाबाहेरचं त्याचं ज्ञान किती मर्यादित होतं, याचं चित्रण येतं. मुळातच मोडकळीला आलेली आल्बेर्तोची बाईक ज्या क्षणी निकालात निघते, त्या क्षणी परिवर्तनाला खरी सुरुवात होते. आपल्या घरात असताना जो समाज त्याच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे होता, तो आता रस्त्यावर आल्यावर त्याला घेरुन टाकतो आणि त्याकडे डोळेझाक करणं आता अर्नेस्टोला शक्य होणार नसतं. रस्त्यावर रहाणारे, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले, स्वत:च्याच जमिनीवरुन उन्मत्त सत्ताधाऱ्यांकडून हकलले गेलेले लोक या दोघाना भेटतात, आणि अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येऊ लागतात. पुढचा टप्पा येतो तो १५ व्या शतकात पेरूमधल्या इन्का समाजाने वसवलेल्या माचू पिचू या वसाहतीच्या अवशेषांना ही जोडगोळी भेट देते तेव्हा. इन्का समाजाने वास्तुकलेप्रमाणेच इतरही शास्त्रात प्रगती केली होती, पण बंदुकधारी स्पॅनिअर्ड्सशी ते लढणं शक्य नव्हतं याची जाणीव गेवाराला या ठिकाणी होते, आणि कोणत्याही प्रकारचा उठाव हा शस्त्राशिवाय शक्य नाही, हे त्याच्या लक्षात येतं.

तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा घडतो तो पेरुमधल्याच कुष्ठरोग वसाहतीत, जिथे वसाहतीच्या मधून वहाणाऱ्या नदीनेच स्टाफ आणि आजार विकोपाला गेलेले रोगी यांना एकमेकांपासून दूर ठेवलेलं असतं. हे विभाजन झिडकारत गेवारा आणि ग्रानाडो संसर्ग टाळण्यासाठी हातमोजे घालणंही नाकारतात आणि मोकळेपणाने या लोकांमधे सामील होतात. या चढत्या टप्प्यांचा परमोच्च बिंदू ठरतं, ते वसाहतीतच गेवाराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीमधे  केलेलं भाषण. छोटंसं असलं, तरी आपलं पहिलं राजकीय भाष्य, तो या भाषणात करतो. दक्षिण अमेरिकन समाज हा एकच आहे, आणि त्याचे तुकडे करुन त्यावर राज्य केलं जातय ही त्याच्या मनातली भावना इथे स्पष्ट होते, आणि रेस्ट, अॅज दे से, इज हिस्टरी.

चित्रपटाचा गाभा गंभीर असला आणि त्यात पाणी घालण्याचा प्रयत्न नसला, तरी गेवाराच्या मित्राची व्यक्तिरेखा चित्रपटाला बरचसं हलकंफुलकं ठेवते. त्यामुळे आपण त्याच्याकडे डाॅक्युमेन्टेशन सारखं न पहाता एक चित्रपट म्हणून पाहू शकतो.

आॅर्सन वेल्सने म्हंटलय, की ,' इफ यू वाॅन्ट ए हॅपी एंडींग, दॅट डिपेन्ड्स, आॅफ कोर्स, आॅन व्हेअर यू स्टाॅप द स्टोरी.' प्रत्यक्षातला गेवाराचा शेवट  सुखांत नाही. क्युबा सोडल्यावर दक्षिण अमेरिकेत क्रांती घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या गेवाराला सीआयएच्या सल्ल्यानुसार चालणाऱ्या बोलिविअन सैन्याने पकडलं आणि वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीच त्याची हत्या केली गेली. द मोटरसायकल डायरीजचा शेवट मात्र सुखांत आहेच आणि खरं तर तो गेवाराची खरी गोष्ट सुरु होण्याच्याही आधी येणारा आहे. तरीही, तो जिथे आहे तिथे येण्याने आपण या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा अर्थ लावू शकतो, त्याच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो. तरुणांमधे दडलेल्या क्रांतीची बीजं इथे दिसतात, आणि गेवारामधली काय किंवा कॅस्ट्रोमधली काय, शेवटी ही बीजच महत्वाची , नाही का?
- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP