ऑस्कर्स 2011 - इट्स ऑल अबाऊट विनिंग!

>> Saturday, February 26, 2011

इट्स नॉट विनिंग ऑर लुजिंग, बट हाऊ यू प्ले द गेम’ असं म्हटलं जातं आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. मात्र त्याचवेळी हेदेखील खरं, की जिंकण्यातून तयार होणारी ईर्षां ही अनेकांना प्रेरित करत असते. केवळ जेत्याला आपल्या पुढल्या कारकीर्दीसाठीच नव्हे, तर जिंकण्याची संधी हुकलेल्याला, ती पुढल्या वेळी हुकू नये अशी कामगिरी करून दाखवण्यासाठीही. जिंकण्याचा हा सोहळा दिमाखात साजरा करणारी ‘ऑस्कर नाईट’ जगभर सारख्याच उत्साहात पाहिली जाते ती कदाचित त्यामुळेच...


जागतिक पातळीवर चित्रपटांसाठी होत असणाऱ्या सन्मानात ऑस्करचा हात क्वचितच कोणी धरू शकेल. प्रामुख्याने ही अमेरिकन व्यावसायिक चित्रपटसृष्टीची पारितोषिकं दर्जेदार खचितच, मात्र दर्जाबरोबरच व्यावसायिक गणिताचा विचारदेखील मनात धरणारी, वादग्रस्तता टाळून सेफ गेम खेळणारी. त्यामुळे नामांकनात मोकळेपणा दाखवून पारितोषिकांत मात्र क्वचित तडजोड करणारी. गोल्डन ग्लोब, बाफ्टासारख्या पारितोषिकांचा थाटमाट, उपस्थितांची स्टार पॉवर, ऑस्करपेक्षा कमी नाही. पण सामान्य रसिकांपर्यंत पोचलेली ऑस्कर ब्रॅन्डची लोकप्रियता इतरत्र नसल्याचं सहज लक्षात यावं. हल्लीच ऑस्करने आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी असणाऱ्या नामांकनाची संख्या पाचवरून वाढवून दहावर नेली आहे. हे जरा अती वाटतं, अगदी आपल्याकडे ‘फिल्म फेअर’ प्रकारातल्या पारितोषिकांनी जसं सर्वाना खूष करण्याचा प्रयत्न करावा, त्या प्रकारचं. मात्र अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड सायन्सेसने या प्रकारचं सावध धोरण स्वीकारावं यात आश्चर्य नाही. चित्रपट उद्योगातल्या कर्त्यांधर्त्यांबरोबर असणारे अ‍ॅकेडमीचे लागेबांधे पक्के होण्यापासून ते समारंभाला उपस्थित सेलिब्रिटीजच्या संख्येत मोलाची भर पडण्यापर्यंत या निर्णयाचे अनेक फायदे असतील हे निश्चित. या वर्षीची बेस्ट पिक्चर वर्गातली नामांकनं मात्रं हा अ‍ॅकेडमीचा निर्णय योग्य असल्याची पावती वाटण्यासारखीच आहेत. त्यामुळं अंतिम विजेता कोण ठरणार याबद्दलचं कुतूहल अधिक वाढवणारी.
ऑस्कर्स कोणाला मिळण्याची शक्यता अधिक आहे, याचा अंदाज हा बहुतेक वेळा बांधता येतो कारण पारितोषिक विजेता हा दर्जातल्या स्पर्धेचा विजेता नसतो. बऱ्याचदा नामांकनातले सर्वचजण, पारितोषिकासाठी लायक असतात अ‍ॅकेडमी मेम्बर्सच्या मतदानातून ठरत असणारा विजेता हा अंतिमत: या उद्योगातल्या अंतप्रवाहांना सूचित करत असतो. उद्योगाचं राजकारण, गोल्डन ग्लोब/ डिरेक्टर्स गिल्डसारख्या इतर प्रमुख पारितोषिकांचे निकाल, नामांकनात आलेल्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’, वादग्रस्तता टाळण्याकडे असलेला कल या सगळ्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष प्रभाव घोषित विजेत्यांवर होत असतो. हे वर्षही त्याला अपवाद ठरू नये. यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकनात नक्की विजेते ठरणार नाहीत, असे तीन चित्रपट आहेत. इंडीपेन्डंन्ट प्रॉडक्शन असलेला ‘विन्टर्स बोन’, स्लमडॉग टीमचा ‘127 अवर्स’ आणि ‘टॉय स्टोरी ३’. ‘टॉय स्टोरी’चा इथला सहभाग हा त्याला अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचं ऑस्कर नक्की असल्याचं सूचित करणारा आहे. उरलेल्यांमध्येही आरोनोफ्स्कीचा ‘ब्लॅक स्वान’ अन नोलानचा ‘इन्सेप्शन’ थ्रिलर्स असल्याने, तर कोलोडेन्कोचा ‘द किड्स आर ऑल राईट’, कॉमेडी असल्याने बाजूला राहणं निश्चित. नोलान अन कोलोडेन्कोला तर दिग्दर्शनाचं नामांकनदेखील नसल्याने त्याचं भविष्य स्पष्ट आहे. या पाश्र्वभूमीवर बक्षिसपात्र ठरण्याची सर्वाधिक शक्यता आहे, तो डेव्हिड फिन्चरचा ‘द सोशल नेटवर्क’, अन तसं झालं तर तो अ‍ॅकेडमीचा अतिशय योग्य निर्णय ठरेल. नेटवर्क हा एक प्रकारचा आधुनिक इतिहास मांडणारा, गुंतागुंतीचा आशय सांगू पाहणारा, दिग्दर्शन अन पटकथेत मुबलक प्रयोग करणारा चित्रपट आहे. तो डावलला जाण्याची शक्यता कमी, पण तसं जर झालंच तर टॉम हूपरचा ‘द किंग्ज स्पीच’ हा दुसरा लायक चित्रपट ठरेल. त्यातलं नाटय़ थोडं अधिक सांकेतिक आहे. अन मांडणीदेखील पटकथेपेक्षा नाटकाच्या जवळ जाणारी आहे. दिग्दर्शन फिन्चरइतकं शैलीदार नसलं तरी चित्रपटाला पूर्णपणे न्याय देणारं आहे. याउलट कोएन ब्रदर्सच्या ‘ट्रू ग्रिट’चा अभिनेता/छायाचित्रण वगळता इतर सर्वच वर्गातला सहभाग हा दर्जादर्शक जरूर आहे, पण तो परितोषिक प्राप्त ठरणं कठीण आहे. यादीतल्या समावेशाने या अत्यंत सर्जनशील बंधूंबाबत सर्वानाच असणारा आदर सूचित होतो इतकंच.
अनेकदा ऑस्कर पारितोषिकात असं दिसून येतं की निर्विवाद दर्जा वाढविणाऱ्या दोन कलाकृती असल्या की एकीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळतो, तर दुसरीचा दिग्दर्शनाचा. इथे ‘सोशल नेटवर्क’ अन् ‘किंग्ज स्पीच’बाबत तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तसं होईल असं मला वाटत नाही. यंदा हे पारितोषिकही नेटवर्कच्या अर्थात फिन्चरच्याच वाटय़ाला येण्याची चिन्हे आहेत. गोल्डन ग्लोबमध्ये त्याने ही कमाई केलेलीच आहे, अन बाफ्टामध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मान किंग्ज स्पीचकडे जाऊनही दिग्दर्शनांच पारितोषिक फिन्चरलाच मिळालेलं आहे. ऑस्करलाही तोच पारितोषिक प्राप्त ठरेल अशी खात्री वाटते.
सर्वोत्तम अभिनयाच्या पारितोषिकांबद्दल यावर्षी कोणताही वाद संभवत नाही. जनतेशी संवाद साधण्यात कमी पडणाऱ्या सहाव्या जॉर्ज राजाच्या भूमिकेतल्या कॉलिन फर्थला ‘द किंग्ज स्पीच’साठी तर सत्य अन कल्पितामध्ये भेद करता न येऊ शकणाऱ्या बॅलेरीनाच्या भूमिकेतल्या नॅटली पोर्टमनला ‘ब्लॅक स्वान’ साठी ही पारितोषिक निश्चित आहेत. ‘ट्र ग्रिट’साठी जेफ ब्रिजेस आणि ‘द किडस आर ऑल राइट’साठी अ‍ॅनेट बेनिंग या दोघांच्या अभिनयाचा दर्जाही पारितोषिक प्राप्त ठरावा असाच आहे. मात्र या वर्षी तरी त्या दोघांना नामांकनावरच समाधान मानावं लागेल. ब्रिजेस यापूर्वी क्रेझी हार्टसाठी विजेता ठरला आहे. बेनिंगचं मात्र हे चौथं नामांकन असूनही तिच्या हाती निराशाच येण्याची चिन्हं दिसतात.
सहाय्यक भूमिकेतल्या अभिनयासाठी मात्र स्पर्धा जरूर आहे. अभिनेत्यांच्या स्पर्धेत ‘द फायटर’मधल्या भूमिकेसाठी निवडल्या गेलेल्या क्रिश्चन बेलचं पारडं हे किंग्ज स्पीचसाठी वर्णी लागलेल्या जॉफ्री रशपेक्षा जड आहे, तर अभिनेत्रीच्या स्पर्धेत ‘द फायटर’ मधल्याच भूमिकेसाठी लढणाऱ्या मेलिसा लिओचं पारडं, ‘टू ग्रिट’साठी नामांकन
मिळालेल्या हेली स्टाईनफेल्डपेक्षा जड आहे. मात्र हा तोल नाजूक आहे. रश अन स्टाईनफेल्ड दोघांच्या भूमिका मोठय़ा आहेत. रशची भूमिका फर्थशी तुल्यबळ आहे, अन् स्टाईनफेल्डची तर चित्रपटातली एकमेव स्त्री भूमिका असल्याने खरं तर प्रमुख भूमिकाच आहे. त्यामुळे पारडय़ांचा जडपणा आयत्यावेळी सरकल्यास फार आश्चर्य वाटू नये.
‘सोशल नेटवर्क’ला अभिनयाचं पारितोषिक जाणार नाही, यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण खरं तर हा दिग्दर्शकाचा अन त्यानंतर लेखकाचा चित्रपट आहे. त्यामुळे पटकथेचं, आधारित पटकथेचं पारितोषिक नक्कीच आरोन सोरकीनला या चित्रपटासाठी मिळेल. स्वतंत्र पटकथेचं पारितोषिक बहुधा जाईल, ते क्रिस्टोफर नोलानला इन्सेप्शनसाठी. दिग्दर्शक म्हणून नामांकनातून वगळण्यात आल्याने त्याच्यावर होणारा अन्याय बहुधा इथे भरून काढला जाण्याची शक्यता आहे. इतर तांत्रिक पुरस्कारातही इन्सेप्शन पुढे राहाण्याची शक्यता आहेच.
छायाचित्रणाचा दर्जा पाहता ‘इन्सेप्शन’ किंवा ‘ब्लॅक स्वान’चा नंबर इथे जरूर लागायला हवा. मात्र आठव्यांदा नामांकन मिळून ही अजून पारितोषिक प्राप्त न ठरलेल्या रॉजर डेकिन्सची ‘ट्र ग्रिट’साठी वर्णी लागल्यास आश्चर्य वाटू नये, त्याचं काम इतर दोन चित्रपटांहून अधिक सोपं असूनही. ऑस्करच्या प्रमुख पारितोषिकांमधली वर्गवारी, ही चित्रपट व्यावसायिक आहे हे गृहीत धरून, आशयाकडे किंचित डोळेझाक करून केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आशय, प्रयोग, सामाजिक बांधिलकी, यासारख्या गोष्टींना महत्त्व येतं, ते उर्वरित पारितोषिकांमध्ये. म्हणजे परभाषिक चित्रपट, माहितीपट, लघुपट इत्यादी वर्गात. इथली स्पर्धा संपूर्ण निरपेक्ष, म्हणूनच अधिक अटीतटीची असते. इथल्या अडचणी वेगळ्या असतात. चित्रकर्त्यांची नावं अ‍ॅकेडमीसाठी अनोळखी असल्याने, अ‍ॅकेडमी सभासदांना मतदानासाठी चित्रपट/माहितीपट दाखवणं हेच जिकीरीचं काम होऊन बसतं. भारतीय चित्रपटांना त्यासाठी कसा अन् किती त्रास झाला याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपण दरवर्षी ऐकत असतोच- आणि आपल्याला न मिळणाऱ्या पारितोषिकाचं खापर त्या अनुपस्थित अ‍ॅकेडमी मेंबरांवर फोडतही असतो!
यंदाचे सर्व परभाषिक चित्रपट काही मी पाहिलेले नाहीत. परंतु जे पाहिलंय त्यावरून मेक्सिकोच्या ‘ब्युटिफूल’ला किंवा डेन्मार्कच्या ‘इन ए बेटर वर्ल्ड’ला पारितोषिक मिळण्याची शक्यता अधिक वाटते. ब्युटिफूलमधला झाविएर बारदेम हा ‘नो कन्ट्री फॉर ओल्ड मेन’साठी साहाय्यक भूमिकेत ऑस्कर विजेता ठरलेला तर यंदा इथल्या प्रमुख भूमिकेसाठी नामांकनातही आहे. चित्रपटाचा संपूर्ण टोन मात्र अतिशय नकारात्मक असल्याने ऑस्कर हुकण्याची शक्यता अधिक!मोठय़ा माहितीपट विभागातदेखील सर्वच फिल्म्स उत्तम असल्या, तरी बॅन्क्सीच्या ‘एक्झिट थ्रू द गिफ्ट शॉप’ या स्ट्रीट आर्ट डॉक्युमेन्टरीला सन्मान मिळण्याची शक्यता खूप आहे. मात्र युद्धविषयक चित्रपट/माहितीपट हा अ‍ॅकेडमीचा वीक पॉईन्ट असल्याने रेस्टरेपोलादेखील निकालात काढता येणार नाही.
अ‍ॅनिमेटेड लघुपटांमध्ये केवळ अ‍ॅनिमेशन उत्तम असून भागत नाही, तर त्यामागचा विचारदेखील महत्त्वाचा ठरतो. पिक्झारच्या ‘डे अ‍ॅण्ड नाईट’ची शैली फार वेगळी नसली, तरी कल्पना मुळात सुचायचा अन मग प्रत्यक्षात उतरवायला अतिशय कठीण आहे. दोन मनुष्याकृतींच्या बाह्याकारातून दिसणारा दिवस-रात्रीचा हा खेळ केवळ वेधक नाही, तर आपल्याला विचारात पाडणारा आहे. दृश्य आणि ध्वनी याचा तपशील इथे फार खोलात जाऊन भरलेला दिसतो. पिक्झारच्या फिल्म्स ब्रिलीअन्ट असणं यात नवीन काही नाही. मात्र त्यांच्या ब्रिलिअन्सची सतत बदलती तऱ्हा मात्र थक्क करून सोडणारी आहे.
‘इट्स नॉट विनिंग ऑर लुजिंग, बट हाऊ यू प्ले द गेम’ असं म्हटलं जातं आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. मात्र त्याचवेळी हेदेखील खरं, की जिंकण्यातून तयार होणारी ईर्षां ही अनेकांना प्रेरित करत असते. केवळ जेत्याला आपल्या पुढल्या कारकीर्दीसाठीच नव्हे, तर जिंकण्याची संधी हुकलेल्याला, ती पुढल्या वेळी हुकू नये अशी कामगिरी करून दाखवण्यासाठी. जिंकण्याचा हा सोहळा दिमाखात साजरा करणारी ‘ऑस्कर नाईट’ जगभरात सारख्याच उत्साहात पाहिली जाते ती कदाचित त्यामुळेच. या रात्रीपुरतं महत्त्व आहे, ते फक्त जिंकलेल्याला. इट्स ऑल अबाऊट विनिंग, अ‍ॅण्ड नथिंग एल्स!
- गणेश मतकरी

Read more...

चौकटीबाहेरची कुटुंबकथा

>> Monday, February 21, 2011

                                                          आय अ‍ॅम ओन ए लोनली रोड अ‍ॅण्ड आय अ‍ॅम ट्रॅव्हलिंग,


                                                              लूकिंग फॉर द की टु सेट मी फ्री,


                                                            ओह द जेलसी, द ग्रीड इज द अनरॅव्हलिंग,


                                                           अ‍ॅण्ड इट अनडझ ऑल द जॉय दॅट कुड बी’

                                                                                                     - जोनी मिचेल, ऑल आय वॉन्ट

------------------------------------------------------------------------------------------------------

जोनी मिचेलची गाणी तिच्या गाण्याच्या शैलीसाठी अन् तिच्या आवाजासाठी जितकी नावाजली जातात, तितकीच अर्थपूर्ण शब्दरचनांसाठीही! तिच्या ‘ब्लू’ या अल्बममध्ये येणारं ‘ऑल आय वॉन्ट’ हे गाणं प्रेम आणि दुराव्याबद्दल अतिशय सोप्या, पण थेट व मनाला भिडणाऱ्या शब्दांत सांगून जातं. या गाण्याचा काही भाग आपल्याला ऐकवला जातो तो ‘द किड्स आर ऑल राईट’ या चित्रपटात, त्यातल्या निक आणि पॉल या दोन प्रमुख पात्रांच्या तोंडून. मात्र ते महत्त्वाचं ठरतं ते त्यातून मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे; जे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.
अमेरिकेत समांतर सिनेमाच्या जागी असलेला इन्डिपेन्डन्ट किंवा ‘इन्डी’ सिनेमा हा ठरावीक वर्तुळात जरूर पाहिला जातो, पण त्याला ब्लॉकबस्टरी परंपरेसारखा प्रेक्षकांचा पाठिंबा नाही. ‘सनडान्स’ हा या इन्डी चित्रपटांना प्राधान्य देणारा, या चित्रकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा चित्रपट महोत्सव नेहमीच वेगळ्या चित्रपटांच्या शोधात असलेल्या रसिकांसाठी लक्षवेधी ठरतो. गेल्या वर्षी या महोत्सवात कौतुकपात्र ठरला तो ‘द किड्स आर ऑल राईट’ हा लिजा कोलोडेन्को दिग्दर्शित चित्रपट. मात्र त्याचं यश हे ‘सनडान्स’पुरतं किंवा मोजक्या चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावणाऱ्या खास प्रेक्षकांपुरतं मर्यादित राहिलं नाही. चित्रपट त्यापलीकडे पोचला. तो चालतो आहे हे लक्षात येताच तो अधिक ठिकाणी प्रदर्शित केला गेला. आणि सर्व स्तरांतल्या अनेक प्रेक्षकांनी तो पाहिला. इन्डी चित्रपटांना मान्यता देणाऱ्या इन्डिपेन्डन्ट स्पिरीट अ‍ॅवॉर्डसाठी तर त्याला अनेक नॉमिनेशन्स आहेतच, वर गोल्डन ग्लोब पुरस्कारात तो विजेता ठरला आणि आता ऑस्कर स्पर्धेतही त्याचं नाव मानानं घेतलं जातं.
या चित्रपटाला पुरस्कार मिळाले वा नाही हे महत्त्वाचं नाही, पण त्याची सर्वत्र पसरलेली लोकप्रियता दाद देण्यासारखी आणि विचार करण्याजोगी आहे. कारण त्याची मांडणी हीच आताआतापर्यंत टॅबू मानल्या जाणाऱ्या विषयाभोवती केलेली आहे.
‘द किड्स आर ऑल राईट’च्या केंद्रस्थानी प्रेमाचा त्रिकोण आहे. निक आणि जूल्स यांचा अनेक वर्षांचा अजूनही प्रेम टिकवून धरणारा संसार. त्यांना दोन मोठी मुलं. मुलगी अठरा वर्षांची, तर मुलगा पंधरा वर्षांचा. आता अचानक त्यांच्या आयुष्यात एक नवं पात्र येतं, ते म्हणजे पॉल. पॉलच्या येण्याने क्षणात सगळी गणितं बदलतात आणि घराचं पूर्ण स्वास्थ्य हरवण्याची लक्षणं दिसायला लागतात.
आता कोणी विचारेल की, या विषयात टॅब म्हणण्यासारखं काय आहे? या प्रकारचे प्रेमत्रिकोण तर अनेक नाटक-सिनेमांत नित्याचे आहेत. पण या त्रिकोणात एक वेगळेपणा आहे. निक आणि ज्यूल्स या दोघीही स्त्रिया आहेत. मुलं या दोघींचीच आहेत, स्पर्म डोनरच्या मदतीने झालेली. आजवर या घराला अपरिचित असणारा हा स्पर्म डोनर आहे पॉल, जो खरं तर या दोन्ही मुलांचा- जोनी अन् लेजरचा बाप आहे.
आजवरचा चित्रपटांचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की, कोणताही व्यावसायिक सिनेमा हा काही प्रमाणात होमोफोबिक असतोच. साहजिक आहे. व्यावसायिक चित्रपट हे अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहणे अपेक्षित असल्याने त्यातली मतं, विचार, संकेत हे समाजाच्या आवडीनिवडीचा लसावि काढूनच मांडलेले असतात. समाजाचा मोठा भाग ‘स्ट्रेट’ असल्याने गे अन् लेस्बियन घटक दुर्लक्षित राहिल्यास आश्चर्य ते काय? आपल्यापेक्षा मोकळा असूनही, अमेरिकन समाज या नियमाला पूर्णपणे अपवाद नाही. १९९० च्या दशकापर्यंत तरी हॉलीवूड फारच सनातनी होतं. पुढे मात्र माय ओन प्रायव्हेट आयडहो (१९९१), फिलाडेल्फिआ (१९९३), टु वाँग फू, थँक्स फॉर एव्हरीथिंग, ज्युली न्यूमार (१९९५), बर्डकेज (१९९६) अशा चित्रपटांतून हे घटक डोकवायला लागले. प्रेक्षकही थोडा चौकटीबाहेरचा विचार करून चित्रपटांना हजेरी लावायला लागले. २००६ च्या ब्रोकबॅक माऊन्टनने तर ऑस्कपर्यंत धडक मारून होमोसेक्शुअ‍ॅलिटीला प्रस्थापित केलं. मात्र अजूनही या प्रकारच्या चित्रपटांचं तुरळक प्रमाण पाहता चित्रकर्त्यांचं अन् प्रेक्षकांचं बिचकणं कमी झालेलं दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर ‘द किड्स आर ऑल राईट’चा बोलबाला हा उल्लेखनीय आहे. चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकाला पाहावासा कधी वाटतो, जेव्हा तो बारकाव्यावर, तपशिलावर, वर्गवारीवर न रेंगाळता त्यापलीकडे जाणारं एखादं मूलभूत विधान मांडेल. जात, धर्म, सामाजिक स्तर, सेक्शुअ‍ॅलिटी यासारख्या वर्गीकरणात न अडकता माणुसकी, तत्त्वज्ञान, मानसिकता याविषयी काही वैश्विक स्वरूपाचं भाष्य करेल, असं जेव्हा होतं तेव्हा या व्यक्तिरेखा त्या कथेपुरत्या, विशिष्ट प्रसंगापुरत्या मर्यादित न राहता प्रातिनिधिक होतात. आणि प्रेक्षकही आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीला बाजूला ठेवून त्या भाष्याकडे पाहू शकतो. त्यानंतर या व्यक्तिरेखा त्याला आपसूक जवळच्या वाटायला लागतात. ‘किड्स आर ऑल राईट’मध्येही काहीसं हेच होतं.
निक (अ‍ॅनेट बेनिंग) आणि जूल्स (जुलिअ‍ॅन मूर) हे लेस्बियन कपल आणि पॉल मुळे (मार्क रफालो) निर्माण होणारा संघर्ष प्रेक्षक सहज मान्य करू शकतो. कारण दिग्दर्शिका सेक्शुअल प्रेफरन्सेस, स्पर्म डोनेशनसारख्या गोष्टी तपशिलापुरत्या वापरूनही विषयाचा भर त्यापलीकडे जाणाऱ्या, कोणालाही सहजपणे जवळच्या वाटणाऱ्या गोष्टींवर देते. चित्रपटात महत्त्व येतं ते कुटुंबपद्धतीला अन् कुटुंबातल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांवर होणाऱ्या बाह्य आक्रमणाला. निक आणि जूल्सच्या लग्नाला अनेक वर्षे झालेली आहेत. त्यांचं प्रेमही शाबूत आहे, पण सरावाने त्यात तोचतोचपणा, कृत्रिमता आली आहे. प्रेम व्यक्त न झाल्याने कुटुंबाला आपली कदर नसल्याची भावना या दोघींच्याही मनात आहे आणि त्यातल्या एकीने आपल्या मानसिक क्लेशावरला तात्पुरता उपाय म्हणून पॉलकडे आकर्षित होणं, हे कुटुंबासाठी न्याय्य नसेल कदाचित, पण तिची ती नैसर्गिक गरज आहे. जूल्सचं हे पाऊल घरातल्या कर्त्यां पुरुषाच्या (नव्हे व्यक्तीच्या) जागी असणाऱ्या निकला अन् दोन्ही मुलांना हादरवून जातं. या प्रकारचा विश्वासघात, कुचंबणा, कुटुंबसंस्थेवरचा आघात हा प्रेक्षक सहज समजून घेऊ शकतो आणि निक तसंच जूल्सकडेही सहानुभूतीने पाहू शकतो.
या प्रकारच्या रचनेत दोन गोष्टी सहजशक्य होत्या. त्या म्हणजे पॉलला खलनायक म्हणून उभा करणं किंवा चित्रपटाला गडद, शोकांत नाटय़ाचं स्वरूप देणं. दिग्दर्शिका लिजा कोलोडेन्को या दोन्ही गोष्टी टाळते. पॉलच्या व्यक्तिरेखेला ती अतिशय सावधपणे, पण सहानुभूतीनेच रंगवते. पॉल जूल्सकडे आकर्षित होतो, तिला प्रतिसाद देतो आणि निक किंवा मुलांचा अपराधी ठरतो, पण त्याच्या दृष्टीने ही आपल्या हातून गमावलेलं काही परत मिळवण्याची संधी असते, कदाचित अखेरची! आतापर्यंत नाती टाळून स्वैर आयुष्य जगलेल्या पॉलला हे कुटुंब आपलं वाटतं (त्यातली दोन मुलं तर त्याचीच आहेत) आणि स्वातंत्र्याची काय किंमत आपण देऊन बसलो, हे त्याच्या लक्षात येतं. त्या कुटुंबाच्या जवळ येताना जो ताबा ठेवायला हवा, तो पॉल ठेवू शकत नाही इतकंच.
कदाचित अखेरच्या पंधरा-एक मिनिटांचा अपवाद वगळता चित्रपटाचा टोनही कॉमेडी आणि ड्रामा याच्यामधला राहतो. तो खो-खो हसवत नाही, पण त्यातले संवाद अन् काही प्रसंगदेखील गमतीदार आहेत. हा विनोद ओढूनताणून न येता स्वाभाविकपणेच रोजच्या बोलण्यात आल्यासारखा येतो. खास म्हणजे यातलं नाटय़ अन् विनोद इथल्या प्रत्येक पात्राच्या वाटय़ाला येतो. कोणीही दुर्लक्षित राहत नाही. सर्व व्यक्तिरेखा त्यांच्या योग्य त्या उत्कर्षबिंदूपर्यंत जातात. बेनिंगला बॉडी लॅन्ग्वेज आणि संवादातून कुटुंबप्रमुख उभा करायचा असल्याने तिला थोडा-अधिक वाव (अन् अधिक पुरस्कार) मिळणं शक्य होतं इतकंच.
आतापर्यंत हॉलीवूडच्या चित्रपटातल्या गे-लेस्बियन व्यक्तिरेखा, एक प्रकारची क्युरिऑसिटी असल्यासारख्या समाजाबाहेरच्या, पण कथानकाच्या सोयीसाठी असल्याप्रमाणे होत्या. ‘द किड्स आर ऑल राईट’ हा त्यांना जराही वेगळी ट्रीटमेन्ट न देता समाजाचाच घटक असल्याप्रमाणे दाखवतो. एक प्रकारची प्रतिष्ठा आणून देतो. कदाचित पुढल्या काळातला चित्रपट अधिक मुक्त विचारसरणीचा करणारं हे महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल.


- गणेश मतकरी ( लोकसत्तामधून)

Read more...

किंग्ज स्पीच - चौकटीच्या आत बाहेर

>> Saturday, February 19, 2011

या वर्षीच्या ऑस्कर स्पर्धेत `द सोशल नेटवर्क`चा प्रमुख स्पर्धक म्हणून ओळखला जाणारा `द किंग्ज स्पीच` उत्तम व्यावसायिक चित्रपट आहे, यात शंकाच नाही. गेल्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटनमधे घडणारा हा चित्रपट ऐतिहासिक संदर्भ अन् ब्रिटिश राजघराण्याची पार्श्वभूमी असणारा आहे. किंग जॉर्ज द सिक्स्थ नावाने गादीवर आलेल्या प्रिन्स अ‍ॅल्बर्टची गोष्ट यात सांगितली जाते, तिही विषयाला शोभणा-या भव्य (मात्र आवश्यक त्या मर्यादेत राहणा-या ) तपशीलासहीत चित्रपट सुखान्त आहे, प्रेक्षकाला व्यक्तिरेखांमध्ये गुंतवणारा आहे, आणि संपल्यावरही आपल्या मनात रेंगाळणारा आहे. अभिनयात तर त्याचं पारडं हे भलतच जड आहे. छोट्या-छोट्या भूमिकांपासून प्रमुख भूमिकेतल्या कॉलिन फर्थ अन् जॉफ्री रशपर्यंत कुठेही नाव ठेवायला जागा नाही. थोडक्यात काय, तर एका आदर्श चित्रपटापासून आपण ज्या अपेक्षा करतो, त्या  सर्व पु-या करणारा हा चित्रपट आहे.
एवढं असूनही मी म्हणेन की तो व्यावसायिक चित्रपटाच्या मर्यादेबाहेरची कामगिरी बजावतो. आशयाच्या स्वरूपापासून ते मांडणीपर्यंत त्याचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. तो कोणत्या घटनांना केंद्रस्थानी ठेवतो, अन् दुय्यम कशाला मानतो यामागे काही निश्चित योजना आहे. राजघराण्यासंबंधातील ऐतिहासिक गोष्ट असूनही तो `एपिक` असण्यावर समाधान मानत नाही. त्याउलट इतर दोन-तीन चित्रप्रकारांची सरमिसळ तो आपला परिणाम वाढविण्यासाठी करतो. त्यामुळे व्यावसायिकतेचे सर्व संकेत पाळत असूनही, मी किंग्ज स्पीचला सांकेतिक, किंवा कन्व्हेन्शनल म्हणणार नाही. `ब्रिटिश राजघराण्यावर आधारित व्यक्तिप्रधान चित्रपट` हा एक नवाच चित्रप्रकार लवकरच मानला जायला लागला, तर आश्चर्य वाटू नये. दर काही वर्षांनी या प्रकारात शोभणारा एखादा उत्तम चित्रपट पडद्यावर येत असतो. मॅडनेस ऑफ किंग जॉर्ज (१९९४) आणि द क्वीन (२००६) ही त्याची दोन गाजलेली उदाहरणे. `द किंग्ज स्पीच` त्या यादीतलंच पुढलं नाव.
चित्रपट सुरू होतो, तो एका भाषणापासूनच. १९२५ सालच्या ब्रिटिश एम्पायर एक्झिबिशनच्या उदघाटनप्रसंगी. राजपुत्र अ‍ॅल्बर्ट (कॉलिन फर्थ) राजाचा संदेश वाचून दाखविणार आहे. अ‍ॅल्बर्ट अन् त्याची पत्नी एलिझबेथ (हेलेना बोनहॅम कार्टर) दोघंही काळजीत आहेत, कारण अ‍ॅल्बर्ट बोलताना अडखळतो. अगदी तोतरा म्हणता येणार नाही, पण लहानपणापासून तो चार लोकांसारखा सहज बोलू शकत नाही. मात्र तो चार लोकांसारखा नसून राजपुत्र आहे. त्याने आपल्या प्रजेच्या संपर्कात राहणं अपेक्षित आहे, त्यामुळे असे प्रसंग तो टाळू शकत नाही. किंबहूना त्याच्यावरच्या जबाबदारीची जाणीव ही त्याची अडचण अधिकच बिकट बनवणारी आहे. त्याचं समाजातलं स्थान, अन् त्याच्या शब्दाकडे कान लावून बसलेला प्रत्येक ब्रिटिश नागरिक त्याचा आत्मविश्वास अधिकच कमकुवत करणारा आहे. अनेक संभाषणतज्ज्ञांकडे गेल्यानंतर अ‍ॅल्बर्टची ओळख लायनल (जॉफ्री रश) या विक्षिप्त तज्ज्ञाशी होते. तो राजपुत्रावर उपचार करायला तयार असतो, पण त्याच्या काही अटी असतात. उपचार हवे असतील, तर अ‍ॅल्बर्टने महालाबाहेर पडून लायनलच्या त्यामानाने छोट्या ऑफिसात हजेरी लावली पाहिजे इथपासून ते त्याला युअर हायनेसऐवजी ` बर्टी `  हे संबोधन वापरण्यात येईल इथपर्यंत.
चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणारा प्रश्न हा एकाच वेळी वैयक्तिक अन् सामाजिक आहे. म्हटलं तर हा अ‍ॅल्बर्टचा त्याच्यापुरता प्रश्न आहे, तो देखील वरवरचा. हे व्यंग नाही, किंवा त्याच्या कर्तबगारीवर त्याचा थेट परिणाम होण्यासारखा नाही. शिवाय असा दोष अनेकांत असतो त्याचा फार बाऊ केला जात नाही. या विशिष्ट केसमध्ये मात्र अ‍ॅल्बर्टचं समाजातलं स्थान, त्या स्थानाची समाजाभिमुख असण्याची गरज आणि रेडिओचा उदय व लोकप्रियता यांनी ही व्यक्तिरेखा बांधली जाते. तिचा दोष ही तिची वैयक्तिक अडचण उरत नाही. पुढे अ‍ॅल्बर्ट राजा झाल्यावर तर नाहीच नाही.
अडचणींचं हे स्वरूप दिग्दर्शक टॉम हूपर समजून घेतो. अन् तिची मांडणी देखील दोन पातळ्यांवर करतो. नायकाचं वैयक्तिक आयुष्य, बायको/मुली, वडीलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांसाठी राजा बनलेला एडवर्ड (गाय पियर्स) ही मंडळी त्याच्या कुटुंबाचा भाग आहेत, आणि चित्रपट ते असलेल्या प्रसंगांना सर्वाधिक महत्त्व देतो. या प्रसंगात अ‍ॅल्बर्टकडे राजा म्हणून पाहिलं जाण्यापेक्षा एक माणूस म्हणून पाहिलं जातं. अ‍ॅल्बर्ट अन् त्याच्या मुली यांच्यातलं बदलतं नातं दाखविणारे तीन प्रसंग (अ‍ॅल्बर्ट राजपुत्र असताना, राजा झाल्यावर अन् अखेरच्या भाषणानंतर) पाहिले, तर ते स्पष्ट होतं. लायनल अन् त्याचा विद्यार्थी बर्टी यांचा संवादही असाच व्यक्तिगत पातळीवर राहतो.
दुसरी सामाजिक पातळी चित्रपट क्वचित येणा-या, पण कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणा-या प्रसंगात दाखवितो. सुरुवात अन् अखेरीला येणारी दोन भाषणं, राजाने अ‍ॅल्बर्टला केलेला उपदेश ,राज्याभिषेकाआधी/नंतर येणारे काही प्रसंग, या मोजक्या जागाही आपल्याला अ‍ॅल्बर्टच्या दुहेरी आयुष्याचा विसर पडू देत नाहीत.
छायाचित्रणात विषयाचं लार्जर दॅन लाईफ असणं स्पष्ट करणारी एक गोष्ट आपल्याला दिसून येते, ती म्हणजे साध्या प्रसंगात आणलेली सौंदर्यपूर्ण कृत्रिमता. चित्रपट सतत वाईड अँगल्स लेन्स वापरताना दिसतो. कमी व्यक्ती असलेल्या प्रसंगातही आजूबाजूचा अवकाश हायलाईट होईल असं फ्रेमिंग करणं, दृश्य रचनेमधे काही अभिजात चित्रांचे संदर्भ वापरणं, आऊटडोअर दृश्यांमध्ये लंडनचं वातावरण स्पष्ट करणा-या धुक्यासारख्या गोष्टीचा अर्थपूर्ण उपयोग करणं, व्यक्तिरेखा वा स्थळाची भव्यता दाखविणारे लो अँगल योजणं या सा-यातून चित्रपटाच्या दृश्य भागाला वजन येतं. हे वजन चित्रपटाच्या व्यक्तिप्रधान अन् समाजाभिमुख यो दोन्ही पातळ्यांना सारखंच राहत असल्याने परिणामात एकसंघता आणतं.
द किंग्ज स्पीच हा एपिक असण्यापलीकडे जाऊन इतर काही चित्रप्रकार वापरत असल्याचं मघा मी म्हटलं. त्यातला महत्त्वाचा एक प्रकार म्हणजे शिक्षक-विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवणा-या गुड विल हन्टिंग किंवा फाइन्डिंग फॉरेस्टर सारख्या चित्रपटाचा. बहुधा यातली एक व्यक्तिरेखा विक्षिप्त असते, अन् चित्रपट त्यांच्या नात्याच्या बदलत्या स्वरूपावर केंद्रीत असतात.
या प्रकाराबरोबरच कौटुंबिक नाट्य, विसंगत स्वभावाच्या मित्रांना जोडणारे बडी मुव्हीज, अपयशी व्यक्तिरेखेच्या यशाकडे होणा-या वाटचालीला रंगवणारे चित्रपट, अशा अनेक प्रकारांचा इथे मिलाफ दिसून येतो. वेळोवेळी चित्रपटात विनोदाची झलकदेखील येते. (खासकरून साध्या सरळ बर्टीने केलेला अपशब्दांचा वापर) मात्र विनोद त्यातल्या नाट्यपूर्णतेला इजा पोहोचवणार नाही याची दिग्दर्शक काळजी घेतो.
यंदा चित्रपटाचं ऑस्कर बहुदा सोशल नेटवर्कलाच जाईल. मात्र किंग्ज स्पीचचं एक पारितोषिक मात्र नक्की आहे. ते म्हणजे प्रमुख भूमिकेतल्या कॉलीन फर्थचं. व्यावसायिक चौकटीच्या आतबाहेरचा तोल राखण्याचं अर्ध काम त्याच्या अभिनयानेच केलं आहे. अ‍ॅकेडमीच्या हे लक्षात आल्यावाचून राहणार नाही.
-गणेश मतकरी.

Read more...

127 अवर्स- एकपात्री साहस

>> Sunday, February 13, 2011

`127 अवर्स` पाहताना मला स्टीवन किंगच्या दोन कथानकांची आठवण झाली. पहिली होती ती `स्केलेटन क्रू` कथासंग्रहात आलेली.`सर्व्हायवर टाईप` नावाची लघुकथा. या कथेचा नायक एका बेटावर अडकलेला. खाण्यापिण्याचे वांधे आणि एका पायानेही जायबंदी झालेला. जिवंत राहण्यासाठी तो स्वतःच्या शरीराचेच तुकडे करून खायला लागतो. किंगने निवेदनासाठी शैली वापरलीय, ती डायरी लिहिण्याची. ही डायरी कोणत्या क्षणी थांबते, ते मी सांगण्याची गरज नाही. दुसरी आहे त्याची `जिरार्डस गेम` ही कादंबरी. या कादंबरीची नायिका एका निर्मनुष्य जागी हातकडीने पलंगाला जखडलेली आहे. सोबतीला तिच्या नव-याचं मृत शरीर आहे, अन् भूतकाळाच्या आठवणी. काही वेळातच आठवणी आणि वर्तमान यांच्या चमत्कारिक मिश्रणात ती गुरफटली जाते. किंगच्या अनेक साहित्यकृतींप्रमाणेच या दोन देखील सामान्य माणसांनी अचानक चमत्कारिक परिस्थितीत सापडण्यावर आधारलेल्या, अन् जीवन-मृत्यूच्या प्रश्नाभोवती फिरणा-या आहेत. `भय` हा या लेखकाच्या साहित्यातील महत्त्वाचा घटक, या ठिकाणीदेखील दिसून येतो. 127 अवर्स पाहून हे आठवण्याचं कारण म्हणजे या दोन्ही कथांमधले घटक या चित्रपटात आहेत. अपरिचित ठिकाणी ओढवणारी विचित्र परिस्थिती आहे, ओळखीच्या जगाशी संपर्क तुटल्याचं जाणवल्याने उत्पन्न होणारी भीती आहे, परिस्थिती अन् संभाव्य मृत्यूच्या चाहुलीतून उदभवणारी मनःस्थिती आहे, भूतकाळाने वर्तमानावर केलेलं आक्रमण आहे आणि सर्व मार्ग खुंटल्यावर नाईलाजाने उचलावं लागणारं टोकाचं पाऊलही आहे. फरक इतकाच, की ही कोणा भयकथालेखकाच्या सुपीक डोक्यातून निघालेली कथा नसून गिर्यारोहक अ‍ॅरन राल्स्टन याच्या आयुष्यातील खरीखुरी घटना आहे. त्याच्या `बिट्वीन ए रॉक अँण्ड ए हार्ड प्लेस` या आत्मचरित्रावर आधारित हा चित्रपट आहे.
दिग्दर्शक डॅनी बॉईल, पटकथाकार सायमन बोफॉय, छायाचित्रकार अँथनी डॉड मेन्टर आणि संगीतकार ए.आर.रेहमान ही `स्लमडॉग मिलिअनेर`ची ऑस्कर विजेती टिम इथे पुन्हा एकत्र आली आहे. मात्र स्लमडॉग अन् `127 अवर्स` याच्यात काही म्हणता साम्य नाही. ना आशयात, ना चित्रप्रकारात, ना दृश्यशैलीत. स्लमडॉग आँस्करस्पर्धेत असताना, मी बॉईलच्या शैलीविषयी अनेक लेखात विस्तृत्तपणे लिहिले होते. ब्लॉगवर त्यातले बरेचसे लेख असल्याने पुनरावृत्ती टाळतो. पण एक मुद्दा सांगंणं आवश्यक आहे. बॉईल हा सामान्यतः वेगवेगळ्या जॉनरमधे, किंवा चित्रप्रकारात काम करतो. संकेत स्पष्ट झालेला एखादा चित्रप्रकार तो निवडतो. (उदा. स्लमडॉग हा त्याने बॉलीवूड शैलीसाठी निवडला होता.) अन् आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीने त्यात बदल घ़डवून आणतो. 127 अवर्सचा चित्रप्रकार हा सत्य घटनांवर आधारित साहसपटांचा आहे. टचिंग द व्हॉईड, एट बिलो यासारखे मानव विरुद्ध निसर्ग थाटाचे साहसपट आपल्याला अपरिचित नाहीत. बॉईलने आपला साहसपट रचलाय तो मात्र मुळातच एका जागी अडकून राहिलेल्या नायकाभोवती फिरणारा. अ‍ॅरन राल्स्टनभोवती.
या प्रकारच्या साहसपटांना मुळातच कथानक थोडकी असतात. कारण बाय डेफिनीशन ते एखाद्या महत्त्वाच्या घटनेभोवती गुंफलेले असतात. हा चित्रपट याचा अपवाद नाही. तो सुरू होतो , अ‍ॅरनच्या कॅन्यनलॅण्डस नॅशनल पार्कमधल्या प्रवेशापासून. हा सुरूवातीचा भाग हा जरा अधिकच प्लेझन्ट आहे, मूळच्या घटनांहूनही कितीतरी अधिक.
प्रत्यक्षात अ‍ॅरनची वाटेवर दोन मुलींशी गाठ पडली आणि त्याने त्या दोघींना पत्ता शोधायला मदत केली. चित्रपटात अ‍ॅरन या दोघींबरोबर चिकार फ्लर्ट तर करतोच वर त्यांच्याबरोबर त्या जात असलेल्या छुप्या तळ्यावर जाऊन त्यांच्याबरोबर डुंबतो देखील. हा भाग बॉईलने अधिक रंगवण्यामागचं कारण स्पष्ट आहे. एकतर तो अ‍ॅरनची व्यक्तिरेखा आपल्या मनात स्पष्टपणे उभी करायला मदत करतो. चित्रपटाचा उरलेला भाग आठवणींमधील थोडीबहुत दृश्य सोडता एकट्या अ‍ॅरनवर चित्रित होतो. अन् केवळ त्याचं स्वतःशी बोलणं हे त्याच्या व्यक्तिचित्रणासाठी पुरेसं नाही. दुसरं कारण म्हणजे अ‍ॅरन चित्रपटाचा बराचसा भाग एका जागी अडकून राहतो. तो अडकल्यानंतरच्या त्याच्या परिस्थितीशी विरोभास निर्माण होण्यासाठी सुरूवातीचा भाग वापरला जातो, ज्यात अ‍ॅरनच्या स्वैर बागडण्याबरोबरच रम्य निसर्गदृश्यांचाही अंतर्भाव आहे.
तळ्यावरून निघताना अ‍ॅरन त्याच्या दोन मैत्रिणींना निरोप देतो आणि आपल्या उद्दीष्टांकडे जायला निघतो. एका घळीत उतरताना त्याचा हात दगडाखाली सापडतो अन् अडकून राहतो. अ‍ॅरनला सुरूवातीला ही गोष्ट फार धोक्याची वाटत नाही. पण वेळ जायला लागतो आणि सूटकेची आशा हळूहळू मावळायला लागते.
या चित्रपटाची पटकथा स्वतः बॉईल आणि बोफॉय अशा दोघांनी लिहिलेली आहे. ती लिहायला कठीण आहे ती दोन कारणांसाठी. पहिलं म्हणजे त्यात म्हणण्यासारख्या घटना नाहीत. अ‍ॅरनला होणा-या भासांमधून थोडी व्हरायटी करणं शक्य आहे, पण तिचा कथेच्या आलेखावर परिणाम होत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या वेगात वा तणावात बदल संभवत नाही. दुसरं कारण थोडं अधिक महत्त्वाचं आहे. ते म्हणजे सामान्य प्रेक्षकाला चित्रपटाचा शेवट माहिती आहे. भारतीय प्रेक्षकाला कदाचित नसेल, पण चित्रपट मुळात ज्या अमेरिकन प्रेक्षकासाठी बनलेला आहे, त्याने २००३मध्ये सर्व वृत्तपत्रांमधून अन् न्यूज चॅनल्सवरून अ‍ॅरनला ज्या दिव्यातून जावं लागलं त्याचा वृत्तान्त ऐकला, पाहिलेला आहे. त्याला अ‍ॅरन जिवंत सुटला हे माहित तर आहेच वर त्यासाठी त्याने कोणता मार्ग पत्करला हे देखील बहुतेकांना तो किती दिवस अडकला होता हे देखील ठाऊक असेल, अन् ज्याना ते आठवत नसेल त्यांच्या सोयीसाठी चित्रपट आपल्या नावातच वेळेचा जमाखर्च स्पष्ट करतो. याचा अर्थ तो मुळातच पटकथेतून रहस्य अन् भय या गोष्टी बाजूला करतो.हे करून तो आपलं लक्ष केंद्रीत करतो, ते अ‍ॅरनच्या मनःस्थितीवर. त्याच्या मनात चाललेल्या आशा-निराशेचा खेळ, भास, आठवणी, कॅमेरावर आपल्या पालकांसाठी निरोप नोंदवणं (हे मुद्रीत फूटेज अस्तित्त्वात असल्याचं मानलं जातं. ते जाहीर नोंदीचा भाग नाही, मात्र चित्रकर्त्यांना ते अ‍ॅरनने दाखविल्याचं कुठेसं वाचलंय.
`ग्रिझली मॅन` डॉक्युमेन्टरीतल्या अखेरच्या अदृश्य फूटेजची आठवण यावेळी झाल्य़ाशिवाय राहत नाही. ग्रिझली मॅनच्या नायकाच्या आणि त्याच्या मैत्रिणीचा अस्वलानी घेतलेल्या बळीचं ध्वनीमुद्रण त्याच्याच कॅमेरावर झालेलं होतं. लेन्स झाकलेली असल्याने दृश्य मात्र लपली. प्रत्यक्ष माहितीपटात हे मुद्रण ऐकवलं जात नाही, पण माहितीपट बनवणारा हरझॉग ते पडद्यावर ऐकत असताना, त्याच्या चेह-यावरले हावभाव आपण पाहू शकतो. )
इथे अ‍ॅरन वाचला असल्याने फूटेज `त्या` फूटेजइतकं भयानक ठरत नाही. उलट या फूटेजचं प्रत्यक्ष चित्रण हाच पटकथेचा एक महत्त्वाचा भाग बनतो.) जीव वाचवण्यासाठी घ्याव्या लागणा-या किंमतीचा हिशेब मांडणं, या गोष्टी १२७ अवर्सला त्याचा आकार देऊ करतात. बॉईलच्या चित्रपटात हमखास दिसणारा ब्लॅक ह्यूमर इथेही हजेरी लावतो. अ‍ॅरनच्या स्वगतात येणारं गेम शो सदृश कोम्पिअरिन्ग , किंवा स्वप्नवत सुटकेचे मार्ग, यासारख्या जागांतून तो दिसत राहतो .हिंसाचार हा लार्ज स्केल नसला तरी काही जणांना तरी डोळे झाकायला लावण्याची ताकद त्याचात निश्चित आहे. पडद्यावरले रक्तरंजित दृश्य हे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं केवळ पुनःकथन आहे, हे देखील आपल्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेसं आहे. बॉईलचा ट्रेडमार्क म्हणण्याजोगी एक गोष्ट इथे नाही,अन् ती म्हणजे गती. चित्रपटाच्या चनेत, अन् प्रत्यक्ष प्रसंगातही गतीचा संपूर्ण अभाव इथे दिसून येतो. अर्थात कथाविषयाच्या दृष्टीने हे योग्यच आहे, आणि सुरूवातीच्या काही दृश्यांमधल्या गतीचा आभास वगळता बॉईलने ती लादण्याचा प्रयत्न न करणं, हे त्याच्या दिग्दर्शन कौशल्याबद्दल सांगतं.
स्लमडॉगनंतरचा बॉईलचा हा पुढला चित्रपट स्लम़डॉगप्रमाणेच ऑस्करच्या अनेक विभागात नॉमिनेटेड जरूर आहे, मात्र स्पर्धा पाहता यंदा त्याचं खातं रिकामं राहण्याची शक्यता अधिक दिसते. पण ते साहजिकच आहे. पारितोषिकासाठी विशिष्ट प्रकारचे चित्रपट लागतात. हा त्यातला नाही इतकंच. तो चित्रपट म्हणून उत्तम आहे, यात शंकाच नाही.

- गणेश मतकरी

Read more...

फाईव्ह डेज व्हिदाऊट नोरा - सहवास संपल्यावर...

>> Monday, February 7, 2011

`फाईव्ह डेज व्हिदाऊट नोरा` हा जर हिंदी चित्रपट असता तर बहुदा त्याची सुरूवात तरूण नोरा होजेला भेटते इथपासून झाली असती. त्यानंतर प्रेमप्रकरण, पालकांच्या समजुती, लग्न, बेबनाव इत्यादी गोष्टींत मध्यंतरापर्यंतचा भाग खर्ची पडला असता. आपल्या चित्रकर्त्यांना ही एक खोडच आहे. बहुतेक सर्व देशांमध्ये चित्रपट हे मुळातला नाट्यपूर्ण भाग अतिशय काळजीपूर्वक निवडतात, अन् पटकथा या कालावधीतच घडवतात. मग गरजच असेल, तर व्यक्तिरेखांचा भूतकाळ, वा इतर तपशील हा मूळ नाट्याला धक्का पोहोचणार नाही अशी काळजी घेऊन हलक्या हातांनी पटकथेत गुंफला जातो. गरजच असेल तर फ्लॅशबॅक किंवा संवादांमधून अधिक माहिती देण्यात येते. आपल्याकडे मात्र नाट्य कोणत्याही भागात असो, पारंपरिक सुरुवातीवाचून आपलं भागत नाही, अन् नायक-नायिकेच्या भेटीपेक्षा अधिक पारंपरिक सुरुवात तरी कोणती असणार?
असो, आपल्या सुदैवाने हा हिंदी चित्रपट नाही, आणि मूळ विषय बाजूला ठेवून इतरच गोष्टींत वेळ काढणं त्याला पसंत नाही. त्यामुळे तो सुरू होतो, तो चित्रपटाच्या नावात येणा-या `फाईव्ह डेज`मधल्या पहिल्या दिवशी नोराच्या मृत्यूपासून, किंबहुना त्याहून थोडा आधी. आपल्या श्राद्धासाठी तिने चालविलेल्या तयारीपासून. नोरा अन् होजे आता निवृत्तीच्या वयाला आलेले. घटस्फोटही झालेला. मात्र समोरासमोरच्या इमारतीत राहणा-या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध आहेत. अजूनही. सुरूवातीचा थोडा वेळ, चित्रपट सेटअपसाठी देऊ करतो, आणि मग मुख्य गोष्टीकडे वळतो. 
सारंच आलबेल नसल्याचा संशय आलेला होजे (फर्नांडो लुयान) नोराच्या फ्लॅटमध्ये शिरकाव करून घेतो, अन् तिने आत्महत्या केल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्याला वाईट वाटलं तरी फार धक्का बसत नाही. कारण आधी अनेक वेळा तिने हा प्रयत्न केलेला असतो. या खेपेला ती यशस्वी होते इतकंच. मन घट्ट करून होजे पुढल्या तयारीला लागतो. खाण्यापिण्याची सोय नोराने करून ठेवलीच असते. गच्च भरलेल्या फ्रिजसोबत तिने स्वैयंपाकिणीसाठी सूचनाही ठेवलेल्या असतात. होजेपुढे काम असतं ते अधिक वैयक्तिक स्वरूपाचं. ते म्हणजे मृत्यूनंतरच्या सोपस्कारांची तयारी करणं. त्यासाठी आप्तांमधून धर्मगुरूपर्यंत सर्वांशी संपर्क करणं, अन् त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवणं. मात्र नोराने आत्महत्येसाठी निवडलेला दिवस हा काळजीपूर्वक निवडलेला असतो. बाहेरगावी असलेल्या मुलाचं कुटुंब परत येईस्तोवर लागलेला वेळ हा नोराच्या ज्युईश सणवाराच्या आड येतो. अन् पुढले दोन-तीन दिवस प्रेत पोहोचवता येणार नाही असं लक्षात येतं. घरात बर्फाच्या दोन-तीन लादींवर झोपवून ठेवलेली नोरा अन् तिने मृत्यूआधी उघड वा लपवून ठेवलेले पुरावे हे कुटुंबापुढे एक जुनं कौटुंबिक रहस्य उलगडायला लागतात, अन् प्रत्येकाला आपली बाजू निवडणं भाग पडतं. २००८ चा मेक्सिकन - फाईव्ह डेज विदाऊट नोरा, ही लेखिका दिग्दर्शिका मारिआना चेनिओची प्रथम निर्मिती. ती पाहताना प्रथम लक्षात येते, ती या चित्रपटाची नाटकासारखी रचना, चित्रपट हे बहुदा एका स्थलकालाशी बांधलेले नसतात, त्यांचं एकापेक्षा अनेक जागी जाऊ शकणं अन् पात्रांच्या संख्येत वा दिसण्यात येऊ शकणारं वैविध्य या माध्यमाच्या वैशिष्ट्यांचा विचार सामान्यतः कथाविषय निवडताना केला जातो. अर्थात याला ट्वेल्व्ह अँग्री मेन (१९५७) पासून एक्झाम (२००९) पर्यंत अनेक सन्माननीय अपवाद जरूर आहेत, जे आपल्या कथानकाला मर्यादित जागेत अन् मर्यादित काळात घडवतात. नोरात वर उल्लेखलेल्या दोन चित्रपटांसारखा एका खोलीत काही तासांत घडत नाही. मात्र नोराचं घर हे त्यातलं प्रमुख स्थळ आहे. त्यातले प्रसंग हे क्वचित होजेच्या घरी, भूतकाळात वा स्मशानासारख्या वेगळ्या जागी घडत असले तरी हे प्रसंग रिलीफ म्हणून येतात. प्रत्यक्ष नाटकात या जागा केवळ निवेदनात किंवा माफक दृश्यबदलांनीही दाखवता आल्या असत्या. त्यातला पाच दिवसांचा कालावधीही नाटकासाठी सोयीस्कर आहे. मुळात या संहितेची सुरुवात नाटक म्हणून झाली असावी का याची माहिती उपलब्ध नाही. मात्र संकल्पनेच्या पातळीवर ते सूचित होतं. पण याचा अर्थ चित्रपट पुरेसा सिनेमॅटीक नाही असा मात्र काढू नये. दिग्दर्शिकेला माध्यमाची पुरती जाण असल्याचं इथले अनेक प्रसंग आपल्याला दाखवून देतात. चित्रपट सुरू होताना चेहरा न दाखवता नोराने चालविलेली आपल्या मृत्युनंतरची तयारी दाखवणं, प्रत्यक्ष नोरा केवळ भूतकाळातील काही प्रसंगांत फोटोमध्ये येऊनही तिचं अस्तित्त्व सतत जाणवत राहिलसं ठेवणं, नोरा अन् होजेच्या समोरासमोरच्या घरांचा आशय अन् दृश्य या दोन्ही पातळ्यांवर उपयोग करणं, या गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत. नोराच्या तयारीचा प्रसंग खास उल्लेखनीय, कारण तो प्रत्यक्ष विषयावर न बोलता पुढे येणा-या अनेक महत्त्वाच्या प्रसंगाची प्रस्तावना करून ठेवतो. ते ते प्रसंग येताच आपल्याला नोराच्या या थोडक्या प्रसंगांची आठवण होते, अन् पर्यायाने तिच्या अस्तित्त्वाची जाणीव. ज्यांनी अपर्णा सेनचा मिस्टर अँड मिसेस अय्यर पाहिला असेल त्यांना कदाचित मी काय म्हणतोय ते अधिक चांगल्या प्रमाणात लक्षात येईल. त्यातही पहिलं दृश्य हे प्रवासासाठी कऱण्यात येणा-या तयारीचं होतं. यात गोळा केल्या जाणा-या वस्तू या पुढे चित्रपटात महत्त्वाच्या ठरणा-या होत्या. अन् इथला त्यांचा उल्लेख हा प्रस्तावनेसारखा होता. (काही वर्षांपूर्वी मी एका नावाजलेल्या चित्रपंडितांना मिस्टर अँड मिसेस अय्यरमधल्या या दृश्याची अकारण चिरफाड करताना ऐकलं होतं. हे सगळं कसं बाळबोध आहे असा त्यांचा सूर होता. मी एवढंच म्हणेन की अय्यर काय , किंवा नोरा काय, ही दृश्य महत्त्वाची आहेत, अन् त्यामागे काही एक विचार केला गेला आहे. कोणाच्याही सल्ल्यावरून निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रेक्षकांनी ती स्वतः पाहणं आवश्यक आहे. माझं स्वतःचं मत या दोन्ही दृश्यांबद्दल, अन् चित्रपटांबद्दल देखील चांगलं आहे.)
नोराचा प्रकार हा ब्लॅक कॉमेडी म्हणण्याजोगा आहे, पण तो वरवर मृत्यूसारखा गडद विषयाकडे सतत गांभीर्याने न पाहता त्यांच्या आयुष्यातील विसंगती शोधण्यासाठी वापर करणं, काही गंमतीदार प्रसंग अन् शाब्दिक तसंच प्रासंगिक विनोद वेळोवेळी जवळ करणं, या गोष्टी ब्लॅक कॉमेडीशी सुसंगत आहेत. मात्र अंतिमतः इथला आशय हा केवळ तिरकस दृष्टिकोनावर अवलंबून नाही, किंवा केवळ सुखांतिका म्हणण्याइतका तो ढोबळदेखील नाही. त्यातला भावनिक संघर्ष इथे सर्वात महत्त्वाचा आहे. नोराचं खरं आव्हान हे ज्या पात्रामुळे संघर्ष तयार होतो, तेच केवळ पार्श्वभूमीला ठेवण्यात आहे. ते समोर येऊन आपल्या वाटचा युक्तिवाद करू शकत नाही. ती जबाबदारी येऊन पडते, ती इतर पात्रांवर अन् निर्जीव पुराव्यांवर. मात्र या मार्गांनीही या व्यक्तिरेखेला न्याय मिळू शकतो, तिची बाजू केवळ चित्रपटातल्या व्यक्तिरेखांपर्यंतच नाही, तर आपल्यापर्यंतही पोहोचू शकते. यात चित्रपटाचं यश आहे. हे यश फाईव्ह डेज विदाऊट नोराला केवळ विनोदाच्या चौकटीत अडकू देत नाही. आपल्याला त्याच्याकडे गंभीरपणे पाहायला लावतं. अंतर्मुख व्हायला लावतं.
- गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP