पीके- सफाईदार म्हणायचा इतकच !

>> Monday, December 22, 2014



स्पॉयलर वॉर्निंग- मला वाटतं आता पीकेच्या विषयात काही रहस्य उरलेलं नाही. तरीही त्याचा विषय , किंवा विषयापेक्षाही पार्श्वभूमी आपल्या चित्रपटांसाठी नवी असल्याने जर तुम्ही पाहिला नसाल तर नं वाचलेलं उत्तम. कारण इथे प्रचंड प्रमाणात स्पॉयलर आहेत.

राजकुमार हिरानी हा सध्याच्या अत्यंत सफाईदार ( चांगल्या अर्थानेच, पण ...) आणि व्यवसायिक वर्तुळातल्या चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट पहाताना कंटाळा येत नाही. तुम्ही कथेला बांधलेले रहाता. विपुल परकीय संदर्भ असले तरी ते हुशारीने लपवले जातात आणि सामान्यत: प्रेक्षक खूष होईल हे पाहिलं जातं. बहुतेकदा काही सामाजिक आशयही मांडला जातो. त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांत सफाईबरोबर एक स्पॉन्टेनिईटी होती. काहीतरी नवंच आपण पाहातोय असा भास होता. थ्री इडिअट्समधे तो कुठेसा हरवला. चित्रपटामागची मेहनत, पटकथेतली जुळवाजुळव जाणवायला लागली. तरीही, इडिअट्समधे हे चालून गेलं. सारं ओळखीचं असलं  तरी पाहाताना त्यात उस्फूर्तपणा वाटत होता. शिवाय आधीच्या चित्रपटांइतका नसला, तरी  पटकथेचा दर्जा हा खूपच चांगला होता. सर्व व्यक्तिरेखांना पुरेसे लक्षवेधी ट्रॅक्स, फ्लॅशबॅक्सचा चांगला वापर आणि उत्तम गाणी हे तर होतच. परफॉर्मन्स हा बोनस. तोही सर्वांचा तुल्यबल. अगदी शर्मन जोशीपासून करीना कपूर पर्यंत. या तीन उत्तम चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर पीके निराशा करतो, हे वेगळं सांगायला नको.
मला पीकेची थोडी आधीपासून काळजी होती. मागे एका मुलाखतीत आमिर खानला पीके व्यक्तिरेखेच्या विस्फारलेल्या डोळ्यांचं कौतुक करताना, आणि हे काहीतरी फारच वेगळं केलय या सुरात बोलताना मी एेकलं, तेव्हापासूनच. पात्राने डोळे नं मिटणं, हा व्यक्तिरेखेचा युएसपी ? सिरीअसली? हिरानीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून मी तेव्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण आता त्याची आठवण झाली ती झालीच.
पीके चित्रपटाचा विषय काय मानायचा? ती पृथ्वीवर अडकलेल्या परग्रहवासियाची गोष्ट आहे, की धर्माला आव्हान देणाऱ्या एका रॅशनल विचारवंताची? कारण यात एक अगदी मूलभूत विसंगती आहे. ती म्हणजे हे दोन स्वतंत्र चित्रपट आहेत. पीके हा परग्रहवासीयाच्या आगमनापर्यंत गोष्टी प्रत्यक्ष दाखवतो , मात्र पुढे साय फाय अँगल खुंटीला टांगून धर्मविषयक तत्वचिंतन वापरतो. पीके ( खान) हा परग्रहावरुन आला असं मानलं तर त्याचे तपशील इतके तकलादू का?  पीके मुळात इतका आपल्यासारखा कसा ?टेलिपथीने बोलणाऱ्या लोकांची स्वरयंत्र इतकी विकसित कशी ?  त्याने पृथ्वीवर येताना बरोबर काहीच आणलं कसं नाही? यानसंपर्कासाठी असलेलं यंत्र इतकं वेडगळ पध्दतीने का लावण्यात आलं होतं? मुळात तो पृथ्वीवर येतोच कशासाठी? त्याचं येणं काही अपघाती नाही  , म्हणजे त्यामागे कारण हवं, काही योजना हवी. पृथ्वीवासियांशी संपर्कानंतर काय करावं,वा तो संपर्क नं येण्यासाठी काय योजना करावी हा विचार हवा. यातलं काही पीकेमधे विचारातच घेतलेलं दिसत नाही. हिचहायकर्स गाईडमधल्या फोर्ड प्रीफेक्टची तयारीही याहून कितीतरी अधिक होती.
सायन्स फिक्शन मधे नेहमीच एक प्रश्न विचारला जातो की आपण परग्रहवासियांचे वंशज तर नाही? तंतोतंत आपल्यासारखा दिसणारा परग्रहवासी असणारा हा चित्रपट तो विचारत नाही. बालपटांमधे हा निष्काळजीपणा एकवेळ मी चालवून घेईन, पण जो चित्रपट अर्ध्याहून अधिक वेळ तर्काच्या आधारे युक्तीवाद केल्याचा दावा करतो त्यात निश्चित नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ग्रहाची वैज्ञानिक प्रगती इतकी उत्तम , तिथून आलेला परग्रहवासी हा आपला हरवलेल्या रीमोटवर तोडगा म्हणून काय शोधेल? देव का वैज्ञानिक? खासकरुन त्याला जर भाषा अवगत असेल, तर तिचा वापर तो शास्त्रज्ञांना पटवण्यासाठी करेल, का सेल्फप्रोक्लेम्ड गुरुवर्यांशी वायफळ वाद घालण्यासाठी? खरंतर एखाद्या शास्त्रज्ञाकडून  माहिती ट्रान्स्फर करुन स्वत:च रिमोट बनवणं सोपं नाही का?
बरं, पीकेचं हे जगावेगळं असणं दाखवल्यानंतर उरलेला चित्रपटभर पीके काय करतो, तर त्या वेगळेपणाचा जराही वापर न करता धर्मसंस्थांना आव्हान देतो. या भागातला पीके, फॉर ऑल प्रॅक्टीकल पर्पजेस, सामान्य माणूस आहे, ज्याचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन काहीसा अजब आहे. या भागापुरतं पीकेचं व्यक्तीमत्व आणि त्याचा जग्गूशी ( शर्मा) संवाद,  के-पॅक्स या उत्तम चित्रपटावरुन प्रेरित असावा असं मानायला जागा आहे. गंमत म्हणजे चित्रपटाचं एकूण रुप पहाता, इथेही के-पॅक्सप्रमाणे नायकाचं परग्रहवासी असणं - नसणं संदिग्ध ठेवलं असतं, तर त्याच्या या रिकामपणच्या उद्योगाला अर्थ तरी आला असता, पण तसंही होत नाही.
आता हे सगळं लाक्षणिक ठरवत पीकेचं एलिअन स्टेटस केवळ कथेला निमित्त आहे, असं मानलं, तर या निमित्ताच्या आंधारे चित्रपट प्रत्यक्ष कोणता वेगळा विचार मांडतो? तर कोणताही नाही. यातला धर्मविषयक चर्चेचा भाग ओ माय गॉड मधे येऊन गेल्याचं मी एेकलय ( मी ओ माय गॉड पाहिलेला नाही) पण ते सोडा , लगे रहो मुन्नाभाई मधे सौरभ शुक्लानेच वठवलेली ज्योतिषाची भूमिका आणि तिला मुन्ना ने दिलेलं आव्हान याचीच ही स्केलने मोठी केलेली आवृत्ती नाही का? पीकेचं स्वत:चं व्यक्तीमत्व तरी नवं कुठे आहे? सर्व गोष्टींचा तर्कशुध्द विचार करु पाहाणारा आणि सतत प्रश्न विचारत रहाणारा हा थ्री इडिअट्समधला रांचोच का म्हणू नये ? आता तो ओळखू येऊ नये म्हणून त्याला भोजपुरी बोली दिली ( जी तो जग्गूचा हात पकडून कधीही बदलू शकतो पण बदलत नाही) आणि डोळे न मिचकावणं वगैरे काही मॅनॅरिझम दिले,की ही व्यक्तिरेखा लगेच वेगळी होते का? शिवाय लगे रहो मुन्नाभाईच्या पटकथेचे पडसाद या चित्रपटात सतत जाणवतात ते वेगळच. नायकाच्या आयुष्यात त्याला स्वाभाविक वाटणारी पण जगाला चमत्कारिक वाटेलशी एक गोष्ट असणं ( पीकेचं परग्रहवासी असणं आणि मुन्नाला गांधी दिसणं) , त्या निमित्ताने त्याने समाजातल्या विसंगतींना तोंड फोडणं, सत्याचा आग्रह धरणं, त्याच्या चळवळीच्या निमित्ताने सारा समाज त्यात सामील होणं, नायक आणि त्याचा विरोधी यांचा सार्वजनिक मंचावर सामना होणं, ही संपूर्ण रचना दोन्ही चित्रपटात आहे. तरीही यात मुन्नाभाई वरचढ ठरतो कारण ती पटकथा मुन्नाचं रहस्य सर्वांसमक्ष फोडून त्याला अंतिमत: केवळ वैचारिक पातळीवर जिंकण्याची संधी देते. पीके या पातळीला पोचूच शकत नाही. तो आपला विवादात पीकेलाच विजयी ठरवून सोपा मार्ग स्वीकारतो.
या चित्रपटाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तो अतिशय प्रेडीक्टेबल आहे. कदाचित मुळातच परग्रहवासीयाला हिंदी चित्रपटात आणणं ही एक गोष्ट सोडली तर त्यात अनपेक्षित काही नाही. तो आपली करमणूक करत नाही असं नाही. आमीर खान एका मर्यादेत चांगला अभिनेता आहे, त्यामुळे आपल्या परीने तो स्वत: आणि चित्रपटही करमणूक करतो, पण ती प्रामुख्याने गॅग्जच्या पातळीवर. चुटके आपल्या जागी ठीक असतात, हसवतातही, पण ते पूर्ण चित्रपटाच्या एकसंध परीणामाची जागा घेऊ शकत नाहीत. खासकरुन मूळ आशयाची तसा परिणाम साधणं ही गरज असताना.
मला हा चित्रपट टाईमपास या पातळीवर ठिक वाटला. त्यापलीकडे जाण्याच्या शक्यता त्यात होत्या, ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मी असा विचार करुन पाहिला, की चित्रपट राजकुमार हिरानीचा असणं या अपेक्षाभंगाला कितपत जबाबदार आहे? समजा पूर्णत: बाष्कळ चित्रपट करणाऱ्या डेव्हिड धवनसारख्या एखाद्या दिग्दर्शकाने तो केला असता तर आपण आहे ते बरं मानून त्यातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करु शकलो असतो का? तसं वाटत नाही. कदाचित अपेक्षाभंगाचं प्रमाण कमी झालं असतं, पण त्रुटी या ढळढळीत दिसत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं नसतच.
 आज पीके हा यशस्वी चित्रपट मानला जातोय. प्राप्ती आणि कौतुक या दोन्ही पातळीवर. अपयशाचे तोटे  फारच असतात, पण अशा काही चित्रपटांचं यश हेही तोट्याचाच एक भाग असतं. लगेच न जाणवणारा हा तोटा  चित्रकर्त्यांच्या एकूण मार्गाबद्दलच शंका उपस्थित करतो. हिरानीचा पुढला चित्रपट हा या मार्गावर शिक्कामोर्तब करणारा असेल. त्यापूर्वी काही सुधारणा व्हावी, ही अपेक्षा.
- ganesh matkari 

Read more...

गणेश मतकरी यांना ‘सिनेमॅटिक’साठी पुरस्कार

>> Wednesday, December 10, 2014


 मुंबई : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस आणि भेंडे कुटुंबीय यांच्यातर्फे देण्यात येणारा सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कार लेखक गणेश मतकरी यांना जाहीर झाला आहे. मतकरी यांच्या 'सिनेमॅटिक' या समीक्षाग्रंथासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून तो २६ डिसेंबर रोजी वांद्रे एमआयजी क्लबच्या सभागृहात प्रसिद्ध दिग्दर्शक अरुण खोपकर यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. ११ हजार १११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विलास खोले, नीरजा, अवधूत परळकर यांच्या परीक्षक समितीने पुरस्कारासाठी 'सिनेमॅटिक'ची एकमताने निवड केली, असे समितीचे निमंत्रक अशोक कोठावळे यांनी कळवले आहे.


पुरस्कारानिमित्ताने सिनेमॅटिकवर अवधूत परळकर यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहिलेला शब्दबंध पुन्हा येथे सादर करीत आहोत.



असा सिनेमा असतो, राजा!
अवधूत परळकर 
टाइमपास इतकंच उद्दिष्ट असलेल्या प्रेक्षक-मानसिकतेतून आपल्या देशात टाइमपास व्यापारी सिनेमा जन्माला आला आहे. त्यानं आपलं सांस्कृतिक विश्व कसं नि किती व्यापून टाकलं आहे ते आपण अनुभवत आहोत. या टाइमपास सिनेसंस्कृतीला उधाण आणणारी टाइमपास सिनेसमीक्षाही जन्माला आली आहे. अशा सवंग वातावरणात या कलाप्रकाराविषयी गंभीरपणे बोलू लिहू पाहणारा; या कलाप्रकाराचं खरंखुरं व्यक्तिमत्व, आणि गाभा अभ्यासूपणे समजून घेऊ पाहणारा गणेश मतकरी हा लेखक जन्माला येणं ही नवलाची घटना आहे. 'सिनेमॅटिक' नावाचं पुस्तक लिहून या तरुण लेखकानं सिनेमा पाहायचा आपला दृष्टिकोन, सिनेकलाकृतीच्या आस्वाद प्रक्रियेविषयीची आपली भूमिका वाचकांसमोर मांडली आहे. सिनेमाचं आपलं आकलन आणि चिंतन वाचकांसमोर मांडता मांडता सिनेमाकडे कसं पाहावं याची प्रगल्भ जाणीव हे पुस्तक वाचकांत निर्माण करतं.
सिनेमाचा आशय, त्यातील भिन्न प्रवाह, आशयाची विविध रूपं, तो पडद्यावर सादर करण्याची दिग्दर्शकांची शैली यावरली उद्बोधक चर्चा सिनेमॅटिकमध्ये विखुरलेली आहे. या निमित्तानं लेखक सिनेनिमिर्तीची पार्श्वभूमी, प्रतिमा रचनेची शैली याबद्दलचं निवेदन आणि त्यावरलं लेखकाचं भाष्य असा हा लेखनप्रवास आहे. 'सिनेमॅटिक'ला बुजुर्ग सिनेसमीक्षक अरुण खोपकर यांची अप्रतिम प्रस्तावना आहे. ती गणेश मतकरींच्या सिनेमाच्या पॅशनबद्दल बोलते; त्यांच्या दृष्टिमागच्या आधुनिक वृत्तीबद्दल, त्यांच्या समीक्षेतल्या मानवतावादी मूल्यांबद्दल बोलते; आणि त्याही पलीकडे जाऊन सिनेमा कले-संदर्भात स्वतंत्र विचार मांडते.
गणेश मतकरींच्या व्यासंगाचा आणि संवेदनशील निरीक्षणाचा प्रत्यय या पुस्तकात पानोपानी येतो. रहस्यपट, युद्धपट, समांतर सिनेमा, मराठी सिनेमा इत्यादी विषयावर मतकरींनी स्वतंत्र प्रकरणं लिहून त्या संदर्भातली आपली निरीक्षणं स्वच्छपणे मांडलीत. मतकरींचं या विषयाचं चौफेर ज्ञान, वरपांगी दिसणाऱ्या घटनांच्या पलीकडे जाऊन सिनेवस्तूचा विचार करण्याची त्यांची वृत्ती हे सर्व त्यांच्या निरीक्षणातून डोकावतं. विशिष्ट सिनेमाचं आपल्याला झालेलं आकलन इतरांपेक्षा वेगळं असेल तर ते निर्भयपणे मांडतात, आपली भूमिका, किंवा विशिष्ट तांत्रिक संज्ञा नीट समजावी म्हणून चित्रपटांची उदाहरणं देतात. रहस्यपटांबद्दल लिहितांना फिल्म न्वारचा नुसता उल्लेख करून ते थांबत नाहीत. 'फिल्म न्वार' ही काय संकल्पना आहे हे दाखले देऊन समजावून सांगतात. भूतकाळातील रहस्य दडवलेला नायक, रहस्यमय तरुणी, सज्जन व्यक्तीचा पूर्ण अभाव ही न्वार सिनेमाची वैशिष्ट्यं चटकन सांगून टाकतात. तसा प्रत्येक चित्रपट रहस्यप्रधान असतो, तरीही आपण त्याला रहस्यपट म्हणत नाही हे सांगून ते रहस्यपटाची लक्षणं आपल्या विचारार्थ मांडतात. 'सिटिझन केन' चित्रपटाची एक बाजू रहस्यपटाची असली तरी त्याला रहस्यपटात का जमा करायचं नाही, हे सांगतात. हिचकॉकचा वेगळेपणा सांगून प्रेक्षकांना खिळवण्यासाठी तो आपल्या चित्रपटात कशा जागा तयार करत असे; लहान लहान प्रसंग मालिकां-मधून रहस्य वाढवत नेणं त्याला कसं आवडायचं हे उदाहरणांसहीत मांडतात. क्षणाच्या हुशारीपेक्षा सातत्यानं परिणाम वाढवणं हे मोलाचं कसं, त्यामुळे श्यामलनच्या 'सिक्स्थ सेन्स' या लोकप्रिय चित्रपटापेक्षा त्याचा 'साईर्न' हा चित्रपट अधिक दजेर्दार कसा ठरतो हे मतकरी पटवून देतात.
' एक्झॉसिर्स्ट' हा सिनेमा सामान्य भयपट म्हणून मी मोडीत काढला होता. मतकरींनी या चित्रपटावर सोळा पानी मजकूर लिहून त्याचं असाधारणपण इतक्या प्रभावीपणे निदर्शनास आणून दिलं आहे की ते वाचून या चित्रपटाविषयीचा माझा प्रतिकूल पूर्वग्रह नष्ट झाला. 'एक्झॉसिर्स्ट'च्या निमिर्तीची आणि त्यामागच्या पार्श्वभूमीची मतकरींनी सांगितलेली कथा हा या पुस्तकातला सर्वात वाचनीय भाग आहे.
युद्धपटांचा त्यांनी घेतलेल्या आढाव्याबद्दलही असंच म्हणावं लागेल. सुरवातीचे युद्धपट जनतेनं युद्धाला पाठिंबा देण्यासाठी काढले गेल्यानं त्यात कसा प्रचारकीपणा येत गेला; युद्धाला बाळबोध संघर्षाचं रूप कसं दिलं गेलं हे सांगून काळानुसार युद्धपट कसे बदलले हे मतकरी स्पष्ट करत जातात. युद्धपटाचा वापर थ्रीलर, रोमान्स, ब्लॅक कॉमेडीसाठी कसा केला जाऊ लागला हेही दाखवून देतात. जिंकलेले आणि हरलेले याच्या पलीकडे जाऊन युद्धपट माणुसकीचा संदेश देऊ लागले; युद्धाचा फोलपणा दाखवू लागले; युद्धाविषयी तिटकारा निर्माण करू लागले हे बदल लेखकानं छान टिपलेत. सुरवातीच्या काही युद्धपटातली युद्धं कशी चेहरा हरवलेली होती; पाहायला नेत्रसुखद, उत्तम कोरिओग्राफ केलेल्या यातल्या युद्ध प्रसंगामध्ये लढणाऱ्या सैनिकाला काय वाटत असेल याचा विचार त्यात नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे. प्लॅटून चित्रपटाच्या दिग्दर्शकानं सैनिकांमधली सामान्य माणसं पडद्यावर उभी केली असं सांगून 'प्लॅटून' हा पहिला वास्तव युद्धपट कसा हे त्यांनी त्यातल्या इतर तपशीलांसह पटवून दिलं आहे. युद्धांचं तंत्र बदललं तरी माणसांनी माणसांना मारणं हे कधीच बदललं नाही त्यामुळे कोणत्याही संवेदनशील चित्रर्कत्यानं केलेला चित्रपट हा युद्धविरोधी चित्रपटच असणार. युद्ध म्हणजे मृत्यू हेच आज हॉलिवुडच्या युद्धपटांना सांगायचं आहे अशा शब्दात ते या प्रकरणाचा शहाणा शेवट करतात.
सिनेमाचे, त्यामागील वैचारिक भूमिकांचे त्यांनी टिपलेले बारकावे त्यांच्या अभ्यासूपणाची आणि तीक्ष्ण निरीक्षण शक्तीची साक्ष पटवणारे आहेत. आज भयपट पुन्हा स्पेशल इफेक्टस आणि रक्ताच्या थारोळ्यात हरवून गेले आहेत या त्यांच्या विधानाशी कोणीही सहमत होईल.
मतकरींची काही मतं प्रवाहाविरुद्ध वाटतील. किंबहुना तशी ती आहेतच. पण त्यात जितका ठामपणा आहे तितकीच विनम्रता आहे. मराठी सिनेमावर लिहिलेल्या प्रकरणात मतकरींनी मराठीतल्या नव्या चित्रपटाच्या लाटेचं-नव्या दिग्दर्शकांचं स्वागत केलं आहे. पण जोगवा, नटरंगसारख्या बेगडी वास्तवपटांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वैचारिक स्टेटमेंट केल्याचा आव आणणारे पण प्रत्यक्षात तद्दन व्यावसायिक वळणाचे असे हे सिनेमे दिशाभूल करणारे आहेत असं इशारेवजा विधान त्यांनी केलं आहे. प्रेक्षकांना आपल्या भूमिकांचा आणि मतांचा फेरविचार करायला लागेल असा मजकूर या पुस्तकात अनेक जागी सापडतो. सोपं आणि स्वीकारण्याजोगं लॉजिक मांडून, त्याला चपखल उदाहरणांची जोड देऊन अपारंपरिक विचार वाचकांच्या गळी उतरवण्याची मतकरींची हातोटी दाद देण्याजोगी आहे.
प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींमधून अर्थापर्यंत पोहोचायचं तर डोकं खाजवणं भाग पडेल असं 'डिमेन्शन्स ऑफ डायलॉग' या श्वान्कमायरच्या अफलातून लघुपटावर लिहिताना लेखकानं म्हटलंय. - हे खरं पाहता पुस्तकात उल्लेखलेल्या अनेक कलाकृतींबाबत हे बोलावं लागेल. तुलनेसाठी, संदर्भासाठी आणि उदाहरणासाठी मतकरींनी या पुस्तकातून जो सिनेमा समोर ठेवला आहे तो सर्वसाधारण मराठी सिनेप्रेक्षकांच्या पाहण्या-बोलण्यातला सिनेमा नाही. फिल्म फेस्टिव्हलला नियमानं हजेरी लावणारे फिल्म सोसायटी चळवळीतले लोक, अभ्यासू समीक्षक, यांना परिचित असलेला हा सिनेमा आहे. या मंडळींची सिनेमाविषयीची समज वाढवण्याची ताकद या लेखनात निश्चित आहे.
तौलनिक निरीक्षणासाठी लेखकानं वारंवार उल्लेखलेली विदेशी चित्रपटांची आणि दिग्दर्शकांची उदाहरणं या वर्तुळाबाहेरील वाचकांना मात्र गोंधळून टाकायची शक्यता आहे. माध्यमाकडे गांभीर्यानं पाहू इच्छिणारा; या माध्यमाची बलस्थानं जाणून घेण्यात स्वारस्य असलेला वर्ग या वाचकातही आहे. कलानिष्ठ सिनेमातल्या विविध कलात्मक प्रयोग जाणून घ्यायला या वाचकांना या पुस्तकाची मदत होईल. मराठी प्रेक्षकांची दृश्यसाक्षरता वाढवणारे चित्रपट आता मराठीत निघू लागले आहेत. गणेश मतकरींनी परिश्रमपूर्वक लिहिलेलं 'सिनेमॅटिक' हे पुस्तक टेक्स्टबुकप्रमाणे या प्रेक्षकांच्या कलाजाणीवांच्या विकासाला उपयोगी पडू शकेल. कदाचित सिनेमॅटिक सुस्वरूप आणि सुबुद्ध सिनेमाचं नवं दालन त्यांच्या समोर खुलं करेल. 'असा सिनेमा असतो राजा' असा साक्षात्कार त्यांना होऊ शकेल.
नव्या तंत्रज्ञानानं, डिजिटल क्रांतीनं या क्षेत्रात आज नवे आयाम निर्माण केले आहेत, आणि बराच गोंधळही उडवून दिला आहे. अखेरच्या प्रकरणात भविष्यात होऊ घातलेल्या या उलथापालथीची मतकरींनी दखल घेतली आहे. या बदलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्वागतशील पण सावध आहे. तंत्रज्ञानाची ही घोडदौड आशयाला तुडवून पुढं जाणार आहे का हा प्रश्न आपल्याप्रमाणे त्यांनाही भेडसावतो आहेच.
सिनेमॅटिक, गणेश मतकरी / प्रकाशक :
 मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस 

पृष्ठं : १७२ / किंमत : ३०० रु.


Read more...

एक्झोडस- गॉड्स अॅन्ड किंग्ज- डेमिल विरुध्द स्कॉट

>> Sunday, December 7, 2014


मी सेसिल बी डेमिल चा टेन कमान्डमेन्ट्स (१९५६) पाहिला तो खूपच उशिरा, १९९० च्या आसपास. तोही थिएटरमधे नाही, तर व्हिडीओ कसेट वर.त्याची लांबी एवढी प्रचंड (२२० मिनिटं) की तो एका कसेटवर रहातही नव्हता. मला तो असा पहावा की नाही अशी शंका तेव्हा आल्याचं आठवतं. कारण तो आधीच पाहिलेल्या माझ्या बहिणीकडून आणि इतरांकडून त्याविषयी फार उत्तम गोष्टी एेकल्या होत्या आणि तो परिणाम कुठला टिव्हीवर यायला, असं आपलं वाटलं होतं. पण कुतूहल जास्त होतं. शिवाय तेव्हा मी लिहीत नसल्याने ,फर्स्ट इम्पॅक्टचा विचारही फार गंभीरपणे केला नाही. माझ्या आठवणीप्रमाणे, कॉलेज सबमिशनचं काहितरी काम करतच एकीकडे मी तो पहायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात इतका गुरफटलो, की पहिला तास उलटायच्या आत इतर सगळी कामं बाजूला पडलेली होती.

टेन कमान्डमेन्ट्समधला सर्वात प्रभावी प्रसंग हा इजिप्तचं सैन्य मागे लागलेलं असताना मोझेसने समुद्र दुभंगून आपल्या अनुयायांना पार नेण्याचा, हे निश्चित आणि आजही हा प्रसंग थरारून सोडतो. त्याआधीचा चमत्कारांचा भागही असाच गुंगवणारा, पण केवळ हे स्पेशल इफेक्ट्स, ही त्या चित्रपटाची ताकद म्हणणं अन्यायकारक होईल. त्याचा खरा इन्टरेस्टिंग भाग होता,तो त्यातली प्रचंड लांबलचक कथा आणि अनेक पात्रं, उपकथानकं धरुन तिचं तपशीलात रंगवली जाणं.

मुळात या कथेचे सरळ चार भाग आहेत.मोझेसचं इजिप्तचा राजपुत्र म्हणून असलेलं आयुष्य, जन्मरहस्याच्या उलगड्यानंतरची हद्दपारी आणि गृहस्थाश्रम, इजिप्तमधल्या गुलाम हिब्रू समाजाला सोडवण्यासाठी त्याचं परत येणं, आणि अखेर सुटकेनंतरचा कमान्डमेन्ट्स मिळेपर्यंतचा भाग. चमत्कार हे प्रामुख्याने यातल्या तिसऱ्या भागात येतात पण एकूणच निर्मितीच्या, अभिनयाच्या बाबतीत डेमिलचा चित्रपट सुरुवातीपासून अखेरपर्यंत दर्जेदार आहे. त्यातली अनेक छोटीमोठी पात्र त्यातल्या पटकथेच्या घट्ट वीणेमुळे आपल्याला कायम लक्षात रहातात.

चित्रपटाचा जेव्हा रिमेक होतो, तेव्हा त्यात नवीन काय आहे हा प्रश्न महत्वाचा ठरतो. मग ते काही असू शकतं. एखादं नवं तंत्र, तंत्रज्ञान, दिग्दर्शकाला जाणवलेली एखादी नवी बाजू, काहीही. याच विषयावरचा प्रिन्स ऑफ इजिप्ट (१९९८) आला तेव्हा त्यातल्या अॅनिमेशनचा रेखीव वापर , त्यांनी उचललेलं भव्यतेचं परिमाण आणि माध्यमाने तयार होणारी नवा बालप्रेक्षक मिळण्याची शक्यता या गोष्टी त्यात वेगळ्या होत्या. जेव्हा हाच प्रश्न आपण एक्झोडस- गॉड्स अॅन्ड किंग्ज बाबत विचारतो, तेव्हा त्याचं पूर्ण समाधानकारक उत्तर मिळत नाही. खासकरुन त्यातला रिडली स्कॉटसारख्या लक्षवेधी दिग्दर्शकाचा आणि मोझेसच्या भूमिकेत क्रिश्चन बेलसारख्या मोठ्या अभिनेत्याचा सहभाग लक्षात घेतो तेव्हा.

वेगळेपणा असणारी एक उघड गोष्ट एक्झोडस करतो, ती म्हणजे मुळातच तो पटकथा कॉम्पॅक्ट करतो. त्यातला फोकस तर नावाप्रमाणेच तो गुलामांच्या मुक्तीवर आणतोच, पण पहिल्या आवृत्तीतल्या अनेक पात्रं , उपकथानकांनाही तो कात्री लावतो, त्यामुळे कथा प्रामुख्याने द्विपात्री होते. या मार्गाने चित्रपट 'टेन कमान्डमेन्ट्स' हून वेगळा होतो आणि वेळही आटोक्यात येतो हे खरं, पण त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची व्यकितिरेखांबरोबरची भावनिक गुंतवणूक बरीचशी कमी करतो. त्यातला वाद बराचसा तात्विक पातळीवर येतो, कोरडा होतो. दुसरा महत्वाचा बदल आहे तो देवाकडे आणि त्याच्या आदेशांकडे पहाण्याच्या दृष्टीत.हा भाग मला मूळ चित्रपटाहून चांगला वाटला कारण इथे स्कॉटचं चित्रण केवळ धर्मवेडं नाही, तर आख्यायिकेतल्या विसंगती अधोरेखित करणारं , क्रौर्याला सूचकतेमागे न दडवता उघड्यावर आणणारं आहे. 'टेन कमान्डमेन्ट्स'मधला देव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देत नाही. इथे मात्र देवाला निश्चित रुप आहे. लहान मुलाचं. हे रुप देवाच्या हट्टाला, प्रसंगी दिसणाऱ्या क्रौर्याला अतिशय चपखल बसतं. त्याच्यापुढे मोझेसचं हतबल होणं आपण समजू शकतो.

देवाने इजिप्तवर संकटं आणणं आणि त्याच्या विरोधात रॅमसीस ने केलेलं क्रौर्याचं प्रदर्शन, हा या हकिगतीचाच महत्वाचा भाग, पण 'टेन कमान्डमेन्ट्स'ने तो फार त्रासदायक न करता शोभवून नेला होता. 'एक्झोडस’तसं करणं टाळतो. इथली अनेक दृश्य  बिचकवून सोडणारी आहेत. मगरींनी बोटीवर केलेला हल्ला, सडलेल्या माशांनी लाल झालेलं पाणी, रॅमसीस ( जोल एडगरटन) ने अनेक निरपराधांना फासावर लटकवणं, अशा अनेक प्रसंगांचं चित्रण हे प्रभावी आहे. अशा वेळी भारतीय कलाकृतींचा देवाकडे अन एकूणच धार्मिक गोष्टींकडे घाबरत घाबरत पहाण्याचा अप्रोच खास जाणवतो/खटकतो. आपल्या देवाने पडद्यावर असा रुद्रावतार धारण केला तर चित्रपट सेन्सॉरकडून पुढे सरकतील का, धर्माच्या नावाखाली अभिव्यक्ती दाबण्याच्या प्रयत्नातल्या विविध संघटना ते चालू देतील का आणि शेवटी आपला प्रेक्षक ते किती पाहून घेईल, असा प्रश्न पडतो.

या सगळ्या दृश्ययोजनात ,अन खासकरुन पुढच्या 'पार्टींग ऑफ द रेड सी' नावाने लोकप्रिय असणाऱ्या समुद्र दुभंगण्याच्या प्रसंगात जाणवतं, की हे प्रसंग खरोखर घडते, तर कसे घडते, याचा दिग्दर्शक विचार करतोय. पण तसं असतानाही इथे एक मोठी अडचण येतेच. त्याचा दृष्टीकोन हा रॅडिकली वेगळा नाही. मायकेल मूरकॉकच्या ’बिहोल्ड द मॅन’मधे जीझस हा सर्वसामान्य माणूस असल्याचं दाखवून लेखकाने आता या महापुरुषाची इतिहासातली जागा कोण घेणार, असा पेच तयार केला होता. तसा दैवी अंश पुसून टाकणारा एखादा घटक स्कॉट पटकथेत आणू शकत नाही. मोझेसच्या पहिल्या देवदर्शनानंतर काही काळ असा आभास तयार होतो, की स्कॉट, हा देव केवळ मोझेसच्या डोक्यात होता असं म्हणतोय की काय? मोझेसने धनगराची काठी टाकून तलवार उचलणं, किंवा देवाने ' मला सेनापती हवाय' असं म्हणणही त्या दिशेने सुसंगत होतं.तसं झालं असतं तर चित्रपट खूपच वेगळा झाला असता. पण जशी मिरॅकल्सची कक्षा वाढते, तसा देवाचा प्रत्यक्ष सहभाग अपरिहार्य ठरतो.अखेर मोझेसला समुद्र दुभंगायला हवा असेल, तर देवाचं अस्तित्व हा केवळ मानसशास्त्रीय घटक ठरु शकत नाही.

तरीही आपल्या दोन नायकांचं, मोझेस आणि रॅमसीसचं व्यक्तिचित्रण मात्र ’एक्झोडस’ खूपच प्रभावीपणे करतो.टेन कमान्डमेन्ट्समधेही ते लक्षणीय होतं यात वाद नाही, पण तिथे ते एकरंगी, प्रवृत्तीच्या दर्शनासारखं होतं. इथे या दोघांच्या व्यक्तीमत्वातली गुंतागुंत तपशीलात येते, विशेषत: मोझेसच्या. त्याला 'आपण कोण आहोत?' हा मुळातच सतावणारा प्रश्न, स्वार्थ आणि कर्तव्य यांतून तयार होणारी द्विधा मनस्थिती, प्रसंगी देवाचं पटत नसतानाही असहाय्यपणे घडेल ते पहात रहावं लागणं ,हे त्याला नेहमीच्या धीरोदात्त नायकापेक्षा वेगळा ठरवतं.

दुसरी विशेष गोष्ट आहे ती म्हणजे रिडली स्कॉटच्या चित्रपटात गेली काही वर्ष सातत्याने दिसणाऱ्या युध्दविरोधी विचारांचे पडसाद.हिंसाचाराला आपल्या चित्रपटात नित्य स्थान देतानाही रिडली स्कॉटचे हल्लीचे चित्रपट हिंसा हा उपाय नाही, या निष्कर्षावर येऊन पोचले आहेत. किंगडम ऑफ हेवन, ग्लॅडीएटर सारख्या चित्रपटात हे स्पष्ट दिसून आलय. एक्झोडसमधेही हा विचार जाणवेलशा पध्दतीने येतो.

या चित्रपटाचा अखेरचा भाग हा त्याचा कदाचित सगळ्यात मोठा दोष मानता येईल. बाकी भागात डेमिल आवृत्तीपेक्षा स्कॉट आवृत्ती कशी वेगळी आहे हे सरळ दिसतं, इथे ते दिसलं नसतं , कारण घटना कमी आणि स्पष्ट आहेत. कदाचित या कारणाने, पण स्कॉट हा भाग फार चटकन उरकतो. घटना तुकड्यातुकड्यात येतात.शेवटाचं वजन त्यांना येत नाही. कदाचित हा भाग अधिक वेळ घेत रंगवला असता तर चित्रपट अधिक एकसंध झाला असता. अर्थात याला पुरावा काही नाही, आता आपण केवळ अंदाजच करु शकतो.

जर कोणी डेमिल आणि स्कॉटच्या आवृत्त्यांची गुणात्मक तुलना विचारली, तर मात्र मी उत्तर द्यायचं टाळेन. कमान्डमेन्ट्सने आपली गुणवत्ता सिध्द केलीच आहे, पण नवं फार न देताही, एक लक्षवेधी प्रयत्न या सदरात एक्झोडस बसू शकतो. पुढल्या काळात यातला कोणता चित्रपट टिकून राहील याचा विचार केला, तर मात्र कमान्डमेन्ट्सचंच नाव एकमताने पुढे येईल असं वाटतं.
- ganesh matkari

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP