परिणामकारक स्विंग व्होट

>> Tuesday, April 28, 2009


निवडणुका हाच विषय सध्या ऐरणीवर आहे. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून विविध मतप्रवाह उलगडून दाखविणारे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटही आहेत. "स्विंग व्होट' हा त्यापैकीच एक. सामान्य माणूस आणि सामाजिक, राजकीय व्यवस्थेची सांगड दाखवणारा, सकारात्मक संदेश देत वेगळी वाट जोखणारा हा चित्रपट. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या विषयाशी संबंधित तीन चित्रपटांच्या रसग्रहण मालिकेतील हा पहिला चित्रपट...

मतदान करणं हे पॉलिटिकली करेक्‍ट आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. युक्तिवाद करायचा, तर मतदानाची बाजू घेणारा त्यात वरचढ ठरणार, हेही उघडच आहे. सध्या वृत्तपत्रांमध्ये सेलिब्रिटीपासून सामान्य माणसापर्यंत सगळे मतदान करणं कसं बरोबर आहे, हेच सांगताहेत. मीदेखील सर्वांप्रमाणेच यातली प्रत्येक बाजू पुष्कळ वेळा ऐकली आहे. तरीदेखील एका प्रश्‍नाचं काही समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही. निवडणुकीला उभं राहणं हे काही सोपं नाही. पक्षीय राजकारण, भ्रष्टाचार, निवडून येण्यासाठी असलेली पैशांची प्रचंड गरज, यातून त्या ठिकाणी पोचणारा माणूस प्रामाणिक असण्याची शक्‍यता किती कमी आहे, हे लक्षात यायला आपण संख्याशास्त्राचे तज्ज्ञ असण्याची गरज नाही. त्यामुळे उभा राहणारा प्रत्येकच जण जर संशयास्पद चारित्र्याचा असेल, तर मतदान केलं काय अन्‌ नाही केलं काय, "अ' उमेदवार निवडला गेला अन्‌ "ब' उमेदवार पडला तर फरक काय पडणार, नाही का?
अर्थात माझ्या सोप्या प्रश्‍नाला अनेक विद्वत्ताप्रचुर उत्तरं आहेत, हे मला माहीत आहे. आणि त्यातली अनेक मी ऐकलेलीही आहेत. मात्र ती मला पूर्णतः पटलेली नसल्याने मी आजवर मतदान केलेलं नाही, हे मान्य करणंदेखील बेजबाबदारपणाचं आहे, हेदेखील मान्य; पण आहे ही वस्तुस्थिती आहे.
नुकताच मी एक चित्रपट पाहिला. त्याचा नायक मात्र माझ्याहून कितीतरी अधिक बेजबाबदार होता. म्हणजे मी निदान मतदान न करण्याला काहीतरी थातूरमातूर कारण तरी देऊ शकतो. या माणसाला ते देण्याची तर गरज वाटत नव्हतीच, वर इलेक्‍शन जवळ आलंय, याचाही त्याला पत्ता नव्हता.
हा चित्रपट होता गेल्या वर्षीचा "स्विंग व्होट' आणि नायक होता बड (केव्हिन कॉसनर... अतिशय उत्तम कास्टिंगचा नमुना). खरं तर "बेजबाबदार' हा एकच शब्द बड या व्यक्तिरेखेची पूर्ण कल्पना यायला पुरेसा आहे. बडचं आयुष्य हे एक अत्यंत सामान्य नोकरी करणं, तिथेही कामचुकारपणा करणं, चिकार बिअर पिणं आणि बाकी फारसं काहीच न करणं यात व्यतीत होतंय.
नाही म्हणायला त्याच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची मुलगी मॉली (मॅडलिन कॅरॉल). 12 वर्षांची मॉली ही आतापासूनच एक अत्यंत जबाबदार नागरिक आहे आणि बापाला सकाळी उठवून जबरदस्ती कामावर धाडण्यापासून घर सांभाळण्यापर्यंत सर्व गोष्टी तर ती करतेच, वर ती शाळेत अत्यंत हुशार आहे, आणि आपल्या सामाजिक हक्कांची तिला स्पष्ट जाणीव आहे. आपल्या वडिलांनीदेखील आपल्याप्रमाणेच सामाजिक, राजकीय घडामोडींत रस घ्यावा, असं तिला वाटतं. या विशिष्ट दिवशीदेखील बापाने चार जागरूक नागरिकांप्रमाणे मतदान केंद्रावर हजेरी लावावी, असं तिला वाटतं. कारण हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या निवडणुकीचा निकाल हा व्हाइट हाउसमधला पुढला रहिवासी कोण, याचं उत्तर देणारा आहे.
अर्थात, अपेक्षेप्रमाणेच बड वेळेवर मतदान केंद्रात पोचू शकत नाही आणि तिथल्या अदृश्‍य सुरक्षाव्यवस्थेचा फायदा घेऊन मॉली बडच्या नावाने मतदानाचा एक निमयशस्वी प्रयत्न करते. दुर्दैवाने मतदार रजिस्टर होतो, पण मत मात्र कोणालाच पडत नाही.
मुख्य धारेच्या व्यावसायिक चित्रपटात शोभण्यासारख्या योगायोगानंतर असं लक्षात येतं, की राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हा निकाल टाय झाला आहे. टायब्रेकर ठरणार आहे ते बडचं मत. त्याने मुळातच न दिलेलं, मात्र आता देण्यावाचून इलाज नसलेलं. ही बातमी फुटताच बड एका प्रचंड गदारोळाच्या केंद्रस्थानी खेचला जातो. त्याच्या छोटेखानी गावाचा दरारा अमेरिकाभर पसरतो आणि अमेरिकेच्या चालू (पण इंटेंडेड) राष्ट्राध्यक्षांशी एकेरीवर बोलण्याइतक्‍या उच्चस्थानी तो जाऊन बसतो.
जोशुआ मायकेल स्टर्न या दिग्दर्शकाचा हा चित्रपट फ्रॅंक काप्राच्या चाहत्यांना जरूर आवडेल. ""मि. स्मिथ गोज टु वॉशिंग्टन', "मीट जॉन डो'सारख्या चित्रपटातून त्यांनी जी सामान्य माणूस आणि सामाजिक, राजकीय व्यवस्था यांची सांगड घातली होती, त्याच प्रकारचा हा प्रयत्न आहे. यातलं उपहास, विनोद आणि मेलोड्रामा याचं प्रमाणही त्याच चित्रपटांशी नातं सांगणारं आहे.
बॉलिवूड म्हणा किंवा हॉलिवूड, व्यावसायिक चित्रपटांचा एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे ते खूपच प्रेडिक्‍टेबल असतात. त्यातल्या अडचणी या अखेर शेवटच्या रिळात सोडवण्यासाठीच तयार केल्या गेल्याचा भास ते पाहताना होतो. जितका चित्रपट अधिक सफाईदार, जितका त्यातला प्रोटेगॉनिस्ट किंवा नायक अधिक सांकेतिक प्रकारचा, जितका त्यातल्या व्यक्तिरेखांचा आलेख अधिक उठावदार, जितकी त्याची रचना ओळखीची वाटणारी तितका त्याचा शेवट अधिक परिचयाचा. आणि जितका शेवट अधिक परिचयाचा तेवढा त्याचा परिणामही. जागतिक चित्रपटातले शिलेदार किंवा कलात्मक समांतर चित्रपटातले अग्रणी व्यावसायिक चित्रपटाला जी नावं ठेवतात यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. हा चित्रपट रंगतदार होऊ शकतो, मात्र तो अनपेक्षित गोष्टी क्वचित करतो. ओळखीचा, सवयीचा मार्ग सोडून त्याचं पाऊल क्वचित पडतं. स्विंग व्होटबद्दल मात्र मी असं जरूर म्हणेन, की तो वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा शेवट (जो मी अर्थातच सांगणार नाही) हा त्यातल्या त्यामानाने उघड संदेशालाच अधोरेखित करत असला तरी तो निश्‍चितच सरधोपट नाही; किंबहुना तो न्याय्य आहे.
"स्विंग व्होट'मध्ये दोन ट्रॅक आहेत. पहिला आहे तो बाप-मुलीच्या नात्याचा. चित्रपट सुरू होतो तेव्हा ते टोकाला गेल्याचं जाणवतं, अन्‌ दोघांनाही एकमेकांविषयी खरं प्रेम वाटत असलं, तरीही या परिस्थितीत ते फार काळ जमवून घेणं कठीण दिसतं. बडने आपल्यावरची जबाबदारी ओळखणं, सलोखा घडवून आणणं, आणि मुलीला आपली लाज वाटेलसा प्रसंग पुन्हा कधीही उद्‌भवणार नाही, अशी सुधारणा स्वतःत घडवून आणणं, हा इथला प्रवास आहे. दुसरा ट्रॅक आहे तो राजकारणाचा अन्‌ पत्रकारितेचा.
या ट्रॅकला चित्रपट ज्या पद्धतीने हाताळतो ते इंटरेस्टिंग आहे. त्याला राजकारण अन्‌ चित्रपट अन्‌ पत्रकारिता या दोन्हींचे वाईट चेहरे माहीत आहेत; पण तो चिखलफेकीवर उतरत नाही. किंबहुना रिपब्लिकन पक्षाचा सत्तेवर असलेला अध्यक्ष अँड्रूबून (केल्सी ग्रामर) आणि त्याच्या विरोधातला डेमोक्रॅट डोनल्ड ग्रीनचीफ (डेनिस हॉपर) या दोघांनाही तो कुटिल राजकारणी म्हणून चित्रित न करता मुळात बरी, पण सत्तेपायी कधी कधी भरकटत जाणारी माणसं म्हणून चित्रित करतो. एका परीने हे अधिक महत्त्वाचं निरीक्षण आहे. कारण ते निवडणूक हा प्रकार माणसाच्या अंगभूत भलेपणालाही जुमानत नाही हे दाखवून देतं. विशिष्ट व्यक्तीपेक्षा एका समाजरीतीवर बोट ठेवतं. चित्रपट याची जाणीव करून देतो, की उमेदवार कसाही असला, त्याची मतं कितीही क्रांतिकारी असली किंवा राजकीय पवित्रा कितीही सच्चा असला, तरी एकदा रिंगणात उतरल्यावर वैयक्तिक चांगुलपणा टिकत नाही. जेव्हा लोकांनी तुम्हाला मत देणं अपेक्षित असेल तेव्हा तुम्ही ज्यांना जे अपेक्षित आहे तेच बोलून दाखवणार, हे नक्की. त्यामुळे मत मागताना प्रत्येकाचा आव हा "ग्रेटर कॉमन गुड' साधण्याचा असला, तरी त्यामागे असतो तो खरा स्वार्थ. आज ही निवडणूक जिंकली पाहिजे ही इच्छा- जी अखेर सगळ्याला पुरून उरते.
स्विंग व्होट ज्या पद्धतीने हे दोन ट्रॅक एकमेकांत मिसळतो ते मात्र पाहण्यासारखं आहे. यात हार्डकोअर राजकारण कुठेही नाही, मात्र बडच्या व्यक्तिमत्त्वात होणारा बदल, त्याने आपला आजवरचा नाकामपणा झटकून टाकणं आणि एका निर्णयापर्यंत येणं, हे प्रेक्षकापर्यंत थेट पोचणार आहे. रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट यातल्या कोणाच्याही बाजूला न जाता अन्‌ कोणालाही प्रत्यक्ष विरोध न करता हे केलेलं दिसतं आणि हे जमण्याचं प्रमुख कारण केव्हिन कॉसनर हे आहे. एरवी या प्रकारच्या बदलाचा चिकटवलेलं वाटण्याची शक्‍यता होती. केवळ हा स्टार तो बदल पटण्यासारखा करून दाखवू शकतो. विशेषतः शेवटच्या भाषणात अन्‌ त्यानंतरच्या मोजक्‍या क्षणांमध्ये तो या भूमिकेला अतिशय परिणामकारक ठरतो.
स्विंग व्होटचा संदेश हा "प्रत्येक मताला महत्त्व आहे' हे सांगत असल्याचं उघड आहे; मात्र तो प्रचारकी न होण्याची काळजी चित्रपट घेतो. राजकारण्यांच्या गुंतागुंतीत न पडताही नागरिकांच्या सामाजिक जाणिवेला आव्हान देतो. राजकारण्यांमध्ये बदल तेव्हाच होईल- जेव्हा जनता आपल्या हक्कांबद्दल जागरूक होईल, हे थोडक्‍यात दाखवून देतो.
"स्विंग व्होट' संपला तेव्हा क्षणभर मीही मतदानविरोधातली माझी उत्तरं तपासून पाहिली, आणि आपलं काही चुकतंय का, असा विचार करायला लागलो. एका व्यावसायिक, रंजनवादी चित्रपटाला या प्रकारचा सकारात्मक संदेश देणं शक्‍य झाल्याचं कौतुक वाटलं ते वेगळंच.
-गणेश मतकरी

Read more...

गतिमान वॉचमेन

>> Friday, April 10, 2009


वॉचमेन ग्राफिक नॉव्हेलमध्ये उत्कृष्ट मानली जाते. सुपरहिरोसारख्या व्यक्तिरेखा वास्तव जगात आल्या तर काय होईल, हे पाहण्याचा प्रयत्न वॉचमेनद्वारे केला गेला. या नॉवेलवर आधारित हा चित्रपट सुपरहिरोंचा असला तरी मुलांचा नाही. सर्वांना तो आवडेल याची खात्री नाही, पण एक वेगळा चित्रपट पाहिल्याचं समाधान तो देईल, हे निश्‍चित.

वॉचमेन' भारतात प्रदर्शित झाला याचं मला फारच आश्‍चर्य वाटलं. अर्थात सुपरहिरो असणारे आणि तिकिट खिडकीवर यशस्वी होणारे चित्रपट हे आपल्याकडे हमखास येतात. यामुळे त्यापलीकडे फार खोलात जाऊन विचार न करता आंधळेपणाने "वॉचमेन' उचलण्यात आला असेल तर आश्‍चर्य वाटू नये. मात्र त्याचं येणं ही फार चांगली गोष्ट म्हणावी लागेल; खासकरून ग्राफिक नॉव्हेल्सच्या चाहत्यांकरता.
डी. सी. ने "वॉचमेन' ही बारा भागांची मालिका 1986/87 च्या सुमारास प्रसिद्घ केली. लेखक होता प्रसिद्ध ऍलन मूर (व्ही फॉरव्हेन्डेटा, लीग ऑफ एक्‍स्ट्रॉऑर्डिनरी जंटलमेन) आणि चित्रकार डेव्ह गिबन्स. तेव्हा आणि नंतर ग्राफिक नॉव्हेल म्हणून प्रसिद्ध झाल्यावर "वॉचमेन'ने अमाप लोकप्रियता मिळवली आणि आजही ते सर्वोत्कृष्ट ग्राफिक नॉव्हेल्समधलं एक परिमाण मानलं जातं.
"वॉचमेन'मध्ये सुपरहिरो व्यक्तिरेखा असल्या तरी त्या मुलांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेल्या नाहीत. सुपरहिरोसारख्या व्यक्तिरेखा जर वास्तव जगात अस्तित्वात असल्या तर काय होईल, हे पाहण्याचा हा एक गंभीर प्रयत्न आहे. हे जग त्यातल्या सामाजिक अन्‌ राजकीय समस्यांनी ग्रासलेलं आहे, आणि सुपरहिरोंच्या अडचणीही कल्पनारम्य असण्यापेक्षा वास्तवाशी प्रामाणिक आहेत. भ्रष्टाचार, सेक्‍शुअल हरॅसमेंट यांसारख्या तुलनेने छोट्या गोष्टींपासून अणुयुद्धाकडे झुकणारं जग आणि राजकीय नेतृत्वाच्या कमजोरीसारख्या मोठ्या प्रश्‍नापर्यंत अनेक बाबींना "वॉचमेन' स्पर्श करतो. त्याचं नाव "हू वॉचेस द वॉचमेन?' या मूळ रोमन वाक्‍प्रचारापासून स्फूर्ती घेणारं आहे. यातले वॉचमेन आहेत सुपरहिरोज, ज्यांतल्या बहुतेकांवर सरकारने बदलत्या काळाबरोबर बंदी घातलेली आहे, वा त्यांना सरकारी गुप्त कामगिऱ्यांमध्ये गुंतवलेलं आहे. मात्र ते आपल्यावर नजर ठेवत असतील तर त्यांच्यावर नजर कोण ठेवणार, हा प्रश्‍न या ग्राफिक नॉव्हेलच्या केंद्रस्थानी आहे.
"वॉचमेन'चं रूपांतर करण्याचे प्रयत्न वीसेक वर्षे चालले आहेत आणि फ्रॅन्क मिलरच्या "300'चं रूपांतर करणाऱ्या झॅक स्नायडरने त्याचं रूपांतर करायला घेणं, हेच स्वागतार्ह पाऊल होतं. मात्र आपल्याकडच्या प्रेक्षकाला "वॉचमेन' हा प्रकार मुळातच माहीत नसल्यानं, शिवाय ग्राफिक नॉव्हेल्सही फार प्रमाणात इथं न पोचल्यानं या चित्रपटाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, हा प्रश्‍न तयार होणं स्वाभाविक आहे.
ग्राफिक नॉव्हेल्स ही मुळात कॉमिक बुक्‍सपासून सुरू झालेली असली तरी कॉमिक्‍समध्ये क्वचित दिसणारा गंभीर आशय आणि प्रौढ वाचकाला डोळ्यांसमोर ठेवून आणलेली रंजकता ही इथं नित्य दिसते. सर्वच ग्राफिक नॉव्हेल्स मोठ्यांसाठी असतात असं नाही. लोकप्रिय सुपरहिरोंचा किंवा मुलांचा वाचक वर्ग डोळ्यांसमोर ठेवून रचनेच्या मोठ्या कथानकांनाही या वर्गात स्थान मिळतं; पण नील गायमन (सॅंडमॅन मालिका), फ्रॅन्क मिलर (सिन सिटी मालिका), आर्ट स्पिगलमन (माऊस), मर्जाने सतरापी (पर्सी पोलिस), आणि ग्राफिक नॉव्हेल्सचा मूळ पुरुष विल आइस्नर (ए कॉन्ट्रॅक्‍ट विथ गॉड, द बिल्डिंग, न्यू यॉर्क - द बिग सिटी) या आणि अशा अनेकांनी या कल्पनेला कॉमिक्‍सच्या चौकटीपलीकडे नेलेलं आहे. ऍलन मूरदेखील यातलंच एक महत्त्वाचं नाव.
मात्र हा तपशील माहीत नसलेला प्रेक्षक "वॉचमेन' पाहून गोंधळात पडण्याचीच शक्‍यता अधिक. एकतर चित्रपट सुपरहिरोंचा असला तरी तो मुलांचा नाही, हे सेन्सॉर सर्टिफिकेटवरूनच स्पष्ट व्हावं. त्यात प्रौढांसाठी असणारी साहसकथा समजून तो पाहावा, तर यातल्या सुपरहिरोंच्या भूमिकाही तथाकथित सुपरहिरोपेक्षा वेगळ्या. एका सुपरव्हिलनचे जगाला नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न आणि धीरोदात्त नायकांनी त्यावर काढलेला तोडगा, हा आकारच इथं नाही. सुपरव्हिलन नाही आणि खलनायकी व्यक्तिविशेष नायकांमध्येही आलेले. नायक ओळखीचे नाहीत, म्हणजे सुपरमॅन- बॅटमॅन वगैरे नाहीत. त्यातून आहेत तेही बहुतेक जण निवृत्त झालेले; मात्र समाजापासून वेगळे पडलेले. जणू सरकारने बंदी आणल्यावरही एक अदृश्‍य मुखवटा त्यांना जनतेपासून वेगळा ठेवतोय. त्यामुळे ज्याला "वॉचमेन'ची पार्श्‍वभूमी माहीत नाही तो प्रेक्षक, आपण नक्की काय पाहतोय याचा योग्य परस्पेक्‍टिव न मिळाल्याने गांगरणार, एवढं नक्की. आणि अखेरची अडचण म्हणजे प्रचंड मोठं कथानक.
"वॉचमेन'ची बारा प्रकरणं जर आपण पाहिली, तर ती प्लॉटिंगनं खचाखच भरलेली आहेत. पुस्तक एका सुपरहिरोच्या मृत्यूनं सुरू होतं आणि मृत नायक अन्‌ त्याच्या बरोबरीचं वजन असणाऱ्या सहा-सात सुपरहिरो व्यक्तिरेखा, इतरही छोटे-मोठे सुपरहिरो अन्‌ बाकी पात्रं, अशी याची प्रचंड मोठी कास्ट आहे. नायक नवे असल्यानं ते कोण आहेत, कसे आहेत हे दाखवणारं "ओरिजिन' छापाचे भूतकाळदेखील कथेत गुंफलेले आहेत. प्रत्येक प्रकरणाबरोबर काही लेखी पानांमध्ये एका नायकाच्या आत्मचरित्राचे भाग, काही उपकथानकाचं स्पष्टीकरण देणाऱ्या बातम्या, मुलाखती, ऑफिस मेमो अशा प्रकारचं इतर साहित्य आहे, आणि एक पात्र वाचत असलेल्या समुद्री चाच्यांविषयीच्या कॉमिक बुकचा भागही आहे. खुनाचं रहस्य म्हणून सुरू होऊन पुढे अणुयुद्धापर्यंत पोचणारी भलीमोठी गोष्टही आहे.
स्नायडरनं यातलं बहुतेक सर्व- म्हणजे समुद्री चाच्याचं कॉमिक वगळता इतर सर्व- चित्रपटात आणलंय, त्यामुळे चित्रपट भरधाव आणि थकवणारा आहे. माझ्यासारख्या "वॉचमेन'ची पारायणं केलेल्यालाही ही सांगितली जाणारी माहिती, कथानकं, उपकथानकं अंगावर येण्याची परिस्थिती काही क्षणी तयार होते, तर ज्यांना मूळ कथानक माहीत नाही त्यांचं काय होईल, हे वेगळं सांगायला नको. "वॉचमेन' पुस्तकही कथानक अति करत असलं, तरी ते आपण अंतराअंतरानं वाचू शकतो, आधीची पानं संदर्भासाठी परत पाहू शकतो. चित्रपट अर्थातच ती संधी आपल्याला देत नाही.
वॉचमेन घडतो 1985 च्या आसपास; पण एखाद्या समांतर विश्‍वात जिथल्या अमेरिकेत अजून निक्‍सन सत्तेवर आहे. चित्रपटाची पहिली श्रेयनामावली ही दृश्‍य चमत्कृती म्हणून मी पाहिलेल्या सर्वोत्तम टायटल सिक्वेन्सेसमधली एक म्हणावी लागेल. 1930-40 च्या सुमारास अमेरिकेत झालेला सुपरहिरोंचा उदय आणि आतापर्यंत इतिहासात घडत गेलेले बदल, हे इथं छोट्या छोट्या स्लोमोशन फ्रेम्समध्ये दाखवले जातात. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर लाईफ मासिकात आलेलं सेलर आणि नर्स मधलं चुंबनदृश्‍य (इथं चुंबन घेणारी व्यक्ती मात्र बदलण्यात आली आहे), केनेडीचा मृत्यू (त्याच्या खुन्यासकट दाखवलेला), व्हिएतनाम युद्धाच्या निषेधातलं मॉन्कचं आत्मदहन अशा महत्त्वाच्या घटना इथं येतात आणि या नव्या विश्‍वाची बदललेली पार्श्‍वभूमी तयार होते.
मुख्य कथानक सुरू होतं ते "कॉमेडिअन' नावानं ओळखल्या जाणाऱ्या एडी ब्लॅक (जेफ्री डीन मॉर्गन) याच्या खुनापासून. सरकारसाठी काम करणारा कॉमेडिअन, कोणताही बदल न स्वीकारणारा बंडखोर रॉरशॅक (जॅक अर्ल हेली) अन्‌ परमाणू अपघातानं सुपर पॉवर्स दिलेला डॉमॅनहॅटन (बिली कुडरूप) हे तिघंच अजून सुपरहिरोपण टिकवून आहेत. त्यांतल्या कॉमेडिअनचा बळी हा रॉरशॅकला संशयास्पद वाटतो, आणि कोणी इतरही सुपरहिरोंचा बळी घेण्याच्या तयारीत नाही ना, हे शोधण्यासाठी तो इतरांची भेट घेण्याचं ठरवतो. नाईट आडल (पॅट्रिक विल्सन) या बॅटमॅनसदृश रात्री संचार करणाऱ्या नायकानं निवृत्ती तर स्वीकारलेली असते; मात्र या आयुष्याला त्याच्या लेखी फार अर्थ नसतो. सिल्क स्पेक्‍टर (मॅलिन एकरमन)चं डॉ. मॅनहॅटनबरोबरचं लग्न अखेरच्या टप्प्यात असतं आणि ओझिमान्डीअसनं (मॅथ्यू गुड) स्वतःची ओळख वापरून औद्योगिक साम्राज्य उभारलेलं असतं. यांतल्या कोणालाही रॉरशॅकच्या आरोपात तथ्य दिसत नाही. पण तो आता गप्प बसणार नसतो.
चित्रपटाची रचना अन्‌ बारा भागांत येणाऱ्या कॉमिक मालिकेची रचना यांमध्ये फरक असतो. याचं सोपं कारण म्हणजे कॉमिकला एका मोठ्या आर्कबरोबर 12 छोट्या क्‍लायमेक्‍सेसची आवश्‍यकता असते. याउलट सिनेमाला एकच आर्क असावी लागते. सेट अप, मध्य आणि शेवट असे तीन भाग महत्त्वाचे ठरावे लागतात, ज्यांची गती चढती असावी लागते. मूळ नॉव्हेलशी प्रामाणिक राहिल्यानं त्या प्रकारचा गतिबदल इथं होऊ शकत नाही. वॉचमेन गतिमान राहतो; पण सतत सारख्या गतीनं तो आपल्याला थकवतो, यामागे हेदेखील एक कारण आहे.
मात्र यावर उपाय आहे. आपण सांगितलेल्या दर घटनेचा तपशिलात विचार न करता जर ढोबळपणे जे घडतंय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर ते सहज शक्‍य आहे. कदाचित पहिल्या फटक्‍यात आपल्या सर्व गोष्टी लक्षात येणार नाहीत; मात्र उत्तरार्धात या कोड्याचे तुकडे एकत्र लागायला लागतील आणि तोवर आपण आशा सोडली नसली तर चित्रपट चांगलाच गुंतवून ठेवेल.
दृश्‍यात्मकतेसाठीही हा या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांतला एक ठरावा. रॉबर्ट रॉड्रिग्जने "सिन सिटी'साठी फ्रॅन्क मिलरच्या पुस्तकांना जसंच्या तसं पडद्यावर आणण्याचा प्रयोग 2005 मध्ये केला. दिग्दर्शक दृश्‍याची रचना ठरवताना छोट्या चित्रांमधून एक आकृतिबंध तयार करतात, ज्याला स्टोरी बोर्ड म्हटलं जातं. रॉड्रिग्जनं मूळ पुस्तकं ही संहिता आणि स्टोरी बोर्ड या दोन्ही भूमिकांमधून वापरली. स्नायडरनेही "300'मध्ये याच प्रकारचा मूळ चित्रांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. "वॉचमेन'मध्येही तोच प्रयत्न आहे; मात्र इथे तो अधिक कठीण आहे. मिलरची शैलीही व्यक्तिरेखांवर फोकस करणारी अन्‌ इतर गोष्टी ढोबळ ठेवणारी होती. "वॉचमेन'मध्ये मात्र ज्या गोष्टीत तपशीलच तपशील आहे; किंबहुना व्यक्तिरेखांइतकंच महत्त्व त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना आहे. कॉमेडिअननं लावलेल्या स्माईली बॅचचा प्रवास, या मोटीफची पटकथेतल्या वेगवेगळ्या वेळी होणारी पुनरावृत्ती, भिंतीवर रंगवलेली "हू वॉचेस द वॉचमेन'सारखी ग्राफिटी, रोरशॅकच्या मुखवट्यावरले सतत बदलणारे (आणि मानसशास्त्रीय चाचणीतल्या सूचक चित्रांची आठवण करून देणारे) शाईसारखे डाग, मंगळावर डॉ. मॅनहॅटनने बनवलेलं घड्याळसदृश यान यांसारख्या अनेक गोष्टी इथं पाहण्यासारख्या आहेत.
त्यातल्या सर्व गोष्टी लक्षात यायच्या तर चित्रपट अतिशय काळजीपूर्वक पाहावा लागेल, तोही किमान तीन वेळा, अन्‌ त्यानंतरही सर्वांना सर्व गोष्टी कळण्याची गरज आहेच असंही नाही. हा तपशील जरी पूर्ण कळला नाही, तरी त्याचं अस्तित्व सतत जाणवणार आहे, दृश्‍य मांडणीला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतं.
"वॉचमेन'ला कोणत्या वर्गात बसवायचं, हे ठरवणं कठीण काम आहे. त्याचा प्रेक्षक वर्ग कोणता, हेही संदिग्ध आहे; मात्र याची काळजी न करता तो पाहणं शक्‍य आहे. सर्वांना तो आवडेल याची खात्री नाही, पण एक वेगळा चित्रपट पाहिल्याचं समाधान तो देईल, हे निश्‍चित.
-गणेश मतकरी

Read more...

गुलाल' - एका व्यवस्थेचा अंत

>> Wednesday, April 8, 2009



व्यवस्थेवरचा राग, कडवटपणा दाखविणारा अनुराग कश्‍यपचा "गुलाल' हा सध्याच्या लक्षवेधी चित्रपटांमधला एक आहे. देशाची राजकीय व्यवस्था चालविणाऱ्या गटांचं हे एक मायक्रोपातळीवरचं चित्र आहे. देशाच्या भवितव्याविषयी असुरक्षित का वाटतं याची अचूक कारणमीमांसाच हा चित्रपट देतो.


अनुराग कश्‍यप आणि वादग्रस्तता हे आज बरेच दिवस हातात हात घालून जाताना आपण पाहिलेले आहेत. गौरव आणि निषेध हे त्याच्या दिग्दर्शन प्रयत्नांतल्या (रिटर्न ऑफ हनुमान सोडून) जवळ जवळ प्रत्येक चित्रटाने पाहिले आहेत. सेन्सॉर बोर्डाने अनिश्‍चित काळासाठी चित्रपट अडवणं (पांच), बंदी घातलेला चित्रपट तत्कालीन संदर्भ पुसट झाल्यावर प्रदर्शित होणं (ब्लॅक फ्रायडे), प्रदर्शित चित्रपटांवर समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत उलटसुलट टोकाची मतं मांडली जाणं (नो स्मोकिंग) आणि मोठ्या प्रमाणात गौरवला जाऊनही तिकीट खिडकीवर तुलनेने कमी यश मिळणं (देव डी) या सर्व गोष्टी कश्‍यपच्या चित्रपटांनी आजवर पचवलेल्या दिसतात. मात्र एवढं सगळं असूनही एक गोष्ट स्पष्ट आहे, की हा दिग्दर्शक आज महत्त्वाचा आणि लक्षवेधी आहे.
"इफ यू कान्ट विन देम, जॉईन देम' असं म्हटलं जातं. चित्रपट माध्यम हे असं खर्चिक माध्यम आहे, की तुम्ही किती वेळा मनमानी करण्याची रिस्क घेऊ शकता, याला मर्यादा आहेत. सतत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट बनवण्यातून जो आर्थिक तोटा संभवतो, त्यामुळे अनेकदा चित्रपटात पैसे घालणारे निर्माते / गुंतवणूकदार बिथरण्याची तर शक्‍यता असतेच, वर बऱ्याच वेळा अभिनेत्यांमध्येही अशा दिग्दर्शकाबरोबर काम करत राहण्याने असुरक्षितता वाढायला लागते.
मग मुख्य धारेतले कलावंत मिळेनासे होतात, अन्‌ अर्थातच लोकप्रिय नावांमुळे मिळणाऱ्या हुकमी प्रेक्षक वर्गाला मुकावं लागतं. नवे चेहरे घेऊन नवा सिनेमा करत राहण्याचा प्रयत्न ठामपणे करत राहणं, हे कठीण काम आहे आणि अशा परिस्थितीत आपला दृष्टिकोन सोडून प्रेक्षकांना पचेलसं काम करणं दिग्दर्शकानं निवडलं, तर आपण त्याला दोष देणार नाही. अनुराग कश्‍यपचा मात्र असा बाजू बदलण्याचा कोणताही विचार दिसत नाही. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "गुलाल'मध्येही हे स्पष्ट होतं.
एखादा सामान्य माणूस काहीसा अपघातानंच एखाद्या विशिष्ट स्थळी / विशिष्ट वेळी (अर्थात रॉंग प्लेस ऍट द रॉंग टाईम) येणं आणि परिस्थितीचा बळी ठरणं हे त्याच्या चित्रपटांना नवीन नाही. त्याचा "क्‍लेम टू फेम' मानल्या जाणारा "सत्या' (1998) ज्यात कश्‍यपचं नाव केवळ लेखक म्हणून होतं, हे याचं सर्वांत महत्त्वाचं उदाहरण. नंतरही कौन, शूलसारख्या त्यानं लिहिलेल्या चित्रपटांतून या कल्पनेची वेगळी रूपं पुढे येत गेली. "गुलाल'मध्येदेखील ही कल्पना वापरात आलेली दिसते. मात्र "सत्या'तला नायक आणि त्याचं विश्‍व हे "गुलाल' मधल्या दिलीप कुमार सिंग (राजा चौधरी) अन्‌ त्याच्या विश्‍वाहून कितीतरी वेगळं होतं.
"गुलाल'बद्दल मला पडलेला एक प्रश्‍न म्हणजे त्याचा प्रोटॅगोनिस्ट, किंवा थोड्या अधिक ढोबळ शब्दात म्हणायचं तर नायक कोण आहे? दिलीपपासून चित्रपट सुरू होतो; काही प्रमाणात त्याच्या दृष्टिकोनातून घटनांकडे पाहतो, मध्येच त्याची साथ सोडत नाही आणि अखेर त्यानं उचललेल्या पावलावरच संपतो. त्यामुळे तर्कशुद्ध निष्कर्ष काढायचा तर दिलीपलाच नायकाचं स्थान मिळायला हवं; मात्र घटनांच्या दृष्टीनं पाहायचं तर ही व्यक्तिरेखा फारच निष्क्रीय आहे. आणि प्रेक्षकांना धरून ठेवेलसं काहीदेखील तिच्याकडे नाही. त्यापेक्षा कितीतरी अधिक वेधक आणि चित्रपटाला व्यापणारा पूर्ण आलेख असणारी पात्रं "गुलाल'मध्ये आहेत. मग यातलं एखादं पात्र अधिक महत्त्वाचं का ठरू नये?
"गुलाल' हा राजकीय व्यवस्थेत दडलेली विनाशाची मुळं पडताळून पाहतो. त्याला पार्श्‍वभूमी आहे राजस्थानात सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजपूत संघर्षांची. डुकी बाना (केके मेनन) या राजवंशातल्या राजपुताला बंड घडवायचंय. राजपुतांची चाललेली पीछेहाट त्याला पाहवत नाही. त्यावर तोडगा म्हणून राजपुतांचं स्वतंत्र राज्य "राजपुताना' त्याला हवं आहे अन्‌ ते मिळवण्यासाठी सैन्यापासून अर्थसाह्यापर्यंत सर्व गोष्टी गोळा करणं, हा त्याचा प्रमुख उद्योग आहे. तरुणांना आपल्या बाजूला वळवणं, हाही त्याचाच एक भाग. साहजिकच कॉलेज इलेक्‍शनमध्ये ढवळाढवळ आलीच.
या बंडाची बीजं रोवली जात असतानाच दिलीप कुमार सिंग हा सरळमार्गी मुलगा कॉलेजमध्ये भरती होतो, अन्‌ योगायोगानं त्याची गाठ पडते रणंजय सिंग (अभिमन्यू सिंग) राजघराण्यातल्या तरुणाशी. रणंजय एका छोटेखानी संघर्षात दिलीपला मदत करतो आणि दोघांची जोडी जमून जाते. याच संघर्षादरम्यान संजय दिलीपची ओळख डुकी बानाशी होते आणि बाना रणंजयला आपल्या बाजूने कॉलेज इलेक्‍शन लढवायला तयार करतो. आजवर गुपचूप आपले शौक सांभाळणाऱ्या रणंजयला असं मैदानात उतरलेलं पाहून अनेक प्रतिस्पर्धी तयार होतात. लवकरच घटना अधिक रक्तरंजित होतात आणि दिलीपला या नाट्यात अधिक महत्त्वाची भूमिका पार पाडायला लागणार, अशी चिन्हं दिसायला लागतात.
आपल्या हातानं आपलं दुःख घडवणारी पात्रं, लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांच्या गडद शोकांतिका, महत्त्वाकांक्षेतून ओढवणारा सर्वनाश, अनेक लहानमोठ्या पात्रांचा काळजीपूर्वक मांडलेला पट, ही आणि यासारखी या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्यं आपल्याला शेक्‍सपिअरच्या शोकांतिकांची आठवण करून देतात. मात्र या सर्व मांडणीतही शेक्‍सपिअर आपल्या प्रमुख पात्राला जे वजन बहाल करतो, ते इथं पाहायला मिळत नाही. दिलीप या प्रकरणात गुंततो. पण यापलीकडे जाऊन तो डोकं वापरताना दिसत नाही. या व्यक्तिरेखेचा मूळ आकार, तसंच तिच्यामार्फत प्रेक्षकाला कथेशी समरस होण्याची संधी उपलब्ध होणं, हे जरी तिच्या महत्त्वाचं असण्याकडे निर्देश करणारं असलं आणि डुकी बानाच्या राज्याला सुरुंग लावणाऱ्या घटनांची सुरवातही त्याच्यापासूनच होत असली, तरी चित्रपटात ती सातत्यानं केंद्रस्थानी राहू शकत नाही. रणंजय, डुकी बाना आणि रणंजयची सावत्र बहीण किरन (आयेशा मोहन) ही तिघं अनुक्रमे केंद्रस्थान घेत जातात. त्यामुळे अनेकदा दिलीप दुर्लक्षित तर राहतोच, वर शेवटी शस्त्र उचलण्यापर्यंत जो तणाव त्याच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण होणं आवश्‍यक आहे, तो पटण्यासारखा पुढे येत नाही. केवळ युक्तिवाद म्हणून असं होण्याची शक्‍यता आपण मान्य करू शकतो; पण ते शक्‍य होण्याला पटकथेची मदत मिळत नाही.
त्यामानानं किरणचं पात्रं हे अधिक भाव खाऊन जातं. आधी लहान अन्‌ बिनमहत्त्वाचं वाटणारं हे पात्र झपाट्यानं या राजकारणातला महत्त्वाचा दुवा तर ठरतंच, वर तिच्या वागण्याला शेवटपर्यंत निश्‍चित आकार येत जातो. दिलीप जेव्हा अखेर तिला विचारतो, की "सगळे तुला वापरून घेताहेत हे तुझ्या लक्षात येत नाही का?' त्यावर तिनं केलेला "कशावरून मीच सर्वांना वापरत नाही आहे?' हा प्रतिप्रश्‍न, राजकारणातल्या एका अगदी मूलभूत स्वरूपाच्या स्ट्रॅटेजीकडे आपलं लक्ष वेधतो.
चित्रपटाच्या सुरवातीला सांगितलं जातं, की "प्यासा'मध्ये वापरण्यात आलेल्या साहीर लुधियानवीच्या "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्‍या है!' या रचनेतल्या काही ओळी "गुलाल'मागचं प्रेरणास्थान आहेत, "ये दुनिया...'चा शेवटाजवळ वापरही केला जातो. प्रत्यक्ष चित्रपटातल्या घटना अन्‌ आंतरराष्ट्रीय राजकारण अन्‌ दहशतवाद यावर शेरेबाजी करणारं डुकीच्या भावाचं पात्र अन्‌ त्याच्याबरोबर अर्धनारीनटेश्‍वर म्हणून संबोधलं जाणारं, मात्र प्रत्यक्षात चमत्कारिक मेकअप करून पेंटोमाईम करणारं, वास्तववादी चित्रपटात न जाणारं प्रायोगिक पात्रंही जोडीला उभं केलं जातं. या तीनही गोष्टी म्हटलं तर अनावश्‍यक आहेत, ज्यांची चित्रपटाला म्हणण्यासारखी गरज नाही. "ये दुनिया...'चा इथला संदर्भ तर योग्य आहे किंवा नाही (निदान दिलीपच्या बाबतीत तरी तो निश्‍चितच अयोग्य आहे) यावर वाद करणं सहज शक्‍य आहे, आणि मूकाभिनय करणारं पात्रं वगळण्यासारखं आहे. स्पर्धेतल्या नाटकांमध्ये उत्साहानं जशा सर्व चमत्कृती भरण्याचा अट्टाहास असतो, तसा काहीसा या तीनही गोष्टींच्या वापरात दिसतो. अनुराग कश्‍यपकडून इतक्‍या अनुभवानंतर ही अपेक्षा नाही.
मात्र हे सगळं धरूनही "गुलाल'ला मी सध्याच्या लक्षवेधी चित्रपटांमधला एक म्हणेन. कश्‍यपच्या बहुतेक चित्रपटांप्रमाणे कडवटपणा, व्यवस्थेवरचा राग इथंही पाहायला मिळतो, जो त्याच्या दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग म्हणायला लागेल. इथं त्यानं राजकारणातली गुंतागुंत, त्यातलं स्वार्थाचं, भ्रष्टाचाराचं गणित हे पुरेशा स्पष्टपणे आणि वास्तवाचं भान ठेवून मांडलेलं आहे. प्रेक्षकांसाठी तडजोड करणं हे त्याच्या प्रकृतीतच नसावं, त्याप्रमाणे इथंही तसा प्रयत्न दिसून येत नाही. "गुलाल'चा भर आहे, तो व्यक्तिरेखांच्या तपशिलावर, त्यांना जिवंत करण्यावर, त्यांच्या वागण्याला कारण न चिकटवता त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीवर. दिलीपच्या निष्क्रियतेविषयी किंवा वेधक नसण्याविषयी मी बोललो; पण ती वास्तवाला सोडून आहे असं मात्र मी म्हणणार नाही. यातला प्रत्येक जण हा स्वकेंद्री अन्‌ स्वतःच्या तर्कशास्त्राला अनुसरून वागणारा आहे. त्यांच्या वागण्याला हे तर्कशास्त्र हीच प्रेरणा आहे, अन्‌ इथं घडणारा संघर्षदेखील यातूनच पुढे आलेला आहे, देशाची राजकीय व्यवस्था चालवणाऱ्या गटांचं हे एक मायक्रो पातळीवरलं चित्र आहे, अन्‌ आपल्याला देशाच्या भवितव्याविषयी असुरक्षित वाटण्यासाठी दिलेली एक अचूक कारणमीमांसा!
- गणेश मतकरी

Read more...

दहशतवाद,युटीव्हीची चित्रत्रयी आणि बॉलीवूड

>> Tuesday, April 7, 2009


आमीर, मुंबई मेरी जान आणि अ वेड्नसडे या तीन चित्रपटांचे गेल्यावर्षीच्या पडत्या काळात ठामपणे उभं राहून दाखवणं काय सांगत होतं? आज काळ बदलतोय, चित्रपटही बदलण्याची आवश्यकता आहे हे ? का दिग्दर्शकांनी मल्टीप्लेक्सला चिकटवण्यासाठी एक प्रोडक्ट बनवण्यापेक्षा आपला आतला आवाज ऐकण्याची गरज आहे हे ? मुंबईवर सर्वात मोठा दहशतवादी हल्लाही गेल्यावर्षी अखेरीस झाला आणि या प्रश्नाला प्रामाणिकपणे पडद्यावर प्रामाणिकपणे पडद्यावर मांडणा-या तीन कलाकृतीही नेमक्या त्याच्या अलीकडच्या काळात आल्या... त्या तीनही चित्रकृतींबद्दलचा तेव्हाच लिहिला गेलेला, पण अनेक अडचणींमुळे प्रकाशित करायचा राहिलेला हा लेख.

बॉलीवूडची सध्याची स्थिती काय आहे, ते आपण जाणतोच, स्टार्सना वाजत- गाजत आणणारा प्रत्येक चित्रपट पडतो आहे. मोठे बॅनर, भव्य निर्मिती, गाणी बजावणी या सगळ्या त्याच त्याच पणाचा एक कंटाळा प्रेक्षकांना आलेला दिसतो आहे, आणि जर या मोनोटनीपासून सुटून काही वेगळं पाहण्याची संधी मिळाली तर ती घेण्याची तयारीही वाढताना दिसते आहे. ज्या कृत्रिमतेचा वास्तवाशी संबंध न ठेवता कथानकांना निर्वातात घडविण्याच्या संकल्पनेचा, फॉर्म्यूलांचा अन् अजब तर्कशास्त्राचा हिंदी चित्रपटांना का कोण जाणे, पण अभिमान होता, त्या सर्व गोष्टीच आज वर्ज्य मानण्याची वेळ आलेली दिसते.
हे आत्ताच का झालं, अन् या आधी का नाही या बोलण्यात अर्थ नाही. कदाचित चित्रपटांची अचानक वाढलेली संख्या आणि सर्वांमधली त्याच त्या घटनांची पुनरावृत्ती हे त्यामागे कारण असेल. कदाचित पूर्वीच्या फॉर्म्युला चित्रपटातूनही दिसणारा प्रामाणिकपणा अदृश्य होऊन डोक्याने कमी असणा-या कॉर्पोरेट हाऊसेसकडून पैसा उकळणं हा एकमेव हेतू ब-याच चित्रपट निर्मितीच्या मुळाशी असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागलं असेल. कदाचित पेज थ्री कल्चरच्या वृत्तपत्रांपासून टी.व्ही, रेडियोपर्यंत सर्व ठिकाणांहून होणा-या मा-यामुळे आज ग्लॅमर या शब्दाला अर्थच उरला नसेल. कदाचित विदेशी चित्रपटांच्या मुबलक उपलब्धतेने आपण कुठे कमी पडतोय, हे प्रेक्षकांना जाणवायला लागलं असेल. कदाचित वेगळंही कारण असू शकेल. असेल ते असो, पण प्रेक्षकांमध्ये एक हिंमत तयार व्हायला लागलेली दिसते आहे. दोन वर्षांपूर्वीच्या राम गोपाल वर्माच्या शोलेचं पहिल्या खेळाबरोबर पडणं, टशनसारखा मल्टीस्टारर लोकांनी नाकारणं, त्याचबरोबर तारे जमी पर सारखी स्टारला दुय्यम भूमिकेत आणणारी निर्मिती डोक्यावर घेतली जाणं.अशी अनेक उदाहरणं या विधानाला पुष्टी देणारी, म्हणून पाहता येतील. गेल्यावर्षी आलेली दहशतवादाच्या मुद्दयाला उचलून धरणारी चित्रत्रयी हे मात्र सर्वात महत्वाचं आणि प्रमुख उदाहरण.
आमीर, मुंबई मेरी जान आणि अ वेड्नसडे ही अधिकृतपणे चित्रत्रयी नाही, तरी तसा उल्लेख करण्यामागे काही निश्चित कारणे आहेत.
चित्रत्रयीमध्ये येणारे चित्रपट नेहमीच एका कथानकाला पुढे नेणारे असण्याची गरज नसते, तर त्याचा विषय सारखा असू शकतो. एका विशिष्ट गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहाणं किंवा तिचे वेगवेगळे पैलू अधोरेखित करणं, हेदेखील या चित्रपटांमधून संभवतं. आमीर, मुंबई मेरी जान आणि अ वेड्नसडे या तीनही चित्रपटांचा विषय हा मुंबईतल्या स्फोटांच्या मालिका आणि त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष होणारा परिणाम, हा आहे. शहरी दहशतवादाचे विभिन्न मुद्दे या चित्रपटांमधून येतात. दहशतवाद्यांचा दृष्टीकोन माफक प्रमाणात आमीरमध्ये येत असला, तरी त्याचा नायत हा एक प्रकारे या दहशतवादाचा मानसिक बळी आहे. दहशतवादी कारवायांमुळे उठणा-या धार्मिक पडसादांना तर तो स्वतः मुस्लिम असल्याने त्याला सामोरं जावं लागतंय, वर या दहशतवाद्यांची अपेक्षाही तो त्यांना समजून घेऊ शकेल, आणि त्यांच्याच उद्दिष्टांकडे सहानुभूतीने पाहील अशी होते.


मुंबई मेरी जानमध्ये या दहशतवाद्यांच्या बाजूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं, आणि स्फोटांच्या आघातानंतर समाजाच्या प्रातिनिधिक घटकांवर होणा-या परिणामांकडे पाहीलं जातं. अ वेड्नसडेमध्येही आपल्याला दिसतो या समाजाचाच प्रतिनिधी, मात्र थोडा अधिक प्रोअँक्टिव्ह मोडमध्ये. सहन करणा-या कंटाळलेला, दहशतवादाच्या विरोधात थेट उभं राहण्याची तयारी करणारा. या तिघांमधलं आणखी एक साम्य म्हणजे त्यांची निर्मितीसंस्था यु.टी.व्हीने या तीनही चित्रपटांची निर्मिती तीन नवदिग्दर्शकांकडून करून घेतली आहे. आमीरचा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि अ वेड्नसडेचा दिग्दर्शक नीरज पांडे यांचेन हे पहिलेच चित्रपट आहेत. निशिकांत कामतचा जरी हा अगदी पहिला चित्रपट नसला, तरी हिंदीतला हा पहिलाच प्रयत्न आहे. या तीनही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचं आपापल्या कथानकांकडे ताजेपणे पाहणं, त्यांनी वरवरच्या छानछोकीपणापेक्षा आशयाकडे अधिक लक्ष पुरवणं आणि त्यांना एकत्र आणण्यात एकाच संस्थेचा हात असणं, ज्यांनी वितरणातही त्यांना जवळजवळ प्रदर्शित करणं, या सर्व गोष्टीचं या निर्मितीमागे काही योजना असल्याचं सुचवितात. या तीन चित्रपटांना चित्रत्रयी म्हणतो, ते तेवढ्याचसाठी.
यावर्षी जे मोजके चित्रपट लक्षात आले, प्रेक्षकांना आवडले, त्यात या तीन चित्रपटांचे नाव घेणे आवश्यक आहे. यातले सगळेच सारख्या प्रमाणात यशस्वी झाले, असं म्हणता येणार नाही. म्हणजे अ वेड्नसडे सर्वात अधिक चालला किंवा मुंबई मेरी जानला हवा तितका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. हे सत्य आहे. मात्र यातला कोणताही चित्रपट दुर्लक्षित राहिलेला नाही. त्याने स्वतःचा प्रेक्षक हा हक्काने मिळवला.
विषयाचं साम्य वगळता, या तीन चित्रपटांमध्ये काही गोष्टी निश्चित अशा होत्या, ज्या त्यांना एकमेकांसारखं होऊ देणार नाहीत. इथे सर्वात उत्तम बांधलेली पटकथा होती वेड्नसडेची. मात्र त्याचबरोबर ती अधिक सांकेतिकदेखील होती. तिचा फॉर्म हा ओळखीचा होता, आणि तथाकथित रहस्यही चाणाक्ष प्रेक्षकांपुढे लपण्याची शक्यता नव्हती. अ वेड्नसडेच्या पटकथेचा सर्वात मोठा गुण म्हणजे तिने घटना घडविण्यात ठेवलेला वेग, प्रेक्षकाला विचार करायला उसंत मिळणार नाही याकडे लक्ष देणं आणि लांबी मर्यादित ठेवणं. या प्रकारचे चित्रपट जितके लांबतात, तितकी त्याची बांधणी सैल पडत जाते. इथे ते होण्याला वेळच मिळत नाही. अभिनेत्याच्या प्रतिमांचा व्यक्तिरेखा शब्दांशिवाय उभ्या करण्यासाठी केलेला वापर हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. आशयात वैविध्य असून, आणि घटनांच्या वास्तवाशी काही प्रमाणात संबंध असूनही वेड्नसडे हा अखेर एक थ्रिलर. त्यातल्या घटना या ख-या घडण्याची शक्यता नाही. जवळजवळ विशफूल थिंकींगचा नमुना मात्र काळाशी सुसंगत विचार मांडणारा. केवळ करमणुकीवर समाधान न मानणारा. अधिक महत्त्वाकांक्षी ध्येय असणारा.
आमीरचाही एक प्रकार साधारण हाच. म्हणजे वास्तवाशी सुसंगत असूनही. इथल्या वास्तवदर्शनाची जवळजवळ पूर्ण जबाबदारी सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय यांच्या खांद्यावर. मुंबईच्या सुंदर रुपड्यापलीकडे जाऊन गल्लीबोळातलं गुन्हेगारी वातावरण अगदी ख-यासारखं उभं करण्याचा हा यशस्वी प्रयत्न. कथेचा जीव त्यामानाने लहान. तिला कथा म्हणण्यापेक्षा कल्पना म्हणणं उत्तम.
या दोन्ही थ्रिलर वळणारी जाणा-या चित्रपटांपेक्षा मुंबई मेरी जान अधिक वास्तव, यातल्या व्यक्तिरेखा नायक- नायिका या साच्यातही न बसणा-या, कितीतरी अधिक अस्सल. त्यातला प्रश्नदेखील एखाद्-दुस-या नायकांच्या करामतीपलीकडे जाणारा, प्रत्यक्ष मुंबईतल्या सामान्य माणसाशी थेट बोलू पाहणारा. त्याला न उत्तराची गरज, ना व्यक्तिरेखांना बंदिस्त आलेख देण्याची. केवळ प्रेक्षकांनी अंतर्मुख व्हावं, इतकीच दिग्दर्शकांची अपेक्षा. या तीनही चित्रपटांतला हा खरा चित्रपट.
या तीन चित्रपटांचे गेल्या वर्षीच्या पडत्या काळात ठामपणे उभं राहून दाखवणं काय सांगत होतं? आज काळ बदलतोय, चित्रपटही बदलण्याची आवश्यकता आहे हे ? का दिग्दर्शकांनी मल्टीप्लेक्सला चिकटवण्यासाठी एक प्रोडक्ट बनवण्यापेक्षा आपला आतला आवाज ऐकण्याची गरज आहे हे ? का निर्मिती संस्थांनी आपली आर्थिक गणितं बाजूला ठेवून आणि बुकींगवाले(?) स्टार्स अधिकाधिक कोटींच्या कॉन्ट्रॅक्टखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न सोडून आपण कसली निर्मिती करतोय याकडे लक्ष पुरवावं हे ? का परकीय चित्रपटांमधून तांत्रिक गुपितं, अन् दिग्दर्शकीय सफाईचा आभास उचलण्यापेक्षा त्यांची ज्या ज्या गोष्टींत बुडून जाऊन काम करण्याची पध्दत स्वीकारावी हे ? का प्रेक्षकाला आज मूर्ख बनवणं सोपं नाही हे?
मला वाटतं हे सगळं आणि इतरही बरंच काही, अर्थात चुका या सुधारता येतात. जेव्हा त्या चुका आहेत हे मान्य केलं जाईल तेव्हाच. आपला चित्रपट उद्योग आपल्या मिजाशीतून जेव्हा बाहेर येईल तेव्हाच तो ही काही अनप्लेझंट पण आवश्यक निरीक्षणं करू शकेल, आणि तो तसा येईल ही कल्पनादेखील अतिशयोक्त वाटणारी. निदान आज तरी!
- गणेश मतकरी

Read more...

ज्याची त्याची श्रद्धा

>> Thursday, April 2, 2009


श्रद्धा किंवा भक्ती हा विषय मालिका किंवा चित्रपटांतून साधेपणानं मांडणं ही फार कठीण गोष्ट आहे. आज आपण टीव्हीवर किंवा चित्रपटांतून या विषयाचे अनेक ढोबळ,बटबटीत नमुने पाहतो. अनेक मालिकांमध्ये देवादिकांना वेठीला धरणा-या भक्तांच्या आणि त्यांच्या अडचणींकडे पर्सनली लक्ष देणा-या दैवतांच्या कहाण्या पाहायला मिळतात. चित्रपटही यात मागे नाहीत. संतोषी माँ पासून साईबाबांपर्यंत चमत्कार हा एक कलमी कार्यक्रम असणारे चित्रपट थोडे नाहीत. त्याचबरोबर मैने आजतक तुमसे कुछ नही माँगा म्हणत नव्या मागण्यांची यादी देणारे नायक किंवा कोणत्याही वैद्यकीय इलाजाशिवाय दृष्टी येणा-या त्यांच्या आयांचे नमुने आपल्याला नवीन नाहीत. त्यातून देव ही एक शक्ती मानून श्रद्धेकडे निरपेक्ष भावनेने पहायची यातल्या कोणाची तयारी नसते. तिथेही गटबाजी आलीच. कोणत्या देवाला चांगला टिआरपी आहे, कोणत्या टेरीटरीत कोणत्या दैवताला बुकींग आहे. स्वर मंडळींनी नाचत गात जाऊन कोणाला साकडं घालणं तिकीट खिडकीवर लाभाचं ठरेल, यासारखे अर्थपूर्ण विचार त्या, त्या दैवाला चमकवताना दिसून येतात. या सर्व गोष्टींनी या भावनेला संवंग करून सोडलेलं आहे. तिथे पावित्र्य, तरलता कुठे पहायला मिळेनाशी झाली आहे.
आपल्याकडे नाही, पण आपल्या इतक्याच हिशेबी मानल्या जाणा-य़ा हॉलीवूडमधून आलेलं या विषयावरच्या चांगल्या चित्रपटाचं उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. जो श्रद्धेला योग्य ती सन्मान्य जागा देऊ करतो. दैवताचा प्रोपोगंडा करणं, उघड टाळीबाज चमत्कार करणं,हदयपरिवर्तनासारखे ओळखीचे उपाय शोधणं यासारख्या कोणत्याही सापळ्यात तो अडकत नाही. कथानकातल्या संघर्षात तडजोड करीत नाही, सोप्या पळवाटा काढत नाही. चित्रपटाचं नाव हेन्री पूल इज हिअर, दिग्दर्शक मार्क पेलिंग्टन.
चित्रपटाचा हेन्री पूल (ल्यूक विल्सन) नुकताच नव्या घरात रहायला आला आहे. हेन्री एकलकोंडा आहे. शेजा-या पाजा-यांमध्ये मिसळणारा नाही. काही नोकरीधंदाही करणारा नाही. अस्वस्थपणे पाहून रडण्यापलीकडे फार काही तो करताना दिसत नाही. अर्थात हे स्वाभाविक आहे. कारण तो इथे येऊन वाट पाहत आहे,केवळ मरणाची. डॉक्टरांनी काही दिवसांची दिलेली मुदत संपण्याची.
जणू हा प्रॉब्लम कमी असल्यासारखी एक नवी अडचण त्याच्यासमोर उभी ठाकते. त्याला नको असताना इस्टेट एजंटने करून दिलेल्या प्लास्टर कामाच्या रुपाने. हेन्रीची शेजारीण एस्परेंझा (आड्रियाना बराजा) हिला म्हणे या प्लास्टरवरल्या डागात येशू ख्रिस्ताचा चेहरा दिसतो. हेन्रीला तो दिसत नाही. प्रेक्षकांनाही बहुतेकवेळा नाही. पण एस्परेंझा गप्प बसत नाही. ती समविचारी अनुयायांना तर गोळा करतेच, वर फादर सालाजार यांच्या मदतीने हा खराखुरा चमत्कार असण्याचं सिद्ध करायच्या मागे लागते. हेन्री या घटनेने अधिकच वैतागतो. तो स्वतः तर या तथाकथित चमत्कारावर बिलकूल विश्वास ठेवणारा नसतो. शिवाय आपल्या आहे त्या परिस्थितीत घराचं श्रद्धास्थान होणं हा त्याला एक क्रूर विनोद वाटतो. अशातच भिंतीला हात लावलेल्या मंडळींना, माफक चमत्कारी अनुभव यायला लागतात. त्याच्या शेजारी राहणारी मुलगी मिली (मॉर्गन लिली) जी वर्षभरात एक अक्षर न बोलता गप्प गप्प राहणारी असते, भिंतीचा एक स्पर्श तिला पुन्हा माणसात आणतो. तिची आई डॉन (राधा मिशेल) या घटनेने हेन्रीच्या जवळ येते, पण हेन्रीची मनःस्थिती ती समजू शकते आणि त्याचा मताचा आदरही करते. मात्र एस्परेंझाचे उपद्व्याप वाढत जातात आणि आता हळूहळू डॉनच्या प्रेमात पडायला हेन्रीचा रागदेखील.
हेन्री पूल इज हिअरचा विशेष हा की वरवर पाहता धार्मिक/अध्यात्मिक छटा असणा-या विषयातही तो तर्कशास्त्र सोडत नाही. मिली जेव्हा नॉर्मल होते. तेव्हा डॉनला हा बदल चमत्कारी वाटतो. मात्र तो म्हणतो हा चमत्कार कसा, हा तर योगायोग आहे. जरी तिचा स्पर्श आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातला बदल एकावेळी घडून आला असला, तरी प्लास्टरवरच्या डागात अशी शक्ती कुठून येणार. पुढे मिलीला भिंतीला हात लावण्याचा सल्ला दिल्याचं एस्परेंझाने मान्य करताच हेन्री तिच्यावरही वैतागतो. मात्र मिलीमधला बदल हा एस्परेंझाच्या युक्तीवादाला दुजोरा देणारा असतो. एस्परेंझा या घटनेचा संदर्भ हा मिलीच्या श्रद्धेशी लावते. अखेर तुम्हाला येणारा अनुभव हा तुमच्या एखाद्या गोष्टीवर असणा-या विश्वासावर अवलंबून आहे. जर हा विश्वास तुमच्या मनात तयार होऊ शकला, तर त्याचा परिणामही तुमच्या आय़ुष्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, असं चित्रपट सुचवितो. पण मग प्रश्न असा उरतो, की हेन्री पूलचं काय? मूळात अश्रद्ध माणूस हा केवळ आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी सश्रद्ध होऊ शकेल ? किंबहुना तसं होणं त्याला शक्य आहे का ? आणि जर श्रद्धेशिवाय त्याने भिंतीला हात लावला तर त्याचा फायदा कसा होईल ?
हेन्रीचा घडणा-या घटनांवर विश्वास नाही. कारण त्या त्याच्या अनुभवात, त्याच्या तर्कशास्त्रात बसत नाहीत. त्यांना तो कोणतंही स्पष्टीकरण लावू शकत नाही. मात्र ख-या आयुष्यातही दर गोष्टीला स्पष्टीकरण असतंच असं नाही, नाही का ? हेन्री पूलचा विशेष हा, की तो प्रत्येक पात्राला आपली श्रद्धा जपाण्याचं स्वातंत्र्य देतो. तो एस्परेंझाला ज्याप्रमाणे हेन्रीच्या बाजूला वळवत नाही, त्याचप्रमाणे हेन्रीलाही तडजोड करायला लावत नाही. एस्परेंझा, हेन्री आणि डॉन ही पात्रं अनुक्रमे आस्तिक,नास्तिक आणि त्रयस्थ वृत्तीचं प्रतिनिधित्त्व करतात. प्रेक्षकांतला प्रत्येक जण यातल्या कोणत्या ना कोणत्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होऊ शकतो आणि ब-याच प्रमाणात इतर दोघांच्या बाजूदेखील त्याच्यापर्यंत पोहोचतात.
हेन्री पूल पहाण्यासाठी तुम्ही एखाद्या विशिष्ट विचारसरणीवर विश्वास ठेवणारे असण्याची गरज नाही. त्याची कल्पना ही युनिव्हर्सल म्हणण्यासारखी आहे. समाजातल्या सर्व थरातल्या अन् प्रकारच्या प्रेक्षकांना तो सहजपणे पाहता येईल. कोणत्याही फॉर्म्यूलाचा वापर टाळून हे करून दाखवणं नक्कीच सोपं नाही.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP