अर्थपूर्ण बेओवुल्फ

>> Tuesday, February 23, 2010

ऍनिमेटेड चित्रपट किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर कार्टून फिल्म्स या बालप्रेक्षकांसाठी असतात, असं एक प्रचलित मत आहे. अर्थातच बऱ्याच प्रमाणात त्याला सत्याचा आधारदेखील आहे, मात्र त्यामुळे धोका संभवतो, तो एखादा मोठ्या वयाच्या प्रेक्षकांसाठी असणारा चांगला ऍनिमेटेड चित्रपट दुर्लक्षित राहण्याचा. "बेओवुल्फ' हा उत्तम चित्रपट आपल्याकडे लागला तेव्हाही बहुधा हाच प्रकार झाला असावा. ऍनिमेटेड, त्यातून साहसपट. त्यामुळे पहिल्या प्रथम कुणालाही तो घरातल्या मुलांना दाखवावा वाटला नाही , असं वाटणं साहजिक आहे. मात्र, एकदा का तो फक्त प्रौढांसाठी असल्याचं समजलं, की आपला प्रेक्षक गडबडणार, हे निश्चित. 18 वर्षांपुढील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन कार्टून फिल्म पाहण्याची आपली प्रथा नाही. त्यातून अशा प्रकारच्या मायथॉलॉजिकल पार्श्वभूमी असणाऱ्या साहसपटातही आपले प्रेक्षक फार रस घेत नाहीत. त्यामुळे मी स्वतः जेव्हा "बेओवुल्फ' पाहायला गेलो तेव्हा प्रेक्षागृह अपेक्षेप्रमाणे रिकामंच होतं. दोनएक रांगा भरलेल्या.
बेओवुल्फच्या आधीचा रॉबर्ट झेमेकीसनं दिग्दर्शित केलेला अन् फोटोरिऍलिस्टिक ऍनिमेशनचंच तंत्र (म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा या जवळजवळ खऱ्यासारख्या वाटण्याइतक्या नैसर्गिक असतात अन् त्यातल्या अनेकांचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या पडद्यामागं उभ्या करणाऱ्या नटमंडळींशी साम्यदेखील असतं. नटांच्या अंगावर मोशन कॅप्चर सेन्सर्स लावून त्यांच्या हालचाली संगणकाद्वारे अचूक पकडणाऱ्या या तंत्राला सध्या हॉलिवूडमध्ये फार मागणी आहे.) वापरून केलेला "पोलर एक्स्प्रेस' त्यामानानं उघडपणे मुलांसाठी होता. त्यामुळे आपल्याकडंही तो थोडाफार धंदा सहज करून गेला. हा चित्रपट मात्र त्याहून कितीतरी पटींनी अधिक उजवा असून, आपल्या प्रेक्षकवर्गाच्या विशिष्ट विचारसरणीचा बळी ठरला. असो!
अनेकदा दंतकथा किंवा लोककथा या उघडपणे एक कथानक सांगतात; पण प्रत्यक्षात त्यांमधून व्यक्त होणारे अर्थ हे अनेक सामाजिक, राजकीय सत्यांना स्पर्शून जातात. सातव्या किंवा आठव्या शतकात लिहिलेल्या गेलेल्या "बेओवुल्फ' या योद् ध्याच्या साहसांवर आधारित काव्यावर बेतलेला बेओवुल्फ याच प्रकारात मोडणारा आहे, मात्र यात दिसून येणाऱ्या अर्थांना मूळ काव्याहून अधिक जबाबदार आहेत ते पटकथाकार नील गायमन आणि रॉजर एवरी. मूळ काव्यात कथानायक हा तीन दिव्यांमधून जाताना दाखवला आहे. सहाव्या शतकात डेन्मार्कमधल्या हरोथगार राजाच्या कारकिर्दीत हैदोस घालणाऱ्या ग्रेन्डेल या दानवाचा नायनाट, पुढे ग्रेन्डेलच्या आईचा वध आणि त्यानंतर अनेक वर्षांनी वृद्धापकाळात त्यानं एका ड्रॅगनशी दिलेला सामना, याचं वर्णन इथं दिसून येतं. शेवटच्या युद्धात नायक विजयी तर झाला; पण त्याच्या जखमा प्राणघातक ठरल्या. त्याला वीरमरण आलं.
बेओवुल्फ चित्रपटात हीच तीन साहसं आहेत. मात्र पटकथाकारांनी त्याला स्वतःचं तर्कशास्त्र लावलेलं आहे. काव्यामध्ये शक्य तितक्या नव्या जागा तर त्यांनी शोधल्याच आहेत, वर मुळात स्वतंत्र असलेल्या ड्रॅगनबरोबरच्या युद्धालाही बेमालूमपणे पूर्वार्धातल्या घटनांचा संदर्भ दिला आहे. अखेर यातून जे कथानक आकाराला आलं आहे, ते कितीतरी अधिक गुंतागुंतीचं अन् केवळ साहसपटाच्या कक्षेत न बसता मानवाच्या आदिम प्रवृत्तींवरच प्रकाश टाकणारं बनलं आहे.
चित्रपट सुरू होतो तो हरोथगारच्या (अँथनी हॉपकिन्सचा आवाज) दरबारात. रात्री इतर योद् ध्यांबरोबर मेजवानीत सामील असताना अचानक ग्रेन्डेल येऊन उभा ठाकतो आणि एकच हलकल्लोळ होतो. अनेकांचे प्राण जातात. प्रत्यक्ष राजाला मात्र तो हात लावत नाही. राजा या प्रसंगापासून धडा घेतो आणि ग्रेन्डेलच्या हत्येसाठी इनाम जाहीर करतो.
अनेक योद् ध्यांच्या मृत्यूनंतर बेओवुल्फ (रे विनस्टोन) राजाकडे येतो. वृद्ध राजाच्या तरुण राणीकडे (रॉबिन राईट पेन) नजर ठेवून तो राजाला दिलासा देतो आणि आव्हान स्वीकारतो. ग्रेन्डेलशी त्याच्याच पातळीला जाऊन सामना करण्यासाठी चिलखत सोडाच, अंगावरचे पूर्ण कपडे काढून सज्ज होतो आणि आपल्या वचनालाही जागतो.
ग्रेन्डेलच्या मृत्यूनं त्याची आई (अँजोलिना जोली) मात्र संतप्त होते आणि बेओवुल्फच्या बहुतेक सहकाऱ्यांना यमसदनाला धाडते. आता तिचा बळी घेण्यासाठी आसुसलेला हा महानायक तिच्या गुहेत आमनेसामने येतो. मात्र, प्रत्यक्षात तिच्या सौंदर्यानं दिपून जातो. पटकथाकार आपल्या आवृत्तीतला पहिला मोठा बदल या प्रसंगात करतात आणि एका साध्या वीरश्रीपूर्ण कथेला बदलून टाकतात.
मूळ काव्य अन् चित्रपट यांमध्ये होणारा मोठा फरक म्हणजे मूळचे खलनायक हे सरळ वाईट प्रवृत्तीचे आहेत अन् त्यांच्या विरोधात उभे राहणारे मानव हे शूर आहेत, सच्चे आहेत, धाडसी आहेत. चित्रपटात हे गणितच उलटंपालटं झालेलं आहे. इथल्या तीन मधल्या दोन दैत्यांच्या दैत्यपणाला माणसंच जबाबदार आहेत आणि तिसऱ्याबाबतही जबाबदारी विभागण्यात आलेली आहे. चित्रपटाच्या दृष्टीनं ग्रेन्डेल जरी दानव असला तरी त्याच्या हातून घडणारी दुष्कर्मं ही माफ करण्याजोगी आहेत. कारण त्याच्या हातून घडणाऱ्या गोष्टींवर त्याचा इलाज चालत नाही. याउलट राजाचा बाहेरख्यालीपणा, बेजबाबदारपणा, आपल्या वागण्याचे परिणाम न ओळखण्याची वृत्ती किंवा बेओवुल्फची आढ्यता, स्वार्थ यांना चित्रपट माफ करत नाही. कारण त्यांनी कसं वागावं, हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. इथले खलनायक ही इथली माणसंच आहेत आणि प्रत्यक्ष दानव नाममात्र.
झेमेकीसनं बेओवुल्फ ऍनिमेटेड का केला, हे मात्र मला नीटसं कळलेलं नाही. एक तर यातली युद्धांची किंवा मारमाऱ्यांची दृश्यं इतकी खऱ्यासारखी आहेत, की हे तुकडे खऱ्या, हाडामाणसांची नटमंडळी असलेल्या चित्रपटांतही जसेच्या तसे लागू शकले असते. नग्नता (जी इथं मोठ्या प्रमाणात आहे. हॉपकिन्स/ विनस्टोन तर कपड्यांशिवाय दिसतातच, तर अँजेलिना जोली प्रत्येक प्रसंगात विवस्त्रावस्थेत दिसते अन् काही महत्त्वाचे तपशील वगळता जशी एरवी पडद्यावर दिसते त्याच रूपात) अन् हिंसाचार यांना काही प्रमाणात आळा जरूर घालावा लागला असता, मग आशय सहीसलामत बचावला असताच. किंबहुना मग हा चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंतही पोचला असता.
काही असो, ज्यांनी केवळ या चित्रपटाच्या ऍनिमेटेड असण्यानं त्याच्याकडं पाठ फिरवली, त्यांनी आपल्या आवडीनिवडीबद्दल पुन्हा विचार जरूर करावा. कारण सध्या संगणकाला या क्षेत्रात आलेलं महत्त्व अन् तंत्रज्ञानाचा वरचष्मा पाहता या प्रकारच्या प्रयोगांचं प्रमाण वाढत जाईल, हे निश्चित. ज्याप्रमाणे संगणकीय खेळ हे दिवसेंदिवस लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून बनवले न जाता पंचवीस ते चाळीस वयाचे नोकरदार डोळ्यांसमोर ठेवून डिझाईन केले जातात, त्याचीच ही पुढली पायरी आहे. चित्रसृष्टी बदलते आहे. आपणही वेळीच बदलावं, हे बरं!

-गणेश मतकरी
(साप्ताहिक सकाळ २००७मधील लेखांमधून)

Read more...

रिस्टकटर्स ए लव्हस्टोरी - शेवटानंतरची गोष्ट

>> Tuesday, February 16, 2010

एक मुलगा आडवा पडून शुन्यात पहात असलेला. अचानक त्याचा काही विचार ठरतो. बाजूला वळून तो गाणं लावतो, मग उठतो. खोलीत प्रचंड पसारा. मुलगा खोली आवरायला लागतो. पडलेल्या वस्तू, कपडे जागेवर ठेवतो. टेबल आवरतो, कचरा काढतो, उद्धवस्त खोली आता छान टापटीप दिसायला लागते. मग मुलगा उभा दिसतो, तो खोलीच्या दुस-या टोकाला असलेल्या बाथरूममध्ये. तो काय करतोय हे नीटसं दिसत नाही. नंतर कॅमेरा दाखवतो तो त्याचा चेहरा. आपल्याला नक्की काय चाललंय ते कळण्याच्या आत सगळी शक्ती गेल्यासारखा मुलगा खाली कोसळतो. मग हळूहळू दिसतं ते गडद लाल रक्ताने भरलेलं वॉश बेसिन, त्यावर ठेवलेला रेझर आणि पांढ-या सिरॅमिकवर ओघळलेले रक्ताचे थेंब. खाली पडलेल्या मुलाला कोप-यात काहीतरी जळमटासारखं दिसतं, मात्र पुढे काही करण्याच्या आतच त्याचा प्राण गेलेला असतो. रिस्टकटर्स ए लव्हस्टोरी या (म्हटलं तर चमत्कारिक, पण चित्रपटाचं योग्य वर्णन करणा-या) नावाच्या सिनेमातला हा पहिलाच प्रसंग. चित्रपटाच्या इतर कुठल्याही प्रसंगाहून अधिक परिणामकारक आणि विचार करायला लावणारा. स्वतंत्रपणे या तुकड्यातून आपल्याला या मुलाच्या आत्महत्येचं कारण कळत नाही, मात्र ते काय असेल याची चुटपूट लागून राहते. त्याच्या खोलीवरून उघडच तो सुखवस्तू घरातला असल्याचं स्पष्ट होतं. मग या मुलावर असं काय संकट आलं असेल ? त्याला दुसरा पर्याय नसेल का ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. अत्यंत थोडक्यात, अन् कोणत्याही संवादा किंवा निवेदनाशिवाय प्रत्यक्ष दर्शनातून या विषयाची विदारकता आपल्यापुढे मांडणारा हा प्रसंग पाहणं, हे एवढं कारणदेखील रिस्टकटर्स पाहण्याकरीता पुरेसं ठरावं.
मेलेल्या नायकांनी केलेल्या निवेदनातून उलगडणारे चित्रपट कमी नाहीत. सनसेट बुलवार्डपासून अमेरिकन ब्युटीपर्यंत. मात्र मेल्यानंतरच्याच घटनांविषयी असणारे आणि पुन्हा पृथ्वीवरच्याच घाडामोडीत न अडकणारे चित्रपट तुरळक. व्हॉट ड्रिम्स मे कम हा थोडा फार अपवाद. रिस्टकटर्स मात्र दुस-या प्रसंगापासूनच पृथ्वीचा नाद सोडतो. अर्थात, याचा अर्थ तो स्वर्गात घडतो असाही नाही. तो घडतो एका नो मॅन्स लॅण्डमध्ये, जिथे आत्महत्या करणारे लोक मृत्यूनंतर पोहोचतात. दिसायला हे जग पृथ्वीहून फार वेगळं नाही. थोडं अधिक रंगहीन, थोडं अधिक कंटाळवाणं, थोडं अधिक गरीब, पण तेवढंच.
पहिल्या प्रसंगात आत्महत्या केलेल्या झिया (पॅट्रीक फ्युगिट) या जगात एका पिझ्झा पार्लरमध्ये नोकरी धरतो. लवकरच त्याची युजीनशी (शिआ विगहॅम) मैत्री होते. युजिनच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी आत्महत्या केल्याने तो इतरांसारखा एकटा दुकटा न राहता भरल्या घरात राहत असतो. अपघाताने झियाला कळतं, की आपल्या आत्महत्येचं कारण असलेल्या डेझरीने (लेझ्ली बिब) देखील आत्महत्या केलेली आहे. डेझरीला शोधायला बाहेर पडलेल्या झियान अन् युजीनची गाठ पडते मिकालशी. मिकाल (शॅनीन सोसामोन) या चमत्कारित जगाच्या कर्त्याधर्त्याच्या शोधात आहे. आपलं येथे येऊन पोचणं, ही तिच्या दृष्टीने चूक आहे, अन् ती सुधारण्याचा दुसरा मार्ग तिला सापडलेला नाही.
रिस्टकटर्सची संहिता विविध चित्रप्रकारांशी नातं सांगणारी, पण शेवटचा निर्णय दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनावर सोपवणारी आहे. एकतर आत्महत्या अन् आफ्टरलाईफ या दोन अतिशय गंभीर गोष्टींशी संबंध असून, ती तशी गंभीर नाही. केवळ जेनरीक विचार केला, तर रोड मुव्ही, ब्लॅक कॉमेडी आणि प्रेमकथा या तीन प्रकारांशी तिचं जवळचं नातं आहे. तिच्यात उघड फँटसी एलिमेंट आहे. मात्र तो निर्णायक घटक नाही. चार्ली कॉफमनच्या बीईंग जॉन मालकोविच किंवा इटर्नल सनशाईन आँफ स्पॉटलेस माइन्डमध्ये ज्याप्रमाणे संहितेतल्या चमत्कृतीला दिग्दर्शकांनी वास्तववादी चष्म्यातून पाहिलं होतं. तसंच इथे दिग्दर्शक गोरान ड्युकिक पाहतो. त्यामुळेच पृथ्वी/स्वर्गापलीकडल्या जगालाही केवळ रंगबदलातून दाखवणं किंवा युजीनच्या गाडीतल्या कृष्णविवराला तेवढ्यापुरत्या स्वतंत्र शॉट्सच्या इन्टरकटमधून दाखवून देणं अशा साध्या योजना केलेल्या दिसतात. अर्थात इथे हे मार्ग शोधण्याचं कारण मर्यादित बजेट आहे, हे कुठेच लपत नाही.
झियाने चालवलेला डेझिरीचा किंवा मिकालने चालवलेला ऑथिरिटीचा शोध जो संपूर्ण चित्रपटाला आकार देतो. तो शेवटासाठी पुरेसा कन्क्लुजिव ठरत नाही. जे एकूण परिणामाच्या दृष्टीने आवश्यक आहे. या दृष्टीने कॉफमनच्या सिनेकड़की न्यूयॉर्क सोडून इतर संहिता अभ्यासण्याजोग्या आहेत. आशय कितीही चमत्कारिक असला, तरी तो शेवटापर्यंत नवा अन् प्रभावी भासवत राहणं सोपं नाही. दृश्य, चमत्कृती शिवाय तर नाहीच. तरीही, जर शेवटचा प्रसंग तर्कशुद्ध असता, तर रिस्टकटर्सला एक वजन जरूर आलं असतं. बहुतेकदा हे शेवट लेखकांनी फार हुशारीने ठरवण्याची गरज असते. (काही वर्षांपूर्वी आलेल्या जस्ट लाईक हेवन या माणूस आणि तथाकथित भूताच्या रोमान्सला हॅपी एन्डिंग किती चतुराईने दिलं होतं. त्याची आठवण, इथला फसलेला प्रसंग पाहून व्हावी.) इथे तो अशारीतीने होतो की चित्रपटाच्या रचनेबाबत काही मुलभूत शंका तयार व्हाव्यात.
अखेर रिस्टकटर्स सर्वात परिणामकारक ठरतो तो त्याने वेळोवेळी दाखविलेल्या आत्महत्यांच्या स्टेज्ड, भडक नसणा-य़ा पण तरीही अंगावर येणा-या फ्लॅशेसमध्ये आणि दोन जगांमध्ये वेळोवेळी केलेल्या तुलनांमध्ये. हा भाग थोडका अन् विदारक असला, तरी अभिरुचीपूर्ण आहे आणि नुसत्या गोष्ट सांगण्यापलीकडे जाऊ पाहणारा. आपल्या सध्याच्या वातावरणात तर खोलवर परिणाम करून जाणारा


- गणेश मतकरी

Read more...

मिसप्लेस्ड फिलॉसॉफी आणि अप इन द एअर

>> Friday, February 5, 2010


ए फिलॉसॉफिक सिस्टिम इज अ‍ॅन इन्टीग्रेटेड व्ह्यू ऑफ एक्झिस्टन्स. अ‍ॅज ए ह्युमन बीईंग, यू हॅव नो चॉईस अबाउट द फॅक्ट दॅट यू नीड ए फिलॉसॉफी. युअर ओन्ली चॉईस इज वेदर यू डिफाइन युअर फिलॉसॉफी बाय कॉन्शस, रॅशनल, डिसिप्लीन्ड प्रोसेस ऑफ थॉट... ऑर लेट यूअर अनकॉन्शस अ‍ॅक्युमलेट ए जन्क हीप ऑफ  अनवॉण्टेड कन्क्लूजन्स. 
- अ‍ॅन रॅण्ड (फिलॉसॉफीः हू  नीड्स इट)                                                                                                                        

धूम्रपानाचा खंदा पुरस्कर्ता असणारा निक नेलर, पंधराव्या वर्षी गरोदर राहून गर्भपाताला नकार देणारी जुनो मॅकगफ आणि नोकरदारांना डाऊनसाईड करण्याचीच नोकरी असणारा रायन विन्गहॅम या तिघांमध्ये आढळणारं साम्य काय हा प्रश्न, जेसन राईटमनच्या चित्रपटांचं मर्म काय हे ओळखण्याकडे निर्देश करेल हे नक्की. ज्यांना वर सांगितलेली नावं ओळखीची वाटणार नाहीत त्यांच्या सोयीसाठी सांगतो की या राईटमनने आजपर्यंत दिग्दर्शित केलेल्या तीन चित्रपटांमधला प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. अनुक्रमे थँक यू फॉर स्मोकिंग (२००६), जुनो (२००७) आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या (भारतात लवकरच प्रदर्शित होणा-या) अन् अनेक पुरस्कारांसाठी स्पर्धेत असलेल्या `अप इन द एअर` या चित्रपटांचे दोन नायक अन् एक नायिका. हे बहुतांश चित्रपटांमधल्या व्यक्तिरेखांपेक्षा एका मूलभूत बाबतीत वेगळे आहेत. तो वेगळेपणा म्हणजे या तिघांनाही जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे.
सामान्यतः आपण चित्रपट पाहिले, तर व्यक्तिरेखा या प्लॉट ड्रिव्हन असतात. त्यांचा विचार खरं तर पटकथाकार किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून आलेला आहे हे जाणवण्यासारखं असतं. या चित्रपटाहून वरचा दर्जा असतो, तो व्यक्तिरेखा अस्सल वाटणा-या चित्रपटांचा. इथे पात्रांचं वागणं अधिक उस्फूर्त असतं. काही योजनाबद्ध शेवटाकडे जाण्याची त्यांची धडपड ही जाणवण्याजोगी नसते. राईटमनची पात्रं मात्र केवळ उस्फूर्त असण्यात समाधान मानत नाहीत. तर त्यांच्या विचारांची एक स्पष्टपणे कळण्याजोगी बैठक प्रेक्षकांपर्यंत पोचवतात. त्यांचे विचार अमुक दिशेने का जातात, त्यांनी तमुक गोष्ट करण्यामागे कोणती विचारप्रक्रिया असेल, एखाद्या प्रसंगाला ते काय पद्धतीने रिअ‍ॅक्ट करतील, हे सगळं एका निश्चित तात्त्विक चौकटीत बसलेलं इथे पाहायला मिळतं. चित्रपटांसारख्या करमणूक प्रधान अन् विशिष्ट कालमर्यादेत आपले विचार मांडणा-या माध्यमासाठी या प्रकारचं व्यक्तिमत्त्व दर्शन हे दुर्मिळ आहे.
एकदा का या पात्रांना ही बैठक असणं गृहीत धरलं, की मग ते तत्त्वज्ञान योग्य असेलच याची खात्री मात्र देता येणार नाही. अ‍ॅन रॅन्ड सारख्या तत्त्वज्ञान अन् स्टोरीटेलिंग एकत्र करणा-या लेखिकेच्या कादंब-यांत आपल्याला (सुरुवातीच्या उधृतात दिल्याप्रमाणे) योग्य अन् बेगडी या दोन प्रकारच्या फिलॉसॉफीज दिसून येतात, मात्र तिचे नायक हे कायम योग्य मार्गाचेच पुरस्कर्ते राहतात. राईटमनला योग्य तत्त्वज्ञान स्वतंत्रपणे रिप्रेझेन्ट करणारी पात्र असण्याची गरज वाटत नाही. मात्र प्रेक्षकांपर्यंत बेगडी तत्त्वज्ञानातल्या त्रुटी स्पष्टपणे पोचतील असं मात्रं तो पाहतो. ज्यांनी राईटमनच्या फिल्म्स पाहिल्या नाहीत त्यांना या वर्णनावरून, हे फार गंभीर प्रकरण वाटण्याची शक्यता आहे. तसं मात्र नाही. स्मोकिंग,जुनो आणि एअर या तीन्ही चित्रपटांमध्ये विनोदाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे करमणूक प्रधान अन् वैचारिक असं काहीसं हे समीकरण आहे.
अप इन द एअर मधला रायन बिन्गहॅमला (जॉर्ज क्लूनी) घर आहे. मात्र असून नसल्यासारखं. कारण त्या घरात तो जवळ जवळ नसतोच. त्याला जवळचे कोणी मित्र नाहीत. आपल्या दोन बहिणींनाही तो अनेक वर्षे भेटलेला नाही. त्याची नोकरी आहे ती अमेरिकाभर फिरण्याची. रिसेशनमुळे सर्वत्र ज्या लोकांना कामावरून कमी केलं जातंय त्या लोकांना ही वाईट बातमी देण्याची. पुढल्या दिवसांकरीता त्यांच्या मनाची तयारी करण्याची जबाबदारी रायनची कंपनी घेते. रायन शेकडो लोकांना ही बातमी सांगत या शहरातून त्या शहरात, या विमानतळावरून त्या विमानतळावर फिरत राहतो. हा प्रवास हेच त्याचं आयुष्य झालेलं. एक कोटी फ्रिक्वेन्ट फ्लायर माईल्स मिळवणं ही महत्त्वाकांक्षा झालेली. हे सारं जस्टीफाय करणारी एक विचारसरणीही त्याने तयार केलेली. कमिटमेन्टपासून, स्थैर्यापासून, लोकांच्या संपर्कापासून,खरं तर आयुष्यापासूनच पळत राहणं हेच त्याला योग्य वाटायला लागलेलं.
मात्र या विचारसरणीला, या जीवनपद्धतीला धक्का लागेलसं काही घडतं, ते नव्यानेच त्याच्या जीवनात आलेल्या दोन स्त्रीयांमुळे. यातली अ‍ॅलेक्स (व्हेरा फर्मिंगा) त्याच्यासारखीच सतत प्रवास करणारी. विविध विमानतळांवर भेटीगाठी घेत तिच्याबरोबर रायनचं माफक प्रेमप्रकरण चालू होतं. दुसरी नॅटली (अ‍ॅना केन्ड्रीक) त्याच्या जीवनपद्धतीलाच सुरुंग लावण्याच्या तयारीत येते. नुकत्याच शिक्षण पूर्ण केलेल्या नॅटलीने प्रत्यक्ष प्रवास न करता इन्टरनेटवरूनच लोकांना फायर करण्याची नवी कल्पना काढली आहे, जी रायनच्या कंपनीत विचाराधीन आहे. रायन नॅटलीच्या कल्पनेचा जाहीर निषेध करून तिला त्याच्या कामाचं स्वरुपच न कळल्याचा आरोप करतो. ते समजून घेण्यासाठी नॅटली रायनबरोबर त्याच्या पुढल्या असाइनमेन्टवर निघते आणि...
अप इन द एअर ज्या मार्गांनी जाईल अशी आपण अपेक्षा करतो ते मार्ग तो घेत नाही. सोप्या सिच्युएशन्स, उघड संघर्ष तो टाळत जातो. वॉल्टर कर्नची याच नावाची कादंबरी काही मी वाचलेली नाही, पण कादंबरीत संकेत टाळण्यापेक्षा चित्रपटात संकेत टाळणं हे अधिक कठीण असतं. त्यामुळे दिग्दर्शक अन् पटकथाकार (राईटमन आणि शेल्डन टर्नर) यांचं श्रेय आपण काढून घेऊ शकत नाही.
रचनेच्या दृष्टीने तो थँक यू फॉर स्मोकिंगच्या बराच जवळचा आहे. वरवर पाहता चुकीची वैचारिक भूमिका ठामपणे आचरणात आणणारा नायक त्याच्या आयुष्यात ती भूमिका योग्य असल्याचा आभास करत नेणारे टप्पे आणि एका क्षणी तिचं कोलमडून पडणं हे सूत्र या दोन्ही चित्रपटांना लागू पडतं. पण अप इन द एअर हा वास्तवाशी अधिक घट्ट बांधलेला आहे. पहिली उघड गोष्ट म्हणजे त्याला असणारी रिसेशनची पार्श्वभूमी अतिशय खरी आहे. किंबहूना यात नोकरीवरून काढून टाकले जाताना दिसणारे अनेक जण हे प्रत्यक्षात रिसेशनचे बळी आहेत. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची जबाबदारी टाळणा-या रायनची व्यक्तिरेखा रुपकाच्या पातळीवर असली तरीही सामान्यतः पहायला मिळणा-या एका टाईपची प्रतिनिधी आहे.
अप इन द एअरमधला विनोद हा कुठेही परिस्थितीची टिंगल करताना दिसत नाही, तर बहुतांशी तो रायनच्या व्यक्तिरेखेमधल्या विसंगतीशी जोडलेला आहे. क्वचित तो प्रासंगिक होतो. (उदाहरणार्थ नॅटलीचा टेक्स्ट मेसेजवरून होणारा ब्रेक अप) पण चित्रपट तेव्हा विनोदावर न रेंगाळता एकूण परिस्थितीकडे त्रयस्थ दृष्टीकोन टाकताना दिसतो.
विनोदाचं प्रमाणही शेवटाकडे कमी होत जातं आणि आशय अधिक गंभीर रुप घेतो. मात्र शेवटदेखील संपूर्ण ट्रीटमेन्टप्रमाणेच परिचित वळण घेत नाही. सांकेतिक हॅपी एन्डींग करण्याचा मोह दिग्दर्शकाला झाला असल्यास नवल वाटणार नाही. तो तसा नाही, हे दिग्दर्शकाला ही व्यक्तिरेखा खरोखर अन् पूर्णपणे कळल्याचं चिन्ह म्हणता येईल. क्लूनी अन् राईटमनच्या अधिकाधिक भक्कम होत गेलेल्या फिल्मोग्राफीमध्ये अप इन द एअर ही महत्त्वाची भर म्हणता येईल.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP