द फ्युचर- अस्वस्थ वर्तमानाची साद

>> Monday, January 2, 2012

पट्टीचे चित्रपट रसिक म्हणतात ,की चित्रपटाची सुरुवात चुकवू नये. म्हणजे ’ती चुकवू नये ’असा धमकीवजा इशारा जाहीरातीतून देणा-या रहस्यपटांचीच नव्हे, तर कुठल्याच. चित्रपट जर चांगला असेल आणि दिग्दर्शक आपल्या कामाकडे पुरेशा गंभीरपणे पाहाणारा असेल तर त्याची चुणूक आपल्याला या पहिल्या काही मिनीटातच दिसून येते. बहुधा पहील्या फ्रेमपासूनच.पुढे येणा-या चित्रपटाची ही पहिली ओळखच आपल्याला त्याविषयी बरंच काही सांगून जाते, तीदेखील प्रत्यक्षात काहीच न सांगता. अमेरिकन ’इन्डी’ दिग्दर्शिका मिरांडा जुलाईच्या ’द फ्युचर’ मधे तर ही ओळख होण्यासाठी पहिली फ्रेम दिसण्याचीही गरज पडत नाही.
भारतीय प्रेक्षक ,हा अमेरिकन चित्रपटाचं नाव हे बहुधा खपाऊ हॉलीवूडशी नेउन जोडतो, पण ते योग्य असतंच असं नाही. आपल्याकडल्या वितरणव्यवस्थेच्या सतत धंद्याचा विचार करुन ब्लॉकबस्टरी वळणाचे चित्रपट आणण्याने ,अमेरीकन सिनेमा म्हणजे डोक्याचा फार वापर आवश्यक नसलेली बुध्दिभ्रष्ट पण पैसे वसूल करमणूक असा एक समज जरुर रुढ झाला आहे, मात्र तो पूर्ण बरोबर नाही. हॉलीवूडच्या चौकटीत राहूनही अर्थपूर्ण चित्रपट देणारे त्याचप्रमाणे भारतीय समांतर सिनेमाच्या वळणाने जाणा-या अमेरिकन इन्डीपेन्डन्ट सिनेमात महत्वाची कामगिरी बजावणारे अनेक दिग्दर्शक आहेत. जुलाई त्यातलीच एक.भवतालच्या वास्तवाकडे, या घडीला बनत्या -मोडत्या नव्या -जुन्या नात्यांमधे अर्थ शोधण्याची, आपल्या चौकस परंतू विक्षिप्त नजरेतून पाहाण्याची तिला वाटणारी निकड, हाच तिचा सिनेमा. २०११ मधे पडद्यावर आलेला ’द फ्युचर’ हा तिचा दुसरा चित्रपट. २००५ च्या ’मी अ‍ॅन्ड यू अ‍ॅन्ड एव्हरीवन वुई नो’ या कॅन चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट प्रथम निर्मितीसाठी पारितोषिक मिळवणा-या अनपेक्षित चित्रपटानंतर ,तब्बल सहा वर्षांनंतर केलेला.
जुलाईची माहिती नसणा-यांसाठी आणि वेगळे चित्रपट पाहाण्याची सवय नसलेल्यांसाठी ’फ्युचर’ हे नाव प्रत्यक्षात योग्य असूनही दिशाभूल करणारं, आणि विज्ञानपटाचा आभास तयार करणारं आहे. त्याचा या चित्रपटापुरता संबंध कोणत्याशा अगम्य भविष्यकाळात घडणा-या कल्पित साहसाशी नसून आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातल्या नजिकच्या भविष्यकाळाशी आहे.आपल्या सर्व अडचणी सोडवणारं, आपला सुखाचा शोध संपवणारं आदर्श भविष्य- ज्याची प्रतिक्षा तर सर्वांनाच असते, पण त्याकडे पोहोचण्याचा मार्ग कुठेसा हरवून गेलेला असतो.अर्थात नावाने जरी ही सायन्स फिक्शन असल्याचा गैरसमज झाला तरी चित्रपट सुरु होताक्षणीच तो विरायला लागतो . आधी म्हणाल्याप्रमाणेच ,पहिली फ्रेम पडद्यावर येण्याआधीच.
’द फ्युचर’ ची सुरुवात दृश्याने होत नाही तर आवाजाने होते. हे निवेदन म्हंटलं तर चित्रपटातल्या विश्वाशी जोडलेलं आहे . ते करणारं पात्र कथानकाशी संबंधित आहे ,पण तथाकथित प्रौढ प्रेक्षकवर्गासाठी असणा-या चित्रपटात त्याचं असणं ,हेच माफक दचकवणारं. हा निवेदक आहे एक मांजर, एक पंजा जायबंदी झालेलं. रस्त्यावर एकटंच वाढलेलं.निवेदनात कळतं ,की महिन्याभराने त्याला आपल्या घरी आसरा देण्याची एका जोडप्याने तयारी दाखवली आहे. हे जोडपं म्हणजे सोफी (स्वत: जुलाई) आणि जेसन (हमिश लिन्कलेटर).चित्रपटाची पहिली  फ्रेम उजळते ,ती याच दोघांवर. सुरुवातीचं निवेदन, ही फ्रेम आणि या छोट्या प्रसंगातलं संभाषण आपल्याला चित्रपट, त्याची दिग्दर्शिका आणि तिची शैली यांचा परिचय करुन देण्यासाठी पुरे आहेत.
एक मोठीशी खिडकी अन समोर ठेवलेला ऐसपैस सोफा , यांनी ही फ्रेम जवळजवळ पूर्ण भरलेली. समोरच एक सेन्टर टेबल , ज्यावर एकदोन बशा , ग्लास , वगैरे. सोफ्याच्या एका बाजूला काही झाडं ठेवलेली. सोफ्यावर गर्दी करुन सोफी आणि जेसन बसलेले.समोरासमोर तोंड करुन, सोफ्याच्या हातांवर रेलून, पाय जवळपास एकमेकांच्या मांडीवर. सोफीजवळ तिचा आवडता पिवळा टी-शर्ट. मात्र असं चिकटून बसूनही त्यांचं संभाषण सुरु नाही. प्रत्येकाच्या हातात आपापला लॅपटॉप अन त्यातच ते रमलेले. सोफ्यापलीकडे त्याच्या लॅपटाप्सच्या पॉवर कॉर्ड्सही दिसतात. ही दृश्यचौकट, प्रमुख पात्रांची पोज, त्यांचं दिसणं, हे संवादाखेरीजच त्यांचा परिचय करुन देणारं. आपापली विश्वं कम्पार्टमेन्टलाइज करुन सहजीवनातही स्वातंत्र्य जपण्यासाठी धडपडणा-या आधुनिक शहरी जोडप्यातलंच हे एक. संस्कृतीपेक्षा काळाशी अधिक जोडलेली अशी जोडपी आज सर्व देशात पाहायला मिळतात. आपल्याही.
पुढे थोडं बोलणं सुरु होताच त्यांच्या (अन दिग्दर्शिकेच्याही) विचारांमधली चमत्कृती दिसायला लागते. जागचं न हालता बसल्या जागी पाणी मिळण्यासाठी घरगुती क्रेनची स्वप्न पाहीली जातात, आणि जेसन आपल्या शक्तीचा प्रयोग करुन प्रत्यक्ष काळ थांबवून दाखवतो. खराखुरा नाही ,गंमतीत. निदान या प्रसंगात तरी ,केवळ गंमतीत.
सोफी आणि जेसन तिशीत आहेत, करीअरचा निर्णय न घेता आरामात जगण्याएवढे तरुण नाहीत. दोघंही नोक-या करतात, पण त्या गरज म्हणून. दोघांच्या महत्वाकांक्षा वेगळ्याच आहेत.कॉल सेंटरचं काम करणा-या त्याला अजून काय करायचंय हेच स्पष्ट नाही, तर लहान मुलांची नृत्यशिक्षिका असलेल्या तिला इन्टरनेटच्या मदतीने आपल्या कक्षा रुंदावायच्या आहेत. आजवर बघूया ,करुया म्हणून फारसं काहीच नं केलेल्या या दोघांना , महिन्याभरात घरी येणा-या मांजराच्या रुपाने एक निश्चित डेडलाईन मिळते आणि दोघे महिन्याभरातच आपल्या भविष्याचा प्रश्न धसाला लावायचं ठरवतात. अर्थात, असं ठरवून सोडवण्याइतका ,हा प्रश्न सोपा थोडाच असतो?
हा ,किंवा या दिग्दर्शिकेचा कोणताही चित्रपट समजून घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी , आणि ती म्हणजे कोणतीही गोष्ट शब्दश: ,दिसेल तशी घ्यायची नाही.दृश्य रुपाच्या जोरावर त्यातले प्रसंग वास्तवाचा आभास निर्माण करत असले तरी प्रत्यक्षात ते शक्यतेच्या कोटित बसणा-या घटना, रुपकं, प्रतिकात्मकता आणि संपूर्ण फॅण्टसी यांचं एक गंमतीदार ,पण विचार करायला भाग पाडणारं मिश्रण असतं. उदाहरणार्थ , मांजर पाळण्याच्या दबावाखाली कोणी आयुष्याचे निर्णय घेणार नाही हे खरं, पण खरोखरंच आयुष्याचा पुन:विचार करायला भाग पाडणारे क्षण आयुष्यात येऊ शकतात हे काही खोटं नाही. चित्रपटात पुढे निर्णय घेणं टाळण्यासाठी जेसन खरोखरंच काळ थांबवतो , किंवा आपलं घर अचानक सोडून परक्याबरोबर राहायला लागलेल्या सोफीचा माग काढत तिचा आवडता पिवळा टी-शर्ट तिच्या नव्या घरी पोहोचतो, किंवा पूर्वी नृत्य शिक्षिका असणारी सोफी रिसेप्शनिस्टची नोकरी करायला लागताच येणा-या एका प्रसंगात तिच्या परीचितांची मुलं अक्षरश: तिच्या डोळ्यांसमोर लहानाची मोठी होतात.हे सारे प्रसंग एका परीने फँटसी वळणाचे ,पण वास्तव स्पष्टीकरणाची अपेक्षा न करता केलेला थोडा विचार ,आपल्याला त्या प्रसंगांमागच्या युक्तीवादाकडे घेऊन जाऊ शकतो. इथे महत्वाचा , तो हा युक्तीवादच.
निवेदनात हजेरी लावणारं मांजर पुढे वेळोवेळी आपल्याला भेटत राहातं, दोन पंजांच्या (त्यातला एक प्लास्टरमधे)रुपात , निवेदनातल्या चमत्कृतीपूर्ण निरीक्षणांसह.कारण अखेर त्याचं भविष्यही सोफी-जेसनशी जोडलेलं आहे. जर त्या दोघांना भविष्यच नसेल तर मांजराच्या भविष्यातही अंधारच असेल ,नाही का ?
दिग्दर्शिकेची शैली ही काहिशी विनोदी आहे. पण हा विनोद काही खो,खो हसवणारा नाही. त्यात स्वत:च्या निरीक्षणाबाबत वाटणारी गंमत आहे, प्रेक्षकांवर दाखवलेला विश्वास आहे, विचारांमधली स्पष्टता आहे. मात्र विनोदाचं प्रमाण चित्रपटाच्या उत्तरार्धात कमी होतं. राहतं ते आशयाचं गांभीर्य, त्याचा टोकदारपणा. चित्रपट संपल्यावरही हे गांभीर्य आपल्याभोवती रेंगाळत राहातं.हळूहळू आपणही आपल्या आजवरच्या वाटचालीचा विचार करायला लागतो. आपल्या भविष्याला जबाबदार असणारा आपला वर्तमान तपासून पाहायला लागतो. या हलकेच दाटून येणा-या अस्वस्थतेतच ’द फ्युचर’ची खरी ताकद दडलेली आहे.
- गणेश मतकरी 


(दीव्य मराठीमधील नवीन सदरातून) 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP