झीरो डार्क थर्टी- आजचा इतिहास
>> Sunday, January 27, 2013
यंदाच्या आँस्कर स्पर्धेत आपल्याला दोन चित्रपट असे पाहायला मिळतात ,जे अमेरिकन हेरगिरीच्या इतिहासातल्या दोन घटनांवर आधारलेले आहेत. या दोन्ही सत्य घटना मुस्लीम राष्ट्रांमधे घडलेल्या असल्या तरी त्यांच्या वजनात मात्र बराच फरक आहे. १९८० च्या सुमारास इराणच्या कनेडीअन अँम्बेसेडरच्या घरात लपलेल्या सहा अमेरीकन नागरिकांना वाचवण्याची बेन अँफ्लेकच्या 'आर्गो' मधली घटना ही महत्वाची असली तरी छोटेखानी आहे. या तुलनेत कॅथरीन बिगेलोच्या 'झिरो डार्क थर्टी' मधली घटना फारच मोठी, ओसामा बिन लादेनचा अंत घडवत दहशतवादविरोधी लढ्यातला एक मोठा अध्याय संपवणारी आहे. दोन्ही चित्रपटांचे शेवट हे ऐतिहासिक नोंदीचाच भाग असल्याने अमेरिकन हेरांच्या योजनेचं यशापयश हे या चित्रपटांमधलं रहस्य नाही, तर योजनेचे तपशील, ती पार पाडताना आलेल्या अडचणी आणि त्यावर काढण्यात आलेले मार्ग हा खरा उत्कंठावर्धक भाग आहे. विशेष गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपट उत्तम असूनही दोन्ही दिग्दर्शकांनी चित्रपटाला आकार देताना संकल्पनेच्या पातळीवर घेतलेले निर्णय हे परस्परविरुध्द आहेत. आर्गोने महत्व दिलंय ते प्रत्यक्ष योजनेला, घटनांना . त्यामुळे त्यातली कोणतीही व्यक्तिरेखा ( अगदी अँफ्लेकची स्वतःची, सुटकेची जबाबदारी घेणा-या हेराची सुध्दा) केंद्रस्थान घेऊन स्वतःकडे अधिक लक्ष वेधून घेत नाही. याउलट झीरो डार्क थर्टी मधल्या घटना या व्यक्तीपुढे दुय्यम आहेत. प्रामुख्याने हे व्यक्तिचित्र आहे ते माया (जेसिका चेस्टेन) या नावाने चित्रपटात दिसणार््या सीआयए आँपरेटीवचं. चित्रपट घटना मांडतो त्या तिच्या दृष्टीकोनातून. याचा अर्थ असा नाही ,की तिच्या अपरोक्ष घडणा-या घटना आपल्याला दाखवल्या जात नाहीत. त्या जातातच, मात्र तिच्या लेखी त्या घटनांना, त्यांच्या परिणामांना असणारं महत्व जोखून. शेवटचा, लादेनच्या हत्येच्या मिशनचा प्रसंग हा पूर्णपणे तिच्या गैरहजेरीत घडतो कारण ती इन्टेलिजन्स आँपरेटीव असल्याने या प्रकारच्या कामगिरीवर जाणं शक्य नाही. हा भाग प्रेक्षकांच्या खास इन्टरेस्टचा असल्याने ,आणि घटनाक्रमातही फार महत्वाचा असल्याने चित्रपटातून गाळणंही शक्य नाही. इथे तिचं या संदर्भातलं महत्व अधोरेखित केलं जातंच. प्रत्यक्ष कामगिरी चालू असताना तर आपण पुन्हा पुन्हा तिच्याकडे जातोच , वर हा भाग संपल्यावरही चित्रपट तिच्याबरोबरच राहातो.
घटना या प्रकारे मांडण्याचे दोन फायदे आहेत. एक तर हा इतिहास खूपच नजिकचा आणि त्यामानाने वादग्रस्त आहे. तोही केवळ एका विशिष्ट बाजूने, जेत्याच्या बाजूने मांडण्याचा. त्यामुळे केवळ अमेरिकन विजय मांडला तर तो एकतर्फी होण्याची वा त्यावर इतर देशांकडून टिका होण्याची शक्यता अधिक. या मार्गाने आपल्याला आॅब्सेशन दिसतं ते देशाचं नाही, तर व्यक्तिचं. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या लढ्याला मानवी चेहरा मिळतो. अरेरावीने जग काबीज करायला निघालेल्या महासत्तेने एका छोट्या देशातल्या व्यक्तीला कायदे न जुमानता पकडणं हे एरवी अमेरिकेच्या प्रतिमेला फारसं शोभून दिसलं नसतं. इथे आपल्यावर ठसतो तो अमेरिका विरुध्द लादेन हा नाही तर माया विरुध्द लादेन हा संघर्ष. जागतिक राजकारणाची वादग्रस्तता बाजूला ठेवून हे पचवून घेणं प्रेक्षकाला अधिक पटण्यासारखं आहे.
दुसरा फायदा आहे तो एक चांगली व्यक्तिरेखा घडवत नेण्याची संधी चित्रकर्त्यांना आणि पाहाण्याची संधी आपल्याला मिळण्याचा. माया खरी कोण किंवा कशी आहे हे आपल्याला कळायला मार्ग नाही. कारण चित्रपटाची पटकथा जरी आधारासाठी घटनेचा सरकारी वृत्तांत वापरत असली आणि त्यात चित्रकर्त्यांच्या स्वतःच्या सोर्सेसकडून कळलेला, जनतेपर्यंत न पोचलेला तपशील भरत असली,तरी मायाची आेळख ही गोष्ट अशी आहे की तिच्या आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ती लपवण्यावाचून पर्याय नाही. आपण फक्त हे जाणतो, की अशी अशी एक स्त्री या विजयाला जबाबदार होती. तिला चेहरा देण्याचं श्रेय मात्र चेस्टेन या अचानक स्टार झालेल्या अभिनेत्रीचं. तिला गोल्डन ग्लोब तर मिळालेलंच आहे. आॅस्कर मिळण्याची शक्यताही खूपच.
दिग्दर्शक कॅथरीन बीगेलो आणि लेखक मार्क बोल ही 'द हर्ट लॉकर' मागची टीम या चित्रपटामागे आहे हे चित्रपटाच्या टेक्श्चरमधे जागोजागी जाणवतं. युध्दग्रस्त परिस्थितीला एकेकाळी चित्रपटात मिळणारं ग्लॅमर 'सेव्हींग प्रायवेहट रायन'ने काढून टाकलं त्याला आता खूपच वर्ष झाली पण त्या एका मोठ्या पावलावर खूश होऊन चित्रकर्ते थांबले नसल्याची लक्षणं अलीकडच्या युध्दपटांमधे दिसतात. बिगेलो/ बोलचे हे दोन्ही चित्रपट त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांची निवेदनशैली देखील आता अधिकाधिक साधी , कथनापेक्षा नोंदी घेणारी ,निरीक्षणं मांडणारी झाली आहे. हॉलीवूडला करमणुकप्रधान या लेबलाखाली टाकून दुर्लक्ष करणा-या आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय आपल्या चित्रपटांशी तुलना करणा-यांनी असे चित्रपट पाहाण्याची गरज आहे. या चित्रपटातला वास्तववाद कोणत्याही प्रकारे पाणचट करण्याचा प्रयत्न इथे झालेला नाही. किंबहुना त्याचं असं रॉ असणं , अस्सल वाटणं यातच त्याचं खरं नाट्य लपलेलं आहे.
झीरो डार्क थर्टीचा काळ मोठा आहे. ११ सप्टेम्बर २००१ च्या हल्ल्याचं ध्वनिमुद्रण तो सुरुवातीलाच ऐकवतो आणि त्यानंतर दोनेक वर्षांनी मुख्य कथानक सुरू करतो, ते मायाच्या पाकिस्तानमधल्या अमेरीकन छावणीत दाखल होण्यापासून. ही तरुण माया या पोस्टींगमुळे फार खूश नाही. टॉर्चरच्या सरसकट वापराने ती बिचकते ,मात्र हे करणं आवश्यक आहे याबद्दल तिच्या मनात तिळमात्र शंका नाही. छोट्या छोट्या प्रकरणांमधे विभागलेला आणि आेसामा बिन लादेनच्या पाठपुराव्यातले महत्वाचे टप्पे अधोरेखित करणारा पुढल्या दहा एक वर्षांचा काळ हा मायाच्या व्यक्तिमत्वातले बदलही अधोरेखित करणारा आहे. तिचं अधिक कठोर होणं, निर्ढावत जाणं, सहकार््यांपासून या ना त्या मार्गाने येत गेलेला दुरावा़, लादेनच्या मागाने झपाटून जाणं, वरिष्ठांनाही धाक वाटेल इतकी व्यक्तिमत्वाला धार येणं, आणि अखेर या कामात इतकं गुरफटणं की ते काम संपल्यावर तिला दुसरं आयुष्यच उरु नये , असा हा सारा प्रवास आहे. त्यामुळेच चित्रपटाचा विचार केवळ एका मिशनमधलं यश, वा अमेरिकेची विजयगाथा अशा उघड आणि सरधोपट पातळीवर करणं शक्य नाही. यातला विजय हा महत्वाचा आहे, पण त्यानंतर मायाला जाणवणारी पोकळी या विजयाला जवळजवळ दुय्यम महत्व आणून देते. या लढ्यात व्यक्तिगत आयुष्य हरवून बसलेल्या अनेकांच्या आयुष्याचं प्रातिनिधीक चित्र उभी करते.
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं आँस्कर मिळेल का नाही हा प्रश्न तसा दुय्यम आहे. तो ते मिळण्यासाठी लायक आहे यात शंकाच नाही. पण त्याचं वादग्रस्त असणं त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला असलेला सरकारी पाठिंबा आणि त्यातून काढले जाणारे राजकीय अर्थ ,त्याचबरोबर काही प्रसंगात दिसणारा युध्दकैद्यांचा छळ यामुळे अँकेडमी जरा बिचकून राहाण्याची शक्यताच अधिक आहे. मात्र प्रेक्षकांनी त्याकडे पाहाताना अधिक मोकळी नजर ठेवण्याची गरज आहे. इतक्या महत्वाच्या घटनेनंतर इतक्या नजिकच्या काळात इतक्या प्रभावी पध्दतीने केलेला चित्रपट येणं ही घटना तशी दुर्मिळ आहे. त्याचा राजकीय मुद्दा करण्यापेक्षा त्यातल्या मानवी दृष्टीकोनाचं कौतुक करणं हीच अधिक प्रामाणिक प्रतिक्रीया ठरावी.
- गणेश मतकरी Read more...