काय पो छे- काठावर पास
>> Sunday, March 10, 2013
नेहमीच्या तयारीने परीक्षेला उतरलेल्या, पैकीच्या पैकी मार्कांची अपेक्षा करणा-या अतिशय हुशार विद्यार्थ्याला एकोणनव्वद टक्के मिळाले तरी बिचा-याची मेरिट लिस्ट हुकली म्हणून आपण निराश होतो आणि त्याच वेळी काठावर पास होणारा, शिकल्या न शिकल्याने फार फरक पडेलशी शाश्वती नसणारा मुलगा पासष्ट टक्के मिळवून आला,तरी त्याने फस्ट क्लास मिळवल्याचं कौतुक आपल्याला वाटल्यावाचून राहात नाही. चित्रपटांचंही असंच असतं. ज्यांची आधीपासून खूप गडबड असते आणि चित्रकर्त्यांपासून समीक्षकांपर्यंत सारेच ज्यांच्यापासून खूप अपेक्षा तयार करतात, त्यांची ब-यापैकी कामगिरीही आपल्याला निराश करते, आणि मुळातच टाकाऊ समजल्या जाणा-या चित्रपटाला आपण खिजगणतीतच धरत नसल्याने,त्यातली एखाददुसरी जमलेली गोष्टही मनापासून आवडून जाते. असं अनेकदा होतं , आणि ब-याच समीक्षकांचं ते 'काय पो छे' या अभिषेक कपूर दिग्दर्शित चित्रपटाबाबत झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चेतन भगत हा अत्यंत सुमार दर्जाच्या पण भरपूर वाचक प्रतिसाद असणा-या कादंब-यांचा लोकप्रिय लेखक म्हणून प्रसिध्द आहे. सामान्य वाचकाला दर्जापेक्षा प्लॉट समजतो, या न्यायाने सर्व भाषा आणि देशांत सुमार, पण रंजक कथानक असणा-या कादंब-यांना वाचकवर्ग असल्याचं आपल्याला दिसतं. अनेकदा, हे प्लॉटला असणारं महत्व त्यांवर आधारीत चित्रपट चांगले होण्यासाठीही जबाबदार ठरतं,मात्र भगतच्या पहिल्या दोन रुपांतरांचा अनुभव फार बरा नव्हता. सलमान खानचं होम प्रोडक्शन असणारा , ' वन नाईट @द कॉल सेंटर' वर बेतलेला ' हॅलो' पुरा फसला, आणि 'फाईव्ह पॉईन्ट समवन' ला पूर्ण श्रेय देण्याचं ' थ्री इडिअट्स' ने नाकारलं. त्यामुळे भगतच्या तिस-या कादंबरीवर आधारलेला, ' रॉक आॅन' हा यशस्वी चित्रपट करुनही स्वतःला पुरतं सिध्दं न केलेला अभिषेक कपूरसारखा दिग्दर्शक असणारा, सर्व नवे चेहरे अभिनयासाठी घेणारा चित्रपट फार तीर मारेल, अशा या समीक्षकांच्या अपेक्षा असतीलसं वाटत नाही. कदाचित या पार्श्वभूमीवर उघड मेलोड्रामा टाळण्याचा प्रयत्न करणारा, व्यावसायिक चित्रपटांना अपरिचितशा प्रादेशिक पार्श्वभूमीवर घडणारा आणि उत्तम अभिनय असलेला चित्रपट त्यांना आवडून गेला असावा.
खरं तर या तीन गोष्टी खरोखर आजच्या चांगल्या चित्रपटांमधे आवश्यक मानण्यासारख्या आहेत आणि त्यांच्या इथल्या वापराने चित्रपटाला वेगळा बाज येतो हेदेखील खरं, पण त्यामुळे चित्रपटाचा दर्जा कौतुक करण्याच्या पातळीइतका उंचावतो का? मला नाही तसं वाटत.
कदाचित आधीच्या चित्रपटीय अपयशांमुळे असेल पण या चित्रपटाच्या जाहिराती या सहजासहजी कळतीलशा पध्दतीने मूळ कादंबरीशी, ' थ्री मिस्टेक्स आॅफ माय लाईफ' शी जोडलेल्या नाहीत. एकतर त्याचं पतंग काटण्याशी संबंधित असलेलं केवळ गुजराथी समाजाला समजेलसं नाव आणि सर्व जाहिरातींमधे मूळ संघर्ष टाळत दाखवलं जाणारं 'थ्री इडिअट्स' वा 'दिल चाहता है' टाईपचं ( पुन्हा तीन मित्रं असणारं) मैत्रीदर्शन. हॉलिवुडच्या बडी मुव्ही फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याकडे हा त्रिकुट फॉर्म्युला तयार होतोय की काय? मात्र हा मिसडिरेक्शनचा मुद्दा मी स्वतंत्रपणे चित्रपटाच्या विरोधात धरणार नाही. त्यासाठी आपल्याकडे इतर अनेक मुद्दे आहेत.
स्पॉईलर वॉर्निंग- माझ्या मते मुळात भगतचा वाचकवर्ग भरपूर असल्याने आणि चित्रपट लागूनही आठवड्यावर झाल्याने सा-यांना सारं माहित असेल. तरीही काही गोष्टी नव्याने कळण्याची शक्यता आहे. पाहा बुवा !
मुद्दा पहिला- कथनशैली आणि मेलोड्रामा
लगान येईपर्यंत आपल्या चित्रपटसृष्टीत दिसलेले खेळ या विषयावरले चित्रपट फार यशस्वी झाल्याची इदाहरणं नाहीत. हिप हिप हुर्रे, अव्वल नंबर यासारखी बरीच उदाहरणं आपण पाहू शकतो. आणि त्यात मला फार आश्चर्य वाटत नाही. खेळ हा मुळात लोकप्रिय प्रकार असला तरी तोच तोच पणा हा त्याचा अविभाज्य भाग असतो. वास्तवात तो लोकप्रिय ठरतो तो उस्फूर्तता आणि अनिश्चितता या घटकांमुळे जे दोन्ही घटक चित्रपटांत आणणं कठीण असतं. यासाठी चित्रपटात हा विषय पाहाताना खेळाबरोबरच उत्तम पटकथा आवश्यक असते जी खेळाचा तोच तोच पणा विसरायला लावून आपल्याला व्यक्तिरेखांमधे गुंतवेल. काय पो छे तलं क्रिकेट महत्वाचं असलं तरी पारंपारिक खेळपटांईतकं ते डाॅमिनेटींग ठरत नाही. या परिस्थितीत पटकथेची आपल्याला गुंतवण्याची जबाबदारी अधिकच वाढते जी इथे परिणामकारक ठरत नाही.
मेलोड्रामा किंवा अतिनाट्य टाळायचं असेल तर ते विषयात किंवा कथानकात टळण्याची आवश्यकता असते. केवळ पटकथेतलं ते टाळणं हे कृत्रिम ,केवळ प्रसंगात न दाखवताही घटनांचे त्या जातीचे परिणाम पटकथेत सामावून घेणारं असतं. कुटुंबकलह, जीवाला जीव देणारी दोस्ती आणि त्यात आलेलं टोकाचं वितुष्ट, सचिन तेंडुलकरच्या वळणाचं क्रिकेट खेळणारा मुलगा आणि त्याला इन्टरनॅशनल क्रिकेटला पोचवण्याची निकड, भूकंप, हिंदू मुस्लीम दंगे, प्रेम-त्याग-मोक्षाचं चक्र या सा-या गोष्टी ' थ्री मिस्टेक्स आँफ माय लाईफ' च्या कथानकात आहेत ज्यातली कोणतीही एक गोष्टही एका चित्रपटासाठी पुरावी. आता या सा-या मुद्द्यांना अतिनाट्य टाळून एकत्र करता येईल का? तर ते अशक्य आहे.चित्रपट ते करण्यासाठी बरेच महत्वाचे प्रसंग पूर्णपणे डेव्हलप करणंच टाळतो आणि झपाट्याने उरकत पुढे जातो. शेवटच्या प्रसंगांमधे हे नाट्य टाळणं शक्य होत नाही आणि चित्रपट ठराविक वळणावर उतरतो. तोवर मात्र तो नाट्य टाळण्याचा आभास आणू शकतो. मात्र माझ्या दृष्टीने असं वरवर वास्तवाचा आभास आणणं आणि संघर्ष आटोक्यात ठेवणं हेच मूळ कथेवर अन्याय करणारं आहे,कारण त्यामुळे कथेतल्या शक्यता पूर्णपणे वापरल्या जात नाहीत . शिवाय इतके नाट्यपूर्ण मुद्दे असूनही कोणताच टोकाला न गेल्याने चित्रपट कंटाळवाणा होतो हे वेगळंच.
मुद्दा दुसरा- सेटअप आणि मूळ संघर्ष
पटकथेत सेट अप वर किंवा पार्श्वभूमी तयार करण्यावर किती वेळ काढावा याला काही मर्यादा आहेत. काय पो छे नवनवे नाट्यमय धागे गुंफत राहातो मात्र त्यातल्या कोणत्याच धाग्यावर तो रमत नाही. पटकथेला त्यामुळे योग्य ती दिशाही मिळत नाही. सुरूवातीचा वायफळ भाग पारंपारीक हिंदी चित्रपटातल्या मैत्रीच्या कल्पनांत रमतो. गोविंद, ओमी आणि ईशान मिळून एक स्पोर्टस अॅकेडमी कम खेळाची सामुग्री विकण्याचं दुकान कम ट्यूशन क्लास काढतात. त्यांना तत्काळ एक हुशार विद्यार्थी मिळतो. पुढे मैत्री,गोविंदचं प्रेमप्रकरण, क्रिकेट अशा वेगवेगळ्या डगरींवर पाय टाकत चित्रपट मध्यंातरावर येतो . हे मध्यांतर गुजरातमधल्या भूकंपावर होतं ज्यात अनेक लोक देशोधडीला लागले. या वेळेपर्यंत मूळ विषय, जो कथानकातल्या मुख्य संघर्षाकडे नेईल तो चित्रपटात येतच नाही, त्यामुळे फाॅर आॅल प्रॅक्टीकल पर्पजेस हा सारा वेळ फुकट जातो. मध्यंतरानंतर कथानक थोडं योग्य दिशा पकडतं मात्र मग वेळ कमी पडल्याने शेवटाकडचा भाग फार तपशीलात न जाता गुंडाळावा लागतो. . माझ्या मते, कदाचित पंधरा वीस मिनीटांचा सेट अप घेऊन उरलेला पूर्ण चित्रपट उत्तरार्धावर बेतला जाता तर कदाचित पुढली घाई टळली असती.
मुद्दा तिसरा- वास्तववाद आणि योगायोग
चित्रपटाचं दृश्यरुप हे वास्तवाचं सोंग आणणारं असलं तरी मुळात हा चित्रपट इतक्या सोयीस्कर योगायोगांवर आणि लेखकाच्या तथाकथित चतुराईवर आधारलेला आहे की पूर्वीचे सलीम जावेदचे चित्रपट रिअॅलिस्ट वाटावेत. यातला सर्वात मोठा योगायोग म्हणजे ज्याला खरंतर प्रशिक्षणाची काही गरजच नाही या लायकीचा शतकातला एक खेळाडू ट्रेनिंगसाठी तीन नवशिक्या मुलांच्या हाताला लागावा. यानंतरची पटकथा म्हणजे लेखकाने बसून दर पंचविसाव्या पानाला नवा पेच टाकण्यासारखं आहे. अर्थात हे पेचही जुन्या चित्रपटांप्रमाणेच झरझर सोडवले जातात. ' करुन पाहू' ही एकच पॉलिसी यातल्या नायकांनी अंगी बाणवलेली दिसते जी सारी विघ्नं दूर करेल. ' आले चेतन भगतच्या मना...' हा एक सरसकट नियम ठरवला तरी यातल्या एका प्रश्नाचं तितकंही समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही. चित्रपटाच्या समर्थकांपैकी कोणाला यावर प्रकाश टाकता आला तर जरुर टाकावा. मुख्य चित्रपट घडतो भूतकाळात, दहाएक वर्षांपूर्वी आणि त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन वर्तमानकाळातले तुकडे आहेत. पहिल्या तुकड्यात गोविंद ( राजकुमार यादव) आपल्या प्रथितयश स्पोर्ट अॅकेडमीतून किती जणांना कसं ट्रेन केलं याचं प्रेझेन्टेशन देत असतो. भूतकाळात गेल्यावर मूळ गोष्ट सुरू होताच आपल्याला कळतं की मुळात ही अॅकेडमी काढण्यात गोविंदबरोबर त्याच्या आेमी ( अमित साध) आणि ईशान ( सुशांत सिंग राजपूत) या दोन जीवाभावाच्या मित्रांचा हात होता. यात मूळ खेळाची पार्श्वभूमी असणारा ट्रेनर आहे इशान, राजकीय आणि आर्थिक सहाय्य पुरवणारा आहे आेमी आणि गोविंद मात्र, केवळ आर्थिक व्यवहार कळणारा माणूस आहे. चित्रपटाचं प्रमुख कथानक संपतं तेव्हा आपल्याला दिसतं की या ना त्या कारणाने ईशान आणि ओमी दोघंही अॅकेडमीचं काम पाहाणार नाहीत. मग खेळाचा गंधही नसलेल्या गोविंदने ही अॅकेडमी कशी चालवली आणि यशस्वी केली? की अकाउन्ट्सचं ज्ञान सर्वसमावेशक आणि सर्वोत्तम आहे, जे आल्यावर बाकी सारं गौण ठरावं. म्हणजे चित्रपट गुजराती पार्श्वभूमीवर घडतो हे ठाऊक आहे, पण धिस इज रिडिक्युलस !
मुद्दा चौथा- व्यक्तिरेखा आणि नट
नट हा यातला जमेचा मुद्दा, कारण अतिशय परिचित वळणाच्या व्यक्तिरेखांना ते नव्या असल्याप्रमाणे सादर करतात. तरीही यातला मैत्री हा प्रमुख अजेंडा असलेला भाग चालू असताना बिचा-या ओमीला करायला नवं काहीच मिळत नाही आणि ईशान करेल त्याच सार््या गोष्टी तो जवळपास त्याच प्रकारे करताना दिसतो. उत्तरार्धात कथानकाला जेव्हा राजकीय रंग मिळतो, तेव्हा कुठे ही व्यक्तिरेखा वेगळी उठून दिसायला सुरुवात होते. या भागात मुळातच आॅथर बॅक्ड ईशान आणि व्यक्तिमत्वात पूर्ण बदल दाखवणारा आेमी, हे दोघेही प्रभाव पाडतात. गोविंद मात्र यातली अंडर रिटन आणि फार छाप न पाडणारी भूमिका ठरतो, जरी ती लांबीला सर्वाधिक आहे आणि चित्रपटाच्या शेवटाचा चाणाक्षपणे विचार करुन या भूमिकेला ईशानच्या ( अहमदाबादेतली मध्यमवर्गीय गुजराती व्यक्तिरेखा असूनही जाने तू या जाने ना मधल्या जेनेलिआसारख्या प्रचंड अॅक्सेन्टमधे बोलणा-या ) बहिणीच्या रुपात रोमँटीक इन्टरेस्टदेखील देण्यात आला आहे. यादव हा चांगला अभिनेता आहे हे आपण त्याच्या इतर चित्रपटांमधल्या भूमिकांमधून जाणतो, पण इथे मात्र त्याच्या व्यक्तिरेखेच्या सपकपणाने तो काय आणि किती करु शकतो याला मर्यादा पडली आहे. असं असतानाही ही मंडळी इथे नसती तर आधीच बर््यापैकी कंटाळवाणा असलेल्या चित्रपटाचं काय झालं असतं याची कल्पनाच केलेली ( किंवा न केलेली) बरी.
असो. परंपरागत व्यावसायिक डावपेच टाळणं , वास्तववादाचा थोडा आभास आणि सहज अभिनय या तीन गोष्टी 'काय पो छे' ला थोडाफार सावरतात. या माफक सावरण्याचं कौतुक वाटून घ्यायचं असेल तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही. मात्र तेवढ्या जोरावर त्याची कामगिरी प्रथम वर्गात येण्याच्या लायकीची आहे असं मात्र मला वाटत नाही.
- गणेश मतकरी
Read more...