आँखो देखी- सत्याचे प्रयोग
>> Monday, April 28, 2014
जुन्या दिल्लीतल्या एका दाट वस्तीतल्या घराची गच्ची. इथे वाढदिवसाची पार्टी सुरु आहे. ही फिल्म हिंदी असली, तरी पार्टी हिंदी चित्रपटातल्या पारंपारिक पार्ट्यांसारखी नाही. किंबहुना , सामान्यतः नाट्यमय चित्रपटात जसे प्रमुख व्यक्तिरेखांचेच वाढदिवस साजरे होतात, तसंही या चित्रपटात होत नाही. भल्या मोठ्या कुटुंबातल्या एका मुलाचा हा वाढदिवस. हा मुलगा अनेक पात्रांतला एक, प्रमुख वगैरे काही नाही.
पार्टी होतेय ती गच्ची प्रेक्षणीय. म्हणजे नेत्रसुखद या अर्थी नाही, तर ती अचूकपणे या कुटुंबाचा आर्थिक , सामाजिक स्तर , त्यांची जीवनपध्दती, त्यांची आवडनिवड मांडते, त्यामुळे आशयाचं अचूक रुप दाखवणारी, म्हणून प्रेक्षणीय. ही गच्ची असलेली इमारत आणि आजूबाजूच्या इमारतीही छोट्या, बैठ्या, जवळजवळ गर्दी करुन बांधलेल्या, दर शाॅटमधे पार्श्वभूमीला दिसणारी भिंती, तारा, अँटेनांची गर्दी, पॅरापिटवर कोणी हौसेने लावलेल्या कुंड्या, घाईघाईत दिसेल तिथे फुगे आणि झिरमिळ्या लावून केलेलं डेकोरेशन.
पार्टीत एक पन्नाशीतला गृहस्थ. सामान्य. बहुधा या मोठ्या कुटुंबातला वयाने सर्वात मोठा. पार्टीत त्याचे भाऊ, बहीण , इतर नातेवाईक, मित्र, सार््यांची पोरं बाळं यांचा समावेश. या गृहस्थाला कोणीतरी विचारतं, की ,' इतर काही सोडा, पण भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत, यावर तरी तुमचा विश्वास आहे की नाही?'
गृहस्थ शांतपणे पण नाॅनकमिटली म्हणतो, ' असतील ना !'
सगळे हसतात, टिंगल करतात, पण गृहस्थ आपला हेका सोडायला तयार होत नाही. इतर सांगण्याचा प्रयत्न करतात, की सारेच जण म्हणताहेत, पेपरात टिव्हीवर येतं, तर त्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? पण गृहस्थाच्या म्हणण्यानुसार ही विश्वास ठेवण्याची पध्दत हाच मुळी एक संकेत आहे. सोयीसाठी केलेला, आणि केवळ त्या संकेतावर विसंबून त्याच्या स्वत:च्या अनुभवाचा भाग नसलेलं काही त्याने खरं कसं मानावं?
टिंगल सुरुच राहाते.
रजत कपूरच्या आंखो देखी चित्रपटातला हा सुरुवातीकडला एक प्रसंग. एका परीने प्रातिनिधिक म्हणावा असा. चित्रपटातलं गांभीर्य आणि विनोद याचं मिश्रण, वास्तववादी शैली, दिग्दर्शकांची व्यक्तिरेखांवरली श्रध्दा, प्रामाणिक दृश्यात्मकता हे सगळं या दृश्यात प्रत्यक्ष दिसतं. व्यावसायिक चित्रपटांना दर प्रसंगात काही घडवायचं असतं, घटनांना कन्क्लूजनच्या दिशेने पुढे रेटायचं असतं. यासारख्या चित्रपटांना ती गरज वाटत नाही. मग ते रेंगाळतात, आणि सर्वसामान्य जगण्याच्या अनुभवात, प्रेक्षकाला सहभागी करुन घेतात.
रजत कपूर हा आपल्या नवसमांतर चित्रपटांमधला एक महत्वाचा दिग्दर्शक. अनुराग कश्यप एवढा हाय एन्ड नाही, पण चांगला. रघू रोमिओ,मिक्स्ड डबल्स, मिथ्या असे चांगले, वेगळ्या प्रकारचे चित्रपट देणारा. त्याची निर्मिती ( आणि भूमिका) असणारा, पण दिग्दर्शन नसणारा ' भेजा फ्राय' चिकार चालला आणि केवळ लोकप्रिय चित्रपट पाहाणार््याला रजत कपूर म्हणजे कोण हे सांगायची सोय झाली, तरीही जे लोक वेगळा चित्रपट पाहातात, त्यांना हे नाव आधीपासून परिचित आहे. त्याच्या चमूतली विनय पाठक आणि रणवीर शौरी, ही दोन नावं अलीकडे खूप प्रकाशात आली आहेत. या चित्रपटात ती (शौरीचा एक सूक्ष्म कॅमिओ सोडल्यास) नाहीत. किंबहुना यात व्यावसायिक वा नवसमांतर मधलं कोणतंच मोठं नाव नाही. तो स्वत: आणि विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाणारा उत्तम अभिनेता संजय मिश्रा हे त्यातल्यात्यात नेहमीचे लोक. पण तसंच असण्याचा चित्रपटाला फायदा आहे . इथे स्वत:ची प्रतिमा असणार््या , ओळखीच्या लोकांची गरज नाही, तर सर्वसामान्य दिसणार््या चांगल्या अभिनेत्यांची आहे. स्वत: कपूर आणि मिश्रा देखील त्यातलेच आहेत.
आँखो देखीची कल्पना सोपी, पण म्हंटलं तर थोडी वैचारिक. एके दिवशी, दिल्लीतल्या छोट्या कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात राहाणारा अन एका ट्रॅवल एजन्सीत नोकरी करणारा एक माणूस, राजे बाउजी ( मिश्रा) ठरवतो, की आपलं सत्य हे आपण जे अनुभवू ते आणि तेवढ्यापुरतं मर्यादित असलं पाहिजे. जे त्यापलीकडलं, जे आपण पाहू शकत नाही, अनुभवू शकत नाही, ते सत्य कशावरुन? मग सत्य म्हणावं तरी कशाला हे एक, आणि आपल्या अनुभवाची पातळी आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकते हे दुसरं, तो पडताळून पाहायला लागतो. समोर येणारी सत्य ही अधिकाधिक घोटाळ्यात पाडत जातात आणि राजे त्या शोधात भरकटत जातो.
राजे बाउजीचा हा शोध कधी खर््या जगाशी नातं ठेवणारा, कधी तात्विक, तर कधी अध्यात्मिक आहे. दिवसेंदिवस तो व्यक्ती म्हणून भोवतालच्या जगापासून तुटत जातो कारण आपलं सत्य हे आपल्या असणार््या बाहेरच्या जगाच्या संदर्भापलीकडे अस्तित्वातच नाही हे त्याच्या लक्षात येतं. पृथ्वी गोल का सपाट या साध्या गोष्टीपासून आपण कामाचा भाग म्हणून क्लायन्ट्सना देत असलेल्या परदेश प्रवासाच्या तपशीलापर्यंत काहीच आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही हे दिसून आल्यावर बाउजींचं जग संकुचित व्हायला लागतं. तो आतल्या आत, आपल्या अवकाशात गुंतत राहातो.
आँखो देखी हा काहीसा विक्षिप्त चित्रपट आहे. तो आपल्या गतीने पुढे सरकतो. त्याचा प्रवास एका निश्चित दिशेलाच जाईल असं नाही. मध्यांतरापर्यंत त्यातली सत्यशोधनाची थीम सुरळीत चालते, पुढे मात्र तो थोडा विस्कळीत होतो. कदाचित चित्रपटाच्या पूर्ण लांबीला ही लघुकथेसारखी कल्पना थोडी कमी पडली असावी. असं असतानाही चित्रपट आपल्याला गुंतवतो. मात्र हे गुंतवणं केवळ त्यातल्या आशयसूत्रामुळे होत नाही, तर त्यात रेखाटलेल्या दिल्लीकर कुटुंबाच्या अस्सल चित्रणामुळेही होतं. हे कुटुंब काही वेळातच आपण जवळून ओळखायला लागतो. राजे आणि ऋषी (रजत कपूर) या दोन भावांची कुटुंब आणि त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्र यातल्या अनेकांशी आपला थोडक्यात परिचय करुन दिला जातो. त्यांचे स्वभाव, समजुती, सवयी हे सर्व आपण जवळून पाहातो आणि हे कोणताही आव नं आणता, वा नाट्यपूर्ण कलाटण्या नं देता उभं केलेलं कुटुंबाचं चित्र आपल्याला आवडून जातं. जेव्हा त्यातला वैचारिक धागा सैल पडतो, तेव्हा या कुटुंबाचं भावविश्व आपली नजर हलू देत नाही. चित्रपटातच ठेवते. चित्रपटाचा शेवट मात्र पुन्हा आपली पकड घेतो आणि त्याला योग्य त्या उंचीवर नेऊन ठेवतो. अपेक्षेप्रमाणेच.
आज आपल्याकडे 'बाॅलिवुड'च्या दिखाऊ आकर्षक जगाबरोबर वास्तवदर्शी चित्रण आणि आशय मांडण्याची ताकद आहे. अनेकदा या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमधे त्याच तंत्रज्ञांचा, कलावंतांचा सहभाग असतो, पण दोन्हीकडे त्यांच्यावर ( खासकरुन कलावंतांवर) सोपवण्यात आलेल्या जबाबदार््या वेगळ्या असतात. या चित्रपटांमधले प्रमुख भूमिकातले चेहरे मोठ्या तथाकथित रंजनपटात छोट्या थॅन्कलेस भूमिका करताना पाहून बरं वाटत नाही. पण सुदैवाने हल्ली या वेगळ्या चित्रपटांनाही एक प्रेक्षक वर्ग तयार होतोय. अशा प्रयत्नांमधूनच तो टिकेल, वाढत जाईल. आँखो देखी चित्रपटगृहात किती चालला माहित नाही, पण चांगले चित्रपट त्यांच्या प्रदर्शन काळानंतरही छोट्या पडद्यांवर पाहिले जातात, टिकतात. हा देखील तसाच टिकेलसं वाटतं.
- गणेश मतकरी Read more...