हाच खेळ उद्या पुन्हा- 'एज आॅफ टुमाॅरो'च्या निमित्ताने
>> Sunday, June 22, 2014
चित्रपट हा सामान्यत: गोष्ट सांगतो. साहाजिक आहे, कारण कला म्हणून मान्यता असलेलं आणि वयाची शंभरी ओलांडलेलं हे माध्यम,आजही व्यावसायिक यशाकरता त्याच्या सामान्यजनांचं 'मनोरंजन ' करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणताही चित्रपट कलेच्या निकषांवर किती प्रमाणात उतरतो, यापेक्षा तो चांगली गोष्ट, वेधक पध्दतीने सांगून प्रेक्षक खेचू शकतो का, याला चित्रपटउद्योगात अधिक महत्व आहे.
आता अधिकाधिक लोकाना आवडायचा, तर या चित्रपटांच्या निवेदनशैलीलाही ,काही आकार, रचना हवी, जी सामान्यत: आपल्याला दिसते ती रचनेत अभिप्रेत असणार््या, कालानुसार सरळ रेषेत उलगडणार््या तीन अंकांच्या स्वरुपात. हे अंक म्हणजे सेट अप, काॅन्फ्लिक्ट आणि रेझोल्यूशन. पहिल्या अंकात व्यक्तिरेखांचा परीचय आणि संघर्षाकडे निर्देश, दुसर््या अंकात प्रत्यक्ष संघर्ष, आणि अखेर तिसर््या अंकात संकटाचं निवारण , या प्रकारची रचना आपण नित्यनेमाने चित्रपटांत पाहू शकतो. मात्र सर्वच चित्रकर्त्यांना या रचनेने स्वत:ला बांधून घ्यावंसं वाटत नाही. मग अशा वेळी हे दिग्दर्शक, पटकथाकार काही वेगळ्या मार्गाची निवड करतात.
नाॅन लिनीअर शैलीत गोष्ट सांगणं, म्हणजे प्रत्यक्ष घटनाक्रमाचा आधार सोडून देऊन जे सांगायचं आहे त्या आशयसूत्राला महत्व देत काळाविरुध्द केलेली रचना ,ही एकेकाळी जितकी अनपेक्षित होती तितकी आता वाटत नाही. कथा पूर्ण उलट्या क्रमाने मांडणार््या क्रिस्टोफर नोलनच्या 'मेमेन्टो'ने (२०००) ही शैली आपल्याकडे खूप लोकप्रिय केली पण प्रत्यक्षात पहायचं तर वास्तव आणि कल्पित, काल आणि अवकाश याचे सारे संदर्भ पुसून टाकणार््या १९६१च्या ' लास्ट इयर अॅट मेरीअॅनबाद' पासून ते क्विझ शोच्या निमित्ताने नायकाच्या संपूर्ण आयुष्याची कथा मांडणार््या २००८ च्या 'स्लमडाॅग मिलिअनेअर' पर्यंत या प्रकारातली इतर अनेकानेक उदाहरणं आपल्याला पाहाता येतील. गंमतीची गोष्ट म्हणजे अशा चित्रपटांनी घटनाक्रमात काळाची साथ सोडली, तरीही आशयाच्या दृष्टीकोनातून हे चित्रपटही ( सन्मान्य अपवाद वगळता) तीन अंकांचं भान सोडताना दिसत नाहीत. हे लक्षात घेतलं तर मी आता ज्या चित्रप्रकाराविषयी बोलणार आहे त्याचा वेगळेपणा लक्षात येईल.
हा चित्रप्रकार नाॅनलिनीअर चित्रपटांचीच एक उपशाखा आहे.या चित्रपटांत एक संपूर्ण पण छोटा कथाभाग दिसतो.घटनांची एक साखळी, जी पात्रांच्या परीचयापासून सुखांतापर्यंत ( किंवा शोकांतापर्यंत) सर्व महत्वाचे टप्पे घेईल. मात्र हा कथाभाग म्हणजे संपूर्ण चित्रपट नव्हे.चित्रपट हा या कथाभागाकडे त्रयस्थपणे पाहातो, त्या कथानकाचे टप्पे तपासून बघतो, यातल्या घटना अमुक पध्दतीनेच घडणं शक्य आहे का इतरही काही शक्यता संभवतात याचा विचार करतो आणि अखेर या कथाभागाच्याच विविध आवृत्त्या सादर करतो. चित्रपट तयार होतो, तो या सर्व आवृत्त्यांचा एकत्रितपणे विचार करुन.
आता चित्रपटाची ही ढोबळ रचना मांडली तरी ती वापरणारे सारेच चित्रपट एकसारखे होतात का, तर नाही ! या चित्रपटांच्या दिग्दर्शकांचा विचार , त्यांच्यापुरतं या चित्रपटांचं आशयसूत्र, हे या चित्रपटांना एकमेकांपेक्षा खूप वेगळं करुन सोडतं. मला वाटतं अशा काही प्रमुख चित्रपटांची उदाहरणं माझा मुद्दा स्पष्ट करतील.
अकिरा कुरोसावाच्या राशोमाॅन (१९५०) मधे आपल्याला दिसते ती बलात्कार आणि दरोडा यांभोवती फिरणारी एक कथा, जी त्यात सहभागी दरेक व्यक्तीच्या दृष्टीकोनाप्रमाणे वेगवेगळी घडते. पण ही सांगताना कुरोसावाचा भर हा खरं काय घडलं हे शोधण्यावर नाही, तर तो आहे मुळात सत्य हेच व्यक्तीसापेक्ष असतं, हा मुद्दा मांडण्यावर. हेराॅल्ड रामीस आपल्या 'ग्राउन्डहाॅग डे' (१९९३) च्या कडवट नायकाला एका छोट्याशा गावात अडकवून तोच दिवस पुन्हा पुन्हा जगायला लावतो, पण त्यादरम्यान तो विचार करतो तो मनुष्यस्वभावाचा, 'भला माणूस' ही काय चीज असावी, याचा. टाॅम टायक्वरच्या जर्मन 'रन लोला रन' (१९९८) मधली लोला आणि तिचा प्रियकर मानी त्यांच्या आयुष्यातला वीस मिनिटांचा कालावधी शोकांत आणि सुखांत शेवटासह विविध मार्गाने जगताना आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो याचा प्रत्यय आणून देतात, आणि डन्कन जोन्सच्या ' सोर्स कोड' (२०११) मधली ट्रेन बाॅम्बिंगची तीच परंतु आवृत्तीगणिक बदलत जाणारी घटना वास्तवाच्या विदारक संदर्भाने येणार््या तत्वचिंतनात्मक दृष्टीला ,रहस्याची डूब देऊन जाते. हा चित्रप्रकार इतका महत्वाचा आहे, की त्यात येणारे चित्रपट मोजके असले तरी उठून दिसणारे आहेत. वर उल्लेखलेल्यातला ' सोर्स कोड' वगळता प्रत्येक चित्रपट आज अभिजात मानला जातो.'अभिजात' या पदवीसाठी 'सोर्स कोड' थोडा अधिक गुंतागुंतीचा असावा. पण त्यालाही कल्ट स्टेटस आहेच. या थोरामोठ्यांच्या पार्श्वभूमीवर याच आकृतीबंधातला डुग लिमानचा 'एज आॅफ टुमाॅरो ' आणखी वेगळं तरी काय करणार, हा प्रश्न मला ट्रेलर पाहाताच पडला.
एकाच गोष्टीच्या काही बदलांसह होणार््या पुनरावृत्तीची कल्पना खास दृश्य माध्यमाला सोयीची वाटते, ती कदाचित दृश्य चौकटींमधे असलेल्या, वर्णन टाळूनही थोडक्यात अनेक तपशील मांडण्याच्या हातोटीमुळे असेल. मात्र गंमतीचा भाग हा, की 'एज आॅफ टुमाॅरो', हे साहित्यकृतीचं रुपांतर आहे. जपानमधे 'लाईट नाॅव्हेल' म्हणून शाळाकाॅलेजच्या मुलांना टारगेट करणारा एक प्रकार आहे.कमी लांबी, साधा आशय पण लक्षवेधी विषय, गतीमान निवेदन, सचित्र आवृत्त्या , असं या 'हलक्याफुलक्या कादंबर््यांचं' स्वरुप. ' आॅल यू नीड इज किल' ही हिरोशी साकुराझाका यांची कादंबरी त्यातलीच एक. साहजिकच, आपल्या चित्रपटआवृत्तीतही ही कादंबरी आशयाला फार खोली नसलेली, पण चित्तथरारक आहे.
मघा सांगितलेल्या चित्रपटातल्या ग्राऊंडहाॅग डे, आणि सोर्स कोड, यांचं एज आॅफ टुमाॅरोशी रचना आणि संकल्पनेच्या दृष्टीने थेट साम्य आहे. त्याखेरीज त्यावर 'मेट्रिक्स'पासून 'एलिअन्स'पर्यंत आणि 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन'पासून 'स्टारशिप ट्रूपर्स'पर्यंत अनेक दृश्य प्रभाव दिसतात. पण चित्रपट या प्रभावांखाली दबून जात नाही. आशयाला नसलेली खोली तो पटकथेची गुंतागुंत वाढवून आणि अनेक प्रासंगिक शक्यतांचा विचार जागरुकपणे करत भरुन काढतो. कथेला पार्श्वभूमी आहे, ती मानवजात आणि परग्रहवासी, यांमधल्या युध्दाची. (परग्रहाचं नाव काढताच इन्टेलेक्चुअल मंडळींनी नाकं मुरडण्याची गरज नाही.फँटसी चित्रपटही डोक्याचा वापर करणारे असू शकतात) असो!
तर मेजर केज (टाॅम क्रूज) हा नावापुरता सैनिक.जीवाला जपणारा आणि पर्यायाने रणभूमीपासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न करणारा. एकदा मात्र पेचात पकडून त्याची युध्दभूमीवर रवानगी केली जाते. युध्दभूमीवर पोचल्यावर काही मिनिटांतच त्याच्या लक्षात येतं, की शत्रूने पृथ्वीवासियांसाठी रचलेला हा सापळा आहे, ज्यात हार अटळ आहे. अर्थात, हे कळून फायदा नसतो. थोडाफार लढण्याचा प्रयत्न करतंच त्याला वीरमरण येतं. पण केजसाठी मृत्यू ही सुटका नसते. उलट तो पुन्हा त्याच सकाळी जागा होतो आणि दिवसभरच्या घटना घडल्या त्याच क्रमाने तशाच घडायला लागतात. छावणीत जागं व्हायचं, वरिष्ठांकडून अपमान करुन घ्यायचा, युध्दावर निघायचं आणि पुन्हा येईल त्या मार्गाने मरुन जायचं अशा लूपमधेच तो अडकतो. यापासून त्याला सुटकेचा एक मार्ग दिसतो, तो म्हणजे शौर्यासाठी नावाजली जाणारी सैनिक रिटा व्रटास्की ( एमिली ब्लन्ट). मात्र अडचण ही, की केजची रिटाशी जुजबीही ओळख नसते. आणि ती करुन घेऊन आपली चमत्कारिक अडचण तिला सांगायला, त्याच्याकडे फक्त एकच दिवस असतो.
राशोमाॅन मधल्या घटनांच्या पुनरावृत्त्या या फक्त त्या त्या व्यक्तीचा दृष्टीकोन मांडणार््या आहेत , म्हणजेच 'त्या त्या व्यक्तिरेखाच्या म्हणण्यानुसार जे घडलं ते असं'ही त्या चित्रपटामागची कल्पना आहे , रन लोला रन 'असं घडण्याची शक्यता आहे, किंवा तसं' असं म्हणतो तर ग्राउंडहाॅग डे' कसं ते माहित नाही, पण हे असं घडलं' असं सांगतो.त्यामुळे हे तिन्ही चित्रपट घटनेला महत्व देतात, स्पष्टीकरणाला नाही. याउलट 'सोर्स कोड' आणि 'एज आॅफ टुमाॅरो' यांमधे एका महत्वाच्या बाबतीत साम्य आहे आणि ते म्हणजे त्यात निर्माण होणारी परिस्थिती ही पूर्णपणे काल्पनिक का होईना, पण स्पष्टीकरणात बसणारी आहे.इथल्या नायकांना आपण या लूपमधे अडकल्याची जाणीव आहे , आपण कशामुळे अडकलो हे माहित आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्यता त्यांना दिसते आहे.त्यामुळे हे दोन्ही चित्रपट आपल्याला प्रोटॅगनिस्टच्या लढ्यात इतर तीन चित्रपटांहून किंचित अधिक पारंपारिक पध्दतीने अडकवतात. नायकाचा विजय हा इथे महत्वाचा ठरतो. दुसर््याही एका गोष्टीत या दोघांत साम्य आहे, ते म्हणजे नायक या घटना पुन्हा पुन्हा जगत असताना त्या घटनांमधे येणार््या स्त्रीच्या भूमिकेचा आलेख. ती स्त्री ही घटना तिच्यापुरती एकदाच जगतेय त्यामुळे नायक जरी तिला अधिक काळासाठी , म्हणजे 'एज आॅफ टुमाॅरो' मधे तर वर्षभर वा त्याहून अधिक , ओळखत असला तरी ती त्याला केवळ काही तासांपुरती ओळखतेय . त्यामुळे त्यांच्यातलं बदलत जाणारं नातं हा चित्रपटाचा महत्वाचा भाग. ( ज्यांनी पीटर सेगालचा '५० फस्ट डेट्स' पाहिलाय त्यांना त्यातल्या नायक नायिकेच्या नात्याशीही या चित्रपटाचं साम्य वाटेल) .
मी असा विचार करत होतो की हल्ली आलेले हे दोन चित्रपट आणि आधीचे यांमधे आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत इतका स्पष्ट बदल कसा? आणि याआधी तशी मुख्य प्रवाहातली नसलेली ही कल्पना अचानक 'ब्लाॅकबस्टर' फाॅरमॅटमधे कशी पोचली, तर त्यामागे एक कारण दिसतं, ते म्हणजे वाढत चाललेली गेमिंग संस्कृती. 'एज आॅफ टुमाॅरो' मधे हे खूप स्पष्ट जाणवतं. आजकाल अॅक्शन गेम्सचं प्रमाण खूप आहे, ज्यात खेळणारा हा कायमच अतिशय हुशार संगणकाशी खेळतो आणि अनेकदा मृत्यूमुखी पडल्याखेरीज पुढची लेव्हल गाठणं त्याला अशक्य होऊन बसतं. मात्र ही प्रगती शक्य होते, ती गेम प्रत्येक टप्प्यावर 'सेव्ह' होऊ शकल्याने. एज आॅफ टुमाॅरो मधलं केजचं छावणीत जागं होणं हा असाच एक सेव्ह पाॅईन्ट आहे. तिथपासून खेळ सुरू होतो आणि हरला तर पुन्हा त्या ठिकाणी परतणं शक्य आहेच.
सोफेस्टिकेटेड गेमिंग हे आज चित्रपटाशी स्पर्धा करतय हे तर आपण जाणतोच. खेळणार््याला हिरो करुन सोडणारा या खेळांमधला इन्टरॅक्टीव भाग चित्रपट नकलू शकत नसल्याने, मात्र चित्रपटांची भव्यता गेम्स घेऊ शकत असल्याने आज ना उद्या अॅक्शन गेम्स हे अॅक्शन चित्रपटांची जागा घेतील हे स्पष्ट दिसतय. या हरत्या लढाईमधला आजची हार उद्यावर टाकणारा एक लक्षवेधी प्रयत्न, म्हणून आपण 'एज आॅफ टुमाॅरो' चं नक्कीच कौतुक करु शकतो.
- गणेश मतकरी