इन्टरस्टेलर- एक तारांकित चिंतन
>> Saturday, November 15, 2014
इफ इट कॅन बी रिटन, ऑर थॉट, इट कॅन बी फिल्म्ड.
स्टॅनली कुब्रिक
आपल्याकडला बहुसंख्य प्रेक्षक ( आणि काही प्रमाणात समीक्षक देखील) 'इमोशनल मेलोड्रामा ' या लेबलाखाली न बसणाऱ्या कोणत्याही चित्रपटाला शून्य महत्व देतो. गंमत म्हणजे, त्याचं हे तर्कशास्त्र अनेक हास्यास्पद हिंदी मसालापटांना गरजेपेक्षा अधिक महत्व आणून देतं, आणि अनेक उत्तमोत्तम चित्रपटांकडे केवळ ते वेगळ्या वाटेवर असल्यामुळे दुर्लक्ष केलं जातं. हे अगदी थ्रिलर्स वगैरेच्या बाबतीतही होतं पण भय, फँटसी आणि सायन्स फिक्शन, हे या दुर्दैवी समजुतीचे कायमचे बळी.सायन्स फिक्शन तर खासच. खरं तर या चित्रप्रकाराचा वेष धारण करुन फ्रित्झ लान्गच्या मेट्रोपोलिस ( १९२७) पासून शेन कारुथच्या प्रायमर (२००४) पर्यंत अनेक विचारप्रवर्तक चित्रपट येऊन गेले आहेत, जे आपल्या खिजगणतीत नाहीत. इन्टरस्टेलर हे त्यातलं अगदी नवं उदाहरण. पहिल्या प्रथमच आपल्याकडे चटकन उचललं गेलेलं, त्यातल्या दिग्दर्शकाभोवतीच्या वलयामुळे.
क्रिस्टोफर नोलन हा आजच्या सर्वात लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक मानावा लागेल. आपल्याकडेही हे नाव परकं नाही. 'मेमेन्टो' (२०००) सारख्या निवेदनशैलीतच मूलभूत प्रयोग करणाऱ्या चित्रपटापासून ते नाव अचानक जगभरात गाजायला लागलं आणि मध्यंतरी येऊन गेलेल्या 'द प्रेस्टीज , इन्सेप्शन, डार्क नाईट चित्रत्रयी' सारख्या चित्रपटांनी त्याच्या कर्तुत्वाची कमान चढती असल्याचं वारंवार सिध्द केलं. 'इन्टरस्टेलर'शी जेव्हापासून नोलन जोडला गेला ( त्याआधी हा चित्रपट अशाच दुसऱ्या कर्तबगार दिग्दर्शकाकडे होता, स्टीवन स्पीलबर्गकडे) तेव्हापासूनच या चित्रपटाला प्रचंड प्रेक्षकवर्ग असणार , हे ठरुन गेलं. एकदा कुतूहल वाढल्यावर चित्रपटाविषयी वाचलं गेलं आणि त्याचा विषय कळताच दुसरा एक चित्रपट राहून राहून आठवायला लागला.
चंद्रावरल्या स्वारीच्या एक वर्ष आधी , १९६८ मधे , विज्ञानकथालेखक आर्थर सी क्लार्क आणि विविध चित्रप्रकार लीलया हाताळणारा दिग्दर्शक स्टॅनली कुब्रिक या दोघांच्या सहयोगातून बनलेल्या '२००१ ए स्पेस ओडीसी' या विज्ञानपटाला आजवरचा सर्वात महत्वाचा विज्ञानपट मानता येईल यात शंका नाही. अवकाश दृष्यांचा क्रांतिकारी वापर, त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध असणं, वैज्ञानिक संकल्पनांचा भडीमार आणि जवळपास प्रायोगिक म्हणता येईलशी पटकथा, यांमुळे तो अजरामर झाला. आजही या चित्रपटाचं नाव मानाने घेतलं जातं. 'इन्टरस्टेलर' वरचा '२००१' चा प्रभाव हा त्याच्या प्रसिध्दीत वापरलेल्या दृश्यांवरुनही दिसून येत होता. पण केवळ चांगला प्रभाव चांगला चित्रपट बनवण्यासाठी पुरेसा नसतो. मला प्रश्न होता तो हा, की 'इन्टरस्टेलर' या प्रभावापलीकडे जाऊ शकेल का? किंबहूना त्याला वैचारिक शक्यता आणि दृश्यक्रांतिसंदर्भात आजच्या युगाचा '२००१:ए स्पेस आेडीसी' मानता येईल का?
थोडक्यात सांगायचं, तर तसं मानायला जागा आहेही आणि नाहीही.
'२००१' सारखाच 'इन्टरस्टेलर'चा अवाकादेखील प्रचंड आहे. तो सुरु होतो, तो एका अनिंश्चित भविष्यकाळात. पृथ्वीचा अंत समीप आलाय. मोठी शहरं, दळणवळण संपुष्टात आलय आणि मानवजात शेतकरी बनून छोट्या वस्त्यांमधे कशीबशी तग धरतेय. यातल्याच एका शेतावर कूपर (मॅथ्यू मेकनोइ) आपल्या मर्फ आणि टॉम या दोन मुलांबरोबर रहातोय. कूपर मुळचा पायलट , पण आता आपला वैभवशाली भूतकाळ विसरुन नाईलाजाने शेतकरी बनलेला. नकारात्मक होत चाललेल्या समाजासमोर त्याच्यासारख्या तंत्रविशारदाना काही किंमत उरलेली नाही. एकदा अपघातानेच त्याला गुप्तपणे तग घरुन राहिलेल्या नासा संस्थेचा शोध लागतो. त्यातूनच संधी मिळते , ती मानवजात टिकून रहाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नव्या पृथ्वीसदृश ग्रहाच्या शोधात निघायची. मात्र प्रश्न हा अाहे, की नवा ग्रह सापडून त्यावर पृथ्वीवासियांना हलवण्याची सोय होईपर्यंत मानवजात शिल्लक राहिलशी काय गॅरेन्टी?
इन्टरस्टेलरला लक्षात येण्याजोगे तीन अंक आहेत. पहिला घडतो पृथ्वीवर, दुसरा अवकाशात, ग्रह शोधण्याच्या प्रयत्नात. तर तिसरा आणि अखेरचा अंक हा जवळपास मेटॅफिजिकल मानता येईलसा आहे. यात मांडलेल्या कल्पना - म्हणजे मानवाच्या आयुष्यातली काळाची भूमिका, परग्रहवासीयांशी संपर्काच्या शक्यता, भविष्याकडे पहाण्याची दृष्टी, माणूस आणि यंत्र यांचं सहजीवन, अवकाशयुगातले नवे टप्पे, अशा अनेक. त्यातल्या बऱ्याच संकल्पना या '२००१' शी साधर्म्य साधतात असं आपल्या लक्षात येईल. तरीही, '२००१' ने आणि काही प्रमाणात कार्ल सेगनच्या कादंबरीवर आधारीत 'कॉन्टॅक्ट'ने (१९९७ , दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस) ज्याप्रमाणे विचाराला जागा तयार करुन प्रत्यक्ष अर्थाशी खेळणं प्रेक्षकावर सोपवलं तसं 'इन्टरस्टेलर' करत नाही, उलट तो प्रत्येक प्रश्नाला निश्चित उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. काही जणांच्या मते हाच इन्टरस्टेलरमधला मोठा दोष आहे. मला तसं वाटत नाही.
नोलनच्या आधीच्या कामाकडे पाहिलं तर तो हे का करतो, हे सहज लक्षात येतं. केवळ कल्पनाशक्तीत स्थान असणाऱ्या गोष्टींना वास्तवाच्या गणितात बसवायचा प्रयत्न , हा त्याचा जुना खेळ आहे. 'प्रेस्टीज'मधली जादू आणि 'डार्क नाईट' मधली सुपरहीरो संकल्पना यांना त्याने ज्या पध्दतीने स्पष्टीकरणाच्या, वास्तववादाच्या चौकटीत बसवलं, ते पाहिलं, की याविषयी शंका उरत नाही. 'इन्टरस्टेलर' मागेही हीच कल्पना आहे, की केवळ कल्पनाविलास हे स्वरुप न ठेवता सिध्द आणि सैंध्दांतिक विज्ञानाचा वापर करुन अंतराळप्रवास आणि मानवापुढे भविष्यात तयार होणारी संभाव्य आव्हानं नव्याने मांडण्याचा प्रयत्न करायचा.
चित्रपट सुरु झाल्याझाल्याच आपल्या लक्षात येतं की तो केवळ स्पेशल इफेक्ट्सच्या जोरावर आपल्याला दिपवत नसून काहीतरी निश्चित वैज्ञानिक विचार आणण्याचा प्रयत्न करतोय. रिलेटिविटी, वर्महोल्स, ब्लॅकहोल्स, यासारख्या हार्ड कोअर वैज्ञानिक संकल्पना चित्रपट समजवून सांगतो, त्यावर चर्चा घडवतो आणि त्यांच्या चित्रणातही शक्य तितका प्रामाणिकपणा दाखवतो. हे शक्य व्हावं म्हणून नोलनने ज्येष्ठ थिअरॉटिकल फिजिसिस्ट किप थॉर्न यांची मदतही घेतलीय. यामुळे काही वेळा पात्र एरवीच्या चित्रपटांच्या प्रमाणाला सोडून कितीतरी अधिक अवघड बोलतात, पण ते सारं तुम्हाला तसंच समजणं आवश्यक नाही. हा विचारांचा भाग तुम्हाला समोर दिसणाऱ्या दृश्यांना तर्काचा आधार आहे, हे दाखवून देतो. ही जाणीव पहाणाऱ्याच्या डोक्यात तयार होणं, हे अंतिम परीणामासाठी पुरेसं आहे. या संकल्पनांच्या आधारे काही आश्चर्यकारक दृश्यरचनाही साकारल्या जातात. उदाहरणार्थ ब्लॅक होल चं नव्या सिध्दांताच्या आधारे केलेलं चित्रण, किंवा तिसऱ्या अंकात येणारा, काळाला वेगळी मिती असल्याचं प्रत्यक्ष दाखवणारा बुकशेल्फ सिक्वेन्स. या पातळीवरचं विचारमंथन एका चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचणं '२००१' लाही साध्य झालं होतं यात शंका नाही, पण त्यातली प्रकरणं ही बऱ्याच अंशी सुटी अन केवळ संकल्पनेच्या पातळीवर जोडलेली होती. त्याचं कथानक पूर्णपणे खेचून नेणारा एक नायक तिथे नव्हता. याला मी गुण किंवा दोष म्हणणार नाही, पण एवढच म्हणेन की 'इन्टरस्टेलर'मधे त्याचा नायक कूपर हा एक मोठा अँकर असल्याने तो प्रेक्षकासाठी अधिक सोपा, मूलभूत पातळीवर गुंतवणारा होतो, जे '२००१' मधे बहुतांशी होऊ शकत नाही .
आता यापलीकडे जाणारी एक गोष्ट आणि ती मला वाटतं सर्वात महत्वाची. ती म्हणजे विज्ञानपटाचा बाज बाजूला ठेवूनही इन्टरस्टेलर पहाणं शक्य आहे. कोणी म्हणेल, की आतापर्यंत त्यातल्या वैज्ञानिक बाजूच्या खरेपणाबद्दल बोलणारा आणि आजवरच्या सर्वात थोर विज्ञानपटाशी त्याची तुलना करणारा मी, अचानक त्याच्या विज्ञानाला बाजूला का ठेवतोय. तर तसं नाही. विज्ञान तर आहेच. पण त्यापलीकडे जाऊन माणसाच्या दुर्दम्य आशावादाची आणि लढ्याची जी गोष्ट इथे मांडली जाते, तिला 'इन्टरस्टेलर'मधे खूपच महत्व आहे. त्यातलं साहस हे केवळ धैर्याच्या पातळीवरचं नाही. त्याला एक सतत जाणवणारी माणूसपणाची किनार आहे. यातल्या व्यक्तीरेखा परीपूर्ण नाहीत पण खऱ्या आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात मानवी स्वभावाची सर्व वैशिष्ट्य आपल्याला दिसतात. बुध्दीनिष्ठ निग्रहापासून हळव्या मैत्रीपर्यंत आणि स्वार्थी महत्वाकांक्षेपासून संपूर्ण विरक्तीपर्यंत सर्व पैलूंचा यात स्वीकार आहे. आपण कोण आहोत याविषयीचं हे एक चिंतन म्हणता येईल.
'इन्टरस्टेलर' हा नोलनचा आजवरचा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट म्हणावा का? निश्चितच. पण त्याचबरोबर , सर्वाना तो सारख्या पातळीवर झेपणार नाही हे उघड आहे. पण चित्रपट जेव्हा परिचित प्रांत सोडून वेगळं काही करायला जातात तेव्हा ती एक शक्यता संभवतेच. मला विचाराल, तर चित्रपट कळला/ न कळला, आवडला / न आवडला यापेक्षा तुमच्यासाठी तो एक नवा अनुभव घेऊन आला की नाही याला अधिक महत्व आहे. आणि त्या कसोटीवर उतरणारं, या चित्रपटाहून अधिक उत्तम उदाहरण आपल्याला क्वचितच मिळेल.
-गणेश मतकरी
- mata madhun Read more...