सात वर्षांचा उद्योग . . .
>> Tuesday, January 20, 2015
१९९७ मधे मी आपलं महानगर या सायंदैनिकात इंग्रजी चित्रपटांची परीक्षणं लिहायला सुरुवात केली. त्यानंतर एक दोन वर्षातच दिवाळी अंकांमधून मोठे लेख वगैरे. २००२/३ च्या सुमारास कामामुळे मला प्रेस शो अटेन्ड करता येईनात आणि महानगरमधलं लिखाण बंद करावं लागलं. त्यानंतर लगेचच मला साप्ताहिक सकाळसाठी अप्रोच केलं ते शिल्पा शिवलकरने. शिल्पा , तेव्हा साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका असलेल्या संध्या टाकसाळे आणि संपादक सदा डुम्बरे यांच्याशी भेट झाली तेव्हा ते म्हणाले , प्रेस शोचं बंधन ठेवू नका. आत्ता प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाविषयी लिहीण्याची गरज नाही. सिनेमा हा धागा धरुन काहीही लिहिलत तरी चालेल.
त्यानंतर ही टीम बदलेपर्यंत मी साप्ताहिक सकाळमधे बॉलिवुड हॉलिवुड हे सदर लिहीलं. २०१० च्या सुरुवातीपर्यंत. ते बंद झालं ते टीम बदलली म्हणूनच. या लिखाणाने मला खूप समाधान दिलं, लिहीण्याला दिशा दिली, पण गंमत म्हणजे या सगळ्या कालावधीत आणि सदर आवडतय हे सकाळकडून आणि परिचितांकडून कळूनही इतर वाचक काय म्हणतोय याचा मला पत्ताच नव्हता. कारण आपला वाचक , हा प्रकाशनाशी पत्रव्यवहार करणार तर मतभेद व्यक्त करण्यासाठी. कौतुकासाठी, वा सकारात्मक सल्ल्यासाठी कोण एवढा वेळ घालवेल !
दरम्यान माझी एका वाचकाशी भेट झाली जो एका वृत्तपत्राशी संबंधित होता. त्याचं म्हणणं होतं की हे लिखाण अधिक आणि साप्ताहिक सकाळच्या परीघाबाहेरच्या तरुण पिढीपर्यंत पोचणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते ब्लॉग माध्यमातून प्रसिध्द करा. मी याला अंगभूत आळशीपणातून बराच काळ विरोध केला. अखेर या वाचकाने म्हंटलं की ठीक आहे. तुम्ही करणार नसाल तर मी तरी ब्लॉग सुरु करु का? मी म्हणालो ठीक आहे, आणि आजपासून सात वर्षांपूर्वी जानेवारी २०, २००८ ला आपला सिनेमास्कोप हा ब्लॉग सुरू झाला. यावर माझं बरच छोट्या स्वरुपातलं लिखाण आहे. आधी काही इतर लेखकांचं देण्याचाही प्रयत्न होता , पण नंतर त्यालाच वाटलं की एकच लेखक राहू दे. माझ्यासाठी याचं महत्व इतकं की पहिल्या प्रथम मला माझा वाचक सापडला. दिसला , बोलायला लागला. एक संवाद सुरु झाला जो आजही चालू आहे. मी चर्चा फेसबुकच्या माध्यमातून पुढे नेली तरी एक संग्रह, मुद्द्यांना तोंड फोडण्याची जागा , म्हणून ब्लॉग महत्वाचा आहे.
यात त्या निनावी वाचकाने पुष्कळ काम केलं . स्वत:चं नाव न देता त्याने ही सातही वर्ष ब्लॉग चालवला, अनेकांना तो माझा ब्लॉग म्हणूनच माहीत आहे. पण मीही त्यावर जाऊन कमेन्टना उत्तर देण्यापलीकडे काही करत नाही. पहिली चारेक वर्ष , म्हणजे आय पॅडने देवनागरी कीबोर्ड काढेपर्यंत तर तो लेख ऑपरेटही करायचा. पत्रकारितेत असणाऱ्या काहीजणांना आपला सिनेमास्कोप हा त्याने चालवलेला ब्लॉग म्हणून माहीत आहे, पण ब्लॉगवाचकांपैकी अनेकांना हे नाव नवीन आहे. मधल्या काळात त्याने स्वत:देखील काही प्रमाणात चित्रपट आणि साहित्यविषयक लिखाण केलं, जे अनेक जण आवडीने वाचतात. असं असूनही त्याने स्वत:चे लेखही या ब्लॉगवर टाकले नाहीत. या वाचकाचं नाव मी ब्लॉगवर प्रथमच जाहीरपणे देतोय आणि ते म्हणजे पंकज भोसले. त्याचं लोकसत्ता आणि लोकप्रभामधलं लिखाण अनेकाना परिचित आहे. त्याच्याशिवाय हा ब्लॉग झाला नसता. त्यामुळे ज्यांना ब्लॉग आवडतो त्यांनी माझ्यापेक्षा त्याचे आभार मानावेत.
सध्या ब्लॉगलिखाणात काहीशी दिरंगाई होतेय पण लवकरच ती मार्गावर येईलशी आशा आहे.
ब्लॉगच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पोस्ट करतोय ती मौजच्या दिवाळी अंकातल्या परिसंवादासाठी मी घेतलेली दिग्दर्शक परेश मोकाशींची ही मुलाखत.
बदल हा मुळापासूनच घडायला हवा !
परेश मोकाशी, मुलाखतकार- गणेश मतकरी
मी- आपला चित्रपट हा बराचसा पलायनवादी दृष्टीकोनातून आकार घेताना दिसतो. मग चित्रपट एक कला म्हणून काही प्रमाणात समाजावर अवलंबून आहे, किंवा चित्रपट आणि समाज हे वेळोवेळी एकमेकांपासून स्फूर्ती घेताना दिसतात असं म्हंटलं जातं, ते आपल्यासाठी कितपत खरं मानावं?
परेश - आहे ना,आपल्या चित्रपटांकडे पाहतानाही एक निरीक्षण म्हणून हे बऱ्याच प्रमाणात योग्यच आहे. मी असं म्हणेन की आपला चित्रपट पलायनवादी आहे कारण आपला समाजही एका परीने पलायनवादीच आहे. आता समाज पलायनवादी म्हणजे काय, तर उथळ, अप्रगल्भ विचारांचा, एखादी समस्या उद्भवली असता, तिच्या मुळाशी नं जाता वरवरची मलमपट्टी करणारा. आता या प्रकारच्या समाजाची जर त्याच भूमिकेतून केलेली मागणी असेल तर त्याच प्रकारचा पुरवठा होणार हे उघड आहे.अर्थातच, चार उदाहरणं अशी असतात, की जी आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर असतात. पण ती म्हणजे पूर्ण समाज नाही. त्यामुळे समाजाबद्दल बोलताना आपण सरासरीचाच विचार करायला हवा. तेव्हा बहुसंख्य चित्रपट हा मसालाप्रधान, पलायनवादी, एस्केपिस्ट या प्रकारचाच असणार कारण आपल्या समाजालाच तो अभिप्रेत आहे. आपल्याला 'पथेर पंचाली', किंवा 'जलसाघर' कुठे हवाय? असं दिसतंय का, की ते बुवा पंचवीस आठवडे चाललेयत, आणि उत्पन्नाचे रेकाॅर्ड ब्रेक करतायत, असं होत नाही. तेव्हा मुद्दा हाच आहे, की चित्रपटकर्ते आपापल्या वकुबानुसार, लायकीनुसार तुम्हाला शून्य ते शंभर, या रेंजचे चित्रपट देत असतात, पण समाज ठरवतो की त्याला कुठला चित्रपट हवा आहे. कुठला चित्रपट हिट आहे किंवा हिट करायचा.
मी- मागे जाऊन पाहायचं, तर आपल्याकडे पहिल्यांदा हे माध्यम आलं, तेव्हा समाजाची प्रतिक्रीया काय प्रकारची होती?
परेश- जर आपण भारतातल्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसांकडे पाहिलं, तर वाटतं की तेव्हाचा समाज तयार होता चित्रपट स्वीकारायला. आता समाज म्हणजे सर्वसामान्य माणूस असं जर आपण म्हंटलं तर त्यांना एरवीच ज्ञान विज्ञानाच्या पातळीवर आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडतायत, त्यांची खूप कमी कल्पना असते. ते खूप कमी वेळा अप टु डेट असतात. अगदी एखादी गोष्ट खूप सार्वत्रिक महत्वाची असेल, तरच सामान्य माणसाला तिची जाणीव होताना दिसते. एखाद्या विशिष्ट माध्यमात काय काम चाललय हे जोपर्यंत काहीतरी स्फोट होऊन त्यांच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्यांना ते कळत नाही. चित्रपटाच्या बाबतीत तसच झालं.आधीपासून लोककला, नाटक, संगीत या सगळ्या गोष्टी समाजामधे असूनदेखील चित्रपट ही गोष्ट तांत्रिक दृष्ट्या इतकी वेगळी आहे , की त्याचा अवेअरनेस आधीपासून असण्याचं काही कारण नव्हतं. नाटक बऱ्यापैकी प्रस्थापित होतं, साहित्य , संगीत बर््यापैकी प्रस्थापित होतं, अगदी शतकानुशतकं, पण याच सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असलेलं माध्यम असूनदेखील चित्रपट स्वीकारताना प्रथम थोडा धक्का बसला. कारण तांत्रिकदृष्ट्या ते खूप वेगळं होतं. तेव्हा निर्जीव पडद्यावरची ती आगगाडी आपल्या अंगावर येऊन आपल्याला चिरडेल की काय या भीतीने लोकं उठून जायची, बैल मुसंडी मारुन आपली शिंग भोसकेल की काय अशी त्यांना भीती वाटायची ! सुरुवातीची एक दोन वर्ष हे प्रकार झाले, पण ते प्रामुख्याने त्या तंत्राला घाबरुन दिलेली प्रतिक्रिया, या स्वरुपाचे होते. चित्रपटात घटक तेच, ओळखीचे होते. तेच नाट्य होतं, त्यांना परिचित अशा पुराणकथांवरच आपले पहिले सारे चित्रपट आधारलेले होते. तरीही एक अचंबा, आश्चर्य, अशी ही प्रतिक्रिया होती. पण हा एक तांत्रिक धक्का सोडला तर हे माध्यम स्वीकारायला समाज पुरेसा पिकलेला होता. कारण केवळ कला म्हणून, किंवा केवळ नाटक-साहित्यापासून चित्रपटापर्यंत उडी असं या घडामोडीकडे पाहण्यापेक्षा , या दिवसात समाजात वेगवेगळ्या वैज्ञानिक गोष्टींचा अंतर्भाव होत चालला होता, ही प्रगती लोकांना सरावाची झाली होती, या मुद्द्याकडे आपल्याला यावं लागतं.
आता आगगाडीची सुरुवात १८५३ मधे झाली, म्हणजे एक अवेअरनेस तिथे निर्माण झाला. सुरुवातीला आगाडीलाही लोकं अशीच घाबरली होती. असा कोणताही मोठा बदल होताना भीड चेपण्याचा एक काळ जावा लागतो, तर तो चित्रपटांबाबत बऱ्यापैकी झालेला होता. या काळात ध्वनीमुद्रण व्हायला सुरुवात झाली होती, टेलिफोन्स कुठेकुठे होते, ट्रेन दिसत होती, ट्राम दिसत होती. समाज हा थोडा या औद्योगिक क्रांतिला सरावत चालला होता. त्यामुळे नव्याचा धक्का फार काळ टिकला नाही आणि लोककला ,रंगभूमी यांविषयीचा अवेअरनेस हे माध्यम जनतेने पटकन स्वीकारायला उपयोगी पडला. हे सगळं असंच छान, खोटं खोटं चित्रीत केलेलं असतं हे समाजाच्या लक्षात यायला काही फार वेळ गेला नाही.
मी- या काळात स्त्रीभूमिकांकडे पाहाण्याची जी दृष्टी होती , यांवरुन तत्कालिन समाजाविषयी काही निष्कर्ष निघू शकतील का?
परेश- तेव्हाच्या चित्रपटांमधे स्त्रीयांना झालेला विरोध हा एक प्रकारे प्रातिनिधिक मानता येईल कारण एकूणच समाजात , इतर क्षेत्रात, स्त्रीयांचं जे स्थान होतं ते चित्रपटांमधे रिफ्लेक्ट झालं. चित्रपटांनी खास स्त्रीयांना वेगळं काढलं असं मात्र झालेलं नाही. पहिला चित्रपटकर्ता फाळके हा स्वतःच्या बायकोला तारामतीची भूमिका करायला गळ घालत होता आणि ती स्वतः सामाजिक दडपणापोटी नकार देत होती असं या पहिल्या दिग्दर्शकाचं थोडं प्रोग्रेसिव्हच चित्र उभं करता येईल . अर्थात मघा म्हणाल्याप्रमाणे फाळकेंसारखी चार उदाहरणं नेहमीच समाजात असतात जी काळाच्या थोडीशी पुढे असतात. ही माणसं समाजाची बंधनं मानणारी नसतात. प्रथा परंपरा मानणारी नसतात. पण त्यावरुन आपण संपूर्ण समाजाबद्दल निष्कर्ष काढू शकत नाही. आणि तेव्हाचच का? आपण जर त्या काळातलं स्त्रीयांचं स्थान आणि आताचं यात तुलना केली तर फार फरक पडला नाही असं म्हणता येईल . सिनेमा हा अजूनही पुरूषप्रधान आहे आणि स्त्रीयांच्या वाट्याला दुय्यम भूमिकाच येतात. पण हे अपेक्षित आहे. आपली संस्कृती ज्या प्रकारची आहे तिच्याकडे पाहाता प्रमुख भूमिकेत पुरुषच असणार. कधीतरी याला अपवाद असणारे चित्रपट येतातही पण सरासरी पहाता आपला चित्रपट हा असाच आहे. पुरुषप्रधान, त्याच मूल्यांची जपणूक करणारा, तेच संस्कार ,त्याच मूल्यांचा खुंटा हलवून बळकट करणारा. आता असाच जर समाज आहे, मग आपण चित्रपटच एकदम खूप वेगळा असेल असं म्हणू शकत नाही. जे सर्व क्षेत्रात आहे , तेच आपल्याला इथेही दिसणार.त्यामुळे आजदेखील, स्त्रीभूमिका काय प्रकारच्या असतात, तर वरवरच्या, काॅस्मेटीक, अगदी शोभेच्या बाहुल्या आणि आयटेम गर्ल्स, हाच प्रकार. आजची नायिकाही आपल्याला 'आयटेम गर्ल'च्याच रुपात आलेली दिसते, पण याचं उत्तर केवळ चित्रपटांच्या नीतीमत्तेशी जोडलेलं नाही, तर ते सामाजिक नीतीमत्तेशी जोडलेलं आहे.
शोधायला गेलो तर या चित्रपटांमधेही काही चांगली उदाहरणं सापडतीलच. म्हणजे अगदी 'हंटरवाली' पासून 'चारुलता'पर्यंत , किंवा अगदी आता येऊ घातलेल्या 'मेरी काॅम' सारख्या चित्रपटापर्यंत नावं आहेत. क्वचित काही महत्वाच्या स्टार्सशी सुध्दा ती आपण जोडू शकतो.पण पुन्हा हे स्त्रीप्रधान चित्रपटही त्यातली ही वेगळी दृष्टी सोडल्यावर चित्रपट म्हणून कितपत गुणवान आहेत ,हे देखील पाहायला हवं.
खरं म्हणजे केवळ चित्रपटाचं स्त्रीप्रधान, स्त्रीवादी असणं याच मुद्द्यासंबंधात नाही, पण कोणत्याही सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटाबद्दल हा गुणवत्तेचा प्रश्नच आपल्याला पडत नाही. आपण या चित्रपटांच्या सामाजिक बाजूमधेच एवढे अडकलेले असतो की चित्रपट म्हणून गुणवत्तेचं काय, हा प्रश्नच आपल्याला पडत नाही. सामाजिक किंवा वास्तववादी किंवा गंभीर चित्रपटांना खूप कन्सेशन्स कळत नकळत दिली जातात. एकदा का चित्रपट स्त्रीप्रधान ,किंवा सोश्योपोलिटिकल आहे, असं जाहीर केलं की पुढे विषयच संपतो. आज सगळ्याच गोष्टींना, म्हणजे चित्रपटांपासून ते चित्रपट समीक्षेपर्यंत प्रत्येक गोष्टीला आपण इतकं वरवर ठेवलेलं आहे,की कशाकडेच आपण फार खोलात जाऊन पहात नाही. आता याचा अर्थ आपण तसं मुद्दाम करतो असंही नाही, कदाचित ते आपोआपच आपल्या हातून होतय अशी सवलत आपण आपल्यालाच देऊया. पण आपला चित्रपट सुधारायचा, तर कधीतरी हा प्रश्न धसाला लावावाच लागेल.
मी- प्रेक्षक हा कायमच सामान्य आणि अभिरुचीसंपन्न असा विभागला गेलाय का? तो जाणं स्वाभाविक किंवा नैसर्गिक मानता येईल का?
परेश- तसा तो विभागला गेला होता , विभागला गेला आहे आणि कायमच विभागला जाईल असं मला वाटतं. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिनही काळात हे विधान लागू आहे. याचं कारण म्हणजे प्रत्येकाचं संगोपन, त्याला मिळालेलं वातावरण हे वेगळंच असतं. तुमचे पालक, मित्रमंडळ , भवताल या सगळ्याचा तुमची मतं विकसीत होण्यात हात असतो. आता एखाद्या चांगली अभिरुची असणार््या, शहरी, सुखवस्तू घरातल्या मुलाला ज्या प्रकारच्या सुखसुविधा, साधनसामुग्री उपलब्ध असेल त्यातून त्याची चित्रपटविषयक मतं तयार होतील, सामाजिक जाणीवा विकसीत होतील. आता तशीच ती बीड जिल्ह्यातल्या किंवा अकोल्यातल्या छोट्याश्या खेडेगावातल्या मुलाला होईल का? नक्कीच नाही. मग तो तद्दन कमर्शिअल, बाॅलिवुड वळणाच्या चित्रपटांकडेच वळणार. त्यामुळे हा केवळ वैयक्तिक अभिरुचीचा प्रश्न नसून, तसा आर्थिक-सामाजिक प्रश्नदेखील आहे. त्यामुळे पुरेसा अवेअरनेस, आणि एक्स्पोजर नसल्यामुळे यापुढेही, समाजाचा बराचसा, म्हणजे अगदी नव्वद टक्के भाग, हा 'सामान्य प्रेक्षक' या वर्गाअंतर्गतच राहील. केवळ पाच दहा टक्के लोकांनाच, ज्यांना त्यांच्यापाशी असलेल्या साधनसामग्रीने म्हणा आर्थिक परिस्थितीने म्हणा, कौटुंबिक पार्श्वभूमीने म्हणा, हा अवेअरनेस निर्माण झालाय. आता त्यांची आवड, अभिरुची ही वेगळीच, अगदी 'विकसीत' नाही म्हंटलं, तरी वेगळी असणार हे निश्चित.
आता प्रत्येकाला उपलब्ध संधी, ज्याची त्याची पार्श्वभूमी आणि भवतालचं वातावरण यावरुन त्याच्या व्यक्ती म्हणून विकासाची पातळी ठरत असल्याने , ते तसं स्वाभाविकपेक्षा अधिक सहाजिक होणारं म्हणावं लागेल. पण तरीही, शेवटी तुमच्या नैसर्गिक आवडीनिवडीचा भागही त्यात येतोच. एखाद्या माणसाला चांगल्या घरात संस्कारात ,वातावरणात वाढून, चांगल्या कलास्वादाचं प्रशिक्षण मिळूनही त्याला 'अमर अकबर अँथनी' हाच सर्वोत्तम चित्रपट आहे असं वाटतं, तेव्हा आपण काय करणार ? मग ते निसर्गावरच सोडावं लागतं. तिथे मग प्रत्येकाची निरीक्षणक्षमता आणि आकलनक्षमता किती आहे , याला महत्व येतं. तुमचं जर भांडंच लहान असेल, तर ते भरुन गेल्यावर त्याहून मोठ्या भांड्याची क्षमता असणारे सिनेमे,तुम्हाला आत्मसातच करता येणार नाहीत.
यात आणखी दुर्दैवाचा भाग असा, की आपण चित्रपटातल्या स्त्रीविषयी असलेली संवेदना, जातपात, धार्मिक सामंजस्य अशा ज्या सामाजिक प्रश्नांविषयी बोलतो, ते समाजातल्या ज्या वर्गाशी जोडलेले आहेत, नेमका त्याच वर्गातला प्रेक्षक, हा वरवरच्या, उथळ करमणुकीला प्राधान्य देतो.
मी-. पण या समस्यांपासून दूर जायचं म्हणूनच हा प्रेक्षक पलायनवादी करमणूक स्वीकारत असेल का?
परेश- मला नाही तसं वाटत. म्हणजे केवळ आपल्या प्रश्नापासून दूर जायचं हे चित्रपट पाहाण्यामागचं एकमेव कारण नाही असू शकत.आता या समाजाला खरच माहितेय का, त्याला कुठले प्रश्न पडलेयत? मुळात आपल्या समोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? उदाहरणार्थ, ' माझी नोकरी गेलीय', ही समस्या आहे. मान्य, की ही अगदी थेट आणि बटबटीत समस्या आहे. बरं आता ती नोकरी कशामुळे गेलीय? त्याला ग्लोबलायजेशन कारणीभूत आहे का ? किंवा, भारताचंच एखाद्या दुसऱ्या देशाबरोबर झालेलं काॅन्ट्रॅक्ट कारणीभूत आहे का? या अशा गोष्टी आपल्याला माहित असतात का? आजकाल या आंतरराष्ट्रीय व्यवहाराचाही आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.आपल्याला हे माहित नसतं.आपल्याला फक्त 'या शेटने मला काढलं' एवढच दिसतं. पण तो शेट तुला काढतो ते का? त्याला काही हौस नाहीये ना? लोकांचे शिव्याशाप कोण कशाला घेईल? त्यालाही माहितेय अशा पन्नास लोकांना काढलं तर उद्या त्याचं घर फोडतील ते ! त्याला आपल्या सुरक्षिततेचा विचारही करायलाच हवा. म्हणजे कोणी हौस म्हणून कोणाला काढत नाही. पण काही गणितच अशी असतात समाजामधे- दरवेळी आंतरराष्ट्रिय असतील असं नाही, राष्ट्रिय पातळीवरही, भ्रष्टाचार आणि अनेक थातूरमातूर मुद्दे असे असतात की त्याचा परिणाम हा थेट एखाद्या शेतकऱ्याच्या आत्महत्येवरही होऊ शकतो. आणि त्या पिडीत वर्गातून येणारा प्रेक्षकच त्यांच्याकडे साहानुभूतीने पाहाणाऱ्या सामाजिक चित्रपटाना बाजूला टाकून, आजच्या भडक व्यावसायिक चित्रपटाला सहजपणे चांगलं म्हणून जातो. हे सगळं इतकं विसंगत आहे.
त्यामुळे मी म्हणतो, की केवळ आत्ता मला त्रास होतोय, काहीतरी करमणूक पाहिजे म्हणून हे अमुक प्रकारचे चित्रपट पाहिले जात नाहीत, तर मुळातच त्यांच्यापलीकडे जायला जी समजुतीची पातळी हवी तिच इथे नाही.या ज्या तेवढ्यापुरती करमणुक वगैरे संकल्पना आहेत, त्या स्पष्टीकरण असल्यासारख्या आपण इथे लावतो, हेच चुकीचं आहे.
आणि पुन्हा करमणुक म्हणजे तरी काय? तुमची करमणुक ही 'पथेर पंचाली' बघूनही होऊ शकते, जर तुमच्या अभिरुचीची पातळी तिथवर आली असेल तर. प्रत्येकासाठी करमणूक, अगदी 'टाईमपास' हा शब्द वापरायलाही हरकत नाही, तर टाईमपास हा वेगळा असू शकतो. आज मला चित्रपट पाहाताना 'धूम, शोले, अमर अकबर अँथनी' काही देणार नाहीत, पण 'पथेर पंचाली' देऊ शकतो. 'इव्हान द टेरीबल' माझी करमणूक करतो. 'चारुलता', किंवा 'जनअरण्य' माझी करमणूक करतात. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाची करमणूक काय , हे जो तो माणूस ठरवतो. तुझ्यासाठी दोनशे आणि पाचशे कोटी मिळवणारा चित्रपट ही करमणूक असेल, तर माझ्यासाठी काहीतरी वेगळं. पण म्हणजेच मुळात आपण चित्रपट पाहातो, तो करमणूक म्हणूनच, सामाजिक जाणीवा विस्तारण्यासाठी नाही.
मी- पण मग असं म्हणायचं का की चित्रपट मुळात पाहिला जातो, तो करमणुक म्हणून पण त्यातून अप्रत्यक्षपणे सोशल अवेअरनेस पसरण्याची शक्यता असू शकते?
परेश- तसंच काही नाही. माझ्या मते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, तो मुद्दाच गौण आहे. प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्य किंवा शक्तीस्थानं वेगळी असतात. आता या माध्यमाचं ध्येय काय असावं हे कोण ठरवणार? आपण प्रत्येक वेळी बोलतो ते आशयाविषयी. साहित्यातही तसंच. पुस्तकाचा विषय काय आहे? त्यात काही सामाजिक सुधारणांचा अंतर्भाव आहे का? रेडिओवरच्या श्रुतीकेतही तेच- काही सोश्योपोलिटिकल अँगल आहे का? तेच चित्रपटात, काही समस्याप्रधान आहे का? प्रश्न माडणार चित्रपट आहे का? समाजाला काही पुरोगामी दिशा देईल का? म्हणजे, आपण माध्यमाकडे पाहाताना फारच कन्टेन्ट ओरिएन्टेड नजरेतून पाहातोय, असं माझं एक निरीक्षण आहे. आणि तिथेच माझा थोडा मतभेद आहे. कशावरुन हे चित्रपट बनवणाऱ्यांचं हेच उद्दीष्ट आहे? या माध्यमातली चांगली कलाकृती बनवणं हा उद्देश कशावरुन नाही? माझं मत हे आहे, की त्या माध्यमातली जी काय वैशिष्ट्य , सौदर्यस्थानं, शक्तीस्थानं आहेत त्यांचा वापर करुन त्या माध्यमातली चांगली कलाकृती तयार करणं, हेच खरं उद्दीष्ट आहे. आणि या उद्दीष्टात किती कलाकृती यशस्वी होतात, यावर त्या समाजाची प्रगल्भता ठरते.
जर तुमच्या समाजात शंभरात नव्वद कलाकृती या 'इव्हान द टेरीबल' किंवा 'सोलरीस' सारख्या असतील, तर त्या समाजाच्या प्रगल्भतेेची कल्पना केलेली बरी. युटोपिअनच म्हणायला हवं त्याला.
आता कधीकधी काळाचा प्रभाव असतो, किंवा विषयाचा प्रभाव असतो, त्यातून तुम्ही कलाकृती निर्माण करता. अर्थात ते तुमचं स्वातंत्र्य आहे. पण केवळ समाजसुधारणेचं तत्व सांगणारी कलाकृती म्हणून ती चागली आहे का? केवळ स्त्रीसमस्या प्रधान आहे, या नावाखाली एखादा चित्रपट चांगला ठरेल का? किंवा कथा , कादंबरीदेखील. असे हिशेब केले की गडबड व्हायला सुरुवात होते.
आता घाशीराम कोतवाल हे चांगलं नाटक का आहे? केवळ ते नाना फडणवीसावर टिका करणारं आहे म्हणून? अर्थातच नाही. ती टीका त्या विषयाचा वरवरचा भाग आहे. पण ज्याप्रकारे एक नाटक म्हणून ते उभं राहातं, म्हणजे त्यात जसा संहितेचा भाग आला तसाच प्रयोगाचाही, त्याचा अॅनॅलिसिस कसा करायचा? तर केवळ ते पेशवाईविरोधी आहे किंवा एका भ्रष्टाचाराला वाचा फोडणारं आहे म्हणून ते चांगलं नाही, तर ते ज्या प्रकारे सादर केलं जातं त्यात त्याच्या गुणवत्तेचा मोठा भाग आहे. आता दुसर््या बाजूला तेंडुलकरांचच सखाराम बाईंडर! त्यात कुठे कसला सामाजिक संदेश आहे? तरीही ते आपण चांगलं मानतोच ना. त्यामुळे अखेर ती कलाकृती कशी आहे याला सर्वात अधिक महत्व मिळायलाच हवं. आणि त्यासाठी शेवटी आपल्याला सामाजिक विचारांचा चष्मा बाजूला काढूनच त्यांच्याकडे पहायला हवं. आपल्याकडे समीक्षकांचीही याबातीत गफलत होते आणि पुन्हा पुन्हा आपण सामाजिक विचाराकडे येऊन थांबतो.
मी- आपला चित्रपट हा सर्व संघर्षाला 'इमोशनल मेलोड्रामा'च्या फाॅर्म्युलात आणून बसवतो, त्यामागे काय कारण असावं?
परेश- मला वाटतं आपला चित्रपट ज्या फाॅर्म्युलात बसतो, त्याला नुसता मेलोड्रामा म्हणणं अधिक योग्य वाटतं. तो केवळ इमोशनल असेलसं नाही, कसाही असू शकेल. थोडक्यात 'बटबटीत भडकनाट्य', असं आपण म्हणू शकतो. त्याचं कारण आपल्या प्रेक्षकाच्या आवडीनिवडीशी जोडलेलं आहे. आपला जो नव्वद टक्क्याचा सामान्य प्रेक्षक आहे, त्याला भडकनाट्यच आकर्षित करतात. साधं, संयत नाट्य असेल, तर आकर्षित नाही करणार. त्याशिवाय रचनेचा, आलेखाचा एक फाॅर्मॅट असतो जो समीक्षकांपर्यंत सगळ्यांच्याच डोक्यात असतो. म्हणजे टिपीकली सिनेमा कोणत्या पाॅइन्टला सुरु होतो, मग मध्य, मग प्री क्लायमॅक्स, मग क्लायमॅक्स, मग अॅन्टीक्लायमॅक्स, हे सारं आपण एका फाॅर्म्युलात बसवायचा प्रयत्न करतो की की काय असंही वाटत राहातं. पण या प्रकारच्या आलेखामागे न धावता िचत्रपट करणारेही काही खटपटी करत असतात, त्यांची पात्रं मग टिपीकल पात्रांसारखी नसतात, त्यांचा संघर्ष हा टिपीकल संघर्षासारखा नसतो, म्हणजे गरजेपुरता निश्चित असतो, पण तो मुद्दाम बटबटीत केला जात नाही, त्याला महिरपी कंस वगैरे घातले जात नाहीत, की पहा, या किती मोठ्या व्यक्ती होत्या, त्यांच्या आयुष्यात कशा समस्या आल्या आणि त्याला त्यांनी कसं तोंड दिलं. पण ते क्वचित. सामान्यतः आपल्याला अशी काहीतरी पोजच अपेक्षित असते. मग असे रचलेले सगळे टिपीकल चरित्रपटही मेलोड्रामा मधेच मानतो मी. म्हणजे केवळ अमिताभ बच्चन निरुपा राॅयच्या मांडीवर मरतोय हाच मेलोड्रामा नाहीये, तर गांधींना आपण सिनेमात ज्या प्रकारे प्राॅजेक्ट केलय, बोसांना ज्या प्रकारे करतो, आंबेडकर असतील, फुले असतील, इतरही. 'लार्जर दॅन लाईफ' हा एक जो सेन्स असतो मेलोड्रामामधे, तो या सगळ्या सिनेमांनाच लागू होतो. आता हे चित्रपट मला कन्विन्सिंग वाटत नाहीत, पण काहीजणांच्या, खरं तर बहुसंख्यांच्या डोळ्यातून ते चित्रपट अश्रू काढतात. निर्मिती करणारा बहुतेक वर्ग हा पोटभरु आहे, गल्लाभरु आहे, त्यामुळे त्याला गल्ल्याकडे लक्ष द्यायलाच लागतं. त्यांचे पाच कोटी, दहा कोटी , खरंतर कधीकधी पन्नास आणि शंभर कोटीही स्टेकला असतात, मग अशा परिस्थितीत तुम्ही जे 'ट्राईड अॅन्ड टेस्टेड' आहे तिथेच जाणार. तुमचा सर्व्हायल इन्स्टिन्क्ट तिथेही लागू होणार. क्वचित एखादा माणूस असेल की जो सर्वस्व पणाला लावून एक चित्रपट तयार करेल, परिणामांची पर्वा न करता. पण ते अपवाद.
पण बर््याच वेळेला हे इन्टेन्शन ठेवूनही, म्हणजे कल्पना सिम्प्लिफाय करुन, किंवा प्रेक्षकाना आवडेल असाच चित्रपट करायचं ठरवून, आणि तशीच आखणी करुनही, तुमचा चित्रपट पडतो. आणि मग तिथे आपल्याला चित्रपटाच्या कलाकृती म्हणून असलेल्या गुणवत्तेकडे वळावं लागतं. डाकूपट इतके आले, पण 'शोले', किंवा 'मेरा गाँव मेरा देश'च तुमच्या का लक्षात राहातो? लग्नपट इतके आहेत. का नाही सगळ्यानी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सारखं यश मिळवलं? तर त्याचं उत्तर म्हणजे या चित्रपटांमधे जुळून आलली जी एक नॅरेटीव्ह व्हॅल्यू आहे, ती इतरांपेक्षा अधिक प्रभावी ठरते.
मी- या सगळ्याबरोबर चित्रपट जे सांगतोय ते आणि तत्कालिन समाजाची ते समजून घेण्याची पातळी याचा ते ते चित्रपट खास जास्त चालण्याशी काही संबंध असावा का? खासकरुन ' दिलवाले ' सारख्या चित्रपटाबाबत असं वाटत नाही का?
परेश- तसा तो थोडा आहेच. अमुक चित्रपट अमुक साली येणं यात एक काळत्व आहेच. त्या त्या काळात ती ती गोष्ट जुळून येते आपण म्हणतो, तसय. त्यामुळेच आपण काही कलाकृतींना काळाच्या पुढच्या म्हणतो ना? आता 'जाने भी दो यारो' चित्रपटाविषयी आपल्याला वाटतं ना, की अरे, कदाचित आज आला असता तर फ्रेश सिनेमा म्हणून डोक्यावर घेतला असता. अर्थात यात स्टारकास्ट वगैरे सारख्या अनेक गोष्टी असतात. कदाचित आजच्या काळातही इरफान, नवाजुद्दीन च्या प्रकारचे वेगळे चित्रपट करणारे स्टार्स मिळाले असते तरच तो चालला असता. याचं थोडं कारण हे की आपण नकळत चित्रपटात उघड दिसणार््या गोष्टीच पहातो. ज्या प्रकारे त्यातलं सटायर गुंफलय त्याला आपण तेवढे महत्व देत नाही. आपल्या चाललेल्या काॅमेडी बघितला तरीही हेच दिसेल. आता 'गोलमाल' - इतपत गुंतागुंत आपण चालवून घेऊ शकतो. त्यापुढे जाऊन 'अंगुर' आपल्याला पचत नाही. पण हे काळाचं गणित लक्षात घेऊनही मी एकूण कलाकृती कशी बांधली गेली आहे, यालाच अधिक महत्व देईन.
त्यात लेखनासारखे मुद्दे आहेतच, वर संगीत, हा आपल्याकडला लोकप्रिय चित्रपटांतला एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक चित्रपट हे केवळ संगीताने खेचून खेचून काठावर पास केले आहेत. किंवा काठावर पास होणार््यांना खूप जास्त यश मिळालय. तेव्हा मग या स्वतंत्र घटकांचाही विचार व्हायला हवा, जे एका परीने चित्रपटबाह्य घटक आहेत, पण ते आपल्याकडे नेहमीच असल्याने त्यांचं एकत्र गाठोडं बांधलं जातं. माझं हे नेहमीचं निरीक्षण आहे की आपल्या चित्रपटाच्या दर्जापेक्षा त्यातल्या संगीताचा दर्जा हा अधिक वरचा असतो. आणि हे विधान मी गुरुदत्तच्या चित्रपटांनाही लागू करीन. असो.
तर हे असे वेगवेगळे घटक चित्रपटात असल्याने ते रसायन जुळून येणं हे फार महत्वाचं असतं. आणि एकदा ते जुळून आलं, तर ते पुन्हा रिपीट करणं फार कठीण असतं. कारण ते काॅन्शसली केलेलं नसतं. एखाद्या रे किंवा शांतारामलाच ते तसं करणं जमतं. ज्या संवेदनशीलतेने शातारामांनी 'कुंकू' केलाय तीच संवेदनशीलता 'माणूस' मधेही दिसते, काही प्रमाणात 'शेजारी' मधेही दिसते. पुढे वरखाली होतं, पण निदान काही चित्रपटांमधे हे सातत्य दिसू शकतं. रेंच्या 'पथेर पंचाली' चा सूर 'अपुर संसार' मधे दिसतो, 'जन अरण्य' मधे दिसतो. सर्व दिग्दर्शकांकडे हे सातत्य दिसत नाही. त्यामुळे श्रेय द्यायचं तर मी बांधणीलाच देईन. प्रेक्षकांचा प्रतिसाद काय असेल हे कोणीच आधी सांगू शकत नाही. पण तो सकारात्मक असणं हे त्यांना बांधणी कितपत आकर्षक वाटते यावरच ठरतं.
मी- आजचा चित्रपट हा सजगपणे समाजाचं निरीक्षण का करत नसावा?
परेश- आजचा चित्रपट समाजाचं निरीक्षण करत नाही कारण मागणी तसा पुरवठा. पण निरीक्षण म्हणजे केवळ कन्टेन्ट धरायचा का? मग 'जाने भी दो यारो' मधलं निरीक्षण हे निरीक्षण नाही का? खरं तर आहे, पण जेव्हा आपण समाजाबद्दल बोलणाऱ्या चित्रपटांची उदाहरणं आपण पाहातो तेव्हा ती प्रामुख्याने वास्तववादी सामाजिक चित्रपटांची असतात. मग 'निशांत' किंवा 'मन्थन' सारखे चित्रपटच तुमच्या डोळ्यासमोर येतात. 'जाने भी दो यारो' तही समाजाचं निरीक्षण, परीक्षण आहेच पण वास्तववादी चित्रपटांच्या तुलनेत, अशा प्रकारच्या विनोदाला समीक्षकांच्या मोठ्या वर्गात स्थान नाही. एकूणच विनोद, हास्यरस आपल्याकडे सर्वात जास्त लोकप्रिय पण सर्वात कमी विश्लेषण झालेला, असा राहिला आहे.
समाजाचं वस्तुनिष्ठ निरीक्षण करणारा चित्रपट हा क्वचित त्या त्या दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनाशी जोडलेला आहे पण त्यांचं एकूण प्रमाण अतिशय कमी आहे. १९१३ ते २०१४ या कालावधीत कमी अधिक फरकाने दरवर्षी हेच घडत आलय की त्यातल्यात्यात लोकरंजन होईल अशा कथा, असे विषय निवडूनच चित्रपट होत आले आहेत, याचं कारण मुळातच चित्रपटांसाठी लागणारी गुंतवणूक आणि ती परत मिळण्याची काळजी. त्यामुळे मग 'आपला चित्रपट लोकप्रिय व्हावा' या इच्छेने चित्रपट तयार करणं हे आपलं प्रमुख उद्दीष्ट राहिलेलं आहे. आणि म्हणूनच ,मधेच 'पथेर पंचाली' सारख्या सिनेमाला मिळालेलं यश, 'निशांत'सारख्या, 'चक्र'सारख्या, 'अर्धसत्य'सारख्या सिनेमाला मिळालेलं यश हे आपल्याला अधिक सुखावह वाटतं. विषयही चांगला सामाजिक वळणाचा आहे, बांधलाही चांगला गेलाय आणि सामान्य प्रेक्षकालाही तो भूरळ घालतोय, म्हणज थोडक्यात सगळंच जमून आलं की असे चित्रपट तयार होतात.
मी- मग सामान्यतः चित्रपट समाजाचं यथोचित चित्र दाखवत नाही असं म्हणायचं का?
परेश-जर वास्तववादी पध्दतीने केलेलं समाजाचं चित्रण म्हणायचं असेल तर फार चित्रपटात ते दिसत नाही हे खरंच आहे, पण मी तर म्हणेन की जे पाॅप्युलर सिनेमे आहेत, त्यातच समाजाचं यथोचित चित्रण आहे. कारण आपला समाज हा असाच आहे. आपल्या आजूबाजूला दिसणार््या बलात्काराच्या घटना घ्या, भ्रष्टाचाराच्या घटना घ्या , काय आहे हे? हा अप्रगल्भपणा नाही ? हा उथळपणा नाही ? हा इनसेन्सिटीवपणा नाही ? मग आपण तो फक्त चित्रपटांना का लागू करतोय? सिनेमा संवेदनशील नाही, पण कसा असणार संवेदनशील, जर तो तुमच्या समाजाचं थेट प्रतिबिंबच असेल?
मी- प्रतिबिंब म्हणजे थेट चित्रण या अर्थी, की समाजाच्या मानसिकतेचं चित्रण या अर्थी?
परेश- सगळंच. आता हे उघड आहे, की कोणी बलात्काराचं समर्थन करणारा चित्रपट नाही करणार. भ्रष्टाचार कसा करावा, याची शिकवणी देणारा चित्रपट नाही करणार. शेवटी हिरो हा आदर्शच असतो आणि तो व्हिलनचं पारिपत्य करतो हा फाॅर्म्युला मान्य आहे. आता याच दृष्टीने पहायचं, तर समाजालासुध्दा जर कोणी गोष्टी सुलभपणे मांडून दिल्या तर हव्याच आहेत ना ! पण ते त्यांना स्वतःला करायचं नाहीये तर कुणातरी 'हिरो'ने ते करायला हवय. हाच प्राॅब्लेम आहे.
आपल्याकडे आज सामाजिक चळवळच अस्तित्वात नाही असं जे मोठमोठ्या समाजशास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे, ते का आहे? सत्तरच्या दशकापर्यंत तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी होत्या , आज त्यातली एकही उरलेली नाही. समस्या आहेत, समस्यांवर काम करणारी चार चांगली डोकी आहेत, त्यांनाच जर चळवळ म्हणायचं असेल तर म्हणा, पण ते केवळ तुमच्या मनाचं समाधान होईल. आता सामान्य प्रेक्षक सोड, पण ही जी काम करणारी माणसं आहेत त्यांना तरी आपला जो सामाजिक जाणीवा असणारा चित्रपट असतो, तो आवडेल हे कोणी सांगितलय? शेवटी ते त्यांच्या कामाच्या क्षेत्रात मोठे जरुर असतात पण त्यामुळे त्यांची चित्रपटातली अभिरुचीही उच्च असेल कशावरुन? आपण आपलं गृहीत धरतो, की आपल्याला जो चित्रपट चांगला वाटतो, तोच सगळ्यांना वाटत असेल असं. पण तसं नसतं आणि देअर इज नथिंग राँग इन दॅट. तेव्हा, केवळ सोश्योपोलिटिकल विषय असलेला प्रत्येक सिनेमा हा चांगला असतोच असं नाही, तसंच, प्रत्येक सोश्योपाॅलिटीकल कार्यकर्ता हा चांगला रसिक असेल असंही नाही. त्याची आवड 'शोले' आणि 'दीवार' हीच असू शकते. आणि त्यात काय गैर आहे? सिनेमा हे काही त्याचं क्षेत्र नाही. ते क्वचित चित्रपट बघणार, त्यातून त्यांची अभिरुची अशी कितीशी डेव्हलप होणार? त्यामुळे जो न्याय आपण सर्वसामान्य प्रेक्षकाला लावू तोच सामाजिक कार्यकर्त्यांनाही लागू पडतो. त्यांची आवडही इतरांपेक्षा वेगळी असेलसं नाही. आपल्याला त्यातली माहीती असते कारण आपण त्या क्षेत्रातले असतो. आपल्याला तरी आपल्या क्षेत्राबाहेरचं काय ज्ञान असतं? उद्या आपल्याला कोणी लेथ मशीन चालवायला सांगितलं तर येणार आहे का चालवायला?
आपल्या समाजात अप्रगल्भता असण्याचं माझ्या दृष्टीनी सर्वात मोठं लक्षण म्हणजे काही विशिष्ट गोष्टींनाच ग्लॅमर देण्याची वृत्ती. टिव्हीवर, वर्तमानपत्रात, इन्टरनेटवर पाहिलं तर चित्रपट किंवा फॅशन माॅडेलिंगसारखं काहीतरी, क्रिकेट किंवा फुटबाॅल वगैरे सारखे इतर खेळ यांनाच महत्व आहे असं दिसतं. त्यामुळे आज मेसी तुमचा तारणहार आहे, रोनाल्डो तुमचा तारणहार आहे. बांग्लादेशात जाऊन संचयनीचं काम करणारा मांणूस तुमचा कोणी नाही. त्याला तेवढं एक्स्पोजर नाही. उल्का महाजनला तेवढं एक्पोजर नाही. किशोर ढमालेला तेवढे एक्स्पोजर नाही. ते कोण आहेत हेदेखील बहुसंख्य लोकांना माहीत नाही. जोपर्यंत आपण सर्वांना एकाच पातळीवर आणण्याचा बॅलन्स साधत नाही, तोपर्यंत समाजात ती प्रगल्भता आलीय हे सिध्द होणार नाही. जेव्हा असे कार्यकर्ते, आपापल्या कामात कुशल असलेले लोहार-सुतार, आणि इतरही क्षेत्रातल्या अशाच अफाट माणसांना आपला समाज हिरो मानेल, तो सुदिन !
मी- सेन्साॅरशिपमुळे येणारी बंधनं चित्रपटांच्या विकासाआड येऊ शकतात का?
परेश- जेवढ्या अधिक प्रकारची सेन्साॅरशिप तुमत्या समाजात आहे, तेवढा तुमचा समाज अप्रगल्भ, कमी वकूब असलेला , असाच असतो आणि तिथेही सामान्य आणि अभिरुचीसंपन्न हा भेद तुम्हाला दिसतो.
पण त्यापलीकडचं बोलायचं, तर सेन्साॅरशिप असावी की नसावी, व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य या गोष्टी केवळ चार लोकांत जास्त चर्चिल्या जातात. रस्त्यावर वडापाव विकणार््याला त्यामुळे फरक पडत नाही. त्याचं आयुष्य त्या गोष्टींना बांधलेलं नाहीये. त्याच्या आयुष्यात त्याला कसली अभिव्यक्ती करायचीय? त्याला ना काही एक्सप्रेस करायचंय , ना कुठला कलाविष्कार करायचाय. त्याला आज घरी जाताना दिडशे रुपये मिळवून जायचय, बस- अशा दारिद्र्यसंपन्न समाजामधे या प्रकारच्या गोष्टी असणारच. त्या असायलाच हव्यात असं नाही, पण त्या असण्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. याचं एक कारण असं, की अशा प्रकारच्या समाजात, एक आर्थिक दरी असते. सुखवस्तू आणि दारिद्र्यरेषेखालचे यांच्यातला फरक मोठा असतो. आपल्यासारखी लोकं सुखवस्तू वर्गातली म्हणता येतील, ज्यांना स्वतःचे फ्लॅट्स आहेत , ज्यांना बर््यापैकी पैसे मिळतायत, जे चित्रपट वगैरे काढण्याच्या गोष्टी करु शकतात, ज्यांच्या सगळ्या गरजा, इगोज भागवले जातायत. त्यामुळे सुरक्षितता, किंवा आर्थिक प्रगती, हा आपल्याला दैनंदिन पातळीवर भेडसावणारा प्रश्न नाही. म्हणून त्यापलीकडे जाऊन चार गोष्टी आत्मसात करणं ,असे उद्योग आपल्याला सुचू शकतात. आज फेसबुक अकाउंट्स कोणाचे आहेत? ट्विटर कोण वापरतं?ज्यांच्याकडे किमान स्मार्टफोन आहे त्यांचेच ना? त्यामुळे अशा सुखवस्तू लोकाना हे रोजच्या जगण्याच्या धडपडीपलीकडले व्यक्तीस्वातंत्र्य, भ्रष्टाचार असे मुद्दे भेडसावतात कारण रोज सव्वाशे रुपये मिळाले नाहीत तर मुलांना काय खायला घालू, असे अधिक मूलभूत मुद्दे आपल्याला भेडसावत नाहीत. आता आपल्याला व्यापक प्रश्न आहेत. जातीव्यवस्था, समाजाची वाटचाल, अमुक प्रकारचं नाटक, तमुक प्रकारचा चित्रपट वगैरे वगैरे. मग हे सेन्साॅरशिप सारखे मुद्देही आपल्या डोक्यात घोळायला लागतात. लक्षात घे, की सेन्साॅरशिप डिमान्ड करणारा वर्ग हा खालचा, दैनंदिन काळज्या करणारा वर्ग नाही, तर आपल्याच बरोबरचा फेसबुक ट्विटरवाला वर्ग आहे. खालच्या वर्गातल्याना याचं फार काहीच पडलेलं नाही. त्यांना तर हेही माहीत नाही की त्यांना खरच काय प्रकारचा चित्रपट हवाय. त्यांना 'बायसिकल थिव्ज' माहितेय का? 'सोलरीस' माहितेय का? नाही ! आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही. ते त्यांच्या सलमान, आमिर, शाहरुख वर खुष आहेत. अती विचार हा आपल्या संवेदनशील क्लासचा प्राॅब्लेम आहे. सरसकट सर्वांचा मुळी हा प्राॅब्लेमच नाही.
तरीही, एक सामाजिक प्रकृतीचा विचार केला, तर ते प्रश्नच आहेत. ते 'रोग' या कॅटेगरीतच येतात. 'बळ' या कॅटेगरीत येत नाहीत. तो समाजाचा रोगच आहे. आणि तो अप्रगल्भतेतून, असंवेदनशीलतेतून, कमी शिक्षणातून उत्पन्न होतो. सेन्साॅरशिप हा या रोगट विचारांचाच एक भाग आहे.
मी- आजच्या चित्रपटात बदलाची शक्यता कितपत वाटते?
परेश- आज आपला समाज, कधी नव्हे इतका स्टॅग्नन्ट आहे असं मला वाटतं. इन्टरनेट रेव्होल्यूशन, इन्फर्मेशन एक्स्प्लोजन वगैरे टर्मिनाॅलाॅजी स्वीकारुनही त्यांचा काही प्रत्यक्ष फायदा दिसत नाही. यात एवढ्यात बदल होईल, असंही वाटत नाही.
आणि बदल बदल म्हणजे तरी काय? आज जे बदल होतायत असं आपल्याला वाटतय, ते तंत्रज्ञानात होतायत, पण जे सांगायचय, ज्या प्रकारे सांगायचंय त्यात काही बदल होतोय का ? एक गोष्ट खरी, की हा बदल जेव्हा केव्हा होईल, तेव्हा केवळ चित्रपटच बदलला असं होणार नाही. किंवा इतरही माध्यमात बघितलं, तर फक्त कादंबरी बदलली, फक्त नाटक बदललं आणि बाकी सारं सुमार आहे, असं होणार नाही. बदल हा मुळापासूनच संपूर्ण सामाजिक दृष्टीकोनात घडायला हवा आणि त्याचे पडसाद एकेका क्षेत्रात, एकेका माध्यमात उमटत जायला हवेत. असं घडलं तरच तो एका सुपरफिशीअल पातळीपलीकडे जाऊन टिकेल.
( मौज दिवाळी अंकासाठी केलेल्या परिसंवादामधून ) Read more...