हायवे- एक सेल्फी आरपार अर्थात कुलकर्ण्यांचा मास्टरस्ट्रोक
>> Friday, August 28, 2015
जीवनाला प्रवासाचं प्रतीक वापरण्याची कल्पना तशी जुनीच, ते प्रतीकही सोपं, सहज अर्थ लागू शकणारं. पण जेव्हा हे प्रतीक आपण चित्रपटासारख्या करमणूकप्रधान माध्यमाच्या आकृतीबंधात वापरतो, तेव्हा ते या माध्यमाकडून असणाऱ्या अपेक्षांच्या विरोधात जातं असं लक्षात येतं. आपल्या नेहमीच्या चित्रपटात पोचण्याचं ठिकाण , हे प्रवासापेक्षा नेहमीच अधिक महत्वाचं असतं. मधले टप्पे भराभर घेत प्रेक्षकाला एकदा घाईने त्याच्या आवडत्या सुखांताकडे पोचवणं, हे बहुतेक चित्रपटांना आवश्यक वाटतं. प्रवासाने कथाभागाचा अधिक वेळ घेतला, तरी तो दुय्यमच रहातो. त्याला डेस्टीनेशनचं वजन येत नाही. हायवे- एक सेल्फी आरपार मधे तसं होत नाही.
प्रवास हे जीवन, आयुष्य, असं धरलं, तर ट्रॅफिक जॅम, हे सहज सापडणारं दुसरं प्रतीक. त्या प्रवासाला खीळ घालणाऱ्या कोणत्याही गोष्टीला अनुसरुन वापरता येण्यासारखं. मग ती गोष्ट कोणत्याही प्रकारची असेल, व्यक्तीगत जीवनातली निराशा, प्रेमभंग, व्यावसायिक अपयश, वैचारिक पेच, डिप्रेशन, अनेक गोष्टी. हे प्रतिक जागतिक चित्रपटांमधे अनेकदा वापरलं गेलंय. ८ -१/२ पासून फॉलिंग डाउन पर्यंत अनेक चित्रपटात त्याचा वापर झालाय. पण ही निराशा हे आतल्याआत कुढत रहाणं, हे सारं संपणार कसं? हे क्वचितच कोणी सांगतं. बांध फुटून प्रवाह पुन्हा सुरु होणार कसा ? हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच कधीना कधी पडणारा, पण त्याचं उत्तर कुठेतरी निसटून गेलेलं. त्यातही प्रश्न अतिशय पर्सनलाईज्ड, प्रत्येकाच्या वृत्ती, व्यवसाय , पार्श्वभूमीनुसार बदलणारा, त्यामुळे हायवेदेखील त्याचं उत्तर देईल ही अपेक्षाही चूक. मात्र तो ते उत्तर कुठे दडलेलं असू शकतं याकडे निर्देश करतो ही गोष्ट खरी.
मला विचाराल तर हायवे सारख्या चित्रपटात , ज्याचा मूळ आशय तत्वचिंतनात्मक वळणाचा आहे आणि जो सोपे परिचित टप्पे घेत नाही, रिअल वर्ल्ड तपशील हा दुय्यम आहे. म्हणजे पुण्याला पोचायला साडेतीन तास लागतात का पावणेचार हे इथे दुय्यम आहे, किंवा त्याहूनही कमी महत्वाचं. समजा हा एखादा रहस्यपट असता, तर कदाचित मिनिटा मिनिटाचा हिशेब महत्वाचा ठरता, पण तशी इथे गरज नाही. महत्व एवढ्यालाच आहे की यातली सारी मंडळी अदमासे एकाच वेळी मुंबईहून पुण्याकडे जायला निघालीयत. आता मंडळी तरी किती ? तर सारी नावं एका समीक्षणात नं मावण्याइतकी. यात एक एनाराय ( गिरीश कुलकर्णी) आहे जो पुण्यात आपल्या वडिलांना ठेवलेल्या हॉस्पिटलमधे चाललाय. त्याच्या गाडीत पोलिसांनी जबरदस्तीने बसवून दिलेलं एक मध्यमवयीन जोडपं आहे. यातल्या पतीचा ( विद्याधर जोशी) पाय जायबंदी झालाय अन तो छोट्याछोट्या गोष्टींसाठी कटकट करतोय. पत्नी ( रेणुका शहाणे) मात्र आनंदाने ही कटकट सहन करतेय. जुनाट विचारांच्या गरोदर पत्नीवर ( वृषाली कुलकर्णी) वैतागलेला कॉर्पोरेट एक्झिक्युटीव ( सुनील बर्वे) नोकरीच्या शिड्या चढताना आपलं वैयक्तिक आयुष्यच विसरुन गेलाय. राजकारण्यांच्या फन्ड रेझरमधे सहभागी व्हायला चाललेली टिव्ही तारका ( हुमा कुरेशी) आपल्या व्यवसायात तर यशस्वी आहे, पण पर्सनल लाईफमधे मोठ्या अडचणीत. वेश्याव्यवसायातल्या एका युवतीला ( मुक्ता बर्वे) आपला भूतकाळ सोडून बाहेर पडायचय, तर उच्चभ्रू वर्गातली एक श्रीमती ( टिस्का चोप्रा ) आपल्या एकटेपणालाच नव्या मार्गांनी सजवण्याचा प्रयत्न करतेय. यांच्याबरोबरीने काही इतरही महत्वाचे ट्रॅक्स आहेत, त्या दर कथासूत्रात एकाहून अधिक व्यक्ती आहेत, चित्रपट या साऱ्यांवर नजर ठेवून आहे. तो यातल्या बहुतेक सर्वांना काही ना काही करायला देतो. त्यांची सर्व माहीती आपल्याला मिळत नाही आणि ती मिळण्याची गरजही नाही. आपल्याला त्यांचं ओझरतं दिसणारं चित्रही गरजेपुरत्या तपशीलात असणं हेच महत्वाचं आहे, ते मात्र दिसतं.
मध्यंतरापूर्वीचा भाग, हायवे केवळ व्यक्तिरेखांना फ्लेश आऊट करण्यात घालवतो. त्या इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याने तसं करावं लागणं हे आवश्यकही आहे. तरीही दर ट्रॅकच्या वाट्याला जो मोजका वेळ येतो त्यात तो हे कसा करु शकतो हे अभ्यास करण्यासारखं आहे. कधी कोणाचा एखादा फोन कॉल, एखादा रिमार्क, मॅनेरिझम, बोलण्यातले संदर्भ, अशा अनेक गोष्टी यात उपयुक्त ठरतात. आता साहजिक पडण्यासारखा एक प्रश्न म्हणजे इतके अधिक लोक दाखवायची काय गरज होती? दोन चार मुख्य पात्रांमधे प्रातिनिधिक पध्दतीने हे दाखवता आलं नसतं का? का नाही, नक्कीच आलं असतं, पण संख्या इथे महत्वाची आहे. अनेक पात्र, त्यांची पार्श्वभूमी , संवादाची ढब या सगळ्यातून आपल्याला समाजाचा जो छेद दिसतो, तो प्रातिनिधिक स्वरुपात प्रभावी ठरला नसता. सर्वांच्या आयुष्यात आलेलं साचलेपण दिसलं नसतं. पहिला भाग हा प्रामुख्याने या ओळख परेडीवरच खर्च होतो, ही इन्टरेस्टींग नक्कीच वाटते, आणि हेही लक्षात येतं की यांचा प्रवास हा केवळ त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे घेऊन चाललाय खरा , पण प्रत्यक्षात यातला प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाने आखून दिलेल्या पिंजऱ्यात अडकलेला आहे . त्यांचं पुढे जाणं हे नावापुरतं आहे कारण जोपर्यंत आपल्या बरोबर वागवत असलेल्या पिंजऱ्यातून त्यांची सुटका होत नाही, तोवर तो जैसे थेच रहाणार.
एका गाडीत छोट्या डब्यात ठेवलेला मासा, तर दुसऱ्या गाडीतला पक्ष्यांचा पिंजरा या अर्थाला पुरक आहेत. या दोन्ही प्रकारच्या पिंजऱ्यातला फरक असा, की माशासाठी भोवताली पाणी असणं हे नैसर्गिकच आहे. त्याचा तिथला वावर हा अपरिहार्य, काहीसा स्वखुषीनेच असल्यासारखा आहे, कारण तिथून सुटका, हा मृत्यूच. पक्षांसाठी मात्र सुटका ही स्वातंत्र्य ठरु शकते. त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात डांबणं हे क्रौर्याचं लक्षण आहे. ( हा विचार अधिक पुढे न्यायचा, तर मासा बरोबर घेणारी बाई गरोदर असणं आणि पिंजरा असणाऱ्या व्यक्तीची बॅकस्टोरी , या गोष्टी अधिक विचार करण्यासारख्या ठराव्यात) या दोन दृष्टीकोनांमधून आपण जर सगळ्याच व्यक्तीरेखांना पाहिलं, तर आपल्याला त्यांची आणि चित्रपटाची जातकुळी अधिक स्वच्छपणे लक्षात येईल. चित्रपटाच्या अखेरीस दुसऱ्याच एका पिंजऱ्यातल्या प्रत्यक्ष सुटकेचं एक उदाहरण आहे. त्याकडेही वास्तव नियम न लावता, या प्रतिकात्मकतेचं एक्स्टेन्शन लावून पहाणं अधिक योग्य.
चित्रपटाचं जेव्हा मध्यंतर झालं, तेव्हा या साऱ्यांचा प्रवास सुरुच होता. मला लक्षात येईना की पुढे काय होणार. म्हणजे या सर्वांच्या गोष्टी कळल्या, प्रश्नही कळले , पण पुढे काय? म्हणजे असच दाखवत रहायचं, तर आणखी कितीही दाखवता आलं असतं. पण त्याला पुढे मुद्दा काय? शेवटाचं काय? जेव्हा चित्रपटात स्वतंत्र कथानकं असतात तेव्हा ती शेवटी एकत्र येणं अपेक्षित असतं. प्रत्यक्ष वा थिमॅटीकली. इथे इतक्या जणांचं एकत्र येणं फारच मोठा योगायोग ठरता. पण मग काय होणार? असे बरेच प्रश्न मला पडायला लागले. मात्र या साऱ्याची उत्तरं मला दुसऱ्या भागात , अतिशय समाधानकारक पंध्दतीने मिळाली.
दुसऱ्या भागाचा बराचसा भाग हा एक मोठा ट्रॅफिक जॅम आहे. पण तिथे पोचायच्या आधीच, फुड मॉलच्या प्रसंगापासूनच मला उत्तरं मिळायला लागली. यानंतर मी खरा या सिनेमात, या व्यक्तीरेखात अडकत गेलो. मी ज्याप्रमाणे मिररमधल्या रिव्ह्यूतून या प्रसंगाबद्दल खूप माहीती दिलेली नाही, तशीच इथेही ती देणार नाही. काही गोष्टी मात्र सांगेन. या चित्रपटाला ग्रॅंड कन्क्लूजन असावं, ज्यात सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचा सिनेमा पहाताय, आणि तो पहात असल्याचं पहिला भाग संपूनही तुमच्या लक्षात आलेलं नाही. यातल्या कोणाचेच प्रश्न म्हंटलं तर सुटत नाहीत, किंवा म्हंटलं तर सर्वांचेच सुटतात. या भागात बऱ्याच जणांच्या आयुष्याची कोंडी फुटते, काहींना नवा मार्ग दिसतो, काहींना आपल्या प्रश्नांकडेच नव्याने पहाण्याची नजर मिळते. हा सगळा भाग पटकथेच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीचा आहे, आणि इतके कलावंत घेऊन या प्रकारचा सीक्वेन्स चित्रित करणं, हे अतिशय कठीण आहे. इथे गरजेचं आहे, ते चित्रपट पहाणाऱ्यांनी रेस्टलेस न होणं. चित्रपट पुढे सरकायचा, तर प्रत्यक्ष घटना पुढे सरकण्याची गरज नसते, तर आशय पुढे सरकणं हे बास असतं. तुम्ही जे पहाताय, त्यात तो पुढे सरकतोय का? आपल्या प्रेक्षकाना जी गोष्ट शिकण्याची गरज आहे ती ही, की प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, आणि आपल्याला परिचित रचनेपलीकडे इतर रचना असू शकतात. मुंबईचे लोक पुण्याला पोचल्यावर काय करतात हे महत्वाचं नाही , महत्वाचा आहे तो स्थित्यंतराचा काळ. हे स्थित्यंतर प्रत्यक्ष स्थलांतर असण्याची गरज नसते. ते मानसिकही असू शकतं. वैचारिकही. हे स्थित्यंतर अधोरेखित करणारी भा रा तांबेंची 'घन तमी शुक्र ' ही कविता हा एका अर्थी चित्रपटाचा हाय पॉइन्ट मानता येईल. आणि क्लायमॅक्सदेखील.
उमेश कुलकर्णीने याआधी डिजिटल माध्यम वापरलेलं नाही, पण या स्क्रिप्टला ते वापरण्यावाचून पर्यायही नव्हता. विविध आकाराच्या चालत्या गाड्या, गर्दीचा फूड मॉल आणि ट्रॅफिक जॅमने चोंदलेल्या रस्त्यावर, थांबलेल्या गाड्यांमधून वाट काढणारी माणसं टिपायला सेल्युलॉइड कॅमेराचा पसारा टाळणे अत्यावश्यकच होतं. या माध्यमाशिवाय ही फिल्म झालीच नसती, असही आपल्याला म्हणता येइल. याशिवाय खास उल्लेख करायला हवा तो मंगेश धाकडे यांच्या पार्श्वसंगीताचा. साउंड डिझाईन आणि इतर तांत्रिक बाबीत उमेश कुलकर्णीचे चित्रपट चांगलेच असतात. हायवे त्याला अपवाद नाही.
उमेश आणि गिरीश कुलकर्णीचे चार चित्रपट पाहिले तर त्यातले दोन बाहेर पहाणारे आहेत तर दोन आत, असं आपल्या लक्षात येईल. वळू आणि देऊळ हे समाजाच्या बाह्यांगावर टिका करणारे आहेत, तर विहिर आणि हायवे हे आपल्या अधिक मुलभूत जाणिवांकडे पहाणारे, फिलॉसॉफीकल वळणाचे चित्रपट आहेत. या दोन्ही जातीच्या चित्रपटांमधे खोऱ्यानी कलावंत, प्रचंड तपशील, तंत्राची उत्तम जाण, अशा सगळ्या गोष्टी कायम असल्या तरी मुळात मला त्यांच्या दृष्टीकोनांमधेच फरक वाटतो. व्यक्तीश: विचारलं तर मला हे इन्ट्रोवर्ट चित्रपट अधिक आवडतात, असं मी म्हणेन. आणि पुन्हा मत बदलण्याची शक्यता नोंदवून असंही म्हणेन, की हायवे - एक सेल्फी आरपार हा या जोडीचा मला आजवर सर्वाधिक आवडलेला चित्रपट आहे.
नोंद- हा चित्रपट पाहून मला आठवलेले दोन संदर्भ मी माझ्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत. पहिला आहे तो विंदा करंदीकरांची यंत्रशिल्पे ही विरुपिका, आणि दुसरा REM चं Everybody Hurts, हे गाणं. या संदर्भांचा चित्रपटाशी तसा संबंध नसला तरी व्यक्त होणाऱ्या भावना आणि टेक्श्चर या बाबतीत ते नक्कीच पहाण्यासारखे आहेत. ते पाहून चित्रपट समजून घ्यायला नक्कीच अधिक मदत होईल.
- ganesh matkari Read more...