मराठी प्रेक्षक आणि वितरणाचं कोडं !
>> Monday, October 23, 2017
नुकताच आपल्याकडे कासव हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. प्रतीकांचा वापर करणारा, गंभीर आशय मांडणारा आणि राष्ट्र्रीय पुरस्कारातलं सर्वोच्च स्थान पटकावत, सुवर्ण कमळ विजेता ठरलेला. सुनील सुकथनकर- सुमीत्रा भावे या गाजलेल्या दिग्दर्शकद्वयीचा हा चित्रपट अत्यंत मोजक्या ठिकाणी लागला. मुंबईत तर एकाच ठिकाणी एकच खेळ अशी त्याची सुरुवात होती. कासव बरोबरच इतर महोत्सवात गाजलेले, पुरस्कार विजेते ठरलेले इतरही दोन चित्रपट होते. गजेंद्र अहिरेंचा द सायलेन्स आणि शिवाजी लोटन पाटील यांचा हलाल. यांना अधिक खेळ मिळाले असले तरी या तिन्ही चित्रपटांना प्रतिसाद अत्यल्प राहिला. त्यांच्याबरोबर इतर चार मराठी लागले होते, त्यांचा तर विचारच नको. कासवच्या आदल्याच आठवड्यात मराठी सिनेमांना नवं वळण देणारे श्वासकर्ते संदीप सावंत यांचा नदी वाहते, हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो आणि बरोबरचे दोन चित्रपट, यांनाही प्रतिसाद हवा तसा नव्हताच. या सुमारास चित्रपटगृहात आलेल्या अनेक मराठी चित्रपटांपैकी दोनच प्रेक्षकांना आपल्याकडे खेचू शकले. विशाल देवरुखकर दिग्दर्शित बाॅईझ आणि निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित बापजन्म. बाॅईझ आणि बापजन्म हे प्रेक्षकांनी बरे चालवले, तर कासव, नदी वाहते सारख्यांकडे दुर्लक्ष केलं, असं चित्र दिसलं. आता याचा अर्थ प्रेक्षक फक्त व्यावसायिक सिनेमांना आपलं म्हणतो असा समजायचा का? आणि तसं असेल, तर ज्या चित्रपटांचं नाव राष्टीय पातळीवर, महोत्सवात गाजतय, त्याचं काय? आणि मग श्वास सारख्या गंभीर चित्रपटाला प्रथम आपलं म्हणून मराठी सिनेमाला पुनरुज्जीवन देणारा प्रेक्षक गेला कुठे?
या आणि या प्रकारच्या प्रश्नांची सोपी उत्तरं काढणं सोपं आहे. व्यावसायिक सिनेमा वाईट, कलात्मक वळणाचा चांगला, किंवा प्रेक्षकांना काय कळतय, वगैरे बोलायला सोप्या गोष्टी आहेत पण माझ्या मते हा प्रश्न इतका सोपा नाही. जर मराठी प्रेक्षकानेच नवा सिनेमा उचलून धरला तर पुढे त्याकडे त्याने पाठ का फिरवली? आज जो मराठी प्रेक्षक जागतिक चित्रपट पहाण्याच्या गोष्टी करतो, तो महोत्सवात गाजलेल्या, कलात्मक चित्रपटांकडे दुर्लक्ष कसं करु शकतो? चित्रपटसंख्या आणि चित्रपटांचं यशापयश याचा काही संबंध आहे का? असे अनेक पैलू या प्रश्नाला आहेत.
एका आठवड्याला सात चित्रपट हे जरा चमत्कारिकच आहे, आणि अपवादानेच घडणारं, पण दोन तीन चित्रपट, हे गणित हे नेहमीचच झालय. नव्या मराठी चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात पाहिले, तर चित्रपटांचं प्रमाण इतकं नव्हतं. वेगळे चित्रपट तर खूपच कमी असायचे. श्वासनंतर, डोंबिवली फास्ट , रेस्टाॅरन्ट, टिंग्या, वळू असे वर्षाला दोन चार चित्रपट वेगळे असायचे, आणि एकूण चित्रपटसंख्याही मर्यादीत होती. त्यामुळे आठवड्याला भाराभर चित्रपट लागत नसत. आणि काय पहायचं हे ठरवणंही सोपं होतं. आज आपण वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट प्रदर्शित करतो. सुट्ट्या, परीक्षा, हिंदीचे मोठे रिलीज यामुळे आठ दहा आठवडे तर प्रदर्शनासाठी निरुपयोगी असतात. मग पंचेचाळीस दिवसात शंभरच्यावर चित्रपट प्रदर्शित करायचे, तर दुसरं काय होणार ? आपल्याकडला बराच प्रेक्षकवर्ग म्हणतो की आपल्याला महिन्यातून एक दोन चित्रपटांहून अधिक काही बघणं शक्यच होत नाही. आणि इतक्या प्रचंड चित्रपटसंख्येत पहाण्यायोग्य चित्रपट कसा निवडावा हे त्यालाही कळेनासं होतं.
आजचा प्रेक्षक हा काय पहावं काय नाही, याबद्दल मला अजूनही गोंधळलेला वाटतो. त्याला अजून स्थैर्य आलेलं नाही. या प्रेक्षकवर्गाची चाचपणी सोशल नेटवर्क, कॉलेजमधल्या पहाण्या वा इतर आधुनिक मार्गांनी केली, तर दिसतं की प्रेक्षक नवं काही पहायला तयार आहे, त्याला पारंपरिक करमणुकीचा कंटाळा आलाय. नवं काही देणाऱ्या चित्रपटांसाठी तो आज मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, एवढच नाही, तर इन्टरनेट क्रांतीने आणलेल्या सुविधांमुळे तो जागतिक चित्रपटांचा चाहता बनलेला आहे. मनोरंजन हे त्याच्या सिनेमा पहाण्यामागचं अंतिम ध्येय नाही. हे सारं एका आदर्श प्रेक्षकाचं चित्र तयार करणारं असलं, तरी प्रत्यक्षात जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा या प्रेक्षकांमुळे तो चाललाय असं पाहाण्यात येत नाही. चित्रपट चालतो वा पडतो, तो पारंपारिक वळणाचे चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांमुळेच. अशा प्रेक्षकांमुळे , ज्यांना चित्रपटाच्या दर्जाविषयी देणंघेणं नसून केवळ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात त्याचं असणं आणि टिव्हीवरून दर अर्ध्या तासाला त्याची जाहीरात दिसत रहाणं, किंवा ' चला हवा येऊ द्या ' सारख्या कार्यक्रमात चित्रपटताऱ्यांची हजेरी लागणं या गोष्टी महत्वाच्या आहेत.
असं का व्हावं हे नक्की माहीत नाही, मात्र अशी शक्यता आहे, की हा नवा प्रेक्षकवर्ग खूपच तरुण आणि शिक्षण वा करिअरमधे गुंतलेला असल्याने, आणि ज्या वेगळ्या प्रकारच्या सिनेमाची त्याला वरकरणी ओढ आहे, त्याचं मर्यादित वितरण होत असल्याने, योग्य वेळी योग्य चित्रपटांपर्यंत पोचू शकत नसावा. त्यातल्यात्यात चांगली गोष्ट ही , की जेव्हा व्यावसायिक वितरणाच्या साथीने नवे चित्रप्रकार सादर होतात, तेव्हा हा प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतो आणि चित्रपट यशस्वी करुन दाखवतो.
हा नवा प्रेक्षक आज जर काही कारणाने चित्रपटगृहापर्यंत पोचू शकत नसेल, तर चित्रपटाने त्याच्यापर्यंत पोचण्याची काही व्यवस्था होऊ शकते का हे पहावं, या दृष्टीने आज थोडेफार प्रयत्न चालू झालेले आहेत. टिव्ही हा या बाबतीतला खरा राजमार्ग, कारण त्याचा पल्ला सर्वात मोठा, आणि प्रेक्षकांनाही दर चित्रपट पहाण्यासाठी वेगळे पैसे पडत नसल्याने, सर्वसामान्य प्रेक्षकाकडून त्यावर दिसणारा चित्रपट सहजपणे पाहिला जाण्याची शक्यताही मोठी. यातला सरकारी टेलिव्हिजनचा मार्ग आज मोठ्या प्रमाणात खुला आहे, पण शहरी भागात अधिक पाहिल्या जाणाऱ्या प्रायव्हेट चॅनल्सची आवड निवड पहाता, त्यांच्याकडून विशिष्ट चित्रपटांनाच प्रतिसाद मिळालेला दिसतो. यावर उपाय आहे तो सध्या सर्वात लोकप्रिय असणारं माध्यम , म्हणजे इन्टरनेट वापरण्याचा. आज खेड्यापाड्यातही या माध्यमाचं पोचणं आणि वेब चॅनल्सनी चित्रपट डाउनलोड करण्याबरोबरच स्ट्रीमिंगचीही केलेली सोय, या दृष्टीने उपयुक्त ठरेलशी. जागतिक चित्रपट पहाणाऱ्या हौशी प्रेक्षकाला ती आधीपासूनच परिचित. इन्टरनेटवर भरवसा ठेऊन, 'पे पर व्ह्यू' मार्गाने तिकीटाप्रमाणे पैसे भरून चित्रपट दाखवणं, किंवा 'आय ट्यून्स' सारख्या माध्यमातून डाऊनलोडची सोय ठेवणं या गोष्टी हळूहळू होतायत. मात्र यात अडचण अशी की डाऊनलोडींगला पैसे मोजण्याची मानसिकता अजून आपल्याकडे नाही आणि एरवीच पायरसी एवढी जोरात असताना ती तयार व्हायलाही वेळ लागेल. ती होण्यासाठी प्रेक्षकाने अधिक जागरुक आणि अधिक प्रामाणिक असायला, व्हायला हवं. पुढल्या पिढ्यांमधे ती शिस्त येऊ शकते, जर आपणच त्यांना या मार्गांच्या योग्यायोग्यतेबद्दल मार्गदर्शन केलं.
कोणत्या का मार्गाने होईना, पण नव्याने तयार होणाऱ्या प्रेक्षकापर्यंत जर असा वेगवेगळा सिनेमा पोचत राहिला तर चित्रपटगृहातल्या प्रतिसादावरही पुढेमागे परिणाम होऊ शकेल आणि या प्रेक्षकांची मागणी ही निर्मितीसंस्थांना आपण काय प्रकारचे चित्रपट करतो आहोत, करायला हवेत, याचा फेरविचार करायला भाग पाडेल.निर्मिती आणि वितरणाचं गणित मग कदाचित आज इतकं कठीण उरणार नाही.
- गणेश मतकरी