गांधीविचार आणि पडदा
>> Sunday, September 30, 2018
गांधीजींना मी पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मधे रिचर्ड अॅटेनबरो दिग्दर्शित गांधी सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्चर्य वाटेलसं वातावरण तेव्हा नव्हतं. आताही गांधींबाबत कदाचित हा बहुमानाचा आग्रह धरला जाणारही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या मवाळ धोरणामुळेच का काय कुणाला माहीत, पण त्यांच्याबद्दल उसना आदर दाखवण्यासाठी आग्रही रहाण्याची फार तसदी कुणी घेत नाही. पण संबोधन काहीही असलं, तरी ही व्यक्ती बहुसंख्यांच्या आदराला पात्र राहिली आणि गांधी या प्रामुख्याने ब्रिटीश निर्मिती असलेल्या चित्रपटातही तो आदर होताच.
गांधीजींचं बाह्यरुप हे तसं सोपं, चटकन उचलता येण्यासारखं. पंचा, काठी, टक्कल, कृश शरीरयष्टी, यांच्या जोरावर चटकन त्यांची प्रतिमा डोळ्यांसमोर आणता येते. ( त्यामुळे अगदी लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धांमधेही ही एन्ट्री तशी परिचित असते. ) अर्थात असं ढोबळ वेषांतर वेगळं, आणि हाडामासाची व्यक्ती समोर उभी करणं वेगळं. गांधी चित्रपट पहाताना गांधीजींच्या वेषातला , चांगला नट आपल्यासमोर उभा असल्याचा भास होत नाही, तर साक्षात गांधीच समोर उभे रहातात. त्यांचं तत्वज्ञान बेन किंग्जले बोलून दाखवतो आहे, असं वाटत नाही, तर आपण गांधीजींच्या आयुष्याचे जणू साक्षीदारच होतो. प्रचंड मोठ्या काळाला आणि व्यक्तीला कवेत घेणारा हा चित्रपट ब्रिटीश दिग्दर्शकाचा असला, तरी आपल्या या महानेत्याला पूर्ण न्याय देतो. त्याला देवत्व देत नाही, पण माणूस म्हणूनच त्याचं काम किती प्रचंड, किती गौरवास्पद आहे, हे दाखवून देतो. गांधी चित्रपटाचं महत्व हे केवळ एक चांगला चित्रपट म्हणून नव्हतं, तर त्याने चित्रपटाला सामाजिक प्रबोधनाचं एक महत्वाचं साधन म्हणून वापरलं. गांधीजींचा विचार त्याने आपल्याकडे तर सर्वदूर नेलाच, वर युरोप अमेरिकेतही हे नाव विशिष्ट काळापुरतं महत्वाचं नसून सार्वकालिक आहे, हे दाखवून दिलं.
गांधी चित्रपटाने आपल्या बायोपिक या चित्रप्रकाराची थोडी अडचण केली. नंतरच्या दर चरित्रपटाला गांधीच्या तुलनेत जोखलं जायला लागलं, आणि हे चरित्रपट त्यात हमखास कमी पडायला लागले. थोडंसं तसच, गांधीजींच्या पडद्यावरल्या प्रतिमेचंही झालं. अनेक जणांनी ही भूमिका पडद्यावर आणून पाहिली. श्याम बेनेगलांच्या ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ (१९९४) मधे रजित कपूरने महात्मापदाला पोचण्याआधीचे तरुण गांधी साकारले. त्याखेरीज सॅम दस्तोर ( लाॅर्ड माऊंटबॅटन : द लास्ट व्हाॅईसराॅय, १९८६, जिना, १९९८ ), अन्नू कपूर ( सरदार, १९९३ ), नासीरुद्दीन शाह ( हे राम, २००० ), मोहन गोखले ( डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, २००० ) , आणि दर्शन जरीवाला ( गांधी, माय फादर, २०००), अशा अनेकांनी गांधीजींच्या ओळखीच्या रुपाला पडद्यावर साकारुन पाहिलं. यात ‘मेकिंग ऑफ महात्मा’ आणि गांधीजी आणि त्यांचा पुत्र हरीलाल यांच्यातल्या संघर्षमय नात्यावर आधारीत ‘गांधी, माय फादर’ सोडता इतर भूमिका त्या त्या चित्रपटात दुय्यम होत्या हे खरं, पण बेन किंग्जलेचा प्रभाव यातल्या कोणाला पुसून टाकता आला नाही हेदेखील तितकच खरं.
एक गोष्ट आपण लक्षात घेता यायला हवी, ती म्हणजे गांधींचं चित्रपटात असणं, म्हणजे केवळ त्यांचं एक व्यक्तीरेखा म्हणून असणं, असा अर्थ घेता येणार नाही. तर त्यांच्या विचारांच्या प्रभावाखालच्या चित्रपटांमधेही त्यांचा अदृश्य वावर असतोच. याप्रकारचं एक प्रसिद्ध पाश्चिमात्य उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचा गाजलेला चित्रपट ‘माॅडर्न टाईम्स’ (१९३६).
१९३१ साली गांधीजी इंग्लंडला गेले असताना चार्ली चॅप्लिनने त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मुळात गांधीजींना चित्रपटांमधे अजिबातच रस नसल्याने त्यांनी भेट नाकारायचा विचार केला, पण चॅप्लिनचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला असलेला पाठींबा लक्षात आल्यावर त्यांनी भेटीला संमती दिली. या भेटीत चॅप्लिनने त्यांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे, ‘ तुमचा यंत्रांच्या वापराला का विरोध आहे ? यंत्रावाचून सारं काम खोळंबणार नाही का?’
त्यावर गांधीजींनी स्पष्ट केलं, की त्यांचा विरोध प्रत्यक्ष यंत्रांना नसून, यंत्रांनी माणसांची जागा घेण्याला होता. हे संभाषण चॅप्लीनला खूपच प्रभावित करुन गेलं, आणि त्यातूनच पुढे त्याला माॅडर्न टाईम्स बनवण्याची प्रेरणा मिळाली, ज्यात तथाकथित प्रगतीतून सामान्य माणसांवर ओढवणाऱ्या संकटाचं चित्रण आहे. चॅप्लिनचाच दुसरा एक प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘ द ग्रेट डिक्टेटर’ (१९४०). हिटलरसारखा एक क्रूरकर्मा हुकूमशहा आणि त्याच्या जागी गैरसमजुतीने आलेला बिचारा गरीब न्हावी यांची ही गोष्ट आहे. या चित्रपटावरही गांधीविचारांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. हुकूमशहाची जागा घेतलेल्या गरीब न्हाव्याने केलेलं शांतीचा संदेश देणारं भाषण , ही या विचारांचीच खूण आहे.
आपल्याकडे खूप चित्रपटांवर त्यांचा प्रभाव दिसत नाही. याचं एक कारण आपल्याकडे एकूणच विचारांपेक्षा करमणूकीला असलेलं महत्व मानता येईल. स्वातंत्र्याच्या काळात लढ्याने प्रेरीत, प्रतिकात्मक आशय मांडणारे चित्रपट जरुर येत, पण गांधीविचार हा प्रामुख्याने समाजाचा विचार होता, आणि सामाजिक, वास्तववादी विचार मांडणारे चित्रपट आपल्याकडे तसे दुर्मिळच. तरीही नितीन बोस दिग्दर्शित चंडीदास ( १९३४) फ्रान्ज ओस्टन दिग्दर्शित अछूत कन्या (१९३६), तमिळ चित्रपट त्यागभूमी ( १९३९) , व्ही शांतारामांचा ‘ दो आंखे बारा हाथ’ (१९५७) अशा काही चित्रपटांवरचा गांधीवादाचा पगडा लक्षात येण्यासारखा आहे. अगदी अलीकडच्या काळात आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान (२००१), स्वदेस(२००४) वगैरे चित्रपटांचाही विचार या संदर्भात करता येईल.
काळ बदलतो तसा समाज बदलतो, विचार बदलतो, धोरणं बदलतात. त्यामुळे काही वेळा सर्जनशील कलावंत विशिष्ट मूल्यविचाराला पुन्हा समोर आणून त्याच्या टिकाऊपणाचा फेरविचार करतात. अलीकडच्या काळात दोन चित्रपटांमधून गांधीवादाचा फेरविचार झालेला आहे. ते आहेत राजकुमार हिरानी दिग्दर्शित २००६ मधे आलेला हिंदी चित्रपट ‘लगे रहो मुन्नाभाई’, तर दुसरा गिरीश कासरवल्ली दिग्दर्शित २०११ चा कन्नड चित्रपट ‘कूर्मावतार’.
या दोन्ही चित्रपटांमधे महात्मा गांधी ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाही, मात्र वेगळ्या पद्धतीने या चित्रपटांनी गांधीजींना आपल्यापुढे आणलय. लगे रहो मधला मुन्ना हा गांधीजींच्या विचारांनी इतका झपाटला जातो, की त्याला प्रत्यक्ष गांधीजी दिसायला लागतात. या त्याच्या मनातल्या गांधींजींच्या मदतीने मुन्ना आजच्या काळातल्या समस्यांना सामोरा जातो. त्यांच्यामार्फतच आजच्या काळावर तोडगा निघतो का, हे पडताळून पहातो. लगे रहो हा व्यावसायिक चित्रपटांसाठी अतिशय नावीन्यपूर्ण आणि तरीही गांधींची महती मांडणारा सुबोध प्रयत्न होता. यात दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले गांधी, हे आज घरोघर पोचलेले आहेत.
मुन्नाभाईच्या तुलनेत कूर्मावतारची रचना थोडी अधिक गुंतागुंतीची आहे. कासरवल्लींच्या चित्रपटात नेहमीच राजकीय विचारांचा एक महत्वाचा धागा असतो. कूर्मावतार मधेही तो आहे. गांधींच्या विचारांना-नेतृत्वाला सोयीस्करपणे वापरलं गेलं पण अखेरच्या काळात ते एकटे पडले, याची या सिनेमाला आठवण आहे. आजही त्यांच्या तत्वज्ञानापेक्षा त्यांचा चेहराच अधिक ओळखीचा असावा, याचं दु:ख या चित्रपटाला आहे.
कूर्मावतारच्या केंद्रस्थानी आनंद राव ( शिकरीपुरा कृष्णमूर्थी ) हा कारकून आहे. तो थोडासा गांधीजींसारखा दिसतो खरा, पण त्यापलीकडे त्याला गांधीजींची फार माहिती नाही.गांधीजींवरच्या एका मालिकेचा दिग्दर्शक रावकडे अचानक येतो आणि ही महत्वपूर्ण भूमिका करण्याची विनंती करतो. आजच्या काळातला , काहीसा सामान्य राव आणि गांधीजींचं असामान्य व्यक्तिमत्व यांच्यातली साम्यस्थळं आणि विरोधाभास, यावर या चित्रपटाच्या कथानकाचा समतोल टिकलेला आहे. रावमधे गांधीजींचे काही गुणधर्म आहेत आणि भूमिका स्वीकारल्यानंतर तिचा अभ्यास करताना ते नक्की कोणते हे स्पष्ट होत जातं. रावमधे होत जाणारा बदल, त्याचं बदललेल्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि त्यातून एकटं पडत जाणं, हे एका परीने रावच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेलं , पण तरीही गांधीचरीत्राची आठवण देणारं आहे. ‘फिल्म विदीन फिल्म’ हा गांधीजींवरच्या इतर चित्रपटात न वापरला गेलेला फाॅर्म इथे कासरवल्लींनी वापरला आहे. यात मालिकेतले प्रसंग हे रावनेच वठवले असले, तरी गांधींच्या आयुष्याबद्दल बोलतात, तर रावचं बाकी आयुष्य गांधींच्या प्रतिमेचा विचार केला जातो. गांधीजींच्या जीवनाचा, विचारांचा, समाजावरल्या प्रभावाचा त्रयस्थपणे विचार करणारा हा खूप महत्वाचा सिनेमा आहे. ऐतिहासिक दाखले देणारे, नुसतच गुणवर्णन करणारे किंवा थोरवीसमोर नतमस्तक झालेल्या चित्रपटांपेक्षा, आपल्याकडल्या मोठ्या व्यक्तीमत्वांचा गांभीर्याने विचार करणाऱ्या चित्रपटांची आज गरज आहे. अर्थात ते येऊ शकतील की नाही, हे आजच्या वातावरणात अजिबातच सांगता येणार नाही.
- गणेश मतकरी Read more...