जोकर - सेन्ड इन द क्लाउन्स
>> Friday, October 4, 2019
‘जोकर’ ही फिल्म बॅटमॅनचा कट्टर शत्रू असलेल्या जोकरची ‘ओरिजिन’ किंवा मूळकथा आहे, पण त्याचबरोबर ती स्वतंत्र स्टॅन्ड अलोन फिल्म आहे, जिचा अमुक एका सुपरहिरो जगाशी काहीही संबंध लावला नाही तरी हरकत नाही. किंबहुना असंही म्हणता येईल, की ती सुपरहिरो फिल्म नाहीच. ती एका सर्वसामान्य माणसाची ( आणि बाय एक्स्टेन्शन ) एका विशिष्ट समाजाची शोकांतिका आहे.
सुपरहिरोंचे सिनेमा पहाणारा एक विशिष्ट वर्ग असतो, आणि त्यांच्याकडे ‘ हे किती बालिश आहेत’ या नजरेने पहाणारा दुसरा एक वर्ग. या वर्गाला सुपरहिरो म्हणजे पोरांचं काहीतरी, या पलीकडे फार माहिती नसते, आणि तो या चित्रपटांना पुरेशा गंभीरपणे घेत नाही. या दोन्ही वर्गांना पटू शकेल, पचू शकेल अशा फिल्म्स फार दुर्मिळ असतात. जोकर हा असा पहाता येतो. तुम्ही त्याला बॅटमॅनच्या मिथाॅलाॅजीमधे घातलत, तर तो बॅटमॅनच्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या , त्याच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या घटनेसह एका सुपरव्हिलनची कथा सांगतो. पण तुम्हाला यातलं काहीही माहीत नसेल, बॅटमॅन कोण हेही माहीत नसेल, तरीही फरक पडत नाही. खालच्या सामाजिक स्तरात शांतपणे जगण्याचा प्रयत्न करु पहाणाऱ्या आर्थर फ्लेकच्या आयुष्यातल्या घडामोडी, त्याच्या शहरावरलं धनदांडग्यांचं आक्रमण, समाजात वाढत चाललेली दरी, बंडाची चाहूल, आणि अनपेक्षितपणे आर्थरच्या माध्यमातून पडलेली ठिणगी, ही आपल्यातल्या कोणापर्यंतही सहज पोचणारी कथा आहे. ती भेदक आहे, पहायला सोपी अजिबातच नाही, हिंसकही आहे, पण जागतिक राजकारण आणि समाजकारणाच्या पार्श्वभूमीवर पहायचं, तर ती काळाशी अत्यंत सुसंगत आहे.
ॲलन मूरचं ‘द किलिंग जोक’ हे ग्राफिक नाॅव्हेल या चित्रपटामागची प्रेरणा आहे असं मानलं जातं, पण थेट नाही. दोघांच्या कथानकांमधे तसं साम्य काहीच नाही. किलिंग जोकचं कथानक बॅटमॅन ॲक्टीव असतानाच्या काळातलं आहे. आर्खम असायलममधून पळालेला जोकर आणि त्याच्या मागावर गेलेला बॅटमॅन ही वर्तमानात घडणारी कथा सांगताना, ते त्याला समांतर जाणारी जोकरची मूळकथा सांगतं. जोकर चित्रपट घडतो तो काळ या आधीचा आहे. त्यातल्या ब्रूसला बॅटमॅन बनायला चिकार अवकाश आहे. किलिंग जोक आणि जोकर यांमधे साम्य आहे ते प्रामुख्याने दोन बाबतीत. आर्थिक आणि कौटुंबिक संकटातून वाट काढत स्टॅन्ड अप कमेडीअन होण्यासाठी झगडणाऱ्या सामान्य माणसाचे प्रयत्न दोन्हीकडे आहेत. दुसरं साम्य आहे ते बरचसं सिम्बाॅलिक. बॅटमॅन आणि जोकर, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे अनेकदा सुचवलं गेलय. दोघांचं मास्कमागे दडणं, दोघांचं व्यवस्थेविरोधात असणं, दोघांचा एकटेपणा अशा घटकांमधून हे अधोरेखित होतं. वेडेपणा हा जोकरसाठी मुक्तीचा मार्ग आहे, तर शहाणपणाचं सोंग हाच ब्रूसचा मुखवटा आहे, असंही या व्यक्तिरेखांमधून दिसलेलं आहे. किलिंग जोकमधे हे फार स्पष्टपणे समोर येतं, आणि तीच गोष्ट आपल्याला जोकरमधेही दिसते. इथला ब्रूस अजून बच्चा आहे. पण थाॅमस वेनच्या तोंडी येणारे मुखवट्यामागे दडलेल्या भ्याड व्यक्तीबद्दलचे संवाद, जोकरचं व्हिजिलान्ती असणं, आर्थर आणि थाॅमस यांच्यातलं रहस्यमय नातं, आणि ब्रूसच्या आयुष्यातली ती एक महत्वाची घटना, या सगळ्यातून , ही बॅटमॅन आणि जोकर एकमेकांचं प्रतिबिंब असल्याची कल्पना स्पष्ट होते. अर्थात, हे तुमच्या लक्षात तरच येईल, जर तुमच्या या व्यक्तिरेखा परिचयाच्या असतील. पण नसल्या तरी बिघडत नाही. मग तुमच्यापुढे हा सिनेमा उलगडेल एका वेगळ्या रुपात.
जोकरच्या सुरुवातीलाच आर्थर फ्लेकच्या तोंडी एक वाक्य येतं, ते म्हणजे ‘ इज इट जस्ट मी, ऑर इज इट गेटींग क्रेझीअर आउट देअर ?’
वाक्य महत्वाचं आहे, आणि एकूण चित्रपटाचा जीवच जणू या वाक्यात आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला जगातली विकृती दिसत असणाऱ्या आर्थरचा प्रवास त्या बाहेर पसरलेल्या मॅडनेसमधेच सामावून जाण्याकडे कसा होतो, हीच चित्रपटाची कथा आहे. या आधीच्या प्रसंगांमधे आर्थर आपल्या विदुषकी अवताराची तयारी करत असताना गाॅथम शहरातल्या बिघडत्या वातावरणाबद्दलच्या बातम्या कानावर पडतात, त्यातून एक पार्श्वभूमी तयार होते. शहर बकाल होत चाललय, कचरा कामगारांचा संप सुरु आहे, वर्गभेदातून शहराचे तुकडे पडतायत, गुन्हेगारी वाढतेय. हे असंतोषाचं, असुरक्षिततेचं वातावरण कसं खोलवर रुजलय, हे दुकानाची जाहिरात करणाऱ्या आर्थरवर चौदा पंधरा वर्षाच्या मुलांचा एक गट क्रूर हल्ला करतो त्यातून दिसतं. आर्थरचा बाॅस या प्रकाराबद्दल खेद तर व्यक्त करत नाहीच, वर दुकानाच्या जाहिरातीचा बोर्ड तोडला म्हणून त्याचेच पैसे कापतो. चित्रपटाच्या सेट अप दरम्यानच येणाऱ्या या प्रसंगात वरकरणी चेहऱ्यावर हास्य धारण करणाऱ्या आर्थरच्या मनातल्या यातना वाकीन फिनिक्स ज्या ताकदीने दाखवतो, त्यावरुनच हा सध्याच्या अतिशय महत्वाच्या अभिनेत्यांमधला एक असल्याचं लख्खं दिसतं.
या व्यक्तिरेखेचं हास्य हा चित्रपटातला महत्वाचा मुद्दा आहे. बॅटमॅन माहीत असणाऱ्यांसाठीही आणि नसणाऱ्यांसाठीही.
व्हिक्टर ह्यूगोची एक कादंबरी आहे, ‘द मॅन हू लाफ्स’. या कादंबरीच्या नायकाचा चेहरा काही कारणाने विद्रूप झालेला आहे. त्या व्यंगामुळे तो कायमच हसत असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात तो दु:खी असला तरीही. मुळात जेव्हा जोकर ही व्यक्तिरेखा तयार केली गेली, तेव्हा या कादंबरीवर आधारीत चित्रपटातल्या फोटोचा संदर्भ जोकरच्या चित्रासाठी घेतला गेला. जोकर कसा बनला याच्या ज्या अनेक मूळकथा काॅमिक्समधे आहेत त्यातली तो कुठल्याशा रसायनात पडून त्याचा चेहरा विद्रुप झाला ही सर्वात परिचित कथा आहे. टिम बर्टनच्या मूळ बॅटमॅनमधेही ती वापरली होती. पण सर्वच कथांमधे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे थोडं प्रतिकात्मक आहे. तो प्रत्यक्षात हसत नसतानाही तो हसत असल्याचा भास ते तयार करतं. जोकर सिनेमात हे चेहरा विद्रुप करणं टाळलय. त्याऐवजी त्याला एक आजार असल्याचं दाखवलय ज्यामुळे तो विनाकारण , आणि नियंत्रणाबाहेर हसत सुटतो. घडणारे प्रसंग, आर्थरच्या मनात चाललेल्या भावना, आणि त्याच्याशी विरोधाभास साधणारं हास्य , याचा चित्रपटातला वापर अर्थपूर्ण आणि त्याचवेळी मूळ संकल्पनेशीही प्रामाणिक रहाणारा आहे.
शहरावर राज्य करणारा, आणि आता मेयर होण्याच्या स्पर्धेत असलेला अब्जोपती थाॅमस वेन ( ब्रेट कलन) आणि लोकप्रिय टाॅक शो होस्ट असलेला मरी फ्रॅन्कलिन ( राॅबर्ट डि निरो ) या दोन व्यक्तिरेखा आर्थरसाठी फादर फिगर्स असल्यासारख्या आहेत. आपल्या आईबरोबर ( फ्रान्सिस काॅनराॅय) एकटाच रहात असल्याने वडिलांच्या वयाच्या पुरुषांचं महत्व त्याच्या लेखी अधिक. या तिन्ही व्यक्तिरेखा आणि आर्थरचं त्यांच्याबरोबरचं नातं हे गुंतागुंतीचं आहे. चित्रपट पुढे सरकतो तशी ही गुंतागुंत वाढत जाते. सभोवती पसरलेल्या विसंगतींमधून वाट काढत, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करत जगू पहाणाऱ्या आर्थरचा बांध एकदा फुटतो आणि त्याच्या हातून असं काही घडतं, जे सामान्य जनतेला बंडाचं पहिलं पाऊल वाटेल. मग ही गांजलेली जनता विदुषकाच्या मुखवट्यालाच प्रतीक म्हणून वापरते आणि आपल्या जीवाशी खेळणाऱ्या धनिकांना उत्तर द्यायला तयार होते.
चित्रपटात विदुषकाच्या हास्याला जसं महत्व आहे तसंच मुळात विदूषक या संकल्पनेलाही. लोकांना हसवणारी व्यक्ती, सामाजिक अन्यायाचा बळी, आणि सामान्यांचा प्रतिनिधी, या तीन गोष्टी एकाच प्रतएकत्र केल्या की एकच व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येते आणि ती म्हणजे चार्ली चॅप्लिन. जोकरमधे विदूषक ही संकल्पना या सर्व अर्थांनी वापरली जाते, आणि या तिन्ही अर्थांची आपल्याला जाणीव करुन दिली जाते ती चॅप्लिनच्या माॅडर्न टाईम्समधला तुकडा एका महत्वाच्या जागी वापरुन. श्रीमंत उद्योगपतीने राजकीय नेता होऊन सामान्यांचा आवाज दबण्याचा प्रयत्न करणं हे ट्रंप इराशी सुसंगतच आहे, त्यामुळे चित्रपटाचं कथानक जरी ऐशीच्या दशकात घडत असलं, तरी त्याचा आजच्या काळाशी असलेला संबंध आपण विसरु शकत नाही.
जोकर बघायला सोपा नाही. त्यात हिंसा तर अंगावर येईलशा पद्धतीने समोर येतेच, पण इतर प्रसंगही अस्वस्थ करणारे आहेत. आणि आशयाचं काय? जोकर हा नायक आहे का खलनायक ? त्याला ॲंटीहिरोचं लेबल लावलं, किंवा चित्रपट व्हिलनला ग्लोरिफाय करतोय असं म्हंटलं, तर आपण चित्रपटाच्या आशयाकडे दुर्लक्ष करु शकतो का ? ग्लोरिफिकेशन हा शब्द अनेकदा चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो. जोकर खलनायकाला ग्लोरिफाय करतो असं कधी म्हणता येईल, जर तुम्ही आर्थर फ्लेक हा खलनायक असल्याचं मान्य केलत तर. चित्रपटातला आर्थर फ्लेक हा खलनायक नाही, तो परिस्थितीचा बळी आहे. हे लक्षात घेतलं, तर त्याच्या बद्दल सहानुभूती वाटणं, याला उदात्तीकरण म्हणता येणार नाही. आपल्या डोंबिवली फास्टमधला माधव आपटे परिस्थितीने बिथरतो, पण त्यालाही आपण खलनायक म्हणत नाही. आर्थरची व्यक्तीरेखा ही माधवपेक्षा अधिकच दारुण परिस्थितीत आहे. तिला आपण व्हिलन समजून सोपा मार्ग काढू शकत नाही.
वाकीन फिनिक्स आणि दिग्दर्शक टाॅड फिलिप्स , या दोघांमुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने शक्य झालाय असं म्हणावं लागेल. पण मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सचे चाणाक्ष लोक अधिकाधिक नफा मिळवणारा फाॅर्म्युला परफेक्ट करत चालले असताना डिसीने आपले वेगळे प्रयत्न चालू ठेवण्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. आधी क्रिस्टफर नोलन दिग्दर्शित डार्क नाईट त्रयी, आणि आता जोकर यांमधून कलात्मक दृष्ट्या तरी त्यांनी आज मार्वलच्या पुढे मजल मारलेली आहे. वाकीन फिनिक्स ने आजवर काही फार वेगळी कामं केलेली आपण पाहिली आहेत. वाॅक द लाईन, द मास्टर, हर, यू वेअर नेव्हर रिअली हिअर, अशी कितीतरी नावं घेता येतील. पण तो भूमिका कशी जगू शकतो, हे त्याने स्वतःवरच करुन पाहिलेल्या ‘ आय’म स्टिल हिअर’ या माॅक्युमेन्टरी प्रयोगातून दिसतं. वाॅक द लाईनच्या यशानंतर आपण अभिनय बंद करुन गायक म्हणून करीअर करतोय असं जाहीर करणं, आणि ‘संपलेला अभिनेता’ या अवस्थेत दोन वर्ष काढून इंडस्ट्रीच्या बेगडी कौतुकाचा आणि लोकप्रियतेचा बुरखा फाडणं, हे फारच अवघड काम त्याने तिथे करुन दाखवलय. जोकरच्या निमित्ताने तो आता पहिल्या दोन तीन सर्वोत्कृष्ट हाॅलिवुड अभिनेत्यांमधला एक गणला जायला हरकत नाही.
टाॅड फिलिप्सने आजवर असं काहीही केलेलं नाही. हॅन्गओवर मालिका हे त्याचे सर्वात लोकप्रिय चित्रपट. मग अचानक तो मार्टीन स्कोर्सेसीच्या फिल्मोग्राफीत शोभेलसा चित्रपट कुठून करु शकला हो कोडच आहे. जोकरवरला स्कोर्सेसीचा प्रभाव उघड आहे. खासकरुन ‘टॅक्सी ड्रायवर’ आणि ‘ द किंग ऑफ काॅमेडी’ हे चित्रपट तर सरळच आठवणारे. व्यक्तीचित्रणाला कथेहून अधिक महत्व, हिंसाचाराचे तपशील, विशिष्ट काळात प्रेक्षकाला घेऊन जाण्याची हातोटी, असं शैलीतलं साम्य जागोजागी आहे.
यापुढे आपल्या पुढल्या चित्रपटात फिलिप्स काय करेल याबद्दल फार कुतुहल आहे.
जोकर पाहून असं वाटलं की ब्रूस वेन अर्थात बॅटमॅन कितीही चांगला नायक असला, तरी त्याच्या श्रीमंती पार्श्वभूमीमुळे, जी ती गोष्ट अचूक प्लान करण्यामुळे, सारं नियंत्रणात ठेवण्याच्या कौशल्यामुळे आजच्या काळाशी आउटसिंक होतोय का ? आजूबाजूच्या गोष्टी नियंत्रणाबाहेर चाललेल्या दिसत असताना, उद्योगपतींचा समाजावर कबजा होत असताना, सामान्यांचा आवाज दाबला जात असताना, कदाचित आज आपल्याला जोकरच हवेत. या सगळ्या वेडेपणावर मार्ग निघणं शक्यच नसेल तर निदान त्यावर हसता येणं, हा एकच मार्ग आता उरला नाही का ?
-गणेश मतकरी
Read more...