द कश्मीर फाईल्स - अपुऱ्या संदर्भांची सत्यकथा

>> Sunday, March 20, 2022







( हा लेख साधारण ‘कन्विन्सींग द कन्विन्स्ड’ या वर्गातला आहे याची मला कल्पना आहे. ज्यांना त्यातले मुद्दे मान्य नाहीत त्यांना या लेखाने ते मान्य होतील या भ्रमात मी नाही. ज्यांना माझ्या मटामधल्या ‘द कश्मीर फाईल्स’चा छोटासा उल्लेख असलेल्या आणि एकूण समाजचित्राबद्दल बोलणाऱ्या लेखानेही त्रास होत होता, ते हा लेख कसा सहन करतील? असो. टु बी फेअर, मी फिल्म आणि दिग्दर्शक यांना आशय पटवून देण्याची पुरेशी संधी दिलेली आहे. मी फिल्म थिएटरला जाऊन पाहिली आहेच, त्याबरोबरच विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची लल्लनटॅाप वरची तब्बल एक तास चाळीस मिनिटांची मुलाखतही मी पाहिली आहे. अशोक कुमार पांडेय यांचा एक पाऊण तासाचा व्हिडीओ पाहिला आहे ज्यात या घटनेसंदर्भात वेगवेगळ्या पुस्तकांमधे आलेले अनेक संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. त्याशिवाय निवेदिता मेनन , ज्यांच्यावर चित्रपटातली राधिका मेनन ही व्यक्तिरेखा ( काही प्रमाणात )आधारलेली आहे त्यांच्या विद्यार्थ्यांसमोरच्या भाषणाचे व्हिडीओ, त्यांच्यावरची टिका हेदेखील मी पाहिलेलं आहे. त्याशिवाय दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करणारे अनेक व्हिडीओ, लेख इत्यादी पाहिलेलं आहे. हे सारंच ज्यांना शक्य आहे त्यांनी पहावं. ते नेटवर सहज सापडेल. )


दोन दिवसांपूर्वी रात्री अकरा वाजता ‘द कश्मीर फाईल्स’चा शो पहाण्यासाठी मी आयनॅाक्स मधे पोचलो तेव्हा एखाद्या पोलिटीकल रॅलीसारखं वातावरण समोर आलं. आयनॅाक्सच्या लॅाबीमधे खच्चून लोक भरले होते. पोलिस बंदोबस्त होता. जमून गटागटाने उभ्या असलेल्या लोकांच्या हाती तिरंगा दिसत होता. हा तिरंगा समोर धरुन आणि घोषणा देताना मुठी वळून ग्रुप फोटो काढले जात होते. जरी मास्क लावण्याचा नियम अजून शिथील झाला नसला तरी सर्वच राजकीय कार्यक्रमांप्रमाणे इथेही अर्ध्याहून अधिक लोक मास्कशिवाय फिरत होते. मास्क लावणं आवश्यक आहे असं सांगणाऱ्या पाट्या घेऊन आयनॅाक्सचे कर्मचारी फिरत होते, पण प्रत्यक्षात या गर्दीतल्या कोणालाही काहीही सांगण्याची त्यांची हिंमत होईलसं वाटत नव्हतं. गर्दीतून आत शिरल्यावर लक्षात आलेली पहिली गोष्ट होती ती म्हणजे एरवी वेगवेगळ्या चित्रपटांची जाहीरात करणारे डिजीटल स्क्रीन्स आता फक्त एकच नाव डिस्प्ले करतायत, ‘द कश्मीर फाईल्स’. थोडी चौकशी केल्यावर कळलं की चित्रपटाचे बरेच खेळ एका राजकीय संघटनेने आपल्या सभासदांसाठी आयोजित केलेले आहेत. आम्ही पाहिला तो खेळ असा नव्हता . रात्री अकराचा असूनही प्रेक्षागृह पूर्ण भरलेलच होतं. पण निदान इथे घोषणा, झेंडे वगैरेला स्थान नव्हतं. लोक तसे शांत आणि आपल्याला काहीतरी गंभीर, विचार करायला लावणारं पहायला मिळणार अशा तयारीत होते.  स्पॅान्सर्ड खेळाला जमून घोषणा देणाऱ्या आणि मोफत पॅापकॅार्न, कोक घेत आत शिरणाऱ्यांपेक्षा, इथल्या लोकांची मनस्थिती चित्रपट पहाण्यासाठी अधिक योग्य वाटत होती.


‘ द कश्मीर फाईल्स’चं कथानक अनेकांनी अनेकदा सांगून झालं आहे. त्यामुळे त्यात मी फार तपशीलात जाणार नाही. फक्त मांडणीपुरतं त्याबद्दल बोलतो. पटकथेचे साधारण तीन भाग पडतात. कृष्णा ( दर्शन कुमार ) या जन्माने काश्मिरी पंडीत असलेल्या पण लहानपणीच तिथून बाहेर पडलेल्या युनिवर्सिटी स्टुडन्टचं काश्मीरमधे पोचणं आणि त्याच्या आजोबांच्या  मित्रांना भेटणं, हा यातला पहिला भाग. हा चित्रपटाच्या वर्तमानात घडतो.  त्या मित्रांच्या आठवणींमधून आपल्याला १९ जानेवारी १९९० आणि त्यानंतरच्या काळात काश्मिरी पंडीतांवर जे अनन्वित अत्याचार झाले याबद्दलचं सत्य दाखवलं जाणं हा झाला दुसरा भाग. तर या सगळ्याशी पूर्ण विरोधाभास साधणारा तिसरा भाग म्हणजे जेएनयू ( भारतात प्रदर्शित प्रिन्टमधे एएनयू ) मधे राधिका मेनन ( पल्लवी जोशी ) या शिक्षिकेकडून शिकवला जाणारा इतिहासाचा विपर्यास, आणि युनिवर्सिटीतलं एकूणच पाकीस्तानधार्जिणं वातावरण. चित्रपट या तीन भागात मागेपुढे करत रहातो.


या चित्रपटाच्या आशयाबद्दल तऱ्हेतऱ्हेचे टोकाचे विचार आपण ऐकलेले आहेत. अग्निहोत्री, त्याची टीम, स्वत: पंतप्रधान आणि अनेक जणांच्या मते चित्रपटात मांडलय ते संपूर्ण सत्य आहे. पुस्तकांमधे या साऱ्याची नोंद नसली तरीही या प्रत्यक्ष पंडितांनी सांगितलेल्या आठवणी आहेत, आणि अशी ओरल हिस्ट्री जुळवूनच चित्रपट तयार केल्याचं दिग्दर्शक सांगतो. याउलट अनेकांनी अशीही भूमिका घेतली आहे, की अग्निहोत्रीने सत्याचा विपर्यास केला आहे. असं म्हणणाऱ्यांमधे स्वत: काश्मिरी पंडितांमधले काही जण आहेत. अशोक कुमार पांडेय सारखे या विषयावर पुस्तकं लिहिणारे आहेत. या बाजूचे अनेकजण आणखी एका गोष्टीकडेही आपलं लक्ष वेधतात, की जेव्हा पंडितांवर अत्याचार झाले, तेव्हा केंद्रात बीजेपीचा पाठिंबा असलेलं व्हीपी सिंगांचं सरकार होतं आणि झाल्या घटनेनंतरही बीजेपीने पाठींबा काढून घेतला नाही, ज्याबद्दल चित्रपट गप्प आहे. चित्रपट एकूणच राजकीय उल्लेख कमीत कमी प्रमाणात करतो, आणि ‘ही सामान्य माणसांची कहाणी आहे’, या कारणाखाली हा अनुल्लेख चालवून नेला जातो. अशाच टाळलेल्या उल्लेखांमधे पुढे बीजेपीत गेलेल्या जगमोहनांचाही समावेश करता येईल, जे १९९० च्या जानेवारी १९ पासून मे २६ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर होते. चित्रपटाला विरोध असलेल्यांकडून असाही एक मुद्दा उपस्थित केला जातो की २०१४ पासून केंद्रात असलेल्या बीजेपी सरकारने अजूनपर्यंत पंडितांच्या भल्यासाठी काही निश्चित पावलं का उचललेली नाहीत ?


थोडक्यात सांगायचं तर दोषारोप दोन्ही बाजूंनी होतायत, आणि यातली कोणती बाजू खरी यावर एकमत झालेलं नाही. याचं एक कारण असं, की हा इतिहास ताजा आहे. काही प्रमाणात तो अजूनही घडतो आहे. अग्निहोत्रीच्या ‘द ताश्कंद फाईल्स’मधल्या घटनांकडे आपण अंतरावरुन आणि अधिक शहाणपणाने पाहू शकत होतो, तसं इथे होऊ शकत नाही. इतिहासाच्या परस्परविरोधी आवृत्त्या इथे आहेत आणि त्या तपासून पहाण्यासाठी एकच सर्वमान्य आवृत्ती उपलब्ध नाही.


आता ‘द कश्मीर फाईल्स’ ची गुणवत्ता ठरवायची कशी, हा थोडा इन्टरेस्टींग प्रश्न आहे. तो चित्रपट आहे, माहीतीपट नाही, ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी आणि कथानक / युक्तिवाद प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शकाला थोडं स्वातंत्र्यही देऊ करायला हवं. मात्र ते करताना तो मांडतोय ते नॅरेटीव दोन धर्मांमधे तेढ निर्माण करु शकतं, ( सध्या ते तसं करतंही आहे ) हे आपल्याला विसरता येणार नाही. तसं जर असेल, तर कोणती बाजू बरोबर ठरवायची ? चित्रपट म्हणून आपल्याला तो दर्जेदार वाटला, तर त्यातल्या ज्वालाग्रही आशयाकडे आपण दुर्लक्ष करु शकतो का ? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपण आशयाच्या सत्यासत्यतेचा आग्रह धरुन बसलो, तर दिग्दर्शकाच्या भूमिकेच्या स्वातंत्र्याचं काय ?


दिग्दर्शक जेव्हा चित्रपटाला सॅाफ्ट पॅावर मानतो; आणि लल्लनटॅापला दिलेल्या जवळपास पावणेदोन तासांच्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीने तसं म्हटलच आहे, तेव्हा तो सिनेमाचा वापर मत तयार करण्याचं साधन म्हणून करतोय हे स्पष्ट आहे. आणि तसं जर असेल, तर या चित्रपटाकडे केवळ कला म्हणून पहाता येणार नाही. त्यातल्या भूमिकेची तपासणी अधिक काळजीपूर्वक झाली पाहिजे. पण ती करताना आपण त्यात दाखवलेल्या गोष्टी खोट्या आहेत असं मानू शकतो का ? तसं करण्याची मला गरज वाटत नाही.


मी हे मानून चालेन, की वर सांगितलेल्या मांडणीच्या तीन भागांतला मधला आणि सर्वात महत्वाचा  भाग, ज्यात १९ जानेवारी १९९०च्या आसपासचे आणि पुढल्या काही दिवसात घडणारे तपशील येतात, हा संपूर्ण खरा आहे. दिग्दर्शकाने तसं म्हटलं आहे, आणि तिथे शंका घेण्याचं कारण नाही. अग्निहोत्री पंडितांच्या हत्यांना ‘जेनोसाईड’ हा शब्द वापरतो, ज्यावर सध्या बरीच चर्चा सुरु आहे. चित्रपटात ‘जेनोसाईड’ बरोबरच ‘एक्झोडस’ हा आणखी एक शब्द येतो. त्याबरोबरच चित्रपटावरच्या एका प्रतिक्रियेत मी ‘एथनिक क्लेन्सिंग’ असा शब्दप्रयोगही वापरलेला वाचला आहे. खरं तर या घटनेसंदर्भात हे तीनही शब्द कमी अधिक प्रमाणात खरे आहेत. अनेकांनी जेनोसाईड शब्दाला आक्षेप घेताना हत्या झालेल्या काश्मिरी पंडीतांच्या संख्येवर चर्चा केली आहे. मी संख्येला बाजूला ठेवतो. तसं ठेवूनही ‘विशिष्ट वंशातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात संहार’, ही व्याख्या गृहीत धरली, तर जेनोसाईड हा शब्द बरोबर ठरेल. आता प्रश्न असा, की हत्या केवळ विशिष्ट वंशाच्या व्यक्तींचीच झाली का ?


चित्रपट पहाताना आपल्याला क्रूर मुस्लिम दहशतवाद्यांच्या हातून निष्पाप हिंदू ( काश्मिरी पंडीत ) मरताना दिसतात पण मुस्लिमांचा मृत्यू आपल्याला दिसत नाही. एखाद्या करारात जसं तळटिपेत काहीतरी महत्वाचं लिहून ठेवलं जातं तसं चित्रपटातल्या कृष्णाच्या शेवटच्या भाषणात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या यादीत मुस्लिमही असल्याची नोंद घेतली जाते, पण हे मृत्यू आपल्याला पडद्यावर कुठेच दाखवले जात नाहीत. दिसतात ते फक्त हिंदूंचे मृत्यू. याबद्दल जेव्हा लल्लनटॅापच्या मुलाखतीत दिग्दर्शकाला विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला की हॅालोकॅास्ट झालं तेव्हा ज्यूंबरोबर जर्मनही मारले गेले, पण त्यांचा कुठे आपण वेगळा उल्लेख करतो ? हा युक्तिवाद योग्य नाही, कारण तेव्हा जर्मन मारले गेले ते युद्धभूमीवर.  कितीसे जर्मन ज्यूंचं रक्षण करताना गेले असतील?  मृत्यूंची एकूण संख्या पहाता काय प्रमाण असेल? काश्मीर हत्याकांडात हिंदूंबरोबर  जे मुस्लीम मारले गेले त्यांचे अनेक उल्लेख उपलब्ध आहेत. अशोक कुमार पांडेय यांच्या व्हिडीओत त्या संबंधातले अनेक संदर्भ आहेत. जेव्हा मुस्लिमांचा उल्लेख गाळला जातो, जेव्हा त्यांच्या अंताला दृश्यरुप दिलं जात नाही,  तेव्हा या सत्यघटनेच्या चित्रणात एक छोटा पण महत्वाचा बदल होतो. दिसणारा संघर्ष हिंदू विरुद्घ मुस्लिम हाच आहे, अशीच आपली समजूत करुन दिली जाते, जेव्हा प्रत्यक्षात तो ‘भारताच्या बाजूचे’ विरुद्ध ‘भारताच्या विरोधातले’, असा आहे. या काळात झालेला मुस्लिमांचा मृत्यू ते भारताच्या बाजूचे असल्याने झालेला आहे. हे चित्र ‘ द कश्मीर फाईल्स’ पुसट करुन टाकतो आणि एका सत्य घटनेवर आधारीत चित्रपटाची प्रॅापोगंडा फिल्म बनत जाते.


पुन्हा एकदा सांगतो, की असं केल्याने चित्रपटात दाखवलेले हिंदूंवरचे अत्याचार खोटे ठरत नाहीत. यातल्या अनेक घटनांची नोंद लोकल वृत्तपत्रांमधून झालेली आहे, आणि चित्रपटात ब्रम्हा ( मिथून चक्रवर्ती ) फाईल्समधे चिकटवताना दिसतो ती हीच कात्रणं. या घटना क्रूर आहेत, अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. त्यातल्या बऱ्याच घटनांच्या मुळाशी असलेला दहशतवादी फारुक मलिक बिट्टा ( चिन्मय मांडलेकर, अतिशय प्रभावी परफॅार्मन्समधे ) ही व्यक्तिरेखाही खरीच आहे. या साऱ्या शोकांत घटनांचं चित्रण चित्रपट खऱ्यासारखं करतो, आणि त्यासाठी तो आणि दिग्दर्शकीय कामगिरी, ही निश्चितच उल्लेखनीय मानता येईल. पण त्याबरोबर मांडणीत असलेले आणि  वर्तमानकाळात घडणारे  जे इतर दोन भाग आहेत, ते या भागाइतके प्रभावी नाहीत.


कृष्णाच्या आजोबांचे मित्र आपल्याला भूतकाळात भेटतात तसेच वर्तमानातही. भूतकाळात त्यांचं चित्रण हत्याकांडाच्या भीषण घटनांच्या संदर्भात येतं, जे त्यांच्या हतबलतेची जाणीव करुन देणारं, प्रातिनिधिक स्वरुपाचं आहे. वर्तमानात मात्र या व्यक्तिरेखा खूप बोलण्यापलीकडे, तेही पुस्तकी बोलण्यापलीकडे, फार काही करत नाहीत. मिडीआला दहशतवाद्यांची रखेल म्हणणं, सरकारने पद्मश्री तोंड बंद ठेवण्यासाठी दिलीय यासारखे टाळीचे संवाद बोलणं यावर इथला मोठा भाग खर्ची पडतो. लोकांच्या भावनेला हात घालता घालता काही वेळा साधा तर्कही चित्रपटाच्या हातून सुटतो. एका प्रसंगात कृष्णा ग्रुप फोटो पाहून ‘यात माझे आई वडील कुठले?’ असं विचारतो. हा क्षण चित्रपटात महत्वाचा आहे. प्रश्नंही मन हेलावून टाकणारा आहे. पण त्या ग्रुप फोटोकडे पाहिलं तर लक्षात येतं, की कृष्णाचे आई वडील आणि भाऊ वगळता फोटोतले इतर सगळे जण त्या क्षणी कृष्णाबरोबर त्या खोलीतच आहेत. मग त्याला असा प्रश्न का पडावा?


हा सगळाच भाग जरी शब्दबंबाळ आणि अनावश्यक लांबी असलेला झाला, तरी मला सर्वात फसलेला वाटतो तो जेएनयू मधला भाग. हा भाग अनेकांना खटकला आहे, आणि प्रो-बीजेपी मंडळींनी या मुद्द्यावरुन त्यांची यथेच्छ टिंगलही केली आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही माझं मत मांडतो. जेएनयू मधल्या भागाचा सर्वात मोठा दोष माझ्या मते ज्या पद्धतीने प्राध्यापक राधिका मेनन यांची व्यक्तीरेखा सादर केली आहे, त्यावर जातो. जेएनयूचा ‘काश्मीर भारतापासून स्वतंत्र व्हावं’ या धोरणाला पाठींबा असल्याचं मत प्रचलित आहे. तिथल्या प्राध्यापक निवेदिता मेनन यांची व्हिडीओ क्लिप आपण पाहिली आहे आणि त्यावरुन झालेला वादही ऐकलेला आहे. राधिका मेनन ही चित्रपटातली  व्यक्तिरेखा निवेदिता मेनन आणि अरुंधती रॅाय या दोघांचं मिश्रण आहे.


जेएनयूमधे स्वतंत्र काश्मीरला पाठींबा असलेले काही लोक निश्चित असतील ( त्याचा पुरावा म्हणून तिथली ग्राफिटी, तिथे वेळोवेळी देण्यात आलेल्या घोषणा याबद्दल आपल्याला कळत असतच )  परंतू प्रत्येक विद्यार्थी ( आणि बहुधा प्रोफेसरही ) याच विचाराचा असल्याचं भासवणं हे मला एका टोकाचं चित्रण वाटलं. दिग्दर्शक म्हणतो की सगळेच असे नसतील, कथेसंदर्भात हवा तोच भाग मी दाखवला, पण तसा विशिष्ट भागच निवडल्याने पूर्ण युनिवर्सिटी या एकाच विचाराने भारलेली असल्याचं चित्रीत होतं. आपल्या देशाच्या अर्थमंत्र्यांपासून अनेक जण या विद्यापिठातून आलेले आहेत, आणि केवळ नक्षलवादच इथे शिकवला जात असेल तर ते शक्य होणार नाही.


या एकूणच असमतोल चित्रणावर  कडी करतं ते राधिका मेनन हे पात्र. प्रत्यक्ष व्हिडीओ क्लिप्समधे दिसणाऱ्या प्राध्यापक निवेदिता मेनन यांची बॅाडी लॅन्ग्वेज, बोलण्याची पद्धत आणि चित्रपटातलं राधिका मेनन यांचं चित्रण हे खूप वेगळ्या प्रकारचं वाटतं. चित्रपटात ही भूमिका खलनायकी पद्धतीनेच समोर येते, ज्यामुळे ती खरी वाटत नाही. ही व्यक्तिरेखा गंभीर आणि विचारी वाटली असती  तर तिच्या दृष्टीकोनाचा मुलांवर झालेला परिणाम अधिक भिडला असता. महाविद्यालयातून चुकीचा दृष्टिकोन पसरवला जातोय असं खरोखर वाटलं असतं, जसं निवेदिता मेनन यांच्या क्लिप्स पाहून वाटतं. (प्रत्यक्षात आपण या क्लिप्सची थोडी अधिक माहिती काढली तर त्या काय संदर्भात, कोणत्या व्याख्यानातल्या आहेत हेदेखील आपल्याला कळू शकेल. आपण बोललो ते काय अर्थाने याबद्दलचं स्पष्टीकरणही मेनन यांनी दिलेलं आहे. ही सारीच माहीती इंटरनेटवर उपलब्ध आहे.)


निवेदिता मेनन यांची मांडणी ‘नॅशनॅलिटी’ या विषयाबद्दलच्या मालिकेतल्या एका भाषणाचा भाग आहेत. चित्रपटात मात्र राधिका मेनन ही व्यक्तिरेखा काही सैद्धांतिक मांडणी करतेय असं न वाटता एखाद्या हिंदी सिनेमातली व्हॅम्प असल्यासारखीच वाटते. ती एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातली प्राध्यापक न वाटता २४/७ दहशतवाद्यांची पब्लिक रिलेशन्स पहाणारी बिट्टाची मैत्रीणच असल्यासारखं चित्र चित्रपटात रंगवून, ही व्यक्तीरेखा हास्यास्पद करुन ठेवण्यात आली आहे. ती महत्वाची ठरण्यासाठी तिने कॅरीकेचर पलीकडे जाणं गरजेचं होतं, जे होत नाही. त्याशिवाय कृष्णा ज्या मुलांबरोबर शिकतो आहे, ती कोण आहेत, कशी आहेत, त्यांना विद्यापीठात मांडलेले टोकाचे विचार का पटतायत, ती प्रतिप्रश्न का करत नसतील, हे सारं आपल्याला उलगडून दाखवायला हवं होतं. केवळ मला तसं वाटतं म्हणून नाही, तर या गटाचं, तरुण पिढीचं मत काय आहे, याला चित्रपटात आशयाच्या दृष्टीने महत्व आहे म्हणून. मेननच्या वागण्याला हो ला हो करणं आणि कृष्णाला विरोध करणं, या पलीकडे हे जेएनयूमधले तथाकथित बंडखोर उभेच रहात नाहीत. त्यांच्या विद्यापिठाची निवडणूक जणू देशाची निवडणूक असल्याच्या गांभीर्याने सगळे ( विशेषत: प्राध्यापक ) का घेतायत हेदेखील मला कळलं नाही!


या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या शेवटाकडे येणारा कृष्णाच्या भाषणाचा प्रसंग तर फारच बाळबोध वाटतो. कृष्णाने काश्मीरमधे जाऊन सत्याची माहीती करुन घेणं आणि युनिवर्सिटीत भाषण देऊन सर्वांना गप्प करणं, हे पटकथेत अपेक्षितच आहे, पण ज्या कृष्णाला काश्मीरची काहीच माहीती नाही, तो एका दिवसात त्या विषयाचा एन्सायक्लोपिडीआ कसा बनतो हे काही कळलं नाही. त्यात भाषणाला होणारा विरोध , मग सपोर्ट, हे सगळं अगदी दिग्दर्शकाच्या मनात आल्यासारखच चित्रीत होतं. प्रत्यक्षात अशा सामान्य भाषणाचा टिकाव जेएनयुच का पण कोणत्याही कॅालेजमधे विरोधी विचारांच्या मुलांसमोर लागणं शक्य नाही.


मी असं ऐकलं की अलीकडे संसदेत कोणीतरी कश्मीर फाईल्स बॅन करण्याची मागणी केली, चित्रपट इस्लाम द्वेष पसरवतो आहे, असं कारण देऊन. माझ्या मते तसं होऊ नये. एक तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण मर्जीनुसार कुणाला आहे तर कुणाला नाही, असं वाटून टाकू शकत नाही. आणि ते सरसकट नसण्यापेक्षा सरसकट असावं. म्हणजेच आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी जरी पडद्यावर दिसल्या, तरी त्यांचा पडद्यावर येण्याचा हक्क आपण मान्य करायला हवा. आपल्यात स्वतंत्र विचार करण्याचं तारतम्य असेल तर आपण काय घ्यायचं, काय सोडायचं हे निश्चितच ठरवू शकतो.


दुसरी गोष्ट म्हणजे यातली काश्मीरी पंडीतांची कहाणी, ज्यातल्या सत्य घटना या लोकांपुढे यायला हव्याच होत्या. पण त्या पहाताना आपण निर्वातात न पहाता त्याभोवती संदर्भाची जी चौकट आहे, ती डोळ्यासमोर आणून पहायला हव्या. जर चित्रपट ती चौकट उभी करत नसेल, तर ती उभी करणारी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकं काश्मीरवर लिहिली गेली आहेत. ती आवर्जून तपासायला हवी.


आणि शेवटची गोष्ट आहे ती चित्रपटापलीकडची. जे लोक चित्रपटाला प्रॅापोगंडा म्हणून वापरतायत, त्याचे फुकट खेळ लावतायत, चित्रपटगृहांमधे भाषणं करतायत, त्यांचा हेतू केवळ सत्य आपल्यापर्यंत पोचावं एवढाच मर्यादीत आहे का इतरही काही आहे, हा विचारही आपल्याला करता यायला हवा. द्वेष केवळ कृतीमधूनच पसरत नाही, तो विचारांमधूनही पसरु शकतो. आणि अशा विचारांमधून पसरणाऱ्या द्वेषाचा प्रभाव कदाचित अधिकच दूरगामी असू शकतो. आपण त्याचं वाहक व्हायचं का नाही, हे आपणच ठरवायला हवं. 


गणेश मतकरी

 

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP