पुन्हा एकदा क्रांती!

>> Monday, January 28, 2008"व्ही फॉर व्हेन्डेटा' हा चित्रपट आपल्या डोंबिवली फास्ट आणि रंग दे बसंती या दोन्ही क्रांतिवादी चित्रपटांपेक्षा काही बाबतींत खूपच वेगळा आहे. एक तर तो त्यांच्यासारखा वास्तववादी नाही, तर फॅन्टसीच्या अधिक जवळ जाणारा आहे. ते साहजिकही आहे. कारण तो ऍलन मूरच्या ज्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे, ते घडतं एका काल्पनिक इंग्लंडमध्ये 1997-98 च्या सुमारास.काही वेळा हिंसा हेच एकमेव उत्तर असतं, असं सांगणारे चित्रपट एकाएकी अवतरायला लागले आहेत. अचानक समाजाच्या सर्व थरांतूनच नव्हे; पण विभिन्न प्रांतांतूनही हा आवाज उमटायला लागला आहे. एका मराठी आणि एका हिंदी चित्रपटानंतर आता हा संदेश देणारा चित्रपट आहे इंग्रजी, तोही हॉलिवूडचा. व्ही फॉर व्हेन्डेटाफ चित्रपटाच्या पोस्टरवरली टॅगलाईनच त्यांना काय म्हणायचंय ते स्पष्ट करते. पीपल शुड नॉट बी अफ्रेड ऑफ इट्‌स गव्हर्न्मेंट, गव्हर्न्मेंट शुड बी अफ्रेड ऑफ इट्‌स पीपलफ असं सांगणारा हा चित्रपट. (खरं पाहता हे वाक्‍य थोडं टोकाचं आहे, कारण खऱ्या सुराज्यात सरकार किंवा जनता कोणीच कोणाला घाबरायची गरज नाही. मात्र, हेच वाक्‍य आपण अफ्रेडऐवजी अकाउंटेबल हा शब्द घालून वाचलं तर अधिक पटण्यासारखं आहे.)मात्र, व्ही फॉर व्हेन्डेटाफ हा चित्रपट आपल्या दोन्ही क्रांतिवादी चित्रपटांपेक्षा काही बाबतींत खूपच वेगळा आहे. एक तर तो त्यांच्यासारखा वास्तववादी नाही, तर फॅन्टसीच्या अधिक जवळ जाणारा आहे. ते साहजिकही आहे. कारण तो ऍलन मूरच्या ज्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे, ते घडतं एका काल्पनिक इंग्लंडमध्ये 1997-98 च्या सुमारास. या जगातल्या इतर महासत्तांनी स्वतःचा नायनाट करून घेतला आहे आणि इंग्लंड हेच एकमेव मोठं राष्ट्र उरलेलं आहे. त्यांचा राष्ट्रप्रमुख त्यांना इतर जगापासून सुरक्षित ठेवण्याचं वचन देतो; पण लोकांच्या स्वातंत्र्यावर पूर्ण आळा घालून, हुकूमशाही पद्धतीनं, हिटलरी मार्गानं चालून.वाचॉस्की बंधूंनी रूपांतर करताना यातली आपल्या आसपासच्या काळातल्या वेगळ्या; पण समांतर काल्पनिक विश्‍वाची कल्पना बदलली आहे. (बहुधा ती त्यांच्या आधीच्या चित्रपटातल्या मेट्रिक्‍समधल्या समांतर संगणकीय विश्‍वाशी खूप जवळ जाणारी वाटेलशी त्यांना भीती वाटली असावी.) आणि हे इंग्लंड भविष्यकाळातलं असल्याचं सुचवलं आहे. अर्थात, हा भविष्यकाळ विज्ञानपटांमधल्या नेहमी पाहायला मिळणाऱ्या भविष्यकाळासारखा उडत्या गाड्या वगैरे असणारा नाही, तर जवळजवळ आजच्या जगासारखाच आहे. प्रमुख बदल आहेत जे राजकीय, इतर फार नाहीत. वातावरण मात्र गढूळ, काळवंडलेलं आहे. सगळ्याच बाबतीत.व्हेन्डेटाफचं ग्राफिक नॉव्हेल पाहिलं तर आपल्याला हा पुस्तकांचा प्रकार किती प्रगल्भ होत चालला आहे याची कल्पना येईल. समाजबदलाच्या शक्‍यता, राजकारण, स्वातंत्र्याच्या संकल्पनेबद्दलचं चिंतन, प्रतीकात्मकता, रहस्य आणि नाट्यमयता यांनी व्ही फॉर व्हेन्डेटाफची चित्रकादंबरी खच्चून भरली आहे. ऍलन मूरच्या बहुतेक ग्राफिक नॉव्हेल्समध्ये या प्रकारच्या विचारांना चालना देणारा आशय पाहायला मिळतो. वॉचमेन, फ्रॉल हेल, लीग ऑफ एक्‍स्ट्रॉऑर्डिनरी जन्टलमेन अशा त्याच्या विविध पुस्तकांना अमाप प्रसिद्धी मिळालेली आहे. मात्र, त्याचं त्यावरून केलेल्या चित्रपटांबरोबर मात्र फारसं जमत नसावं. इथंही मूरनं चित्रपटापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. इतकं, की श्रेयनामावलीतही त्याचं नाव आलेलं नाही. मात्र, व्हेन्डेटाचं श्रेय प्रथम द्यायला हवं ते मूरलाच.व्हेन्डेटाचे नायक आहेत व्ही (ह्यूगो विहींग) आणि इव्ही (नॅटली पोर्टमन). व्ही आहे एक बंडखोर जो हुकूमशहा सटलर आणि त्याच्या माणसांशी जवळजवळ एकटा टक्कर देतोय. व्हीने गाय फॉक्‍स या 1605 मध्ये पार्लमेंट उडवून देण्याचा कट रचणाऱ्या क्रांतिकारकापासूनच या लढ्याची स्फूर्ती घेतली आहे. (रंग दे बसंती आठवतोय?) त्यामुळे तो सर्व वेळ गाय फॉक्‍सच्या सस्मित चेहऱ्याचा मुखवटा लावूनच वावरतोय. चित्रपटाच्या सुरवातीला व्ही काही सरकारी गुंडांपासून इव्हीला वाचवतो आणि तिला बरोबर घेऊनच एक सरकारी इमारत उद्‌ध्वस्त करण्याची योजना पार पाडतो. तारीख असते पाच नोव्हेंबर (पाच नोव्हेंबर या तारखेला विशेष अर्थ आहे, कारण गाय फॉक्‍सनं आखलेल्या योजनेचीही हीच तारीख होती. अजूनही त्या तारखेला इंग्लंडमध्ये फॉक्‍सची आठवण घेतली जाते. त्या घटनेवर एक चार ओळींची लोकप्रिय कविताही म्हटली जाते जिचा वापर चित्रपटातही आहे. ती अशी...रिमेम्बर, रिमेम्बर द फिफ्थ ऑफ नव्हेम्बर,द गनपाउडर ट्रिझन ऍन्ड प्लॉट,आय सी ऑफ नो रिझन, व्हाय गनपाउडर ट्रिझन,शुड एव्हर बी फरगॉट.या घटनेनंतर व्ही आणि इव्ही दोघांचाही शोध सुरू होतो. व्ही ची योजना असते ती पुढल्या पाच नोव्हेंबरपर्यंत लोकांना सरकारी जाचातून सोडवण्याची, ज्या कामात तो इव्हीची मदत मागतो; पण इव्हीची हिंमत होत नाही. ती पळ काढते. व्ही आपल्या योजनेवर ठाम असतो.इफेक्‍ट्‌सची रेलचेलवाचोस्की बंधूंची मेट्रिक्‍स चित्रत्रयी सर्वांत परिणामकारक होती ती त्यातल्या पहिल्या चित्रपटात, ज्याला विज्ञानपटाचं रूप तर होतं; पण अनेक तत्त्वशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्‍नांची चर्चाही होती. पुढल्या दोन चित्रपटांत खास करून रेव्होल्यूशन्समध्ये यातला वैचारिक भाग संपून गेला आणि केवळ इफेक्‍ट्‌सची रेलचेल उरली. मेट्रिक्‍स आणि व्हेन्डेटामध्ये रचना आणि विचारांच्या दृष्टीनं बराच सारखेपणा आहे. सर्वांत महत्त्वाचं साम्य आहे ते हे, की दोन्हींच्या केंद्रस्थानी असणारा प्रश्‍न एकच आहे. सुरक्षित आयुष्याच्या कल्पनेसाठी आपण आपल्या स्वातंत्र्याची किंमत देणं योग्य आहे का? असं मेट्रिक्‍स आणि व्ही फॉर व्हेन्डेटा हे दोघंही विचारतात. त्याखेरीज इथं अनेक चमकदार कल्पनांची रेलचेलही आहे. एका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या इमारतीचा नाश करण्यासंबंधातला युक्तिवाद हा इमारतीची तुलना ही प्रतीकाशी करतो. जणू तिला नष्ट करणं हे सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाचा प्रतीकात्मक विनाश करण्यासारखं आहे. हे किती खरं आहे, हे आपल्याला 2001 च्या 11 सप्टेंबरला दिसलंच, जिथं एका दहशतवाद्यानं (की क्रांतिकारकानं?) एका मोठ्या राष्ट्राच्या दोन इमारतींचा नाश करून ज्यांना हतबल करून सोडलं. त्या प्रसंगात मनुष्यहानीचा भागही होता; पण वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखं जागतिक वर्चस्वाचं प्रतीक गेल्यानं अमेरिकेत मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना पसरली हेदेखील होतंच.याचा अर्थ व्हेन्डेटा हा एकाच वेळी दोन पातळ्यांवर पाहता येतो. पहिल्या पातळीवर तो केवळ एक चित्तथरारक गोष्ट सांगतो, ज्यात एकटा माणूस व्हिलन कंपनीला पुरून उरतो, तर दुसऱ्या पातळीवर तो आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी संबंधित अनेक प्रश्‍नांची चर्चा करतो. या दोन्ही पातळ्या चित्रपटात सर्वत्र कार्यरत नाहीत किंवा कधी त्यातली एक पातळी दुसरीहून वरचढ ठरते; पण चित्रपटात त्या दोघांचंही अस्तित्व जाणवत राहतं.मेट्रिक्‍स बदनाम झाला तो इफेक्‍ट्‌सच्या अतिरेकानं आणि संगणकीय परिभाषेचा त्यातला सततचा वापर हा संगणक येण्यापूर्वीच्या पिढीला जाचक वाटला म्हणून. या दोनही अडचणी इथं नाहीत. इथं इफेक्‍ट्‌स आहेत; पण ते अदृश्‍य स्वरूपाचे. म्हणजे त्यांना अधोरेखित न करता केवळ प्रसंगाच्या परिणामात भर टाकण्यासाठी वापरलेले. मेट्रिक्‍स छापाची मारामारी फक्त शेवटाजवळ एकदा येते; पण ती फार वेळ चालत नाही आणि त्यातला बंदुकांऐवजी असणारा चाकूंचा वापर त्याचं दृश्‍य परिणाम रेखीव करतो.या चित्रपटाचं दिग्दर्शन वाचोस्कींनी केलेलं नाही. जेम्स मॅकटीग या त्यांच्या पूर्वीच्या सहायकानं ती जबाबदारी चांगल्या रीतीनं पार पाडली आहे. वाचोस्कींनी निर्मिती आणि संहितेची जबाबदारी घेतलेली आहे. व्हेन्डेटाला पटकन समजण्याजोग्या पटकथेत बसवणं हे काम कठीण होतं, कारण मूळ कादंबरीचा पसारा फार मोठा आहे. चालू काळात वर्षभर घडणाऱ्या गोष्टी, दोन्ही प्रमुख पात्रांचे भूतकाळ आणि राजकीय परिस्थितीमागचा इतिहास या सर्व गोष्टी कादंबरीत सांगितल्या जातात. त्याशिवाय व्हॅलरी या लेस्बियन अभिनेत्रीच्या ट्रॅकसारख्या छोट्या-मोठ्या अनेक गोष्टी इथं आहेत. त्याचबरोबर मुखवटाधारी व्ही कोण आहे, हे शोधण्यासाठी चाललेला तपास हे रहस्यप्रधान उपकथानकही इथं सुरू आहे.व्हीफचा मुखवटावाचोस्कींनी यातल्या बहुतेक महत्त्वाच्या गोष्टी ठेवल्या आहेत, काही बदलून वापरल्या आहेत, काहींना अधिक भव्यता आणली आहे, काहींना चित्रपटीय फॉर्म्युलांमध्ये खेचून बसवलं आहे. कादंबरीतल्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सरकारी भित्तिपत्रकांवर लाल स्प्रे कॅन्सनं व्ही रंगवणारी चष्मिस मुलगी, इव्हीच्या कोठडीतला उंदीर, व्ही च्या राहत्या जागेतला जुकबॉक्‍स अशा लक्षात राहणाऱ्या प्रतिमाही चित्रकर्त्यांनी संहितेत पेरल्या आहेत, ज्या पुस्तक वाचलेल्यांना ताबडतोब लक्षात येतील.मला या रूपांतरात एकच गोष्ट खटकली ती म्हणजे व्ही चा मुखवटा. तो असणं आवश्‍यक होतं; पण त्यामुळे या अभिनेत्याची भूमिका ही डबिंगपुरती उरली आहे. स्पायडरमॅनसारख्या चित्रपटातही ओठ न दिसणाऱ्या मुखवट्याचा वापर स्पायडरमॅन किंवा ग्रीन गॉलिनस?ठी केलेला आहे. मात्र, तिथं त्यांना आपली दुसरी ओळख अभिनयासाठी वापरता आली आहे. इथं व्हीचा मास्क कायम राहतो, हे बराच काळ चुकल्याचुकल्यासारखं वाटतं.तसंच काही वेळा यातल्या घटनांची, विचारांची, व्यक्तिरेखांची गर्दी थकवते. थ्रिलर, रहस्य, प्रेम आणि राजकारण एकत्र पाहताना दमायला होतं. मात्र, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर वाटतं, की हे सारं आवश्‍यक होतं.व्ही फॉर व्हेन्डेटामध्ये हे सिद्ध होतं, की मेट्रिक्‍सनं वाचोस्कींना संपवलेलं नाही. ऍक्‍शन आणि विचार यांना एकत्र आणणारा खास ब्रॅन्ड त्यांनी रसिकांसाठी उपलब्ध केला आहे. त्यांचे यापुढले चित्रपटही बहुधा याच मार्गावर चालणारे असतील.

-गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

3 comments:

manoj February 12, 2008 at 9:22 AM  

its realy nice to see marathi blog on english movies.......thr r so many english movies tht people don know in india like letters from iwo jima,3.10 to yuma,zodiac,crash,snatch,Michael Clayton.......thr r many more.nice try.......keep it up.

Vivek Kulkarni April 19, 2012 at 11:30 PM  

हाय गणेश,
व्ही फोर व्हान्डेता हा चित्रपट मला आजच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीकरिता महत्वाचा वाटतो. नुकतंच लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ज्यात काँग्रेस पक्ष बहुमतात आला पण विलासराव देशमुखांच्या करिष्म्यामुळे. गेली बरीच वर्ष झाली विलासराव आणि त्यांचे सुपुत्र अमित देशमुख यांचा वरचष्मा लातुरात राहिला आहे. तसेच महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे घराणेशाहीसुद्धा याच धरतीवर चालू आहे. गम्मत म्हणजे लोंकाना याचं काहीही वाटत नाही त्यांनी निवडलेला प्रतिनिधी वर्षानुवर्ष सत्ता उपभोगतोय तसेच वेगवेगळे घोटाळे करून ठेवतोय. या लोकांनी त्यांच्या सो कोल्ड पूर्वपुण्याइच्या जोरावर लोकांवर चेटूक करून ठेवलय भलेही आपल्याकडे ईतर सोयीसुविन्धांची वानवा असली तरी किंवा असंख्य प्रश्न असले तरी.
या चित्रपटात किमान लोकांनी जागृत व्हावं हा विचार मांडलाय हे ही कमी नाही. पण आपल्याकडे अशा पद्धतीचे चित्रपट फार येत नाही आहेत तसेच ललित साहित्यात तर याची वानवाच आहे.

lalit September 12, 2012 at 12:55 PM  

uttam chitrapat ...phar aawadalal ..tumachi post wachalya nantar baghitala hoto dohni ghosti uuttamach

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP