न दिसणारा दिग्दर्शक
>> Tuesday, January 22, 2008
क्लिन्ट इस्टवूडचं नाव घेतलं की आपल्यासमोर दोन प्रतिमा उभ्या राहतात. पहिली असते त्याच्या तरुणपणच्या रांगड्या वेस्टर्न नायकाची. सर्जिओ लिऑनच्या फिस्ट फुल ऑफ डॉलर्सफ (कुरोसावाच्या मोजिम्बोचा अमेरिकन अवतार), फॉर ए फ्यू डॉलर्स मोर आणि द गुड, द बॅड अँड द अग्लीफ चित्रपटांनी ईस्टवूडला ॅन विथ नो नेमम नावानेही ओळखल्या जाणाऱ्या ऍग्री यंग प्रतिमेत अजरामर केलं. पैसे सोडून कसलीच वा कुणाचीच पर्वा न करणारा, पण स्वभावाने वाईट नसणारा हा नायक त्याच्या चाहत्यांच्या दीर्घ काळ स्मरणात राहिला. दुसरी प्रतिमा होती डर्टी हॅरी मालिकेतल्या हॅरी कॅलाहान या सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची. गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याच्याच पातळीवर जायला कमी न करणारा हॅरी अनेक गुन्हेगारीपटावर आपली छाप पाडून राहिला, त्यांच्या आणि आपल्या.गंमत म्हणजे या दोनही अतिशय यशस्वी प्रतिमा हातात असूनही, हा अतिशय बुद्धिमान आणि सर्जनशील कलावंत त्या प्रतिमांच्या साच्यात अडकून तेच ते चित्रपट देत राहिला नाही. एवढंच नाही, तर त्यानं पुढल्या काळात उमेद हरवून बसलेल्या अवस्थेतल्या या प्रतिमाही पडद्यावर साकारल्या. स्वतःच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या अनफरगिव्हनफ मध्ये त्यानं पुढल्या वयातला, नाइलाजानं शस्त्र उचलणारा वेस्टर्न नायक रंगवला, तर इन द लाईन ऑफ फायरफ मध्ये दिग्दर्शक वुल्फगॅंग पीटरसनसाठी थकलेला राष्ट्राध्यक्षांचा शरीररक्षक, ज्याच्या उपस्थितीत एक राष्ट्राध्यक्ष प्राणाला मुकले होते. या नायकांची नावं वेगळी असली तरी त्यांचा प्राण तोच होता आणि हे जाणूनच इस्टवूडने या भूमिकांचा आलेख रचला.यशस्वी नायकयशस्वी नायक म्हणून क्लिन्ट इस्टवूड कितीही प्रेक्षकप्रिय असला तरी एक लक्षात घ्यायला हवं, की हा त्याच्या कारकिर्दीचा केवळ एक भाग आहे. तिचा दुसरा भाग म्हणजे आपल्या विसाहून अधिक चित्रपटांसाठी त्यानं केलेलं दिग्दर्शन. तेही केवळ कामापुरतं. केवळ आपल्या भूमिकेला न्याय देण्यापुरतं नव्हे, तर चित्रपटांना एक दर्जा देणारं, प्रेक्षकांना पसंत पडणारं, समीक्षकांनी गौरवलेलं आणि ऑस्करसह अनेक पारितोषिकेप्राप्त ठरलेलं.त्याचं नाव घेताच त्याची ही बाजू आपल्याला चटकन आठवत नसली, तरी ती महत्त्वाची आहे. आज सत्तरीच्या पुढे असणाऱ्या या दिग्दर्शकाला गेल्या अन् या अशा दोन वर्षी सलगपणे उत्कृष्ट चित्रपटासाठी अन् दिग्दर्शनासाठी असलेला ऑस्कर नामांकन आणि या वर्षीच्या मिलिअन डॉलर बेबीफने सर्वत्र मारलेली बाजी (खरं तर गेल्या वर्षी लॉर्ड ऑफ द रिंग्जफ चा तिसरा भाग आल्यानं, एकूण मालिकेच्या सन्मानासाठी सर्व महत्त्वाची पारितोषिक जॅक्सन कंपनीकडे गेली; अन्यथा मिस्टीक रिव्हरफसाठी क्लिन्ट इस्टवूड नक्कीच पुरस्कारप्राप्त ठरला असता) पाहता, हा दिग्दर्शक अजूनही किती कार्यमग्न आणि दर्जाबाबत जागरूक आहे, हे लक्षात येईल.ईस्टवूडने दिग्दर्शनाला सुरवात तशी लवकर केली. म्हणजे अभिनयासाठी त्याचं सर्वत्र कौतुक होत असतानाच त्यानं हे पाऊल उचललं. 1971 मध्ये डर्टी हॅरीफ प्रदर्शित झाला. त्याच वर्षी त्याचा पहिला दिग्दर्शित चित्रपट प्ले मिस्टी फॉर मीफ पडद्यावर आला. मिस्टी पाहूनच हे स्पष्ट होतं, की ईस्टवूडच्या पडद्यावरच्या सांकेतिक प्रतिमांचा वेगळा वापर कसा करावा, याची जाणीव होती. त्या प्रतिमांना जसंच्या तसं न वापरता काही विरोधाभास अथवा चमकृतीची योजना करणं तो अधिक योग्य समजे. प्ले मिस्टीचा जीव हा स्लॅशरचा होता. सामान्यतः अशा चित्रपटात खलपुरुष सुंदर तरुणींच्या जिवावर उठलेले दिसत. इथे दिग्दर्शकाची चाल बरोबर उलट होती. स्वतःची रांगडी प्रतिमा आणि जॉनरमधली बायकांची नाजूक परिस्थिती उलटवून इथे क्लिन्ट इस्टवूडने नकारात्मक भूमिकेत जेसिका वॉल्टरला टाकलं आणि तिचा नियोजित बळी असलेल्या लोकप्रिय डी जे च्या भूमिकेत स्वतः शिरला. चित्रपट यशस्वी ठरला आणि ईस्टवूडची पुढली वाटचाल सुरू झाली.स्वतंत्र शैलीदिग्दर्शक म्हटला की शैली ही आलीच. अनेकदा लोकप्रिय दिग्दर्शक स्वतःची अशी शैली प्रस्थापित करताना दिसतात आणि मग त्या शैलीच्या आहारी जायला त्यांना वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत शैली आशयावर मात करते, दिग्दर्शक चित्रपटाहून मोठा होऊन बसतो. अमुक अमुक जागी दिग्दर्शक दिसतोफ म्हणायची आपल्याला सवय असते, पण ते चांगल्या दिग्दर्शकाचं लक्षण नव्हे. दिग्दर्शकाचं खरं यश आहे ते न दिसण्यात. प्रत्येक चित्रपटाच्या विषयाप्रमाणे दिग्दर्शकीय शैली बदलली गेली पाहिजे अन् चित्रपटातही महत्त्व यायला हवं ते व्यक्तिरेखांना, त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या प्रवासाला. त्या व्यक्तींना मागे टाकून आपलं कौशल्य दाखवणं, ही आजकालची रीत असली तरी हा चुकीचा पायंडा आहे. शैलीदार चित्रपट टेरेन्टीनोसारख्या काहींना जमत आणि शोभत असले तरी त्यांचं अंधानुकरण चित्रपटसृष्टीला भलत्या वाटेला नेईल. मग ते हॉलिवूड असो की बॉलीवूड.प्लेमिस्टी फॉर मीफ लागला तेव्हा समीक्षकांना वाटलं की दिग्दर्शक म्हणून क्लिन्ट इस्टवूडनेही आपली शैली ठरवून टाकलेली दिसते. हॅंड हेल्ड कॅमेराचा वापर, ट्रॅकिंग शॉट्स, विमानातून घेतलेले शॉट्स अशा छायाचित्रणाच्या युक्त्या, निसर्गाचा शक्य तितका वापर, हे पाहून ते समजले की ही इस्टवूड शैली. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं, की हे प्रकरण वेगळं आहे. हा माणूस शैलीच ठरवत नाही. लवकरच आलेल्या हाय प्लेन्स ड्रीफ्टरफमधलं निसर्गाचं चित्रण आणि मिस्टीमधलं चित्रण यांमध्ये जर साम्य शोधलं, तर सापडणार नाही. ड्रीफ्टरमधला छायाप्रकाशाचा वापर हा अधिक ठळक आणि कथेला, व्यक्तिचित्रणाला अनुकूल आहे. मिस्टीच्या प्रकाशयोजनेहून कळण्यासारखा वेगळा.लवकरच इस्टवूडचे चित्रपट येत गेले आणि आणि स्पष्ट झालं, की याची दिग्दर्शनशैली ही अगदी लवचिक आहे. हा दिग्दर्शक आपली छाप पडावी म्हणून चित्रपट करत नाही, तर आपल्याला अमुक गोष्ट शक्य तितक्या परिणामकारक पद्धतीनं मांडायची आहे हे लक्षात घेऊन करतो. अशी शक्यता आहे की इस्टवूडच्या अदृश्य असण्यामुळेच त्याचा गाजावाजा लायकीपेक्षा कमी प्रमाणात झाला असावा.व्यक्तिप्रधान चित्रपटदिग्दर्शक म्हणून इस्टवूड जसा मोठा होत गेला, तशी त्याची इतर दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची तयारी मात्र कमी होत गेली. त्याच्या सूचनांना मान देणारे, त्याच्या मताबद्दल आदर असणारे दिग्दर्शकच तो जवळ करायला लागला. काही वर्षांनी तर त्याने इतरांबरोबर काम करणंही सोडून दिलं. स्वतःच्या अनेक चित्रपटांतून तो भूमिका करत असे, मात्र सगळ्याच नव्हे.क्लिन्ट इस्टवूडच्या चित्रपटांकडे पाहिलं तर लक्षात येईल, की ते सगळे व्यक्तिप्रधान आहेत. वेस्टनर्स किंवा शहरी गुन्हेगारीपट तर त्याच्या हातखंडा विषयातलेच आहेत. (प्रामुख्याने ते त्याच्या स्वतःच्या प्रतिमेला सरळ किंवा उपहासात्मक नजरेतून पाहत असल्याने ते त्याचा जवळचेही आहेत) पण जॅझ संगीतकार चार्ली बर्डफ पार्करवर बेतलेला बर्डफ किंवा दिग्दर्शक जॉन ह्यूस्टनच्या आयुष्यातल्या एका घटनेवर सैलसर आधारलेला व्हाईट हन्टर, ब्लॅक हार्टफ यासारखे चित्रपट पाहूनही तेच लक्षात येतं. इस्टवूडचा चित्रपट हा भव्य ऐतिहासिक विषयावर किंवा स्पेशल इफेक्ट्सवर मारून नेलेला असणं संभवत नाही.तीन मित्रांची शोकांत गोष्ट सांगणारा गेल्या वर्षीचा मिस्टिक रिव्हर किंवा गुरू-शिष्येच्या जवळजवळ पिता-पुत्रीप्रमाणे बनलेल्या नात्याची कसोटी पाहणारा मिलिअन डॉलर बेबीफ हे दोन चित्रपटही त्याच्या आजवरच्या कारकिर्दीला अपवाद नाहीत. या गोष्टी आहेत माणसांच्या. त्यांच्या व्यक्तिगत विजयाच्या, व्यक्तिगत पराभवाच्या. त्यांना झपाटणारा भूतकाळ, त्यांचा अस्वस्थ वर्तमानकाळ, हीच त्यांची पार्श्वभूमी आहे. त्यांच्या वाटेवर त्यांना विरोध करणारी, आधार देणारी किंवा उपयोगी पडणारीही कोणा काल्पनिक परिकथांमधली पात्रं नाहीत, तर त्यांच्यासारखीच दुसरी माणसं आहेत. त्यांच्या या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला येऊन भिडतात ते त्या सांगणाऱ्या दिग्दर्शकाच्या साधेपणानं आणि प्रामाणिकपणानं. हा साधेपणा अनेक शैलीदार दिग्दर्शकांच्या युक्त्या प्रयुक्त्यांहून अधिक प्रभावी आहे, हे मान्य करावंच लागेल.
-गणेश मतकरी
(साप्ताहिक सकाळमधून)
-गणेश मतकरी
(साप्ताहिक सकाळमधून)
1 comments:
वाचला आणि आवडला :)
Post a Comment