एंजल्स अँड डिमन्स- धर्म आणि विज्ञान
>> Saturday, June 13, 2009
"एंजल्स ऍन्ड डिमन्स' ही ब्राऊननं "दा विंची कोड'आधी लिहिलेली; पण दुर्लक्षित कादंबरी. कादंबरीतील गतिमानता, परिणामकता चित्रपटात नक्कीच आहे. ब्राऊनचा आणि लॅन्गडनचा फॅनबेस बळकट करण्याचं काम "एंजल्स ऍन्ड डिमन्स'नी केलं आहे हे नक्की.
बेस्टसेलर नामक लोकप्रिय वर्गवारीत बसणाऱ्या कादंबऱ्यांना साहित्य म्हटलं जावं का, हा वादाचा मुद्दा आहे. अगदी आपल्याकडल्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पाहिलं तरीही फिक्शन, बेस्टसेलर आणि लिटरेचर हे विभाग स्वतंत्रपणे केल्याचं दिसतं. तत्कालीन बेस्टसेलर यादीतल्या पुस्तकांना कालांतरानं "फिक्शन'मध्ये दाखल केलं जातं; पण अभिजात साहित्यासाठी राखून ठेवलेल्या "लिटरेचर'मध्ये शिरण्याचा मान त्यांना क्वचित मिळतो. याला कारण आहे. ज्याला जेनेरिक किंवा विशिष्ट प्रकारात घुटमळणारं लिखाण म्हटलं जातं, त्याचं प्रमाण इतर देशांत अन अर्थातच इंग्रजी वाङ्मयात पुष्कळ आहे. क्राईम, हॉरर, सायन्स फिक्शन यांसारख्या लिखाणाचा मराठीत फार वाचकवर्ग नसला तरी इंग्रजीत हे अतिशय वाचकप्रिय उपप्रकार आहेत अन एकदा अशा उपप्रकारात यश मिळालेला लेखक त्या उपप्रकाराच्या आधारेच पुढलं लिखाण करत राहील, अशी शक्यता संबंधित अर्थकारण अन प्रचंड प्रसिद्धी यामुळे तयार होते. मग अनेकदा (सन्माननीय अपवाद वगळता) स्वतंत्र सिद्ध कलागुण असूनही हे लेखक पुनरावृत्ती करणंच अधिक पसंत करतात. त्यांचा आधीचा निश्चित वाचकवर्ग अधिकाधिक मोठा होत जातो आणि ही मंडळी "बेस्टसेलर' यादीत नाव पटकावतात. अर्थात, या प्रकारची हुकमी पुनरावृत्ती हेदेखील सोपं काम नाही. लेखनाची चौकट ठरून गेली असताना दर वेळी वाचकांना बांधून ठेवणारं नवं प्लॉटिंग करणं हे कठीणच आहे आणि या यशस्वी लेखकांना मिळणारी मान्यता ही त्यांच्या या विशिष्ट कलागुणांना वाचकांकडून मिळालेली पावतीच म्हणता येईल.
या लेखकांना असणारा मोठा वाचकवर्ग हा अनेकदा त्यांच्या कथा-कादंबऱ्यांना पडद्यावर आणण्यासाठी उपयुक्त ठरलेला दिसतो. हॉलिवूडची व्यावसायिक गणितं ही इतक्या मोठ्या अपेक्षित प्रेक्षकवर्गाकडे पाठ फिरवणं शक्यच नसतं. मग या कादंबऱ्यांची रूपांतरं केली जातात. त्यातली कोणती यशस्वी ठरतात, हे या रूपांतरांना मूळ कलाकृतीचा गाभा गवसलेला आहे की नाही यावर अवलंबून ठरतं.
डॅन ब्राऊनच्या "दा विंची कोड'चं रूपांतर मला खूप आवडलं नव्हतं. एक ऐतिहासिक - सांस्कृतिक रहस्यकथा असं ब्राऊनच्या मूळ पुस्तकाचं स्वरूप होतं. प्रतीकांचा अभ्यास करणारा सिम्बॉलॉजिस्ट रॉबर्ट लॅन्गडन कलाविश्वात श्रेष्ठ ठरलेल्या मोनालिसापासून अनेक चित्रशिल्पाकृतींमागच्या इतिहासाचा छडा लावत, आपल्या तर्कशास्त्रानं काळाच्या पडद्याआड लपलेल्या, प्रत्यक्ष चर्चनं दडवून ठेवलेल्या एका रहस्याची उकल करतो, असं या कादंबरीचं स्वरूप होतं. लॅन्गडनचं या कलाकृतीचं त्यामागच्या तर्कशास्त्राचं केलेलं विवेचन हा कादंबरीचा महत्त्वाचा भाग होता. दुसरा होता तो लॅन्गडनचा एका रहस्यापासून दुसऱ्याकडे जाणारा प्रवास, जो काही श्रेष्ठ कलाकृतींची सफर आपल्याला घडवतो. "दा विंची कोड'च्या रूपांतरात दिग्दर्शक रॉन हॉवर्डनं विवेचन आणि प्रवास यातल्या दोघांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. परिणामी यातल्या कोणत्याच गोष्टीला महत्त्व आलं नाही. चित्रपट हा कादंबरीतल्या स्थळांचं प्रत्यक्ष दर्शन घडवणारा कम्पॅनिअन पीस असल्यासारखा झाला.
"एंजल्स ऍन्ड डिमन्स' ही ब्राऊननं "दा विंची कोड'आधी लिहिलेली; पण दुर्लक्षित कादंबरी. ज्यांनी ती वाचली असेल त्यांच्या लक्षात आलं असेल, की रचनेच्या दृष्टीनं ती अधिक चांगली आहे. दा विंची कोडमध्ये नसलेल्या अनेक गोष्टी तिथे मुळातच आहेत. रहस्याच्या उकलीसाठी कालमर्यादा घालून देणारी डेडलाईन आणि हुशार खलनायक या दोन चित्रपट रूपांतरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रमुख गोष्टी तिथे आहेत. त्याबरोबरच लॅन्गडनची धावपळही अधिक फोकस्ड आहे. व्हॅटिकन सिटीमध्येच पूर्ण रहस्य उलगडतं, त्याचा निकाल हा पोपच्या निवडणुकीशी समांतर जातो आणि या उलगड्यावर प्रचंड जीवितहानी टळणं अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऍक्शन ही केवळ कलाकृती दर्शनापुरती न उरता काही निश्चित परिणाम साधणारी ठरते. दा विंची कोडमधल्या रहस्याची सुरवात वर्तमानात असली तरी उलगडा भूतकाळाकडे निर्देश करणारा आहे. इथे भूतकाळाचा वापर स्वतंत्र घटकांप्रमाणे असला तरी लॅन्गडननं केलेली कोड्याची उकल वर्तमानातच आपला प्रभाव दाखवणारी आहे. वाचकांसाठी त्यामुळेच प्रेक्षकांसाठीही अधिक जवळची.
दिग्दर्शक रॉन हॉवर्ड अन पटकथाकार डेव्हिड केप तसंच अकिवा गोल्ड्समन यांनी कादंबरीची ही वैशिष्ट्यं लक्षात घेऊन चित्रपटाला गतिमान करण्यासाठी त्यांचा वापर केला आहे. दा विंची प्रमाणेच लॅन्गडनला विवेचनासाठी वेळ न मिळणं आणि त्यामुळे त्याचं चातुर्य विश्वसनीय न होणं हा दोष इथंही आहे. मात्र, तो दोष नाहीसा होणं अशक्य आहे. कादंबरी ज्या प्रकारे अशा तपशिलांना वेळ देऊ शकते, तसा चित्रपट देऊ शकत नाही. मात्र, तो काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. या मुद्द्यांपलीकडे पाहिलं तर रहस्य सोपं, थोडक्यात केलेलं आपल्याला जाणवतं. मात्र, चित्रपट डेडलाईनलाच अधिक महत्त्व देत असल्यानं ते आक्षेपार्ह वाटत नाही.
मूळ कादंबरी ही दा विंची आधी घडणारी म्हणजे दा विंचीचं प्रीक्वल असली, तरी ती सेल्फ कंटेन्ड असल्यानं आधी किंवा नंतर घडण्याला काही विशिष्ट आधार नाही. हे ओळखून चित्रकर्त्यांनी "एंजल्स ऍन्ड डिमन्स'ला सीक्वल म्हणूनच सादर केलं आहे. दा विंचीमध्ये लॅन्गडन (टॉम हॅंक्स) चर्चच्या विरोधात असल्यानं इथे सुरवातीला चर्चचा रोष हा जाणवण्यासारखा आहे. चित्रपट सुरू होतो तो दोन घटनांनी - पोपचा मृत्यू आणि उएठछ या प्रयोगशाळेतून ऍन्टिमॅटरची चोरी. जयंत नारळीकरांची पुस्तकं किंवा इंग्रजी सायन्स फिक्शन नियमित वाचणाऱ्यांना माहीत असेल, की आपलं जग हे मॅटरनं बनलेलं आहे. ऍन्टिमॅटर ही मॅटरच्या विरोधी संकल्पना आहे. असं मानलं जातं, की मॅटर अन ऍन्टिमॅटरचा संपर्क आला तर प्रचंड विस्फोट होईल अन मोठा विनाश घडण्याची शक्यता. चर्चकडून लॅन्गडनला पाचारण केलं जातं ते एका धमकीमुळे. विज्ञान आणि धर्म या दोघांमधला विरोध तर जाहीरच आहे. एके काळी अस्तित्वात असणाऱ्या "इल्ममिनाती' या वैज्ञानिकांच्या गुप्त संघटनेकरवी पोप बनण्याच्या स्पर्धेतल्या चार धर्मोपदेशकांचं अपहरण केलं जातं. तेही पोप निवडला जाण्याच्या काही तास आधी. धमकीनुसार मध्यरात्रीपूर्वी तासागणिक एका धर्मोपदेशकाला मारण्यात येईल अन मध्यरात्रीच्या ठोक्याला ऍन्टिमॅटरकरवी व्हॅटिकनचा अन काही प्रमाणात रोमचाही विनाश ओढवेल. आता हा विनाश केवळ लॅन्गडनच टाळू शकेल.
या चित्रपटाची पात्रयोजना ही एकाच वेळी चांगली; पण अयोग्य म्हणण्याजोगी आहे. चांगली तर ती उघडच आहे, कारण प्रमुख भूमिकेत हॅंक्स आणि तीन संशयितांच्या म्हणजे पोपचे रक्षक मानले जाणाऱ्या स्वीस गार्डचा प्रमुख, गत पोपचा विश्वासू सहकारी अन निवडणुकीची व्यवस्था पाहणारा कार्डिनल स्टॉस या भूमिकांत अनुक्रमे स्टेलन स्कार्सगार्ड, इवान मॅकग्रेगर आणि आर्मिन म्युलर - स्टाल हेदेखील ताकदीचे नट आहेत. याबरोबरच बऱ्याच लहान भूमिकांमध्येही कसलेले कलावंत पाहायला मिळतात. असं असूनही या योजनेतला धोका म्हणजे चित्रपटाचं स्वरूप अन संशयितांचं कास्टिंग पाहता खरा गुन्हेगार कळायला आपल्याला जराही वेळ लागत नाही. त्यामुळे अभिनयाचा, चित्रपटाचा दर्जा टिकतो; रहस्य मात्र टिकत नाही.
मूळ चित्रपटानं चर्चला नकारात्मक भूमिका दिली आणि चर्चनंही त्याला विरोध केला. इथं मात्र, चित्रपटानं सलोख्याचा हात पुढे केला आहे आणि चर्चनंही तो स्वीकारल्याचं दिसतं. कारण चित्रीकरणादरम्यान विरोध करूनही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र व्हॅटिकनच्या अधिकृत वृत्तपत्रानं त्याला "निरुपद्रवी मनोरंजन' असल्याचा दाखला दिलेला आहे.
"लॅन्गडन' व्यक्तिरेखेच्या यशानं ब्राऊनच्या पुढल्या कादंबरीकडे अनेकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. मात्र, बराच काळ जाऊनही अन त्यावर काम सुरू असल्याच्या खऱ्या- खोट्या बातम्या येऊनही प्रत्यक्ष कादंबरी मात्र बाजारात आलेली दिसत नाही. अर्थात, तिचे अन त्यावर उघडच येऊ पाहणाऱ्या चित्रपटाचे गुणदोष एंजल्सपेक्षा फार वेगळे असण्याची शक्यता नाही. तरीही ही आगामी कादंबरी अन् चित्रपट क्रिटीकप्रूफ मानले जायला हरकत नाही. ब्राऊनचा आणि लॅन्गडनचा फॅनबेस बळकट करण्याचं काम "एंजल्स ऍन्ड डिमन्स'नी केलं एवढं नक्की.
-गणेश मतकरी
3 comments:
Keeping in mind - the nature of 'haT ke' movies on this blog - is the movie really worth writing about? I mean its a fast action packed one and al - but so are many bond mvoies!
dont agree.everything is worth writing about. i normally dont consider commercial cinema inferior. this blog carries many articles about films which are quite normal. and who said all bond movies are bad?
I didnt say bond movies are bad - or for that matter this movie is bad either!
But thats what it is - not bad! I dont have anything against commercial cinema either! Of the movies running now - i.e. in the past one month - I also saw 'Hangover', 'Soloist' & 'The Brother's Bloom' - and found them better better than 'A&D'. And 'Hangover' is an out n out commercial cinema! Talking of commercial cinema - I would love to (and much rather) see an article about '99'!
Strangely, and I know how difficult it can be - I found this article to be more interesting than the movie!
I may have differed with your POV in the past - but I have always found the selection of movies on this blog to be fascinating! Anyone with access to movies and wondering what to watch can come and pick any given movie from this blog and they would feel happy about that choice. And they need not even agree with your POVs! I just find it odd 'A&D' rubbing shoulders with the others.
(EOD from me - you get the last word).
Post a Comment