एड वुड - ट्रॅजिकॉमेडी
>> Friday, June 19, 2009
एडवर्ड डी. वुड ज्यु. किंवा एड वुडची किर्ती (किंवा अपकिर्ती) आहे ती जगातला सर्वात वाईट दिग्दर्शक म्हणून. ब्लॅक अँण्ड व्हाईट भयपट आणि विज्ञानपट हे हॉलीवूडचं चलनी नाणं होतं त्या काळातल्या या त-हेवाईक व्यक्तिमत्त्वाच्या प्लान नाईन फ्रॉम आउटर स्पेस चित्रपटाने आजवरचा सर्वाधिक वाईट चित्रपट होण्याचा मान मिळविला असला तरी त्याचे इतर चित्रपटही त्याच जातकुळीतले होते. पैशांची चणचण, अत्यंत कमी दिवसात केलेले चित्रिकरण, स्वतःच्या आणि आपल्या चमूच्या कुवतीवर भलता अविश्वास (यातल्या काही गोष्टी काही मराठी चित्रपटांनाही लागू प़डत असतील का ?) आणि अत्यंत सुमार, दर्जा गाठण्याचा जराही प्रयत्न न करणारे स्पेशल इफेक्ट्स ही एड वुडच्या चित्रपटांची व्यवच्छेदक लक्षणं म्हणावी लागतील. वुडच्या हयातीत त्याचा एकही चित्रपट जराही चालला नाही, मात्र त्याच्या मृत्युपश्चात जगातला सर्वात वाईट दिग्दर्शक म्हणून त्याला घोषित करण्यात आलं आणि वुडचा सिनेमा अजरामर झाला. तो चांगला नाही याबद्दल कोणाचंच दुमत नाही, पण त्याच्या सवंगपणालाच एक कल्ट सिनेमाचा दर्जा मिळाला आणि वुडचं आणि त्याच्या सिनेमाचं नाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचलं, त्याला प्रसिद्धी मिळाली. थोडी उशिरा आणि थोड्या वेगळ्या कारणासाठी, पण एड वुड चित्रपटातल्या बेला लुगोसीच्या तोंडचं वाक्य उचलायचं म्हटलं, तर देअर इज नो सच थिंग अँज बॅड प्रेस. प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी, मग त्यात चांगलं वाईट काही नाही.
टिम बर्टनने दिग्दर्शित केलेला एड वुड हा चित्रपट नक्की काय आहे, हे कोडंच आहे. वर वर पाहता तो एड वुडच्या आयु्ष्यातल्या महत्त्वाच्या (?) कालावधीवर प्रकाश टाकणारा चरित्रपट आहे. पण तेवढंच नाही. एड वुड एक महत्त्वाची गोष्ट करतो, जी प्रत्येक चरित्रपटाने करणं अपेक्षित आहे. तो घटनांच्या पलीकडे जाऊन एड वुडच्या अंतरंगांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. वुडच्या चुकांना तो सावरून घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण या चुकांसकटही चित्रपट माध्यमावरचं त्याचं निस्सिम प्रेम पकडण्याचा प्रयत्न करतो. एड वुडला रिटेक हा प्रकारच माहिती नाही. चित्रिकरणातल्या कितीही अक्षम्य चुका तो सहजपणे गृहीत धरून पुढे जातो. जणू समोर चित्रित होणारी दृश्य न दिसता त्याला एक काल्पनिक जग दिसतंय जेथे त्याने घेतलेला प्रत्येक शॉट हा उच्च दर्जाचा कलाविष्कार आहे, आणि या जगात एड वुड स्वतः त्याच्या आँर्सन वेल्स या दैवताइतका मोठा दिग्दर्शक आहे.
एड वुड हा स्वतंत्रपणे दोन ट्रॅक्सवरून चालणारा चित्रपट आहे. विनोद आणि शोकांतिका. यातला विनोद हा वरवरचा आहे, आणि तो संवादातून, तसंच बर्टनने आपल्या १९९४ मधल्या चित्रपटाच्या ब्लॅक अँण्ड व्हाईट चित्रणातून एड वुडच्या चित्रपटाचा मूड जिवंत करण्यामधून येतो. इथे सुरुवात होते, ती शवपेटीतून बाहेर डोकावणा-या पांढ-या आकृतीने वर्दी देण्यापासून, नामांकनादरम्यान अर्धकच्च्या स्पेशल इफेक्ट्सची खिल्ली उडवली जाते. संवादात विसंगती आणि शाब्दिक कोट्या शोधल्या जातात आणि व्यक्तिरेखांचे सादरीकरणही ( बेला लुगासीच्या भूमिकेत आँस्कर मिळवून जाणा-या मार्टिन लॅन्डेचा अपवाद वगळता.) ख-यापेक्षा अर्कचित्रांसारखे करण्यात येते. मात्र एकदा या विनोदाच्या बाह्य आवरणापलीकडे पाहिलं तर दिसणारं चित्र वेगळं असतं. एड (जॉनी डेप) हा असंख्य अडचणींना तोंड देऊन झगडणारा तरुण दिग्दर्शक आणि बेला लुगासी, हा एकेकाळी ड्रॅक्युलाच्या भूमिकेने स्टार बनलेला. पण आता चित्रपटसृष्टीबाहेर फेकला गेलेला आणि गरीबी अन् अमली पदार्थांनी पोखरलेलं आयुष्य गतकिर्तीची स्वप्न पाहत जगणारा वृद्ध अभिनेता. यांच्या मैत्रीची गोष्ट या आतल्या पातळीवर आपल्याला दिसते, ही गोष्ट गंभीर आहे, पटण्यासारखी आहे आणि खरंतर हीच आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवते. एकदा का विनोदी आवरणाची सवय झाली की, त्यात पुढे फार नाविन्य येऊ शकत नाही, ही गंभीर गोष्ट मात्र अपरिहार्य शेवटापर्यंत आपल्याला बांधून ठेवते.
एड वुडच्या शेवटाकडे येणारा एक प्रसंग आहे. प्रसंग अतिशय विनोदी आणि त्याचवेळी विचार करायला लावणारा आहे. प्लान नाईन फ्रॉम आऊटर स्पेस या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान निर्मात्यांच्या आगाऊपणाला विटल्याने आपला आवडता स्त्रीवेष (!) धारण करून एक जवळचा एक बार गाठतो आणि तेथे त्याची भेट होते थेट आँर्सन वेल्सशी. आता एड वुडमधल्या इतर प्रसंगांप्रमाणेच हा सत्य की बर्टनच्या कल्पनेतून आलेला (बहुदा तेच खरं असावं) हे कळायला मार्ग नाही, मात्र जगातला सर्वात वाईट चित्रपट प्लान नाईन बनवणा-या वाईट दिग्दर्शकाची गाठ सर्वोत्कृष्ठ चित्रपट सिटीझन केन बनवणा-या थोर दिग्दर्शकाशी घालणं आणि त्यानिमित्ताने चित्रपट उद्योगाकडेच तिरकसपणे पाहाणं हे बर्टनसारखा विक्षिप्त माणूसच करू जाणे. इथे दोघांच्या बोलण्यातून दिसून येते की दिग्दर्शक उत्तम असो वा सुमार दोघांपुढल्या अडचणी एकसारख्याच आहेत. (निर्मात्यांची अरेरावी ही प्रमुख अडचण) मग एडला प्रश्न पडतो तो हा की एवढी यातायात करून चित्रपट काढण्यातच काही अर्थ आहे का ? यावर वेल्सचं उत्तर एकूणच कलावंतांच्या दुःखाला आणि त्यांच्या प्रसंगी अपयशालाही तोंड देऊन लढत राहण्याला अर्थ देणारं आहे.
एड वुडची दृष्टी ही चार लोकांपेक्षा वेगळी होती. दिग्दर्शनाचे ठोकताळेही शिष्टसंमत मार्गाशी फटकून राहणारे होते. अधिक जाणवणा-या शून्य बजेटसारख्या संकटांना आणि आगाऊ निर्मात्यांनाही त्याला तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे त्याच्या पडद्यावर आलेल्या चित्रपटांमध्ये त्याच्या स्वतः.च्या मर्यादा किती आणि साधनांच्या किती यावरही विचारता येईल, हे चित्रपट दर्जेदार नव्हेत तर सर्वसामान्यच आहे, पण एखाद्या व्यक्तीवर असा अपमानकारक किताब लादणं हेही योग्य नाही. बर्टनचा चित्रपट हा कदाचित चारित्र्याच्या दृष्टीने शंभर टक्के खरा नसेल, पण तो एका परीने एड वुडला न्याय देतो. त्याचे चित्रपट त्याचं जे संकुचित आणि काहीसं विकृत चित्रं आपल्यापुढे उभं करतात, त्याला इतरही पैलू असल्याचं दाखवून देतो. एड वुडच्या ज्ञात चमत्कृतींवर पांघरुण न घालता हे करून दाखवणं ही मोठीच करामत म्हणावी लागेल.
- गणेश मतकरी
1 comments:
चित्रपटाच्या शेवटी क्रेडिट्स रोल होताना जॉनी डेपच्या डोळ्यात जी चमक दिसते, ती नक्कीच एखाद्या विक्षिप्त/काहीतरी ध्येयाने भारलेल्या माणसाची आहे. त्याचा व त्याच्या 'वाम्पायर' मित्राचा अभिनय आवडला. एखाद्या व्यक्तीवर असा अपमानकारक किताब लादणे योग्य नाही हे खरेच.... वेल्स म्हणतो त्या प्रमाणे दुसर्याच्या स्वप्नासाठी आपण का झटायचे ? प्रोडुसर आणि बनर खाली कित्येक दिग्दर्शकांना त्यांची स्क्रिप्ट्स/कास्ट चेंज करावी लागली असावी..
Post a Comment