"कमीने' - भारतीय न्वार

>> Tuesday, September 29, 2009


"कमीने' हा चित्रपट न्वार चित्रप्रकारात मोडणारा असला तरी अस्सल भारतीय चित्रपट आहे. "कमीने' घडतो एका अतिशय असुरक्षित, गढूळलेल्या वातावरणातल्या मुंबईत, जे दुर्दैवाने खरोखरच्या वर्तमानातल्या मुंबईहून फार वेगळं नाही. विशाल भारद्वाजनं व्यावसायिकतेच्या चौकटीत उत्तम, वास्तववादी चित्रपट दिला आहे हे नक्की.

माझ्या सदरामधून मी वेळोवेळी फिल्म न्वार (Film Noir) नामक चित्रप्रकाराविषयी लिहिलेलं आहे. थोडक्‍यात "रिकॅप' सांगायचा तर 1940 अन्‌ 1950 च्या दशकातल्या प्रामुख्याने अमेरिकन गुन्हेगारीपटांना उद्देशून हा शब्दप्रयोग वापरला जातो. शब्दप्रयोग आहे अर्थातच फ्रेंच. या काळात जागतिक चित्रपटांवर महत्त्वाची टीका-टिप्पणी करणाऱ्या फ्रेंच समीक्षकांच्या लक्षात आलं, की या चित्रपटांमधून दृश्‍य अन्‌ आशय यांचा गडदपणा एकत्रितपणे साकारला जातो अन्‌ एकटादुकटा नसून या चित्रपटांची एक लाट तयार होतेय. जर्मन एक्‍स्प्रेशनिझमच्या छायेत यातल्या दृश्‍यरचना, कॅमेरा अँगल्स, अंधाऱ्या प्रकाश योजना यातून एक सावल्यांचं जग तयार होत होतं आणि हे अंधारं वातावरण या कथानकांमध्ये, व्यक्तिरेखांमध्ये उतरलेलं दिसे. भूतकाळाच्या छायेत वावरणारे नायक, रहस्यमय नायिका, सतत विश्‍वासघात अन्‌ फसवणुकीवर आधारलेली कथानकं यांची रेलचेल असणाऱ्या या चित्रपटात सज्जन व्यक्तिरेखेला स्थानच नव्हतं.
काही काळानंतर न्वार चळवळ संपुष्टात आली; पण 1974 मध्ये पोलन्स्कीच्या चायनाटाऊनमध्ये तिचं पुनरागमन झालं, निओ न्वार या नावाखाली. या प्रकारचे चित्रपट अन्‌ दिग्दर्शक अजूनही पाहायला मिळतात. क्वेन्टीन टेरेन्टीनो अन्‌ त्याचा कुठलाही चित्रपट किंवा रॉबर्ट रॉड्रिग्जचे "स्पाय किड्‌स' वगळता बरेचसे चित्रपट, ही याची हल्ली तेजीत असलेली उदाहरणं आहेत.
आता आपल्याकडे न्वार शैली पूर्ण नवी आहे अशातला भाग नाही. गुरुदत्तच्या आरपार, सी.आय.डी., जाल अशा काही चित्रपटांवर मूळ फिल्म न्वारचा ठसा आहे. निओ न्वार मात्र हल्ली-हल्ली इथं आलेलं दिसतं. 2007 मध्ये आलेले संजय खांदुरी दिग्दर्शित "एक चालीस की लास्ट लोकल' आणि श्रीराम राघवन दिग्दर्शित "जॉनी गद्दार' ही याची आपल्याकडली अलीकडची उदाहरणं आहेत.
हे दोन्ही चित्रपट मला आवडलेले आहेत. "एक चालीस' तर बऱ्यापैकी चाललाही होता आणि "जॉनी गद्दार' हे नाव ऐकूनही न घाबरलेल्या ज्या प्रेक्षकांनी तो पाहिला, त्यांना तो आवडला; पण त्यांच्या स्वतंत्र कामापेक्षाही एक अधिक महत्त्वाचं काम त्या दोन चित्रपटांनी केलं, असं मी म्हणेन. त्यांनी "कमिने'साठी प्रेक्षकांच्या मनाची तयारी केली.
"कमीने' या वर्षातला सर्वोत्तम चित्रपट आहे यात वाद असण्याची काही शक्‍यता नाही. मात्र, आपला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात या शैलीला अपरिचित असताना तो येता, तर कदाचित त्याचा मोठा धक्का बसता. आताही काही प्रमाणात धक्का बसेलच, तो त्यातल्या भाषेनं आणि हिंसेनं. तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या भुवया वर जातीलही. आपल्या सर्वांत मोठ्या संस्कृतिरक्षकांनी (काही जण गमतीनं त्यांना सेन्सॉर बोर्ड असंही म्हणतात) त्याला याआधीच "फक्त प्रौढांसाठी' असं सर्टिफिकेट देऊनही टाकलंय. एक लक्षात घ्यायला हवं, की भाषा किंवा हिंसा या दोन्ही गोष्टी या चित्रपटाच्या शैलीचा अपरिहार्य भाग आहेत. विशाल भारद्वाजचा "ओंकारा'मध्येही काहींना आक्षेपार्ह वाटेल अशी भाषा होती. मात्र, एकदा कानांना सराव झाला, की या भाषेचा वापर एक फ्लेवर म्हणून होतो. त्यापलीकडे शिव्यांना स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. हिंसाही एका टोकापलीकडे गेली, की तिचा कार्टून व्हायलन्स होतो. (टॉम अँड जेरीला "प्रौढांसाठी' सर्टिफिकेट देण्याचा कोणी विचार करेल का? त्यातल्या दोन व्यक्तिरेखांनी एकमेकांवर सतत चालवलेल्या जीवघेण्या हल्ल्यांना तमाम घरातली लहान मुलं आवडीनं पाहतातच ना? सेन्सॉर बोर्डाचं टीव्हीकडे फारसं लक्ष दिसत नाही!) टेरेन्टीनो हे तर्कशास्त्र आपल्या प्रत्येक चित्रपटात वापरतो आणि हे चित्रपट मुलांनी पाहू नयेत, असं मी अजिबात म्हणणार नाही. अर्थात, हा निर्णय प्रत्येक पालकानं स्वतंत्रपणे घ्यायचा आहे. पण हे माझं वैयक्तिक मत.
एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, की मी निओ न्वार आणि टेरेन्टीनोबद्दल काही बोललो, तरी "कमीने' हा अस्सल भारतीय चित्रपट आहे. (तसा भारद्वाजचा "ओंकारा' ऑथेल्लोवर आधारित असूनही अस्सल भारतीय होताच, पण हा त्याहून अधिक आहे.) न्वार पटाचं सार हे विशाल भारद्वाजनं आत्मसात करून या चित्रपटातून आपल्यापुढे सादर केलंय. तो पाहताना त्यावरचे परकीय प्रभाव हे ठळकपणे जाणवणारे नाहीत. "कमीने'च्या एका इंग्रजी समीक्षणात यातली "गिटार केस' ही "एल मेरीआची' या रॉड्रिग्जच्या पहिल्या चित्रपटातून आल्याचा उल्लेख वाचला. मात्र, केवळ गिटार केसमुळे या दोघांत तुलना करणं, हा शुद्ध मूर्खपणा होईल. केवळ सायकल असल्याने आपण "बायसिकल थीफ'ची तुलना "जो जीता वही सिकंदर'बरोबर करू का?
"कमीने' दोन भावांची गोष्ट सांगतो. निवेदक आहे चार्ली (शाहीद कपूर). चार्ली हा घोड्यांच्या रेसेस फिक्‍स करणाऱ्या बंगाली गॅंगस्टर्सकडे काम करतो. तो तोतरा आहे. म्हणजे त्याला "स' म्हणता येत नाही. "स'ला तो "फ' म्हणतो. (चित्रपटभर प्रत्येक "स' ला "फ' म्हणणं या एकाच गोष्टीसाठीही शाहीद कपूरला पारितोषिक घ्यायला हरकत नाही. अर्थात, या भूमिकेसाठी तो पारितोषिकप्राप्त ठरेल यात शंकाच नाही.) त्याचा भाऊ आहे सरळमार्गी गुड्डू (पुन्हा शाहीद). गुड्डू बोलताना अडखळतो. एनजीओमध्ये काम करणाऱ्या गुड्डूचं स्वीटी (प्रियांका चोप्रा)वर प्रेम आहे. स्वीटी गरोदर आहे आणि उत्तर भारतीय गुड्डूचा मेव्हणा म्हणून स्वीकार करणं तिच्या महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या पुढारी भावाला - भोपे भाऊला (अमोल गुप्ते) कधीही मान्य होणार नसतं. स्वीटी कोण आहे हे कळताच गुड्डू चपापतो; पण कसाबसा चोरून लग्नाला तयार होतो. भोपे आपल्या गुंडांना हे लग्न थांबवायला पाठवतो.
दरम्यान, चार्ली, ड्रग विक्रेते, त्याच्या व्यवसायातला फितूर आणि भ्रष्ट पोलिस यांदरम्यान एक प्रचंड गुंतागुंतीचा खेळ होतो, ज्याचा परिणाम म्हणून चार्लीच्या हातात दहा कोटींचे ड्रग्ज लपवलेली एक गिटारकेस पडते. चार्ली पळतो आणि पोलिस चुकून गुड्डूला पकडतात. इकडे भोपे भाऊ आणि त्याचे हस्तक चार्लीच्या टेपरीत येऊन पोचतात, गुड्डूचा माग काढत. यानंतर गोंधळ इतका वाढतो, की आतापर्यंतचा भाग सुबोध, सोपा, सरळ वाटावा.
"कमीने' घडतो एका अतिशय असुरक्षित, गढूळलेल्या वातावरणातल्या मुंबईत, जे खरोखरच्या वर्तमानातल्या मुंबईहून फार वेगळं नाही. परभाषकांचे रोजगारासाठी आलेले लोंढे, मुंबईत जन्मूनही वाडवडिलांमुळे मुंबईबाहेरचे मानले जाणारे इतर प्रांतीय, दर गोष्टीचा स्वार्थासाठी वापर करणारे राजकारणी, वाढती गुन्हेगारी, गरिबी, जागांचे प्रश्‍न, राजकीय अन्‌ सामाजिक भ्रष्टाचार, कायद्याची असमर्थता या सर्व गोष्टी मुंबईचं एक विदारक चित्र तयार करतात, जे दुर्दैवानं बरंचसं खरं आहे.
हे गढूळलेपण परावर्तित होतं ते चित्रपटाच्या दृश्‍य परिमाणात. सतत पावसाळी हवामान, कथानकाच्या गतीबरोबर येणारे हवामानाचे चढउतार, अंधाऱ्या खोल्या, खोपटं या सगळ्यांची मदत कथानकाची तीव्रता वाढवण्यासाठी होते. कॅमेराच्या फ्रॅन्टीक हालचाली, रंगांचा जाणीवपूर्वक वापर, बंगाली, हिंदी, मराठी, इंग्रजी अन्‌ इतरही भाषा सतत (आणि बहुधा सबटायटल्सशिवाय) बोलणारे लोक हे रसायन अधिक तीव्र करतात.
रामगोपाल वर्मा हा एके काळी आपल्या "गुन्हेगारीपटां'चा राजा मानला जायचा. सत्या, कंपनी, सरकारमुळे त्याचं नावही चिकार झालं होतं. मात्र, सत्या सोडता इतर दोन चित्रपट अन्‌ "सरकार' पाहता त्याचा भर अनावश्‍यक चमत्कृतीवर झालेला दिसतो. "कमीने'च्या चित्रीकरणातही दृश्‍य संकल्पना अन्‌ संकलनावर भर आहे, पण हे सगळं गरजेशिवाय, केवळ प्रेक्षकाला चकित करायला केलंय असं वाटत नाही, ही चित्रपटाची गरज वाटते. भारद्वाजचे मकबूल, ओंकारा अन्‌ आता "कमीने' पाहता, वर्माजींची आपल्या स्थानावरून हकालपट्टी करायला हवी, असं वाटतं.
"कमीने'ची शेवटची पंधरा-वीस मिनिटं जवळपास हाताबाहेर जातात. गोंधळ इतका पराकोटीला जातो, की छोट्या पडद्यावर कदाचित काय चाललंय हे कळूही नये. हा भाग बराचसा टेरेन्टीनो शैलीत जाणारा. म्हणजे घटक पाश्‍चात्त्य नव्हेत; पण वास्तव, मसाला, तांत्रिक चमत्कार, इतर चित्रपटांचे संदर्भ, संवादांचा बाज आणि टोकाची ऍक्‍शन यांचं मिश्रण करण्याची कल्पना हीच टेरेन्टीनो शैलीजवळ जाणारी. हा भाग किंचित अधिक गंभीर असता आणि शेवट इतका "बॉलिवुडीय गोड' नसता, तर मला किंचित अधिक आवडता; पण जर तरच्या गोष्टी करण्यात फार मतलब नाही. एकूण आवडलेल्या चित्रपटाबद्दल तर अजिबातच नाही.
-गणेश मतकरी

12 comments:

unique Creative September 30, 2009 at 1:04 AM  

tin tas kay challe ahe kahi kalt nahi, ani prekshak pase vaya gelayach dukha padrat padun baher padat

आनंद पत्रे September 30, 2009 at 4:21 AM  

उत्तम चित्रपटाचे उत्तम परीक्षण.... धन्यवाद

Deepak Parulekar September 30, 2009 at 4:27 AM  

Nice article. Tarantino is one of my fav director. When I saw Kaminey I suddenly came to know its same like quentin's movies like Kill Bill, Pulp fiction, reservoir Dogs and all!!! I like Kaminey very much ! it was awesome !

Anonymous,  September 30, 2009 at 4:58 AM  

छान लिहीले आहे परीक्षण

Abhijit Bathe September 30, 2009 at 12:23 PM  

गणेश - ’कमीने’ पाहिला, आवडला. हा २००९ मधला सर्वोत्कृष्ठ हिंदी सिनेमा ठरला तरी आश्चर्य वाटणार नाही. पण हा लई भारी न्वार आहे कि नाही याबद्दल मला डाऊट आहे. एकतर हा पिक्चर पाहुन - ’चांगला आहे, पण लोक बोंब मारताहेत एवढा ग्रेट आहे का?’ - असा प्रश्न पडला. मला वैयक्तिक रित्या ’ओंकारा’ जास्त आवडला. न्वार बद्दल बोलायचं तर नक्की कुठला पिक्चर न्वार मध्ये येतो याबद्दल माझी डेफिनिशन झोल होऊ शकते, पण माझ्या मते - शिवा, सत्या, परिंदा, कंपनी, जॉनी गद्दार - हे सगळेच न्वार मध्ये येतात. अगदीच वैयक्तिक तुलना करायची झाली तर माझ्या मते ’सत्या’ हा ’कमीने’ पेक्षा कोसो वरचा पिक्चर आहे.

डयरेक्टर्स बद्दल माझं मत तुला कदाचित माहित असेल, पण पुन्हा - महेश भट ने ’सारांश’ केला. सारांश भारी पिक्चर आहे, मग पुढे त्याने काय वाट लावायची ती लावो. मला फारसं वाईट वाटत नाही. तेच राम गोपाल वर्मा बद्दल, विधु विनोद चोप्रा बद्दल, क्वॅन्टिन टॅरॅन्टिनो बद्दल (किल बिल अजुन बघवत नाही रे बाबा) आणि तेच विशाल भारद्वाज बद्दल.

दोन जुळे भाऊ, एकाची छावी, गुंड, भ्रष्ट सिस्टिम वगैरे तर मला रेग्युलर स्टोरी वाटली. (स्टोरी बाबत मग ’जॉनी गद्दार’ वरचा वाटलेला). त्यात परत वेगवेगळ्या भाषेत बोलणारी, ड्रग्ज बिग्ज प्रकारातली चकाचक लोकं - ’मी अडाणी’ म्हणतो तसं काय चाललंय हे कळत नाही अशी परिस्थिती बऱ्याच लोकांची होऊ शकते. मी सबटायटल्स असलेली कॉपी पाहिली - त्यामुळे मला फरक पडला नाही. ते नसते तरिही पडला नसता.

पिक्चर मला आवडला. पण तेवढंच. फक्त आवडला. मी काही हा पिक्चर दुसऱ्यांदा वगैरे पहाणार नाहिए. आणि एवढं सगळं असुनही या पिक्चरबद्दल भरपुर बोलायला असुनही ती स्टोरी बिरी कशाला टाकलिएस मधे? ती वाचताना मला ’च्यायला नामजोशी कसे न्वार बद्दल लिहायला लागले?’ असा प्रश्न पडला.

मेन मुद्दा - पिक्चर चांगला, परिक्षण चांगलं. उगीच हल्ला नको.

Vibhavari September 30, 2009 at 10:00 PM  

परीक्षण छान आहे

ganesh September 30, 2009 at 10:24 PM  

anand,dipu ,manatle, vibha,thanks.
mi adani,
i see where u r coming from,pan for this particular film ,kahich kalat nahi may be a bit harsh.maybe u can say it for last 1/4th part.because this is a traditional hindi film story.which we have seen n no of times on screen.
AB,
ha lai bhari noir nahi,pan we dont hava a lai bhari noir....yet. both ek chalis ki last local and gaddar are there, but they are distinctly western setups. this is a traditional bollywood (if u please) setup and noir ideas being used in a internalised way without direct imitation.
satya is absolutely above kaminey but its a straightforward gangster film.its not a neo noir.
a thumb definition of noir would be darkenining of the content as well as visuals. this happens here.
bharadwaj always seems to take a very commercial idea(all shakespere is extremly commercial. ugach nahi tyacha versions varshanuvarsha yet rahatat) and does his stuff in detailing. same here.
out of the list u mention,i would say parinda is noir.others r good gangster films.but hey, to each his own.

Unknown October 7, 2009 at 4:20 AM  

PUN ..JONY GADDHAR CHANGAL HOTA..

ganesh October 8, 2009 at 4:19 AM  

johny gaddar ani ek chalis ki last local ya donhi noir typcha hallicha films changlya hotya yaat wad nahi. only diffrence is that they had lot of direct western influence(which again is not bad in itself but when u start experimenting in ur own set of beliefs ,its the next stage) and bharadwaj uses a typical hindi picture formula to get that effect.

attarian.01 October 8, 2009 at 5:12 AM  

Matkariji , khup khup thanks tumhi ha blog lihilya baddal . mazy sarkhe khup astil fakkt wachanare . tumchy blog madhe tumhi kal RAM GOPAL VARMA la kami lekhale, `hakalpatti' ha shabd vaprala. khar manj VISHAL BHARDWAJ sudha RAM GOPAL VARMA kadech tayyar zala ahe, tyachwar RAM GOPAL VARMA ch effect janawatoy . me sudha kahi diwasa purvi VISHAL BHARDWAJ ha RAM GOPAL VARMA chi jaga ghena asch mat mandala hot. aso ........ baki punha kadi tari ..... punha ekada thankas...

ganesh October 8, 2009 at 8:47 AM  

attarian.01,
just for the record, i do like a lot of films by RGV ,among them shiva, rangila, satya, company and first sarkar. still ,my argument is plain enough. ani kon konakade shikto yavarun performance judge karta yet nahi. raj kumar santoshi ha govind nihlani cha assistant hota. pan he faired much better in commercial cinema whereas nihlani was best in parallel. these things happen.

Unknown September 30, 2017 at 12:32 PM  

गणेश सर, तुम्ही ब्लॉग लिहिणं चालू ठेवलंच पाहिजे. हे असं वाचण्याची वेगळीच मजा आहे. प्लिज.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP