प्रश्‍नांकित सिनेमा

>> Wednesday, September 16, 2009

चित्रपट म्हणजे काय? कला की करमणूक, असा एक वाद प्राचीन (म्हणजे चित्रपटाच्या तुलनेत प्राचीन) काळापासून चालू आहे. चित्रपट हे ते बनवणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिभेचा आविष्कार असावेत, की ते पाहण्याकरता इमानेइतबारे तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांची निर्मिती केलेली असावी, असे दोन दृष्टिकोन इथे संभवतात. यांतल्या कोणत्याही एका दृष्टिकोनाला शंभर टक्के बरोबर मानून चालता येणार नाही. कारण सत्य हे या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. चित्रपटांना कला म्हणून आज मान्यता मिळालेली दिसते; पण केवळ व्यक्तिनिष्ठ कला ही तिचा रसास्वाद घेऊ शकणाऱ्या रसिकांशिवाय व्यर्थ आहे. त्यामुळे या कलेलाही रसिकांचा किंवा प्रेक्षकांचा काहीएक विचार हा लागतोच. प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि तरीही यशस्वी असलेल्या किंवा दुर्लक्षित असण्यात समाधान मानणाऱ्या दिग्दर्शकांची उदाहरणं जरूर आहेत. मात्र, खरा उत्तम चित्रपट तोच मानला जावा, जो या माध्यमाच्या उत्तम कलाविष्कार असण्याकडे अन्‌ त्याबरोबरच त्याच्या रसिकप्रियतेकडेही लक्ष देईल.
याच प्रकारचा एक दुसरा वाद असतो तो आशय महत्त्वाचा की हाताळणी? बहुतेक समीक्षक मंडळी नेहमी या वादात बाजू बदलत राहताना अन्‌ संभ्रमात असलेल्या दिसतात. असा एक लोकप्रिय प्रवाद आहे, की चांगला प्रश्‍न मांडणारा चित्रपट हा ऑटोमॅटिकली चांगला चित्रपट. बहुतेकदा या प्रकारच्या चित्रपटांबाबत केलेलं बोलणं/ लिहिणं हे आपल्याला सांभाळून केलेलं आढळतं, जरी अनेकदा या चित्रपटांचा दर्जा उघडच बेताचा दिसला तरीही. याचं कारण म्हणजे चित्रपटाला केलेला विरोध हा ते मांडत असणाऱ्या विषयाला केलेल्या विरोधासारखा वाटण्याची भीती. मग त्यापेक्षा विरोधच न करण्याचा पवित्रा अधिक सावधपणाचा. जगमोहन मुंदरा या अश्‍लील चित्रपटांसाठी मान्यता पावलेल्या निर्माता/दिग्दर्शकाने परमार्थाचा आव आणून भंवरी देवी प्रकरणावर केलेल्या "बवंडर' किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या एका प्रकरणावर बनवलेल्या "प्रोवोक्‍ड' चित्रपटासारखी सुमार पण उत्तम परीक्षण मिळालेल्या चित्रपटांची उदाहरणं हा मुद्दा स्पष्ट करतील.
मुंदराचं या चित्रपटांसाठी कौतुक व्हावं ते एवढ्याचसाठी, की त्यानं आपल्या अनुभवाला साजेलशी अश्‍लील दृश्‍यं या चित्रपटात आणण्याचं टाळलं आणि स्वच्छ चित्रपट बनवले. (किंबहुना आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचाच हा एक प्रयत्न होता असंही म्हणता येईल.) नंदिता दास, रघुवीर यादव यांसारख्या अभिनयासाठी नावाजलेल्या आणि ऐश्‍वर्या रायसारख्या प्रतिष्ठित सौंदर्यवतीला इथं उपस्थित करून चित्रपटाच्या हेतूबद्दल शंकेला जागा आणू दिली नाही.
पटकथाही थेट विषयाला हात घालणाऱ्या होत्या. "बवंडर'मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या भंवरी देवी रेप केसची पार्श्‍वभूमी आणि कोर्टातला झगडा हा चित्रपटाचा अवाका होता, तर "प्रोवोक्‍ड'मध्ये खटल्याची अन्‌ पतीने चालवलेल्या छळाची गोष्ट होती. मात्र, विषयाला हात घालणं वेगळं आणि तो परिणामकारक पद्धतीनं पोचवणं वेगळं. जगमोहन मुंदराचे हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना कुठंही आपल्यामध्ये गुंतवून घेऊ शकत नाहीत. हे त्यांना कसं जमतं, हा एक अभ्यासाचा विषय व्हावा. कारण दोन्ही विषय हे उघड-उघड नाट्यपूर्ण आहेत.
"बवंडर' हा जवळपास एखाद्या माहितीपटासारखा होता; पण माहितीपटांमध्ये प्रत्यक्ष वास्तव दिसत असल्यानं त्याला जी विश्‍वसनीयता येते, ती नव्हती. पटकथेलाही कुठं जाणवण्यासारखे चढ-उतार नव्हते, टोकदारपणा नव्हता. केसचे कागदपत्र पाहून उतरून काढल्यासारखं त्याचं स्वरूप होतं. आता आपण नव वास्तववादासारख्या उदाहरणांवरून जाणून आहोत, की चांगल्या चित्रपटाला उसनं नाट्य लागत नाही; आजूबाजूच्या वास्तवाकडेच खोलात जाऊन पाहण्याची नजर लागते. दुर्दैवानं मुंदराकडे उसनं सोंग, असलेलं नाट्य पाहण्याची दृष्टीदेखील नव्हती.
"प्रोवोक्‍ड'मध्ये मोठी घोडचूक होती ती कास्टिंगची. ऐश्‍वर्या रायकडे कोणी बी-मूव्ही नायिका म्हणून पाहणार नाही हे खरं असलं, तरी तिचा अभिनय किती बेताचा आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. छळ असह्य होऊन पतीला जाळणारी स्त्री कचकड्याची वाटणार नाही अशी उभी करणं खरंच कठीण आहे. जी व्यावसायिक हिंदी चित्रपटातही अभिनयाचा पटण्याजोगा आविष्कार उभा करू शकत नाही, ती वास्तववादी अभिनय काय करणार? दिग्दर्शकाला ही जाण अपेक्षित आहे. सर्वांकडेच ती असते असं म्हणता येणार नाही अन्‌ चांगली कलाकृती देण्यापेक्षा आपल्या कारकिर्दीला रंगसफेदी करण्यात रस असणाऱ्या दिग्दर्शकाकडे तर ती नसण्याचीच खात्री.
करमणुकीपेक्षा काही एक प्रश्‍न मांडणारा चित्रपट हा नेहमीच आर्थिक जुगार असतो असं नाही. हे चित्रपट दोन प्रकारचे असू शकतात. प्रश्‍नाचा नाममात्र आधार घेऊन व्यवस्थित करमणूक करणारे चित्रपट किंवा प्रश्‍नाला पूर्णपणे समजून घेऊन त्याकडे तपशिलात जाऊन पाहणारे चित्रपट. पहिल्या प्रकारचे चित्रपट या मानानं सोपे आणि थ्रिलर्सना खाद्य पुरवणारे असतात. उदाहरणार्थ हिंदू-मुस्लिम ऐक्‍य किंवा दहशतवाद यांसारख्या विषयांना जर तोंडी लावणं म्हणून घेतलं तर प्रत्यक्ष विषयाच्या आधारे वेगळ्याच सुरस आणि चमत्कारिक कथा रंगवून सांगणं काही फार कठीण नाही. उदाहरणार्थ हल्लीच आलेले दहशतवादासारख्या अन्‌ मुंबई बॉंबस्फोटांसारख्या ऐरणीवरच्या प्रश्‍नांवर आधारलेले "आमीर' अन्‌ "वेडनसडे' हे प्रश्‍नाला दुय्यम लेखणारे अन्‌ मनोरंजनालाच पुढे आणणारे थ्रिलर्स होते. आता ते थ्रिलर्स म्हणून जरूर उल्लेखनीय होते; पण त्यामुळे ते प्रश्‍न उपस्थित करणारे चित्रपट म्हणून चांगले ठरणार नाहीत! याउलट निशिकांत कामतने बॉंबस्फोटांच्याच विषयावर रचलेला "मुंबई मेरी जान' हा घटनेनंतर निवळणाऱ्या, हळूहळू शांत होऊन आपल्या मार्गाला लागणाऱ्या शहराकडे अधिक वास्तव दृष्टिकोनातून पाहत असल्याने तो या प्रकारचा उत्तम प्रयत्न म्हणून पाहावा लागेल.
दहशतवादाकडेच अतिशय वेगळ्या नजरेने आणि एका जागतिक दृष्टिकोनासह पाहणारा चित्रपट होता तो स्टीवन गागानचा "सिरीआना'. केवळ दहशतवादाचं अस्तित्व हे त्याचं टार्गेट नव्हतं, तर तो कसा जन्माला येतो अन्‌ नजीकच्या भविष्यात त्याचं निवारण कसं अशक्‍य आहे, हे काही व्यक्तिरेखांना प्रातिनिधिक स्वरूपात ठेवून त्यानं दाखवून दिलं होतं. 2001 च्या अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर चित्रकर्त्यांचा दहशतवादाकडे केवळ रंजनाचा विषय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि काही अर्थपूर्ण चित्रपट तयार झाले. जागतिक राजकारण, त्यातले नफेतोटे, कॉर्पोरेट्‌सची वाढत चाललेली सत्ता, आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि दहशतवाद यांच्यात काही समीकरण असू शकतं का हे "सिरिआना' पाहतो आणि त्यातून एक अस्वस्थ करणारं उत्तर उभं करतो. या चित्रपटात सांकेतिक अर्थानं मनोरंजन नाही किंवा हा माहितीपटही नाही; पण एका प्रश्‍नाचे सर्व पैलू दाखवून देणारा अन्‌ हे करताना प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारा चित्रपट आहे.
कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव हादेखील "इश्‍यू बेस्ड सिनेमा'साठी चांगला विषय असल्याचं सिद्ध झालेलं आहे. मात्र, मघा म्हटल्याप्रमाणेच विषयाचं गांभीर्य आणि चित्रपटाचा दर्जा याचा अर्थाअर्थी संबंध नसतो. वर्णभेद हा एक असाच लोकप्रिय विषय. 1967 च्या "इन द हिट ऑफ द नाईट'सारखे बेसिक थ्रिलर्स या मुद्द्यावर रचले गेले; तसेच 1988 चा ऍलन पार्कर दिग्दर्शित "मिसिसिपी बर्निंग' किंवा 1997 चा "अमिस्ताद' यांसारखे प्रश्‍नावर लक्ष केंद्रित करणारे चित्रपटही आले. मात्र, अशा वेळी दिग्दर्शक प्रश्‍नाला वजन किती देतो अन्‌ नाट्याला किती, याला खूप महत्त्व येतं. त्यामुळेच पार्करचा चित्रपट हा या प्रश्‍नावरल्या उत्तम चित्रपटांत गणला गेला, तरी स्पिलबर्गच्या नेत्रदीपक कामगिरीची पार्श्‍वभूमी असतानाही पटकथेतल्या प्रमाणेच संतुलन चुकल्याने "अमिस्ताद' पूर्णपणे यशस्वी झालेला दिसत नाही. वर्णभेदावर आधारित चित्रपटांचंच एक नव्या जमान्यातलं रूप म्हणजे एड्‌स आणि होमोसेक्‍शुऍलिटीने समाजात पसरवलेल्या संमिश्र समजावर आधारित चित्रपट. जोनाथन डेमने 1993 मध्ये पडद्यावर आणलेल्या अन्‌ टॉम हॅन्क्‍सचा अविस्मरणीय अभिनय असलेला "फिलाडेल्फिया' हे या विषयातलं आजवरचं सर्वोत्तम उदाहरण. सामाजिक अंधश्रद्धांचं वर्तमानातलं रूप दाखवणारा हा एक भेदक प्रयत्न.
आपल्याकडे प्रश्‍नाबिश्‍नाकडे पाहायला फार कोणाला फुरसत नसल्यानं हा चित्रप्रकारच तसा उपेक्षित. काही हिंदू-मुस्लिम ऐक्‍यावरचे चित्रपट, "फिलाडेल्फिया'ने प्रेरित "फिर मिलेंगे' किंवा "माय ब्रदर... निखिल'सारखे काही चित्रपट आणि क्वचित स्त्रीप्रधान दृष्टिकोन असणारे काही सोडता, आपल्याकडे एकूण कठीण "प्रकार.' त्यातल्या त्यात मध्यंतरी आलेल्या "टिंग्या' आणि हल्लीच्या "गाभ्रीचा पाऊस'मध्ये शेतकरी समाजाची अवस्था नेमकेपणाने दाखवण्याचे प्रयत्न हेदेखील सततच्या करमणुकीच्या माऱ्यापासून झालेला वेलकम चेंज म्हणावे लागतील. मात्र, आपल्या प्रेक्षकाची आवड पाहता, एक ट्रेन्ड म्हणून हे चित्रपट सातत्याने येऊ लागतील, यावर माझा विश्‍वास नाही. मात्र, जे थोडेफार येतील ते बातमीतला विषय चव्हाट्यावर आणून गल्ला जमवण्याचा प्रयत्न करणारे नसले तर त्यापासून काही फायदा संभवेल. हे शक्‍य होईल अशातला भाग नाही; पण आपण आशावादी असायला काय हरकत आहे?
-गणेश मतकरी

2 comments:

Abhijit Bathe September 18, 2009 at 10:29 AM  

माझ्या एका डेंटिस्ट मित्राने पर्फेक्ट चेहरा म्हणजे काय असतं ते समजावुन सांगितलं होतं. म्हणजे लांबी रुंदी रेशो, नाक, कान, डोळे, ओठ, पापण्या बिपण्या वगैरे वगैरे. याच्यात पण ’एवढं’ सायन्स असतं हे ऐकुन आश्चर्यचकित नवल वाटलं होतं. मग त्याचं भाषण संपल्यावर त्याला विचारलं कि मग जगन्मान्य ’पर्फेक्ट’ चेहरा कोण? तर तो म्हणे ’सिंडी क्रॉफर्ड. माधुरी दिक्षित लई मागे पडते पट्टी लावली तर’. मी माधुरी भक्त वगैरे नाही, पण हे वाक्य ऐकल्यावर माझं फुटपट्ट्यांबद्दलचं नवल गळुन पडलं! :))

मला ते लॉजिक या लेखाबद्दल लावावसं वाटतंय. कीस काढायचा म्हटला तर ’मिसिसिपी बर्निंग’ आणि ’अमिस्ताद’ यात मुद्याशी प्रामाणिक कोण राहिला किंवा इतर उदाहरणांमध्ये नाट्यमयतेत कोण वहावत गेला वगैरे वगैरे हजार प्रश्न येतील. पण मुंदरा वगैरे छाटछुट उदाहरणं सोडली तर बाकी सगळेच पिक्चर अफाट नव्हते का? आणि अफाट पिक्चर एन्जॉय करणं महत्वाचं कि त्याने मूळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं कि नाही हे महत्वाचं - असे प्रश्न हा लेख वाचुन पडले.

मी तर बाबा फुल टु राडा मसाला असलेला ’दामिनी’ पण एन्जॉय केला आणि ’द्रोहकाल’ पण. (चुकुन ’द’ अक्षर दोक्यात आलं आणि हे दोन पिक्चर सुचले म्हणुन हे). बाकी ’प्रश्नांकित सिनेमा’ कि ’प्रश्नोत्सुक प्रेक्षक’ असा लईच काथ्याकुट मुद्दा - for kicks - डोक्यात आला. Again its an open ended discussion.

ganesh September 19, 2009 at 8:56 PM  

this artical was prepublished in saptahik sakal and was supposed to discuss certain issue based cinemas.some of the films here are v good(philadelhia,missisipi, syriana etc, i liked amistad only partially)and some are crap(mundra films).sort of a intro to what filmmakers are doing as far as issue based cinema is concernted. its always important if they succeed ultimately as films,and in most cases those which succeed as good cinema ,also are successful in putting issue across. i never say that accurat info of a problem will make a film justified,on the contrary...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP