बिल, ब्राईड आणि टेरेन्टीनो ( किल बिल-२)
>> Tuesday, April 13, 2010
------------------------------------------------------------------------------------------------------------
काही चित्रपट असे असतात, ज्यांच्याबद्दलचं कुतूहल लोकांच्या मनात अनेक वर्षे तयार होत असतं. इतक्या कालावधीच्या विचारप्रक्रियेनंतर जेव्हा चित्रपट पाहायला मिळतो, तेव्हा त्यास मिळणारा प्रतिसाद हा एरवीपेक्षा अधिक कडक असतो. एकतर त्याला `इन्स्टंट क्लासिक` म्हणून डोक्यावर घेतलं जातं किंवा ताबडतोब कच-यात फेकून दिलं जातं. क्वेन्टीन टेरेन्टीनो या चमत्कारिक नावाच्या तितक्याच चमत्कारिक दिग्दर्शकाच्या चौथ्या चित्रपटाचं भाग्यही यातल्याच एका पर्यायात बसणारं होतं. टेरेन्टीनोने आजवर मोजके चित्रपट केले आहेत, पण त्याला स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. `स्टार ट्रेक`पासून `कुंग फू` पटांपर्यंत अनेक गोष्टींचा प्रभाव असणारे हे चित्रपट आशयासाठी कोणी पाहत असेल यावर माझा विश्वास नाही. पण स्टाईल डिपार्टमेन्टमध्ये मात्र या माणसाचा हात धरणारा दिग्दर्शक विरळा. `रिझरव्हॉयर डॉग्ज`ने प्रकाशात आलेल्या टेरेन्टीनोला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली ती पल्प फिक्शनमुळे. त्यानंतरचा `जॅकी ब्राऊन` प्रेक्षकांनी आवडीने पाहिल्यावर जवळजवळ सहा वर्षे पठ्ठ्याचं काहीच पडद्यावर आलं नाही. मध्ये कधीतरी तो `किल बिल` नावाचा चित्रपट करीत असल्याचं कानावर आलं आणि लोकांना वाट पाहण्यासाठी एक नाव मिळालं. प्रदर्शन जवळ आलेलं असताना या किल बिलचे अचानक दोन भाग झाले आणि या विभाजनाच्या निर्णयावरून काही वाद झाले. होता होता पहिला आणि दुसरा भाग वर्षभराच्या अंतराने प्रदर्शित झाले.
टेरेन्टीनोचे चित्रपट पाहताना मला नेहमी पडणारा प्रश्न `किल बिल`ने उपस्थित केला, तो म्हणजे टेरेन्टीनोच्या शैलीबाज दिग्दर्शनाला अपरिहार्यता किती?
टेरेन्टीनोच्या सर्व चित्रपटांमध्ये सातत्यानं असणारं विश्व आहे गुन्हेगारीचं. मात्र वास्तववादाशी त्याचा काही संबंध नाही. अत्यंत श्रीमंती फॅशनेबल कपड्यात वावरणारे,कृत्रिम, वजनदार पण चटचटीत संवाद बोलणारे,खोटे परंतु आकर्षक असे हे गुंड नायक आणि खलनायक हे दोन्ही सारख्याच गडद छटांमधले. कथा कधीही सरळ पॉइंट `ए` पासून पॉइंट `बी` पर्यंत न जाणारी. प्रसंग मागे पुढे करीत, काही भाग पूर्ण वगळून तर काही भाग विविध व्यक्तिरेखांच्या नजरेतून पुन्हा सांगणारी. या तुकड्यांची रचना एखाद्या कथा कादंबरीप्रमाणे विविध प्रकरणांत केलेली. त्यांना चमकदार नावं दिलेली. `किल बिल`देखील याला अपवाद नाही.
टेरेन्टीनोच्या बहुतेक चित्रपटात येणा-या नॉन लिनीअर निवेदनाला कारण असतं. कधी त्याला अमूक भाग दुस-या एखाद्या भागाहून अधिक महत्त्वाचा त्यामुळे आधी आणावासा वाटतो, तर कधी सर्व भागांनी एकमेकांना वेगवेगळ्य़ा ठिकाणी जोडलं जाऊन सलग चित्र व्हावसं वाटतं, जे त्या चित्रपटाच्या पटकथेची रचना ठरवतं. `किल बिल`मध्येही ठरवलेल्या रचनेला ढोबळ कारणं आहे, ते फाफटपसारा वगळून एकामागून एक येणा-या मुद्दयांमध्ये सांगण्याचा. ही मुळात एक सूड कथा आहे. नायिका बिअॅट्रीक्स किड्डो (उमा थर्मन) जी पहिल्या भागात ब्राईड या नावाने ओळखली जाते. तिचं ब्लॅक माम्बा हे टोपणनावदेखील आहे. तर या नायिकेच्या लग्नसमारंभात घुसून बिल (डेव्हिड कॅराडिन) आणि त्याचे चार सहकारी सर्वांना खलास करतात. कोमात गेलेली ब्राईड चार वर्षांनी त्यातून बाहेर येते आणि एकेकाला मारत बिलपर्यंत पोचते, एवढंच हे कथानक.
आता रचना अशी, पहिला भाग सुरू होतो लग्नसमारंभातल्या हल्ल्यानंतर. त्यानंतर आपल्याला दिसतात ते बिलच्या दोन सहका-यांचे बळी. मध्ये तुकड्या तुकड्यात ब्राईडचं इस्पितळातून पळणं, बदल्यासाठी तलवार बनवून घेणं वैगैरे तपशील. दुस-या भागात उरलेल्या दोन सहका-यांचे बळी आणि अर्थात बिलशी सामना. इथे तुकड्यात येतो तो लग्नसमारंभातल्या हल्ल्याआधीचा फ्लॅशबॅक आणि नायिकेचं `पाय मे` या कुंगफू गुरूच्या हाताखाली झालेलं शिक्षण. म्हणजे फ्लॅशबॅक सोडले, तर कथानक ब-यापैकी क्रमवार आहे, मात्र ते क्रमवार वाटू नये यासाठी दिग्दर्शकाचे प्रयत्न आहेत. उदाहरणार्थ पहिल्या भागात ब्राईडने घेतलेल्या दोन बळींमध्ये नंतर घेतलेला बळी आधी दाखविला जातो. कारण काय, तर काहीच नाही.
वरवरच्या रचनाबदलाचा भाग सोडला तर या चित्रपटाच्या दोन भागांमध्ये एक लक्षात येण्यासारखा फरक जाणवतो. पहिला भाग हा अॅक्शनला अधिक महत्त्व देणारा आहे, तर दुसरा आशयाला. पहिल्या भागात टेरेन्टीनो आपल्या चित्रपटांचे सर्व गुणविशेष एखादी शोकेस असल्याप्रमाणे मांडतो. ओ-रेन इशी अर्थात कॉटन माउथशी (लुसी लिऊ) सामना करताना ब्राईडने शेकडो मारेक-यांवर केलेली रक्तरंजित लढाई, त्यातली कॉरिओग्राफी, विनोदाचा वापर आणि जपानी चित्रपटाच्या ऋणनिर्देशासाठी दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याचबरोबर येथे ओ-रेन इशीचा भूतकाळ दाखवणारं एक प्रकरण चक्क अॅनिमे या जपानी शैलीतही दाखवलं जातं. मोठे अॅक्शन प्रसंग, रंगांचा आणि इतर तांत्रिक चमत्कारांचा मुबलक वापर यासाठी हा भाग लक्षात राहतो. पण कथेला पुढे नेणारे सर्व प्रसंग दुस-या भागात येतात.
ब्राईड कोण आहे इथपासून लग्नाच्या वेळी गर्भवती असणा-या ब्राईडच्या मुलीचं पुढे काय झालं इथपर्यंत कथानकाशी संबंधित जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं दुस-या भागात मिळतात. साहजिकच हा भाग अधिक अर्थपूर्ण वाटतो.
टेरेन्टीनोच्या शैलीत मुद्दे अधोरेखित करण्याची गंमत असली तरी प्रत्येक चित्रपटाला ती वापरण्याचा अट्टाहास कळत नाही. पल्प फिक्शनमध्ये तो बरोबर होता. कारण त्यातल्या गोष्टी एकाच वेळी स्वतंत्र आणि परस्परांना जोडलेल्या होत्या आणि हे जोडलेलं असणं गुन्हेगारी विश्वातल्या घाडामोडींचं एक सलग चित्र तयार करत होतं. किल बिलमधलं शैलीचं प्रदर्शन हे केवळ प्रदर्शनच आहे. माझ्यासारख्या या शैलीच्या चाहत्यांना या दोन्ही चित्रपटांतून एकत्रितपणे येणारा परिणाम हा आवडलेला आहेच, पण टेरेन्टीनोचा चित्रपट म्हणून न पाहता, केवळ एक चित्रपट म्हणून पाहणा-याला निदान या चित्रपटापुरती ही शैली खटकणारी आहे. कारण तिचा वापर हा मूळच्या साध्या कथेला विनाकारण गुंतागुंतीची करणारा आहे.
चित्रपटांविषयी पडणारा दुसरा प्रश्न म्हणजे त्याला दोन भागांत विभागण्याची गरज होती का?
चित्रपटाचे एकाहून जास्त भाग निघण्यामध्ये प्रामुख्याने दोन कारणं असतात. एक तर मूळ चित्रपट यशस्वी झाल्यावर त्या कथेला पुढे वाढविण्याची गरज चित्रकर्त्यांना वाटते. अशा वेळी कथेत तशा शक्यता असतात. पण अनेक वेळा शक्यता तयार केली जाते. किंवा त्या व्यक्तिरेखा घेऊन त्यांना वेगवेगळ्या कथानकात गुंफलं जातं. सुपरहिरोपदासारख्या काही वेळा या व्यक्तिरेखा आधीच प्रसिद्ध असतात, त्यामुळे वेगवेगळी साहसं तयार करून या मालिकांचे भागांवर भाग काढता येणं शक्य असतं.
अनेक भागांत चित्रपट विभागला जाण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांना असणारा अशा कथानकांचा आधार, ज्यांची लांबी ही खरोखरच एका भागात बसण्यासारखी नाही. लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या अनेक भागांबद्दल कोणीच आक्षेप घेणार नाही, कारण मुळात ती या कथेची गरज आहे. मात्र अशा चित्रपटांचे भाग करताना शक्य तर अशी काळजी घेतली जाते, की प्रत्येक चित्रपट हे स्वतंत्र प्रकरण असेल, ज्याची कथा तेवढ्यापुरती पूर्ण होईल आणि प्रत्येक चित्रपटाला उत्कर्षबिंदू असेल.
किल बिलसारख्या चित्रपटात हे शक्य होत नाही. कारण इथला दुसरा भाग हा पहिल्या भागाच्या कथेला पुढे नेत नाही, तर हे दोन्ही भाग मिळूनच एक चित्रपट पुरा होतो. म्हणजे याला सिक्वल न म्हणता इक्वल म्हणावं लागेल. इथला पहिला भाग हा संपूर्ण चित्रपटाच्या लांबच लांब ट्रेलरसारखा वाटतो, कारण त्यातली गोष्ट सर्वार्थाने अपूर्ण आहे. त्यातल्या कोणत्याच व्यक्तिरेखेला तिसरी मिती येऊ शकत नाही, कारण त्या व्यक्तिरेखांबद्दल आपल्याला फार माहिती मिळूच शकत नाही. त्यातल्या त्यात ओ-रेन एशीबद्दल मिळते, पण हे पात्र मुळी जात्याच पेपरथिन आहे. मग प्रश्न एवढाच उरतो, की हे कथानक खरंच इतकं लांब आहे का, की ते पुरं करायला दोन भाग लागावेत? याचं उत्तरही नकारात्मक आहेत. दोन्ही भाग मिळवून हा चित्रपट चालतो ते सुमारे तीन तास पन्नास मिनिटे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीतही संकलनावर भर देऊन ही लांबी तीन तासांवर सहज आणता आली असती, किंवा कथेत थोडी काटछाट करून आणखी कमी. तीन तासांचे चित्रपट कमी प्रमाणात असले तरी अगदीच दुर्मिळ नाहीत. टेरेन्टीनोच्या चाहत्यांनी आनंदाने हे तीन तास काढले असते. मग हे दोन चित्रपट कशासाठी ? तर उत्तर उघड आहे. आर्थिक फायद्यासाठी.
आपण जेव्हा म्हणतो, की या चित्रपटांचे दोन्ही भाग असण्याची गरज नव्हती, अन् शैलीचा वापरही इथे आशयाला महत्त्व आणण्यापेक्षा टेरेन्टीनोच्या हौसेखातर केला जातो. तेव्हा तिसरा प्रश्न असा पडतो की, मग हा चित्रपट पाहण्यालायक आहे का?
याचं थोडक्यात उत्तर हो असं आहे. किल बिल हा निवेदनातल्या कसरती आणि इतर उणिवा गृहित धरूनही पाहण्यालायक आहे. ज्यांना याप्रकारचे चित्रपट पाहण्याची सवय नसेल, त्यांना पहिला भाग अधिक खटकेल. पण एकदा का दोन्ही भाग पाहिले, की उभं राहणारं चित्र एका संपूर्ण चित्रपटाचा आनंद निश्चित देईल. टेरेन्टीनोच्या चाहत्यांना तर हाँगकाँग सिनेमाचा प्रभाव, क्लिंगॉन प्रोव्हर्बसारखे विचित्र संदर्भ, बिलच्या सुपरमॅन मिथविषयक संवादामागचा युक्तिवाद, कथानकाला जाणूनबुजून दिलेला दंतकथेचा सूर अशा आवडण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण इतरांनाही ही स्वतःला फारशा गंभीरपणे न घेणारी, तरीही स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहणारी सूडकथा आवडून जाईल. तुम्ही टेरेन्टीनोचे चित्रपट पाहत नसाल, तर सुरुवात करायला ही उत्तम जागा आहे. हॉलीवूडमध्ये स्वतःची खास शैली असणारे अॅक्शन दिग्दर्शक फार कमी आहेत, अन् टेरन्टीनो हे त्यातलं महत्त्वाचं नाव आहे. केवळ शैलीला बिचकून त्याच्या चित्रपटांना बाजूला काढण्यात अर्थ नाही. कारण त्याने आपल्या कलास्वादाला मर्यादा पडण्यापलीकडे काही होणार नाही.
-गणेश मतकरी.
4 comments:
किल बिल चे दोन्ही भाग बघितले होते पण एवढं सुरेख विवेचन वाचून मी आधी काहीच न बघितल्यासारखं वाटलं. :-)
आणि 'म्हणजे याला सिक्वल न म्हणता इक्वल म्हणावं लागेल.' हे तर लाजवाब.. !!
१००% सहमत, अतिशय सुंदर विवेचन...
किल बिल २ मध्ये बिल superman आणि ब्राईड ची तुलना करतो तो भाग तर फार छान आहे.
लॉर्ड ऑफ रिंग ची लांबी प्रचंड आहे.माझ्याकडे uncut असलेले भाग मिळून १२ तासाहून अधिक लांबी होते त्याची.
तुम्ही नोलान च्या फिल्म्स बद्दल कधी लिहिताय त्याची वाट बघतोय.
thanks herambh ani anand.
pratham, i hv written about memento ,prestige and batman films. not sure if all is put on the blog.i dont remember if i have about following, though i had liked it a lot.
Post a Comment