मॉन्स्टर्सः रोड (मॉन्स्टर) मुव्ही

>> Sunday, November 28, 2010

एम नाईट श्यामलनचा `साईन्स` आठवतो ? या दिग्दर्शकाची ही मला सर्वाधिक आवडती (सिक्स्थ सेन्सहून देखील अधिक) फिल्म असल्याने मी तरी ती सहजासहजी विसरणार नाही. साईन्स जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा श्यामलनची खूप हवा होती. शिवाय काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या `इन्डीपेन्डन्स डे`ने `परग्रहवासीयांचा पृथ्वीशी होणारा संपर्क` या विषयाकडून काय अपेक्षा ठेवावी याचं फार ढोबळ समीकरण मांडून ठेवलं होतं. त्यामुळे ब-याच उडत्या तबकड्यांना टीव्हीवरल्या ग्रेनी फूटेजमध्ये दाखवणारा, बरीचशी वातावरण निर्मिती शेतात काढलेल्या क्रॉप्स सर्कल्समधून  करणारा अन् जेमतेम एका परग्रहवासियाला लढ्यासाठी पुढे करणारा साईन्स पाहून आम प्रेक्षक हबकला यात आश्चर्य नाही. २००२चा साईन्स अन् २०१०चा मॉन्स्टर्स यांमधे मिनिमलीस्टीक दृष्टिकोन एवढं एकच साम्य आहे, असं नाही. साईन्सचा प्रवास हा थिऑलॉजिकल अंगाने जाणारा होता.त्याची नजर वर असली, तरी ती केवळ इतर ग्रहता-यांपर्यंत जाण्यात समाधान मानणारी नव्हती. तिला थेट देवाचाच शोध घ्यायचा होता. मॉन्स्टर्सचा अजेन्डा एवढा वेगळा नाही. पण माणूस म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय असे तात्त्विक प्रश्न त्याला पडतात. त्यापलीकडे जाऊन युद्धग्रस्त वर्तमानाची एक बदललेली झलकही त्याला दाखवावीशी वाटते. मात्र तो परग्रहवासीयांना पूर्णपणे दुय्यम स्थान देत नाही. अत्यंत माफक वेळासाठी का होईना, पण वेगळ्या प्रकारच्या एलिअन्सशी तो पुरेशा प्रभावीपणे आपला परिचय करून देतो.
 लेखक दिग्दर्शक गॅरेथ एडवर्डस समोर,  हा चित्रपट मांडतेवेळी साईन्सबरोबर इतरही काही चित्रपट असावेत.रिअ‍ॅलिटी टीव्हीने हॉरर फिल्म आणि थ्रिलर्समध्ये जो बदल घडवून आणला, आणि छायाचित्रणातही अभिजात संकल्पना बाजूला ठेवून उस्फूर्ततेचा आभास तयार करण्याची पद्धत लोकप्रिय केली, त्या लाटेतून पुढे आलेले `क्लोवरफिल्ड`, `पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी` आणि `डिस्ट्रिक्ट-9` हे मॉन्स्टर्सवर आपला प्रभाव सोडून गेल्याचं स्पष्टपणे लक्षात येतं. मात्र आशयगर्भतेच्या दृष्टीने पाहाता `डिस्ट्रिक्ट-9` चा अपवाद वगळता इतर दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत `मॉन्स्टर्स` सरस ठरतो. `मॉन्स्टर्स`ला फॉर्म्युला लावायचा, तर रोड मुव्हीचा लावता येईल.
चित्रपटात सुरूवातीलाच सांगितलं जातं, की एका यानाला झालेल्या अपघाताने मेक्सिकोमध्ये परग्रहावरच्या जीवांचा सुळसुळाट झाला आहे. मेक्सिकोचा अर्धा भाग दूषित असल्याचं जाहीर करून अमेरिकन सरहद्दीवरही सुरक्षा वाढविली आहे. तरीही हे परग्रहवासी जनतेपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात सरकारला यश आलेलं नाही. कथानकाला सुरूवात होते, ती या घाडामोडीनंतर सुमारे सहा वर्षांनी. सॅम (व्हिटनी एबल) ही एक श्रीमंत मुलगी जी मेक्सिकोत आहे. तिचा एक हातही जायबंदी झालेला. सॅमला मेक्सिकोतून  बाहेर काढून अमेरिकेत सुरक्षितपणे पोहोचवायचं काम येऊन पडतं ते कॉल्डरवर (स्कूट मॅकनेअरी). कॉल्डर सॅमच्या वडीलांकडे नोकरी करतो. या कामगिरीत त्याला फार रस नाही, पण नोकरी टिकवायची तर दुसरा इलाज नाही. कॉल्डर फोटो जर्नलिस्ट आहे. आर्थिक/सामाजिक वर्गवारीत त्याची सॅमशी बरोबरी नाही. अन हे दोघेही जण जाणून आहेत. मेक्सिको सोडून अमेरिकेत जायची जवळपास अखेरची संधी असलेली फेरीबोट कॉल्डरमुळे चुकते, तेव्हा सॅम दूषित भागातून जीवावरच्या जोखमीने अमेरिकेत जायचं ठरविते. कॉल्डर अर्थातच तिच्याबरोबर निघतो. राक्षसांच्या सानिध्यात जाताना, पुन्हा आपण माणसांच्या जगात परतू का नाही, याची शाश्वती दोघांनाही वाटत नाही. मॉन्स्टर्सच्या पहिल्या प्रसंगात, आपल्याला चित्रपटाबद्दल माहिती देणा-या काही विशेष गोष्टी दिसून येतात. हॅन्डीकॅम सारख्या कॅमेरावर चित्रित होणा-या या दृश्यात आर्मीच्या दोन गाड्यांवर होणारा हल्ला, अन् तो करणारा महाकाय ऑक्टोपससदृश्य परग्रहवासी दिसतो. या प्राण्यांची जी काही माफक दृश्य या चित्रपटात आहेत, त्यातलं हे महत्त्वाचं दृश्य. या दृश्यावरून आपल्याला चित्रपटाची लो बजेट शैली दिसून येते. ज्यांनी मघा उल्लेखलेले चित्रपट पाहिले असतील त्यांना मॉन्स्टर्समध्ये काय पाहायला मिळेल याचा एक निश्चित अंदाज बांधता येतो. राक्षसाच्या प्रत्यक्ष दर्शनाने (एडवर्डस हा एच.पी. लव्हक्राफ्टच्या कथुल मायथोजचा चाहता असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या राक्षसी प्राण्यांवर द ग्रेट कथुलूची असलेली छाप स्पष्ट दिसणारी आहे.) हा बंदुकधारी ऑर अदरवाईज असणा-या, मानवी स्केलच्या शत्रूंपेक्षा खूपच वेगळा प्रकार असल्याचं दिसून येतं, अन् आपण प्रीडेटर,एलिअन्स वैगैरे मंडळींच्या आसपासचं काही पाहायला मिळेल हा विचार डोक्यातून काढून टाकतो. एकूणात ही प्रस्तावना उपयोगी आहे. मात्र प्रस्तावना म्हणूनच. या प्रस्तावनेचं चित्रपटाच्या शेवटल्या प्रसंगाशी असलेलं नातं अनावश्यक तर आहेच, वर चित्रपटाच्या एकूण परिणामातही बाधा आणणारं आहे. गंमत म्हणजे हा संबंध उघड, वादातीत असला, तरी तो प्रत्येक प्रेक्षकाच्या लक्षात येईलसं नाही. किंबहुना मी म्हणेन, की न येणंच चांगलं. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटाकडे आपण सकारात्मक पद्धतीने पाहू शकू.
 मॉन्स्टर्स हा मुळात प्रवृत्तींचा खेळ आहे. कॉल्डरवर अन्याय करणारा बॉस, सॅमच्या डोक्यातला भेदभाव, जनतेच्या सुरक्षिततेकडे पैसे मिळविण्याची संधी म्हणून पाहणारे भ्रष्ट अधिकारी, युद्धापुढे गरीबांकडे दुर्लक्ष करणारी सत्तास्थानं, चेह-यावर गॅस मास्क लावून स्वतःच राक्षसाचं रूप घेणारे सामान्य जन, अशी इथली परिस्थिती पाहता नावातला मॉन्स्टर्स हा शब्द नक्की कोणाला उद्देशून आहे, असा प्रश्न पडावा. प्रस्तावना विसरून चित्रपटाचा शेवट पाहिला, तर हे अधिकच स्पष्ट होतं. मॉन्स्टर्समध्ये राक्षसाचं प्रत्यक्ष दर्शन कमी वेळा होत असलं तरी प्रेक्षकाला आपली फसगत झाल्यासारखं वाटत नाही. याला कारणं दोन. एक तर दर्शनाशिवायही या राक्षसाचं असणं हे वेळोवेळी जाणवत राहतं. त्यांची अदृश्य छाया ही आजूबाजूच्या जगावर पडलेली दिसून येते. लोकांच्या वागण्यापासून प्रत्यक्ष नासधुशीपर्यंत आणि संवादापासून सुरक्षाव्यवस्थेने उचललेल्या टोकाच्या पावलांपर्यंत सर्वत्र त्याचा प्रभाव आहे. त्याखेरीज प्रत्यक्ष वावर जाणवण्यासाठी साउंड इफेक्टचा उत्तम वापर इथे पाहायला किंवा ऐकायला मिळतो. फसगत न वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे मूळ कथानकातच प्रेक्षकांना गुंतविण्याची असलेली ताकद. सॅम आणि कॉल्डर या व्यक्तिरेखा पुरेशा वेधक आहेत. त्याबरोबर ब-याच चित्रपटात (अन् मिडनाईट रन, थ्री फ्युजिटीव्ह्ज सारख्या रोड मुव्हीजमध्येही) पाहायला मिळणारं विसंवादाचं सुसंवादात होणारं रुपांतर इथे जमलेलं आहे.
असे चित्रपट व्यक्तिचित्रणावर खूप अवलंबून असतात, अन् ते जितकं अस्सल, तितकी त्यांची प्रेक्षकांवरली पकड मजबूत. ही पकड मॉन्स्टर्स सैल होऊ देत नाही. अशा चित्रपटाच्या प्रगल्भ आणि दर्जेदार असण्यात, उघडंच त्यांचा कमी बजेटचा भाग असतो. जेव्हा पैसे नसतात, अन् भव्यतेने प्रेक्षकांना गार करणं शक्य नसतं, तेव्हा चित्रकर्ते ही कमी भरून काढण्याचे अधिकाधिक सर्जनशील मार्ग शोधून काढतात. मात्र हे चित्रपट चालताच पुढल्या चित्रपटांना पैसा उपलब्ध होतो, अन् क्रिएटिव्हीटी ही मागे पडते. चित्रपट जुन्याच पठडीत फिरायला लागतात. एडवर्डसकडेही पुढल्या निर्मितीच्या निमित्ताने पैसा येईलंच. तेव्हा तो काय करेल हे त्याच्या निर्मितीचा पुढला आलेख ठरवणारं ठरेल. ते पाहण्यात मला नक्कीच रस आहे.

-गणेश मतकरी.

Read more...

‘द लास्ट स्टेशन’- अखेरचा पडाव

>> Sunday, November 21, 2010

असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तींची शोकांतिका अनेकदा हीच असते, की त्यांच्या जवळची, घरातली माणसं ही सामान्य असतात. याचा अर्थ घरातल्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव नसते असं नाही. ती जरूर असते. मात्र, हा आदर वैयक्तिक पातळीवरल्या व्यवहारांत उतरत नाही. अर्थात सामान्य असणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे त्यात घरच्या मंडळींचं काही चुकतं, असंही आपण म्हणू शकत नाही. मात्र, त्यांच्या सामान्यत्वाचा एका असामान्य कर्तृत्वाबरोबर जाणारा छेद हा त्या संपूर्ण कुटुंबाच्या स्थैर्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. मन:स्ताप वाढविणारा, अन् क्वचित प्रसंगी घातकही.
शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडकांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक मोठय़ा माणसांना कौटुंबिक आघाडीवर असा मन:स्ताप अनुभवायला मिळाल्याची उदाहरणं आपल्याकडेही खूप प्रमाणात आहेत. त्याच प्रकारचं- त्याहूनही अधिक वरच्या दर्जाचं जागतिक पातळीवरचं उदाहरण म्हणजे प्रख्यात रशियन लेखक, तत्त्वज्ञ लेव निकोलायविच टॉलस्टॉय यांचं. त्यांच्या वादातीत असणाऱ्या वैचारिक, सर्जनशील कारकीर्दीपुढे त्यांच्या घरातल्या वैमनस्याचा भावनिक संघर्ष त्यांच्या आयुष्यातल्या काही काळापुरता उलगडला जातो, तो गेल्या वर्षी पडद्यावर आलेल्या ‘द लास्ट स्टेशन’ चित्रपटातून.
जे पारीनी यांच्या चरित्रात्मक कादंबरीवर आधारित असलेला हा मायकेल हॉफमन दिग्दर्शित चित्रपट टॉलस्टॉय यांच्या आयुष्यातल्या अखेरच्या वर्षांवर लक्ष केंद्रित करतो. त्याच्या नावातलं ‘शेवटचं स्टेशन’ हा अर्थ त्यादृष्टीने प्रतीकात्मक अन् अर्थपूर्णही असला, तरी केवळ प्रतीकात्मक नाही. कुटुंबाचे सर्व पाश तोडून बाहेर पडलेल्या टॉलस्टॉय यांच्या आस्तोपोवो स्टेशनवरल्या अखेरच्या मुक्कामाचा त्याला संदर्भ आहे.
या चित्रपटाचा अजेंडा दुहेरी आहे. एका बाजूने त्याला आपल्या चरित्रनायकाच्या आयुष्यातल्या घटना शक्य तितक्या प्रामाणिकपणे मांडायच्या आहेत, तर दुसरीकडे त्याला सामान्यत: चळवळींमध्ये येऊ पाहणारा व्यक्तिवाद अन् त्यातून तिचा मूळ उद्देश मागे पडत जाणं, याला टीकेचं लक्ष्य करायचं आहे. हा दुहेरी हेतू या चित्रपटाच्या आशयाच्या दृष्टीने बलस्थान म्हणता येईल, तर रचनेच्या दृष्टीने कमकुवतता. कारण त्यात असलेला त्रयस्थपणा हा आपल्याला टॉलस्टॉयन चळवळीकडे प्रातिनिधिक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी उपलब्ध करून देतो, तरी तोच त्रयस्थपणा दुसरीकडे आपल्याला त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या पुरेशा जवळ जाऊ देत नाही.
चित्रपटातली खरी प्रमुख पात्रं तीन. स्वत: टॉलस्टॉय (क्रिस्टोफर प्लमर), त्यांची पत्नी सोफिया (हेलन मिरेन) आणि त्यांचा जवळचा मित्र व्लादिमीर चर्टकोव (पॉल गिआमाती). टॉलस्टॉय अन् सोफिया यांचं एकमेकांवर अजूनही प्रेम असलं तरी त्यांचे सतत खटके उडतात. याला प्रमुख कारण आहे तो व्लादिमीर. व्लादिमीरने टॉलस्टॉयना पूर्णपणे पटवून दिलं आहे की, त्यांचं सर्व लिखाण हे मुक्तपणे सर्व जनतेपर्यंत पोहोचायला हवं. त्यासाठी मृत्युपत्राद्वारे आपला कॉपीराइटचा अधिकार सोडून आपल्या सर्व कामाचं नियंत्रण व्लादिमीरच्या हाती सोपविण्यात यावं. आजवर टॉलस्टॉयच्या साहित्याची सर्व आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या सोफियाला हे मान्य नाही. आपला अन् आपल्या मुलांचा अधिकार हिरावून घेतला जातोय, हे तिला सहन होत नाही. व्लादिमीरशी ती उघड युद्ध पुकारते.
मघा मी ‘खरी’ प्रमुख पात्रं असं म्हटलं त्याला कारण आहे. ही तिघांची गोष्ट थेट तिघांमध्ये घडणाऱ्या प्रसंगांतून येत नाही, तर त्यांना साक्षीदार असणाऱ्या चौथ्या व्यक्तीच्या नजरेतून येते. हा चौथा माणूस आहे- व्लादिमीरने टॉलस्टॉयसाठी नेमलेला नवा सेक्रेटरी वॅलेन्टीन (जेम्स मॅकअ‍ॅवॉय). जेम्सच्याच नजरेतून (पूर्ण नव्हे, पण बराचसा) चित्रपट असल्याने आपला कथेतला सहभाग हा कायमच अप्रत्यक्ष राहतो. वर वॅलेन्टीनचं मत हे आपल्याला दिशादर्शक मानावं लागतं. त्यात टॉलस्टॉय- सोफियाच्या संसाराला एका अर्थी समांतर जाणारी जोडी म्हणून माशा ही बंडखोर मैत्रीण वॅलेन्टीनला दिली जाते, अन् पटकथेची बांधणी सैल व्हायला लागते.
चित्रपटाचा काळ हा १९१० च्या सुमाराचा आहे. टॉलस्टॉय हे तेव्हादेखील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व होतं, हे चित्रपटात स्पष्टच आहे. टॉलस्टॉय साहित्याचा त्यांच्या मिळकतीवरील परिणाम, टॉलस्टॉय पंथाचा गवगवा, कॉपीराइट नियंत्रणासाठी होणारे डावपेच या सगळ्याकडे पाहता हे आपण प्रत्यक्ष इतिहासाची पानं न चाळताही गृहीत धरू शकतो. मात्र पुढल्या काळातही हे नाव टिकून राहिलं, वाढीला लागलं, जगभरात पोहोचलं, यात स्वत: व्लादिमीरचा हात होताच. त्याने मिळविलेल्या हक्कांचा टॉलस्टॉय साहित्याच्या प्रसारासाठी वापर केला. टॉलस्टॉयन विचार त्यातून सर्वत्र पसरला. त्यात त्याचा स्वार्थ असेल कदाचित, पण अप्रत्यक्षपणे का होईना, एका महान विचारवंताची जगाला ओळख होण्यासाठी तो कारणीभूत ठरला. स्वत: टॉलस्टॉय जे विचार मांडत असत ते आचरणात आणत असतंच असं नाही. व्लादिमीरचा मात्र टॉलस्टॉयन आदर्शवादावर पूर्ण विश्वास होता. चित्रपटातही एका प्रसंगी ‘ही इज ए मच बेटर टॉलस्टॉय दॅन आय अ‍ॅम..’ असं व्लादिमीरकडे निर्देश करणारं वाक्य टॉलस्टॉयच्या तोंडी आहे. व्लादिमीरची कीर्तीही याहून वेगळं सत्य सांगत नाही. त्यामुळे ऐतिहासिकदृष्टय़ा पाहिलं तर व्लादिमीरची बाजू, त्याचे मार्ग फारसे बरे नसले, तरीही योग्य होती. याउलट सोफियाच्या हाती नियंत्रण जातं, तर कदाचित तिने केवळ आर्थिक फायदा पाहिला असता; जो टॉलस्टॉयन प्रचारासाठी फार योग्य ठरला नसता. स्वत: टॉलस्टॉयनेदेखील सोफियाच्या विरोधात जाणारी अन् व्लादिमीरला दुजोरा देणारी भूमिका घेतली, यावरूनही हेच सिद्ध होतं. मात्र, चित्रपटात हे थोडं वेगळ्या पद्धतीने उभं राहतं, ते व्ॉलेन्टीनचा दृष्टिकोन त्याला मिळाल्याने, मूळ लेखकाच्या चळवळीच्या राजकारणाकडे खोलात जाऊन पाहण्याने, अन् आम प्रेक्षकाच्या सामान्य व्यक्तिरेखेच्या सुख-दु:खांशी सहजपणे समरस होण्याच्या क्षमतेने.
हा चित्रपट व्लादिमीरच्या व्यक्तिरेखेकडे जवळजवळ सतत नकारात्मक दृष्टीने पाहतो. पॉल गिआमातीने ‘बिट्वीन द लाइन्स’ शोधलेल्या जागा, संवादांत मुद्दाम असणाऱ्या खाचाखोचा अन् सुरुवातीपासून सहानुभूती घेणाऱ्या सोफियाबरोबर या व्यक्तिरेखेचा असणारा वाद यामुळे प्रेक्षकाला व्लादिमीरचा स्वार्थापलीकडे जाणारा काही हेतू असेल, यावर विश्वासच ठेवू देत नाही. सोफियाचा विचार हा खरा अधिक स्वार्थी आहे. कारण टॉलस्टॉयनंतरच्या संपत्तीविभाजनाचा विचार त्यात डोकावतो. मात्र, प्रेक्षकाला टॉलस्टॉयच्या साहित्यप्रसारापेक्षा एका पत्नीने नवऱ्याच्या मिळकतीवर हक्क सांगणं अन् आपल्या वारसांचा विचार करणं, चटकन पटतं. रास्त वाटतं. एका दृष्टीने ही दिशाभूल आहे. मात्र कळेल- न कळेलशी.
मात्र, ही दिशाभूल गृहीत धरूनही ‘द लास्ट स्टेशन’ आपल्याला खिळवून ठेवतो, तो प्रामुख्याने या भूमिकांसाठी ऑस्कर नामांकनात स्थान मिळवून गेलेल्या क्रिस्टोफर प्लमर अन् हेलन मिरेन या दोघांनी साकारलेल्या लेव अन् सोफिया टॉलस्टॉय या व्यक्तिरेखांमुळे. या दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय खऱ्या वाटणाऱ्या आहेत. किंबहुना त्यामुळेच त्या युक्तिवादातली दिशाभूलही उघडपणे लक्षात येऊ देत नाहीत. त्यांचं प्रेम, त्यातला शारीरिक आकर्षणाचा भाग, सोफियाच्या मनातली असुरक्षितता, टॉलस्टॉयला व्लादिमीरचं पटणं, पण तरीही आपण आपल्या माणसांशी डावपेच खेळतोय, ही सलत राहणारी जाणीव, हे सगळं आपल्यापर्यंत थेटपणे पोहोचतं. टॉलस्टॉय ही व्यक्ती अन् टॉलस्टॉय ही प्रतिमा- या दोघांबद्दलही चित्रपट थेटपणे भाष्य करतो. चित्रपट जोवर टॉलस्टॉय अन् सोफिया या दोघांवर केंद्रित राहतो, तोवर तो प्रेक्षकाला जणू त्या काळात घेऊन जातो.
किंबहुना त्यामुळेच स्टेशनवरची या दोघांची अखेरची भेट हा ‘द लास्ट स्टेशन’चा सर्वोच्च पे ऑफ ठरतो. इतर व्यक्तिरेखांचे दृष्टिकोन आपण जाणतो. मात्र, या क्षणापुरते आपण ते बाजूला ठेवतो, अन् या दोघांनी व्यापलेल्या क्षणात समरस होतो. आजपासून सुमारे शंभर वर्षांपूर्वी रशियामधल्या एका एकलकोंडय़ा स्टेशनवर घडलेला हा क्षण मग आपल्याला परका वाटत नाही. आपण जणू त्या क्षणाचाच एक भाग बनलेले असतो. दूरवर उघडणाऱ्या काळाच्या खिडकीतून पाहणारे मूक साक्षीदार!
-गणेश मतकरी. 
(लोकसत्तामधून)

Read more...

बुगी नाईट्स- उदयास्त एका चित्रपट उद्योगाचा

>> Sunday, November 14, 2010

पॉल थॉमस अ‍ॅण्डरसन या दिग्दर्शकाचा प्रत्येक चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण,भरगच्च आणि संकेताच्या मर्यादा न पाळणारा असतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. मागे पोस्ट करण्यात आलेला मँग्नोलिया हा डझनभर पात्रांच्या एकमेकांत गुंफणा-या पण स‌मान सूत्रांभोवती रचलेल्या गोष्टी सांगणारा चित्रपट ही माझी व्यक्तिगत आवड आहे. पण हार्ड एट (1996)पासून ते २००७चा  महत्त्वाकांक्षी देअर विल बी ब्लडपर्यंतचा त्याचा प्रत्येक चित्रपट हा त्याच्या आशयापासून ते दिग्दर्शकीय कामगिरीपर्यंत स‌र्वच गोष्टींसाठी जरूर पाहण्यासारखा आहे. आजचा विषय आहे त्याचा 1997चा चित्रपट बुगी नाईट्स.
चित्रपट उद्योगातला भ्रष्टाचार हा विषय चित्रसृष्टीला नवा नाही. रॉबर्ट ऑल्टमनच्या द प्लेयर सारख्या चित्रपटातून या उद्योगाची काळी बाजू स‌मोर येऊन गेलेली आहे. या विषयावर इतर अनेक चित्रपट असून मी प्लेअरचाच उल्लेख करण्यामागे काही निश्चित उद्देश आहे. तो म्हणजे ऑल्टमनच्या आणि अ‍ॅण्डरसन यांच्या शैलीतलं आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये मांडलेल्या आशयात अस‌णारं साम्य. वयांमध्ये चाळीसहून अधिक अंतर असलेले हे दोघे एका साच्यातून येणारे दिग्दर्शक आहेत. दोघांच्याहीचित्रपटात स‌माजाला लागलेली किड ,वर्गभेद,भूतकाळाने वर्तमानावर उठवलेला ठसा, जनरेशन गॅप पांढरपेशा वर्गाच्या मुखवट्याआडलं स‌त्य यासारख्या
विषयांना स्थान दिसून येतं. कथेपेक्षा व्यक्तिरेखांना महत्त्व,घटनांपेक्षा तपशिल आणि वातावरणाला महत्व हे दोन नियम दोघेही पाळतात. दोघांच्याही चित्रपटात अनेकानेक पात्रांना स्थान असतं. आणि प्रमुख कथानकाबरोबरच या इतरा पात्रांच्या उपकथानकांना सावकाशीने पुढे नेण्यात त्यांना रस असतो.
ऑल्टमन चा प्लेअर हॉलीवूडला आपलं लक्ष्य करतो आणि ब्लॅक कॉमेडीचा आधार घेत, उपहासात्मक शैलीने यशस्वी अमेरिकन चित्रउद्योगाचा पर्दाफाश करतो. प्लेअर आणि बुगी नाईट्स‌मध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत.बुगी नाईट्स क्वचित प्रसंगी सोडला तर विनोदाचा वापर पूर्ण टाळतो, आणि अतिशय गंभीरपणे आपल्या चित्रपटाला त्याच्या विदारक शेवटाकडे घेऊन जातो हा एक फरक. तर चित्रपट उद्योगाचं स्वरूप हा दुसरा. बुगी नाईट्स हा अमेरिकन चित्रपटांना केंद्रस्थानी ठेवतो. मात्र प्रौढांसाठीचे चित्रपट किंवा दुस-या शब्दांत सांगायचं तर पॉर्न इंडस्ट्री हा त्याचा फोकस आहे. बुगी नाईटसमध्ये 1977 ते 1983 असा स‌हा वर्षांचा कालावधी येतो, अन त्या कालावधीतले धंद्यातले चढउतारही.इथलं प्रमुख कथासूत्र आहे, ते एडी अ‍ॅडम्स (मार्क वालबर्ग) या डर्क डिगलर नावाने लोकप्रिय होणा-या पॉर्नस्टारच्या उदयास्ताचं. एडीचा प्रसिद्धीचा आलेख हा या उद्योगाच्या आर्थिक चढउतारांशी स‌मांतर जाणारा आहे.  एडी काम करत असलेल्य हॉटेलात एकदा कर्मधर्म संयोगाने अशा चित्रपटांचा निर्माता दिग्दर्शक जॅक हॉर्नर (बर्ट रेनॉल्डस) अवतरतो आणि एडीचे तारे पालटतात. लवकरच एडी अर्थात डर्कची भरभराट होऊ लागते आणि त्याचं मित्रमंडळ वाढायला लागतं. त्याबरोबरच पैसा आणि  महत्त्वाकांक्षा. लवकरच तो मोठी स्वप्न पाहायला लागतो, जी त्याच्या आवाक्याबाहेर जायला लागतात. चढ पुरा होतो आणि उताराला सुरुवात होते.
विषयाकडे पाहता बुगी नाईट्स देखील प्रौढ प्रेक्षकांसाठी आहे हे उघड आहे , मात्र यातलं चित्रण कुठेही दर्जा सोडत नाही. स‌वंग होत नाही. अपेक्षित प्रेक्षक चांगले चित्रपट पाहणारा रसिक प्रेक्षक आहे, हे इथल्या पडद्यामागच्या स‌र्वांच्या चांगलं लक्षात आहे. आणि ते खोटं ठरेल असा एकही प्रसंग इथे नाही. नग्नता, किंवा शरीरसंबंधांच चित्रण करणारे जरुर आहेत, पण इथल्या व्यक्तिरेखांना या गोष्टी आनंददायक नाहीत, तर तो त्यांच्या रोजच्या कामाचा भाग आहे. त्यांची ही भावना दिग्दर्शक थेट आपल्यापर्यंत पोहचवतो, या पात्रांच्या संवादामधून, त्यांच्या वागण्यात दिसणा-या एकप्रकारच्या त्रयस्थपणातून, विरक्तीमधून. चित्रपट जरी डर्कविषयी असला तरी प्रत्यक्षात तो या उद्योगात जाणूनबुजून वा नाईलाजाने अडकलेल्या स‌र्वांविषयी आहे.ही मंडळी याउद्योगांची बळी आहेत अन् हा उद्योगच आता त्यांचा तारणहार आहे. तो सोडून ही मंडळी काही करू शकत नाहीत. स‌माज त्यांना तशी मुभा देत नाही. या व्यक्तिरेखांच्या मदतीने दिग्दर्शक स‌माजाच्या एका विशिष्ट थरालाच अत्यंत भेदकपणे जिवंत करू पाहतो. उद्योगात
स्थिरस्थावर असूनही खराखुरा चित्रपट बनवण्याची मनीषा ठेवणारा जॅक हॉर्नर, मुलाची कस्टडी नव-याकडे गेल्याने स्वतःवरला ताबा  घालवून बसलेली अ‍ँबर (जुलिअ‍ॅन मूर) ,शिक्षणातून लक्ष उडून भलत्या मार्गाला आलेली रोचरगर्ल (हिथर ग्रॅहम), धंद्याचा डाग पुसून स्वतःच साऊंड सिस्टीमचं दुकान काढण्याचं स्वप्न पाहणारा बक (डॉन चिएडल) अशा अनेकांच्या या गोष्टी आहेत. डर्कच्या कथानकाला पूरक असूनही याचं अस्तित्व चित्रपटाला आकार देतं. त्याला वास्तवाशी आणून जोडतं.
बुगी नाईट्सला नक्की पाहावा अशा यादीत आणणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यातले कलाकार . बर्ट रेनॉल्ड्स सोडता यातले बहुतेक जण १९९७मध्ये नवे किंवा फारसे माहीत नसणारे होते. मात्र काळानंतर यातला प्रत्येक जण हा स्वतःच्या कतृत्त्वाने मोठा स्टार बनला. वालबर्ग, मूर,चिएडल,ग्रॅहम, विल्यम एच मसी, फिलिप सिमॉर हॉफमन या सर्वांना आज इंडस्ट्रीत मोठा मान आहे. या मंडळींनी त्यावेळी केवळ २७ वर्ष वयाच्या असलेल्या आपल्या तरूण दिग्दर्शकाच्या मदतीने या कठीण विषयाला हात घालणं हा सर्वांच्याच दृष्टीने एक जुगार होता. त्यात त्याना मिळालेलं यश हे हॉलीवूडला केवळ कमर्शियल म्हणून नावं ठेवणा-यांसाठी दिलेलं एक रोखठोक उत्तरच म्हणता येईल.
-गणेश मतकरी

Read more...

क्रोज- एपिसोड झीरो- कावळ्यांची शाळा

>> Sunday, November 7, 2010

प्रत्येक चित्रपट हा आपल्याबरोबर संदर्भाची एक चौकट घेऊन येतो. या चित्रपटाचा प्रकार, त्याची जातकुळी यावर ही चौकट ठरत असते, अन्  तो चित्रपट पाहण्याआधीच चित्रपटाच्या जाहिरातीवरून, विषयावरून , कथासारावरून ती आपल्यापर्यंत पोहोचतही असते. आपण जेव्हा अमुक चित्रपट पाहायचा असं ठरवतो, तेव्हा ही संदर्भाची चौकटदेखील आपण स्वीकारतो. अन् त्यानंतर  चित्रपटाच्या दर्जाचा कस ठरवावा लागतो, तो ही चौकट गृहीत धरूनच.
माझा असा अनुभव आहे की, बहुतेकदा सामान्य प्रेक्षक काहीशा नकळतंच या नियमाला न्याय देतात. जाहिरात, वृत्तसमीक्षणं यावरून तोंडओळख झालेलाच चित्रपट ते मुळात निवडतात, अन् त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीला आपसूक एक बैठक तयार होते. जेव्हा त्यांना चित्रपट आवडत नाही, तेव्हाही ते तुलनेसाठी त्याच प्रकारचे चित्रपट निवडतात. याउलट चित्रपट जाणकार, अभ्यासक, समीक्षक हे मात्र काहीवेळा या अलिखित नियमाच्या विरोधात जातात. त्यांना सर्व प्रकारचे चित्रपट पाहण्याची गरज वाटते. पण मुळातली त्यांची व्यक्तिगत आवड त्यांना दर चित्रपटाच्या चौकटीतच विचार करू देते, असं मात्र नाही. उदाहरणार्थ वास्तववादी किंवा तत्त्वचिंतनात्मक चित्रपट आवडणारी व्यक्ती ही स्टार वॉर्ससारखा फॅन्टसी हाच गाभा असलेला चित्रपट स्वीकारू शकेल का? अन् शकली तरी त्याचा त्या विशिष्ट चित्रप्रकारासंदर्भात खोलवर विचार करू शकेल का?  कठीण आहे.
असाच काहीसा अनुभव मला यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आला. खासकरून जपानी रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये असणा-या तकाशी मिके दिग्दर्शित `क्रोज- एपिसोड झीरो` चित्रपटाबाबत. जपानी चित्रपट म्हणजे आपण मुळात मिझोगुची, ओझू, कुरोसावा या दिग्दर्शकांपासून विचाराला सुरूवात करतो, अन् त्यांच्या अभिजात चित्रपटांची आठवण आपल्या मनात जागी होते. आपल्याला तसंच काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण मनात धरतो, अन् जेव्हा ती पूर्ण होत नाही, तेव्हा समोर उलगडणा-या चित्रपटाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं हे कळेनासं होतं. या विशिष्ट चित्रपटाला हजेरी लावणा-या अनेकांना हा अनुभव आला असं दिसलं. इथे त्यांचं रसिक असणं, जाणकार असणं त्यांच्या मदतीला आलं नाही, तर त्यांच्या विरोधात गेलं.
जपानी चित्रपटांना अभिजात आशयघन चित्रपटांची एक परंपरा जरूर आहे, पण मांगा कॉमिक्स आणि अ‍ॅनिम या अ‍ॅनिमेशन शैलीचा प्रभावही तिथे सातत्याने गेली अनेकवर्षे जाणवणारा आहे. हिंसाचार, भय यांना पडद्यावर आणताना या प्रभावाचा वाढता वापर दिसून येतो. घोस्ट इन द शेल (दिग्दर्शक मामारू ओशी) सारख्या अ‍ॅनिम चित्रपटांनी तो अमेरिकेपर्यंत देखील पोहोचवला आहे, अन् मेट्रिक्स मालिकेसारख्या चित्रपटांमध्ये या प्रभावाची आंतरराष्ट्रीय आवृत्तीही आपल्याला दिसून आली आहे. हिडीओ नकाता दिग्दर्शकाच्या रिंगूसारख्या चित्रपटातून जपानी भयपटही जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. हे सारं त्यामानानं हल्लीचं असलं, तरी या चित्रप्रकारांमध्ये झालेलं, होणारं काम हे विसरण्याजोगं नाही. अशा तुलनेने नव्या दिग्दर्शकांमधलं ताकाशी मिके हे महत्त्वाचं नाव. १९९१पासून कार्यरत असणारा आणि फुल मेटल याकूझा (१९९७) ऑडिशन (१९९९), वन मिझ्ड कॉल (२००३) सारख्या चित्रपटांनी जगभर माहित झालेला हा दिग्दर्शक. हिरोशी ताकाहाशीच्या क्रोज नामक अतिशय लोकप्रिय अन् हिंसक मांगा कॉमिक्सवर `क्रोज- एपिसोड झीरो` आधारित असणं, हे खरंतर आपल्याला संदर्भाची चौकट पुरवायला पुरेसं आहे. पण महोत्सवातल्या अनेकांना हा चित्रपट पाहून फसवल्यासारखं वाटलं. त्यांनी ज्या प्रकारच्या चित्रपटाची अपेक्षा केली होती, तो हा नव्हता.
एपिसोड झीरो हे खरंतर प्रिक्वल आहे. कथानकाची मूळ पार्श्वभूमी अन् व्यक्तिरेखांमध्ये कॉमिक्सशी साम्य असलं तरी कथाभाग (जो काय थोडाफार आहे तो) वेगळा आहे. पहिल्या दहाएक मिनिटांतच लक्षात येतं, की महत्त्व कथेला नाही. चित्रपटाची रचना ही एक कन्फ्रन्टेशन्सची मालिका आहे. त्यासाठी कॉमिक्सप्रमाणेच कम्प्युटर गेम्स हा देखील एक संदर्भ सहज लावण्याजोगा आहे. एका व्यक्तिरेखेने, दिलेल्या पार्श्वभूमीवर, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांशी (गेम्सच्या भाषेत सांगायचं तर बॉसेसशी) लढून सर्वात अव्वल ठरणं एवढीच इथली रचना आहे. गेन्जी (शून ओगुरी ) हा इथला नायक आहे. सुझुरान या अतिशय बदनाम शाळेत गेन्जी नव्याने भरती झालाय. फक्त मुलांसाठी असलेली ही शाळा इथल्या गुंडगिरीसाठी प्रसिद्ध आहे. सेरीझावा (ताकायुकी यामाडा) हा इथला सध्याचा बादशाहा आहे. मात्र त्याच्या खालच्या वर्गांमध्येदेखील विविध तुकड्यांवर सत्ता गाजवणारे छोटे-मोठे मासे आहेत. गेन्जीला सेरीझावापर्यंत पोहोचायचं तर यातल्या सर्व अडथळ्यांना पार करावं लागेल, अन् अखेर सेरीझावाशी टक्कर घ्यावी लागेल. मुळातच याकुझा (जपानी माफिया) बॉसचा मुलगा असलेल्या गेन्जीची हे करण्याची तयारी आहे. नव्हे, त्यासाठीच तर तो इथे आला आहे. युद्धाला तोंड फुटल्यावर गेन्जी मदत घेतो, ती केन (क्योजुकी याबे) या शाळेबाहेरच्या गुंडांची. केन फारसा डोकेबाज नाही पण स्ट्रीटस्मार्ट आहे. त्याच्या अनुभवाचा थोडाफार फायदा घेत गेन्जी सेरीझावाशी लढा द्यायला सज्ज होतो.
चित्रपटात काय वाटेल ते दाखविलंय अन् त्यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढून मोकळं होण्यासाठी आपण दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. त्यातील पहिली म्हणजे कथानकातली शाळेची योजना, अन् दुसरी त्यातल्या हिंसाचाराचं स्वरूप. इथे या दोन्ही गोष्टी दाखवताना वास्तववादी दृष्टिकोन अपेक्षित नाही. इथली काळ्या युनिफॉर्ममधल्या गुंडांनी भरलेली स्कूल ऑफ  क्रोज- सुझूरान, ही खऱोखरीच्या शाळेसारखी असणं अपेक्षित नाही. ती एक सिस्टिम आहे, एक व्यवस्था आहे एवढं लक्षात घेतलं, तरी पुरे. त्यातले डावपेच, कुरघोडी, ही ढोबळमानाने कोणत्याही व्यवस्थेसंदर्भात चालण्यासारखी आहे, उदाहरणार्थ राजकीय.
थोड्याफार प्रमाणात हिंसेचेही तेच. कुंग फू हसलसारख्या चायनिज चित्रपटात किंवा टेरेन्टीनोच्या कोणत्याही चित्रपटात चालण्यासारखा हा कार्टून व्हायलन्स आहे. इथे प्रत्येकजण मरेस्तोवर मार खाऊनही पुढल्या प्रसंगात पुन्हा लढायला उभा राहू शकतो. इथली लढाई ही मनस्थिती, छटा प्रवृत्ती आणि बाजू मांडते, जय-पराजय स्पष्ट करते. त्यापलीकडे जाऊन ती कोणाला इस्पितळात वा शवगृहात पोहोचवणार नाही. पहिल्या प्रसंगातल्या केनवर कोसळलेल्या आपत्तीवर काढलेला तोडगा इथला प्रातिनिधिक तोडगा आहे. कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच लागू होणारा.
ताकाशी मिकेने प्रसंगात ओतलेली ऊर्जा, हा क्रोजचा सर्वात लक्षणीय भाग आहे. त्याच्या एकट्या दुकट्या नायकांचं तीस चाळीस जणांबरोबर सतत लढणं वास्तव नसलं, तरी पाहण्यासारखं नक्कीच आहे. इथे प्रसंगात येण्याची शक्यता असणारा तोच तोचपणा टाळण्यासाठी दिग्दर्शकाने विनोदाचा सतत वापर केला आहे. हा विनोद प्रामुख्याने केनच्या व्यक्तिरेखेतून येत असला, तरी इतर प्रसंगातही अँब्सर्डिटी अधोरेखित करण्याच्या स्वरूपात तो अस्तित्त्वात आहे.
 सेरीझावाचं त्याच्या इन्ट्रोडक्टरी सिक्वेन्समध्ये बाईक चालवणं, किंवा गेन्जीच्या गँगसाठी मेम्बर जमविण्याच्या निमित्ताने येणारी ट्रिपल डेट यासारख्या गोष्टी चित्रपटाला कधीच गंभीर होऊ देत नाहीत, मारामा-यांची एखाद्या नृत्यासारखी न वाटणारी, परंतु उघडपणे जाणवणारी कोरिओग्राफी अन् जवळजवळ गेमिंगच्या पातळीवर नेणारं जोरजोरात वाजणारं रॉक संगीत, हे आपल्याला नवं नाही. पण चपखल बसणारं अन् खूपच प्रभावी आहे.
जपानी चित्रपटांची एक शाखा, प्रामुख्याने कुरोसावापासून सुरू झालेली, कायमच जपानी संकेत अन् पाश्चात्य प्रभाव यांची सांगड घालून काही वेगळ्या प्रकारचे चित्रपट देण्याचा प्रयत्न करीत आली. स्वतः मिके अन् त्याचा `क्रोज- एपिसोड झीरो` या शाखेचीच अद्ययावत आवृत्ती आहे. हे ओळखणं, हे देखील हा चित्रपट जाणून घेण्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. मग आपण फसवले गेल्याच्या भ्रमात राहणार नाही. चित्रपटाला मग आपण स्वीकारू शकू. तो आहे त्या स्वरूपात.
-गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP