क्रोज- एपिसोड झीरो- कावळ्यांची शाळा
>> Sunday, November 7, 2010
प्रत्येक चित्रपट हा आपल्याबरोबर संदर्भाची एक चौकट घेऊन येतो. या चित्रपटाचा प्रकार, त्याची जातकुळी यावर ही चौकट ठरत असते, अन् तो चित्रपट पाहण्याआधीच चित्रपटाच्या जाहिरातीवरून, विषयावरून , कथासारावरून ती आपल्यापर्यंत पोहोचतही असते. आपण जेव्हा अमुक चित्रपट पाहायचा असं ठरवतो, तेव्हा ही संदर्भाची चौकटदेखील आपण स्वीकारतो. अन् त्यानंतर चित्रपटाच्या दर्जाचा कस ठरवावा लागतो, तो ही चौकट गृहीत धरूनच.
माझा असा अनुभव आहे की, बहुतेकदा सामान्य प्रेक्षक काहीशा नकळतंच या नियमाला न्याय देतात. जाहिरात, वृत्तसमीक्षणं यावरून तोंडओळख झालेलाच चित्रपट ते मुळात निवडतात, अन् त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीला आपसूक एक बैठक तयार होते. जेव्हा त्यांना चित्रपट आवडत नाही, तेव्हाही ते तुलनेसाठी त्याच प्रकारचे चित्रपट निवडतात. याउलट चित्रपट जाणकार, अभ्यासक, समीक्षक हे मात्र काहीवेळा या अलिखित नियमाच्या विरोधात जातात. त्यांना सर्व प्रकारचे चित्रपट पाहण्याची गरज वाटते. पण मुळातली त्यांची व्यक्तिगत आवड त्यांना दर चित्रपटाच्या चौकटीतच विचार करू देते, असं मात्र नाही. उदाहरणार्थ वास्तववादी किंवा तत्त्वचिंतनात्मक चित्रपट आवडणारी व्यक्ती ही स्टार वॉर्ससारखा फॅन्टसी हाच गाभा असलेला चित्रपट स्वीकारू शकेल का? अन् शकली तरी त्याचा त्या विशिष्ट चित्रप्रकारासंदर्भात खोलवर विचार करू शकेल का? कठीण आहे.
असाच काहीसा अनुभव मला यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आला. खासकरून जपानी रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये असणा-या तकाशी मिके दिग्दर्शित `क्रोज- एपिसोड झीरो` चित्रपटाबाबत. जपानी चित्रपट म्हणजे आपण मुळात मिझोगुची, ओझू, कुरोसावा या दिग्दर्शकांपासून विचाराला सुरूवात करतो, अन् त्यांच्या अभिजात चित्रपटांची आठवण आपल्या मनात जागी होते. आपल्याला तसंच काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण मनात धरतो, अन् जेव्हा ती पूर्ण होत नाही, तेव्हा समोर उलगडणा-या चित्रपटाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं हे कळेनासं होतं. या विशिष्ट चित्रपटाला हजेरी लावणा-या अनेकांना हा अनुभव आला असं दिसलं. इथे त्यांचं रसिक असणं, जाणकार असणं त्यांच्या मदतीला आलं नाही, तर त्यांच्या विरोधात गेलं.
जपानी चित्रपटांना अभिजात आशयघन चित्रपटांची एक परंपरा जरूर आहे, पण मांगा कॉमिक्स आणि अॅनिम या अॅनिमेशन शैलीचा प्रभावही तिथे सातत्याने गेली अनेकवर्षे जाणवणारा आहे. हिंसाचार, भय यांना पडद्यावर आणताना या प्रभावाचा वाढता वापर दिसून येतो. घोस्ट इन द शेल (दिग्दर्शक मामारू ओशी) सारख्या अॅनिम चित्रपटांनी तो अमेरिकेपर्यंत देखील पोहोचवला आहे, अन् मेट्रिक्स मालिकेसारख्या चित्रपटांमध्ये या प्रभावाची आंतरराष्ट्रीय आवृत्तीही आपल्याला दिसून आली आहे. हिडीओ नकाता दिग्दर्शकाच्या रिंगूसारख्या चित्रपटातून जपानी भयपटही जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. हे सारं त्यामानानं हल्लीचं असलं, तरी या चित्रप्रकारांमध्ये झालेलं, होणारं काम हे विसरण्याजोगं नाही. अशा तुलनेने नव्या दिग्दर्शकांमधलं ताकाशी मिके हे महत्त्वाचं नाव. १९९१पासून कार्यरत असणारा आणि फुल मेटल याकूझा (१९९७) ऑडिशन (१९९९), वन मिझ्ड कॉल (२००३) सारख्या चित्रपटांनी जगभर माहित झालेला हा दिग्दर्शक. हिरोशी ताकाहाशीच्या क्रोज नामक अतिशय लोकप्रिय अन् हिंसक मांगा कॉमिक्सवर `क्रोज- एपिसोड झीरो` आधारित असणं, हे खरंतर आपल्याला संदर्भाची चौकट पुरवायला पुरेसं आहे. पण महोत्सवातल्या अनेकांना हा चित्रपट पाहून फसवल्यासारखं वाटलं. त्यांनी ज्या प्रकारच्या चित्रपटाची अपेक्षा केली होती, तो हा नव्हता.
एपिसोड झीरो हे खरंतर प्रिक्वल आहे. कथानकाची मूळ पार्श्वभूमी अन् व्यक्तिरेखांमध्ये कॉमिक्सशी साम्य असलं तरी कथाभाग (जो काय थोडाफार आहे तो) वेगळा आहे. पहिल्या दहाएक मिनिटांतच लक्षात येतं, की महत्त्व कथेला नाही. चित्रपटाची रचना ही एक कन्फ्रन्टेशन्सची मालिका आहे. त्यासाठी कॉमिक्सप्रमाणेच कम्प्युटर गेम्स हा देखील एक संदर्भ सहज लावण्याजोगा आहे. एका व्यक्तिरेखेने, दिलेल्या पार्श्वभूमीवर, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांशी (गेम्सच्या भाषेत सांगायचं तर बॉसेसशी) लढून सर्वात अव्वल ठरणं एवढीच इथली रचना आहे. गेन्जी (शून ओगुरी ) हा इथला नायक आहे. सुझुरान या अतिशय बदनाम शाळेत गेन्जी नव्याने भरती झालाय. फक्त मुलांसाठी असलेली ही शाळा इथल्या गुंडगिरीसाठी प्रसिद्ध आहे. सेरीझावा (ताकायुकी यामाडा) हा इथला सध्याचा बादशाहा आहे. मात्र त्याच्या खालच्या वर्गांमध्येदेखील विविध तुकड्यांवर सत्ता गाजवणारे छोटे-मोठे मासे आहेत. गेन्जीला सेरीझावापर्यंत पोहोचायचं तर यातल्या सर्व अडथळ्यांना पार करावं लागेल, अन् अखेर सेरीझावाशी टक्कर घ्यावी लागेल. मुळातच याकुझा (जपानी माफिया) बॉसचा मुलगा असलेल्या गेन्जीची हे करण्याची तयारी आहे. नव्हे, त्यासाठीच तर तो इथे आला आहे. युद्धाला तोंड फुटल्यावर गेन्जी मदत घेतो, ती केन (क्योजुकी याबे) या शाळेबाहेरच्या गुंडांची. केन फारसा डोकेबाज नाही पण स्ट्रीटस्मार्ट आहे. त्याच्या अनुभवाचा थोडाफार फायदा घेत गेन्जी सेरीझावाशी लढा द्यायला सज्ज होतो.
चित्रपटात काय वाटेल ते दाखविलंय अन् त्यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढून मोकळं होण्यासाठी आपण दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. त्यातील पहिली म्हणजे कथानकातली शाळेची योजना, अन् दुसरी त्यातल्या हिंसाचाराचं स्वरूप. इथे या दोन्ही गोष्टी दाखवताना वास्तववादी दृष्टिकोन अपेक्षित नाही. इथली काळ्या युनिफॉर्ममधल्या गुंडांनी भरलेली स्कूल ऑफ क्रोज- सुझूरान, ही खऱोखरीच्या शाळेसारखी असणं अपेक्षित नाही. ती एक सिस्टिम आहे, एक व्यवस्था आहे एवढं लक्षात घेतलं, तरी पुरे. त्यातले डावपेच, कुरघोडी, ही ढोबळमानाने कोणत्याही व्यवस्थेसंदर्भात चालण्यासारखी आहे, उदाहरणार्थ राजकीय.
थोड्याफार प्रमाणात हिंसेचेही तेच. कुंग फू हसलसारख्या चायनिज चित्रपटात किंवा टेरेन्टीनोच्या कोणत्याही चित्रपटात चालण्यासारखा हा कार्टून व्हायलन्स आहे. इथे प्रत्येकजण मरेस्तोवर मार खाऊनही पुढल्या प्रसंगात पुन्हा लढायला उभा राहू शकतो. इथली लढाई ही मनस्थिती, छटा प्रवृत्ती आणि बाजू मांडते, जय-पराजय स्पष्ट करते. त्यापलीकडे जाऊन ती कोणाला इस्पितळात वा शवगृहात पोहोचवणार नाही. पहिल्या प्रसंगातल्या केनवर कोसळलेल्या आपत्तीवर काढलेला तोडगा इथला प्रातिनिधिक तोडगा आहे. कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच लागू होणारा.
ताकाशी मिकेने प्रसंगात ओतलेली ऊर्जा, हा क्रोजचा सर्वात लक्षणीय भाग आहे. त्याच्या एकट्या दुकट्या नायकांचं तीस चाळीस जणांबरोबर सतत लढणं वास्तव नसलं, तरी पाहण्यासारखं नक्कीच आहे. इथे प्रसंगात येण्याची शक्यता असणारा तोच तोचपणा टाळण्यासाठी दिग्दर्शकाने विनोदाचा सतत वापर केला आहे. हा विनोद प्रामुख्याने केनच्या व्यक्तिरेखेतून येत असला, तरी इतर प्रसंगातही अँब्सर्डिटी अधोरेखित करण्याच्या स्वरूपात तो अस्तित्त्वात आहे.
सेरीझावाचं त्याच्या इन्ट्रोडक्टरी सिक्वेन्समध्ये बाईक चालवणं, किंवा गेन्जीच्या गँगसाठी मेम्बर जमविण्याच्या निमित्ताने येणारी ट्रिपल डेट यासारख्या गोष्टी चित्रपटाला कधीच गंभीर होऊ देत नाहीत, मारामा-यांची एखाद्या नृत्यासारखी न वाटणारी, परंतु उघडपणे जाणवणारी कोरिओग्राफी अन् जवळजवळ गेमिंगच्या पातळीवर नेणारं जोरजोरात वाजणारं रॉक संगीत, हे आपल्याला नवं नाही. पण चपखल बसणारं अन् खूपच प्रभावी आहे.
जपानी चित्रपटांची एक शाखा, प्रामुख्याने कुरोसावापासून सुरू झालेली, कायमच जपानी संकेत अन् पाश्चात्य प्रभाव यांची सांगड घालून काही वेगळ्या प्रकारचे चित्रपट देण्याचा प्रयत्न करीत आली. स्वतः मिके अन् त्याचा `क्रोज- एपिसोड झीरो` या शाखेचीच अद्ययावत आवृत्ती आहे. हे ओळखणं, हे देखील हा चित्रपट जाणून घेण्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. मग आपण फसवले गेल्याच्या भ्रमात राहणार नाही. चित्रपटाला मग आपण स्वीकारू शकू. तो आहे त्या स्वरूपात.
-गणेश मतकरी.

2 comments:
Takashi Mike is really one great director.I like his kuroshiyo alot,I don't why,but I like ot too much.Even second part of this is good,and his three Extremes was also nice,I hope you watched that too.
i am planning to write on three extremes.
that film again, is not for everyone though.
Post a Comment