क्लाउड एटलस- पाहाण्याजोगं बरंच काही

>> Monday, October 29, 2012टॉम टायक्वर आणि वाचोव्स्की भावंडं (अँन्डी आणि लाना) यांना हाय कॉन्सेप्ट आणि पडद्यावर आणायला अवघड अशा विषयावरचे चित्रपट करायची हौस असल्याचं एव्हाना सिध्द झालंय असं म्हणायला हरकत नाही. तत्कालिन उपलब्ध चित्रपट तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओलांडणारी आणि निश्चित पण प्रत्येकाला जाणवेलशी खात्री नसणारा तत्वज्ञानाचा मुलामा घेऊन येणारी मेट्रिक्स चित्रत्रयी करून वाचोव्स्कींनी आपली ताकद सिध्द केली आहे तर रन लोला रन या कथनशैलीत प्रयोग करणा-या चित्रपटातून आणि परफ्यूम या अनफिल्मेबल भासणा-या कादंबरीच्या रुपांतरातून टायक्वरला लोकप्रियता मिळालेली आहे. या दोन्ही नावांचं कल्ट स्टेटस इतकं मोठं आहे की त्यांनी एकत्र येउन केलेला चित्रपट हा आपसूकच चौकस प्रेक्षकांच्या मस्ट सी यादीवर जावा. त्यातून तो चित्रपट डेव्हिड मिचेलच्या ’क्लाउड एटलस ’ या महत्वाकांक्षी आणि विक्षिप्त शैलीतल्या कादंबरीवर आधारीत असल्यावर तर विचारुच नका.
क्लाउड एटलस सरसकट सर्वांना आवडणार नाही हे कळायला आपल्याला प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाण्याची गरज नाही. मिचेलच्या कादंबरीवरुनही ते कळू शकतं.वेगवेगळ्या गोष्टिंचं जोडकाम असणा-या कादंब-या आणि त्याच पठडीतले चित्रपट आपल्याला परिचित आहेत ,पण बहुधा या कलाकृतींमधे स्वतंत्र गोष्टींना जोडणारा धागा हा मजबूत असतो. इथेही तसा धागा आहे ,मात्र तो किती मजबूत आहे हे ज्याचं त्यानं ठरवावं, कारण तो चटकन दिसून येत नाही. कादंबरी ही आपल्या भूतकाळापासून संभाव्य भविष्यकाळापर्यंतच्या काही शतकांच्या कालावधीत घडणा-या सहा गोष्टी सांगते.
एका जहाजावर झालेली एक नोटरी आणि एक गुलाम यांची मैत्री (१८४९), एका होमोसेक्शुअल बेल्जिअन संगीतकाराने समाजाशी बंड पुकारुन आपलं प्रेम आणि संगीत जपण्याचा केलेला प्रयत्न (१९३६), एका अमेरिकन वार्ताहर मुलीने भ्रष्ट उद्योगपतीचा उधळलेला डाव (१९७३),मनाविरूध्द वृध्दाश्रमात अडकून पडलेल्या प्रकाशकाने आखलेली पलायन योजना (२०१२), भविष्यातल्या कोरिआत एका यंत्रमानव वेट्रेसने आपल्या परिस्थितीच्या विरोधात उठवलेला आवाज (२१४४) आणि अखेर पृथ्वीच्या अस्तकाळात एका आदिवासीच्या मदतीने परग्रहवासीयांना घातलेली मदतीची साद (२३२१) अशा या गोष्टी आहेत. गोष्टींचा काळ तर त्यांच्या दृश्य रूपात प्रचंड फरक आणून ठेवतोच पण त्यापलीकडे या गोष्टींचा प्रकारही वेगवेगळा आहे. ऐतिहासिक ,काव्यात्म, साहसप्रधान, विनोदी, विज्ञान कथा , फँटसी असा प्रत्येक भागाचा सूरही एकमेकांशी सुसंगत नाही. पुस्तकात भूतकाळापासून भविष्याकडे जात या सहाही कथांचे पूर्वार्ध आपल्याला सांगितले जातात आणि मध्यावरुन पुढे उलट क्रमाने एकेक गोष्ट पूर्ण केली जाते. त्या कथांमधेच एकमेकांना जोडणारे काही दुवेही पाहायला मिळतात. तरीही ,हे पुस्तकाचं एकूण स्वरुप पाहिलं ,तर या सर्व गोष्टींना एकत्र करत एकसंध अनुभव देणं किती कठीण आहे ,हे लक्षात यावं.
रूपांतर करताना दिग्दर्शक त्रयीने कथेबरहुकूम योग्य ते चित्रप्रकार वापरले आहेत मात्र जोडकामात त्यांनी एक महत्वाचा बदल केला आहे जो चित्रपटाचा परिणाम पुस्तकाहून वेगळा ठरवायला पुरेसा आहे. हा बदल गोष्टींचा सुटेपणा काढून त्यांना चित्रपटाला योग्य असं एकजिनसी स्वरुप आणून देतो हे खरं ,पण त्यामुळे तो कथानकातली वरवरची गुंतागुंत इतकी वाढवतो ,की सहज ,गंमत म्हणून चित्रपटाला आलेला प्रेक्षक गांगरुन जावा. पुस्तकात गोष्टी या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात विभागल्या जातात पण चित्रपटात त्यांचे असंख्य तुकडे होतात. चित्रपट हा एका वेळी कोणत्याही गोष्टीवर बराच काळ रेंगाळत नाही, तर तो सतत वेगवेगळ्या गोष्टींवर उड्या मारतो. या उड्या घेताना चित्रपटाने जे तर्कशास्त्र वापरलंय ते पुस्तकाशी जराही संबंधित नाही. पण ते समजून घेण्याआधी आपण आणखी एका गोष्टीचा विचार करायला हवा आणि तो म्हणजे या गोष्टीना जोडणारं सूत्र.
माझ्या मते ही खरं तर दोन सूत्र आहेत . पहिलं सूत्र सांगतं ,की माणूस हा कधीच एकटा नसून समूहाशी बांधला गेलेला असतो.त्याच्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट ,ही त्याला त्याच्यापुरती ,व्यक्तिगत वाटली तरी ती तशी नसते. तिचे पडसाद हे अवकाश आणि काळ या दोन्ही प्रतलांवर उमटतच असतात. हे सूत्र टायक्वरच्या रन लोला रन मधल्या सूत्राशी सुसंगत आहे ,हा अपघात नसावा. दुसरं सूत्र आहे ते काहीसं वाचोव्स्कींच्या तत्वज्ञानाशी संबंधित. ते सांगतं की माणूस हा पुन्हा पुन्हा त्याच जागी येत असतो. कधी त्याच आयुष्यात असेल ,तर कधी दुसर््या. जन्मांतरात माणसाचा आत्मा टिकून राहातो मात्र त्याच्यात बदल होत असतात. ते भल्याकडे जाणारे वा वाईटाकडे यावर त्या आत्म्याचं मोल अवलंबून राहातं. हे सूत्र पुस्तकात तितकं स्पष्ट नाही ,पण चित्रपटात ते जाणवतं याचं कारण त्यातली पात्रयोजना.
क्लाउड एटलसचा नटसंच पराकोटीचा दर्जेदार आहे. इतका ,की त्यातल्या सा-यांचा यथायोग्य वापर करणं चित्रपटाला शक्य होत नाही. टॉम हँक्स, हॅली बेरी, ह्यू ग्रान्ट, सुजन सरन्डन हे आपल्यालाही चांगलेच परिचित मोठे स्टार्स आहेत. त्याशिवाय बेन विशॉ,जिम स्टर्जेस, जेम्स डार्सी, डूना बे असे आपल्याला फार माहीत नसणारे पण सध्या स्टारपदाच्या उंबरठ्यावरले तरुण अभिनेते/त्री आहेत. त्याबरोबरच ह्यूगो विव्हींग , कीथ डेविड आणि जिम ब्रॉडबेन्ट हे नावाजलेले चरित्र अभिनेते आहेत. आता क्लाउड एटलस करतो काय तर दर गोष्टीत एखादा मोठा स्टार आणि इतर लहान मोठे नट घेण्याऐवजी तो जवळजवळ प्रत्येक गोष्टीत बसतील त्या सा-यांना घेतो. त्यामुळे लहान भूमिकांनाही मोठे स्टार मिळतात आणि अभिनेते रिपीट करण्याच्या पायंड्यामुळे त्यांना एकापेक्षा अधिक प्रमुख भूमिकांमधे कास्ट करुन वर सांगितलेल्या दुसर््या सूत्राशी संबंधित आशयाला जागा करता येते. यातल्या प्रत्येक नटाच्या सर्व भूमिका या एकाच व्यक्तिचा पुनर्जन्म आहेत इतका बाळबोध अर्थ मी काढणार नाही, मात्र त्याच प्रकारच्या मूळ प्रवृत्ती असणा-या व्यक्तिंची ही रुपं आहेत असं इथे सूचित होतं . या व्यक्तिंना पडणारे पेच , त्यावरची बदलती उत्तरं ही या योजनेमुळे निश्चित अर्थ धारण करतात .
उदाहरणार्थ टॉम हँक्सची व्यक्तिरेखा ही पहिल्या कथेत पूर्ण नकारात्मक ठरते , त्यानंतरच्या भूमिकांत वेगवेगळ्या छटा येत जातात. शेवटच्या भूमिकेपर्यंत ती आपल्या काळ्या बाजूशी पूर्ण सामना करायला तयार होते. हँक्स आणि बेरी ही जोडी दोन कथांमधे एकत्र येते . एकाचा शेवट शोकांत होतो ,तर दुस-याचा सुखांत. हेच स्टर्जेस आणि बे बाबतही होतं.ह्यूगो विव्हिंग मात्र आपल्या मेट्रिक्स मधल्या कुप्रसिध्द एजन्ट स्मिथ या व्यक्तिरेखेला जागून सर्व कथांमधे खलनायकी छटांतच दिसतो.या पध्दतीने ,या व्यक्तिरेखा आणि त्यासाकारणारे कलाकार यांच्यात दिग्दर्शक एक पॅटर्न तयार करतात. हा पॅटर्न त्या कथानकांमधे पुस्तकात न दिसणार््या जागा नव्याने तयार करतो ,ज्या जागा चित्रपटात कथाबदल साधताना वापरल्या जातात.याबरोबरच इतरही मुद्दे या कथांमधल्या जोडकामात वापरले जातात. उदाहरणार्थ प्रसंगांमधल्या पेचामधलं साम्य, संकल्पनांची पुनरावृत्ती, संवादांमधे दिसणारं साधर्म्य ,इतरही काही...
हे सारं वाचून असं वाटण्याची शक्यता आहे की हा काहीतरी फार गुंतागुंतीचा चित्रपट आहे जो बहुधा डोक्यावरुन जाईल. बहुधा भारतीय वितरकांनाही तसंच वाटलं असावं नाहीतर हे दिग्दर्शक आणि हा नटसंच असणारा सिनेमा त्यांनी इतक्या थोड्या ठिकाणी प्रदर्शित केला नसता. पण हे एका मर्यादेत खरं आहे. चित्रपट हा एका पातळीवर खरोखर गुंतागुंतीचा आहे आणि त्यातले सारे तपशील, मेक अप च्या चमत्कारांखाली (आणि चमत्कार खरेच. यात साध्या विग आणि वेषभूषा बदलण्यापासून कृष्णवर्णीयांना गोरं आणि गो-यांना एशिअन करण्यापर्यंत सर्व प्रकारचे चमत्कार आहेत जे अनेकदा माहितीच्या कलाकारांनाही अपरिचित करुन सोडतात) दडलेले सारे अभिनेते , कथाबदलामागची दरेक स्ट्रॅटेजी हे एकदा पाहून कळणं अशक्य आहे. मात्र त्यातल्या ढोबळ संकल्पना ,आकार ,गोष्टींमधे स्वतंत्रपणे दिसणारा आणि सरासरीत दिसून येणारा आशय हे ध्यानात घेतल्यास ,हा चित्रपट वाटतो तितका अवघड राहाणार नाही.
आणि हे सारं बाजूला ठेवूनही त्यात दोन हुकूमी गोष्टी आहेतच.पहिली आहे ती या दृश्य भागावरल्या हुकूमतीसाठी नावाजलेल्या दिग्दर्शकांनी दर भागाच्या आशयाला ,संवेदनशीलतेला आणि सुसंगत चित्रप्रकाराला अनुसरुन घडवलेलं दर भागाचं दृश्यरुप आणि दुसरी आहे ती हँक्स पासून सार््यांनी प्रायोगिक नाटकात काम केल्याच्या उत्साहानी सर्व भूमिकांमधे , त्यांच्या लांबी -व्याप्तीकडे न पाहाता आोतलेले प्राण. केवळ या दोन गोष्टिही मला हा चित्रपट पाहाताना पूर्ण समाधान देणा-या आहेत. बाकी सारा बोनस!
- गणेश मतकरी

6 comments:

विशाल विजय कुलकर्णी October 30, 2012 at 12:00 AM  

खुप जणांकडून ऐकलेय या चित्रपटाबद्दल. आता तर त्यावर शिक्कामोर्तबच झाले. बघायलाच हवा आता. :)
धन्यवाद परीक्षणाबद्दल !

Vivek Kulkarni October 30, 2012 at 8:02 AM  

तुम्हाला हा चित्रपट खूपच आवडलेला दिसतो. बघावा लागेल पण चित्रपटातल्या आशयासाठी नाही तर त्या तीन दिग्दर्शकाकरिता.

lalit October 30, 2012 at 11:16 AM  

मला माहित होत कि तुम्ही ह्या चित्रपटा बद्दल जरूर लिहाल म्हणून आणि मी त्याची वाट देखील बघत होतो. त्यातील तुम्ही मांडलेली दोन सूत्र त्या दिग्दर्शकाशी पूर्णत: सुसंगतीत आहे ( run lola run ). आणि ह्या दिग्दर्शकांचे चित्रपटांची खोली खूपच असते. तुमचे लेख येथे मार्गदर्शक ठरतात आणि हाही लेख खूप छान लिहिला आहे तुम्ही.

32 February 5, 2013 at 1:20 PM  
This comment has been removed by the author.
32 February 5, 2013 at 1:23 PM  

गणेश सर,
सुंदर विवेचन!
वाचोव्स्की भावंडे आणि टॉम टायक्वर हे हॉलीवूड मध्ये असणाऱ्या "तरुण" किंवा नाविन्यपूर्ण चित्रपट देणारे त्रिकूट आहे. त्यांनी एकत्र येऊन असे काही काम करावे, हे म्हणजे माझ्यासारख्या चाहत्याला पंचपक्वान्नाचे जेवण! Visually अत्यंत नेटका आणि रंग असो, दृष्य्परिणाम असो, अथवा संपूर्ण "crafting" असो, अत्यंत विचारपूर्वक मांडणी दिसून येते. आपण म्हटल्याप्रमाणे, मूळ पुस्तकाच्या परिणामापेक्षा, चित्रपट ह्या माध्यमाची ताकद वापरून तीनही दिग्दर्शकांनी एक सुंदर "चित्रकृती" तयार केली आहे.
पार्श्वसंगीताचा उत्तम वापर आणि त्यामध्ये सुद्धा असलेला टॉम टायक्वर चा सहभाग हे चित्रपटाच्या संकल्पनेशी असलेली दिग्दर्काची समरसता दाखवते असे माझे मत आहे.

वैयक्तिक पातळीवर मला हा सिनेमा, संकल्पना आणि कलाकारांचा वेगवेगळ्या कथानाकांमध्ये केलेला वापर आणि त्यातून दिसणारे "तत्त्वज्ञान" किंवा आपण म्हणाला आहात तसे "सूत्र" ह्या सर्व जमेच्या बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडल्याने अधिकच आवडला! पण महत्त्वाचे म्हणजे, चित्रपट हा निव्वळ एक प्रदर्शनीय किंवा दर्शनीय माध्यम न राहता अनेक विषय, आशय स्पर्शून एका नव्या जगाची, शक्यतेची सफर घडवणारा असतो हे अनेक वर्षांनी ह्या चित्रपटाद्वारे जाणवून आले! सुंदर चित्र अनुभव!

आपल्या उचित विश्लेषणाबद्दल आभार!

अनीश प्रभुणे. (३२)

myhuonglequyen April 13, 2020 at 12:32 AM  

Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!

Giaonhan247 chuyên dịch vụ vận chuyển hàng đi mỹ cũng như dịch vụ ship hàng mỹ từ dịch vụ nhận mua hộ hàng mỹ từ trang ebay vn cùng với dịch vụ mua hàng amazon về VN uy tín, giá rẻ.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP