मटरु की बिजली का मन्डोला - भारद्वाजी विनोद

>> Monday, January 21, 2013



एक गाव . त्यात खूप सारी माणसं. बरीच नुसत्या विनोदी वळणाची. पण काही विनोदी असूनही  दुष्प्रवृत्त. मग त्यात नेहमीचे टाईप्स. भोळी जनता, नेते, उमराव, राजकारणी, झालंच तर आपल्या ओळखीच्या नरेटीव साच्यात बसणारे नायक, नायिका, खलनायक, एखाद्या अवघड प्रश्नाकडून सोप्या सुखान्ताकडे सुखेनैव प्रवास करणारी संहिता, हे सारं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत असेल तर त्यात आश्चर्य नाही. गेली अनेक वर्ष प्रियदर्शन हा लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक आपल्याकडे या फॉर्म्युलात बसणारे चित्रपट देतो आहे. मोजके प्रमुख नट आणि लहान भूमिकांमधेही उत्तम चरित्र अभिनेते घेण्याचा सपाटा लावून त्याने हा चित्रप्रकार पेटन्ट केला आहे असं म्हणणंही अतिशयोक्ती होउ नये.
मात्र त्याच्या चित्रपटांमधे ( ब-याच प्रमाणात) करमणूक असूनही त्यांचा असा  एक प्रॉब्लेम आहेच जो आपल्याकडल्या बहुतांशी हिंदी चित्रपटामधे पाहायला मिळतो. तो म्हणजे कथा निर्वातात घडणं.  एकदा सेट अप ठरला की पात्रांचं काम हे केवळ आपापसात विविध प्रकारचे गोंधळ निर्माण करणं इतकंच उरतं. त्यांच्या वागण्याबोलण्याला कसलेच संदर्भ उरत नाहीत. ते कोणत्या प्रदेशात राहातात, त्यांची विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे, त्यांच्या भूमिकेमागे काही जागतिक संदर्भ आहे का? असा कसलाच विचार या व्यक्तिरेखांच्या म्हणजे खरंतर या चित्रकर्त्यांच्या मनाला शिवलेला दिसत नाही. तो या चित्रपटात शिवतो ,हा विशाल भारद्वाजच्या 'मटरु की बिजली का मन्डोला' चा विशेष.
मटरू मधे नावापासून असलेला वेगळेपणा , त्याचा तरुणांना आवडण्याजोगा नटसंच ,स्वतः विशाल भारद्वाजचं तारांकित नाव आणि भाराभर प्रमोशन पाहाता, लोकांच्या चित्रपटाकडून फार प्रचंड अपेक्षा होत्या आणि जेव्हा अशा अपेक्षा असतात ,तेव्हा बहुतेक वेळा चित्रपट निराशा करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. त्या नियमाला अनुसरुन बहुतेक प्रेक्षकांनी तो कसा सुमार चित्रपट आहे आणि कसा भारद्वाजच्या किर्तीला शोभणारा नाही याविषयी ताशेरे ओढले. वर्तमानपत्रांमधेही उलटसुलट परीक्षणं आली. काहींना हे भारद्वाजने डाव्या अंगाने केलेलं हे अत्युच्च स्टेटमेन्ट वाटलं तर काहींना ही एक मोठीच बनवाबनवी वाटली. मी स्वतः जेव्हा तो बघायला गेलो ,तेव्हा हे सारं मला माहीत होतं.
गुलजारचा शिष्य असणारा विशाल भारद्वाज हा आपल्या कामात गुलजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो असं दिसतं. साहित्यावर आधारित वा तसे नसतानाही साहित्यिक वळणाचे विषय, आपल्या चित्रपटांमधे फारसं न पाहायला मिळणारे विक्षिप्त दृष्टीकोन आणि स्वतंत्र तर्कशास्त्र, लोकप्रिय व्यावसायिक कलावंतांचा वेगळ्या व्यक्तिरेखांमधे वापर , उत्तम लिहिलेली ( बहुधा गुलजारनेच) गाणी ,हे आणि यासारखे अनेक घटक आपण भारद्वाज आणि गुलजार या दोघांच्याही चित्रपटात असतात. मात्र भारद्वाजचे चित्रपट हे अधिक श्रीमंती  निर्मितीमूल्य घेऊन येतात. गुलजारला साधेपणा चालतो,हे त्याच्या कथानकांच्या छोट्याशा जीवापासून छायाचित्रण शैलीपर्यंत अनेक गोष्टीत जाणवतं.भारद्वाजला छानछोकी लागते. व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाईफ असाव्या लागतात, पटकथा काही प्रमाणात प्रयोग करणारी असावी लागते, दृश्यशैली ठाशीव असावी लागते आणि स्टार्सही अधिक ग्लॅमरस. त्यात भर म्हणून गेल्या काही दिवसात तो चित्रप्रकारांमधेही वैविध्य आणण्याचा प्रयत्न करतोय. कमीने मधल्या निओ न्वार नंतर आता त्याचा हेतू सरळ विनोदी चित्रपट करण्याचा आहे . मात्र भारद्वाजने करायला घेतल्यावर तो फार सरळ राहाणार नाही हेदेखील उघड आहे.

मटरु मधे कथानक महत्वाचं नाही ,किंबहुना ते बरचसं आँटो पायलटवर आहे. त्यात कोण अडचणीत आहे, कोणाचं प्रेम कोणावर आहे, कोणाचं ह्रदयपरीवर्तन होणार , कोणाचा जय होणार हे सगळं ठरल्यात जमा आहे. मग महत्व आहे कशाला ,तर ते मूळ सेटअप ला आणि व्यक्तिरेखा रंगवण्याला. मूळ सेटअपला अशासाठी की तो या पुढल्या फार्ससाठी एक ब-यापैकी बैठक तयार करतो. ही बैठक वास्तववादी नाही, पण ती वास्तव जाणते. तिला वैचारीक आधार आहे. आणि व्यक्तिरेखांना महत्व अशासाठी की त्या तद्दन खोट्या असल्या तरी विशिष्ट प्रवृत्तींचं दर्शन योग्य प्रकारे करतात.

हरयाणामधल्या मन्डोला नामक कल्पित गावी हे कथानक घडतं. गावचा जमीनदारदेखील( पंकज कपूर) मन्डोला हेच नाव लावतो. मन्डोलाची योजना ही गावातल्या कर्जबाजारी शेतक-यांच्या जमिनीवर कब्जा करुन तिथे स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या कलमानुसार औद्योगिक शहर उभारणी करण्याची आहे. या योजनेत मदत व्हावी म्हणून तो राजकारण्यांना ( शबाना आझमी आणि आर्यन बब्बरने उभा केलेला तिचा रणजित, शक्ती कपूर परंपरेतला इरिटेटिंग मुलगा ) हाताशी धरुन आहे. मोबदल्यात आपली मुलगी बिजली ( अनुष्का शर्मा) त्यांच्या घरी सून म्हणून पाठवण्याची  त्याची तयारी आहे. यात अडचणी दोन आहेत. पहिली म्हणजे मन्डोलाची सदसदविवेकबुध्दी जी त्याने दारुला स्पर्श करताच उफाळून येउन  मन्डोलाला  सद्वर्तनी समाजवादी होऊन शेतक-यांची बाजू लढवायला लावते ( ही व्यक्तिरेखा चॅप्लिनच्या  सिटी लाईट्समधल्या दारू पिताच आमूलाग्र बदल घडून येणा-या श्रीमंतासारखी असणं हा योगायोग नसावा) .आणि दुसरी अडचण म्हणजे वकील असून कर्जफेडीसाठी मन्डोलाकडे ड्रायवर आणि हरकाम्याची नोकरी करणारा मटरु ( इम्रान खान ), ज्याचा गावात राहाण्यामागचा हेतू काहीतरी वेगळाच असावा.

'मटरू'चा जीनीअस हा त्याच्या मूळ कल्पनेत आहे जी वरवर गावाकडल्या काॅमेडीचा आव आणत आपल्या ग्रामीण राजकारणी धोरणावर ताशेरे आेढते, मात्र हाच जीनीअस संहितेच्या मांडणीत टिकत नाही. चित्रपट सुरु होताच आपल्याला भास व्हायला लागतो तो संहितेवरचं काम कमी पडल्याचा. अनावश्यक पात्रांचा भरणा, नीट न बांधलेले सैल प्रसंग, विशाल भारद्वाजपेक्षा डेव्हिड धवनच्या चित्रपटात शोभण्याजोगे विनोद, पात्रांमधे न दिसणारं सातत्य ( उदाहरणार्थ सुरुवातीला ड्रायवर असलेला मटरु पुढल्या भागात ते काम सोडून सर्व काही करताना दिसतो) या गोष्टी पाहून वाटतं की बहुधा पुनर्लेखनाचा कंटाळा करुन दिग्दर्शकाने संहितेच्या पहिल्या ढाच्यावरच काम केलेलं दिसतंय. चित्रपट पुढे सरकतो तेव्हा हे अधिक स्पष्ट होत जातं.

मात्र वेळोवेळी असेही प्रसंग येत राहातात जे आपल्याला दिग्दर्शकाच्या शैलीची आेळख देतात, त्यातल्या विनोदामागे दडलेलं वास्तव समोर आणतात , व्यावसायिक दृष्टीकोनाला बाजूला सारत मनाला येईल ते करत टिकून राहण्यामागची हिंमत दाखवतात. मन्डोलाच्या स्वप्नात असणारं शेतांना हटवून होणा-या प्रगतीचं चित्रण आणि त्यावर येणारं मन्डोलाचं स्वगत ,हा एकच प्रसंग माझा मुद्दा स्पष्ट करायला पुरेसा व्हावा. दुर्दैवाने अशा जागा जितक्या प्रमाणात हव्या तितक्या प्रमाणात येत नाहीत आणि चित्रपट ज्या पातळीवर पोचू शकला असता त्या पातळीवर पोचू शकत नाही.

चित्रपट आशयाबरोबर विनोदातही वेळोवेळी रेंगाळण्यामागचं एक कारण म्हणजे सारा डोलारा पेलण्याचं एकट्या पंकज कपूरवर पडलेलं काम. तो ते उत्तमरीत्या करतो मात्र तो नसणारे प्रसंगही अनेक आहेत ,जे ना इम्रान खान सावरु शकत ना अनुष्का शर्मा. कदाचित अजय देवगण असता तर परिस्थिती थोडीफार सुधारली असती , मात्र थोडीफारच. कारण मुळात या भूमिका लिहितानाही डाव्या हाताने लिहिलेल्या आहेत. किंबहुना त्या तशा असणं हेही देवगण जाण्यामागचं कारण असू शकेल.

मात्र हे सारं असूनही मटरु की बिजली का मन्डोलाने मला पुरतं निराश मात्र केलं नाही. भारद्वाज काय करु पाहातोय हे मी समजू शकत होतो. त्यातल्या चांगल्या विनोदाला हसू शकत होतो. त्यामागचा विचार आेळखू शकत होतो. भारद्वाजच्या इतर चित्रपटांबरोबर तुलना करता हा चित्रपट त्यामानाने कमी पडतो यात वादच नाही, पण तशी तुलना करणं मला आवश्यक वाटली नाही. अनेक विनोदी चित्रपट केवळ त्यातला बाश्कळपणा प्रेक्षकापुढे ठेवून हिट होत असताना , काही अजेन्डा असलेला चित्रपट  कधीही अधिक परवडेल असं मी समजतो.
- गणेश मतकरी 

6 comments:

Anonymous,  January 21, 2013 at 2:38 AM  

अनेक विनोदी चित्रपट केवळ त्यातला बाश्कळपणा प्रेक्षकापुढे ठेवून हिट होत असताना , काही अजेन्डा असलेला चित्रपट कधीही अधिक परवडेल असं मी समजतो.
१०० वेळा मान्य

attarian.01 January 23, 2013 at 2:34 AM  

होपलेस सिनेमा आहे . विशाल भरद्वाज चा आहे . म्हणून गेलो .इंटरवल ला उठून आलो .विशाल भारद्वाज चा लागोपाठ दूसरा न आवड नारा सिनमा . सात खून माफ़ ही आवडला नाही

Jagruti's space January 27, 2013 at 12:31 PM  

सिनेमाचा शेवट सोडला तर खुप आवडला सिनेमा ...आणि समीक्षण पटलं :)

32 February 4, 2013 at 5:52 PM  

गणेश सर,
चित्रपट आणि त्यावरील परीक्षण दोन्हीही आवडले. विशाल भारद्वाज स्वतःची एक ठराविक "चौकट" किंवा आजकाल ज्याला "इमेज" म्हणतात, त्यापेक्षा काही निराळे प्रयोग करू पाहत आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अनेकदा, दुर्दैवाने, एकाच शैलीची भुरळ दिग्दर्शकाला पडते किंवा प्रेक्षकांची अपेक्षा असते की एखाद्याने आजवर केलेला मार्गच चालवा. एखाद्या नव्या प्रयत्नाचे स्वागत होतेच असे नाही आणि तो तितका यशस्वीपणे जमतोच असाही नाही. तरीही विशाल भारद्वाज यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
आपले "विवेचन" नक्कीच आवडले.

जाता जाता एक "पुणेरी शंका"

आपण म्हणाला आहात "उत्तम लिहिलेली ( बहुधा गुलजारनेच) गाणी" - ही खोचक टीका का खरोखरच नसलेली माहिती?

ganesh March 21, 2013 at 2:21 AM  

Actually neither. Most songs from most of his films are written by Gulzar, but there maybe something I have missed, but it's too fine a detail to check and in this context, ultimately unimportant. so bahudha, is used for mostly, which is a fact.

आनंद पत्रे July 6, 2013 at 9:36 AM  

सिनेमाला पहिल्या २०-३० मिनिटात सहन केलं की पुढे अत्यंत सुंदर अनुभव आहे... अर्थात शेवटाचे आपले तर्क जुळून "आल्याने" थोडीफार निराशा होते.. बाकी लेख आणि सिनेमा दोन्हीही १००% पटले..

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP