लुटेरा - एका तिकिटात दोन !

>> Monday, July 8, 2013



विक्रमादित्य मोटवानीच्या 'उडान' ची निर्मिती, अनुराग कश्यप या हिंदी नवचित्रपटांच्या गुरूने केली आणि त्याचं कॅन चित्रपटमहोत्सवात प्रदर्शन झालं. ही एक गोष्टदेखील विक्रमादित्य मोटवानीला नव्या पिढीचा आयकाॅनिक दिग्दर्शक बनवण्यासाठी पुरेशी ठरणारी आहे. मला स्वतःला उडान फार आवडला नव्हता. म्हणजे तो आपल्या व्यावसायिक चित्रपटांपासून वेगळा आणि मोटवानीचे संजय लीला भन्सालीचा सहाय्यक असतानाचे दिवस पुसून टाकणारा होता हे खरच आहे, पण तो मोनोटोनस आणि कंटाळवाणाही होता. त्यातलं वातावरण, वास्तवाचा आभास वगैरे मात्र बर््यापैकी  होतं , आणि हा चित्रपट फार जमला नसतानाही पुढल्या चित्रपटांमधे तरी हा दिग्दर्शक आपला प्रभाव टाकू शकेल अशी शक्यता दिसत होती. मध्यंतरी मी लुटेराची ट्रेलर पाहिली. ती मला इन्टरेस्टिंग वाटली आणि लुटेरा येईल तेव्हा पाहायचा असं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे तो पाहिलाही.

लुटेरामधे जाणवण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे मोटवानीचा रिबाउन्ड. हा चित्रपट पाहाताना आपण उडानच्या दिग्दर्शकाचा पुढला चित्रपट पाहातो आहोत हे कळायला मार्ग नाही. उलट दिग्दर्शकावरचा भन्सालीचा प्रभाव मात्र चटकन दिसणारा आहे. भन्सालीचे अनेक ट्रेडमार्क इथे आहेत. परकीय कथानकावर चित्रपट आधारीत असणं, त्याला लावलेली अनावश्यक आणि मूळ कल्पनेला फाटा फोडणारी जोड, अभिनेत्यांच्या स्टार इमेजमधे अडकणार््या व्यक्तिरेखा, सरळ कथानक मांडण्यापेक्षा आपल्या दिग्दर्शकीय हुशारीला आणलेलं महत्व, गाण्यांपासून चतुर संवादांपर्यंत व्यावसायिक चित्रपटांची उघड लक्षणं, पूर्णतः निर्वातात घडणारं- आपल्या वर्तमानाशी ( किंवा खरं तर भूत भविष्याशीही ) संबंध नसणारं कथानक वगैरे, वगैरे. आता उडान सारख्या आधुनिक संवेदना जपणार््या चित्रपटानंतर असा-असा चित्रपट या दिग्दर्शकाने का करावा, याचं उत्तर बहुधा व्यावसायिक दृष्टीकोनाशी जोडलेलं असावं. कारण महोत्सव आणि पारितोषिकं एका जागी आणि व्यावसायिक यश दुसर््या. त्या व्यावसायिक यशाचा दिग्दर्शकाने केलेला पाठपुरावा म्हणजेच 'लुटेरा'.

पुढे जाण्याआधी माझ्या एका मित्राने या चित्रपटाविषयी केलेली एक कमेन्ट नोंदवावीशी वाटते. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मध्यंतरापर्यंतचा चित्रपट आवडला पण पुढल्या भागाचा कंटाळा आला. गंमतीचा भाग हा, की मुळात ज्या आे हेन्रीच्या गोष्टीवर हा चित्रपट बेतला आहे त्या' द लास्ट लीफ' चं कथानक इथे आहे ते उत्तरार्धातच आणि हाच भाग जर प्रेक्षकाना कंटाळवाणा वाटत असेल तर मुळात ही कथा निवडण्यात तरी गोंधळ आहे, किंवा रुपांतरात तरी. साहित्यकृतीवरुन ( किंवा खरं तर कोणत्याही गाजलेल्या कलाकृतीवरुन) केलेलं रुपांतर ही एक अवघड गोष्ट असते आणि ते काय प्रकारे केलं जावं याला काही तर्कशास्त्र असावं लागतं. मध्यंतरी मराठी रंगभूमीवर चेकाॅव्हच्या एका कथेला दुसर््या अंकात जसंच्या तसं ठेवून तिला पहिला अंक जोडण्याचा प्रयत्न झाला होता. भन्सालीने आपल्या 'ब्लॅक' चित्रपटात हेलन केलर च्या आयुष्यावर आधारित 'द मिरॅकल वर्कर' हा चित्रपट पूर्वार्धात वापरुन त्याला उत्तरार्धात चमत्कारिक जोड लावण्याचा प्रयत्न केला होता. लुटेरा मधेही असाच प्रकार आहे. आणि वर उल्लेखलेल्या दोन ठिकाणी ज्या अडचणी आल्या त्याच प्रकारच्या अडचणी इथेही आलेल्या आपल्याला दिसतात.

लेखक जेव्हा स्वतंत्र कलाकृती घडवतो, तेव्हा तो तिचा पूर्ण विचार करतो. जेव्हा तो या कलाकृतीचा विशिष्ट कालावधी, विशिष्ट प्रसंगरचना किंवा व्यक्तिरेखांची विशिष्ट वजनं निवडतो तेव्हा त्याला एक निश्चित परिणाम अपेक्षित असतो. जेव्हा अशा कलाकृतींची रुपांतरं होतात, तेव्हा लेखकाचा हा विचार रुपांतरकर्त्यांनीही गृहीत धरावा अशी अपेक्षा असते. मात्र वर पाहिलेल्या सार््या उदाहरणांमधे रुपांतरकर्ते म्हणतात, की चला, आपल्याकडे चांगला जमलेला भाग आहे ना, मग तो आपण तसाच ठेवू आणि कमी पडलेल्या लांबीवर तोडगा म्हणून कथानक पुढे किंवा मागे वाढवत जाऊ. आता जेव्हा ही जोड लावली जाते तेव्हा बर््याचदा मूळ कलाकृतीचा पोत आणि या नव्या रचनेचा पोत यांमधे खूप फरक पडतो. त्यांचा वेग , केंद्रस्थानी येणारी घटना, कथेचा फोकस हे सारं हलतं आणि तयार होणारा हायब्रीड  मूळ कलाकृतीवर अन्याय करणारा, तिला अनावश्यक ठरवणारा होउन बसतो. ' लुटेरा' मधे काहीसं हेच होतं.

इथे आपल्याला स्वच्छ दिसतं की चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा पोत, मुद्दा, शैली हे सारं पूर्णपणे वेगळं आहे. पहिल्या भागात आपल्याला दिसते ती अतिशय अतिशय पारंपारिक पध्दतीची प्रेमकथा आणि तिच्या शेवटी येणारा तितकाच पारंपारिक विश्वासघात.

साल १९५३. करोडोंची संपत्ती आणि जमीनजुमला असणारा एक भाबडा, सज्जन, प्रेमळ (!) जमीनदार. त्याला एकुलती एक मुलगी पाखी ( सोनाक्षी) . त्यांच्याकडे काही कामानिमित्त वरून ( रणवीर सिंग) नावाचा तरुण आपल्या एका मदतनीसासह येउन राहातो. पाखी आणि वरुनचं प्रथेनुसार प्रेम जमतं. सज्जन जमीनदार काही विरोधबिरोध करत बसत नाही. मात्र वरुनचाच काही वेगळा बेत असतो. प्रेम असूनही त्याला पाखीचा आणि तिच्या वडिलांचा विश्वासघात करणं भाग पडतं. मात्र या दोघांची गाठ पुन्हा पडते. या नव्या भेटीत काही नवीनच नाट्य उलगडतं आणि प्रेमकथेला एक वेगळं वळण मिळतं.

हे ढोबळ कथानक पाहिलं तरी यातला पूर्वार्ध- उत्तरार्धाचा जाॅईन्ट दिसून येतो आणि पटकथेतली गडबड आपल्या लक्षात येऊ शकते. पहिला भाग हा तसा रंजक वळणाचा, बाॅलिवुड प्रेमकथेची सारी वैशिष्ट्य सांगणारा ( साल कोणतं का असेना , बाॅलिवुड प्रेम म्हणजे बाॅलिवुड प्रेम), घटनांना प्राधान्य असणारा, काहीसा प्लेझन्ट, थोडा विनोद- थोडं रहस्य असणारा आहे. त्याला गती आहे आणि ही गती उत्तरार्धात टिकेल अशी अपेक्षा तो तयार करतो. मात्र ती अपेक्षा उत्तरार्धात पुरी होणं शक्य होत नाही कारण ही गती आे हेन्रीच्या कथेमधे नाही. ती कथा काहीशा हळव्या प्रेमाची, एक आजारी तरुणी अन तिची काळजी असणारा एक तरुण यांची आहे. काहीशी मूडी पण बरीचशी दुःखी , घटनांपेक्षा व्यक्तिरेखांवर भर देणारी आहे. या लेखकाच्या कथांमधे आढळणारं धक्कातंत्रही इथे आहे मात्र हा धक्का केवळ लघुकथेला पुरणारा आहे. तो या वजनाच्या मोठ्या चित्रपटाला पुरेलसा नाही. परिणामी लुटेरा हा पूर्वार्धात एक चित्रपट आणि उत्तरार्धात वेगळाच चित्रपट असा विभागला जातो. कोणाला हा आवडेल, तर कोणाला तो. दोन्ही आवडण्यासाठी आणि दोन्ही एकाच चित्रपटाचे भाग म्हणून आवडण्यासाठी, तुमची वृत्ती फारच क्षमाशील हवी.

तंत्र आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबतीत चित्रपट भन्साली स्कूलच्या इतर कोणत्याही चित्रपटाप्रमाणे चकाचक आहे. नेपथ्य, वेशभूषा, गाणी , वगैरे सारं लोकाग्रहाला साजेसं आहे. मात्र या सार््यात मला एक सुपरफिशीअॅलिटी जाणवली. म्हणजे इथे काळ हा दृश्यरुपात पूर्ण उभा राहातो मात्र यातल्या व्यक्तिरेखांचं वागणं हे विशिष्ट काळाशी जोडलेलं नसून कथेच्या सोयीशी जोडलेलं वाटतं. पात्रांच्या वागण्यामागेही काही खास लाॅजिक दिसत नाही. विशेषतः वरूनच्या , जो कधीही तर्काला धरुन वागत नाही. पूर्वार्धात आपल्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची सहज संधी तो घेत नाही तसाच उत्तरार्धातही तो आपल्या विरोधकांच्या योजनांची पर्वा करत नाही. पाखीचं लिखाण आणि वरुनची चित्रकला हा तर एक अफलातून विनोद आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार यांना इतर कलांची माफक, निदान संहितेच्या गरजेपुरती माहिती असावी अशी अपेक्षा आहे, मात्र इथे त्यांनी पाजळलेलं चित्रकलेचं ज्ञान म्हणजे कमाल आहे. त्याला अर्थात मूळ गोष्टीचा संदर्भ आहे पण तपशीलात गोंधळ आहेच.

लुटेराची सर्वत्र आलेली परीक्षणं उत्तमोत्तम आहेत हे मी जाणतो. ती का हे मी सांगू शकत नाही. सादरीकरणात तो विथ डिस्टिंक्शन उत्तीर्ण आहेच. कदाचित तेवढंच या परीक्षकांसाठी पुरेसं असेल. म्हणजे हा आपला माझा अंदाज !

-गणेश मतकरी.

7 comments:

kaustubh July 8, 2013 at 5:29 AM  

गोंधळलेला लुटेरा …
मला पटले

kaustubh July 8, 2013 at 5:29 AM  
This comment has been removed by the author.
Unknown July 8, 2013 at 4:32 PM  

perfect review...ya totally agree with you...thanx

हेरंब July 8, 2013 at 7:14 PM  

>> दोन्ही आवडण्यासाठी आणि दोन्ही एकाच चित्रपटाचे भाग म्हणून आवडण्यासाठी, तुमची वृत्ती फारच क्षमाशील हवी.

हाहाहाहा.

Ashish July 13, 2013 at 1:35 AM  

इ स्क्वेयर मध्ये पॅसिफिक रिम बघत होतो. त्याच्या सारखा चुत्याप्स पिक्चर नाही.

इंटरवल लाच तिथून उठून "लुटेरा" पाहिला. अमे"झिंग" आहे. तरल कथा आणि आणि स्वर्गीय पार्श्वसंगीत. बॉलीवूड चे सिनेमे बऱ्याचदा प्रेक्षकांना पार बिनडोक समजून एकतर खूप डीटेल्स टाकून बेचव केलेले असतात किंवा तर्काचा पार चुराडा करतात. लुटेरा त्या पठडीतला वाटला नाही. इंटरवल नंतरचा भाग बघताना राहून राहून वाटले की हा नक्कीच कुठल्यातरी हॉलीवूड च्या पिच्चर वरून ढापला असावा.
पण सादरीकरणाबद्दल तुम्ही जे म्हणालात त्यामुळे तसा तो अगदी ह्रिदयाला भिडला. नन्तर विकीने सांगितले की तो भाग ओ हेन्रीच्या कथेवर बेतलाय. पण तरीही त्यात वेगळेपण आहे. पाखीच्या आपल्या वडलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वरुणला न विसरणं आणि पोलिसांपासून दडवून ठेवणं. तिच्या मनाची घालमेल, त्याने तिथून जावं म्हणून वरवर झटापटी करणं आणि सकाळी उठून घरभर त्याचा ठाव घेणं हे किती अप्रतिम आहे.. इथे ओ.हेन्रीचा कुठे संदर्भ येतो? आणि तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध वेगवेगळे असते तर पाखीच्या या वागण्याला काही संदर्भ राहिला नसता. तिच्या या प्रेमाचे कडू-गोड कंगोरे कसेकाय दाखवू शकले असते कोणी?

तुमचा पंखा असलो, तरी मला कधी कधी तुमचा राग येतो. क्रिटिक म्हटले की चिरफाड करावीच असल्या प्रथेचे तुम्ही पाईक आहात असे वाटते. कला ही विज्ञान किंवा अर्थशास्त्रासारखी सूत्रबद्ध असलीच पाहिजे का?

चित्रपट आवड्ण्याला आणखी एक कारण होते. डलहौसी जवळच्या कालाटॉप च्या बंगल्याच्या परिसरात सेकंड हाफ चित्रित केलाय. डिसेंबर २००८ च्या युथ होस्टेल च्या ट्रेक मध्ये या बंगल्याच्या गेस्ट हाउस मध्ये आम्ही रात्री थांबलो होतो. तिथला हिमवर्षाव बघायचा राहिला होता. या कथेच्या पार्श्वभूमीवर तो बघणे यापेक्षा आणखी काय हवे? मला तर बाबा हा सिनेमा नितांत सुंदर वाटला.

Sneha July 14, 2013 at 6:18 AM  

दोन्ही भाग स्वतंत्रपणे सादरीकरणात चांगले असले तरी तुम्ही म्हणालात तसं ते एकाच चित्रपटाचे दोन भाग म्हणून स्वीकारण अवघड आहे. उत्तरार्धात येणारा redemption चा भाग अगदी कथासूत्र म्हणून जरी मान्य केला तरी तो ‘लास्ट लीफ’ च्या मार्गाने जाण हे निश्चितच जोडकाम केल्यासारख आणि आधीच्या कथानकाशी विसंगत वाटतं. आणि पात्रांच्या वागण्यामागे लॉजिक नसणं हे खरोखरच फार खटकत. ‘दोन्ही आवडण्यासाठी आणि दोन्ही एकाच चित्रपटाचे भाग म्हणून आवडण्यासाठी, तुमची वृत्ती फारच क्षमाशील हवी’, हे एकदम पटलं. अतिशय मुद्देसूद आणि समर्पक असं परीक्षण झालं आहे.

ganesh July 14, 2013 at 10:11 PM  

Thanks all. Ashish , I don't think there is a hard and fast rule and I actually think I am very lenient most times. Still ,some films really get to me because it feels there is something wrong at a fundamental level. O Henry's story is about a very ill woman who wants to die when the last leaf from a tree falls and an artist ( who wants to paint a masterpiece some day) who uses an idea to save her. sounds familiar. since we have no snow in most places ,the second half happens in dalhousey . this is the kind of manipulation even black had and I really hate., Since u did not like Pacific Rim, you will find my next article equally strange where i say it is a good film. I have a perfectly good reason to do so.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP